डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

एकट्या व एकाकी जगाविषयी आस्था की तिरस्कार?

लिंकनने गुलामांना मुक्त केल्यानंतर त्यांच्या प्रमुख नेत्यांची एक परिषद आपल्या अध्यक्षीय प्रासादात बोलविली. तीत त्या साऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, ‘तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना फसवून व विकत घेऊन येथे आणले गेले आहे. त्या घटनेचा मला व माझ्यासारख्या अनेकांना पश्चात्ताप आहे. तुमच्यापैकी ज्या कोणाला वा सर्वांना पुनःश्च आपल्या मायदेशी परत जावे असे वाटत असेल, तर तशी व्यवस्था माझे सरकार आपल्या खर्चाने करील.’ लिंकनला उत्तर देताना ते नेते म्हणाले, ‘आमच्या कित्येक पिढ्या येथे राहिल्या, राबल्या आणि मेल्या. त्यांचा घाम व रक्त या भूमीत मिसळले आहे. आता अमेरिका हीच आमची जन्मभूमी व पितृभूमी आहे. आम्हा साऱ्यांना हाच आपला देश वाटू लागला आहे. सबब, आम्ही येथेच राहू.’ लिंकन व त्यांच्या सहकाऱ्यांनी मग त्यांचे स्वागत केले व त्यांच्या कायम पुनर्वसनाच्या योजना आखल्या.

मूल जन्माला येते तेच मुळी एकाकीपण घेऊन. त्याचे तेव्हाचे अबोल अन्‌ हसरे बालपण मातृत्व जागविते. पितृत्वालाही साद घालते. जोवर त्याचे माता-पित्यावरचे अवलंबन संपत नाही, तोवर तेही त्यांच्या जीवनाचा भाग होते. जसजसे ते वाढू लागते व त्याला त्याचे आत्मभान येऊ लागते, तसतसे ते या साऱ्यापासून नकळत दूर होऊ लागते. शिक्षण, वाढ आणि स्वयंपूर्णता लाभेपर्यंतचा त्याचा कुटुंबावलंबी स्वभाव पुढे लोप पावतो. प्रगत, शिक्षित व स्वतंत्र वृत्तीत जगणाऱ्या कुटुंबातील मुलात हे लवकर येते. समूहावलंबी व काहीशा मागासलेल्या कुटुंबात ते उशिरा येते, एवढेच. आपण काही खऱ्या गोष्टी स्पष्टपणे बोलायचे टाळतो, कारण त्यात आपल्या परंपरा आडव्या येतात; पण ते खरेपण वडिलधाऱ्या जाणकारांच्या लक्षात यायला फार वेळ जावा लागत नाही.

हे सांगत असताना वात्सल्य, मातृप्रेम, कुटुंबातील इतरांविषयीची आस्था नाकारायची नाही; त्याच वेळी लहानपणाचे सवंगडी, त्यांचे मैत्र हेही सोबत असते- झालेच तर जात, धर्म व देश यांच्याविषयीचे प्रेमही असतेच. हे सारे उपजत असते की सहवासाने येते, हा प्रश्न असतो. एखाद्या सवर्ण कुटुंबात जन्माला आलेले मूल आदिवासी वा दलित कुुटुंबात वाढविले किंवा एखादे भारतीय मूल पाकिस्तान वा बांगलादेशात वाढविले, तर ते कोणाचे व कोठले संस्कार घेऊन मोठे होईल? जन्माचे की सहवासाचे? या प्रश्नाच्या उत्तरात सारे जन्मदत्त व समाजदत्त विषय लक्षात येणारे आहेत. रक्तसंबंध महत्त्वाचे असतात, ते व्यक्तीला त्याचे समाजातील स्थान व त्यातली कमी-अधिक प्रतिष्ठा मिळवून देतात. मात्र रक्तसंबंधाने दिलेल्या या स्थानाचे व प्रतिष्ठेचे मोल आजच्या बदलत्या जगात पुरते ओसरले आहे. समर्थ रामदास म्हणाले, ‘ब्राह्मण कितीही भ्रष्ट झाला तरी तो साऱ्यांना पूज्यच असतो.’ रामदासांचे हे वचन आता ब्राह्मणांनाही मान्य होणारे नाही. बाकीचा समाज तर तो कुचेष्टेचा प्रकार म्हणूनच स्वीकारत असतो. माणसे कुठेही जन्माला येवोत- ती अनुभव, ज्ञान, कलासंपन्नता आणि नेतृत्वगुण या बळावर मोठी होतात. गांधी या महात्म्याची जात कोणती याची कोणी चौकशी केली नाही आणि टिळकांच्या जातीचा बहुजन समाजाने विचारही केला नाही. मौलाना आझाद हे मुसलमानांचे कमी आणि हिंदूंचेच नेते अधिक होते. तिकडे स्वतःला प्रोटेस्टंट म्हणविणाऱ्या अमेरिकेत केनेडी आणि क्लिंटन हे दोन रोमन कॅथॉलिक अध्यक्षपदी निवडून आले. झालेच तर स्वतःला कॉकेशियन वंशाचे गौरवर्णी म्हणवून घेणाऱ्या त्या देशाने बराक ओबामा या कृष्णवर्णीय नेत्यालाही अध्यक्षपदी निवडले. सोनिया गांधी जन्माने इटालियन असल्या, तरी त्या भारताच्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक आहेत. ही उदाहरणे जन्माहून कर्तृत्व आणि रक्तसंबंधांहून गुणकार्य मोठे ठरत असल्याचे सांगणारी आहे. भारतीय संगीताचे बहुतेक सारे मानकरी मुसलमान धर्माचे होते. या देशाला ताजमहाल-सारख्या ज्या वास्तूंचा अभिमान आहे, त्या वास्तूचे निर्मातेही हिंदू नव्हते, मुसलमान होते. याहून स्पष्ट सांगायचे तर- प्रत्यक्ष दशरथाची मुले, सीता, पांडव, कौरव आणि द्रौपदी या साऱ्यांचेच जन्म आज संशयास्पद वाटावेत असे आहेत. जाती-वर्णाचा विचार केला तर रावण ब्राह्मण, राम क्षत्रिय आणि कृष्ण शूद्र होता. मात्र ही दैवते साऱ्यांच्याच पूजेचा व श्रद्धेचा वंदनीय भाग बनली. संस्कार, ही माणूस व समाज घडविणारी सर्वांत मोठी व्यवस्था आहे हे सांगणारे हे वास्तव आहे, त्यात आजही बदल नाही. झालेच तर हे वास्तव यापुढल्या काळात अधिक प्रखर व जगन्मान्य होत जाणार आहे.

यासंबंधीची सर्वांत मोठी व साऱ्यांचे डोळे उघडणारी गोष्ट अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या गुलामगिरीची आहे. अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत गुलामगिरी रद्द करण्याचे कायदे करून ते अमलात आणले. परिणामी, सारे गुलाम मुक्त झाले. त्या देशातील अनेक राज्यांनी तो कायदा अमलात आणण्याची नंतरही फार काळ खळखळ केली, पण लिंकनपुढे कोणाचे फारसे चालले नाही. कृष्णवर्णीयांना संरक्षण देण्याची ही जबाबदारी थेट जॉन एफ.केनेडींपर्यंतच्या अध्यक्षांना वाहून न्यावी लागली.

लिंकनने गुलामांना मुक्त केल्यानंतर त्यांच्या प्रमुख नेत्यांची एक परिषद आपल्या अध्यक्षीय प्रासादात बोलविली. तीत त्या साऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, ‘तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना फसवून व विकत घेऊन येथे आणले गेले आहे. त्या घटनेचा मला व माझ्यासारख्या अनेकांना पश्चात्ताप आहे. तुमच्यापैकी ज्या कोणाला वा सर्वांना पुनःश्च आपल्या मायदेशी परत जावे असे वाटत असेल, तर तशी व्यवस्था माझे सरकार आपल्या खर्चाने करील.’ लिंकनला उत्तर देताना ते नेते म्हणाले, ‘आमच्या कित्येक पिढ्या येथे राहिल्या, राबल्या आणि मेल्या. त्यांचा घाम व रक्त या भूमीत मिसळले आहे. आता अमेरिका हीच आमची जन्मभूमी व पितृभूमी आहे. आम्हा साऱ्यांना हाच आपला देश वाटू लागला आहे. सबब, आम्ही येथेच राहू.’ लिंकन व त्यांच्या सहकाऱ्यांनी मग त्यांचे स्वागत केले व त्यांच्या कायम पुनर्वसनाच्या योजना आखल्या. (या ठिकाणी लिंकन व ट्रम्प यांच्यातील फरक लक्षात येणारा आहे. त्याच वेळी आसामात पिढ्यान्‌पिढ्या राहिलेल्या, फाळणीपूर्वी आसामात येऊन स्थायिक झालेल्या व आसामातील चहा-मळ्यात काम मिळविण्याच्या आशेने केवढ्या तरी काळापासून तेथे राहत असलेल्या बंगाली लोकांची व त्यांच्याविषयीच्या आपल्या सरकारची भूमिकाही या ठिकाणी लक्षात घ्यावी अशी आहे.)

जुन्या पिढ्या साने गुरुजींच्या पुस्तकांचे संस्कार घेऊन वाढल्या. त्यात ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव’ असे संस्कार होते. समाजाच्या सर्वच वर्गांत कमी-अधिक प्रमाणात ते होत आले. पण आज जरा डोळसपणे व परखडपणे पाहिले तर साधारणतः मॅट्रिकच्या वर्गात गेलेल्या मुला-मुलींना आपल्या आईला फारसे काही कळत नाही आणि तिला आमच्या गरजांची जाणीवच नसते, असे वाटू लागते. बारावीतल्या मुला-मुलींना बापाविषयी व कॉलेजात काही दिवस घालविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राध्यापका-विषयीही हेच वाटू लागते. मुले बोलत नाहीत आणि वडिलधारे बोलायचे टाळतात. त्यामुळे हा लपंडाव चालतो व खपतो. नव्या पिढ्या बिघडत असल्याचा हा प्रकार नाही; त्या जुन्या पिढ्यांच्या तुलनेत अधिक लवकर वयात येत असल्याचा परिणाम आहे. प्रस्तुत लेखकाने दूरदर्शन पहिल्यांदा वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी पाहिला. आताच्या पिढ्या संगणकासहच जन्माला येतात. त्यांची दृष्टी, जाण, समाजाविषयीचे दृष्टिकोन, आप्तांविषयीच्या भावना वेगळ्या असतील. कधी कधी त्या विचित्रही वाटतील. मात्र त्या त्यांच्या असतात, हे लक्षात घेतलेच पाहिजे. या वास्तवाच्या जाणिवा दोन्ही पिढ्यांना असतातच. पाश्चात्त्य देशात मुलांना लहानपणापासूनच वेगळे व स्वतंत्र वाढविले जाते. तशात मुले व मुली शक्य तेवढ्या लवकर घरापासून दूर होतात आणि आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतात. (आपल्याकडची मुलांना परावलंबी करून ठेवण्याची व बांधील राखण्याची वडिलधाऱ्यांची वृत्ती या संदर्भात फार वेगळी विचारात घ्यावी लागते.)

स्वतंत्रपण, आत्मभान आणि ‘स्व’ची जाणीव या गोष्टी मुला-मुलींना व तरुणांना त्यांचे वेगळेपण जाणवून देत असते. शिक्षण आणि ज्ञानाचा स्फोट यामुळे ही बाब पूर्वीच्या तुलनेत आता फार लवकर घडते, एवढेच. वास्तव हे की, हे साऱ्याच प्राणिमात्रांबाबत खरे आहे. गांधी म्हणाले, ‘‘काम करील त्याला दाम, घाम गाळील त्याला पैसा. मग त्या तर्काने बापाची मालमत्ता मुलांना का मिळावी? ती समाजाच्या कल्याणासाठी वापरली गेली पाहिजे. प्रत्येक पिढीने आपले स्वतंत्रपण आपल्या पायावर उभे राहून जपले पाहिजे.’’ (दुर्दैवाने गांधीजींचा हा क्रांतिकारी अर्थविचार साऱ्यांनीच दडवून ठेवण्याचा प्रयत्न आपापल्या परीने केला.) या विचारात परावलंबन संपविणे व स्वावलंबन शक्यतो लवकर उभे करणे, ही बाब अनुस्यूत आहे. गांधींचा हा विचार न स्वीकारल्याने आपल्याकडची मुले बापाची इस्टेट, जात, धर्म व झालेच तर त्याचा राजकीय पक्षही सांभाळत उभी होतात व तशीच राहतात.

वंशपरंपरा हा प्रकार आपल्याहून प्रगत देशात फारसा नाही. तेथे तो प्रकार व त्याचा संस्कार ऐन तारुण्यात वा त्या आधीच गळून पडत असल्याने वंशपरंपरेचे संरक्षण, आवरण व त्याचा संस्कारही जातो. परिणामी, माणसे एकाकी होतात. आपल्याकडे नवरा, मुलगा वा मुलगी शोधण्याचा प्रकार तिकडे कधीचाच इतिहासजमा झाला आहे. सारे काही स्वप्रयत्नाने व स्वबळावर उभे राहण्याची प्रवृत्ती तेथील सामाजिक पर्यावरणच तरुणांत विकसित करते. अगदी अध्यक्षांची मुलेदेखील हॉटेलात वेटरची कामे करून पैसा मिळविण्यात वा आपल्या पायावर उभी होण्यात कमीपणा मानत नाहीत. श्रमाची प्रतिष्ठा माणसांच्या इभ्रतीहून मोठी झाली की, असे प्रकार होतात. आपल्याकडील मोठ्या कुटुंबात व प्रगत कुटुंबात ही बाब आता येऊ लागली आहे. मुले व मुली आपली लग्ने स्वतःच ठरवतात. नोकऱ्या मिळताच व शिक्षण पूर्ण होताच स्वयंपूर्ण होतात. गरीब आणि श्रमिकांच्या मुला-मुलींना हे सांगावे लागत नाही. ती स्वतःच स्वयंभूपण अंगी बाणतात आणि लहानपणापासूनच आपल्याला आपल्या पायावर उभे व्हायचे आहे याची जाणीव ठेवतात.

प्रस्तुत लेखकाचे घर ज्या वस्तीत आहे ती श्रमिकांची, कष्टकऱ्यांची, कामगार व गरिबांची आहे. माणसे, बायका सारा दिवस राबतात. मुलांना शिकवतात, संसाराचे शकट ओढतात आणि शांतपणे जगतात. पूर्वी त्यांच्यात भांडणे होत. पिऊन हाणामाऱ्या होत. ते आता फार कमी, नगण्य म्हणावे एवढे झाले आहे. मात्र त्यांची मुले फारसे न शिकता कामाला लागली. व्यवसायात शिरली. त्यांनी कसकसली दुकाने उघडली, गाड्या काढल्या. त्याची विक्री केली. तसेच मिळेल ती संधी शोधून पैसे मिळवू लागले. शहरानजीक कुठे कोळशाच्या खाणी निघाल्या. गावातील पोरांनी तिथल्या अधिकाऱ्यांशी संधान जुुळवून त्या कोळशाची चोरी सुरू केली. प्रथम सायकलीवर, मग मोटारसायकलींवर तर पुढे जीपगाड्या घेऊन त्यावर ते कोळसा पळवून विकू लागले. त्यातील काहींनी अल्पावधीत चांगली घरे बांधली, बँकांत खाती उघडली, मुला-मुलींना शाळा-कॉलेजात पाठविले... त्यानंतर काहीच दिवसांत काही समाजसेवकांच्या कृपेने जिल्ह्यात दारूबंदी झाली. दारूची दुकाने बंद झाली. शहराकाठची नदी ओलांडली की, दुसरा जिल्हा लागतो. त्यात दारू वाहते. मग काही पोरांनी सकाळी नदी ओलांडून जाऊन दारू आणणे सुरू केले. चोरीच्या दारूला भाव अधिक. काळ्या बाजारातील तिच्या किमती फार. मग ही मुले पाहता-पाहता मोटार-सायकलींवरून दारूचा धंदा करू लागली. दिवसाकाठी दोन अन्‌ चार हजार रुपयांची कमाई करू लागली. त्यांची घरे चांगली झाली, मुले-मुली चांगल्या शाळा-कॉलेजात जायला लागल्या. जाताना नटून-थटून अन्‌ शासनाचे गणवेश व्यवस्थित अंगावर चढवून जाऊ लागल्या. त्यातल्या एकाने जरा हिंमत करून पोलिसांशीच संधान बांधले. सट्टा सुरू केला, क्रिकेटपासून निवडणुकीपर्यंतचा. तो काही महिन्यांतच लखपती झाला. तीस-चाळीस लाखांचे घर बांधले. लवकरच काही जमिनी घेतल्या. आपण जे करतो ते अवैध आहे, त्यात आपण पकडले जाऊ हे त्याला व इतरांनाही कळते. पण आपली सुटका करणारी माणसेही अशांनी जमविलेलीच असतात. या पोरांना दोष द्यायचा, नावे ठेवायची की मिळाली ती संधी त्या बिचाऱ्यांनी घेतली याचे कौतुक करायचे? त्यातली काही कधी भेटतात, म्हणतात, ‘‘सर, हे सारे चूक आहे. कधी तरी आम्ही हे बंदही करू. पण पूर्वी पोटालाच नव्हते, आता निदान घरचे खाऊ-पिऊ लागले.’’ अशा वेळी मनात येते, त्यांनी तरी काय करायचे असते? उपाशी राहायचे, की पोट भरायला धोका पत्करून मिळेल ते काम करायचे?

वेश्येच्या व्यवसायातही तिथल्या काही मुली व स्त्रिया आहेत. त्यांच्या पुढचे पर्याय लक्षात घेतले की, आपलीच नीतिमत्ता दुबळी झाल्याचे जाणवते. त्यातली एक स्त्री आमच्याकडे कामाला होती. बाकीच्या शेजारणी तिची तक्रार घेऊन घरी आल्या आणि तिला कामावरून काढून टाकायला माझ्या पत्नीला सांगायला लागल्या. त्यावर माझी पत्नी म्हणाली, ‘‘अहो, तिला चार पोरं. नवरा घर सोडून गेलेला. घरगड्याच्या कामाने इतरांची पोटं ती कशी भरणार? आपण मदत करू, पण किती काळ? तिचा राग करू नका. अशा वेळी सहानुभूतीच मनात आली पाहिजे.’’ आता ही मुले व मुली एकटी असली की, एकाकीच असतात. त्यांचे भरलेले पोट व भरलेले मनच त्यांच्याविरुद्ध भडकून उठते. ती तसे बोलूनही दाखवितात. मग मनात येते- यात ही मुले किती दोषी व आपण किती अपराधी? शिवाय समाज व सरकारचाही यात काही दोष आहे की नाही? ही मुले अशी स्वीकारली म्हणून ती स्वीकारणाऱ्यांचा राग करायचा, की त्यांना त्यांच्या एकाकीपणात दुसरी साथ नव्हती म्हणून त्यांच्याविषयीची आस्था ठेवायची?

माणसांचे एकाकीपण खोट्या श्रीमंतीतही जागे असते, याची ही उदाहरणे. कधी कधी मनात येते, हे थांबावे. थांबवावे. पण लगेच दुसऱ्या क्षणी जाणवते, अगोदरच्या पिढ्यांनी तरी वेगळे काय केले? मिळेल तेच केले. जमेल ती संधी वापरून घेतली. ही पोरे तशीच राहू शकतील उपाशीपोटी आणि त्या सात कोटी बेकारांच्या रांगेत... मग खाईना का पोटभर... त्यांना उपाशी पाहून आपण तरी जेवलो असतो काय? हा प्रश्न केवळ व्यक्तीच्या एकाकीपणाचा नाही, त्या एकटेपणाने समाजाला व विशेषतः त्यातल्या गरजू गरिबांना आणलेल्या दुबळेपणाचा आहे; तसाच अगदी लहानपणीच आपल्या पुढल्या जबाबदाऱ्यांची जाणीव झालेल्या त्यांच्या मुलांचाही आहे. हे अनीतीचे शिकवणे नाही. ज्यांची मुले सोन्या-चांदीचे चमचे तोंडात घेऊन जन्माला येतात, त्यांचा हा प्रश्न नव्हे. समाजाला नुसतीच नीती शिकवून आपल्या पुढच्या पिढ्यांची बेगमी करणाऱ्या समाजसेवकांचाही तो नव्हे. बापकमाईवर वा पैतृक सामाजिक प्रतिष्ठेवर जगणाऱ्यांना जगाला नुसतेच नीती व धर्माचे धडे द्यायला लागते काय? जगणे हीच ज्यांची खरी अडचण आहे, त्यांना परंपरांचे आणि धर्माचे धडे द्यायचे नसतात. विवेकानंद त्याचमुळे म्हणाले, ‘उपाशी माणसाला धर्म सांगणे याएवढा अधर्म दुसरा नाही.’

एकाकीपणाचेच हे प्रकार. ते कधी हाती भिकेचा कटोरा देतात, तर कधी मैत्रीचे आश्रितही बनवितात. हे एकाकीपण श्रीमंत असले तरी अन्‌ अनाथ असले तरी, ते का यावे? 

Tags: एकट्या व एकाकी जगाविषयी आस्था की तिरस्कार? भाग 7 चिंतन सुरेश द्वादशीवार साधना सदर ekaki v ektya jagavishayi astha ki tirskar sadhana series sadar chintan suresh dwadashiwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात