Diwali_4 समता (मन्वंतर - उत्तरार्ध)
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

‘चंगळवाद’ हा एक कमालीचा अन्याय्य व संतापजनक शब्द सध्या बराच लोकप्रिय व प्रचलित आहे. परवापर्यंत ज्या गोष्टी आम्हाला उपलब्ध होत्या, त्या आता या नव्यांनाही मिळू लागल्या म्हणूनच त्यांच्या त्या उपलब्धींना आपण चंगळवाद म्हणतो काय, याचा विचार कधी तरी करावा लागणार आहे. आम्ही पंचतारांकित हॉटेलात कॉफी घेत असताना ते टपरीवरचा चहा पीत होते; आता तेही आमच्या शेजारच्या टेबलवर बसून आम्ही घेतो तीच पेये घेऊ लागले, म्हणून आम्ही त्यांना चंगळी म्हणतो काय? आमची ती गरज आणि त्यांची ती चंगळ, ही मानसिकता खरी की खोटी?

आपल्या राज्यघटनेने समतेच्या मूल्याला स्वातंत्र्या- खालोखाल महत्त्व दिले असले, तरी त्याने समाजजीवनात निर्माण केलेली ऊर्जा व अस्वस्थता मोठी आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या उधाण काळात ‘लिबर्टी, इक्वॅलिटी ॲन्ड फ्रॅटर्निटी’ (स्वातंत्र्य, समता व बंधुता) या मूल्यांची गर्जना झाली आणि तीच त्या क्रांतीचा प्रेरणास्रोत ठरली. समानतेच्या स्थापनेसाठी व धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यासाठी या क्रांतीच्या नेत्यांनी देशभरातील हजारो सरंजामशहांना व धर्मगुरूंना गिलोटिनच्या पात्याखाली आणून यमसदनी पाठवले. पॅरिसच्या मुख्य चौकात उभारलेले गिलोटिन्स (वधस्तंभ) कमी पडले, म्हणून गावोगावी तशा फिरत्या वधस्तंभांची व्यवस्था त्यांनी केली. ‘अपराधी असो वा नसो; तू सरंजामदार व धर्मपुरोहित आहेस आणि तेवढे असणे तुला मारायला पुरेसे आहे’ असे आंधळे दमनचक्र त्या काळात चालले. सरंजामदार व पुरोहितांना संपवून झाल्यावर क्रांतीच्या सरकारने राजघराण्यातली माणसे त्यांतल्या कच्च्याबच्च्यांसह गिलोटिनखाली आणली. पुढे सरकारातच भांडणे लागली, तेव्हा एका गटाने दुसऱ्याला आणि तिसऱ्याने पहिल्याला मारले. सगळेच क्रांतिकर्ते असे गतप्राण झाले आणि देश हताश झाला, तेव्हा नेपोलियनने सत्ता काबीज करून स्वतःला फ्रान्सचा सम्राट म्हणून घोषित केले. क्रांतीने घडविलेला विनाश आणि आणलेली अस्वस्थता त्याने प्रथम संपविली. पुढे त्या बळावर तो जग जिंकायला निघाला. निम्म्याहून अधिक युरोप ताब्यात आणून व त्यातील लक्षावधींचा बळी घेऊन तो रशियावर चालून गेला आणि तिथल्या बर्फाळ थंडीत अडकून पराभूत झाला. पुढे एल्बा या बेटावर कैदेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. 

कोणत्याही चांगल्या तत्त्वाचा टोकाचा अतिरेक कोणत्या दारुण अवस्थेला कारणीभूत होतो याचे याहून मोठे उदाहरण जगात दुसरे नाही. काही इतिहासकारांच्या मते, नेपोलियन हे फ्रेंच राज्यक्रांतीचे सर्वांत मोठे फलित होते. प्रत्यक्षात ते फलित नव्हते, क्रांतीच्या अपयशाची ती सर्वांत मोठी परिणती होती... माणसाच्या स्वभावातला एखादाही दुखरा भाग त्याचा ताबा घेऊ लागला की असे होत असते, असे शेक्सपिअर म्हणाला, त्याचेही कारण हेच... समता हे असे क्रांतिकारी पण दुधारी हत्यार आहे. समतेचा अतिरेकी आग्रह धरणारे लोक बहुधा तिचे हे दुसरे रूप लक्षात घेत असल्याचे दिसत नाहीत. समता म्हणजे सारखेपणा नव्हे, सारखी उंची वा एकचएक ठेंगणेपण नव्हे. समान वेतन नव्हे आणि सारख्या श्रमाची मागणीही नव्हे. असे सारखेपण वरपांगी समतेसारखे दिसत असले, तरी ते स्वातंत्र्य या दुसऱ्या मूल्याच्या जीवावर उठणारे असते आणि एकाच वर्गात राहून सारखेपण सांगणाऱ्यांवरही अन्याय करणारे असते. म्हणून ‘क्षमतेनुसार काम व कामाच्या प्रमाणात दाम’ असे मार्क्स म्हणाला नाही. त्याचे घोषवाक्य ‘क्षमतेनुसार काम व गरजेनुसार दाम’ हे होते. माणसांची क्षमता सारखी नाही, तशी त्यांची गरजही सारखी नाही. त्यामुळे मार्क्सच्या व्याख्येतली समताही सारखेपणाच्या वळणावर जात नाही. माणसांतले अंगभूत व अटळ वेगळेपण ती ध्यानात घेते. कोणतेही चांगले तत्त्व- ते केवढ्याही मोठ्या माणसाने सांगितले असले तरी- जसेच्या तसे कधी अमलात येत नाही. मार्क्सच्या समतेचा चुकीचा अर्थ लावणाऱ्या आरंभीच्या मार्क्सवाद्यांनी तो सारखेपणाच्या वळणावर नेला आणि त्या साच्यात न बसणारी माणसे मारली किंवा तुरुंगात डांबली. 

स्टालिनने पाच कोटी, तर माओने सात कोटी माणसांचा या हट्टापायी बळी घेतला. मात्र स्टालिनला समता आणता आली नाही आणि माओलाही ती आणणे जमले नाही. त्या दोघांच्या शेवटानंतर त्यांच्या देशात सत्तेवर आलेल्या नव्या नेत्यांनी सारखेपणा तर सोडलाच, पण पुढे जाऊन समताही बाजूला सारली. प्रथम गोर्बाचेव्हच्या रशियाने खुल्या व स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि डेंगच्या राजवटीत चीननेही त्याच व्यवस्थेच्या स्वागताची तयारी केली. परिणामी, पूर्वीच्या समतेने जनतेला जे दिले नाही ते नंतरच्या विषमतेने दिले आणि पूर्वीच्या समतेहून नंतरची विषमता सुसह्यही झाली. भारतात नेहरूंनी समाजवादी समाजरचनेची व मर्यादित भांडवलशाहीची ‘मिश्र अर्थव्यवस्था’ आणली. तिचे दोन भिन्न परिणाम देशाने अनुभवले. समाजवादी व्यवस्थेमुळे सरकारी मालकी वाढली व खासगी उद्योगपतींचे कार्यक्षेत्र मर्यादित झाले. मात्र त्याचबरोबर अर्थकारणातली स्पर्धा जाऊन ते गतिरुद्ध झाले. 

सन 1952 पासून 1991 पर्यंत ही अर्थव्यवस्था अवघ्या 3.5 टक्के वार्षिक दराने वाढत राहिली. लोकसंख्याही त्याच दराने वाढल्यामुळे अर्थकारणातली ही वाढ कुणाच्या वाट्यालाही फारशी आली नाही. मर्यादित खुलेपणामुळे उत्पादनाची फार थोडी क्षेत्रे खासगी उद्योगपतींच्या वाट्याला आली आणि त्यावरही सरकारच्या ‘परमिट लायसन्सराज’चे नियंत्रण राहिले. समाजावरचा त्याचा दृश्य परिणाम हा की, त्यात आज ज्याची अन्याय्य चर्चा होते, तो चंगळवादही वाढीला लागला नाही. दोनच तऱ्हेच्या मोटारी होत्या आणि त्यांचे पेट्रोल जाळणारे लोकही थोडे होते. मर्यादित वाढ आणि मर्यादितच वापर अशी ही वाटचाल होती. त्याविषयीची समाजाची मानसिकता 1967 पासूनच बदलत गेली व 1991 मध्ये देशाने रशिया व चीनसारखा खुल्या आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. परिणामी, देशाचे आर्थिक विकास दर पाच टक्क्यांवरून सात तर प्रसंगी नऊ टक्क्यांपर्यंत वाढला. जीवनावश्यकच नव्हे, तर चंगळींना प्रोत्साहन मिळेल अशी उत्पादने वाढली. समृद्धी आली, पण वितरणाची न्याय्य व्यवस्था नसल्यामुळे या समृद्धीने समाधानाऐवजी असमाधानच अधिक आणले. शिक्षणाचा स्फोट व तरुणाईची वाढती संवेदनशीलता यांनी या असमाधानाला धारदार वाचा दिली आणि प्रसंगी त्याला लढ्यासाठीही सिद्ध केले... 

तात्पर्य- पूर्ण समता, मर्यादित समता व मिश्र समता यांतले कोणतेही सूत्र सर्वत्र सारखे वापरता येत नाही. त्यासंबंधीची धोरणे कालसापेक्ष व  क्षेत्रसापेक्षच असावी लागतात. समान संधी हा समतेचा अर्थ याच सापेक्षतेतून पुढे आला. समाज व राज्य यांनी प्रत्येकाला आपल्या प्रगतीची संधी उपलब्ध करून द्यायची. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करायचे. साऱ्यांना शाळेत प्रवेश मिळेल अशी व्यवस्था करायची. त्यांना एकच व सारखे शिक्षण एकत्र द्यायचे. या संधीचा वापर करून पहिला क्रमांक गाठणे व अखेरच्या नंबरावर राहणे याचे स्वातंत्र्य त्यातल्या प्रत्येकाला राहील याचीही व्यवस्था करायची. साऱ्यांना पहिला क्रमांक नाही आणि सारे नापासही नाहीत. काहींना संधी व काहींना बंदी असेही नाही. जगभर स्वीकारली गेलेली समतेची आजची व्याख्या अशी आहे. मात्र या संधीसोबतच काही क्षेत्रांसाठी व वर्गांसाठी विशेष संधीची तरतूद करणे आवश्यक आहे. एकाच समान व सरळ रेषेवरून साऱ्यांना पुढे पळायला सांगत असताना अगोदरच त्या रेषेच्या पुढे असणाऱ्यांना वा तिच्या मागे राहिलेल्यांना त्या रेषेवर आणणे आवश्यक ठरले. आपल्यातील आरक्षण हा या व्यवस्थेचा भाग आहे. समाजाचे जे वर्ग परंपरेने मागे राहिले वा ठेवले गेले, त्यांना या आरक्षणातून विशेष संधी दिली गेली... मात्र या संधीचाही अतिरेक व दुरुपयोग झाला, तेव्हा तिच्याही विरुद्ध समाजात आक्रोश उठलेला दिसला आणि अजून तो शमलाही नाही. 

समाजाच्या इतिहासात एक काळ असा आला की, ज्यात समता हाच मुळात अन्याय समजला गेला. ग्रीकांच्या नगरराज्यात गुलाम होते. एकेका नगरराज्यातली त्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या दोन-तृतीयांशाहून अधिक होती. त्यांचे बाजार भरत आणि गुलामांना आत्मा नसतो असे म्हटले जाई. अगदी सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटलसारखे विद्वान तत्त्वज्ञही याच मताचे होते. युरोपात, मध्य आशियात, रशियात आणि चीनमध्येही गुलामगिरी होती. भारतीय गणराज्यांचा इतिहासही याहून वेगळा नाही. त्यातही गुलाम होते. त्यांचे बाजार होते आणि गुलामाच्या मृत्यूखातर कोणाला शिक्षाही केली जात नव्हती. ब्रिटिशांचे राज्य येऊन कायद्याने गुलामगिरी संपविली जाईपर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार व ओडिशात गुलामांचे आठवडी बाजार भरत असत आणि त्यात गुराढोरांसारखी गुलामांची विक्री होत असे. मीना बाजार हा स्त्रियांचा बाजार, ही त्याचीच वेगळी व नाजूक आवृत्ती असली तरी त्याचे स्वरूपही तसेच होते. गुलामांविषयीची ही मानसिकता अमेरिकेनेही फार उशिरा म्हणजे विसाव्या शतकाच्या मध्यावर आल्यानंतर टाकली. आफ्रिकेतून पकडून आणलेले काळे लोक गुरांसारखे बाजारात विकणाऱ्यांत जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, जेम्स मॅडिसन आणि बेंजामिन फ्रँकलिन यांसारख्या अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांचा सहभाग व कमाई मोठी होती. आपण स्वातंत्र्याची भाषा बोलतो आणि माणसांना गुलामांसारखे बाजारात आणून विकतो यात काही विसंगती आहे, असे त्या ज्ञानवंतांनाही वाटत नव्हते. त्या ज्ञानाची पहाट अब्राहम लिंकनच्या काळात, एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला उगवली आणि बराक ओबामाच्या अध्यक्षपदाने तिची टळटळीत दुपार झाली. मात्र, समतेचा प्रश्न याहून बिकट आणि मोठा आहे. 

समता ही नुसती सामाजिक व्यवस्था वा मूल्य नाही; ती एक व्यक्तिगत व सामाजिक मानसिकताही आहे. एकाच धर्मात, जातीत, पंथात, वर्गात व वर्णात असणाऱ्यांमध्ये समता असेलच असे नाही. आपल्यातील दलितांचे वर्ग विषमतेसाठी सवर्णांना नावे ठेवतात. पण सगळ्या सवर्णांत तरी समता कुठे असते? आणि सारे दलितही एका समान पातळीवर कुठे असतात? अगदी आर्थिक व सामाजिक पातळी एक असली, तर माणसा-माणसांत वेगळेपण असते आणि ते समतेहून विषमतेच्या जाणिवाच अधिक निर्माण करते. कारण व्यक्तिगत व सामाजिक अशा पातळ्यांसोबतच हा मनोधर्माशी निगडित असणारा प्रश्न आहे आणि तीच यातली सर्वांत मोठी अडचणीची व सोडवायला अवघड असलेली बाब आहे. सारे काही समानच नव्हे, तर सारखे असतानाही ‘विषमता’ असू शकते आणि तिची रूपे बरीच असू शकतात... समाजात समता आणण्याचे आजवरचे सगळे प्रयत्न समूहांच्या, वर्गांच्या वा ज्ञातींच्या पातळीवर झाले. अमेरिकेत वर्णांची समता, भारतात जातींची समता, कम्युनिस्ट देशांत वर्गांतली समता आणि प्रगत देशांत शैक्षणिक समता आणण्याचे प्रयत्न आजवर झाले व होत आहेत. त्यासाठी लढे झाले, आंदोलने झाली, कायदे झाले, घटनात्मक तरतुदी झाल्या आणि त्या साऱ्यांच्या मागे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे बळ घेऊन उभे राहिलेले महापुरुषही झाले; पण समता दूर राहिली. आणि जिथे ती आल्याचे सांगितले गेले, तिथेही ती जाणवायची राहून गेली. यापुढचा काळ यातली गुंतागुंत आणखी वाढविणारा व त्याच वेळी ती पसरट आणि विस्तारित करणारा राहणार आहे. समूहांचे वर्चस्व कमी होणे, धर्म व जातींसारख्या संस्थांचे प्राबल्य नाहीसे होणे आणि वर्णविद्वेषाच्या जाणिवा दुबळ्या होणे ही  आताची स्थिती आहे व ती झपाट्याने पुढे जाणारीही आहे... 

कधी कधी मनात येते- आजवरच्या आपल्या प्रयत्नांची दिशा व तीत आपण पुढे ठेवलेले लक्ष्यच चुकीचे होते काय? समूहांना डोळ्यांसमोर ठेवून त्यांना एका पातळीवर आणण्यासाठी झटण्यापेक्षा आजवरच्या इतिहासाने व्यक्तीलाच डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रयत्नांचे लक्ष्य बनविले असते तर? समूहांमध्ये समानता आली तरी व्यक्तींमध्ये विषमताच टिकणार व राहणार असेल, तर समतेचा संगर कधी संपणारच नाही. मार्क्स समूहापाशी सुरू होतो आणि गांधी व्यक्तीपाशी. आपण कोणती दिशा व कोणता मार्ग घेतला आणि तो अचूकच असण्याची खात्री कशाच्या भरवशावर बाळगली? समाजचे समाज वर्षानुवर्षे चुकीच्या मार्गाने जातात. सोव्हिएत युनियन आणि चीन यांचा अनुक्रमे पाऊणशे व पन्नास वर्षांचा इतिहास आपल्या डोळ्यांपुढे आहे. त्या देशांनी 1917 व 1949 मध्ये निवडलेल्या दिशा 1970 च्या दशकात बदलल्या. भारतानेही 1950 च्या दशकात स्वीकारलेला समाजवादी समाजरचनेचा मार्ग 1991 मध्ये सोडला. काळ चुकतो, नियोजन चुकते व नेतेही चुकतात... असे म्हणायला आपण धजावत नाही. पण धजावणे नको म्हणून जाणवलेल्या चुकीच्याच मार्गाने प्रवास करीत राहायचे काय? वर्गीय समता, जातीय समता किंवा वर्णीय सारखेपणा हे भ्रम आहेत की स्वप्ने? ती कधी वास्तवात येतील की मृगजळासारखी दूरच राहतील? माणसे मनातून त्यांच्या स्वीकारासाठी तयार असतात काय? आणि तशी ती कधी होतील काय? आहे त्यात समाधान मानणाऱ्यांचे वर्गही समाजात मोठे आहेत. त्यांना कसल्या उलथापालथी नको असतात. वाट्याला आले ते स्वीकारणे व तेच वरदान मानून जगत राहणे, हाही स्थितिवादी बहुसंख्याकांचा स्वभावधर्म असतोच की नाही? विषमतेवर माणसे खरोखरीच संतापलेली असतात काय? की त्यांचा तो संताप कृत्रिमच असतो? काहींनी तो करायला सांगितला म्हणूनच केला वा धरला जातो?... प्रश्न इथे संपतही नाहीत. दुसरी माणसे आपल्या बरोबरीची झालेली तरी माणसांना आवडतात काय? आपल्याहून मोठे म्हणून ज्यांना मान्यता दिली, त्यांचे मोठेपण एकदाचे कबूल; पण कालवर लहान असलेली वा लेखलेली माणसे बरोबरीला आली, तरी त्यामुळे माणसांचे अस्वस्थपण वाढते, त्याचे काय? 

‘चंगळवाद’ हा एक कमालीचा अन्याय्य व संतापजनक शब्द सध्या बराच लोकप्रिय व प्रचलित आहे. परवापर्यंत ज्या गोष्टी आम्हाला  उपलब्ध होत्या, त्या आता या नव्यांनाही मिळू लागल्या म्हणूनच त्यांच्या त्या उपलब्धींना आपण चंगळवाद म्हणतो काय, याचा विचार कधी तरी करावा लागणार आहे. आम्ही पंचतारांकित हॉटेलात कॉफी घेत असताना ते टपरीवरचा चहा पीत होते; आता तेही आमच्या शेजारच्या टेबलवर बसून आम्ही घेतो तीच पेये घेऊ लागले, म्हणून आम्ही त्यांना चंगळी म्हणतो काय? आमची ती गरज आणि त्यांची ती चंगळ, ही मानसिकता खरी की खोटी? एकवार उत्पन्नाची समता आणता येईल, साऱ्यांना राहायला सारखी घरे देता येतील, वापरायला सारख्याच किमतीची वाहने पुरविता येतील, पुढे जाऊन माओने केली तशी सगळ्या नागरिकांना सारखाच पोशाख करण्याची सक्तीही करता येईल. पण त्यामुळे खुद्द माओ आणि सामान्य चिनी नागरिक एका पातळीवर येतील काय? कन्फ्युशियसचे माहात्म्य कमी होईल काय? बौद्धांच्या भिक्खू संघात समता होती असे आपण मानतो; पण त्यात बुद्धाचे स्थान वेगळे आणि वरचे होते की नाही? ज्ञान, कला व क्रीडा या क्षेत्रांतले नैपुण्य यातूनही माणसांची उंची कमी-अधिक ठरतच असते. सचिनला संसदेत जागा का मिळते? आणि लताबाई त्यात का जातात? क्रिकेटमधले आणि गाण्यामधले सारे त्या सन्मानाचे धनी कुठे होतात? सांस्कृतिक क्षेत्रात जर समता नसेल, तर बाकीची क्षेत्रे तर ‘असांस्कृतिक’ म्हणावी अशीच असतात की नाही?... 

आपल्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेतील समतेत आर्थिक समता सांगितलेली नाही; आर्थिक न्याय सांगितलेला आहे आणि तसाच तो असणे भाग आहे. तीत ‘प्रतिष्ठा व संधीबाबतची समता’ असे म्हटले आहे आणि प्रतिष्ठा हा समाजाच्या मनोधर्माचा भाग आहे. शिवाय, हा धर्म व्यक्तिपरत्वे वेगळा आहे. संधीबाबतच्या समतेची चर्चा वर केली आहे. समतेचा जो अधिकार घटनेच्या 14, 15, 16, 17 व 18 या कलमांनी नागरिकांना दिला आहे, त्यात ‘कायद्यासमोरची समता’ सांगितली आहे. कायदा साऱ्यांना सारखा लागू होईल. तो जन्म-वंशासारख्या निकषांवर व्यक्ती-व्यक्तीत फरक करणार नाही. कायद्याने सांगितलेली शिक्षा तो मोडणाऱ्यांना सारखीच केली जाईल. कायदा साऱ्यांना सारखेच संरक्षण देईल इ. इ... या तरतुदीतील सामान्यपणे लक्षात न येणाऱ्या गोष्टी अशा आहेत. ही समता शिक्षेबाबतची आहे. खून, बलात्कार, चोरी यांसारखे गुन्हे करणारा कोणीही असला तरी, आरोप सिद्ध झाला की कायद्यातील तरतुदीत सांगितलेली शिक्षा त्याला देणे हे प्रावधान यात आहे. एका अर्थाने ही नकारात्मक समता आहे, सकारात्मक नाही. अनातोले फ्रान्स हा फ्रेंच कवी व विचारवंत म्हणाला, ‘खरी समता सांगते- श्रीमंत आणि गरीब यांना पुलाखाली झोपण्याचा, रस्त्यात भीक मागण्याचा व प्रसंगी उपाशी राहून मरण्याचा अधिकारही सारखाच असावा.’ त्याचे म्हणणे वेगळ्या भाषेत सांगता येईल. अशी वेळ कुणावरही येणार नाही, ही तरतूद समतेच्या कायद्यात असावी. तेच त्या अधिकाराचे सकारात्मक स्वरूपही आहे. पण ते घटनेत नाही. पुलाखाली श्रीमंतांना झोपावे लागत नाही, ते रस्त्यात भीक मागत नाहीत आणि उपाशीपोटी राहून मरण्याचा प्रसंगही त्यांच्यावर येत नाही. तो ज्यांच्यावर येतो ते अभागी वेगळे असतात. खरी समता या अभाग्यांचे अभागीपण जाण्यात व जे भाग्यवान आहेत त्यांच्याएवढेच भाग्यशाली होण्यात आहे. पण तसे प्रावधान आपल्याच नव्हे, तर जगातल्या दुसऱ्याही कोणत्या देशाच्या संविधानात नाही. समतेच्या नावाने माणसांना एका दूरच्या समाधानाखेरीज कोणी काही देत नाही. ज्या कम्युनिस्टांनी ते देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी तसे देण्याहून जास्तीचे हिरावूनच घेतले, हा इतिहास आहे. 

प्रकृती (निसर्ग) आणि संस्कृती या दोन परस्परपूरक बाबी आहेत की परस्परविरोधी? प्रकृती मुक्त आणि स्वतंत्र असते. त्याहून ती प्रत्येकात वेगळी दिसते. संस्कृती हे वळण आहे. ते प्रकृतीला लावायचे असते. त्यासाठी प्रसंगी प्रकृतीच्या नाकात ती एक वेसण घालत असते. प्रकृतीचा बाज वैविध्याचा, तर संस्कृतीचा सारखेपणाचा असतो. प्रकृती कळपाची, तर संस्कृती एका सरळ रेषेत उभ्या असणाऱ्यांची असते. माणसाच्या मनातले सगळे द्वंद्वच या दोन संकल्पना एका वेळी जगावे लागण्यातून जन्माला येत असते. प्रत्येक पावलागणिक हे द्वंद्व असते. संस्कृती सांभाळायला प्रकृती किती मारायची आणि प्रकृती जपायला संस्कृती किती दूर सारायची? प्रकृतीनुरूप वागल्याने स्वातंत्र्य अनुभवता येते, पण त्यामुळे समता संपते. तसे होत असतानाच माणूस समुदायापासून वेगळा होतो व संस्कृती नावाच्या व्यवस्थेपासूनही दूर जातो. मग समाज सांभाळायला संस्कृतीची वस्त्रेच नव्हे तर मुखवटेही घालावे लागतात. 

आंध्रातल्या एका लग्नघरची गोष्ट. त्यातला वधुपिता 67 चा, तर वधूची आई 64 ची. तो आडदांड व अद्वातद्वा, तर ही चेहऱ्यावरची रेषही हलू न देता मुकाट जगणारी. ‘आले, या. खाता, खा. आणि हो- हवे ते घ्या. मी देते. ते  देण्यात वा घेण्यात मी असतेच असे नाही. किंबहुना, ते कळू न घेण्याचाच संस्कार माझ्यावर आहे.’ असेच तिचे एकूण वागणे. अंगभर दागिने आहेत. प्रकृतीही तशी मजबूत आहे. पण त्या देहात मन नाही, मेंदूही नसावा. पण बाई घरात प्रिय. साऱ्यांच्या विश्वासाची. कारण तीच साऱ्यांचा भार वाहणारी... फक्त तिच्यात ती नाही. जे आहे ती संस्कार नावाच्या व्यवस्थेची देनच तेवढी आहे... यात समता शोधता येते. संस्कृतीही पाहता येते. समूहात हरवलेले आयुष्यही दाखविता येते. फक्त व्यक्ती दिसत वा सापडत नाही. दुःख याचे की, तिची तिलाही ती सापडत नाही... प्रगत जगात तरी याचीच प्रगत रूपे असतात की नाही?... सोनिया गांधींनी भारतावर दहा वर्षे राज्य केले. केंद्रातले सरकार, राज्या-राज्यातली सरकारे, देशातले राजकारण हे सारे त्यांचा कौतुकाचा शब्द वा साधे स्मित मिळवायला धडपडत होते. प्रियंका त्यांचीच कन्या. लोकप्रिय. राजकारणाला हवी असलेली. पण तिला राजकारणात आणणार काय, या प्रश्नाचे सोनिया गांधींनी आरंभी दिलेले उत्तर होते, ‘नाही. एवढ्यात नाही. तिची मुले लहान आहेत. त्यांना वाढविण्याची जबाबदारी तिच्यावर आहे.’ हे भारताचे झाले. तिकडे विदेशातले चित्रही याहून फारसे वेगळे नाही. हिलरी क्लिंटनने अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवायला ओबामाशी बरोबरीने टक्कर दिली. त्यांच्या सरकारात परराष्ट्रमंत्री म्हणूनही त्या यशस्वी झाल्या. एवढ्या की, ‘अमेरिकेच्या इतिहासात त्यांच्याएवढे प्रभावी परराष्ट्रमंत्रिपद दुसऱ्या कुणी सांभाळले नाही’ असा अभिप्राय अध्यक्षांसह त्यांच्या देशाने द्यावा. आता त्या अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. कदाचित 2016 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षही होतील. एका पत्रकार परिषदेत त्याविषयी विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, ‘अध्यक्षपद राहू द्या, मला प्रथम आजी व्हायला (मुलीची मुलगी पाहायला) जास्तीचे आवडेल.’ आपण म्हणू, हे स्वाभाविक आहे. स्त्रीच्या प्रकृतिधर्मानुसार आहे. पण त्यात स्त्रीचे वेगळेपण आणि असमानपण आहेच की नाही? बराक ओबामाने असे म्हटले असते काय? किंवा स्वतः बिल क्लिंटन कधी आजोबा व्हायला असे उतावीळ झालेले दिसतील काय?... 

याहून मजेशीर गोष्ट इंद्रा नुयीची. पेप्सिको या जगावर राज्य करणाऱ्या पेय कंपनीच्या त्या अध्यक्ष आहेत आणि सोनिया गांधी व हिलरी क्लिंटन यांच्या बरोबरीने जगातल्या दहा सर्वाधिक शक्तिशाली महिलांमध्ये त्यांचा समावेश गेली अनेक वर्षे राहिला आहे. त्यांचे वेतन 79 दशलक्ष डॉलर्स एवढे आहे. पेप्सिको ही काम घेणारी कंपनी आहे. दर दिवशी मध्यरात्र उलटेपर्यंत इंद्रा नुयी त्यांच्या कार्यालयात काम करतात. एका सायंकाळी कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांना कंपनीचे अध्यक्षपद देण्यात आल्याचा निर्णय कळविला. तो घरी जाऊन साऱ्यांना आनंदाने सांगावा म्हणून त्या मध्यरात्र व्हायच्या दोन तास आधीच घरी पोहोचल्या... दारातच त्यांची आई उभी होती. त्या लवकर कशा वगैरे विचारण्याआधीच ती म्हणाली, ‘घरातले दूध संपले आहे. आल्यापावली परत जा आणि सकाळसाठी दूध आण’... ‘पण हे तू घरातल्या गड्यांकडूनही मागवू शकली असतीस!’ इंद्राबाई म्हणाल्या. त्यावर आईने शांतपणे म्हटले, ‘ते मी विसरूनच गेले’... ‘खरे तर मी एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट सांगायला एवढ्या लवकर घरी आले’ इंद्राबार्इंनी सांगायला सुरुवात केली. त्यांना थांबवत आई म्हणाली, ‘तुझी बातमी सकाळपर्यंत थांबू शकते; दूध नाही. आधी ते आण, मगच बातमी सांग’... इंद्रा नुयी आल्यापावली दुधासाठी पुन्हा बाहेर पडल्या... तेवढ्यावर हे थांबले नाही. इंद्राबार्इंनी आपण कंपनीचे अध्यक्ष झाल्याची वार्ता घरच्यांना ऐकविली, तेव्हा अर्थातच साऱ्यांना अतिशय आनंद झाला. मात्र त्यानंतरही त्यांची आई म्हणाली, ‘हे बघ, तुझं अध्यक्षपद तुझ्या गॅरेजपर्यंत. ते तिथंच ठेवून अन्‌ विसरून घरात येत जा. इथं तू गृहिणी आहेस, तुझ्या मुलांची आई आहेस आणि घरातली जबाबदार बाई आहेस.’ 

...तर ही समता, हे स्वातंत्र्य आणि हा न्याय. जगात स्त्रियांची संख्या पुरुषांच्या बरोबरीची. लोकसंख्येत 50 टक्क्यांएवढी. त्यांतल्या फार वरच्या शिखरावर असलेल्यांची ही कथा... ‘स्त्री जन्माला येत नाही, ती घडविली जाते’- या सिमॉन द बोव्हाच्या विधानाचा अर्थ अशा वेळी लक्षात येतो... सोनिया गांधी, हिलरी क्लिंटन किंवा इंद्रा नुयी या सामान्य स्त्रिया नाहीत. त्यांची अशी मानसिकता पाहिली की मनात येते- न्याय, स्वातंत्र्य आणि समता ही खरोखरीची मूल्ये आहेत की त्या नुसत्या कविताच आहेत? 

Tags: मिश्र अर्थव्यवस्था आरक्षण अमेरिका कार्ल मार्क्स महात्मा गांधी बिल क्लिंटन सिमोन द बोव्हा बराक ओबामा इंद्रा नुयी हिलरी क्लिंटन सोनिया गांधी समता सुरेश द्व्दाशीवर Mishr Arthvyvstha Arakshan America Karl Marx Mahatm Gandhi Bill Clinton Simone de Beauvoir Barac Obama Indra Nooyi Hillary Clinton Sonia Gandhi Samata Suresh Dwadashiwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात