डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

1980 ते 90 या दशकभराच्या काळात स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी पंजाबमध्ये दहशतवादाचे थैमान माजले होते, पंजाब हे राज्य भारतापासून तुटते की काय अशी भीती निर्माण झाली होती. त्यावेळी दहशतवादी लपून बसलेल्या सुवर्ण मंदिरावर लष्करी कारवाई करण्याचे आदेश पंतप्रधान इंदिरा गांधींनी दिले. त्या कारवाईत जर्नेलसिंग भिन्द्रानवालेचा मृत्यू झाला आणि नंतर त्या कारवाईचा सूड म्हणून खलिस्तानवाद्यांनी इंदिरा गांधींची हत्या केली... धगधगणाऱ्या पंजाबला पत्रकार या नात्याने भेट देण्यासाठी सुरेश द्वादशीवार 1984 मध्ये गेले, तेव्हा त्यांनी भिन्द्रानवालेची मुलाखत घेतली होती. त्या संदर्भातील हा लेख 25 वर्षांपूर्वीच्या अप्रिय आणि दाहक आठवणी जागवणारा असला तरी, आजच्या काळातील विविध प्रकारचा दहशतवाद समजून घेण्यास प्रवृत्त करणारा आहे. द्वादशीवारांनी याआधी ‘तारांगण’मध्ये अनंत भालेराव, यदुनाथ थत्ते व नरहर कुरुंदकर यांच्यावर लेख लिहिले आहेत, एप्रिल महिन्याच्या ‘तारांगण’मध्ये सुरेश भट यांच्यावरील लेख प्रसिद्ध होईल. – संपादक

23 मार्च 1984.

दुपारचे साडे बारा वाजले आहेत. अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या महाद्वारात मी जरासा घुटळतो. या महाद्वाराशेजारी उभारलेल्या उंच टॉवरवर चार मोठी घड्याळे आहेत. त्याला घंटाघर आणि वॉचटॉवर अशीही नावे आहेत. त्या घड्याळांकडे पाहत सोबत येणाऱ्या मंदिराच्या तरुण सूचना अधिकाऱ्याची मी वाट पाहतो. याच महाद्वारात पंजाबचे डी.आय.जी. अटवाल यांचा भिन्द्रानवाल्याच्या अतिरेकी हस्तकांनी मुडदा पाडल्याचे काल या अधिकाऱ्याने मला सांगितले आहे. सारा पंजाब धगधगत आहे. गेले सारे वर्ष या राज्यात भिन्द्रानवाल्याच्या हस्तकांनी केलेल्या हिंसाचारात शेकडो माणसे मृत्यू पावली आहेत. मृत्यू पावलेल्यांत स्त्रियांची संख्याही मोठी आहे. अकाली दलाचे नेते सरदार दरबारासिंग पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावर आहेत आणि त्यांची या हिंसाचाऱ्यांना फूसच नव्हे तर मदत असल्याचे बाहेर बोलले जात आहे.

आनंदपूरसाहिब हे अमृतसरच्या पूर्वेला असलेले शिखांचे आणखी एक पवित्र धर्मस्थळ आहे. अलीकडेच तेथे झालेल्या अकाली दलाच्या वार्षिक अधिवेशनात त्या पक्षाने पंजाबच्या स्वायत्ततेच्या नावाखाली थेट वेगळेपणाचा झेंडा फडकावला आहे. केंद्र सरकारने रेल्वे, दळणवळण, चलन व नाणी, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार ही पाच खाती स्वतःकडे ठेवून बाकीचे सर्व अधिकार पंजाबच्या स्वाधीन केले पाहिजेत असा ठरावच त्या पक्षाने तेथे सर्वानुमते संमत केला आहे.

देशाच्या घटनेने केंद्राकडे 92 विषयांचे अधिकार दिले आहेत. त्याखेरीज समवर्ती सूचीतील 67 विषयांवर त्याचे वर्चस्व असल्याचे आणि जे विषय घटनेतील कोणत्याही यादीत नाहीत त्याही विषयीचे कायदे करण्याचा अधिकार केंद्राला दिला आहे. त्यामुळे अकाली दलाची ही मागणी थेट 1946 च्या मुस्लिम लीगच्या ‘केंद्राला पाच अधिकार ठेवून अखंड भारत टिकविण्याच्या’ फुटीर भूमिकेच्या जवळ जाणारी आहे. (असे दुबळे केंद्र ठेवून अखंड भारताच्या नावाखाली भारताचे त्रिखंड विभाजन, 1. काश्मीर ते सिंध, 2. बंगाल व आसाम आणि 3. ऊर्वरित भारत, करण्याची योजना इंग्लंडच्या त्रिमंत्री परिषदेनेही सुचविली होती. ती जीनांना मान्य होती. पं. नेहरूंनी तिला पहिला विरोध नोंदविला आणि ती फेटाळली गेली. या ‘अपराधासाठी’ नंतरच्या काळात स्वतःला अखंड भारतवादी म्हणविणाऱ्या विचारवंतांनी नेहरूंना दोषी ठरवून त्यांच्यावर आगपाखड केली होती.)

अकाली दलाची ही भूमिका देशातले कोणतेही सरकार कधी मान्य करणार नव्हते आणि त्यामुळे अकाल्यांना त्यांचे फुटीरतेच्या धमकीचे सत्ताकारण दीर्घकाळ राबविता येणार होते. भिन्द्रानवाल्याच्या दहशती राजकारणाला आनंदपूरसाहिबातील या ठरावामुळे आपोआपच राजकीय बळ प्राप्त झाले होते. अकाली दलाचा मित्र पक्ष म्हणून दरबारासिंगांच्या सरकारात सामील झालेल्या भारतीय जनता पक्षाचे पुढारी अकाली दल व भिन्द्रानवाले यांच्यातील संगनमताविषयी हळू आवाजात अन्‌ खाजगीत बोलतात. मात्र आमची नावे कुठे प्रकाशित करू नका असे बजावतात. काँग्रेस पक्ष या हिंसाचाराच्या निशाणीवर आहे आणि त्याचे अनेक पुढारी दिल्लीच्या सुरक्षित आश्रयाला गेले आहेत. उरलेले आपला जीव बचावून प्रसिद्धीचा प्रकाश टाळत आहेत.

शस्त्राचाऱ्यांनी पंजाब सरकारच्या पोलिसांविरुद्ध त्यांचे हत्यार उपसले आहे. अटवाल यांचा खून ही त्यांतली आजवरची सर्वांत मोठी दहशती घटना आहे. देशातली वृत्तपत्रे पंजाबातील दहशतीच्या बातम्या ठळकपणे प्रकाशित करतात. पंजाबातली वृत्तपत्रे मात्र त्या भीतभीत अन्‌ आतल्या पानावर छापताना दिसतात. ‘पंजाब केसरी’ हे लाला जगतनारायण या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाचे दैनिक भिन्द्रानवाल्याच्या हिंसाचाराविरुद्ध खंबीरपणे उभे राहिले म्हणून 1981 मध्ये लालाजींचा आणि 1984 मध्ये रोमेश चंद्र या त्यांच्या चिरंजीवांचा भिन्द्रानवाल्याच्या माणसांनी त्यांच्या कार्यालयात शिरून अन्‌ त्यांच्यावर गोळ्या झाडून खून केला आहे. त्यांचे धाकटे बंधू विजयकुमार आता पंजाब केसरीच्या व्यवस्थापनाची तर चिरंजीव अश्विनीकुमार संपादनाची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या जालंधरमधील कार्यालयाला भेट दिली तेव्हा त्या इमारतीभोवतीचा सशस्त्र पोलिसांचा मोठा पहारा मी पाहिला ..

‘तरीही आम्ही आमचा लढा जारीच ठेवला आहे. भिन्द्रानवाले सैतान आहे. तो आहे तोवर आमची लेखणी त्याच्याशी लढणार आहे. तो संपेल, नाही तर आम्ही संपू.’ विजयकुमार त्या भेटीत सांगतात. जर्नेलसिंग भिन्द्रानवाले हा जेते 38 वर्षे वयाचा संत त्याच्या उमेदवारीच्या काळात काँग्रेससोबत होता. त्या पक्षाचे पूर्वीचे मुख्यमंत्री व आताचे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या खास विश्वासातला अशी त्याची तेव्हा ओळख होती. गुरू ग्रंथसाहिबावर प्रवचने देण्याची त्याची क्षमता आणि धर्मश्रद्ध शीख तरुणांचा त्याच्याकडे असलेला ओढा लक्षात घेऊन ग्यानीजींनी त्याचा वापर अकाली दलाची पंथावर असलेली पकड सैल करण्यासाठी करून घेतला असे वृत्तपत्रांचे म्हणणे होते. पण ग्यानीजींनी पुरविलेल्या बळावर शक्तिशाली झालेल्या भिन्द्रानवाल्याला आपल्या क्षमतांची जाणीव झाली तेव्हा त्याचा भस्मासुर झाला आणि तो ग्यानीजींवरच उलटला होता. आपली धार्मिक ताकद वाढविण्यासाठी त्याने शीख पंथापासून वेगळ्या झालेल्या धार्मिक प्रवाहांना आव्हान देण्याचे व त्यांना संपविण्याचे डाव प्रथम आखले. धर्मावतारी अशी आपली प्रतिमा त्याने मोठ्या प्रयत्नानिशी त्यासाठी उभी केली. त्याच्या हल्लेखोर साथीदारांचे पहिले लक्ष्य निरंकारी पंथ हे होते. शिखांची गुरुपरंपरा तिच्या दहाव्या गुरूंपाशी, गुरू गोविंदसिंगांपाशी थांबली नाही. नवे गुरू यापुढे येत राहणार आहेत आणि आमचे गुरू गुरुबचनसिंग हे याच परंपरेतील नवे गुरू आहेत असा निरंकाऱ्यांचा दावा होता. तो पाखंडी ठरवून त्यावर हल्ला चढविणे भिन्द्रानवाल्याला सहज जमणारे होते. (मुसलमान धर्मातील लोकांचा अहमदिया या ‘पाखंडी’ पंथावर असलेला राग नेका असाच होता आणि आहे) त्यातून 24 एप्रिल 1980 या दिवशी भिन्द्रानवाल्याच्या रणबीरसिंग नावाच्या हस्तकाने दिल्लीत गुरुबचनसिंगांचा खून केला.

भिन्द्रानवाल्याच्या धर्मवीर या प्रतिमेची झळाळी त्यामुळे आणखी वाढली. पुढल्या काळात त्याने राधास्वामी सत्संग या पंथाचे गुरू चरणजितसिंगजी यांना आपले लक्ष्य बनविले. त्या पंथाचे बळ, संपत्ती आणि स्थान पंजाबात फार मोठे असल्याने व त्याला साऱ्या जगातून मदत मिळत असल्याने त्या पंथावर पाखंडीपणाचा आरोप करण्यापलीकडे भिन्द्रानवाल्याला काहीएक करता आले नाही. चरणजितसिंगजी यांनी मला दिलेल्या मुलाखतीत आपण भिन्द्रानवाल्याला जरा देखील भीत नाही आणि त्याचा शेवट मला आजही पाहता येणारा आहे असे सांगितले आहे. भिन्द्रानवाले बोलायचा छान. ग्रंथ साहिबातल्या अनेक कवनांवर, विशेषतः संत नामदेवांच्या त्यातील रचनांवर त्याची प्रवचने रंगत असत. ती लोकांना आवडत. त्यातून ‘योद्धा संत’ असे बिरूद त्याच्या नावाला चिकटले आणि त्याचे प्रभावक्षेत्र विस्तारले. या भिन्द्रानवाल्यांशीच आज माझी भेट ठरली आहे. गेले तीन दिवस मी सुवर्ण मंदिराच्या परिसरात भटकत आहे. अकाली दलाचे एकेकाळचे ज्येष्ठ व आदरणीय नेते संत लोंगोवाल, भिन्द्रानवाल्याचा तरुण सहकारी भाई अमरिकसिंग आणि त्याचा लष्करी सल्लागार शाबेगसिंग यांच्या मुलाखती झाल्या आहेत. लोंगोवालांची मुलाखत परवा झाली.

भिन्द्रानवाल्याच्या भीतीने सुवर्ण मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या गुरू रामदास सरायच्या एका दालनात स्वतःला सांभाळत अवघडून बसलेल्या त्या शांततावादी नेत्याने आपले असहायपण न दडविता सारे काही मोकळेपणाने सांगितले आहे... भिन्द्रानवाल्याचा कहर तोंड बंद ठेवून उघड्या डोळ्यांनी पाहावा लागण्याची दयनीयता त्यांच्या वाट्याला आली आहे. सुवर्ण मंदिरात हजारोंच्या संख्येने येणारे धर्मानुयायी एकेकाळी त्यांच्या भेटीसाठी रांगा लावीत. आता त्या रांगा भिन्द्रानवाल्याच्या पायरीशी उभ्या आहेत आणि लोंगोवाल त्यांच्या वाट्याला आलेले एकाकीपण अनुभवत आहेत. भिन्द्रानवाल्याविरुद्ध बोलता येत नाही आणि त्याने आपल्याविरुद्ध चालविलेला एकतर्फी प्रचार अनुभवण्याखेरीज गत्यंतरही नाही अशी त्यांची अवस्था आहे.

शाबेगसिंग या भिन्द्रानवाल्याच्या सेनापतीची भेट कालची. शाबेगसिंग हा बांगला युद्धात भारताच्या बाजूने लढलेला वरिष्ठ सेनाधिकारी आहे आणि त्याने भिन्द्रानवाल्याच्या आगामी युद्धाची आखणी चालविली आहे. एकेकाळी लेफ्ट. जनरलच्या पदावर राहिलेल्या शाबेगसिंगाजवळ आज ना उद्या भारताचे लष्कर सुवर्ण मंदिराला वेढा घालणार आणि त्यात दडलेल्या अतिरेक्यांना तेथून हुसकावून लावणारी निर्णायक कारवाई करणार हे कळण्याएवढा अनुभव आणि शहाणपण आहे. हा वेढा पडण्याआधी तीस हजारावर स्त्रीपुरुष आणि मुले मंदिराच्या आवारात आणायची आणि त्यांना पुढे करून भारतीय सेनेची कोंडी करायची अशी त्याची योजना आहे. सामान्य उंचीचा व नजरेत भरू नये अशा साध्याच शरीरयष्टीचा शाबेगसिंग त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेच तेवढी देतो. स्वतःहून फारसे बोलत नाही. त्याची उत्तरेही बेतासबात असतात.

भिन्द्रानवाल्याची सगळी माणसे मला त्याच्याशी बोलायला सांगतात. मात्र त्याची भेट ठरवून द्यायची टाळाटाळही तीच करतात. त्यांना कंटाळून मी सुवर्णंदिराच्या सूचना कार्यालयातल्या  अधिकाऱ्याला गाठतो आणि म्हणतो, ‘मुलाखत जाऊ द्या. संतजींचे दर्शन तरी घडेल की नाही?’ तो अधिकारी आपल्या तरुण सहकाऱ्याला खुणावतो अन्‌ तो सहकारी चट्‌दिशी उठून म्हणतो, ‘चलिये.’ मी डोक्याला साफा बांधत त्याच्या मागून चालू लागतो. महाद्वारातून घडणारे हरिमंदिराचे दर्शन प्रत्येक वेळी भुरळ घालणारे आहे. सोन्याच्या पत्र्याने मढवलेले हरिमंदिर दुपारच्या उन्हात लखलखत आहे अन्‌ त्याच्या प्रकाशमान प्रतिबिंबाने सभोवतीचे अमृत सरोवर उजळून निघाले आहे. मंदिरात सुरू असलेल्या गुरू ग्रंथसाहेबातील कवनांच्या सुरेल गायनाने वातावरण भारून गेले आहे. पुन्हा एकवार ते दृश्य डोळ्यात साठवत अन्‌ ते सूर कानात भरून घेत मी त्या तरुण अधिकाऱ्यासोबत मंदिराभोवतीच्या परिक्रमा मार्गावर येतो. याच मार्गावर काल बीबी अमरजीत कौर या मध्यमवयीन स्त्रीची भेट झाली आहे. पांढऱ्याशुभ्र वस्त्रातल्या ठेंगण्या अन्‌ काहीशा जाड अंगकाठीच्या बीबींनी पंजाब पोलिसातील आठ जवानांची समोरासमोरच्या चकमकीत हत्या केली आहे. त्या बोलत नाहीत. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर एका मंद स्मितानेच तेवढे देतात. ते स्मितही असे की ते पाहणाऱ्याला त्यातून कोणताही अर्थ काढता यावा. बीबीजींच्या पाठीवर एके 47 चे ओझे आहे.

परिक्रमा मार्गावर खूप माणसे आहेत. साऱ्यांच्या कमरांना कट्यारी अन्‌ पिस्तुले आहेत. काहींच्या हाती बंदुका, काहींजवळ कार्बाइन्स. छातीवर अन्‌ कमरेभोवती गोळ्यांचे पट्टे. नखशिखान्त निळा पोशाख केलेल्या अन्‌ अंतराळात दृष्टी लावलेल्या खूप उंच अन्‌ धिप्पाड निहंगांनी हातातली शस्त्रे खेळण्यासारखी धरली आहेत. परिक्रमेच्या डाव्या बाजूला असलेल्या लंगर हॉलच्या एका कोपऱ्याशी असलेल्या एका खोलीत काल अमरिकसिंगाची भेट झाली होती. त्या खोलीत बंदुका अन्‌ कार्बाइन्सचा एक ढीगच तेव्हा मी पाहिला होता. मुलाखत सुरू असतानाही अमरिक शेजारचा पडदा बाजूला करून भिंतीतल्या आलमारीतून पिस्तुलं काढत होता. ‘आम्ही या देशात का राहायचं? शीख माणूस हिंदी सिनेमात हिरो म्हणूनही तुम्हाला चालत नाही’ असे तो म्हणाला होता. स्वत: अमरिक खूप देखणा आहे.

‘तुझ्याएवढ्या देखण्या तरुणाला हीरो होणं अवघड नाही’ मी म्हणालो होतो. ‘पण मग तुम्ही मला माझी दाढी काढायला सांगाल. मला शीख राहू देणार नाही...’

यावर खूप बोलण्याजोगे होते. पण मी त्याच्याशी वाद घालायला आलो नव्हतो. त्याच्या उत्तराने बेचैन होऊन परतलो होतो.

भिन्द्रानवाल्याच्या कँपातली माणसे असलेच काही तरी बोलत होती आणि आता मी त्याच्याच दर्शनाला जात होतो... लंगर हॉलच्या पहिल्या मजल्यावर खूप माणसे जमली आहेत. ती गटागटाने पण हळू आवाजात बोलताहेत. बहुतेकांच्या कमरांना शस्त्रे लटकली आहेत. काहींनी ती हातात धरली आहेत.. माझ्या अंगातले खादीचे कपडे पाहून दारावरचा सशस्त्र पहारेदार मला थांबवतो. सोबतचा सूचना अधिकारी पुढे होऊन त्याचेशी पंजाबीतून काहीतरी बोलतो. मला बाजूला थांबायला सांगितले जाते. मग दोन माणसं पुढे येतात. खांद्यावरची शबनम उतरवून ठेवायला सांगतात. खिसे, कपडे चाचपडून पाहतात. मग एकजण डोळ्यात रोखून म्हणतो, ‘तुम्हारे पास और तो कुछ नहीं?’

‘देख लिजिए’ मी. ‘जाइए.’ माणसांच्या गर्दीतून वाट काढत त्या सूचना अधिकाऱ्यासोबत मी पुढे सरकतो. खूप दिवसात कुणी शिखेतर इकडे फिरकला नसल्याचे मला आतापर्यंत अनेकांनी सांगितले आहे.

मला पाहणाऱ्या अनेकांच्या नजरांत विस्मय आहे, काही डोळ्यांत संशय आहे. पहिल्या मजल्यावरच्या बांधकामाला वळसा घालून आम्ही मागल्या बाजूला जातो. तिथे कडेला सावली आहे. तीत दोनेकशे माणसे खालच्या मानेने बसली आहेत. साऱ्यांच्या मध्यभागी बसलेले संत भिन्द्रानवाले त्यांचेशी हळू आवाजात बोलताहेत. आम्ही पुढे होतो. सूचना अधिकारी संतजींच्या पायांना हात लावतो. मी पुढे होऊन वाकून नमस्कार करतो. संत माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघतात. सूचना अधिकारी काही बोलायच्या आत मी म्हणतो, ‘पत्रकार हूँ. महाराष्ट्र से आया हूँ.’ संतांचे पंजाबीत उत्तर येते, ‘मला रोज ही हजारो माणसे भेटायला येतात. मला वर्तानपत्रांची गरज नाही.’ त्यांचा आवाज खोलवरून आल्यासारखा. सारखे बोलून बोलून बसल्यासारखा. त्यात जबर आत्मविश्वास आहे. उर्मटपणा नाही.

 ‘मी महाराष्ट्रातून आलो आहे. तिथल्या शिखांसाठी तुम्हाला काही सांगायचं नाही?’ मी.

‘ठीक आहे. उद्या याच वेळी ये.’ संत प्रसन्न झाले आहेत. ‘पण हां, मी असा लोकात बसतो. तुला वेगळा वेळ देणे मला जमणार नाही,’ ते बजावतात.

‘मला चालेल’ मी पुन्हा वाकून नमस्कार करतो, परतताना सोबतचा अधिकारी माझे अभिनंदन करतो. म्हणतो, ‘तु बहुत लकी हो साब. संतजी ऐसे मुलाकात देनेवालों में से नहीं.’...

दि.24 मार्च 1984 :

एवढ्या साऱ्या पार्श्वभूमीवर आता आज पुन्हा एकवार लंगरच्या पायऱ्यांशी माझी तपासणी होते. सोबत कालचा तरुण अधिकारी आहे. आम्ही पायऱ्या चढून वर जातो. तिथली करड्या चेहऱ्याची माणसे पुन्हा आम्हांला अडवतात. पुन्हा एकवार तपासणी. खांद्यावरची शबनम तिथेच ठेवायला सांगण्यात येते.

‘फक्त पेन अन्‌ पॅड सोबत घ्या’ ते म्हणतात. मग काही तरी सुचून त्यांतला एकजण माझे पेन तपासून त्यात काही स्फोटके वगैरे दडवली नाहीत याची खात्री करून घेतो.

 तेवढ्यात निरोप. दुसऱ्या मजल्यावर संतजी युवकांच्या एका गटाशी बोलताहेत. मग पुन्हा खोळंबा. पहिल्या मजल्यावर कालच्यासारखीच खूप माणसे आहेत. सारी शीख. सगळी सशस्त्र आहेत, सर्वत्र दिसणारे निळे निहंगही येथे आहेत. मी एकटाच बिनदाढीचा. भिन्द्रानवाल्याच्या  भाषेतला ‘डिस्‌फिगरड्‌ शीख.’ सारे रोखून पाहतात. तेवढ्यात लग्नाला निघाल्यासारखा उंची पोशाख केलेले एक ठेंगणे गृहस्थ तेथे येतात. मोतिया रंगाची अचकन, तसाच साफा, पांढरी सुरवार, गौर वर्ण अन्‌ ठेंगणा मध्यम बांधा. सगळे बघू लागतात.

‘हे आहेत, सरदार बलबीरसिंग भरपूर. अकाली दलाच्या मुखपत्राचे संपादक’ सोबतचा सूचना अधिकारी सांगतो. या गृहस्थांविषयी मी वाचले आहे. भिन्द्रानवाले अन्‌ मुख्यमंत्री दरबारासिंग यांचेतला हा दुवा असल्याचे पंजाबात बोलले जात होते. मी परिचय करून घेत नाही. जरा वेळाने मला पुढे चलण्याची सूचना मिळते. आम्ही जिना चढू लागतो. या अंधाऱ्या जिन्यावरही खूप सशस्त्र माणसे आहेत. त्या गर्दीतून वाट काढत आम्ही वर जातो. बलबीरसिंग भरपूरही आमच्या मागून येत आहेत. जिन्याचे वरचे दार बंद आहे. दाराशी स्टेनगन्‌, कार्बाइन्स घेतलेले पहारे आहेत. इथे पुन्हा एकदा माझी तपासणी होते अन्‌ खोळंबाही. जरा वेळाने दार उघडते. इथे भरपूर पुढे होतात. आम्हीही जातो. तिथे उघड्या जागेत फरशीवर पन्नासेक शीख तरुण बसले आहेत अन्‌ जिन्याच्या दाराशी भिंतीलगत उभे राहून संत जर्नेलसिंग भिन्द्रानवाले त्यांचेशी बोलताहेत. येणारा प्रत्येकजण त्यांना वाकून नमस्कार करतो. मीही नमस्कारासाठी वाकतो.

माझ्या पाठीवर थाप पडते : ‘आ गये?’ मग ‘बैठो, यही बैठो.’ मी पुढल्याच रांगेत बसतो. ‘....रेडिओ-टेलीव्हिजन नको. शस्त्रे खरेदी करा. वाटेल तिथून मिळवा, लायसन्सची पर्वा नको. आपले गुरू दिल्लीवाल्यांशी लढले. त्यांनी दिल्लीवाल्यांना परवाने मागितले नव्हते... अंतिम लढाई निकराची असणार. त्यासाठी त्यागाला तयार राहिलं पाहिजे’.... संतजींचे व्याख्यान सुरू आहे. ‘गुरूचे राज्य आले पाहिजे. राज करेगा खालसा ही फुकाची घोषणा नाही. शीख हा जगातला सर्वांत सामर्थ्यशाली धर्मसमाज आहे. त्याची निष्ठा मोठी आणि निर्धार कठोर आहे. साऱ्या जगात जाऊन आपले धर्मप्रेम शिखांनी जाहीरपणे मिरविले आहे. शीख जग सोडेल पण धर्मचिन्ह सोडणार नाही... ‘अल्पसंख्य म्हणून या देशात राहायचे की आपल्या भूमीवर आपल्या धर्माचा झेंडा लावायचा याचा विचार आता झाला पाहिजे. तो तरुणांनी केला पाहिजे.

महाराजा रणजितसिंगांनी पहिल्या खलिस्तानची स्थापना केली तेव्हा लाहोर ही त्याची राजधानी होती. नवे राज्य या पवित्र भूमीत उभे राहिले पाहिजे. अमृतसरची धर्मभूमी त्याची राजधानी झाली पाहिजे... या देशात आम्ही आमचे राज्य कधी आणू शकणार नाही. आपण येथे कायम दुय्यम नागरिक म्हणून राहणार आहोत. या बेड्या तोडल्या पाहिजेत... आझादी मागून मिळत नाही. तिच्यासाठी लढावे लागते. लढायचे तर शस्त्रे हवीत. ती चालवायला लागणारे प्रशिक्षण हवे. जेवढी जंग मोठी तेवढी शहादत मोठी. शहीद व्हायला तयार व्हा. पण शहादत विजयासाठी करायची आहे हे विसरू नका.. गुरूंनी बलिदान केले म्हणून आपण आज ताठपणे उभे आहोत. बादशाहत संपली, गुरूचा दरबार अजून भरला आहे.’ ते बोलत असतात.

सहा फुटावर उंची. दणकट रांगडी देहयष्टी. काळाभोर तपकिरी वर्ण. तांबूस लाल डोळे अन्‌ खोलवर पाहणारी भेदक नजर. छातीवर आलेली काळीभोर लांब दाढी. हसत बोलण्याची लकब. त्यातही एखादा तिरका विनोद केला की इतरांच्या हंसण्याचा अंदाज घेत वर पाहत हंसण्याची सवय. डोक्याला मोठे निळे पागोटे. अंगात पांढरा शुभ्र टेरीकॉटचा पोटरीपर्यंत येणारा अंगरखा. त्याखाली दिसणारे मजबूत राकट पाय. अनवाणी पावलांची बोटे लांब आहेत अन्‌ बोलताना ती हलवायची त्यांना सवय आहे. संत नखशिखान्त सशस्त्र आहेत. पाठीला स्टेनगन अन्‌ कमरेला नवे कोरे पिस्तुल आहे. पिस्तुलाच्या कातडी कव्हरमधून त्याचे चकाकणारे नोझल बाहेर आले आहे. पिस्तुलाजवळच कट्यारीच्या कातडी म्यानाचे पितळी टोक लखलखते आहे. कमरेभोवती पिस्तुलाच्या गोळ्यांचे पट्टे आहेत. हातात कमरेएवढ्या उंचीचा एक लाकडी सोटा आहे. तो जमिनीवर रोवून अन्‌ त्यावर भार टाकून ते बोलताहेत. एकेक मुद्दा झाला की जरा थांबून ते श्रोत्यांची प्रतिक्रिया आजमावताहेत. त्यांच्या मागे उभे असलेले त्यांचे सशस्त्र अंगरक्षक साऱ्या प्रकाराकडे निर्विकारपणे पाहताहेत. संतजींकडे त्यांची नजर वळते तेव्हा मात्र तीत भक्तिभाव आलेला दिसतो. मध्येच संतजी पुढल्या एकाला काठीनं ढोसतात, मान वर करायला सांगतात. त्यांच्या उजव्या हाताला भिंतीला रेलून अमरिकसिंग पेंगतो आहे. संत त्यालाही काठीनं जागवतात. ‘लढाईच्या काळात पेंगायचे नसते’ म्हणतात. समोरची माणसे हसतात. अमरिकही त्यात सामील होतो. वीसेक मिनिटे हा प्रकार चालतो. अखेर संतजी माझ्याकडे वळून म्हणतात, ‘हा एक दिल्लीचा खादीवाला आला आहे. उससे जरा निपटना है.’ मघापासून माझ्याकडे संशयाने पाहणाऱ्या त्या नजरांत मिस्किलपणा येतो. काहीजण हसतात.

 ‘आओ’ संतजी मला खुणावतात.

समोरची मुले शिस्तीत पायऱ्या उतरतात. आता भेटीला आलेले भरपूर, त्यांच्या सोबतची दहापंधरा माणसे अन्‌ संतांचे अंगरक्षकच तेवढे उरतात. संतजी जमिनीवरच भिंतीशी टेकून बसतात. त्यांचे अंगरक्षक लगेच मागे ओळीने आपापल्या जागा घेतात. मी पुढली जागा घेतो. भरपूरजी बाजूला. ते विचारतात, ‘पंजाबी येतं का?’ ‘नाही’ मी. मग ते आपणहून स्वत:कडे दुभाषाचे काम घेतात. मांडी घातलेले अन्‌ दोन्ही हातांचे तळवे गुडघ्यांवर दाबून धरलेले संत जर्नेलसिंग भिन्द्रानवाले समोर झुकतात अन्‌ माझ्यावर नजर रोखून म्हणतात, ‘हां, आता विचार’. ‘आताचं तुचं भाषण मी ऐकलं. संतजी, एकच महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. पंजाबातला हिंसाचार रोखण्याची ताकद असणारे तुम्हीच एकमेव नेते आहात...

’ माझं वाक्य अर्ध्यावर तोडत संतजी म्हणतात, ‘तो...?’ त्यांची सावध नजर आपल्यावर रोखली गेली असल्याचे मला जाणवते.

‘मग या संदर्भात तुम्ही काही करीत का नाही?’ ‘तुला काय म्हणायचं आहे? हा हिंसाचार, ह्या कत्तली मी घडवून आणतो असं...?’

 ‘छे, छे! मी असं म्हणत नाही’ मी घाईघाईने उत्तरतो.

‘तुला तेच म्हणायचं आहे. मी हिंसाचार रोखू शकतो याचा अर्थ मीच तो करतो असा होतो...

’ संतांच्या आवाजात धार आहे, ‘कायदा आणि सुव्यवस्था हे संतांचं काम नाही. ते सरकारचं काम आहे’ ते तिरकस संतापाने पुढे म्हणतात. एवढ्या मुश्किलीने मिळालेली मुलाखत हातची गेली म्हणून मी अस्वस्थ होतो अन्‌ ते पुढं काही बोलायच्या आत म्हणतो, ‘रोखणं सोडा पण तुम्ही तर लोकांना शस्त्र घ्यायलाच सांगत होता.’ ‘मग? दिल्लीवाल्यांना हीच, शस्त्राचीच भाषा समजते. आमच्या गुरूंनी दिल्लीवाल्यांना याच भाषेत समजावलं. मीही तेच करतो. फरक एवढाच, तेव्हा दिल्लीत मुसलमानांचं राज्य होतं. आज हिंदूंचं आहे.’ ‘पण संतजी, लोकशाही हाही लोकांचे प्रश्न सोडविण्याचा एक मार्ग आहे’ मी. इथे माझी उलट तपासणी सुरू होते.

‘लोकशाही म्हणजे बहुमतवाल्यांचंच राज्य ना?’ संत ‘नाही.

ते कायद्याचं राज्य आहे’ मी. मला पुढल्या सरबत्तीची पूर्ण कल्पना आली आहे. ‘अरे, कानूनसुद्धा बहुमतानंच होतात ना?’ ‘हं.’

‘मग हिंदुस्थानात बहुमत कुणाचं आहे?’ ‘जनतेनं निवडलेल्या काँग्रेस पक्षाचं.’ मी.

‘ती माणसं कोणत्या धर्माची?’ ‘काँग्रेस पक्ष स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवतो’ ‘पण त्यात कोणत्या धर्माची माणसं अधिक आहेत?’ संतजी.

‘सेक्युलर व्यवस्थेत ही मोजणी कशी करायची?’ मी.

संतजींना माझ्या तोंडून ‘भारतात हिंदू बहुसंख्यकांचं राज्य आहे’ हे वदवून घ्यायचे आहे अन्‌ मी सेक्युलॅरिझमचा पडका किल्ला लढवतो आहे. मग तेच म्हणतात, ‘यह तु हिंदुओं का राज है. और तु भी आझाद नहीं. तु उस ब्राह्मणी के (इंदिराजींचे) गुलाम हो... इथं एक गुलाम दुसऱ्याला गुलाम करायला निघाला आहे. मला ही व्यवस्था मंजूर नाही.’

‘तुम्ही खलिस्तानची मागणी करणाऱ्यांतले नाही ना?’ मी.

‘आम्ही ती मागणी अजून केली नाही. पण आम्ही तो विचार जरूर करीत आहोत.’ इथे मी बळ आणतो. विचारतो, ‘संतजी जोवर देशाचं लष्कर शाबूत आहे अन्‌ ते देशाशी एकनिष्ठ आहे तोवर खलिस्तान कसा होईल? दहा, बारा लाखांच्या फौजेशी तुच्याजवळची शे-पाचशे माणसं कुठवर लढतील?’ ‘आमचा एक आदमी तुमच्या शंभरांना भारी आहे. बादशहाचं  लष्करही मोठं होतं. गुरूचे सहकारी थोडे होते...’ इथे जुन्या धार्मिक लढायांवर ते बोलू लागतात. इंदिरा गांधींना ते ‘ब्राह्मणी’ म्हणतात अन्‌ तेव्हा हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदावर असलेल्या भजनलालांना छल्लीराम. ‘ती ब्राह्मणी हरियाणाला तो छल्लीराम मागेल ते देते. आमच्या मागण्यांना मात्र वाटाण्याच्या अक्षता. शिखांपेक्षा त्या छल्लीरामनं या देशासाठी जास्तीचं काही केलं का?....’ त्याच सुरात पुढे ते अकाल्यांच्या मवाळ नेत्यांवरही तोंडसुख घेतात.

‘तुम्ही लोंगोवालांची आज्ञा पाळण्याची आणि त्यांच्या नेतृत्वात शांततेने आंदोलन करण्याची शपथ अलीकडेच जाहीरपणे घेतली ना?’ मी विचारतो. मला संत लोंगोवालांनी त्यांच्या मुलाखतीत तसे सांगितले असते.

‘मी अशी कोणतीही शपथ घेतली नाही. मी पंथाला बांधलो आहे. व्यक्तीला नाही. और लोंगोवाल?... वह तो घांसफूस का आदमी है. त्यानं पंथासाठी आजवर काय केलं?’ मधूनच भिन्द्रानवाले धर्माकडे वळतात. म्हणतात, ‘शीख हा जगातला सर्वांत जुना धर्म आहे.’ ‘पण संतजी, इतिहास तसं सांगत नाही’ मी.

‘मी इतिहासाचं बोलत नाही. सच्चाईचं सांगतो.’ संतांच्या उत्तराने मी अवाक्‌ होतो. ते पुढे म्हणतात, ‘आम्ही दाढी राखणारे निसर्गाच्या अन्‌ परमेश्वराच्या जवळचे म्हणून जुने आहोत.’ हे तर्कट पुढे चालवले तर इस्लाम अधिक जुना होतो हे मी मनात येऊनही विचारीत नाही. संतजींनी चिडून मुलाखत मध्येच थांबविल्याचे आणि पत्रकारांना घालवून दिल्याचे मी ऐकले आहे अन्‌ माझे बरेच विचारायचे, ऐकायचे राहून गेले आहे. संत मोकळे हसतात. हसताना त्यांच्या डोळ्यांत मिश्किल छटा येते. दातांच्या मजबूत ओळी त्यातून दिसतात.

‘तुम्ही अतिशय प्रक्षोभक भाषेत बोलता असं तुम्हाला वाटत नाही?’ मी.

‘तू माझं खरं प्रक्षोभक भाषण ऐकलंच नाहीस. दहा नंबरची एक टेप पंजाबात विकली जाते, ती मिळव अन्‌ ऐक.’ मग जरा थांबून म्हणतात, ‘थांब मीच तुला ती देतो’ अन्‌ लगेच एक कार्यकर्ता पुढे होतो. ‘या प्रक्षोभक भाषेचा परिणाम पंजाब बाहेरच्या शिखांवर होईल असं तुम्हाला वाटत नाही?’ मी.

आतापर्यंतचा संतांचा आवाज संथ आहे. पण इथे तो कमालीचा खुनशी होतो. ‘धमकी दे रहे हो क्या?’ अतिशय हळू आवाजात ते विचारतात.

‘नहीं नहीं....’ मी गडबडतो, ‘मी फक्त एका दुष्परिणामाचंच तेवढं सांगतो.’ ‘मग सुन, या घडीला एखादा शीख जर बाहेर मारला गेला तर तुला इथंच छाटून टाकू गाजरासारखं...’ या ठिकाणी ते माझ्या मांडीवर एक जोरदार थाप मारतात. त्या हाताला वजन आहे.

‘पण त्यानं प्रश्न कसा सुटणार?’ मी आवंढा गिळून पुन्हा विचारतो. ‘आमचा माणूस लढेल. अन्‌ लढला नाही तर त्याला मी शीख समजणार नाही, अन्‌ मला शिखांचीच तेवढी काळजी करायची आहे... तुझे प्रश्न संपले असतील तर आमच्यासोबत जेवणार का?’ संतजींच्या या अखेरच्या वाक्याने मी गडबडतो, सुखावतोही.

‘नाही’ मी. ‘भिऊ नकोस. आम्ही तुला जहर देणार नाही.’ मुलाखतीच्या आरंभी संतांनी माझ्याशी हस्तांदोलन करायला नकार दिला आहे. गैरशिखांशी आपण हस्तांदोलन करीत नसल्याचे म्हटले आहे.

आवाजात शक्य तेवढी नम्रता आणून मी म्हणतो, ‘संतजी, मी राजकारणी माणूस नाही. जो नेता हस्तांदोलनालाही नकार देतो त्याच्यासोबत केवळ जेवून काय साधायचं?’ माझ्या खांद्यावर थोपटल्यासारखं करीत संत हसून म्हणतात, ‘बुरा मान गये.’ मग दूध मागवले जाते. मी एक खाजगी प्रश्न काढतो, ‘तुम्ही संत असून गळ्यापर्यंत एवढे राजकारणात कसे?’ ‘शीख पंथ धर्म आणि राजकारणात फरक करीत नाही. अकाल तख्ताचे दोन ध्वज आहेत. एक धर्माचा, दुसरा राजकारणाचा. सेक्युलॅरिझम हे तुम्हा हिंदूंचं फॅड आहे. ते आम्हांला मान्य नाही.’ मुलाखत संपत आली आहे. आता संतजी बोलतात तेव्हा त्यांच्या आवाजात एक खाजगीपण आहे.

‘पंजाबात पुन्हा कधी येणार? जर आलास तर चौक मेहताला ये...’

‘चौक मेहता मे संतजीकी माँ रहती है.’ शेजारी बसलेला अमरिकसिंग हळू आवाजात सांगतो.

‘हाँ, और वो बहुत अच्छी रसोई बनाती है’ संतजी त्याचे ऐकलेले वाक्य पूर्ण करतात.

आतापर्यंतच्या खोमेनीच्या शीख अवताराची जागा एका सामान्य शीख गृहस्थानं घेतल्याचं लक्षात येतं. एवढ्या हिंस्र गदारोळात भिन्द्रानवाल्याला त्याची आई आठवते ही बाब मला विलक्षण वाटते. सैतानासारख्या उग्र दिसणाऱ्या या थोराड अंगाच्या माणसात एक झरा अजून वाहता आहे हे मनात येते. आताचा माझ्या पुढ्यातला भिन्द्रानवाले हा अतिरेकी नसतो. त्याच्या शस्त्रांची वाद्ये झालेली असतात. आईच्या हाताला असलेल्या चवीची आठवण मनात ठेवणारा तो सामान्य मुलगा झालेला असतो...पुढे खूप दिवस मनात येत राहिले, भिंन्द्रानवाल्याचा हा हळवा क्षण पकडायला अन्‌ खुलवायला देशात एखादा गांधी असता तर.. तर कदाचित पंजाबच्या इतिहासाने घेतलेले ते दुर्दैवी वळण त्याच्या वाट्याला आले नसते.

संत जर्नेलसिंग भिन्द्रानवाले विवाहित आहेत अन्‌ त्यांना चार मुले आहेत हे मी वाचलं आहे. सुवर्ण मंदिरात त्यांच्या एका मुलाशी माझ्या वाटाड्यानं माझी ओळखही करून दिली आहे.

‘पण संतजी, तुम्ही तर दरबारसाहेबाबाहेर (सुवर्णंदिर) जात नाही?’ मी.

‘अरे हा आजचा माहौल कधी तरी तरी बदलेल...’ ‘तुम्हाला एवढी माणसं रोज भेटतात. माझ्यासारख्याची ओळख तुम्ही कुठवर ठेवणार?’  ‘खूप येतात. पण एवढ्या काळात खादीवाला कुणी इकडे फिरकला नाही.’ मग एका कार्यकर्त्याकडे वळून विचारतात, ‘क्यों भई, हा असा खादीवाला खूप दिवसांनी आला नं?’ ‘येईन. मुद्दामहून तुम्हाला भेटायला येईन,’ मी म्हणतो अन्‌ नमस्कार करून भिन्द्रानवाल्याचा निरोप घेतो... त्यांचे बोलावणे अन्‌ आपले ‘हो’ म्हणणे केवढे निरर्थक आहे याची कल्पना पायऱ्या उतरतानाच माझ्या मनात उतरू लागते. अमरिकसिंगाच्या खोलीतली शस्त्रास्त्रे, नानक निवासावरचे लष्करी प्रशिक्षण, अकाल तख्ताभोवतीचे निहंगांचे सशस्त्र पहारे, अन्‌ संत लोंगोवालांसारख्या मवाळ पुढाऱ्याच्या कार्यालयावर पहारा करणारे त्यांचे खाजगी लष्कर हे सारे पुरेसे बोलके आहे. ‘प्रत्येक शीख सिंहासारखा लढेल’ हे शाबेगसिंगानं अमरिकच्या खोलीत मला ऐकवले आहे... ... या भेटीला 75 दिवस लोटले...

दि. 6 जून 1984 :

रेडिओवर सकाळच्या बातम्या ऐकत असतो. सुवर्ण मंदिरात लष्कराने प्रवेश केल्याचे अन्‌ त्यात अडकलेल्या मवाळ नेत्यांना पकडून सुरक्षित जागी नेल्याचे वृत्त कालपासून ऐकवले जात आहे. भिन्द्रानवाल्याबाबतचे रेडिओचे आतापर्यंतचे मौन बोलके वाटू लागले आहे. अन्‌ एकाएकी बातमीत भिन्द्रानवाल्याचा मृतदेह सापडल्याचे व त्याची ओळख पटल्याचे जाहीर होते. भिन्द्रानवाल्याच्या क्रौर्याच्या कथाही नंतर सांगितल्या जातात, ‘तुला इथंच छाटून टाकू गाजरासारखं...’ त्याची धमकी अजून कानात घुमते. मनातले त्याने दिलेले पुढच्या भेटीचे आमंत्रण अजून मिटत नाही.... त्या राकट अवताराच्या आतला राक्षस निवलेला असतो. संतही संपलेला असतो. संत त्याच्यात होता का? असेलही कदाचित! पण तोही आता संपला आहे. फक्त माणूसच तेवढा आठवणीत राहिला आहे. ही माणसे संत तरी का होतात? माणूसच का राहत नाहीत?

एप्रिल 2007

पुन्हा एकवार सुवर्ण मंदिरात आलो आहे. दरम्यान इंदिरा गांधींचा खून झाला आहे. त्यातून उसळलेल्या शीखविरोधी दंगली शमल्या आहेत. अमृतसर शांत अन्‌ सुवर्णमंदिर प्रसन्न आहे... पुन्हा एकवार परिक्रमा मार्गावरून हरिमंदिराला मी प्रदक्षिणा घालतो. डाव्या बाजूच्या लंगर साहेबाकडे नजर जाते. अन्‌ क्षणभर पाऊल थांबते. त्या इमारतीच्या पायथ्याशी राहणारा अमरिक डोळ्यांपुढे येतो. शाबेगचा चेहराही क्षणभर तरळल्यासारखा होतो. वर नजर जाते तेव्हा भिन्द्रानवाल्याची माणसे पूर्वीसारखीच डोळ्यांसमोर येतात... आणखी पुढे जातो तेव्हा रामदास सरायमध्ये आपला जीव बचावून बसलेले संत लोंगोवाल अजून तेथे असतील असे मनात येते... ... पण आता सर्वत्र मशीनगनच्या युद्धाच्या खुणा आहेत. अकाल तख्ताची घाईगर्दीने दुरुस्त केलेली पडझड तिचा जुना दिमाख तशातही दाखवीत आहे आणि हरिमंदिराच्या अंगावर बंदुकांच्या गोळ्यांचे व्रण आहेत... मग भिन्द्रानवाले हरवतात. अमरिक, शाबेग अदृश्य आणि लोंगोवालही दिसेनासे होतात. दिसतात त्या फक्त युद्धाच्या खुणा. ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या जखमांचे अवशेष... प्रलंयकारी माणसे फक्त ईश्वरालाच घडविता येतात असे नाही. धर्माचे राजकारणही त्यांना जन्म देतच असते.

Tags: तारांगण पत्रकार हरमंदिर काँग्रेस शीख ग्यानी झेलसिंग इंदिरा गांधी सुवर्णमंदिर ऑपरेशन ब्ल्यू स्टार भिन्द्रानवालेय journalist सुरेश द्वादशीवार taranjgan harmandir congress gyani zelsing shikh gold temple operation blue star bhindarnwale suresh dwadashkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात