Diwali_4 एका अलक्षित सेवाव्रतीला अभिवादन!
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

बाळासाहेब सरोद्यांसारखी माणसे आपल्या शेजारी असतात, अवतीभवती असतात. त्यांच्या निगर्वी मौनामुळे ती स्वत:विषयी कधी काही सांगत नाहीत. आणि तसले काही ऐकून घेण्याची सवयही आपल्यातील अनेकांना नाही. मग त्यांचे सेवाकार्य, मूल्योपासना आणि समाजात राहूनही जपलेले निर्लेपपण असेच सार्वजनिक मौनात विरून जाते. प्रस्तुत लेखकाने त्यांना कधी उंची वा डोळ्यांत भरतील अशा कपड्यांत पाहिले नाही. माध्यमिकच नव्हे तर प्राथमिक शाळेतले साधे शिक्षक असावेत, तसे ते राहायचे आणि दिसायचे. मात्र अशाच माणसांच्या मूल्यनिष्ठा जबर असतात. कोणत्याही विषयावर आपली बाजू व म्हणणे सोडायला ती तयार नसतात. ती नम्र असतात, पण त्यांची निष्ठा ताठर असते. त्यांना ओळखणारे मग कधी त्यांच्या फारसे जवळ जात नाहीत आणि दूरच्यांना त्यांच्या सेवेशी वा निष्ठेशी काही घेणे-देणे नसते.

 

यवतमाळ हा शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्यांचा जिल्हा आहे. ज्या कुटुंबातील कर्त्या माणसाने आत्मत्या केली, त्या कुटुंबाशी संपर्क साधणे, त्याला शासकीय व अन्य मदत मिळवून देणे आणि त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे त्या संकटाच्या काळात त्यांच्या मागे धीराने उभे राहणे, हे काम त्यांनी कमालीच्या काळजीनिशी केले. शाळेतील गरीब मुलांना आर्थिक व अन्य मदत करण्यापासून वेश्यावस्तीत वाढलेल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही त्यांनी हाताळला.

समाजसेवेला स्वार्थाचा स्पर्श नसला आणि ती मूल्यांच्या उपासनेसोबत होत असली, तर तिला निष्कलंकपणाची जोड व दर्जा येतो. आपण व आपला संसार सांभाळून आणि  तो स्वत:च्या कष्टाने स्वयंपूर्ण करून समाजाच्या या मूल्यांच्या आराधनेमागे लागणारी माणसेच मग तो दर्जा मिळवू शकतात. समाजसेवेच्या नावाने आत्मसुख मिळविणे चांगले, पण त्याच मार्गाने स्वार्थपूजा साधणे वाईट. सध्याच्या ‘सेवाधर्मा’त अशी माणसे फार आहेत. लोकांना त्यांच्या कामाचा प्रचारकी व बाह्यांग भाग दिसतो. त्यावर ते लुब्धही असतात. त्या कामामागे जाऊन ते करणारी माणसे नेमकी कशी आहेत, याची चौकशी कुणी फारसे करीत नाहीत. आपल्या मराठी मुलुखात अशा किती सेवासंस्थांचे अलीकडे संस्थानात रूपांतर झाले आणि त्यातली संस्थानिक माणसेच समाजातील खऱ्या निष्कलंक माणसांना उपदेश करताना कशी दिसतात, याची असंख्य उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत. माणसे बोलत नाहीत म्हणूनच अशा लोकांचे सेवाधर्म टिकले आहेत. अशा धर्मकार्यांना व सेवाधर्मांना, ते करणाऱ्यांच्या बँकांमधील रकमांची व त्यांनी जमविलेल्या इस्टेटीची चौकशी ना सरकार करते, ना सामाजिक कार्यकर्ते करतात. मग त्यांच्या सेवेतून स्वार्थसाधन बिनबोभाटपणे चालते आणि समाजालाही त्यांची शंका घ्यावीशी वाटत नाह. ‘आपल्यातला सेवाधर्म लोपत नाही’ असे उद्‌गार रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष रावसाहेब शिंदे यांनी त्याचमुळे काढले असावेत.

अशा दुटप्पी माणसांपासून वेगळे राहून मूल्यांची उपासना खऱ्या स्वधर्मासारखी करणारी आणि त्यासाठी स्वत:ला प्रसिद्धी व पैसा यापासून दूर ठेवणारी माणसे पाहिली की, उपरोक्त ढोंगांची चीड येते अन्‌ समाजाच्या सोशिक लबाडीचाही राग येतो. गांधीजींनी निर्माण केलेले आदर्श, विनोबांनी दाखविलेला मार्ग, साने गुरुजींनी आचरलेली सेवादृष्टी आणि समाजातील वंचितांच्या वर्गांचे प्रश्न निष्ठेने सोडविण्याचा ध्यास घेतलेली एकेकटी माणसेच मग खरी सेवाधर्मी वाटू लागतात. यवतमाळसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहून मेटिखेड्यात गरीब पोरांची एक शाळा चालविणारा, जयप्रकाशांच्या आणीबाणीविरोधी लढ्यात भाग घेऊन  तिहारचा तुरुंगवास अनुभवणारा, आयुष्यभर साध्या वस्त्रात निर्लेप वृत्तीने जगणारा आणि आपल्या पश्चात घरासाठी फारसे काही न ठेवणारा बाळ सरोदे हा माणूस असा होता. त्यांचे दि. 16 जानेवारी 2020 ला निधन झाले तेव्हा असंख्य गरिबांना, दलित व वंचितांना  पोरकेपणाची भावना आली. त्याचा नुसता सहवासही त्यांना प्रेरणादायी वाटत होता. ते तर सारेच घरचे माणूस गमावल्याच्या व्यथेने दु:खी झालेले दिसले. हा माणूस कधी सभा-समारंभात दिसला नाही, त्याने फारशी व्याख्याने दिली नाहीत, उपदेशाचा पाऊस पाडला नाही. सार्वजनिक कार्यक्रमातही कुठल्याही न दिसणाऱ्या जागी बसून सहभागी होणाऱ्या या माणसाचे खरे मोल त्याहीमुळे या समाजात कदाचित अलक्षित राहिले असेल.

वृत्तपत्रात बातमी नाही, त्याच्या कार्याचा वृत्तांत नाही, त्याचे छायाचित्र वा आणखी कोणती माहिती नाही. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सर्वसेवासंघातील, सर्वोदयी कार्यकर्त्यांतील व संस्थेतल्याही कोणाला ती द्यावीशी वाटली नाही. हे त्याच्या संस्कारामुळे झाले, की या लोकांच्या नाकर्त्या आळसामुळे? काही का असेना, बाळ सरोदे या जगातून मुकाट्याने गेला. एवढा की, तो गेल्याचे कुणाला फारसे कळलेही नाही. अशा किती माणसांचे ऋण आपल्या आयुष्यावर असेल आणि आपल्याला त्याची दखलही नसेल. समाजसेवा हे तसेही आपल्यातले एक उपेक्षित क्षेत्र आहे. त्यात चमकणारी माणसे नाहीत असे नाही. त्यासाठी ते करीत असलेली जाहिरातबाजीही साऱ्यांना कळते. पण त्यांच्याकडे देशातली धनवंत माणसे जातात, सरकार त्यांच्यावर पदव्यांची बरसात करते आणि कधी कधी अशा संस्थांशी आम्हीही जुळले आहोत असे सांगण्याचा अभिमान बाळगणारी उच्चभ्रू माणसे त्या संस्थांना भेटी देऊन एखादी यात्रा केल्याचे समाधान मिळवितात.

बाळासाहेब सरोद्यांसारखी माणसे आपल्या शेजारी असतात, अवतीभवती असतात. त्यांच्या निगर्वी मौनामुळे ती स्वत:विषयी कधी काही सांगत नाहीत. आणि तसले काही ऐकून घेण्याची सवयही आपल्यातील अनेकांना नाही. मग त्यांचे सेवाकार्य, मूल्योपासना आणि समाजात राहूनही जपलेले निर्लेपपण असेच सार्वजनिक मौनात विरून जाते. प्रस्तुत लेखकाने त्यांना कधी उंची वा डोळ्यांत भरतील अशा कपड्यांत पाहिले नाही. माध्यमिकच नव्हे तर प्राथमिक शाळेतले साधे शिक्षक असावेत, तसे ते राहायचे आणि दिसायचे. मात्र अशाच माणसांच्या मूल्यनिष्ठा जबर असतात. कोणत्याही विषयावर आपली बाजू व म्हणणे सोडायला ती तयार नसतात. ती नम्र असतात, पण त्यांची निष्ठा ताठर असते. त्यांना ओळखणारे मग कधी त्यांच्या फारसे जवळ जात नाहीत आणि दूरच्यांना त्यांच्या सेवेशी वा निष्ठेशी काही घेणे-देणे नसते.

समाजसेवकांचा एक आणखीही वर्ग आपल्यात आहे. त्याचीही अशा वेळी आठवण व्हावी. ही माणसे विदेशी संस्थांकडे अनुदानासाठी अर्ज करतात. असली-नसली कामे आपण करीत असल्याचे त्यात लिहितात आणि तिकडचे खुळे त्यांना पैसेही देतात. मग विदेशी पैशांवर यांची स्वदेशी सेवा ऐषारामात येथे चालत राहते. सरोद्यांसारखी सेवाभावी माणसे पाहिली की, या माणसांविषयीचा केवळ रागच मनात येत नाही, तिरस्कारही येतो.

यवतमाळ हा शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्यांचा जिल्हा आहे. ज्या कुटुंबातील कर्त्या माणसाने आत्मत्या केली, त्या कुटुंबाशी संपर्क साधणे, त्याला शासकीय व अन्य मदत मिळवून देणे आणि त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे त्या संकटाच्या काळात त्यांच्या मागे धीराने उभे राहणे, हे काम त्यांनी कमालीच्या काळजीनिशी केले. शाळेतील गरीब मुलांना आर्थिक व अन्य मदत करण्यापासून वेश्यावस्तीत वाढलेल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही त्यांनी हाताळला. परिणामी, उच्चभ्रू वर्गात त्यांना स्नेही कमी मिळाले असले तरी समाजाच्या अखेरच्या पातळीवरील वर्गात त्यांना मिळालेली मान्यता मोठी होती. समाजात स्वत:ला हरवून टाकणे आणि ‘स्व’ बाजूला सारून त्याच्या खऱ्या गरजा भागवण्यासाठी परिश्रम करणे, हा त्यांच्या सेवाधर्माचा भाग होता. अलीकडच्या काळात सर्वसेवा संघ वा सर्वोदय यातील कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या लोक-संघर्षापासून फारकत घेतली. पुढे-पुढे तर त्यांच्यातील अनेकांना सेवाधर्माचाही विसर पडलेला दिसला. आपल्या संस्था-संघटनांचा हा नाकर्तेपणा बाळासाहेबांना अर्थातच आवडणारा नव्हता. परंतु तो बोलून दाखविणे व संबंधितांना दुखवून त्यांची चाललेली कामेही थांबविणे, हे त्यांच्या सुसंस्कृत मनाला जमणारे नव्हते. परिणामी, त्यांनी या संघटनांना आलेली मरगळ व्यथेसहित अनुभवली व पचविली.

प्रस्तुत लेखकाच्या आईची एक दरिद्री मावशी 1950 च्या दशकात दाईचे काम करायची. ते कामही भामरागडजवळच्या कसनसूर या माडिया आदिवासींच्या गावात. माडिया स्त्रीच्या बाळंतपणाची सूचना आली की, ती जंगलातून पायी निघायची. रात्र असेल तर आणखी एखादी स्त्री हाती जळते लाकूड घेऊन तिच्यासोबत जायची. अशी शेकडो बाळंतपणे जिवावर उदार होऊन तिने केली. पण तिला कोणी पद्मश्री दिली नाही वा राज्यस्तरीय सन्मानही दिला नाही. कारण तिच्यामागे कोणी नव्हते आणि सरकारी दाई होती. आपल्याकडे सरकारी नोकरांची सेवा दोनच वेळी गौरविली जाते. ती नक्षल्यांच्या गोळ्यांना बळी पडली तर किंवा सीमेवर लढताना त्यांना मरण आले तर. समाजाच्या सेवेसाठी आयुष्य झिजवून मृत्यू पत्करणाऱ्यांना कोण विचारतो? घरातली माणसेही मग ‘ती फुकट मेली’ असे म्हणून थांबतात.

वास्तव हे की, या एवढा सामाजिक कृतघ्नपणा दुसरा कोणता नाही आणि तो कृतघ्नपणा आहे याची कोणाच्या लेखी दखलही नाही. अशी माणसे तशीच दुर्लक्षित राहिली आणि गेली. बाळासाहेबांचे नशीब थोर म्हणून त्यांचे चिरंजीव ॲड. असीम सरोदे, मुलगी ॲड. स्मिता आणि तिचे यजमान संदेश सोबत होते. सौ.सरोदेही जवळ होत्या. शेजारची माणसे होती. त्यांनी यवतमाळात व मेटिखेड्यात काढलेल्या शाळांचे शिक्षक व कर्मचारी होते. सर्वोदयी या थोर नावाची माणसे काही आली नाहीत. ज्या सेवाग्रामात त्यांनी एवढे दिवस घालविले, तिथलेही कोणी आले नाही. तुरुंगातले सहकारी नाहीत, गांधी वा विनोबांच्या विचाराचेही कुणी नाही. काही माणसे विष पितच जगतात आणि ते पचवूनच शांत होतात.

‘नाही चिरा, नाही पणती’ हे शोकगीत बोरकरांनी अशाच माणसांसाठी लिहिले असेल. (त्या गीतातली करुणा किती जणांना अस्वस्थ करीत असेल आणि किती जणांना तिची चालच तेवढी भावत असेल?) आपण बहुधा सारेच संवेदनशून्य असतो. प्रस्तुत लेखकाचा संबंध आनंदवनाशीही राहिला. माणसे मोठ्या संख्येने येत. प्रतिभावंत, लेखक, गायक, कवी, वक्ते असे सारे. मात्र ते सारे जण बाबांना आणि तार्इंना भेटून परत जात. त्यातल्या कोणालाच तिथल्या कुष्ठरोग्याशी ओळख करून घ्यावी, असे वाटले नाही. ‘पैसे दिले की आपली सामाजिक जबाबदारी संपते’ हीच साऱ्यांची वृत्ती. हे दु:ख सांगता येत नाही आणि जो सांगेल तो साऱ्यांच्या टीकेचाच विषय होईल.

त्यामुळे गप्प राहायचे, बाळासाहेब सरोद्यांचे स्मरण करायचे. त्यांना मनोमन श्रद्धांजली वाहायची आणि चालू लागायचे. त्यांना तरी याहून जास्तीचे आणखी काय हवे होते?

Tags: चळवळ बाळासाहेब सरोदे सुरेश द्वादशीवार andaranjali activist chalval balasaheb sarode suresh dwadashiwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात