डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

व्यक्तिगत विश्वसनीयतेकडून सामाजिक विश्वस्ततेकडे

माझ्या कृतीला मीच जबाबदार असल्याची जाणीव मला चांगल्या मार्गावर ठेवत असते. या उलट मला वाचवायला राजकारण आहे, जातिकारण आहे किंवा माझ्या साऱ्याच बऱ्यावाईटावर पांघरूण घालणाऱ्या व्यवस्था मला उपलब्ध आहेत ही जाणीवच मला उद्दाम व बेबंद बनवीत असते. नवे जग स्पर्धेचेही असेल. त्यात साऱ्यांच्याच व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे झिजतील. माणसे परस्परांसोबत संबंध जुळविताना आपल्या चांगल्याच बाजू समोर आणतील. स्पर्धा आणि व्यक्तिगत गुणवत्ता ही ज्या समाजजीवनाची मूल्ये असतील त्यात अर्थोत्पादनाच्या प्रेरणाही प्रबळ असतील आणि त्या मुक्तही असतील. मात्र जात, पात, वंश, धर्म यांचे प्रतिष्ठेशी जुळलेले नाते तेव्हाही कायम राहील काय? जमशेटजी टाटा किंवा घनश्यामदासजी बिर्ला यांच्याहून आताच्या अंबानी-मित्तलांसारख्या भांडवलदारांची संपत्ती मोठी आहे. मात्र सामान्य माणसांच्या मनात पूर्वीच्या टाटा-बिर्लांविषयी वसणारा आदरयुक्त दरारा आज राहिला आहे काय? तेव्हाच्या कारखानदारीकडे आणि धनसंचयाकडेही विश्वासाने पाहिले गेले. आता तसे पाहिले जाते काय? 

जगाने लहान होणे आणि त्याच वेळी त्याने सपाट होत जाणे ही प्रक्रिया साधी नाही. ती सरळ वा सुखरूप पार पडणारीही नाही. तो क्रमाने व वेगाने होत जाणारा प्रवास असला तरी त्याचे स्वरूप अडथळ्यांच्या शर्यतीसारखे आहे. जग लहान होण्याच्या प्रक्रियेत ज्यांच्या साम्राज्यांच्या सीमांचा किंवा प्रभावाच्या विस्ताराचा संकोच होणार आहे त्यांना तसे होणे मानवणारे नाही. ते सपाट होण्याने ज्यांना त्यांचे आजवरचे उंच असणे विसरावे लागेल त्यांचे अवघडलेपणही या प्रक्रियेत अडचणीचे ठरणार आहे. ज्या वर्गांना आजवर दूर असलेली क्षितिजे जवळ आलेली दिसतील ते वर्ग आनंदून जाणार असले आणि कालपर्यंत जे कमी उंचीचे ठरविले गेले त्यांना त्यांचे ठेंगणेपण हरवता आल्याने तेही हर्षभरित होणार असले तरी या प्रक्रियेत जे गमावणारे असतील ते दुखावणार आहेत. ही प्रक्रिया आता सुरू झालेली असल्यामुळे तिच्या तशा प्रतिक्रिया पडसादासारख्या दिसूही लागल्या आहेत. ‘आमच्या देशात वा भूमीत इतरांना वास्तव्य आणि व्यापार करू देणार नाही.

देशात येणाऱ्या परकीयांवर निर्बंध घातले पाहिजेत. ऑस्ट्रेलियाच्या गोऱ्या भूमीवर काळ्या भारतीयांना स्थान नाही. अमेरिकेतील जे उद्योग बंगलोरमधून आऊटसोर्सिंग करतील त्यांच्यावर निर्बंध लावू किंवा विदेशातून येणाऱ्या स्वस्त मालावर जास्तीचे आयातकर लावले पाहिजेत’ यांसारख्या आताच्या अंतर्गत व आंतरराष्ट्रीय राजकारणात उठणाऱ्या गर्जना या पडसादाची साक्ष पटविणाऱ्या आहेत. त्याच वेळी ‘भूमिपुत्रांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, मराठी भूमीत हिंदी भाषिकांना स्थान नाही, तामिळांनो, मुंबईतून चालते व्हा, हिरव्यांना हाकला, मिशनऱ्यांना पळवा, मणिपुरी माणसे येथे कशाला’ यांसारख्या ज्या घोषणा आपण ऐकतो त्याही याच संकोचामुळे ज्यांच्या महत्त्वाकांक्षा आवळल्या गेल्या त्यांचा संताप सांगणाऱ्या आहेत. गरीब आणि अविकसित देशांमध्ये किंवा समाजाच्या सामान्य व मध्यम वर्गांमध्येच हा संताप नाही.

अमेरिका आणि ऑस्ट्रेलियापासून जर्मनी व फ्रान्ससह एके काळी उदारमतवादी म्हणविल्या गेलेल्या देशांतही ही लाट सध्या मोठी झाली आहे. या संतापाची तऱ्हा जागोजागी वेगळी आहे. कुठे ती अतिरेकी राष्ट्रवादाचे रूप घेताना दिसते तर कुठे धार्मिक अहंतांच्या रूपाने विक्राळ होताना आढळते. जातीय, वांशिक किंवा फार कशाला कौटुंबिक अस्मितांच्या कडा असलेले जे असहिष्णुपण आपण आज पाहतो त्याचेही मूळ लहान आणि सपाट होत जाणाऱ्या जगाच्या याच अंतरंगाशी जुळले आहे. हा संताप प्रतिक्रियेच्या स्वरूपाचा आहे आणि प्रतिक्रियांचे आयुष्य मोठे होत असलेल्या विझणाऱ्या दिव्यांसारखे असते. या प्रतिक्रियांचा ते धारण करणाऱ्यांनाच पुढे कंटाळा येऊ लागतो. त्यांच्या पुढच्या पिढ्या त्यांचे नकारात्मक स्वरूप लक्षात घेऊन त्यांचा तिटकाराही करू लागतात.

हिटलरच्या मागे वेड्यासारखा गेलेला जर्मन समाज आता त्याचे नावही उच्चारत नाही. ‘आमच्या देशाच्या इतिहासातले ते तमोयुग होते’ असे सांगून विली ब्रँड या जर्मनीच्या नोबेल पारितोषिक विजेत्या चॅन्सेलरने (पंतप्रधान) नाझी-जर्मनीचे वर्णन नंतर केलेही आहे. परवाचे धर्मांध, काल विसरण्याजोगे आणि आज तिरस्करणीय झाले आहेत. कालच्या जात्यंधांचा प्रभाव आज ओसरताना दिसत आहे आणि उद्या तो हास्यास्पद ठरणार आहे. वंशाभिमान मागे पडला आहे आणि भाषांचे अभिमानही माघारलेल्या मनोवृत्तीचे द्योतक ठरू लागले आहेत. आमची संस्कृती तुमच्या संस्कृतीहून श्रेष्ठ असे म्हणण्यातले फोलपण साऱ्यांच्या लक्षात आले आणि आमचे राष्ट्र तुमच्या देशाहून महान असे सांगण्यातला खोटा अहंकारही सर्वपरिचित झाला आहे.

एक गोष्ट मात्र खरी, विझत जाणारे हे कालचे वास्तव त्याच्या अस्तित्वासाठी जी अखेरची झुंज देईल ती निकराची व प्रसंगी हिंस्रही असेल. अशा हिंसक लढती जगाच्या अनेक भागांएवढ्याच आपल्या देशातील अनेक राज्यांतही उभ्या होत असलेल्या आपण पाहत आहोत.  नव्या आव्हानांचे एक स्वरूप वैचारिकही आहे. जुन्या व समूहाधारित विचारसरणींचा नव्या संक्रमणात क्रमाने पाडाव होत जाणार आहे. एके काळी साऱ्या समाजावर अधिराज्य गाजवणाऱ्या या विचारसरणी आपला पराभव एकाएकी मान्य करणार नाहीत. आपल्या वैचारिक वर्चस्वासाठी त्या लढतील. अशा लढती तालिबानांच्या आणि माओवाद्यांच्या रूपात आपण पाहत आहोतच. अमेरिकेतील कू-क्लक्स-क्लॅन ही अशीच वर्णवर्चस्ववादी संघटना आता लढून दुबळी झाली आहे. अशा संघटनांच्या लढ्याचे स्वरूपही नीट लक्षात घ्यावे असे आहे. त्यांचे सेनापती कुशल आणि राजकारणी तर अनुयायी अशिक्षित आणि भाबडे आहेत. अडाणी अनुयायांच्या प्रतिगामी अस्मिता चेतवून हे शहाणे पुढारी त्यांना मरायला पुढे करतात आणि आपल्या वैचारिक अस्तित्वाचे दर्शन जगाला घडवीत असतात. कोणत्याही तऱ्हेच्या बौद्धिक वा आधुनिक आव्हानावर त्यांचा भर नसतो. अनुयायांचे मागासलेपण हीच त्यांची खरी ताकद असते.

पूर्वीचे जमीनदार आणि सरंजामदार आपल्या प्रजाजनांना शिकू देत नसत. ही माणसे शिकली तर ती आपल्या ताब्यात राहणार नाहीत ही भीती त्यांना छळत असे. आताच्या वर्णवंशवादी पुढाऱ्यांना आपल्या अनुयायांचे अडाणीपण त्याचसाठी हवे असते. या संदर्भात एक महत्त्वाची व दिलासा देणारी बाबही साऱ्या संबंधितांनी लक्षात घ्यावी अशी आहे. या लढतीत प्रतिगामी ताकदींना काही काळ विजय मिळताना दिसले तरी अंतिमतः त्यांचा पराभव अटळ असतो. त्यांची लढत त्यांच्या हरवत असलेल्या हितसंबंधांसाठी असते आणि तिचे वैय्यर्थ ती देणाऱ्यांनाही कळून चुकलेले असते. जगाचा प्रवास निखळ माणुसकीच्या दिशेने होत आहे. या प्रवासाचा मार्ग अडवून धरू पाहणारे हे माणुसकीच्या प्रगतीच्या मार्गातील गतिरोध आहेत. अडसर अटकाव करू शकतात, कायमची अडवणूक हे त्यांच्या क्षमतेबाहेरचे आव्हान आहे. त्यामुळे या अडसरांकडे फारशा गांभीर्याने पाहण्याचे कारण नाही.

जगाच्या इतिहासातला कोणताही वर्ग व देश शंभर टक्क्यांएवढा प्रगत वा तेवढाच माघारलेला कधी नव्हता. त्यातल्या प्रत्येकाचे स्वरूप या संदर्भात नेहमीच व्यामिश्र आणि सरमिसळच राहिले आहे. त्यामुळे कोणताही समाज वा वर्ग तणावमुक्त असतो वा राहिला असे समजण्याचे कारण नाही. व्यक्तींचे वेगळेपण जोवर सजीव आहे आणि त्याला फुटणारे नवे धुमारे जोवर अंकुरत राहणार आहेत तोवर या तणावांना अंत नाही. हा अंत या सजीवपणाला आणि त्याला फुटणाऱ्या धुमाऱ्यांना ‘जागा’ (स्पेस) देण्याएवढे आपले सहजीवन जेव्हा मोकळे आणि सैल होईल तेव्हाच होणार आहे. समाजव्यवस्था स्थितिवादी आणि व्यक्ती गतिमान असल्याचा हा अपरिहार्य परिणाम आहे आणि त्याची मागणीही तशीच राहणार आहे.

समाजाचे बळ त्याच्या संघटित प्रभावात आहे व ते कमी होत असले तरी अजून शिल्लक आहे. या उलट व्यक्तीचे बळ वाढते आहे. तिला ज्ञानाएवढीच विज्ञानाची आयुधे आता उपलब्ध झाली आहेत. तंत्रविज्ञानाने तिचे सामर्थ्य अधिक वाढवीत नेले आहे. झालेच तर लोकशाही व्यवस्थेतील कायदा व्यक्तीच्या बाजूने उभा आहे. तिला संवैधानिक संरक्षण मिळाले आहे. (भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार त्या घटनेने समाजाला, समुदायाला, धर्माला, जातीला वा वर्गाला दिलेले नाहीत. ते व्यक्तीला दिलेले अधिकार आहेत आणि त्यांची गळचेपी करण्याचा अधिकार समाजाएवढाच राज्यालाही असणार नाही अशी ग्वाहीही या घटनेने दिली आहे.) या संघर्षाचा वा स्पर्धेचा शेवट व्यक्तीच्या विजयात होईल याविषयी त्याचमुळे कोणाच्या मनात शंका राहण्याचे कारण नाही. त्यासाठी व्यक्तीचे आत्मबळ वाढणेच तेवढे गरजेचे आहे.

‘एक सत्यवचनी व समर्थ व्यक्ती हेच समाजातले खरे बहुत आहे’ हे सुभाषित या अर्थाने पाहायचे आहे. या बदलाची चांगली बाजू ही की त्यात व्यक्ती मुक्त असेल आणि तिच्यावरची सारी बंधने गळून पडतील. अशा व्यक्ती स्वैर होण्याची शक्यता असेल की नाही, ही या संदर्भात विचारली जाणारी शंका महत्त्वाची आहे. या व्यवस्थेत बळी तो कान पिळी किंवा मात्स्यन्याय येण्याची शक्यता कितपत असेल हाही याच विषयाशी संबंध असणारा दुसरा प्रश्न आहे. या बदलाचे स्वागत करू इच्छिणाऱ्यांनी या शंकांमुळे बिचकण्याचे मात्र कारण नाही. आज धर्माची बंधने आहेत, सामाजिक निर्बंध अजून पुरते सैल झाले नाहीत. जातींची व कुटुंब व्यवस्थेची नियंत्रणे अजून व्यक्तींवर आहेत आणि ती असतानाही बेबंद वागणारी माणसे जगात आणि आपल्यात आहेत. ही बंधने नसती तरी चांगले व समाजशील वर्तन करतील असा ज्यांच्याविषयी विश्वास वाटावा अशीही माणसे समाजात आहेत आणि त्यांचीच संख्या मोठीही आहे.

बंधने असली तरी ज्यांना स्वैर वागायचे ती माणसे तशीच वागणार आणि ज्यांना वाईट वागायचे नसते वा तसे वागता येत नाही ती बंधने असली वा नसली तरी चांगलीच वागतात. बऱ्यावाईट माणसांचे प्रमाण आज आहे तेवढेच पुढेही राहणार आहे. फरक, आपल्या चांगल्या व वाईटाचे समर्थन मांडायला जातिधर्माच्या कसोट्या यापुढे उरणार नाहीत हा आहे व तीच उद्याच्या व्यवस्थेच्या जास्तीच्या चांगुलपणाची हमी आहे. माझ्या कृतीला मीच जबाबदार असल्याची जाणीव मला चांगल्या मार्गावर ठेवत असते. या उलट मला वाचवायला राजकारण आहे, जातिकारण आहे किंवा माझ्या साऱ्याच बऱ्यावाईटावर पांघरूण घालणाऱ्या व्यवस्था मला उपलब्ध आहेत ही जाणीवच मला उद्दाम व बेबंद बनवीत असते. नवे जग स्पर्धेचेही असेल. त्यात साऱ्यांच्याच व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे झिजतील.

माणसे परस्परांसोबत संबंध जुळविताना आपल्या चांगल्याच बाजू समोर आणतील. जातींनी दिलेला मस्तवालपणा, धर्माने दिलेले आगाऊ शहाणपण आणि राजकीय बळाने दिलेले उद्दामपण अशा गोष्टी व्यक्तींच्या समाजात असणार नाहीत. पुढे जाणे आणि सुरक्षित राहणे या दोन्ही गोष्टी मला स्वबळावरच कराव्या लागणार असल्याने माझ्या वागण्यात संयमही येईल. हा संयम भीती वा दडपणातून न येता आत्मसामर्थ्यातून आला असेल. त्याला सामाजिकतेच्या कुबड्या लागणार नाहीत आणि जातिधर्मासारख्या बाह्य व गैरलागू ऊर्जास्थानांचीही गरज पडणार नाही. शिवाय स्वातंत्र्य आले की माणसे स्वैराचारी होतात हाही एक अपसमज आहे. आपल्याकडील चाणक्यापासून तिकडच्या हॉब्ज आणि मॅकव्हिलीपर्यंतच्या विचारवंतांनी तो जोपासलाही आहे. मात्र त्याचवेळी माणसे स्वतंत्र असली की चांगली वागतात असा निर्वाळा देणारे विचारवंतही जगात आहेत व त्यांचेही मोठेपण इतिहासमान्य आहे.

गांधीजींचा आध्यात्मिक अराज्यवाद हा असा विचार आहे. त्यात राज्य नसेल, शासन नसेल, कायदा आणि तुरुंग असणार नाहीत. त्यात मुक्त व स्वयंपूर्ण झालेली माणसे परस्परांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करीत समाधानाने राहणारी असतील. ज्ञानी व तत्त्वज्ञ बनलेल्यांना कायद्याचेच काय पण कुटुंबाचेही बंधन नको असा विचार सांगणारा प्लेटोही इतिहासाला ज्ञात आहे. दर वेळी हॉब्ज किंवा मॅकेव्हिली यांची भीती दाखवून माणसांतले वाईटपण अधोरेखित करीत राहणे हा प्रकारही निराश करणारा आहे. समाजातील बहुसंख्य माणसांचे व्यक्तिगत चांगुलपण हीच आपल्या आजच्याही समाजशीलतेची खरी ताकद आहे. नव्या व्यवस्थेतही ती तशीच राहणार आहे. राग लोभ आणि द्वेषासारख्या विकारांचे मूळ माणसाच्या स्वभावात आहे की सामाजिक संस्कारात, हा मानसशास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे. हे विकार इतरांच्या संदर्भातच उद्‌भवत असतील तर सामाजिकता शिथिल होण्याचा त्यांच्यावर होऊ शकणारा परिणाम हादेखील चिकित्सेचा विषय होणार आहे.

राग कोणाचा, मत्सर कशाचा आणि मोह कशाविषयीचा असा विचार करू लागलो की या गुणविकारांचे प्रतिक्रियात्मक रूप लक्षात येते. समाजावर वा सामूहिकतेवर विसंबून न राहणाऱ्या स्वयंपूर्ण व्यक्तींच्या मैत्रीपूर्ण समाजात अशा विकारांचे महत्त्व किती असेल आणि त्यामुळे त्यांची वर्तणूक किती प्रभावित होईल? व्यक्तिगत विकार समूहावर स्वार झाले की हिंस्र होतात. तसे ते आज आपण पहातही आहोत. माणसे स्वतःच्या मतानुसार वागू लागली वा विचार करू लागली की त्यांचे असे सामूहिक वेडाचार संपण्याचीच शक्यता अधिक राहील... प्लेटो म्हणाला, माणसे समुदायात वेगळी वागतात कारण समुदायाचे एक मन असते आणि ते भावनेच्या आहारी जाणारे असते. माणूस एकटा असला की त्याचे स्वतःचे मन त्याला जे मार्गदर्शन करील ते अधिक विश्वसनीय असेल कारण ते विवेकाच्या अधिक जवळचे असेल.

नव्या व्यवस्थेत स्पर्धा असेल आणि ती व्यक्तिगत गुणवत्तेच्या बळावर जिंकावी लागेल. ज्ञानाचा, माहितीचा आणि प्रकाशाचा स्फोट एवढा मोठा असेल की त्यात लबाडीला आणि छुप्या पळवाटांना जागा नसेल. पाठीशी कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे, जातीच्या आरक्षणाचे, धर्माच्या बचावाचे आणि झालेच तर राष्ट्राच्या नागरिकत्वाचेही पाठबळ नसेल. अशा वेळी स्वतःला सिद्ध करणे ही प्रत्येकाची व्यक्तिगत जबाबदारी असेल. ती पुढे जाण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी आणि प्रभावी वा मोठे होण्यासाठी गरजेची असेल... माणसामाणसांचे संबंधही याच कमी अधिक प्रभावाच्या व्यक्तिगत बळावर निश्चित होतील. मैत्रीच्या संबंधात निर्बंध नसले तरी प्रभावी असणे आणि प्रभावित होणे हा संबंध असतोच. तोच व्यवहार सार्वत्रिक होईल. प्रशंसेची व मान्यतेची गरज तेव्हाही असेल. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेच्या आधारावर ती मिळविण्याची धडपडही असेल.

पैसा आणि अर्थबळ हे मानवी आचार निश्चित करणारे साधन तेव्हाही असेल काय, हा प्रश्न येथे विचारता येईल. स्पर्धा आणि व्यक्तिगत गुणवत्ता ही ज्या समाजजीवनाची मूल्ये असतील त्यात अर्थोत्पादनाच्या प्रेरणाही प्रबळ असतील आणि त्या मुक्तही असतील. मात्र जात, पात, वंश, धर्म यांचे प्रतिष्ठेशी जुळलेले नाते तेव्हाही कायम राहील काय? जमशेटजी टाटा किंवा घनश्यामदासजी बिर्ला यांच्याहून आताच्या अंबानी-मित्तलांसारख्या भांडवलदारांची संपत्ती मोठी आहे. मात्र सामान्य माणसांच्या मनात पूर्वीच्या टाटा-बिर्लांविषयी वसणारा आदरयुक्त दरारा आज राहिला आहे काय? तेव्हाच्या कारखानदारीकडे आणि धनसंचयाकडेही विश्वासाने पाहिले गेले. आता तसे पाहिले जाते काय? मार्क्स म्हणाला, सगळे भांडवल ही चोरी आहे.

आताचा सुशिक्षितांचा व विशेषतः तरुणांचा वर्ग आजच्या भांडवली घराण्यांकडे आदराने पाहतो की अपराध्यांसारखे? मार्क्सचे वचन तेव्हापेक्षा आज समाजाच्या जास्तीचे गळी उतरले आहे की अल्पकाळात धनवंत होणाऱ्यांच्या व्यवहारांविषयीची जास्तीची स्पष्टता आता निर्माण झाली आहे? गेल्या एकदोन दशकांत अब्जाधीश झालेल्या पुढाऱ्यांविषयी त्यांचेच अनुयायी जे बोलतात ते याहून वेगळे नाही. एक गोष्ट आणखीही महत्त्वाची. भांडवलदार आणि भांडवलशाही असेल पण तिच्या संपत्तीवरची मालकी यापुढे विकेंद्रितही होत जाईल. अंबानींच्या उद्योगात तीस लाखांहून अधिक भागीदार (शेअर होल्डर्स) आज आहेत.

आज या उद्योगसमूहावर एका कुटुंबाचे नियंत्रण दिसते. हे पुढच्या काळात तसे राहणार नाही. या उद्योगांत पैसा गुंतवणारे भागीदार उद्या त्यांच्या नियंत्रणातही भागीदारी मागतील. अशा मागण्या थोपविणे या उद्योगांच्या मालकांएवढेच लोकशाहीतील सरकारांनाही फार काळ जमणार नाही. एका पक्षाची अरेरावी ज्या लोकशाहीत खपवून घेतली जात नाही तीत एका घराण्याची सामायिक पैशावरील मालकी बिनबोभाट चालू दिली जाईल अशी शक्यताही फारशी उरणार नाही. अंबानींचे तीस लक्ष भागीदार असे अधिकारसंपन्न झाले तर गांधीजींच्या कल्पनेप्रमाणे अंबानी हे त्यांच्या ताब्यातील उद्योगांचे फक्त विश्वस्त होतील आणि राजकीय लोकशाहीच्या जोडीने आर्थिक लोकशाही जगात उभी राहिलेली दिसू लागेल. हे इच्छाचिंतन नाही.

अमेरिकेतील बड्या उद्योगसमूहांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेतन, मानधन आणि भत्ते यांवर मर्यादा घालण्याचे निर्देश अध्यक्ष बराक ओबामा यांनी अलिकडेच दिले आणि उद्योगपतींना त्यांच्या इच्छेविरुद्ध ते मान्य करायला त्यांनी भागही पाडले. भारतातील खासगी क्षेत्रात नोकरभरती कशी करायची याचे निर्देश सरकारने त्यांना द्यावे अशा मागण्या आताच पुढे येऊ लागल्या आहेत. भागीदारांना किती प्रमाणात मोबदला द्यावा हे ठरवायला उद्योगपती आजही मोकळे नाहीत. होऊ घातलेल्या ऊर्ध्वगामी परिवर्तनाची ही परिणती आहे. मालक विश्वस्त होतील तरच टिकतील असे सांगणारे हे संकेत आहेत. एक बाब आणखीही होईल. भागीदारांचे वर्ग मोठे होतील आणि लोकशाहीच्या राजकारणावर त्यांचा वरचष्मा वाढेल. मात्र उद्योगपतींसमोर पैशासाठी लाचार होणारे राजकारण मतांच्या गरजेसाठी भागीदारांच्या मोठ्या वर्गांकडेही वळताना दिसेल.

नागरिक आपल्या अधिकारांबाबत जसे डोळस होतील तसे ते आपल्या होणाऱ्या फसवणुकीबाबत आणि लुटीबाबतही सावध होतील. ती चिन्हे आज आपण पाहतही आहोत. या वर्गाच्या डोळसपणाचा वचक राजकारणावर बसून त्यालाही अर्थकारणाबाबत आणखी विधायक व लोकाभिमुख भूमिका घ्याव्या लागतील. अमेरिकेत समाजवाद हा शब्द तिरस्काराने उच्चारला जातो. मात्र सामान्य ग्राहकांच्या हितासाठी होणाऱ्या कायद्यांचे त्याही देशात स्वागतच होते. आपण लोकशाहीत राहतो. ज्या देशांत अजून लोकशाही आली नाही त्यांतही येत्या काही वर्षांत ती येणार आहे. रशियाचे आणि पूर्व युरोपचे उदाहरण त्यासाठी पुरेसे आहे.

चीन किंवा म्यानमारसारखे जे देश अजून हुकूमशाहीला चिकटून आहेत त्यातल्या हुकूमतींना तडा जाऊ लागल्याची चिन्हे जगाने पाहिली आहेत. तियानमेन चौकातील विद्यार्थ्यांचा उग्र लढा किंवा आँग सान स्यू की चा तुरुंगवास ही तीच चिन्हे आहेत. दक्षिण अमेरिका किंवा आफ्रिकेतील ज्या देशांत जमातींची हुकूमशाही आहे तेथेही जमातवादाची जागा व्यक्तिगत अधिकारांनी घ्यायला आता सुरूवात झाली आहे. लोकशाहीत लोक सामर्थ्यवान होतात, नव्या मन्वंतरात ते व्यक्ती या नात्यानेही सामर्थ्यशाली व समान होतील. अशी समर्थ व समान माणसे काही थोड्या माणसांजवळचे आर्थिक केंद्रीकरण खपवून घेणार नाहीत. त्या केंद्रीकरणाला कायदा वा संविधानही फारसे संरक्षण देऊ शकणार नाही. तसे संरक्षण देणारे कायदे आणि संविधान बदलण्याचे बळ पुन्हा सामान्य माणसांमध्येच आलेले असेल.

मार्क्सने श्रमिकांच्या हिंसक क्रांतीची कल्पना मांडली व कामगारांच्या हुकूमशाहीचे कल्पनाचित्र रेखाटले. लोकशाहीच्या विकासप्रक्रियेत धनिकांविरुद्ध हिंसाचार उभा करण्याची गरज असणार नाही. त्यांच्या मुनाफाखोरीवर आणि भांडवलावर लोकनिर्मित कायद्यांचीच बंधने येतील. राजकीय लोकशाही आणि आर्थिक एकाधिकार या तशाही परस्परविसंगत व्यवस्था आहेत. त्या आज टिकल्या असण्याचे कारण लोकशाहीचा विकास केवळ राजकीय अधिकारांपुरता मर्यादित असणे हे आहे. तो तसा राहण्यासाठी आजचे समूहांचे व त्यांच्या पुढाऱ्यांचे मर्यादित राजकारण कारणीभूत आहे. राजकारणातले पुढारी आणि अर्थकारणातले एकाधिकारशहा यांच्यातले मूक संगनमत त्याला जबाबदार आहे. समूहांएवढाच पुढाऱ्यांचा वरचष्मा जसजसा ओसरू लागेल तसतसे त्यांच्या अशा हितसंबंधांविषयीचे प्रश्न पुढे येतील आणि ते विचारले जातील. अशा वेळी या माणसांनाही आपल्या हितसंबंधांवर पाणी सोडण्याची तयारी करावी लागेल. आर्थिक एकाधिकार ही लोकशाहीत न बसणारी बाब आहे. पुढाऱ्यांना जसा जनतेला जाब द्यावा लागतो तसा तो येत्या काळात उद्योगक्षेत्रातील कर्णधारांनाही द्यावा लागणार आहे. राजकीय लोकशाहीला जोडून येणाऱ्या आर्थिक लोकशाहीची तीच नांदीही ठरणार आहे.

Tags: सामाजिक विश्वस्तता व्यक्तिगत विश्वसनीयता हिटलर विली ब्रँड वंशाभिमान कू-क्लक्स-क्लॅन हॉब्ज मॅकव्हिली आध्यात्मिक अराज्यवाद capitalist भांडवलदार विश्वस्त development of democracy लोकशाहीचा विकास suresh dwadashiwar सुरेश द्वादशीवार weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात