डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माणसे संघात गेली वा हिंदू महासभेची सभासद झाली, तरच ती हिंदू होतात काय? या संघटनांना व त्यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षांना हिंदुत्वाची सर्टिफिकिटे देण्याचा अधिकार मिळाला आहे काय? गांधी, नेहरू, पटेल, सुभाष, राजाजी, राजेंद्रबाबू, विनोबा आणि त्यांच्यासारखे काँग्रेसचे तेव्हाचे सारे ज्येष्ठ नेते हिंदू होते की नव्हते? की फक्त सावरकर, गोडसे, आपटे आणि गोळवलकरांनाच हिंदुत्व लाभले होते? हा प्रश्न तेव्हासारखाच आताही विचारता येईल. राजीव गांधी, राहुल, शरद पवार, नितीशकुमार, लालूप्रसाद, मायावती, मुलायमसिंह- फार कशाला ज्योती बसू आणि नंबुद्रिपाद हे हिंदू आहेत की नाही? जयप्रकाश, लोहिया, गोरे, एसेम हे हिंदुत्ववादी नव्हते; पण त्यांचे हिंदू असणे कोण नाकारू शकेल?

हिंदू हा धर्म आणि हिंदुत्व ही धारणा या गोष्टी पाच हजार वर्षांहून अधिक प्राचीन असल्या, तरी ‘हिंदुत्ववादा’चा जन्म 1906 मधला आहे. त्याच वर्षी इंग्रज सरकारच्या पाठिंब्याने आणि आगा खानांच्या पुढाकाराने मुस्लिम लीगची स्थापना झाली. आपल्या पहिल्याच अधिवेशनात व त्यानंतर सरकारला दिलेल्या निवेदनात लीगच्या नेत्यांनी 1909 मध्ये येऊ घातलेल्या मोर्ले-मिंटो या सुधारणा कायद्यात मुसलमानांना विभक्त मतदारसंघ मिळावे अशी मागणी केली. ही मागणी करताना आम्ही अल्पसंख्य असल्यामुळे ते आम्हाला मिळावेत, असे लीगने म्हटले नाही. ‘आम्ही वेगळे राष्ट्र आहोत, म्हणून आम्हाला वेगळे व स्वतंत्र मतदारसंघ मिळावेत’ असे त्या मागणीचे स्वरूप आहे.

वेगळ्या राष्ट्रवादावर आधारलेले विभक्त मतदारसंघ देशाच्या ऐक्याला मारक ठरतील, हा तेव्हाच्या काँग्रेस नेत्यांचा कयास होता. (व तो पुढे खराही ठरला) त्यामुळे त्यांचा या मागणीला विरोध होता. ती बळावू नये आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या काँग्रेस पक्षात मुसलमानांचे प्राबल्य वाढू नये, या हेतूने काम करणारी संघटना हे आरंभीच्या हिंदुत्ववादाचे मागणे होते आणि त्यासाठी स्थापन झालेल्या हिंदू महासभेचेही तेच प्रमुख म्हणणे होते.

हिंदू महासभा ही तेव्हा (नंतरच्या काँग्रेस-समाजवादी पक्षासारखी) काँग्रेसमध्ये राहूनच हिंदूहिताचे जतन करू इच्छिणारी आणि मुसलमानांचे वेगळे राजकारण प्रबळ होऊ न देण्यासाठी झटणारी संघटना होती. काँग्रेसच्या अधिवेशनाला जोडून व बहुधा त्याच्याच सभामंडपात हिंदू महासभेची अधिवेशने तेव्हा होत. बऱ्याचदा काँग्रेसचा अध्यक्ष हाच हिंदू महासभेचाही अध्यक्ष असे. लाला लजपत राय आणि पं. मदनमोहन मालवीय ही यातली काही ठळक नावे. हिंदू महासभेचे कार्यक्रम व ठरावही काँग्रेसच्या कार्यक्रमांना पूरक व त्यांची पाठराखण करणारेच असत.

भारत हा मूळचा हिंदुस्थान देश आहे. त्यात हिंदू बहुसंख्यच नव्हे, तर सर्वव्यापी म्हणावेत एवढे आहेत. देशाचे हे स्वरूप कायम राहावे, त्यातील सरकारचा चेहरामोहराच नव्हे तर प्रकृतीही हिंदू असावी- हा या सभेचा आग्रह असे. मात्र तेव्हाचे तिचे अस्तित्व अतिशय लहान असल्याने तिच्या त्या भूमिकेची फारशी चर्चा तेव्हा होत नसे. या देशाचे हिंदूबहुल हे स्वरूप सदैव कायम राहणार असल्याचे गृहीतच धरले जाण्यानेही हिंदू महासभेचे काँग्रेससोबत असणे, हा भाग तेव्हा काँग्रेसमधील थोड्याशा मुसलमानांनाही आक्षेपार्ह वाटत नसे.

येथे एक गोष्ट नमूद करण्याजोगी. देशातले बहुसंख्य मुसलमान आणि त्यांच्या तत्कालीन संघटना काँग्रेसला हिंदूंचा पक्ष मानत होते. तसे म्हणणाऱ्यांत अलिगड पीठाच्या सर सय्यद अहमद यांच्यापासून देवबंद पीठाच्या धर्मगुरूंचाही पुढाकार होता. आगा खान आणि बॅ. जीनाही काँग्रेसकडे त्याच दृष्टीने पाहणारे होते. काँग्रेसच्या आरंभीच्या अधिवेशनांना मुसलमान प्रतिनिधी येतही नसत. त्यांच्यातील काहींना धरून-बांधून व त्यांच्या मिनतवाऱ्या करून त्यांना तिथे हजर करावे लागे. अशाच एका अधिवेशनाला चार मुस्लिम प्रतिनिधींना प्रवासखर्च व मानधन देऊन आपण कसे पाठवले, याची माहिती काँग्रेसचे तत्कालीन सचिव न्या.तेलंग यांनी लिहून ठेवली आहे.

आपली ही अडचण लक्षात घेऊनच काँग्रेसने आपल्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्षपद बद्रुद्दीन तय्यबजी यांना दिले. तय्यबजी शिया पंथाचे होते आणि त्यांना त्यासाठी देशातील बहुसंख्य सुन्नी मुसलमानांची नंतरच्या काळात शिवीगाळही सहन करावी लागली. काँग्रेसमध्ये मुसलमान तसेही येत नसल्याने हिंदू महासभेचे काँग्रेसला ‘हिंदू’ राखण्याचे काम अर्थात सोपेही होते. सन 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी बॅ.जीनांसोबत जो लखनौ करार केला, त्याने या हिंदूसभेचा वर्ग प्रचंड संतापला आणि टिळकांनी ‘हा घातकी करार करायला नको होता’ असे म्हणायला सुरुवात केली. मात्र टिळकांचे सामर्थ्य, लोकप्रियता आणि त्यांच्याभोवतीचे त्यागाचे लखलखते वलय एवढे मोठे होते की, त्यांच्याविरुद्ध उठाव करण्याची तयारी त्यांना करता आली नाही. एकटे डॉ. मुंजे यांनीच टिळकांना भेटून या कराराविषयीची सभेची व स्वतःची तीव्र नापसंती त्यांच्या कानांवर घातली.

मुळात लखनौ करार मुसलमान समाजाला जास्तीचे झुकते माप देणाराही होताच. त्यात मुंबई प्रांतातील विधी मंडळात मुसलमानांना 33 टक्के, पंजाबमध्ये 50 टक्के, बंगालमध्ये 40, उत्तर प्रदेशात 30, ओडिशा आणि बिहारात 25, तर मद्रास आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी 15 टक्के जागा मिळणार होत्या. शिवाय उर्दू भाषेला विशेष दर्जा आणि मुस्लिम प्रश्नांवरील कायद्यांना त्या समाजाच्या तीनचतुर्थांश सभासदांची मान्यता अशाही अटी त्यात मान्य करण्यात आल्या होत्या. सन 1909 मध्ये झालेल्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्यात मुसलमानांना विभक्त मतदारसंघ देण्याचे मान्य करण्यात आलेही होते. लखनौ कराराने या मतदारसंघांत जास्तीची वाढ केली.

टिळक वा त्यांचे सहकारी मुस्लिमधार्जिणे होते वा त्यांना मुसलमानांचा अनुनय करायचा होता, असा या कराराचा अर्थ नाही. इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात हिंदू व मुसलमान यांनी एकत्र असावे व त्या ऐक्यासाठी साऱ्यांनीच- विशेषतः बहुसंख्याकांनी जास्तीची किंमत मोजावी म्हणून ही व्यवस्था मान्य करण्यात आली होती. (मात्र या पुढच्या काळात- 1920 नंतर गांधीजींचे नेतृत्व देशात प्रस्थापित झाले, तेव्हा गांधी व काँग्रेस यांनी या कराराच्या पुढे जाऊन मुसलमानांना आणखी नव्या सवलती द्यायला ठाम नकार दिला. ते मुसलमानांविषयी बंधुत्वाची व ऐक्याची भाषा बोलत आले. खिलाफतची चळवळही त्याचसाठी त्यांनी हाती घेतली. पण समाज म्हणून मुसलमानांची दुसरी कोणतीही राजकीय मागणी त्यांनी कधी मान्य केली नाही. भारताची राज्यघटना तयार होत असताना गांधीजी हयात होते. या घटनेत मुसलमानांचे विभक्त मतदारसंघ नाकारले गेले, उर्दूला वेगळा दर्जा मिळाला नाही आणि मुसलमानांच्या धार्मिक मागण्यांनाही कुठे जास्तीची संमती नाही.)

हिंदू महासभेच्या तेव्हाच्या व नंतरच्या नेत्यांचे वर्तनही यासंदर्भात पाहिले पाहिजे. टिळकांनी लखनौ करारात मुसलमानांना जे भरभरून दिले (लखनौचा उल्लेख टिळकांनी, ‘लक नाऊ’ म्हणजे भाग्योदय असाच त्या काळात केला), त्याविषयी मौन बाळगलेल्यांचा हा वर्ग त्यांना गोड बोलण्याखेरीज काहीएक न देणाऱ्या गांधींवर मात्र सदैव तोंडसुख घेत राहिला. हिंदू महासभेचे असले- नसले सामर्थ्य महाराष्ट्रात होते आणि टिळकही मराठी होते म्हणून असे झाले की, गांधी महाराष्ट्राबाहेरचे असल्याने तसे झाले- या प्रश्नाचे उत्तर हा अभ्यासकांच्या संशोधनाचा विषय व्हावा.

हे सारे घडेपर्यंत गांधीजींचे स्थान भारतात कायम व्हायचे होते. काँग्रेसने 29 डिसेंबर 1916 या दिवशी आपल्या 31 व्या अधिवेशनात लखनौ येथे लखनौ करार मंजूर केला, तर मुस्लिम लीगने त्याला 31 डिसेंबर 1916 या दिवशी मान्यता दिली. गांधीजी 9 जानेवारी 1915 या दिवशी भारतात आले. आरंभीचे अनेक दिवस ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यासोबत त्यांच्या आश्रमात राहिले. याच काळात गोखल्यांच्या सूचनेवरून त्यांनी साऱ्या भारताचा प्रवास करून येथील जनतेचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. साबरमतीला 1917 मध्ये आपल्या आश्रमाची स्थापना करून ते देशाच्या प्रश्नांत खऱ्या अर्थाने लक्ष घालू लागले. त्यामुळे लखनौ कराराशी संबंध असलेल्या साऱ्या घटनाक्रमापासून गांधीजी दूर होते.

हा काळ मवाळांचे राजकारण संपल्याचा होता. गोखले गेले होते आणि फिरोजशहा मेहता यांनीही जगाचा निरोप घेतला होता. हिंदू महासभा नंतरच्या काळातही काँग्रेससोबत राहिली. मात्र ती वाढली वा विस्तारली नाही. तिचे प्रमुख असलेले डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य महाराष्ट्राबाहेर फारसे ज्ञात नव्हते. महाराष्ट्रातही त्यांचे वजन पश्चिम महाराष्ट्रापुरतेच मर्यादित होते. त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा नव्हत्या आणि देशाचे राजकारण कवेत घेऊ शकण्याएवढी त्यांची दृष्टीही मोठी नव्हती. हिंदू महासभेचे अस्तित्व होते तेवढे व तसेच मग कायम झाले.

तिच्या प्रकृतीत व स्वरूपात बदल झाला तो 1936 मध्ये. त्या वर्षी ब्रिटिश सरकारने सावरकरांवरची सगळी बंधने काढून घेतली आणि त्यांना राजकीय कामात भाग घेण्याची मुभाही दिली. त्यांना गांधींच्या नेतृत्वात असलेल्या  काँग्रेसमध्ये जाणे जमणारे नव्हते. त्यांची प्रवृत्ती समाजवादी वा साम्यवादीही नव्हती. त्यापेक्षा एखादी संघटना उभी करणे आणि तिच्यात जीव ओतून तिला सक्रिय व आक्रमक बनविणे त्यांना जमणारे होते. सावरकरांनी कुर्तकोटींना बाजूला सारून मग हिंदू महासभेची सारी सूत्रे स्वतःकडे घेतली व ते तिचे अध्यक्ष झाले. सभेलाही तिची मरगळ दूर करणारा व तिच्यात प्राण ओतणारा नेता हवाच होता. ते काम सावरकरांनी केले. मात्र, त्यांनाही ती संघटना जनतेपर्यंत वा हिंदूंपर्यंत पोहोचविणे कधी जमले नाही. हिंदू महासभेसोबत देशातला हिंदू समाज कधी नव्हताच.

अकरा वर्षांपूर्वी 1925 मध्ये स्थापन झालेल्या व हिंदू राष्ट्राचे स्वप्न घेतलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतही तो नव्हता. तो ‘गांधीजी की जय’ म्हणणारा आणि काँग्रेसच्या झेंड्याखाली संघटित होणारा होता. सभेचे राजकारणही नंतरच्या काळात स्वातंत्र्य- लढ्याच्या बाजूने वा इंग्रजांच्या विरोधात उभे झालेले कधी दिसले नाही. साम्राज्याला तोंडी विरोध करणारी वा दर्शविणारी संघटना असेच तिचे स्वरूप राहिले. सन 1936 नंतरचा सारा काळ हिंदू महासभेने गांधी आणि काँग्रेस यांना विरोध करण्यात आणि त्यांच्यावर टीका करण्यात घालविला. गांधी जे पाऊल उचलतील, त्याला विरोध करायचा- मग तो इंग्रजी सत्तेला अनुकूल ठरणारा असला तरी चालेल, असे सभेचे धोरण राहिले.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ‘भारताला स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन देत असाल, तरच युद्धाला साह्य करू’ अशी ताकीद इंग्रज सरकारला काँग्रेसने दिली, तेव्हा सावरकरांनी ‘हिंदूंचे सैनिकीकरण’ करण्याची घोषणा करून भारतीय तरुणांना इंग्रजी फौजेत सामील होण्याचे आवाहन केले. धर्माच्या नावावर गांधींनी देशाच्या होऊ घातलेल्या फाळणीला विरोध करणारी भूमिका घेतली; तेव्हा 1925 पर्यंत हिंदू आणि मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत, अशी सर सय्यद अहमद यांच्या पातळीवर जाणारी भूमिका घेणारे सावरकर हे ‘हिंदूंचे राष्ट्र आहे’ असे म्हणत गांधींवर मात करण्याचा प्रयत्न करू लागले. प्रत्यक्षात फाळणी झाली, तेव्हा मात्र त्यांनी व त्यांना मानणाऱ्या महाराष्ट्रातील त्यांच्या अनुयायांनी फाळणीच्या पापाचे खापर गांधींच्या माथ्यावर फोडले आणि तसा प्रचार केला. मात्र त्यांनी वा त्यांच्या नेतृत्वातील हिंदू महासभेने फाळणीविरुद्ध साधे आंदोलन केल्याचेही कुठे दिसले नाही. तात्पर्य- हिंदू महासभा काँग्रेससोबत असताना तिच्या पंखाखाली राहिली आणि सावरकरांचे नेतृत्व लाभल्यानंतर ती इंग्रजविरोधी न होता गांधीविरोधी बनली.

देशात सातशेवर संस्थानिक राज्य करीत होते. या संस्थानिकांच्या ताब्यातील प्रदेशांत स्वातंत्र्याची मागणी जागृत होत होती. या मागणीला उत्तेजन देण्याचे, पण संस्थानिकांना न डिवचण्याचे राजकारण काँग्रेसने आरंभी आखले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थानिकांचा प्रश्न सहजगत्या सोडविता येईल, ही काँग्रेसची भूमिका होती. सावरकरांना मात्र त्यांच्या डोळ्यांसमोर दिसणारे हैदराबादच्या निजामाचे मुसलमानी राज्य सलणारे होते. त्याविरुद्ध त्यांनी भागानगरचा सत्याग्रह या नावाखाली एका छोटेखानी आंदोलनाची उभारणी करून पाहिली.  त्याला फारसे यश आले नाही. प्रत्यक्षात हैदराबादचे संस्थान भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरदार पटेलांच्या पुढाकाराने भारतात विलीन झाले. पुढला काळ हिंदू महासभेचे क्षीण अस्तित्व सांगणारा राहिला.

हिंदू महासभा आणि सावरकर या दोहोंचाही गांधीजींशी आलेला संबंध व त्याचे स्वरूप स्पष्टपणे समजून घेणेही येथे आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 1883 मधला. गांधीजींहून ते वयाने 14 वर्षांनी लहान होते. मात्र आपल्या जहाल वक्तव्यांनी आणि कृतिशील कार्यक्रमांनी त्यांनी आपले नाव महाराष्ट्रात त्यांच्या विद्यार्थिदशेतच सर्वतोमुखी केले होते. सशस्त्र लढ्यावर विश्वास असलेले आणि ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ असे म्हणणारे सावरकर ज्या काळात स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरले तो महाराष्ट्रापुरता मवाळांच्या राजकारणाचा काळ होता. मवाळांच्या अर्ज- विनंत्यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशासाठी ‘मारिता मारिता मरेन’ असे म्हणणाऱ्या सावरकरांचे तरुणाईला आकर्षण वाटले नसते, तरच नवल!

विदेशी कापडांच्या होळ्या, स्वदेशी वृत्तीचा अभिमान, देशाच्या इतिहासातील जाज्वल्य क्षणांचे स्मरण, त्यांची अध्यात्मिक उंची, ज्ञाननिष्ठा आणि प्रभू रामचंद्रापासून मौर्य, गुप्त, प्रताप व शिवरायांच्या स्फूर्तिदायी जीवनांच्या कहाण्या- ही सगळी प्रेरणेची स्थाने असणाऱ्या सावरकरांच्या देशभक्तीला सेनापतीचे रूप व लढवय्या नेत्याची शौर्यवृत्ती लाभली होती. भगूर- नाशिक-पुणे हा जन्मापासूनचा शैक्षणिक प्रवास व कृतिशील तारुण्य अनुभवून 1906 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी ते बॅरिस्टरीची परीक्षा द्यायला इंग्लंडमध्ये दाखल झाले. तेथील वास्तव्यात त्यांनी इंडिया हाऊस या भारतीयांची वर्दळ असलेल्या वास्तूचा ताबाच स्वतःकडे घेतला.

सशस्त्र क्रांती करायची तर शस्त्रे लागणार. बंदुका, पिस्तुले, हॅन्डग्रेनेड्‌स आणि बॉम्बही हवेत. इंडिया हाऊसच्या मागच्या जागेत त्यांनी या साऱ्यांचा एक गुप्त कारखानाच आपल्या स्नेही सहकाऱ्यांच्या मदतीने उभारला.... याच सुमारास मदनलाल धिंग्रा या तरुणाने कर्झन वायलीचा खून करून भारतात त्याने केलेल्या अत्याचाराचे त्याला शासन केले. धिंग्रा पकडला गेला आणि यथाकाल त्याला मृत्युदंडही झाला. तेव्हाची संशयित म्हणून सांगितली जाणारी एक बाब ही की, धिंग्राने वापरलेले पिस्तूल प्रत्यक्ष सावरकरांनीच त्याला दिले होते.

गांधीजी 1909 च्या जुलै महिन्यात लंडनला आले. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या कैफियती सरकारसमोर मांडणे, हा त्यांच्या लंडनभेटीचा हेतू होता. अहिंसा हे मूल्य मानणाऱ्या गांधींना तरुणाईतला सशस्त्र उत्साह मानवणारा नव्हता. सावरकरांचे त्या काळातले शब्द होते, ‘तुम्ही आम्हाला बंदुका देत नाही, तर आम्ही पिस्तुले घेऊ. तुम्ही आम्हाला प्रकाश नाकारत असाल, तर आम्ही अंधारात आमच्या वाटा शोधू आणि जमेल त्या व वाटेल त्या मार्गाने आमची मातृभूमी स्वतंत्र करू.’ गांधींची उद्विग्नता वेगळी होती.

त्याचसुमारास आपले स्नेही हर्मन कालेनबाख यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘या हिंसाचाराला भिऊन इंग्रजांनी उद्या भारत सोडलाच, तर त्यावर कोण राज्य करील? पिस्तुलधारी, खुनी की रक्ताची चटक घेतलेले? खुनी माणसे भारताला काहीही देऊ शकणार नाहीत- मग ते खुनी गोरे असोत वा काळे.’ याच पत्रात ते म्हणतात, ‘शस्त्राने स्वराज्य मिळेल, यावर विश्वास असलेला एकही नेता वा माणूस मला भारतात आजवर भेटला नाही.’ परस्परविरोधी भूमिका धारण करणारी ही दोन मोठी माणसे त्या वर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर एका व्यासपीठावर समोरासमोर आली. रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत येणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या स्वागताचा तो सण होता. त्यानिमित्त लंडन शहरातील भारतीयांची सभा इंडिया हाऊसमध्ये आयोजित झाली होती. सभेचे मुख्य वक्ते होते सावरकर आणि तिच्या अध्यक्षस्थानी होते गांधीजी. तीच त्यांची पहिली भेटही होती.

कार्यक्रमाच्या ठरल्या वेळेआधी काही मिनिटे सावरकर सभास्थानी आले. ते त्यांच्या नेहमीच्या टापटिपीच्या पोषाखात होते. लोक जमू लागले होते. सभेच्या अध्यक्षांचा मात्र कुठे पत्ता नव्हता. जसजशी वेळ होत आली तसतसे कासावीस होऊ लागलेले कार्यक्रमाचे संयोजक अध्यक्षांना शोधू लागले. जरा वेळाने लक्षात आले की, अध्यक्ष स्वयंपाकघरात आहेत आणि सभेनंतर होणाऱ्या सर्व उपस्थितांच्या भोजनाची सिद्धता करणाऱ्या स्वयंपाक्यांना भाज्या चिरून देण्यात मदत करीत आहेत! सावरकर आणि गांधी या दोन बॅरिस्टरांच्या वागण्यातील हे अंतर साऱ्यांना अचंबित करून गेले होते.

ऐनवेळी गांधी सभास्थानी आले आणि कार्यक्रम सुरू झाला.  सावरकरांनी त्यांच्या भाषणात कोदंडधारी रामाची गौरवगाथा त्यांच्या वक्तृत्वपूर्ण शैलीत साऱ्यांना ऐकवली. दुष्टजनांचा त्याने केलेला नाश, रावणाचा वध, वालीचा अंत आणि यज्ञकार्यात अडथळे आणणाऱ्या राक्षसांचा बंदोबस्त इ.इ.... सीतामाईच्या सुटकेसाठी रामाने केलेली पराक्रमाची शर्थ आणि त्याला मिळालेली सुग्रीव व हनुमंताच्या सेनेची जोड वगैरे सारे... नंतरच्या अध्यक्षीय भाषणात गांधींनी प्रजाहितदक्ष रामाची कथा सांगितली. प्रजेच्या कल्याणासाठी, समाधान-सुखासाठी संवेदनशील असलेला रामराजा हा आपला आदर्श असल्याचे ते म्हणाले. भारतात येणारे स्वराज्य तशा रामराज्यासारखे असावे, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या भाषणात रामाचे धनुष्य वा त्याचा टणत्कार नव्हता. त्याने प्रजेच्या केलेल्या सेवेची, वडिलांच्या पाळलेल्या आज्ञेची आणि लक्ष्मणामार्फत रावणाकडून समजून घेतलेल्या राजधर्माची गोष्ट होती... सावरकर आणि गांधी यांच्यात नुसते मतभेद नसून प्रकृतिभेद आहेत, हे त्या सभेत साऱ्यांच्या लक्षात आले.

त्या दोघांतलेही वेगळेपण आणखीही एका घटनेने दाखवून दिले. इटलीच्या स्वातंत्र्यलढ्याचा सेनानी जोसेफ मॅझिनी याचे अत्यंत स्फूर्तिदायी चरित्र सावरकरांनी लिहिले होते (त्याला त्यांनी लिहिलेली 32 पृष्ठांची प्रस्तावना मुखोद्‌गत करणाऱ्या तरुणांचा मोठा वर्ग तेव्हा महाराष्ट्रात होता). मॅझिनी इटलीच्या एकीकरणासाठी व स्वातंत्र्यासाठी लढला आणि आपले ध्येय त्याने त्याच्या अतुलनीय पराक्रमाने साध्यही केले. सावरकरांनी त्याच्या पराक्रमाची गाथा लिहिली होती. इंग्लंडच्या याच दौऱ्याहून परत द.आफ्रिकेत जाताना गांधींनी त्याचे ‘हिंद स्वराज्य’ हे महत्त्वाचे छोटेखानी पुस्तक बोटीवरच लिहिले. त्यात त्यांनीही मॅझिनीवर लिहिले आहे. मात्र त्यात मॅझिनीच्या शस्त्रधारी पराक्रमाची महती नाही. स्वतंत्र व एकात्म झालेला इटली अजून लोकशाहीच्या वाटेने जात नसल्याची आणि त्यावरील राजसत्ता अजून कायम असल्याची खंत बाळगणारा मॅझिनी त्यांनी रंगविला आहे. हा फरकही सावरकर व गांधी यांच्या दृष्टिकोनातलाच नाही, तो त्यांच्यातील प्रकृतिभेदाचे दर्शन घडविणाराच प्रकार आहे.

युद्ध व शांतता, सशस्त्र लढा व अहिंसक सत्याग्रह आणि सेनापती व संत यात असावे तेवढे अंतर या दोन प्रकृतींमध्ये आहे. सन 1909 च्या दसरा महोत्सवाची सभा आटोपल्यानंतर गांधीजी लगेच आफ्रिकेत परतले, तर सावरकरांना ते फ्रान्सहून परत येताना 13 मार्च 1910 या दिवशी लंडनच्या व्हिक्टोरिया स्टेशनवर ब्रिटिश पोलिसांनी अटक केली. नंतरच्या काळात त्यांच्यावर दोन खटले चालविले गेले आणि त्या दोहोंतही त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ही शिक्षा त्यांनी वेगवेगळी भोगायची होती. ती त्यांना सगळीच भोगावी लागली असती, तर त्यांची सुटका 24 डिसेंबर 1960 या दिवशी झाली असती. मात्र 6 जानेवारी 1924 ला ब्रिटिश सरकारने अनेक अटी लादून त्यांची सशर्त सुटका केली. अनेक अर्ज-विनंत्या आणि सुटकेसाठी केलेले अर्ज- असे सारे होऊन व राजकारणात भाग न घेण्याची अट मान्य करून सावरकर अंदमानातल्या काळ्या पाण्याच्या जीवघेण्या अंधारातून बाहेर आले.

पुढची 13 वर्षे ते रत्नागिरीत स्थानबद्ध राहिले. दि.10 मे 1937 या दिवशी ते पूर्णपणे बंधमुक्त होऊन समाजकारणाएवढेच राजकारणातही भाग घ्यायला मोकळे झाले. मात्र 1910 ते 1937 या 27 वर्षांत देशाचे राजकीय चित्र आमूलाग्र बदलले होते. देशाला 1910 मध्ये फारसे परिचित नसलेले गांधी त्याचे सर्वोच्च नेते झाले होते.  काँग्रेसची सारी सूत्रे 1920 मध्येच त्यांच्या हाती आली होती. देशात 1920, 1924 आणि नंतरच्या 1937 पर्यंतच्या झालेल्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने जिंकल्या होत्या. व्हाईसरॉयने त्यांना बरोबरीच्या नात्याने 1929 मध्ये वाटाघाटींसाठी पाचारण केले होते, तर दुसऱ्या गोलमेज परिषदेत ‘देशाचे एकमेव प्रतिनिधी’ म्हणून त्यांनी इंग्रज सरकारशी वाटाघाटी केल्या होत्या.

उलट, सावरकरांचा त्याग व त्यांना अनुभवाव्या लागलेल्या यातना महाराष्ट्र वगळता देशाच्या फारशा चर्चेत नव्हत्या. त्यांच्या पाठीशी राष्ट्रीय पातळीवरचा कोणताही पक्ष व संघटना नव्हती. शिवाय स्वतःला क्रांतिकारी म्हणवून घेणाऱ्यांचे गटही विखुरले व क्षीण झाले होते. देशाच्या राजकीय प्रकृतीतही बदल झाला होता. सत्याग्रह आणि अहिंसेचे सूत्र देशाने स्वीकारले होते. सामान्य माणसांची सहनशक्तीच त्यात त्याचे शक्तिस्थान बनले होते. क्रांतिकारी म्हणविणारी माणसे थोडी होती व तीही एकेकटी राहिली होती. त्यांचा त्याग मोठा होता. देशासाठी प्राणार्पण करण्याची त्यांची वृत्तीही वंदनीय होती.

पण हाती शस्त्र घेऊन लढण्याची क्षमता नेहमीच फार थोड्यांमध्ये असते. त्यासाठी सोसावे लागणारे कष्टही साऱ्यांना सहन होणारे नसतात. अशी माणसे मनाने मोडतात. असे एक दुर्दैवी उदाहरण चंद्रशेखर आझादांचे आहे. नेहरूंच्या आत्मचरित्रात चंद्रशेखरांच्या शेवटाची अंतःकरणाला चटका लावील अशी कथा आली आहे. अलाहाबादेतील कार्यक्रम आटोपून आनंद भवन या आपल्या निवासस्थानी नेहरू परतले; तेव्हा एक दणकट बांध्याचा, मध्यम उंचीचा आणि विस्कटलेले केस व अंगावर मळके कपडे असलेला एक तरुण त्यांच्या व्हरांड्यात बसलेला त्यांना दिसला. नेहरू त्याच्याशी बोलायला थांबले, तेव्हा त्याने आपली ओळख सांगितली. ते चंद्रशेखर आझाद होते.

नेहरूंना त्यांच्या पूर्वायुष्याची आठवण होती. वयाच्या पंधराव्या वर्षी असहकारितेच्या आंदोलनात उडी घेऊन आझादांनी शाळा सोडली होती. फटक्यांची शिक्षा अनुभवून त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. नंतरच्या काळात मात्र हाती शस्त्र घेऊन ते भूमिगत चळवळीत उतरले होते.... आपली व्यथा सांगताना आझाद नेहरूंना म्हणाले, ‘‘हाती शस्त्र घेतले तेव्हाच मागे फिरण्याचे सारे मार्ग बंद झाले. दिवसेंदिवस स्वतःला लपवीत आणि पोलिसांचा ससेमिरा चुकवीत फिरणे वाट्याला आले. मात्र शिरावर अपराध असल्याने पोलिसांच्या स्वाधीन होता येत नाही आणि शांतीच्या वाटेवर यायचे मनात असूनही तसे येता येत नाही.’’

त्यांची समजूत काढत नेहरू म्हणाले, ‘‘तुमचा पश्चात्ताप मी बापूंच्या कानावर घालतो. त्यांना यातून मार्ग काढायला सांगतो. ते तुम्हाला मार्ग दाखवतील आणि आताच्या तुमच्या अवस्थेतून तुमची सुटकाही करतील.’’ आझादांनी कृतज्ञतेने नेहरूंचा निरोप घेतला...

मात्र त्यानंतर अवघ्या सातच दिवसांनी- नेहरूंची गांधीजींशी भेट होण्याआधीच पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्यांच्या गोळ्यांना बळी पडून चंद्रशेखर आझाद शहीद झाले. सावरकर अंदमानात बंदिस्त झाले, तेव्हा गांधी आफ्रिकेत होते. ते 1915 मध्ये भारतात परतले, तेव्हाही सावरकर अंदमानातच होते. गांधी काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय भाग घेऊ लागले, तेव्हापासूनच त्यांनी सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न करायला काँग्रेसला भाग पाडले. गांधींना असे प्रयत्न करणे आवश्यक वाटण्याचे एक कारण सावरकरांना अंदमानात दिली जाणारी अमानुष वागणूक हे; तर दुसरे प्रत्यक्ष सावरकर आपल्या सुटकेसाठी सरकारकडे नियमितपणे अर्ज करीत होते, हेही होते.

अंदमानात प्रविष्ट झाल्यानंतर सावरकरांनी आपल्या सुटकेची विनंती करणारा अर्ज पहिल्या सहा महिन्यांतच सरकारकडे पाठविला, तो फेटाळला गेला. नंतरच्या काळात असे अर्ज ते नियमितपणे करीत राहिले. या अर्जात ‘यापुढे आपण सरकारविरुद्ध कोणतीही कारवाई करणार नाही आणि सरकारला अडचणीतही आणणार नाही’ हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. त्यांचा होत असलेला छळ आणि त्यांनी आपल्या सुटकेसाठी चालविलेले अर्ज- विनंत्यांचे प्रयत्न गांधींची संवेदनशीलता चाळवणारे होते. गांधींनी सावरकरांच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नांबाबत सावरकरांचे महाराष्ट्रातील भक्त फारसे बोलत नाहीत, हेही येथे नोंदविले पाहिजे.

गांधींना काँग्रेसमध्ये 1917 पर्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. त्या वर्षी मुंबईत भरलेल्या काँग्रेसच्या प्रादेशिक अधिवेशनात गांधींनी सावरकरांच्या सुटकेची मागणी करणारा ठराव सर्व प्रतिनिधींच्या सहमतीने मंजूर करून घेतला. नंतरच्या काळात दक्षिणेत काकीनाडा येथे भरलेल्या काँग्रेसच्या अ.भा. अधिवेशनातही त्यांनी तसा ठराव आग्रहपूर्वक संमत करून घेतला. सावरकरांची सशर्त सुटका होण्याआधी त्यासाठी गांधींनी केलेल्या या प्रयत्नांची नोंद महाराष्ट्रातील लेखक व  विचारवंतही फारशी घेत नाहीत, हेही येथे सांगितले पाहिजे.

गांधी आणि सावरकर यांच्यात प्रकृतिभेदासोबतच प्रवृत्तिभेदही होते. रत्नागिरीत स्थानबद्ध असलेल्या सावरकरांना भेटायला कस्तुरबांना घेऊन गांधी तिथे गेले. चर्चेच्या वेळी मात्र त्यांनी आपण कस्तुरबांना सोबत आणल्याचे सावरकरांना सांगितले नाही. त्यांच्यातील औपचारिक चर्चा संपली, तेव्हा गांधींनी सावरकरांना सौ.सावरकरांना बाहेर बोलविण्याची विनंती केली. त्यावर अचंबित झालेल्या सावरकरांनी ‘कशाला?’ असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना गांधी म्हणाले, ‘‘देशासाठी अनिवार कष्ट उपसलेल्या देशभक्ताच्या पत्नीच्या वाट्याला कोणत्या यातना येतात, ते दाखवायला मी कस्तुरबाला माझ्यासोबत आणले आहे. तिला सौ.सावरकरांना पाहायची व भेटायची इच्छा आहे.’’

सन 1910 ते 1937 हा 27 वर्षांचा काळ सावरकरांना देशाच्या राजकारणापासून दूर ठेवणारा ठरला. ‘माझा कोणीही गुरू नाही’ असे म्हणणारे सावरकर काळ हा आपला गुरू मानत आले. 27 वर्षांच्या बदललेल्या परिस्थितीत त्यांच्या या गुरूनेच त्यांची फसवणूक केली, हे स्पष्ट होते. मात्र त्यांचा स्वभाव आणि वृत्ती त्यांना आपली फसवणूक वा हार मान्य करू देणारी नव्हती. रणावाचून स्वातंत्र्य जवळ येत असलेले पाहूनही सावरकर त्यांच्या ‘रण’वादी भूमिकेपासून ढळले नाहीत. क्रांतिकारकांची दुर्दशा त्यांना दिसत होती, पण तीही त्यांना विचलित करू शकली नाही. इंग्रजी साम्राज्याला केलेल्या विरोधामुळे ओढवलेल्या अंदमानच्या अरिष्टाने त्यांना इंग्रजांविरुद्ध जाऊ दिले नाही आणि ज्या पक्षाचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले, तो हिंदू महासभा हा पक्ष हिंदूंचाही होऊ शकला नाही. (वास्तव हे की, 1967 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत देशातील हिंदुत्ववादी पक्षांना- त्यात जनसंघ व हिंदू महासभा हेही आहेत- देशात 80 टक्के हिंदू असताना 6 टक्क्यांएवढीही मते मिळाली नाहीत) त्यातून सावरकरांची विज्ञाननिष्ठा त्यांच्या सनातनी हिंदू भक्तांना त्यांच्यापासून दूर ठेवणारी ठरली. सारा जन्म अस्पृश्यतेला विरोध करणाऱ्या सावरकरांचे ‘भाला’कार भोपटकरांसारखे भक्त अस्पृश्यतेचे समर्थन जाहीर सभांमधून करीत होते.

‘गाय हा एक उपयुक्त पशू आहे’ हे त्यांचे म्हणणे हिंदूसभेएवढेच तेव्हा मूळ धरू लागलेल्या संघालाही मानवणारे नव्हते. ज्याला विरोध करायचा ते ब्रिटिश सरकार अजून बलशाली आहे, ज्याच्या विरोधात भूमिका घ्यायची तो काँग्रेस पक्ष देशव्यापी आहे, ज्याच्यावर टीका करायची ते गांधी समाजाचे दैवत बनले आहेत आणि ज्यांना अनुयायी म्हणायचे ते अनुयायी नसून भक्त आहेत- ही सावरकरांची तेव्हाची अडचण आहे. शिवाय हिंदूंची सांस्कृतिक संघटना म्हणून उभा होत असलेला संघही त्यांच्या शब्दात नव्हता. बाबाराव सावरकर या त्यांच्या बंधूंनी संघाच्या उभारणीला आरंभापासून सहकार्य व मार्गदर्शन केले. त्यांच्याविषयीची साधी कृतज्ञताही संघ दाखवीत नाही, हे त्यांना दिसत होते... त्यांच्यासारख्या सक्रिय व लढाऊ वृत्तीच्या माणसाची कोंडी स्पष्ट करणारे हे वास्तव आहे.

येथे सावरकरांच्या भूमिकांविषयीचेही एक वास्तव मांडणे आवश्यक आहे. अस्पृश्यतानिवारण, सामाजिक एकता, जातीयतेला विरोध, मांसाहाराला प्रोत्साहन, गाईकडे पशू म्हणून पाहण्याची त्यांची दृष्टी या बाबींकडे ते मूल्य म्हणून पाहणारे नव्हते. या सगळ्या गोष्टी देशाची एकात्मता व त्याचे सामर्थ्य वाढविण्यासाठी उपयोगाच्या  आहेत एवढ्यासाठी त्यांचा आग्रह ते धरीत होते. गांधी आणि सावरकर यांच्यातील हा सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक आहे. अस्पृश्यता किंवा जातीयता या गोष्टी मूलतःच वाईट आहेत, म्हणून त्या गांधींना मान्य नव्हत्या. सावरकरांना त्या देशाची दुर्बलता वाढवणाऱ्या म्हणून अमान्य होत्या. याच एका कारणामुळे एका ज्येष्ठ अभ्यासकाने सावरकरांना ‘राष्ट्रभोळे’ असे म्हटले आहे.

कोणतीही सामाजिक दृष्ट्या अनिष्ट ठरणारी बाब मूल्य म्हणून नाकारणे वेगळे आणि ती कशाच्या तरी उपयोगाची नाही म्हणून नाकारणे वेगळे आहे. ही गांधी आणि सावरकर यांच्यातील वेगळेपण सांगणारीही बाब आहे.

दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर देशासह जगाचेही राजकारण बदलले. त्या विशाल पटात हिंदू महासभा व सावरकर यांचे स्थानही फारसे मोठे राहिले नाही. तरीही त्या काळात काँग्रेसने इंग्रजांच्या युद्धप्रयत्नांना सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सावरकरांनी हिंदू तरुणांनी सैन्यात भरती व्हावे, असे आवाहन करणे सुरू केले. त्या आवाहनाचा प्रत्यक्षात फारसा परिमाम झाला नाही. त्यांच्या समर्थकांनी मात्र त्यांच्या या भूमिकेला ‘हिंदूंचे सैनिकीकरण’ असे गोंडस नाव दिले. इंग्रजी सत्तेच्या तुष्टीकरणाखेरीज त्यातून फारसे काही साध्यही झाले नाही.

गांधीजी आणि सावरकर यांच्या परस्परविरोधी राजकारणाचे हे दोन प्रवाह अखेरपर्यंत असेच समांतर चालत राहिले असते, तर त्याची खंत करण्याचे कारण नव्हते. लोकशाहीसाठी लढणाऱ्या देशात मतस्वातंत्र्य, मतभेद व विरोध यांना जागा आहे आणि ती असणे आवश्यक आहे. सावरकरांचा मतभेद हा प्रकृतिभेदाएवढा मोठा असला तरी तो समजण्याजोगा होता. मात्र त्यांच्या गांधीविरोधाचे पर्यवसान गांधीजींच्या खुनातील आठव्या क्रमांकाचे आरोपी होण्यात व्हावे, ही बाब मात्र साऱ्या देशाने त्याच्या पुढच्या सगळ्या भविष्यात खंत करावी एवढी मोठी आहे.

सावरकरांना शस्त्रबळाचे आकर्षणच नव्हे तर तेच एक साऱ्या प्रश्नांची उत्तरे देणारे साधन आहे, असे वाटत होते. त्यांचे हे बळ त्यांनी वा त्यांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांनी विदेशी सत्तेविरुद्ध वापरले, तेव्हा त्याची खंत एक गांधी वगळता दुसऱ्या कुणाला फारशी वाटलीही नाही. परंतु, सावरकरांचे हे बळ देशाच्या सर्वोच्च नेत्याविरुद्ध वापरले जाणे, ही बाबच अनाकलनीय व अविश्वसनीय वाटावी अशी आहे. साऱ्या जगाने डोक्यावर घेतलेल्या गांधींना गुरुदेव टागोरांनी महात्मा म्हटले आणि त्यांच्याशी मतभेद असतानाही सुभाषबाबूंनी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून गौरव केला... सावरकरांच्या देशभक्तीविषयी गांधीजींसह कुणाच्याही मनात संशय नव्हता. अशा माणसाच्या जवळ असणाऱ्यांनी गांधीजींचा खून करावा आणि त्याविषयी झालेल्या खटल्यात सावरकरांना आरोपी म्हणून न्यायालयाच्या कठड्यात बसलेले पाहावे लागावे, हे देशाचे दुर्दैव होते.

दि.12 सप्टेंबर 1947 या दिवशी गांधींची भेट घ्यायला संघाचे तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर दिल्लीला आले. त्या वेळी त्या शहरात झालेल्या मुसलमानांच्या हत्याकांडात संघाचा हात असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्यांची कात्रणे गोळवलकरांना दाखवून गांधींनी त्या हत्याकांडाचा निषेध करण्याची त्यांना विनंती केली. त्यावर ‘या हत्याकांडाशी आमचा संबंध नाही’ एवढे सांगून गोळवलकर थांबले. त्या हत्याकांडाचा निषेध करायलाही त्यांनी नकार दिला. ‘फार तर तुम्ही तुमच्या प्रार्थनासभेत माझी याविषयीची नापसंती सांगा’- असे त्यांचे म्हणणे होते. गांधींनी त्यांच्या सायंप्रार्थनेत ते सांगितले. मात्र त्याच वेळी नेहरू व पटेलांशी बोलताना ‘गोळवलकरांची भूमिका विश्वसनीय वाटणारी नसल्याचेही’ त्यांनी बोलून दाखविले.

त्यानंतर चार दिवसांनी संघाचे काही कार्यकर्ते भेटीला आले, तेव्हा त्यांना गांधी म्हणाले, ‘‘शुद्ध हेतू आणि स्वच्छ मन यावाचून केलेला त्यागही समाजाचे अकल्याणच करीत असतो. तुम्ही तुमचे सामर्थ्य देशाच्या हितासाठी वापरले पाहिजे.’’ त्यावर ‘हिंदू धर्म पाप्यांची हत्या करायला मान्यता देत नाही काय?’ असे त्यांच्यातील एकाने विचारले तेव्हा, ‘‘एक पापी दुसऱ्या पाप्याची हत्या करण्याचा हक्क कसा मागू शकतो?’’ असे उत्तर देऊन गांधी म्हणाले, ‘‘केवळ कायदा आणि घटना यांनी निर्माण केलेले न्यायालयच तो अधिकार बजावू शकते.’’ गांधी स्वतःला सनातनी हिंदू म्हणवत, पण ‘माझे हिंदुत्व मला इतर धर्मांचा द्वेष करायला सांगत नाही; उलट ते मला अंतर्मुख करून माझ्याच धर्मातील जुने दोष नाहीसे करायला आणि तो जास्तीत जास्त शुद्ध व स्वच्छ करण्याची शिकवण देते’, असे ते म्हणत.

जगातील सर्व धर्मांची खरी शिकवणही हीच आहे, असे त्यांचे सांगणे असे. ते गीतेला प्रमाणग्रंथ मानत आणि कुराणातली  अवतरणेही देत. येशूचे पठारावरील प्रवचन त्यांच्या नित्याच्या वाचनात होते आणि बुद्धाची अहिंसाही त्यांनी शिरोधार्य मानली होती. भांडण धर्मात नाही, ते त्यांना समजून न घेणाऱ्या त्यांच्या अनुयायांत आहे- असे ते म्हणत.

रा.स्व.संघाची स्थापना 1925 मधली. त्याच्या स्थापनेत डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांचा पुढाकार होता, तर त्यांना बाबाराव सावरकर आणि डॉ. मुंजे या हिंदुत्ववादी नेत्यांचीही साथ होती. हेडगेवारांनी त्याआधी काँग्रेसच्या अधिवेशनात स्वयंसेवकांच्या पथकाचे प्रमुख म्हणून काम केले होते, हे येथे उल्लेखनीय. मात्र आरंभापासून ‘भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्याचा विकास व स्वरूप हिंदूबहुलच नव्हे, तर हिंदूवर्चस्वाचे राहिले पाहिजे’ ही या संघटनेची भूमिका होती. संघाने आपले स्वरूप केवळ हिंदू व तेही सांस्कृतिक असल्याचे जाहीर करून राजकारणापासून दूर राहण्याचा पवित्रा आरंभी घेतला. त्यामुळे त्याने स्वातंत्र्याच्या आंदोलनात कधी भाग घेतला नाही. त्या लढ्याला त्याचा विरोध नव्हता, परंतु गांधीजींच्या लोकलढ्यातील मुसलमानांच्या सहभागाविषयी तो आरंभापासून संशय व्यक्त करीत राहिला.

गांधीजींचा सर्वधर्मसमभाव किंवा नेहरूंचा सेक्युलॅरिझम या संकल्पना संघाला हिंदुत्वाचा संकोच करणाऱ्या म्हणूनही मान्य होणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे राजकारणात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी संघाने गांधी, नेहरू आणि काँग्रेस यांच्याविरुद्ध एक मूक पण विषारी प्रचाराची मोहीम आरंभापासूनच चालविली. संघाचा हिंदुत्ववाद शुद्ध विधायक नव्हता व नाही. त्याला मुस्लिम व ख्रिश्चन विरोधाची जोड होती व आहे. शिवाय हिंदूंचा इतिहास व जीवनपद्धती यांचे पुनरुज्जीवन करण्याचीही धारणा त्याने बाळगली आहे. थेट वेदोपनिषदांपासून जुन्या धार्मिक परंपरांना उजाळा देण्याचे आणि इतिहासातील हिंदूंच्या शक्तिस्थळांचे पुनर्स्थापन करण्याचे धोरणही त्याने अवलंबिले आहे.

सुधारणावाद, स्वातंत्र्य व समतेसारखी मूल्ये किंवा निखळ राष्ट्रवाद हेही संघातील वादाचे विषय आहेत. डॉ. लोहियांच्या मते- संघ ही पाकिस्तानवादी, मुस्लिमविरोधी, अराष्ट्रीय, धर्मांध व एकचालकानुवर्ती संघटना आहे. ज्या काळात संघ बाळसे धरीत होता, तेव्हा त्याच्या धारणांमधील काटेरी भाग फारसा कुणाला जाणवला नाही; मात्र त्याचे बळ जसजसे वाढत गेले तसतशा त्याच्या मुस्लिम व ख्रिश्चनविरोधी बाजू धारदार होत गेल्या. त्याच वेळी सर्वधर्मसमभाव किंवा सेक्युलॅरिझम यांना असलेला त्याचा विरोधही कडवा होत गेला.

संघाने अखंड हिंदू राष्ट्राच्या कल्पनेची उपासना सातत्याने केली. मात्र फाळणीच्या वेळी तिच्याविरुद्ध त्याने आंदोलन केल्याचे दिसले नाही. ‘ते करणे आम्हाला तेव्हा सुचले नाही आणि तसे काही करण्याएवढे आमचे सामर्थ्यही मोठे नव्हते’, हे संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनीच एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मात्र त्यांचा सेक्युलॅरिझमला व त्यामुळे गांधींना असलेला विरोध टोकाचा होता. गांधीजींवर ते मुस्लिमधार्जिणे असल्याचा व त्यांचा सर्वधर्मसमभाव हिंदूविरोधी असल्याचा प्रचारही या ‘सांस्कृतिक’ संघटनेने सातत्याने केला. गांधींचा खून करणारा गोडसे हा संघाचाही कार्यकर्ता होता. गांधींच्या खुनाचा जीनांसह साऱ्या जगाने निषेध केला, पण तसे करणे संघाने तेव्हा टाळले व आजवरही ते तो टाळत आला. सारांश- संघ ही स्वतःला सांस्कृतिक म्हणविणारी अर्धधार्मिक व अर्धराजकारणी संघटना होती.

फाळणीच्या वेळी झालेल्या मुस्लिमविरोधी दंगलीत संघाने  भाग घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे होत्या. त्यासाठी सरकारने संघाकडे विचारणाही केली होती. स्वतः गोळवलकर हे 302 या कलमान्वये गांधीजींच्या खुनातील एक आरोपी होते. त्यांचीही सुटका पुराव्याअभावी झाली. गांधीजींच्या खुनानंतर गृहमंत्री सरदार पटेल यांनी संघावर बंदीच घातली होती. देशाची होऊ घातलेली फाळणी ही त्याचे मन जखमी करणारी बाब होती. तिच्याविषयीचा संताप देशभरातील हिंदूंच्या मनात होता. हिंदूंच्या म्हणवून घेणाऱ्या लहानसहान संघटनांना तो विषय त्यांच्या राजकारणासाठी वापरता येणेही सोईचे व हिताचे वाटले होते.

देशभरात हिंदू-मुसलमानांचे दंगे उसळले होते. हजारोंच्या संख्येने माणसे मरत होती. स्त्रिया पळविल्या जात होत्या. मालमत्तेची लूट व जाळपोळ होत होती. कोणतेही संवेदनशील मन अशा वेळी स्वस्थ राहणे शक्य नव्हते. मात्र ज्यांनी देश व समाजाचे नेतृत्व करायचे, त्यांना अशाच वेळी आपले जळते मन सांभाळून डोक्यात बर्फ ठेवावा लागत असतो. जीना आणि गांधी, लीग आणि काँग्रेस त्याही काळात परस्परांशी चर्चा करीत होते. हंगामी सरकारात दोन्ही पक्षांचे सभासद भांडत असले, तरी एकत्र होते. मरणाऱ्या व मारणाऱ्या माणसांच्या प्रतिनिधींचेच सरकार साऱ्यांच्या डोक्यावर होते आणि इंग्रज या तिसऱ्या पक्षामुळे ते काही करायला असमर्थच नव्हे, तर हतबलही होते. देशात लष्कर होते, पण त्यात अवघी पाच लाख माणसे होती. हे लष्करही धर्मांत विभागलेले होते. पुढे झालेल्या फाळणीनंतर त्यातली दोन लाख वीस हजार माणसे पाकिस्तानात गेली आणि भारताचे सैन्यबळ दोन लाख ऐंशी हजारांएवढे उरले. मोठी लोकसंख्या व प्रचंड क्षेत्रफळ असलेल्या देशात व समाजात शांतता राखायला हे बळ अतिशय तुटपुंजेही होते.

इंग्रजांवर राग काढता येत नव्हता आणि काँग्रेस पक्ष अखेरपर्यंत फाळणीविरुद्ध भूमिका घेत राहिला होता. ‘माझ्या देहाचे तुकडे प्रथम करा, मगच देशाची फाळणी करा’- हे गांधींचे म्हणणे देशाने अभिवचनासारखे घेतले होते. फाळणीची अपरिहार्यता मात्र त्याही स्थितीत साऱ्यांना दिसत होती. हिंदुत्ववाद्यांना गांधी, गांधीविचार, त्यातली अहिंसा आणि निःशस्त्र लढ्याचा सत्याग्रही मार्ग मुळातच मान्य नव्हता. सावरकर आणि त्यांचे अनुयायी हे उघडपणेच शस्त्रवादी होते. अशा दृष्टीची परिणती संतापाच्या व रोषाच्या अतिरेकातच व्हायची होती व तशीच ती झाली.

दि.30 जानेवारी 1948 या दिवशी सायंकाळच्या प्रार्थनेला निघालेल्या गांधीजींना नथुराम गोडसे या सावरकरवाद्याने तीन गोळ्या घालून त्यांचा खून केला. त्याची परिणती त्याच्या व त्याच्या सहकाऱ्यांएवढीच त्याच्या पाठीराख्यांच्या व समर्थकांच्या अटकेतही झाली. प्रत्यक्ष खुनाच्या वेळी गोडसेसोबत असलेला नारायण आपटे हाही सावरकरांचा अनुयायी होता. हिंदू महासभेत व संघातही ते एकत्र राहिले होते. शिवाय बडगे या त्यांच्या सहकाऱ्याने माफीचा साक्षीदार होऊन गांधीजींच्या खुनाला सावरकरांचा आशीर्वाद होता, अशी साक्ष न्यायालयात दिली होती. ‘‘...‘यशस्वी होऊन या’, असे सावरकरांनी गोडसे व आपटे यांना सांगितल्याचे आपण ऐकले...’’ असे त्याने त्याच्या जबानीत न्यायालयाला सांगितले. मात्र त्याची साक्ष खरी ठरविणारा कोणताही पुरावा त्याला पुढे करता आला नाही. ज्यांचे बोलणे आपण ऐकले, असे हा बडगे म्हणाला; त्या गोडसे व आपटे या दोघांनीही गांधीजींच्या खुनाचा त्यांच्यावरील आरोप मान्य केला होता. गांधी हे देशाच्या फाळणीला कारणीभूत असल्यामुळे आपण त्यांचा खून केला, ही गोष्ट त्यांनी त्यांच्या न्यायालयासमोरील जबानीत सांगितली होती. त्यांच्या कृत्याशी सावरकरांचा संबंध नाही, असेही ते म्हणाले होते. परिणामी, बडगेची साक्ष ‘पुराव्याअभावी’ बाजूला सारून न्यायालयाने संशयाचा लाभ देत सावरकरांची मुक्तता केली. बडगेला त्याची जबानी खरी ठरविणारा पुरावा देता आला असता तर?... हा प्रश्न अनुत्तरित राहिला.

नथुराम आणि नारायण यांचे सावरकरांशी असलेले संबंध कोणीही नाकारले नाहीत. त्यांच्या राजकीय, संघटनात्मक व व्यक्तिगत संबंधांची चर्चा करणारे बरेच लिखाण नंतर प्रसिद्ध झाले. या खुनामागे हिंदुत्ववादी संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या सावरकरांवर सरदार पटेलांचा व गृह खात्याच्या चौकशी यंत्रणेशी संबंध असलेल्या अनेकांचा संशय होता. सगळा परिस्थितीजन्य पुरावा पुढे असताना सावरकरांची सुटका एका साक्षीला न लाभलेल्या प्रत्यक्षदर्शीच्या अभावी म्हणजे ‘संशयाचा फायदा देऊन’ झाली, हे उघड आहे. अगदी अलीकडे याविषयी एका तरुण व अभ्यासू पत्रकाराने विचारलेला प्रश्नही येथे नोंदविण्याजोगा आहे. ‘सावरकर हे गांधीजींच्या खुनाला जबाबदार नाहीत हे एकवार मान्य केले, तरी ते हा खून थांबवू शकले असते की  नाही; हा प्रश्न शिल्लक राहतोच’ असे तो म्हणाला. तो खटल्याच्या काळात विचारला गेला नसेल आणि नंतर सावरकर-भक्तांच्या भयामुळे तो विचारण्याचे धाडसही कुणी केले नसेल; मात्र या प्रश्नाचे महत्त्व कालातीत म्हणावे असे आहे. त्याचे उत्तर समाजालाच कधी तरी शोधावे व द्यावे लागणार आहे.

जाता-जाता एक बाब येथे आणखीही उल्लेख करण्याजोगी. गांधींच्या खुनाने साऱ्या देशाला व त्यातल्या हिंदूंएवढाच मुसलमानांनाही जो जबर धक्का दिला, त्यामुळे त्यांच्यातील दंगली एका क्षणात थांबल्या. आपल्या वेडाचारातून त्यामुळे बाहेर आलेल्या सगळ्या शस्त्राचाऱ्यांनी त्यांची शस्त्रे नुसती म्यानच केली नाहीत, तर ती टाकलीही. जे पोलिसांना जमले नाही आणि लष्करालाही करता येणार नव्हते, ते गांधींच्या हौतात्म्याने केले. त्या हौतात्म्याचा कडकडाटच एवढा मोठा होता की, त्याने साऱ्यांना हतबुद्ध व अंतर्मुख करून आपल्यात दडलेल्या माणुसकीचा एक विलक्षण साक्षात्कार घडविला.

एका अभ्यासू लेखकाने या घटनेचा उल्लेख काहीशा औपरोधिकपणे केला आहे. तो म्हणतो, ‘कधी तरी या देशातील मुसलमानांनीच गोडशाचे आभार मानले पाहिजेत. देशभरच्या शस्त्रधारी हिंदुत्ववाद्यांच्या शस्त्रांना जे साधले नाही, ते त्या माथेफिरूच्या तीन गोळ्यांना साधले.’ हिंदुत्ववादी संघटनांचे नेते, लेखक, प्रचारक आणि समर्थक गांधीजींच्या खुनाचे ‘वध’ असे जे वर्णन करतात, तेही कधी तरी नीट समजून घेतले पाहिजे. वध राक्षसांचा होतो, तो दुष्टांचा होतो. रावणवध किंवा कंसवध हे शब्द साऱ्यांपर्यंत इतिहासाने पोहोचविले आहेत. संतांच्या, सत्पुरुषांच्या किंवा महात्म्यांच्या हत्येला वध म्हणत नाहीत. त्यामुळे गांधीजींच्या खुनाला वध म्हणणाऱ्यांची मानसिकताही कधी तरी मुळातून तपासावी अशी आहे.

देश व समाज यांच्या सेवेत सारे आयुष्य घालविलेल्या एका वृद्ध व निःशस्त्र लोकनेत्याला राक्षसांच्या वा दुष्टांच्या रांगेत बसविण्याचा असा प्रयत्न हिंदुत्ववाद्यांच्या प्रचाराचा परिणाम झालेल्या अनेक मराठी लेखक व कलावंतांनीही त्यांच्या लिखाणात व वक्तव्यात पुढल्या काळात केला. त्यांच्या पुढच्या पिढ्यांतही तो विखार शमला नाही, हेही येथे नोंदविले पाहिजे. गांधीजींच्या खुनानंतर सावरकर 1966 पर्यंत राहिले. मात्र त्या काळात त्यांच्या निस्सीम भक्तांखेरीज त्यांची दखल फारशी कुणी घेताना दिसले नाही. हिंदू महासभा खुरटलेलीच होती आणि संघाला सावरकरांचे हिंदुत्व मान्यही नव्हते. (सावरकरांची हिंदुत्वनिष्ठा प्रदेशविशिष्ट होती. भारतात राहणारे, या भूमीला मातृभूमी मानून तिला आपली निष्ठा वाहणारे सारेच त्यांच्या मते हिंदू होते. त्यांच्या उपासनेचा धर्म मुस्लिम वा ख्रिश्चन असला तरी या भूमीत राहून या भूमीवर प्रेम करणारे सगळेच सावरकरांच्या हिंदुत्वात बसणारे होते. याउलट संघाची हिंदुत्वनिष्ठा संस्कृतिविशिष्ट आहे. त्याच्या मते, जेथे हिंदू आहेत आणि हिंदू संस्कृती आहे, ते सारेच प्रदेश हिंदुस्थान आहेत. संघाची ही व्याख्या हिंदुस्थानच्या सीमा त्याच्या सध्याच्या सीमेच्या पलीकडे नेणारी आणि जिथे जिथे जर्मन तिथे जर्मनी असे म्हणणाऱ्या हिटलरच्या राष्ट्रवादाजवळ जाणारी आहे. यातून दिसणारे सावरकरांचे हिंदुत्व देशाच्या मर्यादेत राहणारे, तर संघाचे हिंदुत्व या मर्यादेच्या बाहेर जाणारे व प्रसंगी आक्रमक होऊ शकणारे आहे.)

सोईसाठी सावरकरांचे नाव घेण्याखेरीज संघाने त्यांना कधी उचलून धरले नाही. नाही म्हणायला, सावरकरांना झालेल्या दोन जन्मठेपांची शिक्षा ज्या दिवशी औपचारिकरीत्या संपायची होती, त्यादिवशी पुण्यात त्यांचा मृत्युंजयदिन त्यांच्या समर्थकांनी धडाक्याने साजरा केला. त्यात संघाचे लोकही सहभागी झाले. त्या सभेतले सावरकरांचे भाषण वीरश्रीयुक्त होते. मात्र तेवढ्यावरच सारे संपले. हिंदुत्ववाद्यांचे नेतृत्व संघाकडे गेले होते आणि हिंदू महासभेजवळ वजनदार नेता राहिला नव्हता. परिणामी, सावरकरांचे नाव पुस्तकात आणि पूर्व महाराष्ट्रात व कोकण परिसरात राहिले. मराठवाडा व विदर्भातही ते फारसे गेले नाही. या काळात गांधी जगभर गेले आणि जगाचे झाले. जाती-धर्मापलीकडे जाऊ न शकणाऱ्या एकारलेल्या वृत्तीवरचा मनुष्यधर्माचा तो विजय होता.

सावरकरांची देशभक्ती संशयातीत होती. त्या देशभक्तीला धर्माची एकारलेली धार होती. गांधींच्या देशभक्तीला जगाचे वलय होते. एका चिनी पत्रकाराने त्यांना विचारले, ‘‘तुम्ही जगाच्या ऐक्यावर आणि त्याच्या एकत्र येण्यावर विश्वास ठेवता काय?’’ गांधींचे उत्तर होते, ‘‘भारताचा स्वातंत्र्यलढा ही त्याच मार्गावरची आमची वाटचाल आहे. जाती-धर्माचे वा भाषा-पंथाचे संस्कार सांगणाऱ्याला जगाचा संसार करण्याची दृष्टी कधी यायची नसते. ते काम संतांचे, ऋषींचे, तत्त्वज्ञांचे व मनुष्यधर्माच्या उपासकांचे असते. त्यांनाच ते उत्तरदायित्व वाहता येते  आणि ते वाहताना वाट्याला येणारे मरणही त्यांची वाटचाल थांबवत नाही. उलट, त्यामुळे त्या वाटेचा महामार्ग झाला असतो.’’

एकीकडे वेगळ्या मतदारसंघांपासून फाळणीपर्यंत आपली मागणी वाढवीत नेलेले मुस्लिम राजकारण गांधींना हिंदूंचा नेता म्हणत होते. काँग्रेसवरही ती हिंदूंची संघटना असल्याचा त्यांचा आरोप होता, तर दुसरीकडे देशातला बहुसंख्य हिंदू मागे असलेल्या गांधींना देशातल्या हिंदुत्ववादी संघटना मात्र मुस्लिमधार्जिणे म्हणत होत्या. बॅ.जीना हे गांधीजींचा उल्लेख नेहमी ‘मि. गांधी’ असा करीत. त्यांच्या वक्तव्यात वा लिखाणात गांधीजी नसे. महात्मा वा राष्ट्रपिता हे शब्दही त्यांना मान्य नव्हते. (स्वतः जीनांनी त्यांच्या मूळ महंमद अली जीनाभाई या नावातून भाई वजा केले होते. स्वतःचा उल्लेखही ते एम.ए. जीना किंवा बॅ.जीना असा करीत. त्यांनी गांधींना, नेहरूंना वा पटेलांना ते बॅरिस्टर असूनही तसे कधी म्हटले वा लेखल्याचे आढळत नाही.)

या देशातील हिंदुत्ववादी संघटनांचे दुर्दैव वा अपयश हे की, इथला हिंदू त्यांच्यासोबत कधी गेला नाही. सवर्णांमधील काही जातींतले थोडे लोक त्यांच्यासोबत दिसले. तुरळक म्हणावी अशी बहुजन समाज व दलितांमधली माणसेही त्यात होती. पण समाज म्हणून हिंदू त्यांच्यासोबत कधी नव्हते. ते ‘गांधीजी की जय’ म्हणणारे होते. गांधीजींच्या पश्चात अगदी 1985 पर्यंतही 80 टक्के हिंदू असलेल्या या देशात येथील हिंदुत्ववादी संघटना व पक्ष रोडके व बारकेच राहिले. त्यांना आलेले बाळसे 1990 च्या दशकातले आहे. तरीही या संघटना गांधींवर मुस्लिमधार्जिणेपणाचा आरोप करीत आणि केवळ आम्हीच हिंदूंचे त्राते व नेते आहोत, असे म्हणत. तसे म्हणणे त्यांना भावणारे असले, तरी खोटे होते. हिंदू ज्यांच्यासोबत आहेत, त्या गांधींना हिंदूविरोधी (वा मुस्लिमधार्जिणे) म्हणणे आणि मागे वा पुढे फारसे हिंदू नसणाऱ्यांनी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणे- यातली विसंगती आणि विनोदही साऱ्यांच्या लक्षात यावा असा आहे.

मुस्लिम लीगने 1906 मध्ये मुसलमानांसाठी विभक्त मतदारसंघ मागितले, तेव्हा गांधी भारतात नव्हते. मोर्ले- मिंटो कायद्यात ते मान्य झाले, तेव्हाही ते आफ्रिकेतच होते. टिळकांनी जीनांसोबत 1916 मध्ये लखनौ करार करून मुसलमानांचे विभक्त मतदारसंघ वाढवून द्यायला मान्यता दिली आणि उर्दूला विशेष दर्जा देण्याचे कबूल केले, तेव्हा गांधींना भारतात येऊन पुरते वर्षही झाले नव्हते. त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेशही व्हायचा होता. नंतरच्या काळात काँग्रेस व देश यात गांधीजींचे नेतृत्व प्रस्थापित झाल्यानंतर मात्र गांधींनी मुसलमानांची कोणतीही नवी मागणी कधी मान्य केली नाही. भारताची आजची घटना तयार झाली तेव्हा गांधी हयात होते आणि घटना समितीतील 95 टक्क्यांएवढे सभासद त्यांना मानणारे होते. या घटनेत मुसलमानांचे विभक्त मतदारसंघ नाहीत. उर्दूला विशेष दर्जा नाही आणि मुसलमानांना त्यांच्या संख्येहून जास्तीचे प्रतिनिधित्वही नाही. या साऱ्या गोष्टी घटनेतून गळणे याचा गांधींशी संबंध नाही वा नसावा असे समजणारे लोक गांधी हे विधिज्ञ व बॅरिस्टर होते; पटेल व नेहरू हे त्यांचे निकटवर्ती अनुयायीही बॅरिस्टर आणि कायदेपंडित होते, हे वास्तव कधी लक्षात घेत नाहीत.

(एका ज्येष्ठ मराठी विचारवंताचा एका हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याशी झालेला संवाद येथे नोंदविण्याजोगा आहे. काँग्रेस ही देशातील हिंदूंची सर्वांत मोठी संघटना आहे, असे विधान त्या विचारवंतांनी संघाच्या सायंकाळच्या सभेत भाषण करताना केले होते. त्यावरची नाराजी व्यक्त करताना ते कार्यकर्ते म्हणाले, आम्ही काँग्रेसला हिंदूंची संघटना मानत नाही. त्यावर एका क्षणाचाही विलंब न करता ते विचारवंत म्हणाले, कारण तुम्ही बहुजन समाजालाही हिंदू मानत नाही... काँग्रेस ही हिंदूंची सर्वसमावेशक व सर्वांत मोठी राष्ट्रीय संघटना आहे- ती राजकीय असली तरी, असे त्याचमुळे मी म्हणतो. तो संवाद तेवढ्यावरच थांबलाही होता.)

माणसे संघात गेली वा हिंदू महासभेची सभासद झाली, तरच ती हिंदू होतात काय? या संघटनांना व त्यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षांना हिंदुत्वाची सर्टिफिकिटे देण्याचा अधिकार मिळाला आहे काय? गांधी, नेहरू, पटेल, सुभाष, राजाजी, राजेंद्रबाबू, विनोबा आणि त्यांच्यासारखे काँग्रेसचे तेव्हाचे सारे ज्येष्ठ नेते हिंदू होते की नव्हते? की फक्त सावरकर, गोडसे, आपटे आणि गोळवलकरांनाच हिंदुत्व लाभले होते? हा प्रश्न तेव्हासारखाच आताही विचारता येईल. राजीव गांधी, राहुल, शरद पवार, नितीशकुमार, लालूप्रसाद, मायावती, मुलायमसिंह- फार कशाला ज्योती बसू आणि नंबुद्रिपाद हे हिंदू आहेत की नाही? जयप्रकाश, लोहिया, गोरे, एसेम हे हिंदुत्ववादी नव्हते; पण त्यांचे हिंदू असणे कोण नाकारू शकेल?  यशवंतराव चव्हाण, कन्नमवार, वसंतदादा, शंकरराव इथपासून सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुखांपर्यंतचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदूच असतात. त्यांच्यासारखेच मनोहरपंत जोशी आणि देवेंद्र फडणवीस हेही हिंदूच असतात. एखादे एसेम कृष्णा काँग्रेसमध्ये असले की हिंदू नसतात आणि भाजपमध्ये गेले की हिंदू होतात, असे काही राजकीय धर्मांतर आपल्यात आहे काय? मग सगळेच पक्षांतर करणारे पुढारी पक्षासोबत धर्मही बदलतात, असे म्हणावे लागेल.

देशातील काँग्रेसच नव्हे तर समाजवादी, कम्युनिस्ट, बसप, राजद, जदयू, लोजद हे पक्ष सोडा; पण अगदी तेलुगू देसम, तेलंगण राष्ट्र समिती, द्रमुक व अण्णा द्रमुक हे पक्षही हिंदूंचेच आहेत की नाहीत? काही मुसलमान सभासद त्यांच्यासोबत आहेत एवढ्याखातर त्यांचे हिंदुबहुल स्वरूप नाहीसे होते काय? संघाने नसला तरी भाजपने आता मुसलमानांना प्रवेश दिला आहे. त्यामुळे त्याचे हिंदू असणे संपते, की पातळ होते? मौ. आझाद किंवा सरहद्द गांधींसारखी माणसे गांधींसोबत होती. पण ती पाकिस्तानवादी नव्हती, भारताच्या अखंडतेचा ध्यास घेणारी होती. त्यांना आपण मुसलमान मानायचे, की हिंदू, की एकात्म राष्ट्रवादी?...

दुर्दैव हे की एकांगी व एकारलेल्या भूमिका घेतलेली आणि डोळ्यावर रंगीत चष्मे लावलेली माणसे समाजाएवढेच राजकारणही त्याच्या खऱ्या स्थितीत पाहू शकत नाहीत. त्यातल्या माणसांबद्दलच्या त्यातील अनेकांच्या भूमिका त्यांच्या प्रचारकी व्यवस्थेनेच घडविलेल्या असतात. त्या खऱ्या नसतात, सोईच्या असतात. राजकारण सोय बघत असते. त्यासाठी सत्याचा बळी देणे त्याला फारसे महत्त्वाचेही वाटत नसते. वास्तव हे की, हिंदुबहुल देशातील सर्वच पक्ष व संघटना (धार्मिक संघटनांचा अपवाद वगळता) हिंदूंच्या असणार किंवा हिंदुबहुलच राहणार. त्यांच्याकडे तसे पाहता येणे मात्र आवश्यक असते.

मराठवाड्यातील एका ज्येष्ठ अभ्यासकाने देशाच्या फाळणीविषयीचा एक नवाच दृष्टिकोन आता पुढे आणला आहे. ही फाळणी झाली नसती आणि देश एकसंध राहिला असता; तर आताच्या वजिरीस्तान, बाल्टिस्तान या तालिबानग्रस्त पाकिस्तानी प्रदेशांसह पूर्वेकडचा बांगलादेशही भारताचा भाग राहिला असता. अशा भारतातील लोकसंख्येत मुसलमानांचे प्रमाण 36 टक्क्यांहून अधिक राहिले असते. हिंदूंना 60 ते 62 टक्क्यांएवढे ते खाली आणू शकले असते. सध्या देशावर राज्य करणारे मोदींचे सरकार केवळ 31 टक्के मते मिळवून सत्तेवर आले आहे. देश अखंड असता आणि त्यातले मुसलमान पूर्वीसारखेच लीगसोबत संघटितपणे उभे राहिले असते; तर भारतावर लीगचे, असदुद्दीन ओवैसीचे किंवा मुलायमसिंहांचे सरकार सत्तेवर राहिले असते आणि त्याला तसे कायमचे टिकताही आले असते. त्या स्थितीत हिंदूंमधील अनेक वर्ग व जाती सत्तेसाठी लीगसोबत निवडणूक समझोते करायला तयारही राहिल्या असत्या. ही स्थिती भारताला दारुल इस्लाम बनविणारी झाली असती. या अभ्यासकाच्या मते, फाळणी हे हिंदूंना लाभलेले वरदानच आहे आणि त्याकडे आता तसेच पाहिले पाहिजे. जुन्या व होऊन गेलेल्यांच्या आयुष्यापेक्षा देशात येणाऱ्या नव्या पिढ्यांचे आयुष्य अधिक महत्त्वाचे असल्याचे त्याचे मत येथे विचारात घ्यावे असेच आहे.

भारतीय वा हिंदू समाजाचे एक गुणवैशिष्ट्यही याच संदर्भात नोंदविण्याजोगे आहे. ‘हा समाज फार सहनशील आहे’ असे म्हटले जाते. प्रत्यक्षात तो सहनशील नसून चिवट आहे. तो लवकर बदलत नाही, कारण तो गटातटांत विभागला आहे. एक-दोन गट बदलले तरी बाकीचे त्याचा विरोध म्हणून वा प्रतिक्रिया म्हणून आपले परंपरागत अस्तित्व कायम राखायला धडपडत असतात. मुसलमानांनी सातव्या शतकात भारतावर पहिली स्वारी केली असली, तरी दिल्लीत गादी कायम करायला त्यांना   सातशे वर्षे झुंजावे लागले. पुढली चारशे वर्षे त्यांनी या देशावर राज्य केले. मात्र, या अकराशे वर्षांच्या काळात त्यांना हिंदुस्थानला मुसलमान बनविता आले नाही. शंभर वर्षांत सारा मध्य आशिया मुस्लिम करणाऱ्या धर्माचा भारतात झालेला तो पहिला, मोठा व दीर्घ काळ होत राहिलेला पराभव होता.

माणसे आपले अंतस्थ आयुष्य चिवटपणाने जगत व सत्तेला तोंड देत राहिले. शेरशहापासून अकबरापर्यंतच्या राज्यकर्त्यांना हिंदूंचे चिवट असणे समजत होते. त्याचमुळे त्यांनीही या देशाचे इस्लामीकरण करण्याचा त्यांच्या धर्मगुरूंचा आग्रह मोडून काढला. त्यांच्यावरील संतापामुळे अकबराने मुसलमान धर्माचा त्यागही केला, ही बाब महत्त्वाची आहे. हे चिवटपण हिंदू धर्माला स्थायी बनविणारे आहे; मात्र तेच त्याला कोणतीही सुधारणा लवकर स्वीकारू देत नाही. सुधारणांना विरोध करण्यातही त्याने अनेक शतके घालविली आहेत.

‘तुमच्यासमोरचा सर्वांत अवघड प्रश्न कोणता?’ असा प्रश्न एका पाश्चात्त्य पत्रकाराने विचारला, तेव्हा त्याला उत्तर देताना पंतप्रधान नेहरू म्हणाले, ‘‘एका धर्मश्रद्ध समाजाला लोकशाहीसाठी सेक्युलर बनविणे हा तो प्रश्न आहे...’’ हिंदुत्ववादी संघटनांना समाजाचे हे चिवटपण मानवणारे असले तरी त्याची त्यांनी तशी दखल घेतलेली दिसत नाही. हिंदू समाज हे एक दीर्घकालीन अस्तित्व आहे, असे ते म्हणतात. नेमके तेच नेहरूही ‘भारत ही पाच हजार वर्षांची परंपरा आहे’ या शब्दांत सांगत असतात. यातला हिंदुत्ववाद्यांचा आग्रह ते चिवटपण कायम करण्याचा, तर नेहरूंसारख्यांचा ते चिवटपण घालवून त्यात सैल समजूतदारपण आणण्याचा असतो.

गांधी ‘रघुपति राघव राजाराम’ या प्रार्थनेला जोडून ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ म्हणतात, तेव्हा तो याच प्रयत्नाचा भाग असतो. एका अलक्षित पण अनुभवसिद्ध समाजवास्तवाचाही उल्लेख येथे करण्याजोगा आहे. जे समाज व ज्या व्यवस्था कमालीच्या एकसंध व बळकट असतात, त्या तुटायलाही वेळ लागत नाही. काचेचे मजबूत दिसणारे भांडे एखादाही तडा सहन करू शकत नाही. त्या तड्याने त्याचा भंग पूर्ण होऊन त्याचे तुकडे होतात. एकसंध समाजाचेही (मोनोलिथिक) तसेच असते.

मुसलमान समाज आरंभी एक ग्रंथ, एक पैगंबर आणि हदीस हे धर्मभाष्य यांच्यासह पहिल्या चार पवित्र खलिफांनी एकसंध राखला. त्यांच्या नंतरच्या राजवटींनीही तो तसा राहील याची व्यवस्था केली, पण त्यात लवकर फूट पडली. प्रत्यक्ष महंमदाची लाडकी पत्नी आयेशा हीच उंटांच्या लढाईत त्याच्या जावयाशी- एका पवित्र खलिफाशी लढताना जगाने पाहिली. मुसलमान म्हणविणारी किमान वीस राष्ट्रे आज जगात आहेत. त्यांच्या भाषा, राहणी, उपासनापद्धती व जीवनव्यवहार असे सारे वेगळे आहेत. त्यांच्यातील धार्मिक संबंधही दुबळे आहेत. शिवाय त्यातील अनेकांतले राजकीय वैरही मोठे आहे. पाकिस्तानपासून इजिप्त व स्पेनपर्यंतची मुसलमान राष्ट्रे आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर कधी एक भूमिका घेताना दिसत नाहीत. भारत व पाकिस्तान यांच्यातील युद्धात त्यातले अनेक देश भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत.

अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, सिरिया आणि पॅलेस्टाईन याविषयीच्याही त्यांच्या भूमिका वेगळ्या व त्यांच्या राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्याच राहिल्या आहेत. अल्‌ कायदा, तालिबान किंवा बोकोहरामसारख्या मुस्लिम अतिरेक्यांच्या बंदोबस्तासाठी या मुसलमान देशांना ख्रिश्चन अमेरिकेची व रशियाची मदत घेणे गैर वाटत नाही. शिवाय त्यांच्यातही आपसातल्या लढाया आहेत. त्या केवळ शिया आणि सुनी या पंथातल्याच नाहीत. शिया विरुद्ध सुन्नी आणि कडवे विरुद्ध उदारमतवादी, लोकशाहीवादी व साम्राज्यवादी असणे हेही त्यांचे एक स्वरूप आहे...

एकसंध दिसणाऱ्या व हवाबंद वाटणाऱ्या कम्युनिस्ट देशांचीही स्थिती आता अशीच आहे. रशियन साम्राज्याचे आपल्या डोळ्यांदेखत 15 तुकडे झाले आहेत. त्यातल्या अनेकांनी कम्युनिस्ट विचारांशी फारकतही घेतली आहे. चीनने त्याचे राजकीय बळकटपण आपल्या हुकूमशाहीच्या बळावर टिकवले. पण खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून जगात स्वतःचा व स्वतःत जगाचा प्रवेश त्या देशाने मान्य केला. चिवट समाज टिकतात आणि एकसंध देश तुटतात, या वास्तवाचे राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनाही म्हणावे तेवढे भान नाही. ही बाब राजकारणाएवढीच धर्मकारणाला व त्यातल्या एकांगी दिसणाऱ्या बळकटपणालाही लागू आहे. आपले विस्कळीत दिसणारे चिवटपण इतरांच्या संघटित दिसणाऱ्या ठिसूळपणाहून हिंदुत्ववाद्यांनी कमी लेखले काय, हा प्रश्न अशा वेळी आपल्याला पडावा असा आहे.

समाजाच्या एका भविष्यकालीन प्रवासाची जाण याच जागी नोंदवावी, अशी आहे. समाज जसजसा प्रगत होतो तसतसा तो अधिकाधिक विकेंद्रित होत जातो. (या विकेंद्रित होण्यालाच कर्मठांचे जग विस्कळीत म्हणते)  समाजाच्या मध्यवर्ती केंद्रापासून तो परिघाच्या दिशांनी सरकत पुढे जातो. तो परिघ त्याला अडविणारा असेल, तर तो त्या परिघाबाहेरही पडतो.

समाजाचा विकास याचा खरा अर्थ- त्यातील प्रत्येक व्यक्तीला येत जाणारे आत्मभान, हा आहे. अशा आत्मभान आलेल्या व्यक्ती तिच्यावर ताबा ठेवत आलेल्या शक्तिकेंद्रांच्या पकडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्या यथावकाश यशस्वीही होतात. यातून समाज तुटत नाही, तर सैल आणि शिथिल होतो. त्याचे एकसुरीपण जाते. एकांगी असणे त्यालाच आवडेनासे होते. तो संस्कृतिबहुल, विचारबहुल, आचारबहुल आणि जीवनबहुल होण्याचा प्रयत्न करतो. देश तुटतात, धर्मांची शकले होतात, पक्षात दुभंग होतात, एका नेत्याच्या जागी सामूहिक नेतृत्वाचा आग्रह येतो; तर कधी कधी अनुयायी म्हणविणारेच नेतृत्वाला आपल्या मागे ओढून नेऊ लागतात... ही सगळी समाज प्रगत होत जाण्याचीच लक्षणे आहेत. त्याला पुन्हा एका रंगात रंगविण्याचा, एका विचारात आवळण्याचा आणि एकाच दिशेने एकाच चाकोरीतून नेण्याचा प्रयत्न महामार्गावरून गल्लीत शिरण्याच्या उफराट्या प्रकारासारखा असतो.

अल्‌ कायदा व तालिबान यांसारख्या मुसलमानांतील अतिरेकी संघटना घड्याळाच्या काट्यांसोबत इतिहासाची शतके उलटी फिरवीत असतात. त्या 21 व्या शतकातील समाजाला सातव्या शतकात नेण्याचा प्रयत्न करतात. हिंदूंमधील हिंदुत्ववाद्यांच्या संघटनाही आजच्या प्रगल्भ आणि संस्कृतिबहुल हिंदूंना स्वातंत्र्याच्या लोकलढ्याच्या मागे नेऊन 1857 चे युद्ध ऐकवितात. ते छत्रपती आणि राणाप्रतापाच्या कहाण्यांच्या मागे जाऊन थेट आचार्यांच्या काळात- मग त्याही मागे जाऊन समाजाला वेदोपनिषदांच्या दैवी काळाची प्रलोभने दाखवतात. मग गाय पुन्हा दैवत बनते आणि संस्कृत ही देवांची भाषा पुन्हा मानवी जगावर लादण्याचा प्रयत्न होतो.

आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाहांना विरोध सुरू होतो. लग्नावाचूनचे सहजीवन हा व्यभिचार ठरविला जातो, खाण्यावर जुनी बंधने येतात आणि पोशाखांवर निर्बंध लादले जातात. रामाच्या काळात नसलेल्या विमानांचा शोध सुरू होतो आणि महाभारतातली अस्त्रे खरीच असल्याचे लोकमानसावर बिंबविण्याचा प्रयत्न होतो. हा सारा समाजाला उलट दिशेने नेण्याचा, प्रगतीकडे पाठ फिरवायला लावण्याचा आणि स्वतंत्र व मुक्त विचारांकडून आंधळ्या धर्मश्रद्धांकडे नेण्याचा प्रयत्न असतो. मात्र, त्या प्रयत्नांनाही अनुयायी मिळतात. नव्या जगात हरलेली किंवा हरण्याची खात्री झालेली जुनकट मनाची व तशाच विचारांची माणसे त्यांच्या सुकत आलेल्या जीवनप्रवाहातच सुरक्षितता शोधू लागतात. त्याच प्रवाहात नव्या पिढ्यांनी जमेल तेवढे दिवस भिजत राहावे, असा आग्रह धरतात. मग त्यांना पंचगव्य आवडू लागते, गोमूत्र प्राशनाची तहान लागते आणि मोडत चाललेल्या जातिबंधनांचे सद्‌गुण त्यांना खुणावू लागतात.

हे मुस्लिम धर्मातच होते, असे नाही. हिंदू कर्मठही तसेच वागतात. मग जामा मशिदीच्या मौलवीचा शब्द कुराण शरिफाचा शब्द होतो आणि इकडे हिंदुत्वाच्या पुढाऱ्यांची वक्तव्ये वेदवाक्ये होतात. हा सारा उफराटाच नव्हे, तर अंधाऱ्या दिशेचा प्रवास होतो. जे स्थान आपल्या पूर्वीच्या साऱ्या पिढ्यांनी सोडले व मागे टाकले, त्या स्थानी नव्या पिढ्यांना पोहोचविण्याचा हा खटाटोप असतो. त्यात कोणतेही कर्मठ मागे नसतात- मग ते हिंदू असोत, मुसलमान असोत वा ख्रिश्चन. ही माणसे आपली मार्गदर्शक नसतात. आपल्या डोळ्यांभोवती झापड बांधायला आलेली नेते या नावाची ती मालक माणसे असतात. त्यांच्यामागूनच जाता येणे शक्य असते. त्यांच्यासोबतीने चालता येत नाही आणि त्यांच्यापुढे जाणे तर पाखंडच असते.

अशा वेळी ‘नव्या पिढ्यांनो या आणि माझ्या अंगावरून पुढे जा’- असे म्हणणारा रोमा रोलॉँ द्रष्टा ठरतो. या रोमा रोलॉँने महात्मा गांधींचे पहिले चरित्र लिहिले असते आणि त्याला नोबेल पारितोषिक देऊन जगानेही गौरविले असते.

Tags: सावरकर हेडगेवार गोळवलकर गुरुजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गांधीजी आणि त्यांचे टीकाकार गांधीजी आणि हिंदुत्ववादी सुरेश द्वादशीवार साधना दिवाळी अंक hedagevar savarakar golvalkar guruji gandhiji ani tyanche tikakar gandhiji ani hindutvavadi suresh dwadashiwar diwali ank weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके