डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विचारवंत म्हणून देशात व महाराष्ट्रात ओळखले जाणाऱ्यांचे चार प्रमुख वर्ग आहेत. मार्क्सवादी (यातच समाजवादीही समाविष्ट), गांधीवादी, हिंदुत्ववादी आणि आंबेडकरवादी. देशातला वा महाराष्ट्रातला कोणताही ‘विचारवंत’ उचलला, तर तो या चारपैकी एका वर्गात टाकता येतो आणि या चार गटांत जो बसत नाही, त्याला विचारवंत मानण्याची महाराष्ट्राची तयारीही बहुदा नसते. या चारपैकी मार्क्सवादी, हिंदुत्ववादी व आंबेडकरवादी या तीन गटांतले विचारवंत गांधी आणि गांधीविचार यांचे विरोधक व टीकाकार आहेत. त्यांच्याकडून गांधींना न्याय मिळण्याची शक्यता तेव्हा नव्हती आणि आताही नाही. दुर्दैवाने ज्या गांधीवाद्यांकडून गांधी समजावून सांगितला जाणे अपेक्षित होते, त्यांची शोकांतिका ही की- त्यांना गांधी कधी पेलताच आला नाही.

गांधीजींवर आजवर जगात एक लाखाहून अधिक पुस्तके लिहिली गेली (त्यानंतरचा क्रमांक नेपोलियनचा). गेली 100 वर्षे हा देश आणि जग त्यांचा व त्यांच्या भूमिकांचा उलट-सुलट विचार करीत आले. त्यांचा जन्मदिवस हा संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक शांततादिन म्हणून पाळायचे ठरविले, तर त्यांच्या मृत्यूचा दिवस भारतात हुतात्मादिन म्हणून मान्यता पावला. जगातील सहाशेहून अधिक विद्यापीठांत गांधी आणि गांधीविचार आज शिकविला जातो. गांधींच्या हयातीत त्यांना लाभलेल्या अनुयायांएवढी संख्या त्यांच्या आधी व नंतरही जगात कुणाला लाभली नाही. तीत त्यांचे अनुयायी होते तसे भक्तही होते. वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, ज्ञानवंत, राजकीय नेते व सामाजिक विचारवंतांसह सारे जसे त्यात होते, तशी त्यांची मनोभावे पूजा बांधणारा त्यांच्या भक्तांचा वर्गही मोठा होता.

आइन्स्टाईनसारख्या वैज्ञानिकाला ‘गांधी नावाचा माणूस या पृथ्वीतलावर आपली पावले कधी काळी उमटवून गेला, हे पुढल्या काळाला खरेदेखील वाटणार नाही’ असे लिहावेसे वाटले. लोकमान्य टिळकांना त्यांच्या पश्चात ‘देशाचे नेतृत्व करणारा माणूस’ गांधीत दिसला. त्यांनी जागविलेल्या लोकशक्तीचे माहात्म्य ओळखू शकलेले इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल हे दक्षिण आफ्रिकेचे गव्हर्नर जनरल स्मट्‌स यांना एकदा म्हणाले, ‘‘तुमच्या तुरुंगात असतानाच तुम्ही या माणसाचा निकाल लावला असता, तर आपले जगावरचे साम्राज्य आणखी काही दशके राहिले असते.’’ मार्टिन ल्यूथर किंगपासून नेल्सन मंडेलांपर्यंत आणि बराक ओबामांपासून ऑन साँग स्यू की यांच्यापर्यंतच्या साऱ्यांना गांधी हे त्यांचे प्रेरणास्थान व स्फूर्तिस्थळ वाटत आले. त्यांच्या धारणांकडे संशयाने पाहणारे व त्यांच्यावर टीका करणारे समाजसुधारकही त्यांनीच आखून दिलेल्या सत्याग्रहाच्या वाटेने त्यांची आंदोलने पुढे नेताना दिसले. गांधीजींचे जगाच्या मनावरील हे गारूड केवळ ज्या एका आधुनिक विचारवंताच्या प्रभावाशी ताडून पाहता येण्याजोगे आहे, तो म्हणजे- कार्ल मार्क्स.

मात्र मार्क्सला नंतरच्या काळात जगानेच दूर सारले; गांधींचे प्रभुत्व त्यावर अजून कायम आहे आणि ते दिवसेंदिवस अधिक वजनदार होताना दिसत आहे. मात्र या गांधींचा त्यांच्याच देशात खून झाला. स्वतःला सनातनी हिंदू म्हणवून घेणाऱ्या गांधींना सनातनी हिंदूच्याच गोळ्यांना बळी पडावे लागले. त्यांच्याच मार्गाने चालणाऱ्या चळवळींचे नेतेही त्यांच्यावर टीका करताना दिसले.  स्वातंत्र्याची जी चळवळ टिळकांच्या पश्चात गांधींनी लोकांची बनविली व सक्रिय केली, त्याच हेतूने पुढे सरकणाऱ्या अनेकांना ते अडचणीचे वाटले. हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब टाकणाऱ्या अमेरिकी हवाईदलातील पश्चात्तापदग्ध वैमानिकांनाही गांधींचा विचार आधाराला घ्यावासा वाटला आणि त्यांच्यासोबत ‘यापुढे अहिंसा किंवा अस्तित्वहीनता’ हे दोनच पर्याय जगापुढे उरले असल्याचे म्हणावेसे वाटले.

जगभरच्या स्वातंत्र्य चळवळींना प्रेरणा देणाऱ्या गांधींना त्यांच्याच देशात ‘समाजाला अहिंसेच्या शिकवणीने दुबळे बनवणारा’ म्हटले गेले. त्याच वेळी जगातले नवे देश त्यांचे नाव घेऊन स्वातंत्र्याच्या युद्धात उतरतानाही आढळले. कधी काळी (1919 पर्यंत) स्वतःला ब्रिटिश साम्राज्याचा नम्र सेवक म्हणविणारा आणि त्या सरकारने दिलेली हिंदकेसरी ही पदवी सन्मानाने स्वीकारणारा गांधी नंतरच्या काळात ते साम्राज्य मोडून काढायला कसा सिद्ध झाला आणि आरंभी चातुर्वर्ण्यव्यवस्थेचा पुरस्कार करणारा हा धर्मश्रद्ध माणूस ‘यापुढे माझ्या आश्रमात फक्त आंतरजातीय विवाहच होतील, सजातीय विवाहांना मी हजरही राहणार नाही’ असे म्हणण्याइतपत कसा बदलला? झालेच तर- स्वतःला सनातनी म्हणविणारा गांधी नव्या व आधुनिक संस्कृतीचा गौरव करणारा आणि ती एक चांगली बाब असेल, असे तरी कसे म्हणू शकला?

‘मी सांगूनही तुम्ही पुण्याच्या त्या बामणाचा (टिळक) बंदोबस्त केला नाही. परिणामी, आताचे ब्रिटिशविरोधी वातावरण देशात निर्माण करणे त्याला जमले. निदान आता या गांधीचा तरी बंदोबस्त तुम्ही तत्काळ करा. तुम्हाला ते जमणार नसेल, तर तसे करायला मला सांगा. मी त्याचा बंदोबस्त करतो’- असे एका समाजसुधारणावादी मराठी संस्थानिकाला इंग्रज सरकारला लिहून कळवावेसे वाटण्याचे कारण तरी कोणते होते?

माणसे काळानुरूप बदलतात. नव्या जगाची नवी आव्हाने त्यांना नवा विचार करायला लावतात. त्या विचारांनी त्यांच्या जुन्या भूमिकांवर मात केलेली असते. गांधी असा दर दिवशी बदलत गेलेला माणूस होता. त्याचमुळे अनेकांना तो गूढ वाटत आला असावा काय? त्याने कधी काळी उच्चारलेले एखादे वाक्य वा घेतलेली तात्कालिक भूमिकाच तेवढी घट्ट धरून त्यापुरताच विचार मांडण्याचा वा त्याला समजून घेण्याचा प्रयत्न त्याचमुळे चुकीच्या निष्कर्षावर नेणारा ठरतो काय? की, हे सगळ्याच महापुरुषांविषयीचे सत्य असते? न बदलणारी माणसे निष्ठावान असतात, की वठलेली? गांधी वठलेल्यांत जमा होणारा नाही. तो नव्या अभ्यासकांसमोर नित्य नवी परिमाणे घेऊन येणारा आहे. प्रासंगिक आणि मूलभूत यातला फरक  लक्षात न घेणाऱ्यांना याचमुळे तो गूढ व अनाकलनीय वाटत राहिला असणार. दीर्घ विचारांती भूमिका घेणे, त्या घेताना कमीत कमी लोक दुखावले व दुरावले जातील याची काळजी घेणे, अधिकाधिक लोक सोबत राहतील याविषयी सावध असणे आणि टोकाच्या भूमिका घेण्यापेक्षा मध्यममार्गी भूमिकांना महत्त्व देणे- हेही गांधींविषयीच्या अनाकलनीयतेचे कारण असावे काय? टोकाच्या भूमिका गाजतात. त्या घेणारी माणसे लोकांच्या लक्षात जास्त राहतात. अशांना काही थोड्यांचे नेतृत्व करणेही जमते. मात्र, अशी माणसे साऱ्या समाजाचे वा देशाचे नेतृत्व करायला तोकडी पडतात. त्यांना जाती-धर्माचे नेते होता येते, एखाद्या वर्गाचे वा समूहाचे पुढारी बनता येते; मात्र साऱ्या समाजाला सोबत नेण्याचे उत्तरदायित्व त्यांना पेलत नाही आणि ते त्यांच्या आवाक्याबाहेरचेही असते.

गांधींबाबतच्या परस्परविरोधी व काहीशा चमत्कारिक वाटाव्यात, अशा मतांना बऱ्याच अंशी ते स्वतःच कारणीभूत आहेत. सामान्यपणे विचारवंत व तत्त्वज्ञ त्यांचा विचार सूत्ररूपाने ग्रंथबद्ध करतात. आपल्याकडे शंकराचार्यांपासून वल्लभापर्यंत आणि ज्ञानेश्वरांपासून तुकोबारायांपर्यंतच्या साऱ्यांनी त्यांच्या भूमिका व श्रद्धाविषयक मते ग्रंथबद्ध केली आहेत. त्याआधी बुद्धविचार त्रिपिटकात संग्रहित झाला. कौटिल्याचे अर्थशास्त्र, पाणिनीचे व्याकरण किंवा वात्स्यायनाचे कामसूत्र ग्रंथबद्ध आहे. पाश्चात्त्यांत थेट प्लेटो व ॲरिस्टॉटलपासून पुढल्या बेकन-नित्शे-हेगेल-मार्क्स आणि अगदी अलीकडच्या रसेलपर्यंतच्या साऱ्यांनी त्यांचे विचार ग्रंथातून शिस्तबद्धरीत्या मांडले आहेत.

गांधीचा विचार ग्रंथबद्ध नाही. त्यात एकसूत्रता असली, तरी त्या मांडणीत शिस्त नाही. ‘मला माझा विचार लिहायला वेळच मिळाला नाही’ असे म्हणणारे गांधी नंतर ‘माझा विचार अद्याप पूर्णही झाला नाही’ असे म्हणून थांबले. शिष्यांनी फारच आग्रह धरला, तेव्हा ते ‘माझे जीवन हाच माझा संदेश’ असे म्हणून मोकळे झाले. पण त्यांच्या जीवनाला अनेक वळणे आहेत आणि त्यांचे रूप फारसे एकमार्गी दिसणारेही नाही. तब्बल 21 वर्षे दक्षिण आफ्रिकेत असतानाचे गांधी, 1915 मध्ये भारतात आल्यानंतरचे 1919 पर्यंतचे गांधी, 1920 ते 1936 या काळात देशाचे सर्वोच्च नेते असलेले गांधी आणि 1939 ते 1948 या काळात एका बाजूला देशाशी व दुसरीकडे ब्रिटिशांशी बोलत राहिलेले गांधी- असे त्यांच्या जीवनाचे अनेक अध्याय आहेत. शिवाय अगोदरचा अध्याय संपतो तिथेच पुढचा सुरू होतो, असेही त्यांच्या जीवनग्रंथाचे स्वरूप नाही. मग यातला कोणत्या वेळचा त्यांचा संदेश खरा मानायचा? अगोदरचा की अखेरचा? की, आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांना उत्तर देऊ शकणारा कोणताही?

गांधींच्या भूमिकांसंबंधी त्यांच्या निकटच्या अनुयायांमध्येही वेगवेगळी मते होती. सरदार पटेलांना गांधी आपला धाकटा भाऊ मानत. सरदार म्हणतात, ‘गांधी हा एक संतवृत्तीचा थोर समाजसुधारक होता.’ गांधी समाजसुधारक होते, याविषयी दुमत होण्याचे कारण नाही. मात्र एवढ्या साध्या वर्णनात गांधी बसत नाहीत. नेहरूंना मोतीलालजींसारखेच गांधीजी पितृवत्‌ वाटत. ‘जनतेच्या नाडीवर हात असणारा व जनमताचा सिस्मोग्राफ असलेला तो प्रगल्भ राजकारणी होता,’ हे नेहरूंचे त्यांच्याविषयीचे मत. पण तेही गांधींचे सारे व्यक्तिमत्त्व कवेत घेऊ शकणारे नाही. आचार्य कृपलानी जरा चावट होते. ते म्हणाले, ‘आम्ही गांधीजींचे अनुयायी असल्याने गांधी फक्त आम्हालाच समजला, असे आम्ही म्हणत राहिलो. पण कधी कधी गांधी आमचाही गोंधळ उडवायचा. एकदा तो म्हणाला, शेजाऱ्यावर प्रेम करा. त्यामुळे आम्ही शेजाऱ्यावर प्रेम करू लागलो. मग तो म्हणाला, शत्रूवरही प्रेम करा. तेव्हा आमचा गोंधळ उडाला. आम्ही आमच्या बुद्धीनुसार मग त्यातून मार्ग काढला. एकाच वेळी शेजारी आणि शत्रू या दोघांवरही प्रेम करायचे, तर आम्ही प्रथम शेजाऱ्याला शत्रू केले आणि मग त्याच्यावर प्रेम करण्याचा उद्योग सुरू केला.’... डॉ. राधाकृष्णन यांनी गांधींविषयीची अशी थोरामोठ्यांची असंख्य वचने त्यांच्या 300 पृष्ठांच्या संग्रहात एकत्र केली आहेत. ती गांधी जेवढा समजावून देतात, तेवढाच त्याच्याविषयीचा गोंधळही वाढवितात.

या गोंधळात नकारात्मक भर घालण्याचे आणि गांधीजी व त्यांची विचारधारा यांच्याविषयी जास्तीचा भ्रम उभा करण्याचेही प्रयत्न या देशात झाले. गांधींचा विचार खऱ्या स्वरूपात जनतेसमोर व विशेषतः नव्या पिढ्यांसमोर येऊ न देण्याचे काम गांधींच्या राजकीय व वैचारिक विरोधकांनी कमालीच्या नेटाने केले. विचारवंत म्हणून देशात व महाराष्ट्रात ओळखले जाणाऱ्यांचे चार प्रमुख वर्ग आहेत. मार्क्सवादी (यातच समाजवादीही समाविष्ट), गांधीवादी, हिंदुत्ववादी आणि आंबेडकरवादी. देशातला वा महाराष्ट्रातला कोणताही ‘विचारवंत’ उचलला, तर तो या चारपैकी एका वर्गात टाकता येतो आणि या चार गटांत जो बसत नाही, त्याला विचारवंत  मानण्याची महाराष्ट्राची तयारीही बहुदा नसते. या चारपैकी मार्क्सवादी, हिंदुत्ववादी व आंबेडकरवादी या तीन गटांतले विचारवंत गांधी आणि गांधीविचार यांचे विरोधक व टीकाकार आहेत. त्यांच्याकडून गांधींना न्याय मिळण्याची शक्यता तेव्हा नव्हती आणि आताही नाही. दुर्दैवाने ज्या गांधीवाद्यांकडून गांधी समजावून सांगितला जाणे अपेक्षित होते, त्यांची शोकांतिका ही की- त्यांना गांधी कधी पेलताच आला नाही.

वादी हा शब्द त्याच्या वास्तव अर्थाने कधी तरी समजून घ्यावा, असा आहे. विचार ही प्रवाही संकल्पना आहे. विचार कधी थांबत नाही. त्यामुळे विचारवंतही एखाद्या निर्णयापाशी थांबून राहत नाही. ज्यांनी विचारांची वैज्ञानिक पद्धत अवलंबिली आहे, त्यांचा विचार तर विज्ञानातील प्रयोगांप्रमाणे कुठे थांबतच नाही. आजच्या प्रयोगाने सिद्ध केलेले प्रमेय उद्याच्या प्रयोगामुळे असिद्ध होऊ शकते, या धारणेमुळे कोणताही वैज्ञानिक वा वैज्ञानिक पद्धतीने विचार करणारा अभ्यासू आपला निर्णय अखेरचा मानत नाही. सबब- विचारवंत हा अखेरपर्यंत विचारवंतच असतो, तो वादी होत नाही. वादी हा थांबलेला विचारवंत आहे. त्याने आपल्या निर्णयापुढे वा निष्कर्षापुढे पूर्णविराम नोंदवलेला असतो. मला गवसलेल्या सत्याखेरीज दुसरे काहीही खरे असू शकत नाही, या भूमिकेवर तो आलेला असतो. त्यामुळे मार्क्सवादी, आंबेडकरवादी किंवा हिंदुत्ववादी या वादी मंडळींचा (विचार न थांबलेल्या गांधींबाबतचा) दृष्टिकोन कमालीच्या सावधपणे विचारात घ्यावा लागतो.

मुळात हे तिन्ही प्रकारचे वादी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गांधींकडून पराभूत झाले आहेत किंवा गांधी पुढे चालत राहिला तरी हे त्यांच्या मुक्कामावर कायम राहिले आहेत. मुक्काम धरणे हा प्रकार माणसाला कालविसंगत वा कालबाह्य ठरविणारा होतो. गांधी कालबाह्य का होत नाही आणि वादींचे हे वर्ग कालविसंगत का होतात, या प्रश्नाच्या उत्तरात गांधींची सातत्याने होत राहिलेली व अजून होत असलेली वाटचाल पाहावी लागते.

मार्क्ससमोर कामगारांचा वर्ग आहे आणि त्याचे भांडवलदारांनी चालविलेले शोषण आहे. त्याच्यासमोर 19 व्या शतकातली भांडवली शोषणव्यवस्था आहे. ती उखडून टाकण्याचा व कामगारांचे राज्य आणण्याचा विचार तो मांडतो. कामगारांचे येणारे राज्य आर्थिक विषमता नाहीशी करील व समता आणील, असे तो म्हणतो. ही समता आली की, राज्य व धर्म या गोष्टी विलयाला जातील आणि माणूस मुक्त होईल, अशी त्याची धारणा आहे. मार्क्स विसाव्या शतकातच कालबाह्य झालेला आणि मार्क्सवादी म्हणविणाऱ्या राज्यव्यवस्थांनीही आता टाकून दिलेला विचारवंत आहे... भारतातील कामगार मार्क्सच्या विचारामागे वा मार्क्सवादी म्हणविणाऱ्यांच्या मागे कधी गेला नाही. तो ‘गांधीजी की जय’ म्हणणाऱ्यांचा वर्ग आहे.

हिंदुत्ववाद्यांची शोकांतिकाही हीच आहे. या देशातला हिंदू हिंदुत्ववादी संघटनांच्या मागे 1980 पर्यंत कधी गेला नाही. तो हिंदू महासभेसोबत नव्हता, संघासोबत नव्हता आणि देशभरातील लहानसहान हिंदूंच्या म्हणविणाऱ्या संघटनांसोबतही कधी गेला नाही. हिंदूंमधील सवर्णांचे व अवर्णांचे प्रचंड वर्ग गांधींच्या मागे आणि त्यांच्या आंदोलनासोबत राहिले, हे वास्तव आहे. गांधींनी आपला केलेला हा पराभव हिंदुत्ववाद्यांना तेव्हा व आताही पचविणे जमलेले नाही.

आंबेडकरांच्या मागे गेलेला अनुयायांचा वर्ग या देशातील जातिव्यवस्थेच्या कर्मठ पकडीमुळे प्रामुख्याने त्यांच्या स्वजातीयांचाच- देशभरातील व महाराष्ट्रातीलही दलितांचे इतर वर्ग मोठ्या प्रमाणात गांधींसोबतच राहिले. हे वास्तव लक्षात न घेता, गांधींना दलितविरोधी ठरविण्याचा प्रयत्न या देशात फार झाला. याचेही वास्तव कधी तरी लक्षात घेतले जाणे आवश्यक आहे.

गांधीवाद्यांच्या दृष्टीला गांधीभक्तीची मर्यादा राहिली. त्यांच्यातील मोठा वर्ग गांधींच्या पश्चात विनोबांनाच त्यांचा पूर्णावतार मानत राहिला. पण वस्तुस्थिती ही आहे की, गांधीजींच्या आयुष्यात असलेला लोकसंघर्षाचा अतिशय महत्त्वाचा व मोठा अध्याय विनोबांच्या वाट्याला आला नाही आणि त्या वाटेने ते गेलेही नाहीत. सबब- गांधींच्या नंतर स्वतःला गांधीवादी म्हणविणारे लोक जनतेच्या संघर्षापासून व प्रश्नांपासून दूर राहिले आणि जनतेनेही त्यांच्याकडे फारसे लक्ष कधी दिले नाही. या वादी मंडळींचा गांधींवरील रोष सहानुभूतीने समजून घ्यावा, असा आहे. मात्र त्यांनी रंगविलेला गांधी त्यांच्या रंगातला आहे, तो गांधीच्या स्वतःच्या रंगातला नाही- हे अभ्यासकांनी लक्षात घ्यायचे आहे.

Tags: महात्मा गांधी गांधीवादी सुरेश द्वादशीवार गांधीजी आणि त्यांचे गूढ गांधीजी आणि त्यांचे टीकाकार Mhatma Gandhi Gandhivadi Suresh Dwadashivar Gandhiji aani tyanche gudh Gandhiji aani tyanche tikakar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके