Diwali_4 न्याय (मन्वंतर - उत्तरार्ध)
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

सामान्यपणे चर्चिली न जाणारी व गांधीवाद्यांनीही दडवून ठेवलेली गांधींच्या अर्थविचारातली एक गोष्ट इथे नोंदविण्याजोगी आहे. घाम गाळील त्याला दाम, श्रम करील त्याची संपत्ती- हे आपले सूत्र गांधीजींनी बापाची इस्टेट मुलाला मिळू नये इथपर्यंत ताणले होते. जे मिळविले नाही, ते मिळणारही नाही. जुन्या पिढ्यांची संपत्ती त्यांच्या अखेरीस समाजाच्या मालकीची व्हावी, असे ते म्हणत. ते म्हणणे समाजवाद्यांएवढेच गांधीवाद्यांनाही मानवणारे नव्हते. सबब, त्यांनी ते कधी चर्चेलाच येऊ दिले नाही. ते आले असते, तर गांधी हा मार्क्सहून अधिक क्रांतिकारी अर्थशास्त्रज्ञ ठरला असता. शिवाय तो उद्या येऊ घातलेल्या न्यायव्यवस्थेचा आधुनिक संस्थापकही झाला असता...  

अथेन्समधील सेफॅलस या सुखवस्तू नागरिकाच्या घरी चर्चेला माणसे बसली आहेत. त्यात ग्लाऊकॉन आणि ॲडिमॅन्टस हे प्लेटोचे दोन भाऊ आहेत. सोफिस्ट तंत्राने विचार करणारा थ्रॅसिमॅकस आहे आणि इतरांना प्रश्न विचारून चर्चेला सुरुवात करणारा सॉक्रेटिस आहे... ‘‘तर,’’ सॉक्रेटिस सेफॅलसला विचारतो, ‘‘ही संपत्ती मिळवून तू काय साधलेस?’’... सेफॅलस उत्तर देतो, ‘‘संपत्ती हा आशीर्वाद आहे. त्या बळावर मला उदार होता येते, प्रामाणिक राहता येते आणि न्यायाने आयुष्य काढता येते...’’ त्यावर सॉक्रेटिस विचारतो, ‘‘मग तुला न्याय समजत असला पाहिजे. त्याचा अर्थ तू मला सांग.’’ 

सॉक्रेटिसच्या प्रश्नावलींचा अनुभव असलेला थ्रॅसिमॅकस चिडतो आणि म्हणतो, ‘‘तू नेहमीच अशा वेडाचे गारूड घेऊन असतोस. ही माणसे तुझ्या नादी का लागतात, हेच मला कळत नाही. एवढा ज्ञानी असशील, तर न्यायाचा अर्थ दुसऱ्याला विचारण्याऐवजी तू स्वतःच तो का सांगत नाहीस...?’’ न्याय करणे व त्याचा नेमका अर्थ सांगणे याहून अवघड बाब दुसरी नाही. बुद्धी आणि मन यांची एकाच वेळी ती कमालीची कठोर परीक्षा घेते. त्यामुळेच न्याय ही संकल्पना तेव्हा आणि त्यानंतर आजवर व्याख्येवाचून राहिली आहे... तरीही सॉक्रेटिस आपल्या प्रश्नाचा आग्रह धरतो, तेव्हा थ्रॅसिमॅकस रागावून म्हणतो- ‘‘मी सांगतो तुला न्यायाचा अर्थ. बळी तो कान पिळी, हा आहे न्याय. न्याय म्हणजे समर्थांचे हितसंबंध. हुकूमशाहीत हुकूमशहा आपले हितसंबंध जपणारे कायदे करणार आणि ते सत्तेच्या बळावर राबविणार. सरंजामशाहीत सरंजामदार तेच करणार आणि लोकशाहीत बहुसंख्य माणसे कायदे करून ते अमलात आणणार. ही अंमलबजावणी म्हणजे न्याय. तिला विरोध करील, तो आरोपी. कायदा त्याला शिक्षा करणार आणि न्याय झाला, असे त्यालाच सारे म्हणणार...’’ 

आपली न्यायालये न्याय देत नाहीत, ती गुन्हेगारांना शिक्षा करतात. या अर्थाने ती शिक्षालये ठरतात. ती ज्या कायद्याच्या आधारे शिक्षा देतात (वा न्याय करतात), तो बहुमताच्या जोरावर विधिमंडळात मंजूर झाला असतो... नित्शे म्हणाला, ‘‘माणसे न्याय मागतात तेव्हा मला हसायला येते. ही माणसे दुबळी असतात. त्यांना हात वा पंजे नसतात...’’ 

स्टर्नर म्हणाला, ‘‘मूठभरांचे बळ हे पोतेभरांच्या शहाणपणावर मात करते व तोच न्यायही असतो...’’ कॅलिकल्सच्या भाषेत ‘न्याय आणि नीती हे दुबळ्यांनी स्वतःच्या बचावासाठी लावलेले शोध आहेत. सबळांची सत्ता रोखायला त्यांच्याजवळ याहून दुसरी साधनेही नसतात.’ तेवढ्यावर न थांबता तो यालाच नैसर्गिक व आदर्श न्याय म्हणतो. ज्यांना हे जमत नाही, ते भित्रे दयेत न्याय शोधतात आणि न्याय व नीतीच्या नावाने आपल्या कातडीबचावूपणाचे समर्थन करतात. नीती  ही गुलामांची वृत्ती आणि त्यांचा स्वभावविशेष आहे. त्याचा शौर्याशी व साहसाशी संबंध नाही... 

विसाव्या शतकातला तत्त्वचिंतक विल्‌ ड्युरांट म्हणतो सबलांच्या अशा न्यायातूनच साम्राज्यवादाचा जन्म होतो. अथेन्सचा साम्राज्यवादही असाच होता. ‘तुमचे साम्राज्य तुमच्या बाहूंच्या सामर्थ्यावर उभे आहे, तुमच्या प्रजाजनांच्या सद्‌भावनेवर नाही’, असे पेरिकल्स हा अथेन्सचा राज्यकर्ता आपल्या सैनिकांना उद्देशून म्हणाल्याची नोंद इतिहासात आहे... चांगले-वाईट, न्याय-अन्याय यांचा विचार बरोबरीच्या माणसांत करायचा असतो; विषम व्यवस्थेत न्यायाला स्थान नसते. सामर्थ्यवान आणि दुबळे यांना तो सारखाच लागू करता येत नाही. सामर्थ्यवान त्यांना जे करायचे ते करतात आणि दुबळे त्यांच्या प्राक्तनात असेल ते सहन करतात. 

न्यायाची ही वर्णने ऐकून सॉक्रेटिस शांतपणे म्हणतो, ‘‘न्याय हा व्यक्ती-व्यक्तीतला संबंध आहे आणि या संबंधांचा आधार विश्वास हा आहे. तो विश्वास जपण्याची जबाबदारी समाजव्यवस्थेची आहे. समाजरचनेच्या संदर्भातच न्यायाचा विचार करावा लागतो; केवळ व्यक्तीच्या गुणसामर्थ्याच्या बळावर तो करता येत नाही. न्यायी समाजाची व न्यायी राज्याची कल्पना आपण करू शकलो, तरच व्यक्तीला न्याय मिळवून देण्याची चर्चाही आपल्याला करता येईल... न्यायाचा विचार व्यक्तिगत वा लहान पातळीवर करण्याहून समाजाच्या मोठ्या पातळीवर करणेच योग्य व यथार्थ ठरते...’’ सॉक्रेटिसला जाऊन 2400 वर्षे झाली. त्या शहाण्या चर्चेलाही आता तेवढा काळ लोटला; मात्र समाजाच्या संदर्भात न्यायाचा जो विचार सॉक्रेटिसने सांगितला, तो अजून स्वप्नवत्‌च राहिला आहे. 

सॉक्रेटिसच्या मते, न्यायालयात केली जाणारी शिक्षा हा नकारात्मक न्याय आहे आणि न्याय ही नकारात्मक संकल्पना नसून ती सकारात्मक व विधायक आहे. माझ्यावर अन्याय झाला वा होतो, असे जोवर एखाद्याला वाटते; तोवर तो खऱ्या वा खोट्या अन्यायाचा बळी असतो. ही भावना का निर्माण होते व ती कशी घालविता येते, याचा सॉक्रेटिसने मांडलेला विचार हा न्यायाचा विधायक विचार आहे. त्याच्या अंमलबजावणीची जी तऱ्हा त्याने सांगितली, तिच्याविषयी तेव्हा मतभेद होते व आजही ते आहेत; मात्र त्याने सांगितलेला न्याय तेव्हा व आताही कुणाला नाकारणे जमले नाही... 

न्यायाचा विचार समाज व राज्याच्या संदर्भात सॉक्रेटिस करतो. अथेन्सचे नगरराज्य कमालीचे एकसंध व व्यक्तीहून राज्याला मोठे मानणारे होते. प्रथम न्यायी राज्य उभे करायचे व त्यासाठी समाजाच्या प्रस्थापित रचनेत बदल करायचा- ही न्यायाची पहिली अट आहे, असे तो म्हणाला. ‘प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेनुसार व योग्यतेनुसार सारे मिळावे. ते मिळवून देण्याची व्यवस्था समाजात असावी. गुणवत्तेचा आदर व तिला मिळणारी मान्यता, म्हणजेच न्याय आणि जो समाज ती उपलब्ध करून देईल, तो न्यायी.’ असे त्याचे म्हणणे होते. अन्यायाची भावना मनात खदखदण्याचे खरे कारण आपल्याला आपल्या योग्यतेनुसार काही मिळत नसल्याची खंत हे आहे. मला माझ्या कुवतीनुसार सारे मिळाले आहे, असे वाटणे हीच एक बाब व्यक्तीच्या मनात न्यायाची भावना निर्माण करते.... यावर अर्थातच आक्षेप आहेत. आपली योग्यता कमी आहे, हे मानायला कोणी तयार होत नाही. नफ्फडातल्या नफ्फडालाही आपल्याला सारे अधिकार व सर्व काही मिळावे, असे वाटत असते... सॉक्रेटिसचे त्यावरचे उत्तर ‘गुणवत्ता मोजता येते’ हे आहे. 

‘जन्म’ या चांगल्या अपघाताशी अन्यायाची नाळ जुळली आहे. ती तिच्या गुणविशेषांसह बाजूला सारली की, माणसे फक्त माणसेच उरतात. ती सारखी व साधीही असतात. त्यांच्यात स्वातंत्र्यासह समतेची व बंधुतेचीही बीजे उपजतच असतात. शारीरिक सामर्थ्याच्या वा एखाद्या कौशल्याच्या बळावर त्यांच्यात पुढे वेगळेपण आले, तरी त्यांच्यातील अंत:स्थ समभाव तसाच असतो. बलवानांच्या ताब्यात जाण्याचा व सुरक्षित होण्याचा स्वभाव केवळ मानवीच नाही; तो पशूंच्याही मानसिकतेत आहे. मात्र या मूळच्या समान व साध्या माणसांच्या मागे एकदा जन्म उभा झाला की; मग ती हिंदू होतात, ख्रिश्चन ठरतात, मुसलमान बनतात- बौद्ध, शीख वा पारशी म्हणविली जातात. मग तीच भारतीय ठरतात; पाकिस्तानी, अमेरिकी, इंग्लिश, जर्मन, इटालियन आणि श्रीलंकन ठरविली जातात. एकाच धर्मात व एकाच देशातही ती स्पृश्य वा अस्पृश्य होतात, काळी वा गोरी ठरतात आणि जाती-जातींत वाटली जातात. त्यांच्या डोक्यांवर त्यांचे ईश्वर व संत आणून बसविले जातात आणि त्यांची माणूस ही ओळख या विशेषणांमागे लुप्त होते. तेवढ्यावर हे थांबत नाही. जन्म नावाची गंभीर बाब प्रत्येकाचा जीवनमार्गही निश्चित करते. त्याचा वर्ग, त्याची समृद्धी, त्याचे दारिद्य्र, त्याचा व्यवसाय, त्याच्यावरील ओझी आणि त्याच्या वाट्याला येऊ शकणाऱ्या उपलब्धीही त्यामुळे ठरून जातात... 

जन्म ही माणसाला जन्मतःच त्याची वेगळी ओळख देणारी व त्याला इतरांपासून दूर करणारी बाब होते. यातूनच विषमता येते व  अन्याय नावाच्या सामाजिक दोषाचा आरंभही येथेच होतो. हे सॉक्रेटिसच्या काळात होते व आजही ते तसेच आहे. इतिहासाच्या सर्व पर्वांत, युगात व प्रत्येकच शतकात ते घडले आणि आजही घडते. राजाच्या पोराने राजा होणे, प्रजेच्या पोरांनी प्रजाजन होणे हे पूर्वी होते आणि आजही आहे. व्यापाऱ्यांची पोरे व्यापारी, डॉक्टरांची डॉक्टर, वकिलांची वकील आणि कष्टकऱ्यांची कष्ट करणारी... धनवंत व राज्यकर्ते यांच्या पुढच्या पिढ्याही बहुधा धनवंत व राज्यकर्त्यांच्याच असतात. त्यापासून वंचित असणाऱ्यांच्या पिढ्या पुढेही तशाच राहतात आणि त्यापुढे येणाऱ्या पिढ्यांचे प्राक्तनही त्याहून वेगळे नसते. कारण त्या साऱ्यांचे वर्तमान, भविष्य व प्राक्तन- जन्म नावाच्या अपघाताने अगोदरच निश्चित केलेले असते. जन्माने केलेला एक फरक स्त्री व पुरुष यांच्यातलाही आहे. त्यातही न्याय व अन्याय यांची झालेली विभागणी ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि व्यक्तीच्या मानसिकतेत रुजलेली आहे. अपवाद तिलाही आहेत, पण ते अपवाद म्हणून सांगावेत एवढे अजूनही थोडे राहिले आहेत. 

फ्रेंच राज्यक्रांतीपासून व विशेषतः विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून या स्थितीत बदल झाल्याचे आपण अनुभवतो. मात्र हा बदल सार्वत्रिक नाही, तो सर्वमान्यही नाही. नव्या पिढ्या जन्म नावाच्या बाबीकडे दुर्लक्ष करू लागल्या असल्याने त्या हा बदल झट्‌कन स्वीकारतात. जुन्या पिढ्यांना तो विसरता येत नसल्याने त्यांची जन्माने निर्माण केलेल्या जुन्या व्यवस्थेविषयीची आस्था घट्टच असते. हे बदलायला वेळ लागेल; पण तो होणार आहे, याविषयी मात्र शंका बाळगण्याचे कारण नाही. 

सॉक्रेटिसच्या मते, जन्म या संकल्पनेशी जुळलेली माणसाची नाळ तोडूनच न्यायाचा आरंभ करावा लागतो. मी मोठा, तो लहान, हा अमुक, ती तमुक- हा वेगळेपणाएवढाच विषमतेचाही आरंभ आहे आणि विषमता हाच मुळात एक मोठा अन्याय आहे. सॉक्रेटिस यावर जो उपाय सांगतो; तो प्लेटोच्या भाषेत- ‘मुलांना त्यांच्या आई-वडिलांपासून व कुलपरंपरेपासून लहानपणापासूनच दूर करण्याचा आणि त्यांच्यावर जुन्या पिढीचा संस्कारच नव्हे तर सावलीही पडू न देण्याचा’ आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच मुले व मुली राज्याच्या नियंत्रणात संयुक्तपणे व स्वतंत्रपणे वाढविली जावीत, अशी क्वचितच कधी अमलात येऊ शकणारी पण महत्त्वाची वाटावी अशी त्याची सूचना आहे. त्या व्यवस्थेत संयुक्त शिक्षणाची सोय असेल, त्यात जन्मगत वेगळेपण विसरायला लावण्याची व आपण सारे समान आहोत हा संस्कार घडविण्याची व्यवस्था असेल. तो घडवीत असताना त्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या, ते तो सांगतो. या परीक्षांत  गुणवत्तेच्या चाचणीवर त्याचा भर आहे. त्यातून इच्छाप्रधान, भावनाप्रधान आणि विचारप्रधान मुले कोणती- ते निश्चित करता येईल. सॉक्रेटिसची ही शिक्षणप्रणाली पंचेचाळीस वर्षांएवढी मोठी आहे. 

इच्छा, भावना आणि बुद्धी या तीन प्रेरणा प्रत्येकातच सरमिसळ पण कमी-अधिक स्वरूपात असतात. त्यांतली एक कोणती तरी प्रेरणा जास्तीची प्रबळ व इतरांवर मात करणारी असते. ही माणसे वेगळी करता येतात. इच्छाप्रधानांचा वर्ग अर्थ व उत्पादनाच्या क्षेत्रात, भावनाप्रधानांचा वर्ग सुरक्षेच्या, तर बुद्धिप्रधानांचा वर्ग राजकारणात जावा- असे तो म्हणतो. यांतल्या प्रत्येक वर्गातील व्यक्तीला वर्ग बदलण्याची वा मिळविण्याची मोकळीक असेल. आपली गुणवत्ता वाढवणारी माणसे बुद्धिप्रधानांच्या वर्गात जाऊ शकतील आणि ज्यांची गुणवत्ता कमी होईल ती इच्छाप्रधानांच्या वर्गात आणली जातील, असेही तो सांगतो. प्रत्येकाला त्याच्या प्रेरक शक्तीप्रमाणे व प्रकृतिधर्माप्रमाणे क्षेत्र उपलब्ध झाले, तर ती व्यवस्था न्यायाची असेल... (आजच्या ॲप्टिट्यूड टेस्टहून हे फारसे वेगळे नाही) इच्छेला भावनेची जोड असावी; मात्र त्या दोहोंवरही बुद्धीचे नियंत्रण असावे. ते असेल, तरच व्यक्तीचे जीवन न्यायाचे होईल आणि इच्छाप्रधान व भावनाप्रधान माणसांवर बुद्धिप्रधानांचे नियंत्रण असेल, तर ते राज्य व तो समाजही न्यायाधिष्ठित बनेल. प्लेटोने ज्याला तत्त्वज्ञ राजा म्हटले, तो बुद्धिप्रधान राज्यकर्ता हा आहे.... हा सारा सॉक्रेटिसच्या बुद्धीची झेप सांगणारा प्रकार असला व तो बराचसा स्वप्नवत्‌ वाटत असला, तरी त्यातली तथ्ये महत्त्वाची आहेत आणि ती आज पाहता व अनुभवता येणारी आहेत. 

एक- माणसाचे समाजातले स्थान आता त्याच्या जन्मावर ठरत नाही. दोन- प्रत्येकाला शिक्षणाची व ज्ञानप्राप्तीची समान संधी उपलब्ध झाली आहे. तीन- या साधनेतून जे आपली गुणवत्ता सिद्ध करतात, त्यांना कुठवरही पुढे जाण्याचा अधिकार असतो. चार- ज्यांची गुणवत्ता इच्छेशी वा भावनेशी थांबते, ते लोक निम्न ठरविले जात नाहीत. त्यांना सर्व सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक व नागरी अधिकार असतातच. पाच- राज्यकर्त्यांच्या वर्गाला समाजातील इतरांशी स्पर्धा करूनच वर यावे लागते. 

सॉक्रेटिसच्या मते, त्याने सांगितलेल्या शिक्षणाच्या समाप्तीनंतरही त्याच्यावर प्रत्येक वर्गात त्यातील लोकांसोबत काम करण्याची सक्ती असेल. या स्पर्धेतही (प्रॅक्टिकल) त्याला आपले बुद्धिवर्चस्व व कौशल्य सिद्धच करावे लागेल... तात्पर्य- जन्माने कोणी मोठा वा लहान असणार नाही; क्षमता व गुणवत्ता यांच्या जोरावरच प्रत्येकाला त्याचे समाजातील स्थान प्राप्त होईल आणि तसे होणे हाच त्याच्या वाट्याला येणारा खराखुरा न्याय ठरेल. 

सॉक्रेटिसची समाजधारणा आजही स्वप्नातल्यासारखी वाटावी अशी आहे आणि ती तशी काहीशी आहेही. मात्र यातल्या ज्या गोष्टी आज प्रत्यक्षात आल्या आहेत वा येण्याच्या मार्गावर आहेत, त्या पाहिल्या की सॉक्रेटिसचे द्रष्टेपण व आपल्या जगाचे भवितव्य या दोहोंतले सारखेपण जाणवून आपण थक्क होतो... जन्माचे माहात्म्य संपले वा संपण्याच्या मार्गावर आहे. जन्मदत्त मोठेपण वा लहानपण यांची महती नुसती कमीच झाली नाही, तर ती मिरवणारे समाजाच्या तिरस्कार व हेटाळणीचे विषय झाले आहेत. जन्माने प्राप्त होणारे वंश, जात, धर्म, पंथ व त्यासोबतचे कुलपरंपरांचे महत्त्वही कमी झाले आहे. परंपरेने चालत आलेले कामधंदे आताच्या पिढ्या मुकाटपणे स्वीकारत नाहीत. जुन्या पिढीकडून वारसाहक्काने मिळणारी मालमत्ता कम्युनिस्ट देशांनी गेल्या शतकात थांबविली. पण त्या पद्धतीतील हुकूमशाही मोडीत निघाली, तेव्हा ती तेथे पुन्हा येताना दिसली. चीन, क्युबा किंवा कोरिया (उत्तर) हे देश अजून त्या पद्धतीला चिकटून असले तरी त्यांनीही आता तीत कालानुरूप बदल केले आहेत... 

सामान्यपणे चर्चिली न जाणारी व गांधीवाद्यांनीही दडवून ठेवलेली गांधींच्या अर्थविचारातली एक गोष्ट इथे नोंदविण्याजोगी आहे. घाम गाळील त्याला दाम, श्रम करील त्याची संपत्ती- हे आपले सूत्र गांधीजींनी बापाची इस्टेट मुलाला मिळू नये इथपर्यंत ताणले होते. जे मिळविले नाही, ते मिळणारही नाही. जुन्या पिढ्यांची संपत्ती त्यांच्या अखेरीस समाजाच्या मालकीची व्हावी, असे ते म्हणत. ते म्हणणे समाजवाद्यांएवढेच गांधीवाद्यांनाही मानवणारे नव्हते. सबब, त्यांनी ते कधी चर्चेलाच येऊ दिले नाही. ते आले असते, तर गांधी हा मार्क्सहून अधिक क्रांतिकारी अर्थशास्त्रज्ञ ठरला असता. शिवाय तो उद्या येऊ घातलेल्या न्यायव्यवस्थेचा आधुनिक संस्थापकही झाला असता... ॲरिस्टॉटल हा संपत्तीला व्यक्तिमत्त्वाचे वाढीव अंग मानायचा. मार्क्सने तिला चोरी म्हटले. गांधीजींच्या मते, ती व्यक्तिमत्त्वावर चढणारी सूज आहे. 

...डेमॉस्थेनिस हा अथेन्सचा सर्वाधिक लोकप्रिय वक्ता व जनतेचा लाडका पुढारी होता. त्याच्या वक्तृत्वावर गेली अनेक शतके कवने लिहिली गेली. ‘सॉक्रेटिस तरुणांना बिघडवतो, त्यांना शंकेखोर बनवतो, त्यांच्या श्रद्धा उखडतो आणि  जुन्यांविषयी अनादर निर्माण करतो,’ अशी टीका तो करायचा. सॉक्रेटिसविरुद्ध खटला दाखल व्हायला आणि त्याला मृत्युदंड सुनावला जायला डेमॉस्थेनिसच सर्वाधिक कारणीभूत ठरला. सॉक्रेटिसचा परात्पर शिष्य असलेल्या ॲरिस्टॉटलचाही त्याने असाच राग केला. अथेन्सवर हल्ला चढवून ते नगरराज्य बुडविण्याचा ध्यास घेतलेला अलेक्झांडर हा ॲरिस्टॉटलचा शिष्य होता आणि ती बाब अथेन्सचे जनमत ॲरिस्टॉटलविरुद्ध उभे करायला डेमॉस्थेनिसला पुरेशी होती. त्यातच अलेक्झांडरने अथेन्सच्या मध्य वस्तीत ॲरिस्टॉटलचा पुतळा त्याच्या जिवंतपणीच उभा केला. त्यातून अथेन्सचा ॲरिस्टॉटलद्वेष एवढा वाढला की, तो ते नगरराज्य सोडून कॅल्सिसला निघून गेला. तिथे असतानाच निराशेच्या खोल गर्तेत त्याने हेमलॉक हे विष घेऊन इहलोकीची यात्रा संपविली, असे डायोजिनिस आपल्याला सांगतो.... डेमॉस्थेनिस, सॉक्रेटिस आणि ॲरिस्टॉटल या तिघांचीही नावे इतिहासात अजरामर झाली; मात्र त्या तीन ज्ञानी माणसांतले वैर हे एवढे जीवघेणे होते. 

ॲरिस्टॉटल हा ग्रीक तत्त्ववेत्यांच्या परंपरेतला अखेरचा तत्त्वज्ञ होता. त्याच्या काळातच (इ.स.पूर्व तिसरे शतक) ग्रीक सम्राटांनी (फिलीप आणि अलेक्झांडर) अथेन्समधील लोकचर्चा व लोकशाही संपविली. पुढे इ.स.च्या चौथ्या शतकात रोमच्या कॉन्स्टन्टाईन या सम्राटाने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला आणि विज्ञानापासून तत्त्वज्ञानापर्यंतचा सारा शोध व विचार त्या धर्माच्या आज्ञेनुसार व त्याच्या नियंत्रणाच्या परिघातच व्हावा, असे फर्मान काढले. परिणामी, तत्त्वचर्चेच्या नष्टचर्यावर नव्या सत्तेचे आणखी गडद व काळे सावट आले. ते एकाच वेळी राजसत्तेचे व धर्मसत्तेचे होते. धर्म ही सारे जीवन व्यापणारी व नियंत्रित करणारी एकारलेली यंत्रणा असल्याने तिने वेगळा विचार, तर्क व त्यातून जन्माला येणारे तत्त्वज्ञान संपविले. परिणामी, अथेन्सचे (ग्रीसचे) प्रकाशपर्व मावळले आणि त्याच्या अंधारयुगाला सुरुवात झाली. ज्ञानाची चर्चा विज्ञानापासून सुरू होऊन तत्त्वज्ञानाच्या दिशेने विकसित होत जाते. धर्म व त्याच्या श्रद्धा विज्ञाना- एवढ्याच ज्ञान व तत्त्वज्ञानाच्याही वैरी असतात. नव्या धर्मश्रद्धेने बायबल हाच सर्वश्रेष्ठ तत्त्वविचार, ज्ञानविचार व विज्ञानविचार असल्याचे सांगून सारे काही त्याला अनुकूल असेच व्हावे, असा आग्रह धरला. सगळा विचार वेदानुकूलच असला पाहिजे, या भारतीय दुराग्रहाची ती रोमन आवृत्ती होती... 

तरीही त्या काळात काही अरब तत्त्वचिंतकांनी ग्रीकांचा (व काही प्रमाणात भारतीयांचा) तत्त्वविचार व विज्ञानविचार जोपासण्याचा प्रयत्न केला... मात्र अरबांमध्ये इस्लाम सर्वाधिकारी बनला, तेव्हा त्यांचेही प्रयत्न कुराणात बंदिस्त झाले आणि ग्रीक व रोमन सम्राटांनी सुरू केलेले अज्ञान व अंधाराचे दमनचक्र पुरते चालून त्यांनी ज्ञान-विज्ञान व तत्त्वज्ञान या साऱ्याच गोष्टी चिरडून टाकल्या... यात ज्ञानाएवढीच न्यायासारख्या मूल्याची चर्चाही लोपली. तिचे पुनरुज्जीवन नंतर फार पुढे फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात झाले. भारतातही तो काळ धर्मश्रद्धांचा व धर्मानुकूल विचार सक्तीचा करणारा होता. धर्मगुरू झाले तसे धर्मचिंतक झाले. ते वैदिक, जैन व बौद्धही होते. पण त्या साऱ्यांचा विचार व तर्क त्यांच्या धर्मानुकूलच राहिला. तशी त्यांच्या धर्माचीच त्यांच्यावर सक्ती होती. परिणामी, स्वतंत्र विचार नुसता संपलाच नाही तर संशयितही बनला. महाभारतात चार्वाकांच्या ग्रंथांचे व ग्रंथकर्त्यांचे उल्लेख आहेत. पण पुढे झालेल्या श्रद्धाशीलांच्या परंपरेने त्यांतले काही त्यांच्या विधायक आठवणींसहदेखील शिल्लक ठेवले नाही. विज्ञानवादी चार्वाकांचा एकही ग्रंथ एकविसावे शतक सुरू झाल्यानंतरही आज भारतात सापडू नये, याचा अर्थ याहून दुसरा कसा लावायचा? की, तो तसा न लावताच आम्ही आपली पाठ सहिष्णू म्हणून थोपटून घ्यायची?... 

श्रद्धा ही विचार थांबविणारी बाब असते आणि तिच्यामागे तो थांबविणारी शक्तिशाली यंत्रणाही उभी असते. ती धर्माची असते, राज्याची असते आणि श्रद्धेने बांधलेल्या समाजाच्या मानसिकतेचीही असते. ॲरिस्टॉटलनंतर ग्रीक तत्त्वज्ञान संपले. चर्चच्या उदयानंतर त्याचे उरलेसुरले अवशेषही नामशेष झाले. पुढल्या काळात त्या धर्माने युरोपातली सगळी सामाजिक चर्चाही बंद पाडली. इस्लामच्या आक्रमणानंतर अरबांचे तत्त्वचिंतन संपले. महायान पंथाच्या उदयानंतर बुद्धविचार पुढे गेला नाही आणि शंकराचार्यांच्या पश्चात वैदिक विचारही सरकताना दिसत नाही. श्रद्धा आणि तर्क या परस्परविरोधी प्रेरणा आहेत. तर्काच्या शक्तिकाळात श्रद्धा क्षीण होते आणि श्रद्धेच्या प्रबळपर्वात तर्क हरतो... मार्क्स, गांधी, हिंदुत्व आणि आंबेडकर हे चार विचारप्रवाह भारतात मागल्या शतकात प्रबळ होते. मात्र 1930 नंतर भारतात कोणताही नवा विचार जन्माला आला नाही... तर्क, बुद्धी व विचार हीच न्यायाची बलस्थाने आहेत. न्याय- अन्यायाचा विचार श्रद्धाशील मन करीत नाही; मग त्यात सिंधूचे अतिरिक्त पावित्र्य आदर्श ठरते आणि नवऱ्याच्या इच्छेखातर जळत्या चितेत उडी घेऊन आपले शुद्धत्व सिद्ध करणारी सती साध्वी म्हणविली जाते. हे सारे तर्कात न बसणारे, पण श्रद्धेच्या शिरोभागी असणारे आहे. श्रद्धा या  अदृश्य शक्तीत न्यायाची, स्वातंत्र्याची, समतेची, माणुसकीची अशी सगळीच मानवानुकूल चर्चा थांबवण्याचे बळ आहे. 

आज प्रत्येकच जण- मग तो श्रमिक असो वा धनिक, साक्षर असो वा निरक्षर- स्वाभिमानाने मान उंचावून जगताना दिसतो. अगदी ‘तुम्ही आम्हाला सांगणारे कोण?’ असे तो मंत्र्यांपासून पुढाऱ्यांपर्यंतच्या साऱ्यांना ऐकवू शकतो. (‘तुमच्या पापण्या एवढ्या जड नसत्या, तर आमची मुले सीमेवर अशी मेली नसती’- हे उद्‌गार एका पंतप्रधानांना उद्देशून लष्करातील एका जवानाच्या आईने काढले, हा आपल्याच देशातला अनुभव आहे.) वयात आलेलीच नव्हे, तर येऊ पाहणारी मुले व मुली आई-वडिलांना फारशी किंमत देताना दिसत नाही. ते त्यांचे बिघडलेपण नसून, लवकर वयात येणे आहे. घरात, दारात, समाजात, बाजारात आणि सरकारात माणसे ‘समतेने’ वागताना वा तसे धाडस करताना दिसतात. रिक्षावाल्याला काका किंवा घरातल्या मोलकरणीला आत्या वा काकू म्हणून सन्मानाने बोलणारी मुले पाहिली की, याचा चांगला प्रत्ययही अनुभवाला येतो. धर्माभिमानाहून धर्मनिरपेक्षतेचे मूल्य मोठे झाले आणि जातीयवादी ही शिवी होऊन जातिनिरपेक्ष वृत्ती आदरणीय बनली. माणसाची क्षमता, भावनाशीलता व गुणवत्ता हे त्याच्या जन्मदत्त भूमिकांहून जास्तीच्या आदराचे विषय झाले... तशी जन्म ही न विसरता व न तोडता येणारी बाब आहे. तिला चिकटून येणारी पुटे बाजूला सारायची- याचे एक नाव सॉक्रेटिस, दुसरे नाव प्लेटो आणि आताचे नाव गांधी... 

एक गोष्ट आणखीही घडताना दिसते आणि यापुढे ती वाढलेलीही दिसेल. बराक ओबामा हा काळा पुढारी गोऱ्या अमेरिकेचा अध्यक्ष झाला. एक पुरुष बरोबर चार स्त्रिया म्हणणाऱ्या धर्माचे बिरूद माथ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर एक स्त्री चार वेळा निवडली गेली. भारतासारख्या कर्मठ देशाने जन्माने इटालियन असलेल्या सोनिया गांधींना आपले पंतप्रधानपद देऊ केले आणि त्यांचा सर्वाधिकार दहा वर्षे शिरोधार्ह मानला. एक चहावाला मुलगा पुढे देशाचा पंतप्रधान झाला. फ्रान्समध्ये लग्न न करताही चार मुलांची आई झालेली सेगोलाईन रॉयल ही त्याच्या अध्यक्षपदावर निवडून येता-येता राहिली, तर त्या देशाचे दोन अध्यक्ष लग्नावाचूनच आपल्या मैत्रिणींसोबत त्या पदावर जाताना दिसले. मुंबईचे डबेवाले इंग्लंडच्या राजपुत्राचे पाहुणे झाले आणि गडचिरोली जिल्ह्यातली मुले प्रथम चंद्रपुरात, पुढे नागपूर-पुण्यात व आता थेट इंग्लंड-अमेरिकेत शिकताना दिसू लागली. 

व्यवसायाची बंधने संपली, वर्गांच्या कक्षा रुंदावल्या आणि वर्गा-वर्गांतील तटबंदी नाहीशा झाल्या. जातींची व धर्मांची बंधने अजून शिल्लक असली, तरी वर्गांची बंधने इतिहासजमा झाली. आंतरजातीय, आंतरधर्मीय व आंतरभाषिकच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय लग्नेही आता कोणाचे कुतूहल फारसे चाळवीत नाहीत. एका वर्गातली माणसे दुसऱ्यासोबत, तर कधी तिसऱ्यासोबत जगता-वावरताना दिसली. यांतल्या प्रत्येकाला आत्मभान येत असतानाच दुसऱ्यांच्या तशा अस्तित्वाच्या जाणिवाही होतच राहिल्या. ज्ञानाची महती वाढली. शौर्य, कला, क्रीडा या क्षेत्रांतील गुणवंतांची नावे मोठी झाली. ती जन्मसंबद्ध न राहता गुणसंबद्ध झाली. अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांचा धर्म कुणी विचारात घेतला नाही आणि मनमोहनसिंगांचे अर्थतज्ज्ञ असणे देशाएवढेच जगानेही नाकारले नाही. गांधी जगाने स्वीकारला, आंबेडकरांचीही महती वाढली आणि नेल्सन मंडेलांना जगाने अभिवादन केलेले दिसले. हे सारे सॉक्रेटिसच्या द्रष्टेपणात होतेच, असे आज म्हणता यायचे नाही; पण त्याचे द्रष्टेपण या साऱ्यांना स्वप्नात पाहू शकणारे होते, असे नक्कीच म्हणता येईल. 

ही उदाहरणे मोठी म्हणून येथे नोंदविली; पण ती आपल्या अवती-भवतीही पाहता यावीत, एवढी विपुल आहेत. शाळेत एकसारखा गणवेश घालून जाणारी मुले एकत्र बसतात, वाढतात, खेळतात आणि स्पर्धा करतात. त्यांच्यात उच्च-नीच वा खालचा-वरचा हा भेद नाही. जो तसा पाहील, तो त्या मुलांच्याही तिरस्काराचा विषय होईल. संपत्तीचे वरचढपण संपले. मुकेश अंबानींच्या ‘ॲन्टिला’ने आमची रात्र हिरावली, असा संताप त्या इमारतीभोवतीचे गरीबच बोलू लागले. मंत्री तुरुंगात जातात आणि उद्योगपतींना बेड्या पडतात. शंकराचार्य अपराधी होतात आणि मौलानाही कायद्याच्या बंधनात अडकतात. अमेरिकेचे एक उपाध्यक्ष त्यांच्या पदावरून थेट तुरुंगात गेले, तर भारताचे एक केंद्रीय मंत्री स्वतःचा बचाव करीत कित्येक दिवस जंगलात लपून राहिले. हुकूमशहांना फासावर लटकलेले पाहिले आणि सामान्य कुटुंबांतली माणसे देशाच्या अध्यक्षपदी व पंतप्रधानपदी आलेलीही पाहिली. हा सारा जन्माचा पराभव आणि गुणवत्तेचा विजय आहे. ही न्यायाची खूण आहे आणि न्याय ही उद्याच्या समाजाची आधारशीला आहे. 

Tags: सेगोलाईन रॉयल नेल्सन मंडेला सोनिया गांधी मनमोहन सिंग अब्दुल कलाम मुकेश अंबानी बराक ओबामा डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी सॉक्रेटिस प्लेटो अँरिस्टोटल न्याय मन्वंतर सुरेश द्वादशीवार Segolene Royal Nelson Mandela Soniya Gandhi Manmohan Singh Abdul Kamal Mukesh Ambani Barac Obama Dr. Babasaheb Ambedkar Mahatma Gandhi Socrates Plato Aristotle Nyay Manvantr Suresh Dwadashiwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात