डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

आपल्या तरुणपणी ग्रेटा गार्बोशी पत्रव्यवहार करणारा माणूस सारे आयुष्य कुष्ठरोग्यांच्या वस्तीत घालवतो तेव्हा त्याने काय मिळविलेले आणि काय गमावलेले असते? कॉलेजात शिकताना रेसर कार बाळगणारा विद्यार्थी ऐन तारुण्यात संन्याशाची वस्त्रे परिधान करतो तेव्हा त्याने आपल्यातले काय मारलेले आणि काय जगवलेले असते? कुटुंबातल्या चार पिढ्यांना आपल्याच पावलावर तो चालायला लावतो तेव्हा त्याने त्यांना काय दिलेले आणि काय सोडायला लावलेले असते...? बाबांचा असा अभ्यास हा त्यांच्या अभंग असण्याचा की शतभंग होण्याचा? तो ज्या कुणाला करता येईल त्याला फक्त बाबाच कळणार नाहीत, तो स्वतः कळेल. झालेच तर त्यासोबत बाकीची माणसे आणि समाजही त्याला वाचता येऊ शकेल...

हट्ट, जिद्द, सोशिकपण, सावधपण, दूरदृष्टी, आत्मविश्वास आणि परिश्रम करण्याची अमर्याद क्षमता एवढ्या साऱ्या गोष्टी एखाद्यात असतील आणि त्या साऱ्यांच्या जोडीने ज्याला आपले वेगळेपण, उंची, प्रतिभा आणि व्यक्तिमत्त्वातील प्रखर स्वातंत्र्य जपता येईल त्याला बाबा आमटे होणे जमणार आहे.

आपल्या उणीवा, अभाव, मर्यादा आणि अपुरेपण यांचे भान राखूनही ज्याला भरीवपण, भावपूर्णता, अफाटपण आणि प्रसन्न पूर्णत्वाचा ध्यास घेता येतो त्यालाही त्यांच्याजवळ जाणे जमेल. माणसाला गाठता येणे शक्य असलेले सगळे मोठेपण गाठणे आणि त्याचवेळी जन्माने दिलेले सगळे गुणविशेष त्यातल्या शैशवासह आपल्या मनात, मेंदूत आणि देहात ज्याला सांभाळता येतील त्यालाही तसे होणे जमेल.

समोरच्याची गुणवत्ता त्याच्या सगळ्या क्षमतांसह क्षणार्धात जोखण्याची, त्याच्या विकास व वाढीला मनापासून प्रोत्साहन देण्याची आणि त्याच वेळी त्याला आपल्याशी जोडून घेण्याची गुणवत्ता हाच ज्याचा स्वभाव आहे त्यालाही तसा प्रयत्न करता येईल... एवढ्या सगळ्या गोष्टी एका माणसाला सहजसाध्य होत नाहीत. म्हणून मग बाबा आमटे एकटे असतात तसे दिसतात, तसेच वागतात आणि एकाच वेळी ते अनेकांच्या श्रद्धेचा, आदराचा तर काहींच्या रोषाचा व असूयेचा विषय होतात.

 अंध विद्यालयातील मुलामुलींना हाताळता यावी म्हणून बिनकाट्याच्या गुलाबाची झाडे शोधणे, माणसांच्या पिढ्या जगाव्या म्हणून स्वतःची राख करून घेणाऱ्या अनाम वृक्षांच्या स्मरणार्थ स्मारक उभारणे, उकिरड्यावर टाकून दिलेल्या मुलीला घरात आणून तिच्या जन्माचे सोहळे उभे करणे, वृद्धाश्रम या टाकाऊ नावाला उत्तरायण हा प्रतिभाशाली पर्याय देऊन त्याला ज्ञानाचा अधिकोष (विज्‌डम बँक) म्हणणे आणि सिंधू नदीच्या किनाऱ्यावर देह ठेवण्याची इच्छा बाळगणे या आणि यासारख्या गोष्टी फक्त अशाच माणसाला सुचतात.

 त्यासाठी फक्त प्रतिभा पुरेशी नसते, स्वयंभू व सामर्थ्यशाली प्रज्ञेला त्यासाठी अचाट साहसाची जोड असावी लागते. अपंगांना धडधाकट माणसांचे सामर्थ्य प्राप्त करून देणे ही किमया साधी नाही. हातापायाची बोटे गमावलेल्या, डोळ्यांच्या खाचा झालेल्या आणि नीट चालता येऊ न शकणाऱ्या माणसांचा दवाखाना न करता त्यांची कृषी व औद्योगिक संस्था उभी करणे हा चमत्कार आहे.

हातीपायी धड असणारी माणसे नियतीच्या गोष्टीत गढलेली पाहावी लागत असताना आनंदवनातील पांगळे नियती नाकारतात आणि स्वबळावर ईश्वराला पराभूत करतात ही किमया नाही, तो चमत्कारही नाही. समूहशक्तीच्या निर्मितिक्षमतेचा तो जयघोष आहे.

माणसे गर्दीत राहतात तशी ती समाजातही राहतात. त्यांतल्या प्रत्येकाला त्याच्या अडीअडचणी आणि व्याधी व्यथा असतात. अशाच माणसांधील सर्वाधिक वंचितांना एकत्र आणणे, त्यांच्यात विकासाचा मंत्र पेरणे आणि त्यांना कार्यप्रवण करून जेथे दारिद्य्र दिसावे तेथे वैभवाची उभारणी करणे असे या मानवी किमयेचे, चमत्काराचे आणि अपंगांच्या समूहशक्तीतून उभ्या झालेल्या निर्मितिक्षमतेचे स्वरूप आहे. बाबा आमटे या एका माणसाचे कर्तृत्व आहे. त्याच्या आयुष्याचा तो सफल संपूर्ण झालेला यज्ञ आहे.

  ‘शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई

 दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही’

 असे म्हणण्याचा अधिकार फक्त त्याचाच होता.

 ‘झोपले अजून माळ तापवीत काया

असंख्य या नद्या अजून वाहतात वाया

अजून हे विराट दुःख वाट पाहताहे

अजून हा प्रचंड देश भीक मागताहे’

हे ऐकविण्याचा हक्कही त्याचाच होता.

हिमालयाएवढा असा माणूस साधा, लहानगा आणि आपला झालेला पाहता येणे हा नुसता आनंदाचा वा अचंब्याचा विषय नव्हता. तो माणुसकीच्या थोरवीचा आणि तिच्या कोवळिकीचा साक्षात्कार घडविणाराही क्षण होता.

 एका रात्री उशीरा घरी परत येत असताना वाटेत बाबांची बस एका शाळेसमोर रस्त्याच्या कडेला उभी असलेली पाहिली आणि मी थांबलो.

बसच्या बाजूला स्कूटर उभी करून आत शिरलो तेव्हा आतल्या कॉटवर डोळे उघडे ठेवून पहुडलेले बाबा अस्वस्थ दिसले... ‘तुझी घरी बरीच वाट पाहिली आणि परतलो. वाटले तू रस्त्यात भेटशील म्हणून येथे थांबलो.’

 मी संकोचून म्हणालो, ‘ तुम्ही साधा फोन केला असता तरी मी आलो असतो. तेवढ्यासाठी एवढ्या लांब... ’

‘माझे कामच तसे होते’ माझं वाक्य अर्ध्यावर तोडत ते म्हणाले.

 मी उत्सुकतेने शांत झालो.

‘आनंदवनाला एवढ्या वर्षांत चार लाखांचं कर्ज घ्यायची आज प्रथमच वेळ आली. माझी व्यथा सांगायला आलो.’

 बाबा माझ्या वडिलांचे स्नेही. आम्हा साऱ्यांच्या श्रद्धेचेच नव्हे तर पूजाभावाचे विषय. आपली व्यथा सांगायला एवढ्या रात्री पन्नास किलोमीटरचा प्रवास करून ते आले आणि माझ्यासाठी दोन तास घरी थांबले. मी ओशाळून गेलो.

‘बाबा, तुम्ही आम्हांला मुलं मानता ना, मग चार लाखांची चिंता नको. तेवढी रक्कम उद्या मी तुम्हाला आणून देईन.’

 ‘कशी’

‘घर आणि बाग विकून.’

ते एकटक पाहत राहिले.

मग जवळ बोलावून आणि माझं डोकं आपल्या छातीवर धरून म्हणाले, ‘ जा तू आता. मला सारं मिळालं.’

तिसऱ्या दिवशी माझ्या स्नेह्यांकडून जमा केलेली दीडेक लाखांची रक्कमच मी त्यांना नेऊन दिली.

 ‘माझे कर्ज आता फिटले’ ते म्हणाले.

 त्या प्रसंगाने माझे त्यांच्याशी असलेले संबंध नात्यात बदलले.

एखादी गोष्ट विश्वासाने सांगावी असे मनात आले की ते मला बोलावून घेत. 78 ते 84 या काळात प्रत्येकच शनिवारी कॉलेज करून मी आनंदवनात जात असे आणि सोमवारी पहाटे निघून सरळ कॉलेज गाठत असे.

ते दोन दिवस सवड झाली की ते त्यांच्या कल्पना, स्वप्ने, मते आणि मनातले सारे सांगावेसे आणि सांगू नयेसेही सांगायचे. त्यांच्या कल्पनांत नावीन्य, स्वप्नांना दिव्यत्व, मतांना सार्वत्रिकता आणि मनाच्या गुहेत विचारांचे भांडार होते. त्यांच्याजवळ सांगण्यासारखे जसे खूप तसे न सांगण्यासारखेही फार होते... मला ते भांडार खुले होते.

 ‘करुणेचा कलाम’ हा संग्रह त्यातून जन्माला आला. त्यांच्या सांगण्यात संगती नसे. एकेक भन्नाट कल्पना आकाशात अग्निबाण सोडावा तशी ते सांगायचे. तिचे सामर्थ्य, स्वरूप, रंग आणि मोहक दाहकता असे सारे मनात साठवून घेऊन मी ती शब्दबद्ध करायचो. खूपदा ते इंग्रजीतून सांगत. तेही सुभाषितात बोलल्यासारखे. त्यात व्यासांपासून ज्ञानदेव-तुकारामांपर्यंतचे, गांधींपासून सानेगुरुजींपर्यंतचे, ख्रिस्तापासून जिब्रानपर्यंतचे आणि मार्क्सच्या संतत्वापासून माओच्या क्रौर्यापर्यंतचे संदर्भ एकाच वेळी अन्‌ एकामागोमाग एक येत. ऐकताना गांगरल्यासारखे व्हायचे. पण एकदा बाबा कळले की त्या सुभाषितांतल्या सत्यांची गर्दी शिस्तबद्ध होऊन रांगेत उभी होताना दिसायची. पु.लं. नी या प्रक्रियेला ट्रान्स्प्लांटेशन हे नाव त्यांच्या प्रस्तावनेत दिले.

मी शनिवारी येणार आणि दोन दिवस त्यांच्यासोबत विचारांपासून विकारांपर्यंतच्या सगळ्या गोष्टींवर बोलणार हे काही दिवसांत एवढे स्वाभाविक झाले की एका शनिवारी मला जाणे जमले नाही तेव्हा रात्री दहा वाजता घरचा फोन खणखणला.

 ‘मी बाबा बोलतो. असशील तसा निघून ये.’

आनंदवनात पोहोचायला मला एखादाच तास लागला असेल.

अतिशय अस्वस्थ मनाने मी त्यांच्या खोलीत गेलो.

ते शांत होते. म्हणाले, ‘काही काम नव्हतं. नेहमीसारखा तू आला नाहीस म्हणून जरा बेचैन झालो होतो. आता झोप.’

 गर्दीतला हा माणूस गर्दीचा नव्हता, साऱ्यांत राहून एकटा होता, एकाकीपण हा त्याचा शाप तर गर्दी हा त्याला मिळालेला उःशाप असावा असे तेव्हाही मनात आले.

पहाटे त्यांच्यासोबत फिरायला निघालो आणि पुढच्या पाऊण तासाच्या पायपिटीत त्यांनी मला अख्खा खलिल जिब्रान त्याच्या सुभाषितांसह सहज सांगावा तसा काहीच न घडल्यासारखा ऐकविला.

बाबांना प्रथम पाहिले ते 1962 या वर्षी. आदिवासींच्या प्रश्नाला वाहिलेले एक साप्ताहिक तेव्हा मी सुरू केले होते. त्यासाठी बाबांची मुलाखत घ्यायला आनंदवनात गेलो होतो. तेव्हाचे आनंदवन आजच्याएवढेच स्वच्छ, लखलखीत आणि दवाखाना न दिसता एखाद्या कृषी व औद्योगिक वसाहतीसारखे धनधान्य व निसर्गसंपन्न होते.

तोवर बाबा आणि आनंदवन या दोहोंची जगाने फारशी दखल घेतली नव्हती. देशोदेशीचे राजदूत, कवी, लेखक आणि प्रत्यक्ष विनोबा एवढ्या साऱ्यांनी गौरविलेल्या या कामाची  दखल घेणे तेव्हाच्या नागपुरातील वर्तमानपत्रांनी ठरवून टाळले होते... परिणामी या मुलाखतीनंतर आनंदवनाचे वृत्तांत मी ठळकपणे प्रकाशित करू लागलो.

आनंदवनाच्या आरंभीच्या मित्रमेळाव्याचे वृत्तांतही त्या साप्ताहिकातच यायचे. आनंदवनाची दखल टाळणे जेव्हा अगदीच अशक्य झाले तेव्हा प्रथम पुण्याची, नंतर मुंबईची आणि अखेर नागपूरची वृत्तपत्रे त्यांच्याकडे वळली.

 माध्यमांच्या या अनास्थेची जाणीव बाबांनाही होती. मात्र ते त्यांच्या कामात आणि यशाच्या धुंदीत मग्न असत. एक दिवस या नाठाळांना आपली आणि आनंदवनाची नुसती दखल घेणेच नव्हे तर या वेगळ्या सृष्टीचा गौरव करणे भागच पडेल याविषयी ते आश्वस्त असावे. तसेच पुढे झालेही.

ज्याँ बुले या फ्रेंच कवीने आनंदवनावर त्याच काळात एक प्रदीर्घ कविता लिहिली. तीत त्याने येशू ख्रिस्ताला नव्याने जन्म घेण्याच्या त्याच्या आश्वासनाची आठवण करून देत आनंदवनात जन्म घ्यायला विनविले. त्या कवितेच्या लक्षावधी प्रती त्याने युरोपात वाटल्या तेव्हा त्या खंडातील लोकांनी आनंदवनाला पहिली भरघोस मदत पाठविली होती.

जग असे बाबांच्या प्रेमात पडत असताना महाराष्ट्र त्यांच्याबाबत उदासीन राहिलेला पाहावा लागणे हीच मुळात व्यथित करणारी बाब होती. बाबांची ओळख महाराष्ट्राला करून देणारा पहिला माणूस आणि ‘त्यांच्या स्वप्नांचा सहोदर’ होता, यदुनाथ थत्ते.

 बाबांच्या वृत्तीतच एक पहेलवानी बेफिकीरपण होते. आयुष्याच्या आरंभी त्यांनी पैलवानीचा षौक केलाही होता. त्यातून त्यांनी रोमन लढवय्यासारखी उंचीपुरी, मजबूत आणि दमदार देहयष्टी कमावली होती. काळा आणि उन्हातान्हात राहून रापलेला वर्ण, चांगली सहा फुटांची उंची, डोक्यावर भरघोस केसांचा बराचसा विस्कटलेला पण शिस्तीतला पिसारा. मोठ्या अन्‌ सावध डोळ्यांतली तीक्ष्ण नजर - सारे आरपार पाहणारी व समोर बसलेल्याच्या मेंदूचा थेट मागला भाग वाचू शकणारी. अंगात खादीचे साधे बनियन अन्‌ त्याखाली खादीची अर्धीच चड्डी. (त्या पोशाखाला आनंदवनात सारे गंतीनं बाबासूट म्हणायचे. त्याच पोशाखात राष्ट्रपती भवनात जाऊन त्यांनी प्रथम गांधीजींच्या व नंतर आंबेडकरांच्या नावाने दिले जाणारे राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारले) सारा पोशाख देहाचे पिळदार सामर्थ्य दाखविणारा.

त्यांना थकलेले वा वाकलेले कधी कुणी पाहिले नाही. बोलायचे ते गडगडाटात. भाषणेही तशीच. विजांचा कल्लोळ उठवल्यासारखी. समोरच्या माणसांना त्यातले बरेचसे न समजणारी पण पार चेपून टाकणारी... मार्क ट्‌वेन म्हणाला, धाडस हा भीतीचा अभाव नाही, ती भीतीवरची मात आहे. बाबांना भय होते. काळजी आणि चिंतांनी त्यांना कासावीस झालेले मीही अनेकदा पाहिले. पण ती भीती त्यांच्यासाठी नसायची. विश्वासाने सोबत रहायला आलेल्या हजारो कुष्ठरोग्यांची, आपल्यावरच्या श्रद्धेने त्या रुग्णांची सेवा करायला आलेल्या कार्यकर्त्यांची आणि आपला कोणताही क्षण आणि पण वाया जाणार नाही या आकांक्षेची... त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर मग, भान राखून आखलेल्या योजना ते बेभान होऊन अंमलात आणत आणि सोबतच्यांना आपल्याएवढे बेभान होता येत नाही म्हणून प्रसंगी चिडत.

त्यांना बोलण्याचा सोस तेव्हाही होता. टाइम आणि न्यूजवीक सारखी नियतकालिके नित्याच्या वाचनात होती. खलिल जिब्रान मुखोद्‌गत होता. खरे तर तेव्हापासूनच त्यांना साधे बोलताना मी खाजगीतही कधी पाहिले नाही.

साधीही गोष्ट त्या बोलण्यात अलंकृत होऊन यायची. त्यात सलगपण बहुधा नसे, एकेक वाक्य वेगळे अन्‌ तुटक असे. पण त्यांचा आवेग आणि व्यक्त होणारा आक्रोश एवढा समर्थ की त्याला भाषेचे व्याकरण लावण्याकडे कोणाचे लक्ष नसे.

शेक्सपियर आणि गटे, टॉलस्टॉय आणि गांधी, विनोबा आणि साने गुरुजी त्यात येत आणि जिब्रान तर त्यात नेहमीच असायचा. आणि त्याचवेळी ते पांढऱ्या रंगाचा एक मिनी ट्रक चालवायचे. कुष्ठरोग्याच्या हाताबोटांना संवेदना नसतात म्हणून त्यांना तेव्हाही ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नसे. मग आनंदवनात येणारे पाहुणे, त्यात होणारे दूध, भाजीपाला, त्यातल्या माणसांना लागणारे कापड-धान्य आणि शिवाय असंख्य इतर गोष्टी आणा-न्यायच्या तर ते कोण करणार? मग बाबाच ड्रायव्हर व्हायचे. कोणत्याही व्यावसायिक ड्रायव्हरने केले नसेल एवढे कित्येक लाख मैलांचे ड्रायव्हिंग त्यांनी केले. त्यात पाठीच्या मणक्यांची झीज झाली.

त्या मणक्यांच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना इंग्लंडला जावे लागले तेव्हाची गोष्ट. प्रकाशकडे काही दिवस राहून ते सकाळी दहाच्या सुमारास माझ्याकडे आले. इंग्लंडला जायला लागणाऱ्या पासपोर्टची सगळी कागदपत्रे त्यांना दिवसभरात हवी होती. बाबांना सारेच ओळखणारे असल्याने त्यांची छायाचित्रे काढण्यापासून पोलिस प्रमुख, जिल्हाधिकारी अशा साऱ्यांच्या सह्या होऊन ती दुपारी तीनपर्यंत तयार झाली. दुसरे दिवशी नागपूरहून ते मुंबईला रवाना झाले. तेथेही सारे एका दिवसात पार पडून ते इंग्लंडला रवाना झाले....

 चार दिवसांनंतर साधनाताई तशाच अचानक उतरल्या. बाबांनी आनंदवन सोडल्यापासून त्यांनी अन्नाचा कण घेतला नव्हता. ते भेटत नाहीत तोवर काही एक न खाण्याचा तो निग्रह होता... मग पुन्हा तोच पासपोर्ट बनवण्याचा खटाटोप. तो पूर्ण होऊन बाबांच्या मागून ताई सात दिवसांत लंडनला पोहोचल्या. तेथे बाबांची भेट झाल्यानंतरच त्यांनी अन्नाचा घास घेतला होता.

 ताई आणि बाबा दोघेही सारखेच हट्टी. आपल्या मनाजोगे आणि चोख घडत नाही तोवर काही एक करायला राजी नसणारे. अण्णासाहेब सहस्रबुद्धे ताईंना सावित्री म्हणत. कुरुंदकरांना त्यांच्यात द्रौपदीची तेजाळ मूर्ती दिसे. बाबांसोबत महारोग्यांचा   सहवास खुशीने पत्करणाऱ्या तार्इंत पु.लं.नी नवऱ्यामागून स्मशानात जाऊन राहणाऱ्या पार्वतीचे रूप पाहिले.

या बड्या मंडळीसारखे तार्इंचे वर्णन मला करता यायचे नाही. मला त्यांच्यातली आईच सतत जाणवत राहिली. आई हेच त्यांचे खरे बिरुद आहे असे मला वाटत आले... हेमलकशाच्या महारू गोटाची बायको कॅन्सरने गेली. तिला मूठमाती द्यायला सारे गेले तेव्हा महारूच्या तीन वर्षांच्या मुलीला अंघोळ घालून खेळवताना तार्इंना मी पाहिले.

स्वतःच्या आईचे शव बाजूला पडले असताना गोकुळातल्या मुलांचे खाणेपिणे करणाऱ्या ताई मला ठाऊक आहेत. आनंदवनातल्या रोगमुक्तांच्या विवाहाच्या वेळी नवऱ्याचं नाव घेणारी नववधू जेव्हा ‘अमुक अमुकाचं नाव घेते, ताईबाबांची लेक’ म्हणायची तेव्हाचा तार्इंच्या डोळ्यांत दाटलेला मातृत्वाचा गहिवरही मी पाहिला आहे... आनंदवन ही संस्था न होता कुटूंब बनले. त्या कुटुंबातला जिव्हाळ्याचा स्रोत ताई हाच होता...

प्रत्येक असामान्य व्यक्ती ही खऱ्या अर्थाने सामान्यच असते अशा अर्थाचे एक इंग्रजी सुभाषित आहे. आपले असामान्यत्व कोणालाही बोचू नये एवढे सामान्यत्व तार्इंनी सांभाळले.

बाबा हा घाईतला माणूस होता. त्याला प्रत्येक गोष्ट नीट आणि चोख हवी होती. परिणामी सारे सहकारी विश्वासातले असले तरी सगळी कामे जातीने पुढाकार घेऊन करायची त्यांना सवय होती. मग साधी विहीर खणायची असली तरी ते खणल्या जाणाऱ्या खड्‌ड्याच्या मध्यभागी उभे होत आणि सकाळी काम सुरू झाल्यापासून सायंकाळी ते संपेपर्यंत तसेच उन्हात उकडत राहत.

आनंदवनातून निघालेला भाजीपाला ग्राहकांना योग्य दरात मिळतो की नाही ते पाहायला त्या भाजीसोबत बाजारात जात आणि तिचे चुकारे स्वतःच आणून संस्थेत जमा करीत.

दवाखाना होता, त्यात काम करणारी माणसे होती पण कुष्ठरोग्यांच्या जखमा स्वतः स्वच्छ करून अन्‌ त्यातल्या अळ्या काढून बांधायलाही ते स्वतःच पुढे होत... कधीतरी या रोगावरची लस शोधून काढायचे त्यांच्या मनात आले तेव्हा त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना भेटून त्या रोगाचे जंतू माझ्या शरीरात टोचून तिचा शोध घ्या हे सांगायला ते कोलकात्याला गेले... हा रोग फक्त माणसांना होतो त्यासाठी करावयाचे प्रयोगही त्यामुळे माणसांवरच करावे लागणार म्हणून आपल्या देहाची प्रयोगशाळा करायची त्यांची तयारी होती... स्वाभाविकच त्यांना इतरांची दिरंगाई, सुस्ताई अन्‌ कामचुकारपण सहन व्हायचे नाही. मग ते संतापायचे. स्वतःशी त्रागा करायचे आणि प्रसंगी साऱ्यांशी बोलणे टाकायचे. बाबांचा राग साऱ्यांना चालायचा. त्यांचे अबोलपण साऱ्यांना कासावीस करायचे.

एका रात्री आनंदवनातून विकासचा घाबऱ्या आवाजातला फोन. ‘तू असशील तसा स्टेशनच्या चौकात जाऊन थांब. जयालाही सोबत ने. बाबा संतापाच्या भरात घरून निघून गेले आहेत. कुठं जातो ते न सांगता’...

‘काय झालं?’ मी...

‘काही नाही. नेहमीचाच वैताग.

ताईशी तंडले आणि निघाले.’...

 ‘पण ते इकडेच येतील कशावरून?’ मी.

...‘जाणार कुठं? तुझ्याकडे नाही तर सोमनाथला.’ तो म्हणाला.

मी अन्‌ जया सोनाथच्या वळणावर थांबलो. बाबांची बस चंद्रपूर रेल्वे स्टेशनावरचा पूल ओलांडून पलीकडे उतरली आणि मला पाहून थांबली.

आम्ही बसचे दार उघडून आत जाताच बाबा कडाडले, ‘तुला कोणी यायला सांगितलं इथं?’...

 मी म्हणालो ‘पण तुम्ही कोणाला काही न सांगताच बाहेर पडलात. तिथं सारे काळजीत आहेत.’...

‘काळजीच करा असं सांग त्यांना. आता मी पुन्हा आनंदवनात परत जायचा नाही आणि तूही माझी समजूत काढायचा प्रयत्न करायचा नाहीस.’ बाबा...

 ‘आम्ही फार लहान आहोत बाबा. पण आनंदवन, ताई...’

मला अर्ध्यावर तोडत ते घुश्यात म्हणाले, ‘ पण त्यांनाच तर नको ना मी.’

...ते जेवढ्या लवकर विरघळायचे तेवढ्याच झटक्यात त्यांचा पारा वर जायचा. एरव्ही दिसणारं तार्इंचं अन्‌ त्यांचं अद्वैत शंकराचार्यांच्या मायेसारखं अशा वेळी हवेत लोपायचं...

 ‘मी निघतो. आणि आता तूही उतर अन्‌ मला जाऊ दे.’ त्या वाक्याच्या शेवटी मात्र जयाकडे वळून ते म्हणाले, ‘तू कशी आहेस बेटा?’... मी विसावलो.

बाबांचे विरघळणे सुरू झाले होते. बाबा सोनाथला पोहोचण्याआधी मी अन्‌ विकासनं ते तिथं येत असल्याचं साऱ्यांना कळवलं आणि त्यांचं सारं काही नीट बघण्याची सवय असलेल्या माणसांनी त्यांचं सगळं मनाजोगं केलं. चांगले आठ दहा दिवस ते तिथं होते.

 पुढे तार्इंची भेट झाली तेव्हा तार्इंनी त्यांना सुनावलं, ‘मलाही तुमच्यासारखं जाता येतं. पण मी तुमची अन्‌ साऱ्यांची जबाबदारी घेतली आहे. तुम्हाला आनंदवनच सोडता आलं, मी जगही सोडू शकते.’ आणि बाबा निवळले, हसले आणि पूर्वीसारखे झाले.

अलम्‌ दुनियेसमोर आत्मविश्वासात झगमगणारे बाबा (कदाचित त्यांचा स्वतःचा अपवाद वगळला तर) एकट्या तार्इंसमोरच असे मावळताना दिसायचे.

बाबांची अशी असंख्य अन्‌ वेगवेगळी रूपं मी पाहिली आहेत. ती एका मागोमाग एक झपाट्याने बदलतानाही पाहिली आहेत. त्यांना क्षणात थोर अन्‌ क्षणातच पोर होता यायचे. लहान मुलात दिसणारी स्पर्धेची अन्‌ ईर्ष्येची ऊर्मी त्यांच्यात यायची. क्षणातच त्यांना करुणेचा सागरही होता यायचे. रागावले की हिमालय गदगदा हलवतील असे वाटायचे अन्‌ कोवळे झाले की पाझरायला लागतील असे मनात यायचे.

बोलू लागले की त्यांच्या तोंडून शेली आणि बायरन, शेक्सपियर आणि गटे व त्यांच्या जोडीला इटली आणि अरबस्तानातले लेखक अन्‌ कवी आपापली उघडी पुस्तकं घेऊन त्यांच्या पुढ्यात उभे व्हायचे. मग त्याच वेळी त्यांना बायबल अन्‌ कुराणातली वचनं उपनिषदांधल्या संहितांसारखी आठवायची... मग त्यांना गांधी दिसायचे, विनोबा त्यांच्या समोर  चालायचे आणि साने गुरुजी त्यांचा वाटाड्या व्हायचे.

जमिनीवर असतानाचा त्यांचा तो प्रवास मग अंतरिक्षातल्यासारखा व्हायचा आणि जवळच्यांनाही आपले बाबा एकाएकी दूरच्या नक्षत्रासारखे वाटू लागायचे.

 माणसे कितीही मोठी झाली तरी ती सेवेच्या मानदंडासमोर नम्र होतात. सत्ताधाऱ्यांपासून कीर्तिवंतांपर्यंत, प्रतिभावंतांपासून सामान्यांपर्यंत आणि समूहांपासून व्यक्तीपर्यंत. खूपदा त्यांना त्या मानदंडातला माणूस दिसत नाही. दिसला तरी तो पाहायची इच्छा उरत नाही. त्या मानदंडाने दिलेली उंची, आखून दिलेली चौकट आणि तिच्यातली कैद यातच त्याने राहिले पाहिजे असेच मग पाहणाऱ्यांना वाटत असते.

आपली मागणी त्या व्यक्तीचा कोंडारा करते याचे भानही कुणाला उरत नाही. आपल्या वाट्याला येणारे आनंद व दुःखाचे साधे क्षण त्यालाही अनुभवावेसे वाटत असतील असेही त्यांना वाटत नाही... बाबांमधला माणूस त्या मानदंडांच्या साखळदंडातही सशक्त आणि शाबूत होता. त्या बेड्या तोडून साधे व सामान्य होताना त्यांना मी पाहिले आहे. तसे करणे जमले नाही तेव्हाचे त्यांचे कासावीस होणेही मी अनुभवले आहे.

आपल्या तरुणपणी ग्रेटा गार्बोशी पत्रव्यवहार करणारा माणूस सारे आयुष्य कुष्ठरोग्यांच्या वस्तीत घालवतो तेव्हा त्याने काय मिळविलेले आणि काय गमावलेले असते? कॉलेजात शिकताना रेसर कार बाळगणारा विद्यार्थी ऐन तारुण्यात संन्याशाची वस्त्रे परिधान करतो तेव्हा त्याने आपल्यातले काय मारलेले आणि काय जगवलेले असते?

कुटुंबातल्या चार पिढ्यांना आपल्याच पावलावर तो चालायला लावतो तेव्हा त्याने त्यांना काय दिलेले आणि काय सोडायला लावलेले असते...? बाबांचा असा अभ्यास हा त्यांच्या अभंग असण्याचा की शतभंग होण्याचा? तो ज्या कुणाला करता येईल त्याला फक्त बाबाच कळणार नाहीत, तो स्वतः कळेल. झालेच तर त्यासोबत बाकीची माणसे आणि समाजही त्याला वाचता येऊ शकेल... माणसाच्या अंतरंगापर्यंत जाण्याचा प्रयत्न आपल्यात कमीच झाला. जेथे झाला तेथेही तो त्याच्या परिघापाशीच थांबला. माणसाच्या मध्यबिंदूपर्यंत तो क्वचितच कुठे गेला असेल... आपले भंगलेपण त्याचमुळे कदाचित राहिले आणि टिकले असेल. कदाचित तसे असणे हाच आपला आणि त्या शोधव्यक्तीचा मूलधर्मही असेल.

बाबांनी भारत जोडोची मोहीम हाती घेतली त्या काळात मी त्यांच्यापासून दुरावलो होतो. त्यांच्या मोहिमेवर झालेली टीका बरीचशी रास्त होती आणि तरीही मी तिच्यामुळे अस्वस्थ होत होतो.

 ‘मी सारा जन्म आनंदवनातच घालवायचा काय? हा देश, समाज, तरुणाई आणि सभोवतीची माणसं यांच्याविषयी माझ्या मनात दुसरे काही येऊच नये काय? आणि ते आले तर इतरांनी एवढे रागवायचे कारण काय?’ असे ते त्या काळात विचारत.

प्रचंड उन्ह, रस्त्याच्या कडेचा मुक्काम, सोबत सायकलवरून येणाऱ्या शेकडो मुलामुलींची जबाबदारी. कुठे रस्त्यावर घर कर, कुठे उभ्याउभ्या काही खा तर कुठे तापभरल्या देहाने दिवसाचे वेळापत्रक पूर्ण कर... त्यांचा उत्साह अखेरपर्यंत कायम होता. आपली ही तळमळ विचारी म्हणविणारी टीकाकार माणसे का समजून घेत नाहीत हा कासावीस करणारा प्रश्न सोबत होता...

बाबांना प्रसिद्धीची गरज उरली नव्हती. देशात आणि परदेशात त्यांचे चाहते होते. तरीही ते प्रसिद्धीसाठी हा स्टंट करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर तेव्हा अनेकांनी केला. आयुष्यात ज्यांना फारसे वा थोडेसेही करणे जमले नाही ती विचारवंतांच्या अदृष्य शेंड्या मिरविणारी माणसे टीका करीत होती आणि बाबा पंजाबातल्या संतापलेल्या तरुणांच्या जथ्यांना सामोरे जात होते. बिहार आणि ओरिसातील शस्त्राचाऱ्यांच्या कळपात जाऊन त्यांना समजून घेत होते.

ती यात्रा तिचे अपेक्षित उद्दिष्ट गाठू शकणार नव्हती. मात्र ‘मी जे करतो ते काही मिळवायला वा कोणाच्या समाधानासाठी नाही. कुष्ठसेवेचे कामही मी सेवेच्या भावनेतून केले नाही. मला राहवले नाही म्हणून मी ते केले.’ असे म्हणणाऱ्या बाबांना या यात्रेच्या फलिताचीही चिंता नव्हती. आपण ती पूर्ण करू शकलो आणि देशाच्या एकात्मतेचा प्रश्न केवढा अवघड आहे हे तिच्यातून समजू शकलो याचेच समाधान त्यांना होते.

 मोठ्या योजना आखणारी बरीच माणसे धोरणांपाशी थांबतात. त्यांतली काही पुढे जाऊन त्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेच्या उभारणीशी थांबतात. काहींना शेवटच्या तपशिलापर्यंत जाणे जमते. बाबा यातली प्रत्येक गोष्ट बारकाईने करीत आणि तेवढ्यावर न थांबता हाती घेतलेले काम त्याच्या खऱ्या व परिपूर्ण फलश्रुतीपर्यंत पोहोचले की नाही ते पाहिल्याशिवाय शांत होत नसत...

आनंदवनाला सोमनाथची जमीन मिळाली तेव्हा तिच्या पहिल्या नांगरणीपासून तीत सगळी पिके चांगली येईपर्यंत ते त्या जमिनीवरच झोपडे बांधून राहिले. त्या नांगरणीला काहींनी विरोध केला तेव्हा तेच त्यांना सामोरे गेले. त्यात आलेली फुले बाजारात जाताना पाहिली, त्यातल्या फळभाज्या आणि त्यातले तांदळाचे पीक आपल्या माणसांच्या तोंडी लागलेले पाहिले व मगच ते आनंदवनात परतले.

या साऱ्या काळात त्यांच्यासोबत राहून त्यांना हताश, उदास, उद्विग्न, संतप्त, आनंदी आणि हर्षोत्फुल्ल होताना पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. बाबांच्या सेवाभावाला सौंदर्यधर्माची जोड होती. साधे शेतात पाणी न्यायचे झाले तरी ते त्या पाण्याची कारंजी उडवीत नेत. आनंदवनातल्या गाईगुरांना चारापाण्यासोबत संगीताची मेजवानी देत. भेटायला येणारी माणसे आनंदवनातल्या कुष्ठरोग्यांशी जिव्हाळ्याने वागतात की नाही ते डोळसपणे पाहत... आमट्यांचे मित्र आणि आनंदवनाचे स्नेही यातले अंतर त्यांच्या नेमके ध्यानात असे.

 पैसा आणि देणगी यांना संस्थेच्या लेखी मोल होतेच. मात्र पैसेवाली माणसे आणि देणगीदार यांची मिजास त्यांनी सांभाळली  नाही. त्यांच्या लेखी लेखक, कवी, कलावंत, गायक, विचारवंत आणि ज्ञानी माणसांचे मोल मोठे होते. ती माणसेही त्यांच्यातल्या मोठेपणाला असलेल्या सौंदर्याच्या दृष्टीवर मोहित होती.

 ‘लागलो बुवाच्या नादी’ या शीर्षकाचा एक लेखच कुरुंदकरांनी त्यांच्यावर लिहून महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित केला. भीमसेनांपासून वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्वांपर्यंतच्या साऱ्यांना ते हवेहवेसे होते... बाबांच्या सेवाकार्याएवढीच त्यांच्या प्रातिभ दृष्टीची ती मिळकत होती. त्यांच्या योजनांची आखणी गरजांच्या जन्मापूर्वीच झालेली असायची. संपूर्ण आणि अंमलाच्या व्यवस्थेसह.

पावसाचे वेध सुरू होण्याआधी आनंदवन आणि सोनाथची शेते पेरणीसाठी तयार असायची. गोदामात बियाणे आणि खतांची कोठारे भरली असायची. अवर्षणाची चिन्हे साधी दिसली तरी त्यांचे पाण्याचे नियोजन पूर्ण झालेले असायचे... गरजेहून अधिक पैसा संस्थेत येईल आणि आनंदवनाला कधी चणचण भासणार नाही याविषयी ते जागरूक असायचे...

या मोठ्या गोष्टींएवढ्याच आपल्या सभोवतीच्या माणसांच्या गरजाही त्यांच्या मनात अचूक अन्‌ वेळेआधी नोंदविल्या जायच्या.

आणीबाणीत माझी तुरुंगात रवानगी झाली. मला नेणारे पोलिसांचे वाहन वरोऱ्याच्या बसस्टँडवर थांबवून मी बाबांना फोन केला.

म्हणालो, ‘ मी निघालो कृष्णाच्या मायभूीकडे’

ते तात्काळ म्हणाले, ‘गोकुळाची काळजी नको. मी आहे.’

असे किती प्रसंग आणि किती आठवणी...

बाबांचे मोठेपण अनेकांनी सांगितले. मलाही ते सांगता येईल. पण त्यांच्या मोठेपणाहून त्यांचे माणूसपणच मला अधिक मोहवत आले. त्या माणूसपणाला मर्यादा नव्हती. मोठेपण मर्यादित झाले म्हणजे त्याचे माणूसपण होते की माणूसपण अमर्याद झाले म्हणजे त्याला मोठेपण येते?

बाबा एकाचवेळी मोठे आणि माणूस होते. त्यांच्या त्या भूमिकांत अद्वैत होते. त्यांच्यातला बाप कुठे थांबायचा आणि नेता कुठे पुढे व्हायचा, सेवक कधी थांबायचा आणि संयोजक कधी अग्रेसर व्हायचा आणि ते महामानव केव्हा असायचे आणि बाबा केव्हा व्हायचे ते कळू नये एवढे त्यांचे साधेपण अनिर्वचनीय होते.

आनंदवनात असताना एका रात्री अकराच्या सुमाराला माझे वडील गेल्याचा फोन आला. मी तडक निघालो. बाबांनी सोबत यायची तयारी केली. ‘तुम्ही थांबा, मी गेल्यावर कळवतो’ असं कसंबसं म्हणून मी त्यांचा निरोप घेतला... घरी नातेवाईक जमले होते. तेवढ्या अपरात्रीही वडिलांचे जुने मित्र आले होते. ती रात्र आम्ही जागूनच काढली.

पहाटेचा सूर्य उगवण्याआधी बाबा आले. सोबत ताई होत्या. मग घरच्या कर्त्या माणसाने करावे तसे सारा पुढाकार घेऊन त्यांनी केले. वडिलांची अखेरची यात्रा चार किलोमीटरची. ती सारा वेळ माझ्या खांद्यावर हात ठेवून ते चालत राहिले... उन्हाची काहिली 115 अंशांची असताना... बाबांना पाहायला तेवढ्या उन्हात लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते... माझे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. ‘अरे, एका स्वातंत्र्य सैनिकाची ही अंत्ययात्रा आहे.’ बाबा सोबत आलेल्या पत्रकारांना सांगत होते.

 ऐंशीच्या घरातल्या माझ्या काकूला अपघात होऊन ती अंथरुणाला खिळल्याचे त्यांना कळले. मी आणि माझी पत्नी दोघेच घरी असल्याने आमच्यातला एकजण तिच्यासोबत दवाखान्यात असायचा... आणि एका सायंकाळी मी दवाखान्यात जाण्याआधीच जया घरी परतली.

 ती म्हणाली, ‘विकास आणि भारतीला ॲम्ब्युलन्स देऊन बाबांनी पाठवले. त्यांनी काकूला परस्पर आनंदवनात नेले’...

पुढे आठ महिने ती आनंदवनात होती. दरदिवशी बाबा तिला भेटायचे. त्या बळावर ती जगली. ती गेल्याचा फोन आला तोही ‘आता रात्रीचा येऊ नकोस’ असा. वर ‘सकाळी तू येतपर्यंत सगळी तयारी झाली असेल. काळजी करू नकोस.’ असे सांगणारा. तिच्या अंत्ययात्रेला आनंदवन आलं होतं. स्वतः बाबा त्यांना ढकलत न्यायच्या गाडीवर पडून तीत होते. अखेरच्या टप्प्यावर बाबा ताड्‌दिशी त्यांच्या गाडीतून उतरून शवाजवळ आले... आणि आम्ही अवाक्‌ होऊन पाहत असताना 92 वर्षे वयाच्या बाबांनी त्याला खांदा दिला. तिची अखेरपर्यंत तशी सोबत करणं आम्हांला जमलं नाही, ते त्यांनी केलं.

 रागवावे बाबांनी, कौतुक करावे तेही त्यांनीच, दुरावले की पुढच्याला जगाने आपल्याकडे पाठ फिरवली असे वाटावे आणि कौतुक करायला लागले की भांड्याला डाग देणाऱ्यालाही क्षणभर आपणच टाटा असल्याचा भास व्हावा... पण ते सारे करताना त्यांच्यातला चाणाक्ष परीक्षक सावध असायचा.

त्यांच्या लेखी प्रत्येकाची ओळख त्याच्या योग्यतेएवढीच त्याच्या आवाक्याचा अचूक अंदाज घेणारी होती. शिवाय त्यांच्या मोजपट्‌ट्या साऱ्यांसाठी सारख्या होत्या. मग एका मराठी विचारवंताला बस घेऊन द्यायचे त्यांच्या मनात यायचे. एका विनोदी लेखकाला स्थानबद्ध करून सक्तीने लिहायला लावायचा ते विचार करायचे. एका गायकाला फक्त गायला मोकळे ठेवा असा आणि दुसऱ्या एकाला जास्तीची विश्रांती कशी मिळेल याचाच विचार त्यांना अस्वस्थ करायचा... ओढ सगळी अत्युच्चतेची आणि जिव्हाळा साऱ्या वंचितांचा... आकाश आणि पाताळ असे सारेच कवेत घ्यायची जिद्द. या जिद्दीनेच त्यांना जगविले, वाढविले, सामर्थ्यवान केले आणि दुबळेपणाच्या पातळीवर जाईल एवढे हळवेपणही तिनेच त्यांना दिले.

खांडेकरांना बाबांच्या मानसिक घडणीत साने गुरुजींच्या सेवाकार्याचा प्रभाव आणि डॉक्टर कोटणीसांची कहाणी सापडली.

 पु.लं.ना त्यांच्यात रवींद्रनाथांची उभारी दिसली तर कुरुंदकरांना गांधी विचाराचा सक्रिय प्रतिनिधी सापडला.

 स्वतः बाबा विनोबांना आई मानत आणि इतर समाजसेवकांविषयी कमालीच्या श्रद्धेने बोलत. एका कवीने त्यांना वादळ म्हटले. (आणि ते मुठीत  ठेवण्याच्या साधनातार्इंच्या सामर्थ्याचे कौतुक केले) बाबा वादळ असतील तर ते फक्त सामर्थ्य आणि गतिमानतेच्या संदर्भातच. एरव्ही वादळाला स्वतःची दिशा नसते. त्याला अल्पजीवितेचा शापही असतो. बाबा आमटे नावाचे वादळ स्वयंप्रेरित, स्वयंचलित आणि स्वयंनियंत्रित होते. त्या नियंत्रणाची कळही त्यातच होती. शिवाय त्याला सातत्याचे वरदानही होते.

शेवाळकरांनी अशा आशयाची एक कविता फार पूर्वी मला ऐकवली.

जे वादळ येऊन जाते

ते म्हणजे हवेतली हवा

जे येऊन कायम होते

ते म्हणजेच दिवा

दुःख, दैन्य आणि जीवनातली कुरूपता यामुळे साऱ्यांचीच मने उद्विग्न होतात. मात्र त्यांतल्या बहुतेकांवरचा त्यांचा परिणाम करुणेपाशी थांबतो. सहभागाच्या तळमळीने पुढे होणारे मित्र फार थोडे असतात... त्यात एखादा गांधी असतो. एखादा साने, एखादा श्वाएट्‌झर आणि एखादी टेरेसा. त्यातच मग एखादा बाबा आमटेही असतो.

बाबांभोवती त्यांच्या चाहत्यांनी आणि जवळच्यांनीही अनेक कहाण्या त्यांच्या हयातीतच उभ्या केल्या... त्यांचा जन्म चालत्या गाडीत झाला. त्यांनी भगतसिंगांना शस्त्रे पुरविली. रवींद्रनाथांसोबत बसून गप्पा केल्या. गांधीजींनी त्यांना अभयसाधक म्हटले. नेहरूंनी आनंदवनात येऊन त्यांची प्रशंसा केली आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी होऊन बाबांनी अनेकदा तुरुंगवास भोगला, या त्यांतल्याच काही कथा.

त्यांच्यावर लिहिलेल्या एका इंग्रजी चरित्रग्रंथातही त्या पोथीवाल्याने भक्तिभावाने लिहाव्या तशा आल्या आहेत.

 बाबांना क्वचित कधी भेटलेली माणसेही त्या तशाच इतरांना सांगताना मी पाहिली आहेत. मात्र एखाद्याच्या हयातीतच त्याच्याविषयीच्या दंतकथा उभ्या व्हायला त्याचे अद्‌भुतपणच कारण ठरते. बाबांच्या आयुष्यात सारेच तसे होते.

चमत्कार वाटावा असेच सारे त्यांच्या हातून घडले. जे घडले त्याचे स्वप्न त्यांनीच पाहिले, त्याच्या साकारणीची आखणी त्यांनीच केली आणि आपल्या कष्टांतून त्यांनीच त्याची उभारणीही केली...

मुळात आनंदवनाची स्थापना, विकास आणि त्याचे स्वरूप हाच चमत्कार वाटावा असा पराक्रम आहे. तो बाबांनी त्यांच्या अपंग सैनिकांना सोबत घेऊन केला आहे. हातीपायी धड असणाऱ्यांना जमणार नाही ते त्यांच्या अपंग साथीदारांनी घडविले आहे... कुष्ठरोग्यांच्या संस्थेने निकोप नागरिकांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून महाविद्यालये उघडण्याची आणि त्यांतल्या प्राध्यापकांना वेतन देण्याची किमया जगात एकट्या आनंदवनानेच केली असावी... त्यांनी पिकविलेला भाजीपाला आणि दूधदुभते आरंभी एका शहराला आणि पुढे जिल्ह्याला पुरवण्याचा विक्रमही त्यांनीच केला असावा... आनंदवनाला लागणारी सगळी चीजवस्तू त्यातल्या अपंगांच्या हातून तयार करून घेण्याचे आणि जास्तीची बाहेरच्या जगाला देण्याचे पहिले व्यावसायिक यशही बहुधा त्याचेच असावे...

 कुष्ठरोग्यांचे केंद्र ज्ञानपीठ बनविण्याचे, ते प्रतिभावंतांचा ऊर्जास्रोत करण्याचे आणि समाजाने टाकून दिलेल्या माणसांना समाजाचे उपकारकर्ते करून दाखवण्याचे अद्‌भुत कामही बहुधा आनंदवनानेच प्रथम केले असावे. झालेच तर हे सारे ‘संकल्पास्तव अधीर पूर्तता’ या वेगाने त्यांना करता आले आहे.

 माणसांचा इतिहास हा माणसांनी माणसांवर लादलेल्या जुलुमांचा आणि माणसांनी त्याविरुद्ध दिलेल्या लढ्यांचाच इतिहास आहे. त्यात क्वचित कुठे एखादा महामानव माणसांच्या मुक्तीसाठी ईश्वर नावाचे नियतीचे शस्त्र हाती घेऊन उभा राहिलेला दिसला. त्या अस्त्राच्या लखलखटाने दिपून गेलेली माणसे मग नव्या मरगळीच्या आधीन झालेली दिसली. नियतीला शरण आणण्याचा मंत्र देणारेही खूप झाले. तंत्र आणि विज्ञानाचे शस्त्र घेतलेले महर्षीही माणसांच्या सुखासाठी नियतीवर मात करायला उभे झालेले इतिहासाने पाहिले.

पण नियतीविरुद्धच्या या लढाईत शस्त्रे महत्त्वाची आणि माणसांचे माणूसपणच गौण झाल्याचे त्याला जाणवले... बाबांच्या अपंग फौजेने केलेल्या लढाईचे वेगळेपण तिच्यातल्या सैनिकांनी नियतीचे अस्तित्वच प्रथम नाकारण्यात होते. शिल्लक सामर्थ्यानिशी आपल्यातील अभावांविरुद्ध त्यांनी युद्ध जाहीर केले होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरली. पण तिला त्यांनी माणुसकीची मालकी दिली नाही. माणसांचे दास बनविले. गांधीबाबालाही यंत्रशक्तीचे नेके हेच स्वरूप अभिप्रेत होते.

कुणालाही आवडावी तशी स्तुती बाबांनाही आवडायची. पण चढायची नाही. इंदिरा गांधी भेटीला आल्या तेव्हा, वाजपेयींच्या हातून गांधी-आंबेडकर पुरस्कार घेतले तेव्हा किंवा पद्मविभूषणसारखा राष्ट्रीय सन्मान जाहीर झाला तेव्हाही ते शांत व त्यांच्या नेहमीच्या आविर्भावातच होते. नाही म्हणायला इंदिरा गांधी आल्या आणि त्यांनी त्यांची महामानव म्हणून प्रशंसा केली तेव्हा महामानव कसा चालत असावा याची पंधरावीस फूट लांब टांगा टाकत चालून जाऊन त्यांनी नक्कल करून दाखविली होती.

आपल्या त्या करामतीवर ते स्वतःच मोठ्याने हसतही राहिले होते. इंग्लंड-अमेरिकेतील साहाय्यकारी संस्थांप्रमाणेच युरोपातील संस्था-संघटनांच्या मदतीचा ओघही एके काळी आनंदवनात यायचा. त्यांच्याविषयी बाबांच्या मनात कृतज्ञतेची भावना असायची. मात्र या संस्था त्यांच्या कामावर आपली मते लादण्याचा प्रयत्न करू लागल्या की ते संतापायचे.

मग अशा संस्थांना ‘तुमची मदत नको’ असे परखडपणे कळवायलाही ते मागेपुढे पाहत नसत... एका देशी संस्थेने आनंदवनात एखादे मंदिर उभारा असे त्यांना सुचविले तेव्हा ‘मग त्यासोबत मशीद, चर्च, गुरुद्वारा आणि विहारही उभारावा लागेल’ असे उत्तर त्यांनी ताड्‌दिशी दिले...

बाबा सेक्युलर तर होतेच शिवाय ते पूर्णपणे निरीश्वरवादीही होते... कर्म हाच  ईश्वर, माणूस हाच देव आणि सेवा हीच पूजा अशी धारणा असणारे बाबा कधी कोणत्या देवळात व मशिदीत गेल्याचे कुणी पाहिले नाही... अगदी अखेरच्या काळात मात्र त्यांनी अनेक देवळे जवळ केली.

चढता येत नसतानाही माहूरचा गड चढून जाऊन त्यांनी अंबेचे दर्शन घेतले. त्यामागे तार्इंच्या देवभावाचा आदर करण्याचा अपराधी भाव होता. तार्इंनी बाबांसाठी आपल्या इच्छा आयुष्यभर मागे ठेवल्या. त्या ईश्वराच्याच नव्हे तर संत-महात्म्यांच्याही भक्त होत्या. त्यांचे देवघर प्रेक्षणीय होते. ते सदैव ताज्या फुलांनी सजलेले असे. त्यात देवीदेवतांच्या मूर्तींसोबत संत-महंतांच्याही तसबिरी होत्या. पूजेत त्या चांगला तास-दीडतास घालवीत आणि ‘आनंदवनात आम्ही फुले तोडीत नसतो’ असे बाबांच्या आज्ञेचे फलक लागले असताना त्यातली सारी फुले त्या तोडत... मात्र बाबांना आवडत नाही म्हणून त्यांनी कधी गोडधोड खाल्ले नाही की आपल्या मुला-नातवंडांची कोणती हौस केली नाही... आपल्यासाठी हिने एवढे केले, आपण मात्र तिच्यासाठी मनाला जराही मुरड घातली नाही या जाणिवेने अखेरच्या काळात तार्इंच्या हातून चक्क तीर्थप्रसाद घेऊ लागले.

 त्यांच्या देवा-बुवांच्या दर्शनालाही मग ते जाऊ लागले... मात्र हे सारे ते सश्रद्ध झाले म्हणून नाही तर तार्इंवर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन म्हणून.

नर्मदा सरोवराविरुद्ध झालेल्या आंदोलनासाठी त्यांनी आयुष्याची तब्बल बारा वर्षे आनंदवनापासून दूर नर्मदेच्या किनाऱ्यावर काढली. मध्यप्रदेशातील कसरावद या खेड्याजवळ नर्मदेच्या विस्तीर्ण पात्राच्या दक्षिणेला असलेल्या उंच कड्यावर टिनाचे झोपडे बांधून ते राहिले. सोबत ताई होत्या आणि आनंदवनातली माणसे तेथे येत-जात होती... या काळात त्यांनी तिथली आदिवासी माणसे सोयऱ्यांसारखी जोडली.

 त्यात तरुण होते, वृद्ध होते, बायाबापड्या आणि आंदोलनातले कार्यकर्ते होते. त्या काळात मी त्यांना भेटायला तिथल्या जीवघेण्या उन्हाळ्यात तिथे गेलो... 49 डिग्री सेल्सियस एवढे तापमान आणि वरच्या टिना तव्यासारख्या तापलेल्या. तशातच त्यांच्या कॉटशेजारी बसून त्यांच्याशी बोलत असताना एक विलक्षण घटना घडली. लाल तोंडाच्या माकडाचे एक लहानसे पिलू खोलीत आले आणि ओळखीच्या अधिकाराने टुण्‌दिशी उडी मारून बाबांच्या छातीवर जाऊन बसले.

बाबांवर मनुष्यमात्रांएवढेच या प्राणिमात्रांचे असलेले प्रेम मला ठाऊक होते तरी मी या माकडाला पूर्वी पाहिले नव्हते. मी त्याला हुसकावू लागलो तर ते आपले दोन्ही लांब हात बाबांच्या गळ्याभोवती घालीत त्यांना बिलगले... मग बाबांनी त्याला थोपटत म्हटले, ‘मन्या, अरे किती दिवसांनी आलास बाबा’ आणि ‘अरे, हा आपला सुरेश’ असं म्हणून त्याची माझ्याशी ओळख करून दिली.

भारद्वाज पक्षाचं एक जोडपं आणि नर्मदेकाठची काही हरणंही या काळात त्यांच्या परिवारात आली होती... खूप पूर्वी सोमनाथला भरलेल्या साहित्य संमेलनात बाबांचा शिकारखाना साऱ्या साहित्यिकांनी पाहिला होता. ते संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. संमेलनाच्या मंडपात डाव्या कडेला त्यांची कॉट असे. तिकडे ते यायला निघाले की त्यांच्या मागे हरणे, मोर, माकडं आणि बिबट्याचे एक पिलूही संमेलनात यायचे.

जोवर बाबा मंडपात असत तोवर श्रोत्यांचा तो वर्गही व्यासपीठावरील वक्त्यांची भाषणे शांतपणे ऐकून घ्यायचा. चांगली आणि कंटाळवाणी अशी सगळीच भाषणे आस्थेने ऐकणारा श्रद्धाशीलांचा तो वर्ग मग बाबांपाठोपाठच मंडपातून बाहेर पडायचा.

अखेरच्या आजारात अंथरुणावर पडून कंटाळलेल्या बाबांनी ताऱ्यांनी भरलेले आकाश पाहण्याची इच्छा बोलून दाखविली तेव्हा आनंदवनातल्या सहकाऱ्यांनी त्यांच्यासाठी एक भली भक्कम गाडीच तयार केली. ती माणसांनी ढकलायची होती आणि तिला कारला असावे तसे मजबूत ब्रेक्स होते.

रात्रीचे आकाश त्या गाडीवरून फिरून पाहिल्यानंतर त्यांनी रोजच सायंकाळी आनंदवनात फिरायचा ध्यास घेतला. त्यांची गाडी तिथल्या तलावाकाठी आली की त्यातला बदकांचा मोठा कळपही तरंगत त्यांच्या गाडीजवळ यायचा आणि त्यांच्यासोबत तो पांढरा थवाही तलावाला प्रदक्षिणा घालायचा.

0 8 फेब्रुवारी 2008 ची रात्र. मी पुण्यात होतो. अकराच्या सुमाराला बाबांच्या भाच्याचा, डॉ. बाबा पोळचा फोन. ‘बाबांची तब्येत बिघडली. तू निघून ये.’...

जरा वेळाने विकासचा फोन, ‘काळजी नको. त्यांच्या तब्येतीत असं वारंवार होतं. तू आरामानं ये.’

... पहाटे पाच वाजता पुन्हा विकासचाच फोन. ‘बाबा आत्ताच गेले....’

सकाळी मुंबई गाठून संध्याकाळपर्यंत आनंदवनात पोहोचलो. सारे जमले होते. रडवेले, पोरके आणि छत्रहीन... माझ्या माणसांत मग मीही तसाच सामील झालो.

आनंदवनाच्या दक्षिणेला घनदाट वृक्षांच्या सावलीत आणि रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांच्या महिरपीत बाबांचा मृतदेह पहुडला होता.. आनंदवनात गेलो की न चुकता तार्इंसोबत मी तिथे जात होतो. फुलं वाहून अन्‌ हात जोडून त्यांच्यासोबतच परत येत होतो... परतताना भडभडून येत नसे. डोळ्यात पाणीही दाटत नसे. मनात आणि कानात त्यांचा आश्वासक आवाजच तेवढा घुमत असायचा. आता त्या समाधीत बाबांसोबत ताईही रहायला गेल्या आहेत आणि आता तिथे जाताना कोणाला सोबत न्यायचे हा मला पडलेला प्रश्न आहे.

... आणि आता ताईही नाहीत

साधनाताईंच्या परवाच्या जाण्याने आनंदवनाएवढेच देशात कार्यरत असलेल्या शेकडो सेवाभावी कार्यकर्त्यांचे मातृछत्र आता हरवले आहे. बाबांच्या सहधर्मचारिणी एवढीच त्यांची ओळख नव्हती. सेवेच्या कामात आत्मीयता आणून संस्थांना कुटुंबाचा चेहराच नव्हे तर प्रकृती प्राप्त करून देणाऱ्या संस्काराच्या त्या प्रेरणारूप प्रतिनिधी होत्या. बाबांनी कामे उभारायची आणि तार्इंनी त्यांच्या विधायक प्रवृत्तीत एक प्रसन्न आपलेपण आणायचे अशी त्यांच्यातली श्रमविभागणी होती... महामहोपाध्याय घुले शास्त्र्यांच्या वेदशास्त्रसंपन्न घरात जन्माला आलेली इंदू, बाबा आमटे नावाच्या संन्याशाशी साऱ्यांचा विरोध पत्करून लग्न करते आणि त्याने उभारलेल्या अठरापगड जातीधर्मांच्या माणसांच्या सामुहिक कुटूंबात आपले सर्वस्व विसरून सहभागी होते हीच मुळात एक थरारक कथा होती.

 कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन बाबांनी माळरानावर संसार मांडला तेव्हाही त्या त्यांच्याच एवढी जिद्द घेऊन त्या कामात सहभागी झाल्या. स्वत्व राखायचे आणि उरलेल्या आपलेपणाला मीपणाचा तोरा कधी चिकटू द्यायचा नाही ही किमया साधलेल्या साधनातार्इंचे त्या साऱ्या उभारणीतले अस्तित्व जाणवणारे आणि तरीही डोळ्यावर न येणारे होते.

9 फेब्रुवारी 2008 ला बाबांचे निधन झाले तेव्हाच त्या फार काळ आपल्यासोबत राहणार नाहीत या चिंतेने आनंदवन परिवाराला ग्रासले होते. बाबांवाचून त्यांना वेगळे आयुष्यही नव्हते. "I sought my God, my God I could not see, I sought my friend, my friend eluded me, I sought my husband
& I got all the three" असे त्या म्हणायच्या. तरीही बाबांच्या पश्चात त्या हिंमतीने उभ्या राहिल्या.

आनंदवनाच्या दैनंदिन व्यवहारावरची त्यांची नजर आणि पकड कायम राहिली. दरदिवशी बाबांच्या समाधीपर्यंत जाऊन त्यांना नमस्कार करण्याचा त्यांचा क्रम त्यांच्या आजारातही कधी चुकला नाही. त्यांच्या मूळ स्वभावातील जिव्हाळ्याला जास्तीचे भरते आलेलेच या काळात सभोवतीच्या साऱ्यांच्या लक्षात आले. बाबांचा अभाव कोणालाही जाणवू नये या त्यांच्या इच्छेचीच ती परिणती असावी.

याच काळात त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने गाठले. वयाच्या वाढीसोबत त्या क्षीण होत, खंगत गेल्या. मात्र त्यांच्या चर्येवरचे प्रसन्न हास्य आणि डोळ्यातला आशीर्वादाचा भाव त्या विकाराला कधी पराभूत करता आला नाही. अखेरच्या श्वासापर्यंत त्या स्थिरचित्त आणि हसतमुख राहिल्या.

मृत्यूच्या आदल्या दिवशी सायंकाळी मी त्यांना भेटलो. त्यांना धाप लागली होती. क्षणभर डोळे उघडून त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्या नजरेत ओळख उमटली. किंचितसे स्मित त्यांच्या चर्येवर उमटल्याचा मला भास झाला. मी दिलेले दोन चमचे पाणी त्या प्यायल्या. तासभर मी त्यांचा हात धरून शेजारी बसलो. विकासही मग तिथे आला. नेमका त्याच वेळी प्रकाशच्या मुलाचा, अनुचा आलेला फोन मी घेतला. ‘प्रकाश अन्‌ तुम्ही सारे ताबडतोब निघा’ असे मी त्याला म्हणालो. त्यावर ‘एवढ्या घाईने त्यांना बोलवण्याची गरज नाही’ असं कुणीतरी म्हणालं.

कण्हत असलेल्या ताई तोवर शांत होऊन झोपी गेल्या होत्या. त्याच स्थितीत मी त्यांचा निरोप घेऊन परतलो.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता विकासचा फोन आला - ‘ताई आत्ताच गेल्या.’

आता बाबा नाहीत आणि ताईही नाहीत. मात्र आनंदवनावरचा त्यांचा संस्कार मोठा आहे. त्यांनी घालून दिलेली शिस्त आणि त्यातल्या कामाचे वेळापत्रक तिथल्या साऱ्यांच्या अंगवळणी पडले आहे.

आनंदवनातच नव्हे तर त्यापासून प्रेरणा घेतलेल्या अनेकांच्या आयुष्यावर त्यांच्या संस्कारांची छाप कायम राहणार आहे. त्यांच्या ओढीने आनंदवनात येणाऱ्यांना आता त्या दिसणार नाहीत एवढेच.

Tags: आनंदवन भारत जोडो हेमलकसा साधना आमटे बाबा आमटे Anandvan Bharat Jodo Hemlakasa Sadhana Amte Baba Amte weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात