डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बाभळगावात जिव्हाळा, लातुरात प्रेम, मराठवाड्यात आदर, महाराष्ट्रात अपेक्षा आणि दिल्लीत प्रभाव अशा सगळ्या जमेच्या बाजू सोबत असलेल्या आणि कोणतेही व्यसन साथीला नसलेल्या विलासरावांना यकृताच्या विकाराने ग्रासणे ही बाब नियतीच्या अन्यायाची साक्ष देणारी. ती जेवढी अकस्मिक आणि धक्कादायक तेवढीच आयुष्याच्या अविश्वसनीयतेची ओळख करून देणारी.

केवळ हळहळ, विषाद आणि आयुष्य असहाय असल्याची एक जीवघेणी जाणीव करून देणारी. सारेच उपलब्ध, सगळेच हाताशी आणि तेवढेच तत्पर... पण कोणतीच साथ कामाची नाही, कसलीही सेवा उपयोगाची नाही आणि आजवरची सगळी उपलब्धीही वापरात येणारी नाही... एक विषण्ण करणारा अनुभव. सारेच अविश्वसनीय वाटायला लावणारा क्षण... सारे असून नसल्यासारखे आणि सगळे नसून असल्यासारखे.

‘तुमची तब्येत बरी नाही का’ मी विलासरावांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात फोनवरून विचारलं.

‘तुम्हाला कुणी सांगितलं तसं.’

‘माझ्या पत्नीने फोन करून. तुम्हाला टीव्हीवर पाहून ती म्हणाली तसं.’

‘वहिनींना सांगा, मी चांगला ठणठणीत आहे आणि पुढच्या वेळी तुमच्या घरी येणार आहे.’

विलासरावांनी हे घसघशीत आश्वासन दिलं त्याला अजून दोन महिने व्हायचे आहेत...

आमच्या स्नेहाची सुरुवात, ते कुठल्याही पदावर नसतानाची. मंत्रिपद, पक्षातलं पद आणि आमदारकी असं सारंच गमावलं असतानाची.

त्या वेळी त्यांनी काँग्रेसविरुद्ध बंड करून विधानपरिषदेची जागा अपक्ष उमेदवार म्हणून लढविली होती. त्यांना मतदान करू शकतील असे एक आमदार माझ्या संबंधातले आहेत असं त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितल्यामुळे ते नागपुरात आले होते. त्यांच्या त्या स्नेह्याच्या घरीच आमची भेट झाली.

‘हे मत तुम्ही मला द्याल यासाठी मी इथवर आलो.’

‘मी तसा प्रयत्न करीन. पण विलासराव, तुम्ही चूक करताहात. तुमच्या भवितव्याचे धागेदोरे काँग्रेसला बांधले आहेत. त्या पक्षात राहूनच तुम्हाला चांगले दिवस यायचे आहेत.’

‘आता चूक झाली आहे आणि ती परत घेता येण्यासारखीही नाही.’

दुसरे दिवशी मी त्या आमदारांना विलासरावांच्या सुपूर्द केले...

त्या निवडणुकीत त्यांचा 0.5 मतांनी पराभव झाला आणि त्यांची अंधारयात्रा सुरू झाली. पुढे त्यांची वाट उजळली तेव्हा ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. आणखी काही काळानंतर ते राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरच आरूढ झाले.

मी बार्शीला होतो. त्यांच्या मंत्रिमंडळातील रामकृष्ण मोरेंचा फोन आला. म्हणाले, ‘सरकारने राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळावर अध्यक्ष म्हणून तुमची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तो उद्या विलासरावजी जाहीर करतील. तुमची संमती सांगा.’

तेव्हा मी लोकसत्ता दैनिकाच्या नागपूर आवृत्तीचा संपादक होतो. त्या यंत्रणेची संमती घेणे गरजेचे होते. तसं मी मोरेंना म्हणालो तेव्हा, ‘ते सारं विलासराव बघतील.’ असं म्हणून आणि माझी संमती गृहीत धरून मोरेंनी फोन ठेवला...आठ महिने काम करून मी ते पद सोडलं. विलासरावांनी फोन करून ते न सोडण्याविषयी सांगून पाहिलं.

मी म्हणालो, ‘अहो, त्या पदावर राहून माझं सहा लाखांचं नुकसान झालं आणि मी घरचा कोणी धनवंत माणूस नाही.’

‘नुकसान मी भरीन.’ ते म्हणाले.

‘कुठून? बाभळगावातून?’ असं हसून म्हणत मीच फोन बंद केला.

दरम्यान त्यांच्या भेटी होत राहिल्या. मुख्यमंत्री, रिकामपण, पुन्हा मुख्यमंत्री आणि मग अनपेक्षितपणे केंद्रातले मंत्रिपद. सारा काळ मी त्यांच्याशी बोलत राहिलो. कधीही फोन केला तरी ते तो घ्यायचे. मोकळेपणी बोलायचे. कधी बातमीची शंका तर कधी एखादी नवी बातमी मी विचारायचो. ते सविस्तर सांगायचे. अनेक कार्यक्रमांत ते प्रमुख पाहुणे तर मी अध्यक्ष वा कुठे ते अध्यक्ष तर मी प्रमुख पाहुणा... सत्तेला खूप माणसे चिकटलेली असतात. त्यांचे कधी आणि कधी यांचेही हितसंबंध ती एकत्र ठेवत असतात. अशी माणसे मी पाहिली आहेत. त्यांचा स्नेह अशा हितसंबंधांशीच जुळलेला... विलासराव हे ओळखणाऱ्यातले होते. तसले हितसंबंधी उरकले की त्यांचा फोन यायचा, मग गप्पा व्हायच्या. त्यात राजकारण, वृत्तकारण, साहित्य,   नवी पुस्तके आणि जुनी माणसे येत...

या साऱ्यांविषयी बोलताना त्यांच्या स्वरात एक मिस्किल छटा येई. त्यांच्या टीकेलाही विषाची धार नसे. कटुता कमी आणि समजूत अधिक असे. त्याच काळात कधीतरी एका पुढाऱ्याच्या आत्मचरित्राचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. मी अध्यक्ष होतो. प्रास्ताविक वगैरे सुरू असताना माझ्या कानाशी लागत त्यांनी हळू आवाजात विचारले, ‘यांच्या पहिल्या बायकोची मुलं इथं कुठं दिसत नाहीत.’

सगळ्या तपशिलावरची त्यांची पकड पाहून मीच भांबावलो. ‘त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याची’ गोष्ट मीही त्यांना मग हळू आवाजात सांगितली. ती त्यांनी व्यासपीठावरच्या उल्हास पवारांपर्यंत लागलीच पोहोचवलीही.... त्यांच्या आईच्या नावाने पत्रकारितेचा एक मोठा पुरस्कार लातुरात दरवर्षी दिला जातो. त्या सोहळ्याला एकदा मी आणि ना.धों.महानोर प्रमुख पाहुणे म्हणून हजर होतो. पुढे काही वर्षांनी त्यांनी तो पुरस्कार मलाच देऊ केला. ‘जो पुरस्कार माझ्या हातून दिला गेला तो मीच कसा घ्यायचा?’ मी त्यांना फोनवरच माझी अडचण सांगितली.

‘तो माझ्या आईच्या नावाचा आहे म्हणून. तिचा आशीर्वाद नाकारायचा नाही म्हणून.’ ते म्हणाले.

यावर कोणता उजर चालणार होता?

ते केंद्रात मंत्री असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर आलेल्या एका नेत्याने मला मोबाईलवर फोन केला तेव्हा मी परतवाड्याहून माझ्या पत्रकार स्नेह्यासोबत नागपूरला येत होतो.

राज्यातल्या मंत्रिमंडळाच्या रचनेचे काम सुरू होते. मी नव्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले तेव्हा ते म्हणाले, ‘तुमची विलासरावांशी असलेली मैत्री मला ठाऊक आहे.’

‘पण तुम्हीही माझे स्नेही आहात...’ मी म्हणालो. ‘म्हणूनच तुम्हाला फोन केला. गेल्या चार तासांपासून माझा फोन ते घेत नाहीत. प्लीज, त्यांना जरा सांगाल का...’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांची अडचण सांगत होते.

तेवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीविषयी मनात अनुकंपा उभी होण्याचा पहिलाच अनुभव मी घेत होतो. त्यांना तसे आश्वासन देऊन मी विलासरावांना फोन लावला. त्यांनी तो तात्काळ उचलला.

‘काय राव, दिल्लीत जाऊन महाराष्ट्राला एवढ्या लवकर विसरलात काय?’

‘मी कुठे विसरलो. महाराष्ट्रानेच मला इकडे पाठवले.’

‘पण म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा फोनही घेऊ नये काय... अन्‌ तोही तासन्‌ तास.’

जरा थांबून ते म्हणाले, ‘त्याचं काय आहे, सकाळपासून माझी दाढ उमळली आहे. ते दुःख असह्य म्हणून मी फोन घेणं टाळत राहिलो एवढंच.’... मी जे समजायचं ते समजलो.

राजकारणी माणसं परस्परांशी कशी वागतात याचा आणखी एक अनुभव माझ्या खात्यात जमा झाला होता.

विलासराव नंतर म्हणाले, ‘त्यांना सांगा, साडेपाचनंतर बोलायला. तोवर हे दुःख कमी झालं असेल.’

... पण विलासराव नुसते हलकेफुलके नव्हते. राज्याच्या अतिशय गंभीर नेत्यांपैकी ते एक होते. प्रत्येक गोष्ट हसण्यावरी नेण्याचा आरोप त्यांच्यावर अनेकांप्रमाणे मीही एकदा केला.

‘तुम्ही कधी गंभीर होता की नाही?’

या माझ्या आरोपवजा प्रश्नावर ते म्हणाले, ‘माणसे आपली दुःखे आणि अडचणी घेऊन माझ्याकडे येतात. मीही त्यांच्याचसारखा ओढलेला चेहरा करून राहिलो तर त्यांना खोटाही का असेना दिलासा कसा मिळेल? शिवाय गंभीर चेहरा केल्याने गंभीर प्रश्न सुटतात असेही नाही.’

... त्यातून ते दिसायचे तरुण, स्मार्ट, सिनेमात शोभावे असे. त्यांचे हसणे खुलायचेही फार. मात्र घ्यायचा तेव्हा ते फार कठोर निर्णयही घ्यायचेच.

ते सांस्कृतिककार्यमंत्री असतानाची गोष्ट.राज्यातील गरीब कलावंत व लेखकांना सरकारकडून अनुदान दिले जाते. त्यांच्या त्या  कारकीर्दीत राज्यातल्या अकराशे जणांना ते मिळायचे. त्या अनुदानप्राप्तांची यादी एकदा संपादक म्हणून माझ्या हाती आली. पाहतो तर काय, त्या यादीत विदर्भातले एक आणि मराठवाड्यातली फक्त तीन नावे. बाकी सारे पुण्या-मुंबईचे आणि कोकणातले. त्यावर ‘यातही अनुशेष असावा ना’ या शीर्षकाचा अग्रलेख मी लिहिला. विलासरावांनी ती सारी यादी तात्काळ रद्द केली आणि नवी यादी तयार करण्यासाठी राज्याच्या सर्व विभागांतील सांस्कृतिक कार्यकर्त्यांची नवी समितीच नेमली... हे अनुदान जेमतेम नऊशे रुपयांचे असायचे. महाराष्ट्राच्या एका नामवंत कवीला ते सुरू झाले तेव्हा मी विलासरावांना म्हणालो, ‘एवढी लहान रक्कम त्यांना प्रथम कशी द्यायची?’

या वेळी ते मुख्यमंत्री होते. ते म्हणाले, ‘त्यांचे अनुदान सरकारने पंधरा वर्षांपूर्वीपासून रेट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्टने सुरू केले असे समजा आणि तेवढ्या रकमेचा पहिला चेक तुम्हीच तुमच्या हातून त्यांना द्या.’ नागपूरला होणाऱ्या एका हिवाळी अधिवेशनाच्या काळात ते माझ्यासोबत तेव्हा अशोकवनात आलेल्या बाबा आमटेंना भेटायला आले. साधनाताई त्या काळात मध्यप्रदेशच्या दिग्विजयसिंगांना आपला मुलगा म्हणायच्या.

मी गमतीनं त्यांना म्हणालो, ‘तुमचा मुलगा आणि आमचा मित्र यांत अधिक देखणा कोण?’ विलासरावांनी माझ्या पाठीवर गुद्दा हाणला.

ताई मात्र निःशंकपणे म्हणाल्या, ‘तुझे हे मित्र.’

परतताना काहीतरी विसरल्यासारखे होऊन ते म्हणाले, ‘अरे, एवढ्या मोठ्या माणसाला भेटायला जाताना आपण रिकाम्या हातांनी कसे गेलो?’ दुसऱ्या दिवशी पुण्याच्या दोन पत्रकार स्नेह्यांसोबत त्यांनी आनंदवनासाठी पाच लाखांचा एक चेकच माझ्याकडे पाठवला... बहुधा त्याच अधिवेशनातली आणखी ही एक आठवण.

शरद जोशींच्या शेतकरी संघटनेने नागपूर अधिवेशनाच्या काळात विधिमंडळावर शेतकऱ्यांचा एक मोठा मोर्चा आणायचे जाहीर केले होते. त्याची तयारी त्यांनी साऱ्या राज्यात केली होती. मोर्चा सेवाग्रामहून निघून वाटेत मुक्काम करीत नागपुरात थडकायचा होता. मोर्चात हजारो माणसे आणि स्त्रिया सामील होत्या. शिवाय दरदिवशी निरनिराळ्या जिल्ह्यांतली पथके त्याला येऊन मिळत होती. उत्साह मोठा आणि सारे जोशात.

शेतकरी संघटनेची आंदोलने शिस्तबद्ध राहत आली असली तरी एखादे विपरीत इतरही कोणाकडून घडणे अशावेळी अशक्य नसते... विलासरावांचे आणि माझेही मित्र अभिनंदन थोरात एका रात्री माझ्याकडे आले. म्हणाले, ‘तुमचा शरद जोशींशी स्नेह आहे. त्यांचा मोर्चा नागपुरात येऊ नये असे मुख्यमंत्र्यांना वाटते. तुम्ही जोशींशी बोला.’ दुसऱ्या दिवशी मी जोशींना वर्ध्यातच गाठले. ‘तुमच्या मागण्या आणि त्यांतल्या तातडीच्या अगोदरच मान्य झाल्या तर...’ मी मुख्यमंत्र्यांकडून आलो आहे हे त्यांना मी आल्याआल्याच सांगितले होते...

‘पण आमचा मोर्चा शांततामय असतो. सरकारने मागण्या मान्य केल्या तर तेवढ्याच शिस्तीत तो परतही जाईल’ जोशी म्हणाले.

‘पण तसे होऊ नये असे काहींना वाटत असेल तर...’ शरद जोशी हे अतिशय गंभीर आणि सावध नेते आहेत.

ते म्हणाले, ‘मोर्चा नागपुरात पोहोचायला आणखी चार-पाच दिवस आहेत, तोवर बघू.’

.. नंतरच्या प्रत्येकच दिवशी मी इकडे विलासरावांशी आणि तिकडे शरद जोशींशी भेटत व बोलत राहिलो. मोर्चा सेलूला येण्याआधीच शरद जोशींशी बोलणी करायला जयंत पाटील आणि रोहिदास पाटील यांची माझ्यासोबत पाठवणी केली.

बोरीनजीकच्या एका शेतमळ्यात आमची बोलणी झाली. जे मान्य करायचे ते सरकारकडून मान्य करायची मंत्र्यांनी तयारी दर्शविली. जोशींना मात्र त्यावर विलासरावांचे शिक्कामोर्तब हवे होते.

‘माझ्या शेतकरी सहकाऱ्यांसमोर येऊन खुद्द मुख्यमंत्र्यांनी ते जाहीर करायला हवे’ ही त्यांची अट मी मान्य केली...

तिकडे नागपुरात मोर्चा येणार, गोंधळ होणार आणि काहीतरी अघटित होणार असे वातावरण वृत्तपत्रांनी तयार केले होते.

मोर्चा नागपुरात येण्याच्या दिवशीच सकाळी मी आणि अभिनंदन थोरात यांनी मिळून विलासरावांना बुटीबोरीच्या इंडस्ट्रियल इस्टेटमधील सरकारी विश्रामगृहात आणून सोडले.

तोपर्यंत तिकडे सेलूहून शरद जोशींचा मोर्चा रवाना व्हायची तयारी पूर्ण झाली होती. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा जोशींचे भाषण सुरू होते... ‘माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आज तुम्हाला भेटायला येथे येत आहेत. त्यामुळे आज आपण येथेच थांबू.’

 ते मोर्चेकऱ्यांना विश्वासात घेऊन सांगत होते... मी सुटकेचा निःश्वास सोडला.

शरद जोशींना सोबत घेऊन बोरीला आलो. त्यांच्यासोबत त्यांच्या संघटनेचे आमदार व इतरही काही नेते होते. विलासरावांसोबत जयंत पाटील आणि रोहिदास पाटील होते. या भेटीची कुणकुण लागलेल्या पत्रकारांचा एक ताफाही तेथे तेवढ्यात येऊन थडकला. आम्ही शरद जोशींना घेऊन बैठकीत प्रवेश केला तेव्हा विलासरावांनी समोरच्याला निःशस्त्र करणारे त्यांचे प्रसन्न हास्य करून जोशींचे व त्यांच्या सोबतच्या साऱ्यांचे स्वागत केले.

नंतरच्या कलमवार चर्चेत दोन्ही बाजूंकडून तपशिलावर पकड ठेवून बोलल्यानंतरच समझोता झाला. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य आणि त्यांच्या मोर्चाचे नागपुरात येणे रद्द... समोरच्या समझोतापत्रावर विलासरावांनी आणि जोशींनी सह्या केल्या.

जोशी मला म्हणाले, ‘माझा सरकारचा अनुभव फारसा चांगला नाही. तुम्हीही यावर साक्षीदार म्हणून सही करा...’

मी विलासरावांकडे पाहिले.

‘करा हो’ ते म्हणाले...

एका मोठ्या समोरासमोरच्या टक्करीतून सारे सुटल्याचा आनंद सोबत घेऊन मी आणि अभिनंदन मग परतलो होतो.

नागपूरचे हिवाळी अधिवेशन हा तसाही एक आनंदच असतो. हुरड्याचे म्हणून ख्यातकीर्त झालेले हे अधिवेशन एकदा त्याच काळात नागपुरात झालेल्या लोकनाट्याच्या संमेलनामुळे जरा जास्तीच रंगीत झाले होते. सारे सरकार दिवसा अधिवेशनात आणि  रात्री लावणीत दंग. विरोधी पक्षाचे दिग्गजही त्याच्या मांडीला मांडी लावून लावणीचा ठेका धरणारे. रंगलेल्या अशा रात्री कटकारस्थानाच्याही असतात...

तशाच एका रात्री साडेदहाच्या सुमाराला राज्याचे माजी मंत्री राहिलेल्या एका ज्येष्ठ आमदारांचा मला फोन.

‘संपादक, अहो घ्या बातमी.’

सावध होऊन मी विचारले, ‘कसली?’

‘उद्या हे विलासरावांचे लावणी सरकार जाणार. सत्तावीस आमदार मागणी विधेयकाविरुद्ध मतदान करणार.. तुम्हाला म्हणून फोन केला... बघा उद्या यांची फजिती.’

‘पण हे सारे खरे कसे?’

‘अहो, मी तिथूनच बोलतोय. सगळे जण खच्चून आमदार निवासाच्या खोलीत एकत्र आहेत. सगळे ठाम.’

मग त्यांनी त्यातली काही मोठी नावेही वानगीदाखल सांगितली... फोन करणाऱ्या नेत्याच्या वयावर, अनुभवावर आणि त्यांच्या माझ्याशी असलेल्या संबंधांवर माझा विश्वास होता...

बातमी करायची की मित्राला सावध करायचे? फारसा विचार न करता मी विलासरावांना मोबाईलवर फोन लावला.

त्यांच्या ज्या सहकाऱ्याने तो घेतला तो म्हणाला, ‘साहेब लावणी ऐकताहेत’... त्याच्या आवाजाला घुंगरा-ढोलकीची साथही होतीच.

‘अहो, त्यांना बाहेर बोलवा. नाहीतर आहेत तेथे त्यांना फोन नेऊन द्या.’

 जरा वेळाने विलासरावांचा बेफिकीर आणि हसरा आवाज.

‘काय म्हणताहात?’ ते वसंतराव देशपांडे सभागृहातच. ढोलकी आणखी जोरात. त्यात बाईच्या गाण्याचा स्वर मिसळलेला.

‘अहो लावणी काय ऐकताय? तुमचे सरकार वाचवा. सत्तावीस जण बसलेत तुमच्याविरुद्ध. आमदार निवासाच्या खोली क्र.... मध्ये. ते तुमच्या विरोधात मतदानाचं ठरवताहेत उद्या.’

‘कोण म्हणतं असं?’

मला फोन करणाऱ्या आमदारांचं नाव मी सांगताच ते म्हणाले, ‘मी लागलीच बाहेर येतो.’

एव्हाना हा संवाद त्यांच्या शेजारी बसलेल्या भाजपाच्या एका ज्येष्ठ आमदाराने ऐकलेला.

 ‘ते सांगत असतील तर हे खरेच असणार.’ विलासराव बाहेर येऊन म्हणाले, ‘मी शरदरावजींना फोन लावतो...’ जरा थांबून ते म्हणाले, ‘तुम्हीही त्यांना हे सारे लागलीच सांगा.’

शरदरावांना फोन लागेपर्यंत वीस मिनिटे गेली होती. तोवर विलासरावांनीच सारी कथा त्यांना सांगितली होती. लागलीच चक्रे फिरली. शरदरावांचा त्या खोलीवर फोन... सगळी दाणादाण. विलासरावही तेथे थडकलेले... बंड जिरले आणि सरकार तरले.

त्या रात्रीचा माझा आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद ऐकलेले भाजपाचे ते नेते मग फार काळ माझा राग करीत होते.

एकदा महादेवराव शिवणकरांदेखत मुंबईच्या आमदार निवासात ते मला म्हणाले, ‘त्या रात्री तुम्हीच आमचा डाव घालविला बरं का’... पत्रकार म्हणून चुकलो की मित्र म्हणून बरोबर ठरलो, या तेव्हाच्या प्रश्नाचे खरे उत्तर मला अजून मिळाले नाही. मात्र मी केले त्याचा पश्चात्ताप मला कधी झाला नाही... विलासराव अतिशय छान पेटी वाजवायचे हे आता कोणाला सांगूनही खरे वाटायचे नाही. बाभळगावातले त्यांचे वाडावजा जुने घर त्याभोवतीच्या देवळांच्या दाटीवाटीत उभे आहे. या देवळांत आणि त्यांच्या घराच्या आवारात जमलेली माणसं भजनं म्हणताहेत. ती म्हणणाऱ्यांना साथ द्यायला विलासराव पेटी तर त्यांचे भाऊ दिलीपराव तबला वाजवताहेत आणि त्यांचे वडील, दादा, तो देखावा डोळ्यांत साठवून समाधानाने तृप्त होताहेत. हे दृष्य पाहिलेली अनेक माणसे बाभळगावात आहेत...

विलासरावांची शवपेटी त्यांच्या घरून निघताना स्फुंदून स्फुंदून रडणाऱ्या गरीब ग्रामीण स्त्रिया परवा पाहिल्या आणि त्यांची त्या गावाशी आणि त्यातल्या संस्कृतीशी जुळलेली नाळच परवा मला दिसली. विलासरावांवर त्यांच्या वडिलांचा संस्कार फार मोठा होता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी असताना आपल्या विरोधकांवर त्यांनी एकदा कडाडून टीका केली. तीत काही व्यक्तिगत संदर्भही आले.

ती गोष्ट दादांच्या कानावर गेली. रात्रीचे जेवण सुरू असताना (आणि त्यांच्या घरात एकत्र जेवायला बसायची परंपरा होती) दादा म्हणाले, ‘विलासराव, (मुलांना अहो-जाहो म्हणण्याची परंपराही त्या कुटुंबाने राखली होती) तुम्ही आजच्या भाषणात कोणावर तरी खाजगी टीका केल्याचे ऐकले.’ आपण आपल्या भाषणात काय म्हणालो हे विलासरावांनी सांगताच दादा म्हणाले, ‘पुन्हा असे करू नका. इतरांना तुमच्यावर टीका करू देत. पण तुम्ही मात्र कोणावर व्यक्तिगत टीका करू नका. हे पथ्य पाळाल तर तुम्ही नक्कीच मोठे व्हाल’... विलासरावांनी दादांचा शब्द अखेरपर्यंत पाळला आणि त्यांच्या शब्दातल्यासारखे ते खरोखरीच मोठेही झाले... अशा एका निर्व्यसनी, सेवाभावी व अजातशत्रू माणसाला यकृताच्या कर्करोगासारख्या असाध्य रोगाने त्याच्या ऐन उभारीच्या काळात गाठावे या ईश्वरी अपराधाला काय म्हणायचे असते?

दीर्घकाळच्या मैत्रीच्या, नेतृत्वाच्या आणि कर्तृत्वाच्या अपेक्षेने ज्याच्याकडे पाहायचे त्याचे असे आकस्मिक जाणे हा माणसाच्या वाट्याला येणाऱ्या अपघाताचा योग की परमेश्वराच्या गफलतीचा पुरावा?.. विलासरावांच्या अंत्ययात्रेत दहा लाखांचा जनसागर लोटला होता. काही काळ त्यात मिसळून आणि काही काळ त्यापासून दूर राहून त्यातली अनोळखी चेहऱ्यांची माणसे मी पाहात होतो.

माणसांच्या त्या अफाट गर्दीत स्त्रियाही मोठ्या संख्येने होत्या. साऱ्यात महत्त्वाची होती ती त्यात प्रचंड संख्येने सहभागी झालेली तरुणाई. एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलेला ग्रामीण भागातल्या तरुणांचा प्रचंड वर्ग मी प्रथमच पाहात होतो. त्याहून महत्त्वाची बाब होती, ती त्या साऱ्यांच्या चेहऱ्यावरच्या आपण आपले काहीतरी गमावले असल्याच्या भावाची...

‘साहेब, आम्ही पायी,  अनवाणी फिरणारी मुले होतो.. साह्येबांच्या आशीर्वादाने आम्ही मोटारसायकलींवर आलो. आमच्यातले अनेकजण आता चार चाकी गाड्या वापरतात... आम्ही अजून शेतात राबतो. पूर्वी नांगरटी करायचो, साह्येबांमुळे आता ट्रॅक्टरं वापरतो. साह्येबांचा हातच सोन्याचा होता..’ पंचायत समितीचा सभासद असलेला त्यांच्यातला एकजण मला सांगत होता.

बाभळगावचे सरपंच, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि अखेर केंद्रीय मंत्री... सत्तेची प्रत्येकच पायरी चढत जाऊन विलासराव मोठे झाले. मात्र मुंबईत असो वा दिल्लीत, त्यांचे आतडे बाभळगाव लातुरातल्याच एका कोपऱ्याशी अडकले होते. तिथली माणसेही त्यांना भेटायला येताना मी पाहिली. घरी, विश्रामभवनात, लातूरच्या छोटेखानी विमानतळावर. ते प्रत्येकाजवळ जात, त्याची विचारपूस करीत... मुंबईत आलेल्या प्रत्येकाला, रात्री कितीही उशीर झाला तरी ते भेटायचे. त्यासाठी उशीरापर्यंत जागायचे. त्याविषयी एका स्नेह्याशी बोलताना ते म्हणाले, ‘ही माणसं थेट यवतमाळ- गडचिरोलीहून येतात. त्यांचे प्रश्न सुटतात म्हणून नाही. मी ते ऐकून घ्यावे म्हणून... त्यांना न भेटणे हा अपराध होईल.’

विलासरावांचा मुलगा सिनेमात दाखल झाला तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘बाप राजकारणातली नाटकं सांभाळतो आणि मुलगा आता खरी नाटकं सांभाळणार.’ त्यावरची त्यांची नोंद, ‘पण बाप त्याच्या भूमिकेत यशस्वी झाला. आता मुलगाही तसा व्हावा असं म्हणा...’ काही माणसं त्यांना सदैव चिकटलेली दिसत. एवढी की त्यांचा त्यांच्या घरच्यांनाही राग यायचा. त्यांच्यामुळे जिल्ह्यांचे पालकमंत्री, आमदार आणि इतरांचाही संकोच व्हायचा. तशी त्यांतल्या काहींची तक्रार त्यांना सांगितली.

त्यावरचे त्यांचे उत्तर, ‘एवढ्या धकाधकीत मलाही माझं मन रमवावंसं वाटत असेलच की नाही? मी अशी जोडलेली माणसं विश्वासाची आहेत की नाहीत?’

विलासरावांना नियतीनेच देखणेपण दिलं होतं. त्याला स्मार्ट ऐटीचीही जोड होती. एका समारंभात ‘महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वांत देखणे मुख्यमंत्री’ असा मी त्यांचा उल्लेख केला.

तेव्हा ते तात्काळ म्हणाले, ‘अरे असं म्हणून तुम्ही शरदरावजींना विसरलेला दिसता...’

ती नुसती स्मरणाची उजळणी नव्हती, तीत एक राजकीय सावधपणही होते. विलासराव सदैव सावध असणारे राजकारणी होते. ते मुख्यमंत्री आणि भुजबळ उपमुख्यमंत्री असतानाची एक पत्रपरिषद. गृहमंत्र्यांशी संबंध असलेला एक अडचणीचा प्रश्न पत्रकारांकडून मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलेला... अतिशय सहजपणे समोरचा माईक भुजबळांकडे सरकवीत मुख्यमंत्री म्हणाले, ‘घ्या, तुमचे क्षेत्र...’

 विलासरावांच्या मनात यशवंतरावांविषयी विलक्षण आदर होता. शंकररावांना ते आपला गुरू मानायचे. शरदरावांविषयी ते कमालीचे सावध असत. त्यांना न दुखावता त्यांच्या राजकारणाला जमेल तेवढा ते तडा देत. पवारांनाही हे कळत होते. एकमेकांना ओळखत आणि जोखत त्यांनी स्पर्धेचे राजकारण केले. पवारांना साऱ्यांनी बहाल केलेले ज्येष्ठत्व विलासरावांनाही मान्य होते, पण त्या ज्येष्ठत्वाचे ओझे त्यांनी शिरावर घेतल्याचे कधी दिसले नाही... त्यांच्यावर नाराज असणारे लोक मला ठाऊक आहेत. मात्र त्यांचा टोकाचा राग करणारा माणूस मला अजून भेटायचा आहे. राग धरणारी जी थोडी माणसे मला ठाऊक आहेत तीही त्यांच्या यशाचा राग करणारी असल्याचेच मला जाणवले आहे.

 विलासरावांच्या जिव्हाळ्याचा विषय मराठवाडा हा होता. मात्र मराठवाड्याचे नेते अशी प्रतिमा स्वतःला चिकटू न देण्याविषयी ते खबरदार होते... नागपुरात येणारी पुण्या-मुंबईची माणसे त्या शहराच्या आताच्या सौंदर्याविषयी भरभरून बोलतात, त्याची तुलना सिंगापूरशी करताना दिसतात. पण राज्याच्या या उपराजधानीला तिचे आजचे वैभव विलासरावांनी मिळवून दिले.  साऱ्या देशाचे व जगाचे लक्ष लागून असलेले मिहान हे जागतिक व्यापाराचे केंद्र तेथे आणण्याचे श्रेय विलासरावांचे.

मुंबईत बाळासाहेबांना न डिवचता राजकारण करण्याचे कसब त्यांना अवगत आणि पवारांचे पुढारीपण बाजूला सारून पश्चिम महाराष्ट्रात आपल्या चाहत्यांचा वर्ग उभा करण्याचे कौशल्यही त्यांचेच.. त्यांना पुस्तकांचा सोस होता, इंग्रजी ग्रंथांचे वाचन होते. इंग्रजीवर पकड होती. विज्ञानाच्या परिषदेत तब्बल चाळीस-चाळीस मिनिटे अस्खलित इंग्रजीतून त्यांना बोलता यायचे. त्यांनी अमेठीत केलेल्या एका भाषणाचे कौतुक मला प्रत्यक्ष दिग्विजयसिंगांनी ऐकविले...

माणूस असा हरहुन्नरी, कुणालाही आपला जवळचा वाटावा असा. कोणत्याही कटुतेचा लवलेश नसणारा. हसरा, मिस्किल, कोटीबाज आणि अर्थात देखणाही. बाभळगावात जिव्हाळा, लातुरात प्रेम, मराठवाड्यात आदर, महाराष्ट्रात अपेक्षा आणि दिल्लीत प्रभाव अशा सगळ्या जमेच्या बाजू सोबत असलेल्या आणि कोणतेही व्यसन साथीला नसलेल्या विलासरावांना यकृताच्या विकाराने ग्रासणे ही बाब नियतीच्या अन्यायाची साक्ष देणारी.

ती जेवढी अकस्मिक आणि धक्कादायक तेवढीच आयुष्याच्या अविश्वसनीयतेची ओळख करून देणारी. केवळ हळहळ, विषाद आणि आयुष्य असहाय असल्याची एक जीवघेणी जाणीव करून देणारी. सारेच उपलब्ध, सगळेच हाताशी आणि तेवढेच तत्पर... पण कोणतीच साथ कामाची नाही, कसलीही सेवा उपयोगाची नाही आणि आजवरची सगळी उपलब्धीही वापरात येणारी नाही...

एक विषण्ण करणारा अनुभव. सारेच अविश्वसनीय वाटायला लावणारा क्षण...

सारे असून नसल्यासारखे आणि सगळे नसून असल्यासारखे. अशा वेळी आठवण... घरी येणार आणि भेटणार असल्याच्या आश्वासनाची.. तीच त्यांना करून द्यायची... तर विलासराव, आता भेट कधी...?

 

Tags:  विलासराव देशमुख दिल्ली महाराष्ट्र मराठवाडा लातुर   बाभळगाव Vilasrao Deshmukh Delhi Maharashtra Marathwada Latur Babhalgaon weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके