Diwali_4 सेक्युलॅरिझम
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

आधुनिक जगात सेक्युलर हा शब्द प्रथम 1851 मध्ये त्याच्या आजच्या अर्थानिशी वापरात आला. तो घडविण्याचे श्रेय जॉर्ज जेकब होलिओक (1817 ते 1906) या फ्रेंच तत्त्वचिंतकाला आहे. ‘ओरॅकल’ आणि ‘द मूव्हमेंट’ या दोन नियतकालिकांचे संपादन केलेला होलिओक हा ऑगस्ट कोमटे या समाजशास्त्रज्ञाच्या चिंतनाने प्रभावित झाला होता. या कोमटेनेच ‘माणुसकीचा धर्म’ (रिलिजन ऑफ ह्यूमॅनिटी) ही संकल्पना चर्चेत प्रथम आणली. हॅरियट नावाच्या होलिओकच्या समकालीन तत्त्वचिंतिकेने त्याच अर्थाने ‘विवेकाचा प्रकाश’ (लाईट ऑफ रिझन) हा शब्द वापरला.

सगळी थोर माणसे बदलत्या काळानुसार आचार- विचारांनी जास्तीची समृद्ध, प्रगल्भ व अधिकची सर्वसमावेशक होत असतात. सगळ्या भव्य संकल्पनांबाबतही हे खरे आहे. त्यांचे अर्थ काळानुरूप बदलतात आणि विस्तारत जातात. लोकशाहीचा जो अर्थ आज आपण लावतो, तो प्राचीन भारतात व ग्रीक गणराज्यात नव्हता. आताचा अर्थ कालपरत्वे बदलत जाऊन आपल्यापर्यंत आला आहे. तेव्हाच्या भारतीय गणराज्याचे वर्णन ‘लोकशाही राज्य’ असे होत असले, तरी त्या गणराज्यात कुलप्रमुखांची सत्ता चालायची. काशीप्रसाद जयस्वाल आणि देवीप्रसाद चट्टोपाध्यायांची संशोधने वाचली; तर त्यात मोठ्या प्रमाणावर गुलामगिरीही होती, हे लक्षात येते. अथेन्स आणि स्पार्टासारखी ग्रीक गणराज्येही गुलामांच्या श्रमांवर जगत व श्रीमंत होत होती. त्यांच्या एकूण लोकसंख्येत दोन-तृतीयांशाएवढे गुलाम व एक-तृतीयांश कमी नागरिक होते. तरीही राज्यशास्त्रात व इतिहासात त्यांचा उल्लेख ‘लोकशाही गणराज्ये असाच येतो.’ ‘गुलामांना आत्मा नसतो असे समजणारी ही राज्ये लोकशाहीची कशी,’ असा प्रश्न तेव्हाच्या विद्वानांनाही कधी पडल्याचे दिसत नाही... या लोकशाह्यांचे स्वरूप व अर्थही काळानुरूप तत्त्वज्ञांच्या मतांनुसार बदलते राहिले. अथेन्सच्या ज्या न्यायालयाने सॉक्रेटिसला मृत्युदंड दिला, ते लोकन्यायालय होते आणि त्याच्या न्यायपीठावर 500 नागरिक बसले होते. सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो त्याचमुळे लोकशाहीवर संतप्त होता. त्याच्या मते, लोकशाही हे गर्दीचे- म्हणजे झुंडीचे- राज्य होते. प्लेटोचा शिष्य ॲरिस्टॉटल मध्यमवर्गीयांच्या राज्याला खरी व चांगली लोकशाही मानायचा... प्रौढ सार्वत्रिक मतदानावर आणि स्वातंत्र्य व समतेसारख्या मूल्यांवर आधारलेली लोकशाही हे विसाव्या शतकाचे- म्हणजे अवघ्या शंभर वर्षांपूर्वी जन्माला आलेले- राजकीय अपत्य आहे.

लोकशाहीसारखाच ज्या दुसऱ्या भव्य संकल्पनेचा अर्थ शतकानुरूप बदलला, ती ‘सेक्युलॅरिझम’ ही एक कल्पना आहे. तिची पहिली ओळख प्राचीन धर्मग्रंथांतूनच येणारी आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्‌’ किंवा ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ ही त्याचीच उदाहरणे आहेत. सारे विश्व हेच एक कुटुंब असेल तर ते सेक्युलर, म्हणजे आजच्या सर्व धर्मांच्या वर उठणारे वा धर्मातीतच असणार; आणि कर्म हाच माणसांचा अधिकार असेल, तर पाप-पुण्याच्या सर्व प्रस्थापित कल्पनाही गळून पडणार. महाभारतातला ‘महाजनो येन गतस्य पंथः’ हा धर्ममार्गही मग असाच धर्मातीत व सेक्युलर असतो... ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीत (न्यू टेस्टामेंट) जीझस आपल्या उपदेशात जेव्हा ‘गिव्ह अन्‌ टू सीझर्स, व्हॉट इज सीझर्स ॲन्ड गिव्ह अन्‌ टू गॉड व्हॉट इज गॉड्‌स्‌’ (सत्तेचे असेल ते सत्तेला द्या आणि ईश्वराचे असेल ते ईश्वराला द्या) असे म्हणतो; तेव्हा तो धर्म आणि राजकारण यांची क्षेत्रे वेगळी असल्याचा सेक्युलॅरिझमचा नवा अर्थच सांगत असतो.

सेक्युलॅरिझमचा आणखीही एक अर्थ पवित्र कुराणाने सांगितला आहे. इस्लामचा संस्थापक हजरत महंमद पैगंबर हा मक्का सोडून मदिनेला (तेव्हाचे नाव यथ्रेब) वास्तव्याला आला, तेव्हा त्या  नगरात ज्यूंची संख्या सर्वांत अधिक होती. त्या खालोखाल ख्रिश्चन, नंतर मूर्तिपूजक, बौद्ध व इतर धर्मांचे लोक होते. पैगंबरासोबत आलेले मुसलमान (त्यांना तेव्हा मुहाजीर म्हणत) संख्येने सर्वांत कमी होते. स्वाभाविकच पैगंबराला त्या साऱ्यांशी जुळवून घ्यावे लागले. त्यातून जन्माला आलेले त्याचे पहिले राज्य ‘उम्मतुल वाहिदा’ या नावाने ओळखले जाते. त्या राज्यात प्रत्येक धर्माच्या अनुयायांना त्यांच्या धार्मिक उपासनेचे पूर्ण स्वातंत्र्य होते. साऱ्यांना आपापल्या धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे जगण्याची मुभा होती. त्यातही संख्येने ज्यू सर्वाधिक म्हणून त्यांचा मान राखायचा, तर सर्व धर्मांच्या लोकांनी जेरुसलेम या ज्यूंच्या धर्मस्थळाकडे तोंड करून प्रार्थना करायची- अशी पैगंबराची आज्ञा होती. त्यावर नाराज झालेले मुहाजीर त्याच्याकडे गेले व आपण मक्केकडे पाहून प्रार्थना करावी, असे सुचवू लागले; तेव्हा त्यांची समजूत काढत पैगंबराने त्याच्या समन्वयी राज्याचे कारणही त्यांच्या लक्षात आणून दिले...

वाहिदा म्हणजे करार. सर्व धर्मांच्या लोकांत समन्वयाचा झालेला हा करार म्हणजे उम्मतुल वाहिदा. पुढे मक्केवर हल्ले झाले, तेव्हा पैगंबराने नाइलाजाने तलवार हाती घेऊन आपल्या अनुयायांना जिहादचा आदेश दिला. (त्याचमुळे वाहिदा हाच पैगंबराचा खरा व विधायक आदेश आहे आणि जिहाद हा त्याचा नाइलाज आहे, असे मौलाना अबुल कलाम आझाद म्हणत. त्यांच्या ‘तफासील कुराण’ या कुराण- भाष्यातही त्यांनी तसेच म्हटले आहे.) उम्मतुल हा सेक्युलॅरिझमचा आणखी एक अर्थ आहे व तो जगातील सर्व धर्मांच्या लोकांनी परस्परांच्या धर्मांचा योग्य तो आदर राखून स्वधर्माची उपासना करावी असे सांगणारा आहे.

गांधीजी याही पुढे गेले आणि त्यांनी सर्वधर्मसमभाव ही विधायक व सकारात्मक बाब पुढे आणली. स्वधर्माचा आदर करा आणि परधर्माचाही आदर करा, असे ते सांगत. सर्व धर्मांची अखेरची शिकवण एकच आहे व ती मनुष्यधर्माची आहे, असे ते म्हणत. ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ ही त्यांची रामधूनही त्यातून आली आहे. याखेरीज मार्क्सचा निधर्मी व धर्मविरोधी म्हणून पुढे आलेला सेक्युलॅरिझमचा आणखीही एक अर्थ आहे आणि तो धर्माचा नकारात्मक विचार करणारा आहे. श्रम न करता श्रीमंतीत जगणारे आणि श्रम करून दारिद्य्रात राहणारे असे दोन वर्ग समाजात आहेत. त्यांतल्या श्रीमंतांची श्रीमंती त्यांच्या पूर्वजन्मातील पुण्याईमुळे त्यांना लाभली, तर दरिद्री माणसांचे जगणे त्यांना त्या जन्मातील अनिष्ट कर्मांमुळे मिळाले- ही धर्मांची शिकवण विषमता जागवणारी व तिच्यातला अन्याय चिरंजीव करणारी आहे. सबब, धर्म ही गरिबांना अंधारात ठेवणारी व त्यांच्यावरील अन्याय मुकाट्याने सहन करायला लावणारी अफूची गोळी आहे, असे सांगून तो म्हणाला- धर्म ही संस्था संपविणेच त्यामुळे आवश्यक आहे.

...धर्मनिरपेक्षता वा धर्मातीतता हादेखील सेक्युलॅरिझमचा जास्तीचा अर्थ आहे. मला धर्माशी काही घेणे-देणे नाही. त्यात चांगले आणि वाईट असे सारेच असते. मी त्याकडे पाठ फिरवून विवेकबुद्धीने वागेन आणि नीतीने जगेन. विवेक आणि नीती या धर्म नाकारणाऱ्या गोष्टी नाहीत, पण त्यात बसणाऱ्याही नाहीत. धर्मातीत राहून नीतीने जगणाऱ्यांचाही एक मोठा वर्ग समाजात आहे... एवढे सगळे सेक्युलॅरिझमचे अर्थ इतिहासातून आपल्यापर्यंत आले आहेत आणि तसे ते यापुढेही येत राहणार आहेत. सेक्युलॅरिझमच्या या अर्थांपैकी काहींचे वास्तविक व खरे नसणे सहजपणे लक्षात येणारे आहे.

‘वसुधैव कुटुंबकम्‌’ हे वास्तव नाही, ते स्वप्न आहे. शेकडो वर्षांपूर्वी ऋषी-मुनींनी पाहिलेले हे स्वप्न अजून प्रत्यक्षात यायचे राहिले आहे. ‘कर्मण्ये’सारखी वचने उपदेशपरच अधिक आहेत. कसे वागायचे आणि कोणती वृत्ती धारण करायची, हे ते सांगतात. येशूचे ‘ईश्वराचे राज्य’ व ‘सीझरचे राज्य’ यांतील फरकातही वास्तव कमी आणि कविताच अधिक आहे. जगातला कोणताही धर्म राजकारण आणि धर्मकारण यांतले वेगळेपण मान्य करीत नाही. मानवी जीवनाची अशी विभागणीच धर्माला मान्य नाही. व्यक्ती व समाज यांचे समग्र जीवन व्यापूनच नव्हे, तर ते ताब्यात घेऊन उरणारी आणि त्यांची पुढची आयुष्ये नियंत्रित करणारी ती यंत्रणा आहे. तुलनेने नव्या असलेल्या शीख या धर्माचे दोन ध्वज आहेत. एक धर्माचा व दुसरा राज्याचा. त्या दोहोंवरही नियंत्रण धर्माचे असेल, असा त्याचा सांगावा आहे. इस्लामला अशी विभागणी आरंभापासूनच मंजूर नव्हती. मध्य आशियातील ज्या राज्यकर्त्यांनी धर्मबंधनांपासून दूर होण्याचा आणि आधुनिकता स्वीकारण्याचा प्रयत्न केला, अजून करतात; त्यांच्याविरुद्ध तिथे उठलेल्या धर्मांध शक्तींचा इतिहास मोठा आहे आणि त्यांचे वर्तमानही आपल्या डोळ्यांसमोर  आहे.

ख्रिश्चन धर्म आरंभी सेवा सांगत आला, पण चर्चच्या स्थापनेपासून तोही संघटित झाला आणि त्याने आपल्या धर्मानुयायांच्या साऱ्या आयुष्याचे नियोजनच स्वतःकडे घेतले. हिंदू व ज्यू या धर्मांची गोष्टही याहून वेगळी नाही. वास्तव हे की, धर्म नावाची संघटना मृत्यूनंतरच्या जीवनाचा (आणि पुनर्जन्म व पूर्वजन्माचा) हवाला देत माणसाचे आजचे जीवन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते. मानवी जीवनापासून धर्माला वेगळे केले की, तो साराच्या सारा हवेतच तरंगू लागतो... धर्माचे नियम वर्तमानासाठी असतात आणि त्या नियमांमागचा धाक भूत व भविष्याचा असतो. दोन किंवा अधिक धर्मांमधील करार हा दीर्घ काळ न टिकणारा व केवळ तात्कालिक स्वरूपाचा समझोता असतो. संबंधितांकडून त्याचे पालन करून घेण्याची जबाबदारी ज्या ‘राज्या’वर असते, ते कोणत्या ना कोणत्या धर्माचे म्हणून पुन्हा पक्षपाती ठरते.

उम्मतुलचे सरकार मुसलमानांचे पक्षपाती ठरले. त्याहून महत्त्वाची गोष्ट ही की, करार हा धर्म नव्हे आणि कराराचे बंधन धर्ममान्यही नाही. आपल्यावर काही बंधने असतात, हे कोणताही धर्म मान्य करीत नाही. शिवाय, त्याचा जन्म केवळ त्याच्या अनुयायांच्या कल्याणासाठीच झालेला नसतो; त्याला साऱ्या जगाचा उद्धार करायचा असतो. धर्मयुद्धांमागचे खरे कारणही तेच असते. उम्मतुल वाहिदा आठ वर्षे टिकले व तेवढेच ते टिकायचेही होते. मात्र त्यातून पैगंबराच्या जीवनातली समन्वयाची एक बाजू काही काळासाठी का होईना, जगासमोर आली... तुर्कस्थानात ख्रिश्चन व मुसलमान अशा दोन धर्मांचे लोक एकत्र राहतात. त्यांच्यात सर्वस्पर्शी सीमाही आहेत. पण या सीमा हीच त्यांच्या भांडणांचे व गृहयुद्धाचे क्षेत्र आहे. त्या देशातले एकही सरकार आजवर स्थिर झाले नाही आणि त्याला काळानुरूप जगासोबत फारसे पुढेही जाता आले नाही. भारतात वाहिदा नाही, तो धर्मबहुल देश आहे. त्यात बऱ्यापैकी शांतताही आहे; मात्र त्यात धार्मिक तणावही आहेत, झालेच तर त्यांना बळ देणारे पक्ष व संघटनाही आहेत...

एकाच धर्माच्या म्हणून सांगितल्या जाणाऱ्या देशात व समाजातही हाणामाऱ्या आहेत. पाकिस्तानने सुन्नी पंथाला मान्यता दिली, शियांना दुय्यम नागरिक बनविले आणि अहमदियांना तर पार बेकायदाच ठरविले. इराक आणि सिरियामध्ये आता जन्माला आलेली खिलाफत ही शियांच्या कत्तलींची परवानगी आपल्या सुन्नी अनुयायांना देते, ख्रिश्चनांचा खातमा करायला सांगते आणि इतर धर्मांच्या लोकांचे जगणे हाच त्यांचा अपराध असल्याचे सांगते. याउलट, इराणमध्ये शियांचे वर्चस्व असून तो देश सुन्नींना आपले शत्रू मानतो. गेल्या दशकातले इराण-इराक युद्ध यातूनच उभे राहिले. आधुनिक धर्म बाजूला ठेवले तरी जमातींच्या धर्मश्रद्धाही  परस्परविरोधी व त्यांना युद्धासाठी उद्युक्त करणाऱ्या आहेत. जगातला कोणताही धर्म इतर धर्मांना आपल्या बरोबरीचा वा समकक्ष मानत नाही, ही ‘सर्वधर्मसमभावाच्या’ मार्गातली खरी व मोठी अडचण आहे. प्रत्येक धर्म स्वतःला सनातन, सर्वाधिक जुना व सर्वाधिक कालसंगत मानतो. बाकीचे धर्म त्याच्या मते नुसते त्याज्यच नव्हे, तर तुच्छ असतात. आमचा धर्म जगाच्या निर्मितीपूर्वीही अस्तित्वात होता व त्याच्या समाप्तीनंतरही तो राहणार आहे, असे या सनातन श्रद्धेचे स्वरूप आहे. धर्माचे संस्थापक म्हणविणाऱ्यांनी त्यांच्या सूत्रांचे व उपदेशाचे संकलन-संपादनच तेवढे केले, असे ते म्हणतात.

इस्लाम या सर्वांत अलीकडे जन्माला आलेल्या धर्माचा आरंभ इ.स. 610 च्या सुमारास पैगंबरावर अल्लाचा पहिला संदेश अवतरला तेव्हा झाला. पण त्या धर्माचे म्हणणे असे की, पैगंबरापूर्वीही अल्लाचे सव्वा लक्ष दूत जगात आले आणि त्यांनीही हाच उपदेश जगाला केला. (बुद्धापूर्वी आलेले बोधिसत्त्व, महावीराआधी आलेले तेवीस तीर्थंकर आणि हिंदू धर्मात असलेली अवतारकल्पना हीदेखील यासंदर्भात अभ्यासावी व पाहावी अशी आहे.) कालांतराने त्यात अनेक चुकीच्या गोष्टी शिरल्या व काही भाग प्रक्षिप्त स्वरूपात आले. सबब, अल्लाने या अखेरच्या प्रेषिताला धर्मदुरुस्तीसाठी व त्याच्या नव्या मुहूर्तमेढीसाठी पृथ्वीतलावर पाठविले. त्याचा संदेश जगातला सर्वांत नवा, ताजा, शुद्ध आणि पवित्र आहे. कुराणाचा संदेश सर्वांत नवा आणि पैगंबर हा अखेरचा प्रेषित या भूमिकेतून जन्माला येणाऱ्या पण सामान्यपणे न दिसणाऱ्या गोष्टी अनेक आहेत. पैगंबरानंतर प्रेषित नाही, ही त्यांतली एक. त्यामुळे साऱ्या जगाने त्याच्याशी एकनिष्ठ व्हावे, ही दुसरी. कुराण हा ईश्वराचा नवा व सर्वाधिक शुद्ध उपदेश असल्यामुळे इतरांनी त्यांच्याजवळचे ईश्वरी संदेश त्याच्याशी पडताळून पाहिले पाहिजेत आणि त्यांच्या संदेशातील विसंगती दूर किंवा रद्द केल्या पाहिजेत, ही यांतली तिसरी बाब. जे हे करणार नाहीत ते पाखंडी, अल्लाविरोधी आणि म्हणून दंडनीय ठरतात. इस्लामने जगातल्या धर्मांचे त्यासाठी दोन भागांत वर्गीकरण केले. ज्या धर्माचा एकच पवित्र ग्रंथ आहे (उदा. ख्रिश्चनांचे बायबल व ज्यूंचा तोराह), ते किताबी. ज्यांचा असा एक ग्रंथ नाही ते हिंदू, बौद्ध, जैन आदी गैरकिताबी. यांतील किताबींना त्यांचे ग्रंथ कुराणानुसार दुरुस्त करून घेण्याची व त्यासाठी जिवंत राहण्याची संधी आहे; मात्र ती त्यांनी कर भरून मिळविली पाहिजे. गैरकिताबींना अशी संधी नाही. त्यांनी इस्लाम स्वीकारायचा किंवा मृत्युदंड पत्करायचा. फार थोड्या फरकाने इतर धर्मांच्या भूमिकाही अशाच कडव्या व असहिष्णू आहेत.

ख्रिश्चनांना ज्यू चालत नाहीत. त्यांना जिवंतपणी जाळण्याचे पोग्रोम्स त्या धर्माला मान्य आहेत. हिंदूंना त्यांच्या ब्रह्माखेरीज इतरांची उपासना मोक्षाप्रत नेणारी आहे असे वाटत नाही. बौद्धांना त्यांच्या मार्गाखेरीज निर्वाण नाही आणि जैनांनाही महावीराच्या कृपाप्रसादाखेरीज स्वर्ग नाही... भारतीय वा पौर्वात्य धर्मांत इतरांसाठी मृत्युदंड नसला तरी ‘नरक’ नक्की आहे... परस्परांविरुद्ध असे उभे राहिलेले आणि स्वतःलाच सर्वाधिक जुने, आधुनिक व सनातन समजणारे धर्म समभावाच्या पातळीवर कसे येणार? आणि ईश्वर-अल्ला एक कसे होणार?... याचा सरळ अर्थ-सर्वधर्मसमभाव ही सद्‌भावना आहे. महात्म्यांनी पाहिलेले उद्याच्या समाजाचे ते प्रगत व प्रगल्भ चित्र आहे. त्याला असलाच तर त्या महात्म्यांच्या स्वप्नांचा काव्यमय आधार आहे; ते वास्तवाधारित मात्र नाही...

सेक्युलॅरिझमचा विचार नेहमी धर्माच्या संदर्भात होत असल्याने धर्माच्या इतिहासाची दुसरी बाजूही येथे लक्षात घेणे गरजेचे आहे. धर्मांनी समाजाला संघटित केले, त्याला जीवनाचा मार्ग दाखविला आणि एक सुस्थिती दिली- हे त्याचे उपकार नजरेआड करता येणारे नाहीत. आपला आजचा जीवनक्रमच त्याने निश्चित केला आहे, हेही विसरता येणार नाही. पण आपण नजरेआड केलेल्या व विस्मरणात टाकलेल्या त्याच्या इतर बाबीही फार आहेत. धर्मांनी समाजाला एक मानसिक गुलामगिरी दिली. आपल्या अहंतेसाठी त्याला युद्धखोर बनवून मरायला आणि मारायला लावले. आपल्याखेरीजचे सारे तुच्छच नव्हे तर वध्यही आहेत, अशी अघोरी शिकवण त्याला दिली... धर्माच्या नावावर माणसे मारण्याचा प्रकार प्रथम ख्रिश्चनांनी सुरू केला. त्यांनी ज्यूंना (ते येशूचे मारेकरी म्हणून) जिवंत जाळण्याचे पोग्रोम्स केले. स्वतंत्रपणे विचार करणारी स्त्री चेटकीण आहे आणि प्रत्येक चेटकीण ही मृत्युदंडाला पात्र आहे, असे सांगून सोळाव्या शतकापासून युरोपातील 50 लाखांवर स्त्रियांना जाळून  नाहीसे केले. संशोधक, वैज्ञानिक व तत्त्वज्ञ यांना संपविण्याचा त्या धर्माचा उद्योग पहिला म्हणावा असा आहे. त्याने गुलामगिरीला साथ दिली, विषमतेचे समर्थन केले आणि येशूने उपदेशाच्या बळावर सांगितलेला धर्म शस्त्राच्या बळावर वाढविला.

त्या खालोखालची हिंसा इस्लामच्या नावावर आहे. ख्रिश्चन आणि इस्लाममध्ये झालेले युद्ध 700 वर्षे चालले. भारताला जिंकायलाही त्याने 700 वर्षे चढाया केल्या. हिंदू धर्मात शैव व वैष्णवांची युद्धे शतकानुशतके चालली. त्या धर्माने स्वधर्मीयांना अस्पृश्य ठरवून गावकुसाबाहेर ठेवले. बौद्ध धर्मही युद्धमुक्त राहिला नाही. जपान, चीन, ब्रह्मदेश आणि श्रीलंकेतील आतापर्यंतच्या युद्धांत तो प्रेरक म्हणून उभा राहिला... बहुतेक सगळ्याच धर्मांची पूजास्थाने लुटून आणलेल्या सामग्रीच्या बळावर दिमाखात उभी झालेली आज आपण पाहतो आणि त्यात प्रार्थनेसाठी जाणाऱ्या भाविकांना त्या इतिहासाची साधी दखलही नसते. सेक्युलॅरिझम आणायचा, तर हा सारा इतिहास पुसावा वा विस्मरणात टाकावा, असा आहे.

प्रत्यक्षात सेक्युलॅरिझमचा आरंभ धर्माएवढाच किंबहुना, त्याहूनही अधिक अगोदरचा व जुना आहे. धर्मांच्या जन्मतारखा सांगता येतात; सेक्युलॅरिझमचा जन्मदिवस दाखविता येत नाही. माणसांच्या मनात माणसांविषयीचे प्रेम, आस्था, जिव्हाळा व मैत्र ज्या दिवशी जन्माला आले; त्याच दिवशी सेक्युलॅरिझमचाही जन्म झाला. माणुसकी वा मैत्र या धर्मनिरपेक्ष भावना आहेत. त्या धर्माआधीच्या आहेत आणि धर्मानंतरही शिल्लक राहणार आहेत; किंबहुना तीच एक मनासारखी व मनाएवढी माणसासोबत उरणारी बाब आहे. पुढे जाऊन सांगायचे तर- सेक्युलॅरिझम ही मनुष्यजीवनाएवढीच नव्हे, तर मनुष्यपूर्व म्हणता येईल अशीही भावना आहे.

माकडांच्या ज्या टोळ्यांमधून माणूस उत्क्रांत झाला; त्यांत मातृत्व, पितृत्व, मालकीहक्क, मातृहृदय, स्नेह, मैत्र या साऱ्या गोष्टी आहेत. किंबहुना, त्या सगळ्याच प्राणिमात्रांत पाहता याव्यात, अशा आहेत. धर्म नावाची संघटना हेतुपुरस्सर निर्माण होते व तशीच ती झाली. कोणत्याही धर्माचा पूर्वेतिहास या सत्याची साक्ष देऊ शकणारा आहे. शिखांचे समुदाय, भिक्खूंचे संघ, दीक्षांचे विधी, धर्मप्रवेश किंवा त्या प्रवेशाच्या अटी व कसोट्या हे सारे त्याच वास्तवाचे पुरावे आहेत. या संघटनांमध्ये झालेली वैरे, त्यांच्यात उद्‌भवलेल्या लढाया आणि त्यांत शतकानुशतके मारली गेलेली व मरत आलेली माणसे हेही त्याचेच पुरावे आहेत. पण याच काळात जगलेला मनुष्यव्यवहार, माणसांचे आपसांतील संबंध, एखादी राखी पाठवून धर्मावर मात करण्याच्या कहाण्या याही गोष्टी होत्या. मनुष्यधर्माचा हा पुरावा हीच सेक्युलॅरिझमची खरी साक्ष आहे.

आधुनिक जगात सेक्युलर हा शब्द प्रथम 1851 मध्ये त्याच्या आजच्या अर्थानिशी वापरात आला. तो घडविण्याचे श्रेय जॉर्ज जेकब होलिओक (1817 ते 1906) या फ्रेंच तत्त्वचिंतकाला आहे. ‘ओरॅकल’ आणि ‘द मूव्हमेंट’ या दोन नियतकालिकांचे संपादन केलेला होलिओक हा ऑगस्ट कोमटे या समाजशास्त्रज्ञाच्या चिंतनाने प्रभावित झाला होता. या कोमटेनेच ‘माणुसकीचा धर्म’ (रिलिजन ऑफ ह्यूमॅनिटी) ही संकल्पना चर्चेत प्रथम आणली. हॅरियट नावाच्या होलिओकच्या समकालीन तत्त्वचिंतिकेने त्याच अर्थाने ‘विवेकाचा प्रकाश’ (लाईट ऑफ रिझन) हा शब्द वापरला. होलिओकने ईश्वर नाकारला, पण आपल्या तत्त्वचिंतनाला नकारात्मक नाव देणे त्याला आवडले नाही. आपली भूमिका विधायक व सकारात्मक आहे, अशीच त्याची धारणा होती. म्हणून त्याने माणुसकीसाठी सेक्युलॅरिझम हा शब्द वापरला. ‘ज्याने माणसांचे सर्वोच्च कल्याण होते, तो नीतीचा धर्म म्हणजे सेक्युलॅरिझम’ असे तो म्हणाला. एका शब्दात सांगायचे तर, होलिओकचा सेक्युलॅरिझम म्हणजे नीतिधर्मच. हे होलिओकचे संशोधन (इन्व्हेन्शन नाही) पूर्वापार चालत आलेल्या धर्मातीत विचारांच्या व आचारांच्या मांडणीचे त्याने केलेले शास्त्रशुद्ध संकलन व संपादन आहे. तो सेक्युलॅरिझमचा जन्मदाता नाही, प्रवक्ताच तेवढा आहे.

व्यक्तीला धर्माएवढीच राज्यापासून मुक्ती हवी. त्यासाठी राज्य आणि धर्म हे वेगळे असावेत व त्यांचे वेगळेपण साऱ्यांनी लक्षात घ्यावे, असे तो म्हणायचा. राज्यही धर्ममुक्त व धर्मातीत असावे, त्याने आपल्या नागरिकांवर कोणतेही धार्मिक कार्यक्रम लादू नयेत- असा त्याचा आग्रह होता... सार्वजनिक व सामाजिक जीवनातले सर्व निर्णय आणि कार्यक्रम धर्मबंधनांपासून मुक्त राखण्यावर त्याचा भर होता. मारकस्‌ ऑरेलियस आणि एपिक्युरस या ग्रीक तत्त्वज्ञांचा त्याच्यावर प्रभाव होता. डेनिस डिडेराँ,  व्हॉल्टेअर, स्पिनोझा, जेम्स मॉरिसन, थॉमस जेफरसन, थॉमस पेन, रॉबर्ट इंगरसॉल आणि बर्ट्रांड रसेल हे त्याचे आवडते तत्त्वज्ञ होते. चार्ल्‌स ब्रॅडलॉ आणि काँग्रेसच्या पूर्वाध्यक्ष ॲनी बेझंट यांचा तो काही काळ समकालीन व सहकारी होता. होलिओकने आपला मनुष्यधर्म सांगताना जगातल्या सर्व धर्मांतील व धर्मांबाहेरील विधायक विचारांचा मागोवा घेऊन त्यांना एकत्र आणण्याचा आणि त्यांना संपूर्णपणे मानवी पाया देण्याचा ध्यास घेतला. ईश्वर हीच मानवी निर्मिती असल्यामुळे ईश्वरी ग्रंथ, ईश्वरी संकल्पना वा ईश्वरी आज्ञा या साऱ्याच मुळात मानवी आहेत. त्या फक्त चांगल्या किंवा वाईट असतात; ईश्वराच्या वा स्वर्गातून आलेल्या नसतात- अशी त्याची मांडणी आहे. ती सर्व धर्म, वर्ग, समाज आणि काळ यांना कवेत घेणारी आहे. ती नवी नाही, जुनीच आहे; किंबहुना तीच सनातन आहे. माणुसकी वा मनुष्यधर्म ही माणसाची मूळ प्रकृती आहे. ती संस्कारित असेल वा नसेल; तिचे मनुष्यपण महत्त्वाचे आहे. मुळात माणसे चांगली व विधायकच असतात. त्यांच्यात येणारे वाईटपण ही प्रतिक्रिया असते. आपल्या राज्यघटनेने स्वीकारलेला सेक्युलॅरिझम असा आहे. घटनेच्या मूळ उद्देशपत्रिकेत तो आला नसला, तरी 42 व्या घटनादुरुस्तीने तीत तो समाविष्ट केला आहे. मात्र जुन्या उद्देशपत्रिकेत तो नसला तरी साऱ्या घटनेत त्याचे प्रतिबिंब आहे.

आपल्या धर्माची उपासना करण्याचा, न करण्याचा, हवा तो धर्म निवडण्याचा आणि धार्मिक नसण्याचा- असे सारे अधिकार भारतीय नागरिकांना आहेत. राज्याचा स्वतःचा कोणताही धर्म असणार नाही, राज्य धार्मिक शिक्षण देणार नाही आणि ज्या शिक्षणव्यवस्थेत धर्म आहे तिथे प्रवेश घेण्याची कुणावर सक्ती असणार नाही- अशा तरतुदी धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारातच आल्या आहेत आणि त्यांचे स्वरूप सेक्युलर आहे... पं. नेहरूंनी आपली रक्षा गंगेत विसर्जित करण्याची व हिमालयाच्या शिखरांवर पसरण्याची जी इच्छा आपल्या मृत्युपत्रात लिहिली, तीत त्या दोहोंचा राष्ट्रीय संस्कृतीशी असलेला पूर्वापार संबंध अधोरेखित आहे. त्यामागे धार्मिक नसून सांस्कृतिक भावना असल्याचेच त्यांनी नोंदविले आहे. नेहरू वृत्तीने सेक्युलर होते. त्यांच्याएवढे सेक्युलर मन साऱ्यांनाच जपता न येणे, ही त्या थोर संकल्पनेच्या विकासातली खरी अडचण आहे...

धर्मश्रद्ध व धर्मांधांना धर्मनिरपेक्ष मानवधर्माची ही शिकवण मानवणारी नाही. त्यांना त्यांच्या संघटित धर्मसत्तेच्या नियमांत व नियंत्रणात साऱ्या समाजाला त्याचे विचार व श्रद्धांसकट आणायचे आहे. आपली दैवते, आपले धर्मगुरू, पुरोहित, मुल्ला, मौलवी, आचार आणि रिवाज यांचा साऱ्यांनी निःशंक होऊन आदर केला पाहिजे, हा त्यांचा आग्रह असतो. ते तेवढ्यावर थांबत नाहीत; त्या आग्रहामागे अनेक सुप्त शक्ती व संघटना दडल्या असतात. ख्रिश्चनांमध्ये पोप हा स्वतःच त्यांच्यामागे आहे. इस्लाममध्ये मुल्ला-मौलवींपासून जिहादची शस्त्रे घेतलेले लोक त्यामागे आहेत. हिंदूंमध्ये पुरोहितांचे आणि पुजाऱ्यांचे वर्ग, शंकराचार्यादिकांचे अनुयायी, बुवा- बाबांना मानणारे लोक आणि हिंदूंच्याच म्हणवून घेणाऱ्या अर्धराजकीय व अर्धसांस्कृतिक संघटना त्यात आहेत. ‘साईबाबाची पूजा नको’ आणि उद्या ‘कबीराची नको’ म्हणत येणारे स्वरूपानंद व त्यांच्या वतीने मारामारीला उतरणारे लोकही यात आहेत. शिवाय काही संस्था व संघटनांचा आधारच धार्मिक असतो. कुटुंबात नवरा हा साधा पुरुष नसतो, तो पतिदेव असतो. नवरी ही मात्र देवी नसते, ती साधी अबला असते. पुरुषश्रेष्ठत्व ही नुसतीच सामाजिक बाब नाही, ती धार्मिकही आहे. एका पुरुषाची बरोबरी करायला चार स्त्रिया लागतात, असे इस्लामने म्हटले आहे. ख्रिश्चनांमध्येही स्वतंत्र विचार करणारी स्त्री ही एके काळी चेटकीण ठरविली गेली. या कौटुंबिक परंपरांमधूनही मनुष्यधर्माविरुद्ध जाणाऱ्या समजुती जपल्या जातात. त्या धर्मसंगत असल्या तरी मनुष्यसंगत नसतात. सेक्युलॅरिझम ही मनुष्यसंगतीचे आवाहन करणारी विचारपरंपरा आहे. संघटित धर्म आणि माणुसकी यांत ती माणुसकी श्रेष्ठ मानते.

खरे तर सगळ्या चांगल्या परंपरा याच बाजूने उभ्या असतात. आपले ज्ञानेश्वर ‘हिंदूंचे तिमिर जावो’ म्हणत नाहीत; साऱ्या मानवमात्रांच्या कल्याणाचे पसायदान ते मागतात. आपले सगळे संत ज्या अद्वैताची आराधना करतात, ते अद्वैत हिंदू वा अहिंदू नसते. इतर धर्मांतील संतपुरुषांच्या प्रार्थनाही अशाच आहेत. मात्र, संघटित धर्म आणि त्यांच्या मनुस्मृती वा शरीयतसारख्या आज्ञांची गल्लत या सरळमार्गी शिकवणुकीशी करता येत नाही. त्या कमालीच्या एकारलेल्या व एकांध आहेत. त्यांचा मनुष्यधर्माशी असलेला संबंध त्यांच्या संघटित स्वरूपांमार्फत येणारा व  बहुधा विरोधाचा आहे... त्याचमुळे होलिओकविरुद्ध ख्रिश्चन धर्मश्रद्धा बाळगणाऱ्यांनी न्यायालयात खटले दाखल केले व त्याला तुरुंगातही डांबले. गॅलिलिओसारखा होलिओक दबला नाही. साऱ्या दबावांना तोंड देत आपल्या सेक्युलॅरिझमचा झेंडा त्याने उंच फडकवतच ठेवला. भारतातही सेक्युलर विचाराची टवाळी व टिंगल कमी झाली नाही. त्याच्या सेक्युलॅरिझमला ‘स्युडो’ (अर्धवट वा बनावट) म्हटले गेले. ही माणसे समाजाला अनीतीच्या मार्गावर नेतात, अशी टीका झाली. आपलाच धर्म तेवढा परिपूर्ण, असे समजणाऱ्यांकडून हे होणे अपेक्षितही होते. येणारा काळ सेक्युलॅरिझमचा आहे. धर्मांध शक्तींना सध्या उधाण आल्याचे दिसत असले आणि मध्य आशियापासून उत्तर भारतापर्यंत त्यांचा उच्छाद आपण अनुभवत असलो, तरी ही विझत्या दिव्याची वाढलेली ज्योत आहे. समूह, समुदाय, समाज आणि संघटन यांची- मग ते कोणत्याही कारणाखातर एकत्र आले असोत शक्ती क्षीण होत जाण्याचा व त्यांच्या जोरावर इतरांवर अंमल गाजवू पाहणाऱ्यांची आसने अस्थिर होत जाण्याचा हा काळ आहे.

खरी खिलाफत शंभर वर्षांपूर्वीच निकालात निघाली. आताचे तिचे सोंग छोटे, घृणास्पद व जगाने फारसे गंभीरपणे घेऊ नये असे आहे. इजिप्त, इराण व सौदी अरेबियापासून पाकिस्तान आणि बांगलादेशपर्यंतचे सारे देश मुस्लिमबहुल आहेत. पण त्यांतील फार थोड्यांचा अपवाद सोडला, तर इतरांनी सेक्युलॅरिझम न म्हणताही त्याच्या शिकवणुकीचा स्वीकार केला आहे. पाकिस्तान हा देश झिया उल हकच्या राजवटीत जेवढा धर्मांध दिसला, तेवढा पूर्वी जीनांच्या राजवटीत नव्हता. शिवाय झियांच्याच राजवटीत सगळे मुस्लिम धर्मसंकेत बाजूला सारून बेनझीर भुट्टो ही महिला त्या देशाच्या पंतप्रधानपदावर आली. बांगलादेशात ते पद शेख हसीना वाजेद आणि बेगम खालिदा झिया यांनीच आळीपाळीने भूषविले आहे. आपल्या भिक्खू संघात स्त्रियांना प्रवेश द्यायला बुद्धाने प्रथम नकार दिला होता. मात्र पहिली महिला पंतप्रधान बुद्धाच्या देशात श्रीलंकेतच अधिकारारूढ झाली. भारत हा हिंदुबहुल देश असला तरी तो सेक्युलर आहे आणि नेपाळने ‘हिंदू राष्ट्र’ हे त्याचे जुने बिरूद आता टाकले आहे. इंग्लंडमध्ये त्या देशाची राणी हीच त्याची धर्मप्रमुख असली, तरी त्या देशाच्या राजकारणात धर्माची लुडबूड नाही आणि अमेरिकेने आपण सेक्युलर असल्याचे घोषितच केले आहे. सगळी कम्युनिस्ट व डावी राष्ट्रे सेक्युलर आहेत आणि धर्मसत्ता (थिऑक्रसी) सांगणाऱ्या राज्यांची संख्या एका हाताच्या बोटांवर मोजावी एवढीच आता शिल्लक आहे. जॉन एफ्‌. केनेडी या रोमन कॅथॉलिक पंथाच्या उमेदवाराने अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविली; तेव्हा साऱ्या देशाने त्याला विचारलेला प्रश्न होता, ‘तू घटनेनुसार राज्यकारभार करणार की पोपच्या आज्ञेनुसार?’... केनेडीने त्याला दिलेले उत्तर होते, ‘घटनेनुसार. त्या दोघांच्या आज्ञा परस्परभिन्न वा विरोधी असल्या तरी मी घटनेच्याच बाजूने उभा राहणार.’... उत्तर अमेरिकेसह सारा युरोप, उत्तर व पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य व दक्षिण आफ्रिकेतील बहुसंख्य देश स्वतःला सेक्युलर म्हणविणारे आहेत.

समाजाने वा व्यक्तीने सेक्युलर होणे ही सामाजिक व व्यक्तिगत पातळीवरील मनोव्यापाराची प्रक्रिया आहे आणि तीही बहुसंख्य माणसांबाबत आता पूर्ण झाली आहे. हिंदू म्हणविणारा माणूस वेद वा स्मृती वाचून आपला आयुष्यक्रम निश्चित करीत नाही आणि मुसलमानही कुराण, हदीस वा शरीयत वाचून ती अमलात आणत नाही. ख्रिश्चनांनी येशूची प्रवचने नुसती उच्चारायलाच पाठ केलेली असतात आणि ज्यू वा शीख त्यांच्या धर्मांचे बाह्यात्कारी अंग सांभाळत असले तरी त्यांची शिकवण ते नेहमी पाळतातच, असे नाही. त्यांना धर्माचा वा धर्मांधतेचा ज्वर चढविणाऱ्या शक्ती राजकीय आहेत; त्या वगळता सारी माणसे माणसांसारखीच आहेत. हे माणूसपण वाढविणे, हाच सेक्युलॅरिझमचा अर्थ व संदेश आहे आणि त्याच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत जाणाऱ्या आहेत. तसा सेक्युलॅरिझम साऱ्यांनी मनोमन स्वीकारला आहे. मनात अहंतांच्या भिंती बाळगणारी माणसे आणि त्यांच्या तशा संघटना यांचाच काय तो अडसर त्याच्या मार्गात आहे; मात्र त्यांचे आयुष्य फारसे मोठे नाही.

Tags: द मूव्हमेंट ओरकल जॉर्ज जेकोब होलिओक भारतीय राज्यघटना कार्ल मार्क्स महात्मा गांधी पंडित नेहरू धर्मगुरू जॉन के. केनेडी जैन बौद्ध येशू ख्रिस्त मोहंमद पैगंबर मुस्लीम विवेक नीती धर्म सेक्युलॅरिझम सुरेश द्वादशीवार The Movement Oracle George Jacob Holyoake Bhartiy Rajayghatna Karl Marx Mahatama Gandhi Pandit Neharu Dharmguru John.F. Kennedy Jain Bouddh Yashu Khrist Mohammad Paigambar Muslim Hindu Vivek Niti Dharm Secularism Suresh Dwadashiwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात