Diwali_4 स्वातंत्र्य (मन्वंतर - उत्तरार्ध)
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

स्वातंत्र्याचा अर्थ लावू पाहणारी माणसे त्याच्या एवढ्या छटा लक्षात घेतात काय हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर निराशाजनक आहे. कारण स्वातंत्र्य हे केवळ सामाजिक मूल्य नाही. तो व्यक्तिगत अधिकारही आहे आणि व्यक्तीचा अधिकार कुठे संपतो आणि सामाजिक मूल्याचे महात्म्य कुठे सुरू होते याविषयीच्या साऱ्या धारणा स्थलकालच नव्हे तर प्रगतीसापेक्षही आहेत. 

न्यायाखालोखाल स्वातंत्र्य या मूल्याचा समावेश आपल्या घटनेच्या उद्देशपत्रिकेत (प्रिॲम्बल) आला आहे. मात्र तो ‘विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा व पूजा’ या मर्यादांनी निश्चित केला आहे. घटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारात स्वातंत्र्य समाविष्ट आहे. त्यात विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा व पूजा यांच्या जोडीला संचार व व्यवसाय यांचेही स्वातंत्र्य सांगितले आहे. या स्वातंत्र्यावरील विवेकाच्या मर्यादांचा त्याच ठिकाणी सविस्तर उल्लेख आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे सारेच सांगतात. पण स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय, हे त्यांच्यातले कोणी सांगत नाही. तत्त्वज्ञानाचे ग्रंथ, राजकीय व सामाजिक विचारवंतांचे लेखन आणि स्वातंत्र्याचे म्हणून लढविले गेलेले आजवरचे लढेही त्याचा अर्थ सांगत नाहीत. त्यावरचे परस्परभिन्न आणि प्रसंगी परस्परविरोधी असणारे भाष्य अनेकांनी केले व ते अनेकांना पटतानाही दिसते. मात्र या मूल्याचीही नीती व न्यायासारखीच कोणतीही सर्वमान्य व्याख्या नाही. व्यक्तिपरत्वे त्याचा अर्थ वेगळा असतो आणि प्रत्येकच जण स्वातंत्र्याचा त्याने लावलेला अर्थ खरा मानतो. अगदी सॉक्रेटिसला मृत्युदंड देणारी अथेन्सची लोकशाही त्याला स्वतःलाच पुरेशी स्वतंत्र वाटली. तिने विषाचा पेला पिण्याचा वा देश सोडून जाण्याचा- असे दोन पर्याय त्याच्या पुढे ठेवले. मात्र सॉक्रेटिसला तो निर्बंधाचा विषय वाटला नाही. त्याने विषाचा पेला स्वेच्छेने घेतला आणि मृत्युदंड स्वीकारला. ते करीत असताना आपण स्वदेशी कायद्याचा आदर करीत असून त्याविषयीचा सामान्य माणसांच्या मनातील विश्वास कायम राखत आहोत, असे म्हणाला. 

आपल्याला झालेल्या शिक्षेत अन्याय्य वा स्वातंत्र्याचा संकोच करणारे काही आहे असे त्याने आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत म्हटले नाही. स्वातंत्र्य नावाच्या मूल्यासाठीच सारे जग आणि मानवजात आजवर लढत आली. जगाचा इतिहास हा स्वातंत्र्यलढ्याचाच इतिहास आहे आणि आजचे वर्तमानही तोच लढा लढत व ती लढत अनुभवत आहे, अशी कवने कवींनी लिहिली; तत्त्वज्ञानी माणसांनी त्यांचे मेंदू झिजविले आणि त्याचा अर्थ न कळताही अनेकांनी त्यासाठी प्राणांचे मोल चुकविले... पण एवढ्यावरही त्या मूल्याचा नेमका अर्थ इतिहासाला आणि वर्तमानाला सांगता आला नाही. भविष्यालाही तो सांगणे जमेल, असे वाटत नाही. 

विचारस्वातंत्र्य ही संकल्पना जेवढी थोर तेवढीच फसवी आहे. विचारांनी समाज पुढे नेता येतो, विचारांनीच तो प्रगल्भ व प्रगत होतो, झालेच तर विचारांमुळेच तो ओळखलाही जातो. असा विचार कोण करतो, तो करणाऱ्यांची संख्या केवढी आणि समाजातली बहुसंख्य माणसे विचार करतात काय- हा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर निराशाजनक आहे. जे वाटते, तो विचार नव्हे. जे आवडते, पटते वा भावते, तोही विचार नव्हे. प्रत्येक प्रश्नाच्या सर्व बाजू मनात आणून त्यांतल्या सर्वांत योग्य बाजूची निवड करणे ही विचाराची खरी प्रक्रिया आहे. ती अंगवळणी पडलेल्यांचे वा तसा प्रयत्न करणाऱ्यांचे वर्ग कितीसे मोठे आहेत? अगदी सॉक्रेटिसचा काळ घेतला तरी त्याच्या नगरराज्यात दीड लाख माणसे होती. त्यांतली दोन-तृतीयांश गुलाम होती आणि त्यांना विचाराधिकार नव्हता. उरलेल्यांपैकी व्यापारउदिम करणाऱ्यांनाही मतदानासारखे नागरी अधिकार नव्हते. राहिलेल्या मूठभरांत तरी ‘स्वतंत्र’ विचार करू शकणारी माणसे किती होती? प्लेटोचे सारे संवाद वाचले आणि अथेन्सविषयीचे ग्रंथ पाहिले तरी ज्यांच्याजवळ स्वतःचा म्हणून विचार आहे अशा माणसांची संख्या दीड ते दोन डझनांच्या पुढे जात नाही. ही माणसेही त्यांच्या परंपरेला धरून विचार करतात. 

डेल्फीच्या दैवताचे स्मरून निर्णय करणारी आणि सॉक्रेटिस, ॲटिकस वा डेमॉस्थेनिससारख्याच्या विचारांचे अनुकरण करणारी होती. एक मोठा वर्ग प्रभावी वक्त्यांच्या भाषणांनी वाहून जाणारा व ती भाषणेच खरी मानणारा होता. या प्रकाराची भीती अमेरिकेची राज्यघटना तयार होत असताना तिच्या घटनाकारांच्या मनातही होती. आपल्या भाषणाने लोकांना मोहित करून एखादा वक्ता अध्यक्षपद मिळवू शकेल, या  शंकेपायीच त्या घटनाकारांनी अध्यक्षपदाची निवडणूक अप्रत्यक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला. 
आज भारतात काँग्रेसच्या विचाराची, संघविचारांची, डाव्या वा उजव्या विचारांची माणसे भरपूर आढळतात. ‘त्यांच्या’ स्वतःच्या विचारांची माणसे त्यात किती असतात? गांधीने विचार करायचा- प्रसंगी नेहरू, पटेल व आझादांनी तो करायचा आणि त्यांच्या अनुयायांनी तोच आपला विचार म्हणून सांगायचा. संघासारख्या एकचालकानुवर्ती व कम्युनिस्टांसारख्या नेतृत्वावर्ती संघटनेतही याहून वेगळे काय असते? वास्तव तर याहूनही वेगळे व निराश करणारे आहे. वर्तमानपत्रात छापून येणारी आपल्या आवडत्या पुढाऱ्याची भाषणे वाचायची आणि तोच आपला विचार असल्याचे जोर लावून सांगायचे, हेच सर्वत्र आढळणारे. त्यामुळे विचारस्वातंत्र्य हे मूल्य मोठे असले तरी ते पेलू शकणारे मात्र थोडे, असे वास्तवच आपण अनुभवत असतो... अमेरिकेत रिपब्लिकन व डेमॉक्रॅटिक पक्षांचे नेते विचार करतात व तो व्यक्त करतात. वर्तमानपत्रे त्यावर बरे-वाईट लिहितात आणि लोक त्याआधारे त्यांचे ‘विचार’ बेततात... हुकूमशाहीत फक्त एक जण विचार करतो. रशियात तो लेनिन करायचा, पुढे स्टालिन व नंतरच्यांनी त्यांच्या कालानुरूप त्याच प्रकारच्या आवृत्त्या पुढे नेलेल्या. ज्या गोर्बाचेव्हने आपली फार वेगळी आवृत्ती आणली. त्याने पक्ष मोडला, देश तोडला आणि तोही आपल्या पदावर राहिला नाही. जर्मनीत हिटलर विचार करायचा आणि बाकीचे तो ऐकायचे. चीनमध्ये माओ विचार करणार आणि बाकीचे ऐकणार... एक गोष्ट आणखीही येथेच नोंदवावी, अशी. विचार हे शस्त्रही आहेच. हिटलरने त्याच्या विचारासाठी दोन कोटी, स्टालिनने पाच कोटी, तर माओने सात कोटी माणसांचा बळी घेतला. (हे आकडे युद्धात मारले गेलेल्यांच्या संख्येहून वेगळे आहेत.) 

अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हा स्वातंत्र्याचा पूर्ण अर्थ नव्हे. भाषण, लेखन वा मुद्रण हीदेखील त्याची सगळी अंगे नव्हेत. कारण ती अनुभवू शकणारी माणसे नेहमीच मूठभर होती व आजही ती तेवढीच आहेत. अभिव्यक्ती हे मूल्य भाषण, मुद्रण, दूरचित्रवाणी आणि चर्चेची अन्य व्यासपीठे यांतून अनुभवता येते. ही साधने वापरू शकणारे व वापरणारे किती, हा प्रश्न पुन्हा येतोच. भाषणस्वातंत्र्य म्हणजे पुन्हा ते देणाऱ्याचे की त्याला ते द्यायला लावणाऱ्या नेत्याचे वा पक्षाचे? मुद्रणस्वातंत्र्य कुणाला असते? संपादकाला, वार्ताहराला की त्यांना नेमणाऱ्या व काढून टाकू शकणाऱ्या मालकाला? भारतातली सगळी माध्यमे बड्या भांडवलदारांच्या ताब्यात असण्याची आजची स्थिती आहे. गेल्या काही महिन्यांत त्यांनी किती संपादकांना राजीनामे द्यायला भाग पाडले, याची मोजदाद तरी कोणी केली? 

अमेरिकेत, इंग्लंडमध्ये आणि पाश्चात्त्य देशांत हे एवढे बटबटीत नसले तरी सौम्य स्वरूपात आहे. आणि हुकूमशाहीत? तिथे तर सत्तेवरचा पक्ष व पुढारी देईल तेवढेच स्वातंत्र्य आणि तेवढीच त्याची अभिव्यक्ती. माओ-त्से- तुंगांने जेव्हा ‘शंभर फुले फुलू द्या’ ही त्याची कविता ऐकविली, तेव्हा ई. एम. फोर्स्टर हा कवी म्हणाला, ‘अगदी शंभर झाले तरी त्यातही कुणी तरी पहिला असतोच’... परिणाम भोगण्याची तयारी असली तर प्रत्यक्षातली ही बंधने झुगारणे एखाद्याला शक्यही होते. मात्र तसे धाडस फार थोड्यांना जमणारे आणि म्हणून हा अधिकारही फार थोड्यांच्याच वापराचा आहे. अभिव्यक्तीवर काही चांगली बंधनेही आहेत. कुणाची बदनामी होऊ नये, मित्र राष्ट्रांच्या संबंधात बिघाड होऊ नये, धर्म वा जातीत भांडणे लागू नये- अशी अभिव्यक्ति- स्वातंत्र्यावरची काही बंधने आहेत आणि ती सर्वमान्य व स्वागतार्हही आहेत... आपल्या मर्जीनुसार व्यवसाय निवडण्याचा अधिकारही या स्वातंत्र्यात समाविष्ट आहे आणि तो महत्त्वाचा आहे. एके काळी व्यवसाय परंपरागत असत. जुन्या पिढ्यांचे व्यवसाय नव्या पिढ्या पुढे नेत. आता हे बंधन कायद्याने तोडले तसे समाजानेही झुगारले आहे, हे लक्षणीय. 

गमतीने सांगता येण्याजोगी गोष्ट, श्रद्धा व पूजा याविषयीच्या स्वातंत्र्याची आहे. यातही श्रद्धा कशाविषयी बाळगावी व कोणी कशाची पूजा करावी, हे ठरविण्याचा श्रद्धा बाळगणाऱ्या व पूजा करणाऱ्यांना पुरेसा हक्क नाही. पूजेचे स्वातंत्र्य व्यक्तिगत नाही, ते समूहगत व परंपरेने निश्चित केले आहे. ज्या धर्मात, देशात, समाजात, जातीत वा प्रदेशात जन्म घेतला, त्यातल्याच दैवतांची पूजा करायची, त्यांचाच अभिमान बाळगायचा आणि श्रद्धेने त्यांच्याचकडे पाहायचे- हे समाजाचे सांगणे आहे. हिंदू धर्मात जन्म घेतलेल्याला कुराण वाचता येईल, पण त्याविषयीची श्रद्धा बाळगणे निषिद्ध असेल. पाकिस्तानात जन्माला आलेल्याला भारताविषयी चांगले बोलता येईल, पण त्याचा अभिमान बाळगता येणार नाही. जातींची दैवते असतात. जमातींची पूजास्थाने असतात, प्रदेशांच्याही देवता वेगळ्या असतात. याखेरीज पुरुषांची दैवते आणि स्त्रियांची दैवतेही वेगळी असतात. ‘स्वधर्मे निधनम्‌ श्रेयः’ या चांगल्या सुभाषिताचा खरा अर्थ- जन्माने दिलेल्या धर्माची, देशाची, दैवताची आणि समाजाची पूजा करा, हा आहे. त्यामुळे पूजास्वातंत्र्य हादेखील व्यापक अर्थाने एक भ्रमच आहे. अडवाणींनी जीनांची तारीफ करणे किंवा नवाझ शरिफांनी  गांधीजींच्या समाधीवर पुष्पचक्र वाहणे हा अधर्मच नव्हे, तर देशद्रोह ठरण्याचा धोकाच आज मोठा आहे. कोणत्याही अरबाने अमेरिकेची मदत घेतली आणि त्या देशात शिक्षण घेतले, तरी तिला चांगले म्हणायचे नसते आणि मागल्या शतकात स्वतंत्र झालेल्या बहुसंख्य देशांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून प्रेरणा घेतली असली तरी त्यांनी भारताचे गोडवे गायचे नसतात... पूजास्वातंत्र्य हा समाजमान्यतेच्या बळावरच अनुभवता येणारा हक्क आहे, हा याचा अर्थ. काही जण ही अट झुगारतात; पण मग ती एकटी होतात, बहिष्कृत राहतात किंवा वाळीत पडतात. 

अभिव्यक्तीच्या पल्याडही स्वातंत्र्य असते की नाही? आणि असेल, तर ते कोणते आणि कुठवर? शहाणी माणसे सांगतात- आपल्या स्वातंत्र्याने इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच करू नये. इतरांच्या स्वातंत्र्याच्या मर्यादेत आपण आपले स्वातंत्र्य अनुभवावे. कारण इतरांच्या स्वातंत्र्यावरचे अतिक्रमण हा त्यांच्यावरील अन्याय आहे. पण स्वातंत्र्य वा न्याय यांच्या सीमारेषा तरी कुठे निश्चित आहेत? त्या ज्यानेत्याने स्वतःपुरत्या ठरविल्या व ठरवायच्या आहेत. त्या प्रत्येकालाच ठरविता येत नाहीत. त्याविषयीचे त्याचे अज्ञान तेवढे मोठे आहे, म्हणून मग राज्य आणि त्याचा कायदा व समाज आणि त्याचे नियम अस्तित्वात आहेत. प्रश्न हा की, या कायद्यांनी व नियमांनी संकुचित केलेले स्वातंत्र्य हे मूल्य तरी कसे असेल? आणि ते तसे नसेल, तर त्याचे मोल तरी कितीसे? जगाचा इतिहास हा स्वातंत्र्याच्या वाटचालीचाच इतिहास असेल; तर जगाची आजवरची वाटचाल त्याने उगाच केली, की आपण ती केली हा भ्रमच त्याने बाळगला? 

स्वातंत्र्य या मूल्याला आज असलेला अर्थ फ्रेंच राज्यक्रांतीने दिला आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्या क्रांतीची गर्जना होती. आजही ती ऐकायला चांगली व अंगावर रोमांच उभे करणारी आहे. मात्र या गर्जनेतल्या तीनही बाबी परस्परविरोधी व परस्परविसंगत आहेत, हे आपणही कधी तरी समजून घेतलेच पाहिजे... स्वातंत्र्य दिले आणि माणसे आपापल्या क्षमतेनुसार वागू लागली की, जास्तीची क्षमता असणारी माणसे पुढे जाणार आणि कमी क्षमता असणारी माणसे मागे राहणार. ही व्यवस्था समता निर्माण करणारी नसून विषमता आणणारी आहे. याउलट, समतेचा आग्रह धरला की कमी क्षमतेची माणसे जागच्या जागी राहून सुखावणार व स्वस्थ होणार आणि जास्तीची क्षमता असणाऱ्यांच्या पायांत बेड्या पडणार... बुद्धिमान व तत्त्वज्ञ म्हणविणारी माणसे म्हणतात स्वातंत्र्य आणि समता यांच्यात समन्वय साधला पाहिजे. हा समन्वय कोण व कसा साधणार, हा प्रश्न आहे. तो राज्यकर्ते या नावाच्या वर्गात असणाऱ्यांनी साधायचा, की समाज नावाच्या अदृश्य महाव्यवस्थेतील वजनदारांनी करायचा? जे तो साधतील ते स्वतंत्र, की ज्यांच्यावर तो लादला जाईल ते स्वतंत्र? 

स्वातंत्र्याचा अर्थ लावू पाहणारी माणसे यातील विसंगतीचा उलगडा करताना म्हणतात, समता म्हणजे फक्त संधीची समता. या संधीचा वापर करून पुढे जाण्याचा वा मागे राहण्याचा अधिकार प्रत्येकाला असणे म्हणजे स्वातंत्र्य. पण संधीची समता फक्त क्रिडांगणावर असते. त्यावरचे धावपटू एका सरळ रेषेवर उभे असतात आणि परीक्षकाने शिटी वाजवली की धावायला लागतात. मग त्यात कुणी पहिला येतो, तर कुणी अखेरचा. पण क्रिडांगणावरची ही सरळ रेषेची समता आणि धावपटूंना लाभणारे हे स्वातंत्र्य जीवनाच्या दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात असते? आणि ते नसेल, तर ते आणण्याचा प्रयत्न कुठे दिसतो? आपल्याकडे आरक्षण नावाची व्यवस्था आहे. ती आजवर मागे राहिलेल्यांना वा तसे ठेवलेल्यांना न्याय देते. पण ती पुढे जाणाऱ्यांनाही न्याय देते, असे ठामपणे कोण सांगेल? समाज हे व्यवस्थापन आहे आणि त्याला एक आत्मसंतुलन राखावे लागते. ते त्यात खूपदा असतेही. मात्र समाजाचे हे संतुलन त्याची उंची कणाकणाने वाढवीत असले तरी त्यातल्या क्षमतावान व्यक्तींचे वाढणे ते वठवीत असतेच की नाही?... की, समाज ही मुळातच एक विषम व्यवस्था आहे? ...गांधींनी समतेहून बंधुतेवर जास्तीचा भर दिला. स्वातंत्र्य आणि समता यांच्यातला समन्वय बंधुतेच्या भावनेतून साधता येईल, अशी त्यांची श्रद्धा होती. अगदी अलीकडे वाजपेयींनी बंधुतेऐवजी ममता हा शब्द वापरला. ‘हमे समता चाहिये और ममता भी चाहिये’, असे ते म्हणाले. पण बंधुता म्हटले काय आणि ममता म्हटले काय- खाली वाकून एखाद्याला कडेवर घेणेच त्यात अपेक्षित आहे की नाही? आणि असे वाकण्याची सक्ती वा संस्कार या स्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या बाबी असतात की नाही? दुसरीकडे- ज्याला उचलून घ्यायचे, त्याची स्वबळाच्या आधारे उभे होण्याची क्षमता त्यामुळे बाधित होते की नाही? हा विषय येथे शारीरिक उदाहरणाने चर्चिला असला तरी मानसिक व पुढे सामाजिक संदर्भातही खरा ठरावा असा आहे. 

या प्रश्नाविषयी माणसे बोलायचे टाळत असली, तरी तो साऱ्यांच्या मनात खदखदत असतोच. एकीकडे आरक्षणाच्या कक्षा रुंदावाव्यात, अशी मागणी होते. ज्या समाजाने समाजजीवनाची सगळी सत्ताक्षेत्रे काबीज केली आहेत, त्या  मराठ्यांनाही महाराष्ट्रात 16 टक्क्यांएवढे आरक्षण हवे; शिवाय ते आणखी वाढवून हवे. दलित व आदिवासींना ते आहे. ओबीसींना ते प्राप्त झाले आहे. धनगर, वंजारा या ज्ञातींनाही ते हवे आहे. उत्तरेतल्या ब्राह्मणांच्या एका पोटजातीनेही ते मागितले आहे. एके काळी आरक्षण ही सवलत होती; आता तिच्याकडे हक्क म्हणून पाहिले जात आहे. तोही ‘यावच्चंद्र दिवाकरौ’ असावा, अशा मागण्या पुढे येत आहेत. ज्यांची आरक्षणाची गरज कधीचीच संपली, त्यांनाही ते हवे आहे. कारण आरक्षण हीदेखील अंगवळणी पडणारी सवय आहे. आरक्षणाने 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे आणि तसे करताना त्याने न्यायालयांना धाब्यावर बसविले आहे. ज्यांचा समावेश आरक्षणात नाही, त्या जातिवर्गांची भावना याविषयी कोणती व कशी आहे? त्यांना तो त्यांच्यावरील अन्याय वाटतो की नाही? 

विश्वनाथ प्रताप सिंहांच्या सरकारने जेव्हा मंडल आयोग लागू केला, तेव्हा त्याविरुद्ध एकट्या उत्तर प्रदेशात आत्मदहन करणाऱ्या तरुणांची संख्या केवढी होती? समतेच्या नावाने समाज एकसंध व स्वतंत्र व्हायचा, की तो तोडून त्याच्या आधीच्या विषमतेत वैराच्या विषाची बीजे पडायची? मतांच्या राजकारणामागे लागलेले लोक याचा विचार करोत वा न करोत; पण ज्यांना समाजाच्या एकसंधतेविषयी व खऱ्या स्पर्धात्मक स्वातंत्र्याविषयी आस्था आहे, ते याबाबत काय करताहेत? आता देशाने खुली व स्पर्धात्मक अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. चीनने ती फार पूर्वी स्वीकारली आहे. पण त्या देशातले राजकीय निर्बंध मात्र कायमच राहिले. राजकीय निर्बंध आणि खुली अर्थव्यवस्था या परस्परविरोधी बाबी आहेत, असे आता त्या देशातला विचारवंतांचा वर्ग उघडपणे सांगू लागला आहे. राजकीय निर्बंध जर खुल्या अर्थव्यवस्थेशी विसंगत असतील तर तीत आरक्षण कुठे आणि कुठवर बसते? एक गोष्ट आणखीही. हे सारे सरकारी नोकऱ्यांबाबतच लागू होणारे आहे आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. व्यापार, उद्योग व बाजार खुला व्हायचा आणि त्यात विदेशी गुंतवणूक यायची तर असे होणे अपरिहार्यही आहेच... स्वातंत्र्य आणि समता, खुले अर्थकारण आणि आरक्षण यांतल्या विसंगतींवरचा बंधुता हा भावनात्मक मार्ग यापुढे कितीसा कामी येईल याचाही विचार या निमित्ताने व्हावा लागेल आणि त्याचे निष्कर्ष साऱ्यांना आवडणारे असणार नाहीत. 

स्वातंत्र्याचा अर्थ लावू पाहणारी माणसे त्याच्या एवढ्या छटा लक्षात घेतात काय, हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर निराशाजनक आहे. कारण स्वातंत्र्य हे केवळ सामाजिक मूल्य नाही; तो व्यक्तिगत अधिकारही आहे; व्यक्तीचा अधिकार कुठे संपतो आणि सामाजिक मूल्याचे माहात्म्य कुठे सुरू होते याविषयीच्या साऱ्या धारणा स्थल-कालच नव्हे, तर प्रगतिसापेक्षही आहेत. गांधीला केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरेसे वाटले नाही. तो सामाजिक, कौटुंबिक व थेट व्यक्तिगत स्वातंत्र्यापर्यंत गेला. भारताच्याच नव्हे तर साऱ्या जगाच्या व त्यातही त्यातल्या माणसांच्या स्वातंत्र्याविषयीचा त्याला ध्यास होता. तेवढ्यावरही तो थांबला नाही. बुद्धी व मन यावरचे माया, मोह व स्वार्थ यांचे सावट दूर होणे आणि माणसाचे माणूसपण (त्याला त्याने आत्मा म्हटले) सर्वतंत्र स्वतंत्र व निर्भय होणे, एवढ्या आध्यात्मिक पातळीवरच्या स्वातंत्र्याची आकांक्षा त्याने धरली... तो सॉक्रेटिसही त्यातलाच होता. 

येता काळ स्वातंत्र्याचे क्षेत्र रुंदावण्याचा आणि त्यावरच्या मर्यादा अस्पष्ट व धूसर होत जाण्याचा आहे. शिक्षणाचा स्फोट, समाजाची वेगवान प्रगती आणि वाढते अर्थबळ यामुळे वाढीला लागणाऱ्या आत्मभानाचा हा काळ आहे. हे आत्मभान व्यक्तीला जास्तीचे स्वतंत्र मन व भान देणारे आहे. त्यावरच्या आजच्या मर्यादांचे फोलपणही तिला समजावणारे आहे. फार काळ परावलंबन मान्य न करणारा, स्वावलंबनाची संधी शोधणारा व स्वतंत्रपणे आपल्या पायावर स्थिर होण्याचा हा काळ आहे. यात वरच्या, खालच्या वा बाजूच्याही मर्यादा क्षीण होणार व गळून पडणार आहेत. राज्याचे अधिकारक्षेत्र सीमित व्हायला सुरुवात झाली आहे. नागरी अधिकारांत वाढ झाली व ती यापुढे आणखी होणार आहे. पन्नास वर्षांपूर्वी जे अधिकार कुणी स्वप्नात पाहिले नव्हते, ते आता प्रत्यक्ष वापरता येत आहेत. माहितीचा अधिकार अमेरिकेत पूर्वी आला; आता तो भारतीयांना मिळाला आहे. अन्नसुरक्षा मिळाली आहे. जीवनावश्यक वेतन सर्वत्र निश्चित झाले आहे. खासगी मालमत्ता विस्तारली व तिचा वापर करू शकणाऱ्यांची संख्या मोठी झाली. ज्या वयात जे अधिकार प्राप्त होत नसत, ते त्याच वयात आता मुला-मुलींना प्राप्त होऊ लागले आहेत. याहून महत्त्वाची बाब- या अधिकारवापराची नवी मानसिकताही आता तयार झाली आहे. मनांवरची सरकारची, पुढाऱ्यांची, समाजाची, धर्माची, जातीची आणि अन्य अधिकारी म्हणविणाऱ्यांची दडपणे हटली वा कमी झाली आहेत. पूर्वीच्या स्त्रीहून आजची स्त्री अधिक स्वतंत्र आहे आणि तिला स्वतःच्या मर्जीने जगता येणे शक्य झाले आहे. जे तिला तसे करू देणार नाहीत, ते अपराधी ठरण्याचाही हा काळ आहे. ही स्थिती फार कमी वेळात आली आणि तिचा येण्याचा व वाढण्याचा वेग अकल्पित वाटावा एवढा मोठा आहे. विदेशात राहणारी आणि  नोकरी-धंद्यानिमित्त लवकरच घरापासून दूर होणारी मुले व मुली आता स्वयंनिर्णयानुसार जगतात व राहतात. स्वातंत्र्य आले आणि वाढले आहे, याचे हे दाखले आहेत. 

स्वातंत्र्याचा संबंध समाजाशी आहे. येत्या काळात समाजाची बंधने क्षीण होऊन गळणार असली, तरी त्यातला निखळ संबंधांचा भाग शिल्लक राहील आणि त्यांचा आधार परस्परांविषयी वाटणारा विश्वास हा असेल. ‘सर्व तऱ्हेच्या जाचक निर्बंधांपासून मुक्तपणे जगण्याची सामाजिक स्थिती म्हणजे स्वातंत्र्य’ अशीच स्वातंत्र्याची व्याख्या ऑक्सफर्डच्या शब्दकोशात आली आहे. हे संबंध नातेसंबंधांवर व रक्तसंबंधांवर उभे नसतील. आपली व इतरांची भावभावना आणि वृत्ती सारखी असल्याच्या विश्वासावर ते आधारले असतील. यातला एक प्रश्न- हा परस्परविश्वास सारखा असेल काय, हा आहे. माणसांच्या क्षमता वेगळ्या व कमी-अधिक असणार. त्यातून स्वातंत्र्यात त्यातला फरक आणखी वाढला असणार. जास्तीच्या क्षमतेची माणसे त्यात वरचढ असतील काय आणि कमी क्षमतेची माणसे त्यांना दबून वागतील काय, या प्रश्नाचे उत्तर सरळ व सोपे नाही. असे संबंध आपण आजही पाहतो. वचक ठेवणारी आणि वचकून वागणारी माणसे त्यात वेगळी दिसतात. उद्या यातला वचक कमी झाला असेल. समान अधिकार, स्वातंत्र्याचे सारखे क्षेत्र आणि पुढे जाण्याची सारखीच संधी... या स्थितीत जाच नसेल, मनमानी नसेल आणि फसवणूकही नसेल. त्यात आदराचा भाग मोठा असेल आणि वचकाचा विश्वास बनला असेल... मतभेद राहतील; ते आजही आहेत. मनभेदही असतील, आजच्यासारखेच; पण परस्परांची क्षमता, अधिकार, क्षेत्र आणि व्यक्तित्व या साऱ्यांच्या जाणिवा प्रत्येकात येणाऱ्या आत्मभानामुळे वाढल्या असतील... 

एके काळी कुटुंबात स्त्री कःपदार्थ होती. पुढे ती दखलपात्र झाली. नंतर ओळख ठेवण्याएवढी ठळक झाली. पुढे ती मान देण्याएवढी मोठीही झाली. तिची शारीरिक क्षमता लक्षात असूनही तिला त्यासाठी कमी लेखण्याची वृत्ती लोपत गेली. जेथे ती लोपली नाही तेथे मागासलेपण कायम राहिले, असेच आपण म्हणतो. नवे स्वातंत्र्य माणसांना आत्मभान आणि आत्मविश्वासासोबत निर्भयपण देईल. या निर्भयपणाचा दर वेळी क्षमतेशी संबंध असेलच, असे नाही. मात्र क्षमतेचे कमी- अधिकपण हा सामाजिक आदर वा अनादराचा आधार असणार नाही. कारण स्वातंत्र्य एकटे येत नाही, ते लोकशाही मूल्यांसोबत येत असते. लोकशाहीत प्रत्येकाच्या मताला मोल आहे आणि ते सारखे आहे. आजचे पुढारी पूर्वीच्या सेनापतींसारखे व राजांसारखे अनुयायांना सदैव गृहीत धरू शकत नाहीत. प्रसंगी ते स्वतःचा वापरही त्यांना करू देतात... अमेरिकेचा अध्यक्ष झाला तरी त्याला जनमत विचारात घ्यावे लागते आणि हुकूमशहांनाही त्याची दखल घ्यावी लागते. 

आजवरच्या आपल्या इतिहासात 13 व्या शतकातल्या एका राजाला इंग्लंडच्या जनतेने त्याच्या उद्दामपणासाठी फासावर चढविले. गेल्या पाच वर्षांत फासावर लटकलेल्या अशा उद्दामशहांची जगातली संख्या केवढी, हे लक्षात आणले तरी या साऱ्या प्रश्नांची उत्तरे हाती येतील. स्वातंत्र्य ही न थांबणारी बाब आहे. तिची अडवणूक करणारे थकतात; तिचे पुढे जाणे थांबत नाही. ती स्वतःसोबत नुसती लोकशाहीच आणत नाही, मानवाधिकारांचे तोरणही आणत असते. उद्याचा काळ या तोरणांनी सुशोभित झाला असेल. 

जगात 198 देश असल्याचे म्हटले जाते. ही संख्या कधी 195, तर कधी 222 पर्यंत सांगितली जाते. देशांना मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय मान्यतांच्या भरवशावर ही संख्या कमी-अधिक होते. 1972 मध्ये यांपैकी अवघ्या 43 देशांत लोकशाही सरकारे सत्तेवर होती. 2002 मध्ये त्यांची संख्या 89 वर गेली आणि हुकूमशहांची संख्या 47 पर्यंत खाली आली. आंशिक लोकशाही असणारे देश त्यांत 56 होते. आज जगात केवळ 43 हुकूमशहा शिल्लक राहिले असून येत्या 25 वर्षांत ते सारे नामशेष होतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. हा काळ लोकशाहीच्या नुसत्या भौगोलिक विस्ताराचाच नाही, तर ती आपल्या नागरिकांना देत असलेल्या अधिकारांच्या वाढीचाही आहे. ही वाढ स्वातंत्र्याच्या दिशेने होणारी आहे आणि तिची गती मोठी व दिशाही निश्चित आहे. लोकशाहीचा विस्तार हा लोकशाही राज्यांच्या संख्येचाच विस्तार नाही; या विस्ताराला गुणात्मक बाजूही आहे. लोकशाही सरकारे सत्तेचे विकेंद्रीकरण स्वीकारतात आणि सरकारची अधिकाधिक सत्ता प्रादेशिक जनसमूहात वितरित करण्याचा प्रयत्न करतात. ‘आमच्या गावात आमचेच सरकार’ ही महाराष्ट्रात ऐकू येणारी घोषणा या पातळीवरची आहे. भारतात सत्तेचे विकेंद्रीकरण 1962 मध्येच सुरू झाले. त्यामुळे जिल्हा परिषदांना व पंचायत समित्यांना त्यांच्या भागांचा विकास करण्याचे अधिकार प्राप्त झाले. आता हे अधिकार थेट ग्रामपंचायतींच्या पातळीपर्यंत पोहोचविण्याचा देशात प्रयत्न होत आहे. या प्रयत्नांची पुढची दिशा व्यक्तीचे अधिकार वाढविण्याची व तिच्या स्वातंत्र्याचा विस्तार करणारी असेल.

Tags: जाती-विषमता मंडल आयोग व्ही.पी.सिंग आरक्षण मूल्य पंडित नेहरू हिटलर महात्मा गांधी राज्यघटना बंधुता समता ऑक्सफोर्ड डिक्शनरी सॉक्रेटिस प्लेटो अमेरिका बराक ओबामा लोकशाही सुरेश द्वादशीवार मन्वंतर स्वातंत्र्य Jativishmata Mandal Ayog V.P.Singh Arakshan Muly Pandit Neharu Hitler Mahtama Gandhi Rajyghatna Bandhuta Samata Oxford Dictionary Socrates Plato America Barac Obama Lokshahi Suresh Dwadashiwar Manwantar Freedom Swatantry weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात