डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

घाम गाळील त्याला दाम, श्रम करील त्याला मोबदला किंवा कसेल त्याची जमीन- ही आपली भूमिका तिच्या तार्किक टोकापर्यंत नेत गांधीजी म्हणाले, या न्यायाने बापाची संपत्ती मुलाला मिळण्याचे कारण नाही. प्रत्येकाने आपली उपजीविका आपल्या श्रमातून मिळवायची असते. बापाच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती समाजाच्या स्वाधीन केली जाणे, हाच न्याय आहे. गांधींनी त्यांची ही भूमिका लुई फिशर या त्यांच्या चरित्रकाराजवळ सविस्तरपणे मांडली आहे. एकाच पिढीच्या काळात समाजातली विषमता व शोषण संपविण्याचा हा मार्क्सहूनही अधिक मूलभूत असा क्रांतिकारी उपाय आहे.

जगभरचे मार्क्सवादी कार्ल मार्क्सला ज्ञानाचा पूर्णविराम मानत आले. त्यांच्यातील काहींनी स्थलकालपरत्वे आपापली माणसे त्यात स्वल्पविराम व अर्धविराम म्हणून त्याच्या सोबतीने उभी केली. पण मार्क्स हाच त्या साऱ्यांचा अखेरचा व सर्वाधिक महत्त्वाचा विरामबिंदू राहिला. मार्क्सच्या चष्म्यातून जगाकडे व जगातील साऱ्या व्यवहाराकडे पाहण्याची दृष्टी या वर्गाने स्वीकारली. त्याला गांधी वेगळाच नव्हे, तर मार्क्सच्या तुलनेत तोकडा दिसणेही स्वाभाविक होते. त्याचमुळे सगळ्या भारतीय व मराठी मार्क्सवाद्यांनी गांधी हा मार्क्सहून लहान वा अपूर्ण कसा आहे, हेच सांगण्याचा प्रयत्न केला. रशियाच्या मार्क्सवादी राज्यकर्त्यांना गांधी, काँग्रेस व त्या पक्षाच्या नेतृत्वात भारतात झालेला स्वातंत्र्यलढा हा तसाही भांडवलदारांच्या हस्तकांनी चालविलेल्या लढ्यासारखा वाटत राहिला. स्टालिन हा पटेल व नेहरूंना भांडवलदारांचे हस्तकच म्हणत असे. वास्तविक, मार्क्स आणि गांधी यांच्यातील मूलभूत भेद गांधींनीच स्पष्ट केला आहे. मार्क्स हा समूहापाशी सुरू होऊन व्यक्तीकडे येण्याचा प्रयत्न करतो, मात्र तो तिथपर्यंत कधी पोहोचत नाही- असे नोंदवून गांधीजी म्हणाले, मी व्यक्तीपाशी सुरू होऊन तिच्याचजवळ पोहोचत व थांबत असतो. समाजाच्या दुरुस्तीहून माणसाची दुरुस्ती सोपी व सहजसाध्य असते. माणसे दुरुस्त झाली की समाजाची काळजी करण्याजोगे मग फारसे काही उरतही नाही.

मार्क्सने भांडवलशाहीतील शोषणाविरुद्ध कामगारांच्या क्रांतीचा सिद्धांत मांडला. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांच्यातील सशस्त्र संघर्षात अखेर ‘नाही रे’वाल्यांचा विजय होतो. भांडवलदार त्यांच्या हुकूमतीसह नाहीसे होतात वा मारले जातात. क्रांतीच्या अखेरीस कामगारांची हुकूमशाही सत्तेवर येते आणि ती आर्थिक विषमतेचा भांडवलशाहीसोबतच शेवट करते. त्याच वेळी राज्य व धर्म या भांडवलशाही जुलूमाला पोषक ठरणाऱ्या व्यवस्थाही इतिहासजमा होतात. माणूस मुक्त होतो आणि एका अराज्यवादी व समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा उदय होतो. गांधीला सशस्त्र लढा आणि त्यातला हिंसाचार जसा मान्य नाही, तसा वर्गसंघर्षही मान्य नाही. गांधी हा वर्ग- समन्वयाचीच नव्हे तर समाजाच्या एकात्मतेची भाषा बोलणारा विचारवंत आहे.

भांडवलशहांना संपवून भांडवली शोषण समाप्त करता येणार नाही. भांडवलदार व धनवंत यांच्या मनात संपत्तीविषयीची विश्वस्ताची भावना जागवूनच ते संपविता येईल, असे गांधींचे म्हणणे आहे. शोषण ही केवळ व्यवस्था नाही, ती वृत्ती आहे. ती संपवायची तर त्यासाठी योग्य त्या मानसिक संस्कारांचाच आग्रह धरावा लागतो. मार्क्स म्हणाला, भांडवल ही चोरी आहे. गांधी म्हणाला, भांडवल ही त्याच्या मालकाकडे समाजाच्या हितासाठी सोपविलेली साधनयंत्रणा आहे. ही संपत्ती माझी नाही, तिच्यावर समाजाचा अधिकार आहे आणि आपण तिचे विश्वस्तच केवळ आहोत- हा ‘सबै भूमी गोपाल की’ विचार भांडवली शोषण संपविण्याचा सहज-साधा व निःशस्त्र मार्ग आहे. ही व्यवस्था अल्पावधीत निर्माण करण्यासाठी गांधीने आणखीही एक विलक्षण क्रांतिकारी उपाय सुचविला. घाम गाळील त्याला दाम, श्रम करील त्याला मोबदला किंवा कसेल त्याची जमीन- ही आपली भूमिका तिच्या तार्किक टोकापर्यंत नेत गांधी म्हणाला, या न्यायाने बापाची संपत्ती मुलाला मिळण्याचे कारण नाही. प्रत्येकाने आपली उपजीविका आपल्या श्रमातून मिळवायची असते. बापाच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती समाजाच्या स्वाधीन केली जाणे, हाच न्याय आहे. गांधींनी त्यांची ही भूमिका लुई फिशर या त्यांच्या चरित्रकाराजवळ सविस्तरपणे मांडली आहे. एकाच पिढीच्या काळात समाजातली विषमता व शोषण संपविण्याचा हा मार्क्सहूनही अधिक मूलभूत असा क्रांतिकारी उपाय आहे.

दुर्दैव हे की गांधींचा हा विचार त्यांच्या विरोधकांएवढाच त्यांच्या अनुयायांनीही समाजापासून दडवून ठेवण्याचेच पाप केले. कदाचित त्यांच्या अनुयायांनाही तो विचार परवडण्याजोगा वाटला नसावा. गांधींची ही भूमिका ॲरिस्टॉटलच्या संपत्तीविषयक विचारांशी ताडून पाहिली पाहिजे. माणसाने मिळविलेली संपत्ती ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग होते. त्यामुळे तो समाजात व अन्यत्र ओळखला जातो. तो भाग हिरावून वा काढून घेणे हे व्यक्तिमत्त्वाचे खच्चीकरण आहे, असे ॲरिस्टॉटल म्हणाला. गांधीने व्यक्तिमत्त्वाचे खच्चीकरण सांगितले नाही. प्रत्येकाने आपले व्यक्तिमत्त्व स्वबळावर (बापाच्या बळावर नव्हे) विकसित करावे, असे म्हटले. त्याच वेळी शोषणकर्त्याच्या मनातील शोषक संपविला पाहिजे, हा विधायक विचारही त्याने मांडला.

मार्क्सवाद्यांचा गांधींवरील मुख्य आक्षेप ते देशातील भांडवलदारांची स्वातंत्र्यलढ्याला मदत घेतात हा होता. या मदतीमुळे गांधी भांडवलदारांच्या विरोधात कधी भूमिका घेऊ शकणार नाहीत आणि कामगारांच्या बाजूने त्यांना उभे राहता येणार नाही, असे ते म्हणत. स्वातंत्र्यलढ्यासाठी गांधीजींनी सामान्य माणसांसारखेच बजाज वा बिर्ला या भांडवलदारांकडूनही अर्थसाह्य घेतले, हे खरे आहे. गोदरेज यांनीही त्यांच्या टिळक फंडाला मोठी मदत केली, ही गोष्ट जगजाहीर आहे. त्यामुळे कम्युनिस्टांचा हा आक्षेप वरपांगी खरा वाटावा असा आहे. प्रत्यक्षात गांधींवर कोणत्याही भांडवलदाराचा प्रभाव कधी पडला नाही आणि त्यांच्यातला कोणीही गांधींना त्यांच्या सत्याग्रहाची व आंदोलनाची दिशा सांगू शकला नाही. तुम्ही तुमच्या- जवळच्या संपत्तीचे मालक नसून विश्वस्त आहात, तुमच्या संपत्तीवर या देशाचा व या देशातील जनतेचा अधिकार आहे; सबब- ही संपत्ती तुम्ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी व उद्याच्या विकासासाठी वापरली पाहिजे, ही शिकवण गांधींनी या उद्योगपतींच्या गळी उतरविली होती. त्यांचे नैतिक सामर्थ्य एवढे मोठे की, त्यांचा शब्द या उद्योगपतींनी कधी खाली पडू दिला नाही. जमनालाल बजाज हे गांधीजींना पितृस्थानी मानत आणि गांधीही त्यांना आपला पाचवा मुलगा म्हणत. जे उद्योगपती स्वातंत्र्यलढ्याबाबत साशंक होते आणि इंग्रजी राजवटीच्या आश्रयामुळेच आपले उद्योग सुरक्षित आहेत असे मानत होते, त्यांचा यात समावेश नाही. मात्र त्यांच्यातील अनेकांनाही गांधींच्या आंदोलनाविषयी व सत्याग्रहाविषयी आस्था होती. इंग्रजांचे राज्य आज ना उद्या जाईल आणि येथे येणारे नंतरचे राज्य गांधीजींच्या नेतृत्वातले असेल, याचे भयही त्यांच्यातील अनेकांच्या मनात होते. सबब- गांधींच्या फार जवळ जाणे त्यांच्यातील अनेकांनी टाळले असले, तरी ते गांधींची कधी उपेक्षा करू शकले नाहीत. गांधी कामगारांच्या बाजूने उभे राहणार नाहीत, हा मार्क्सवाद्यांचा संशयही खरा नव्हता.

 भारतातील कामगारांचा पहिला देशव्यापी संप कम्युनिस्टांनी घडविला नाही. लोकमान्य टिळकांना सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली तेव्हा देशातील सारे कामगार संतप्त होऊन संपावर गेले. भारतातील कामगार मार्क्सवादी असण्याहून राष्ट्रवादी देशभक्तांच्या अधिक जवळ होता, असे सांगणारे हे वास्तव आहे. तेही येथील कम्युनिस्टांनी फारसे लक्षात घेतले नाही.

मार्क्सचे ज्येष्ठ अनुयायी लेनिन आणि स्टालिन यांनी मार्क्सवादाच्या अमलासाठी रशियन साम्राज्यातली पाच कोटी माणसे मारली. मार्क्सवादी क्रांतीत हिंसा बसणारी असल्यामुळे तेवढ्या माणसांचा बळी जगभरच्या मार्क्सवाद्यांनी एक तर क्षम्य ठरविला किंवा त्याच्याकडे त्यांनी साफ दुर्लक्षच केले. लेनिन म्हणाला, भांडवलशाहीत  संपत्तीचा संचय मोठा झाला की, तिच्यातले उद्योजक नव्या बाजारपेठा शोधायला साम्राज्यवादाचा मार्ग अवलंबितात. मात्र तसे म्हणणाऱ्या लेनिनने स्वतःच रशियन साम्राज्य सावरण्याचा, बळकट करण्याचा आणि विस्तारण्याचाही प्रयत्न केला. स्टालिनने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस सारा पूर्व युरोपच रशियाच्या टाचेखाली आणून त्यावर आपला कम्युनिझम लादला. आपल्या प्रयत्नांना विरोध करणाऱ्या साऱ्यांना त्याने इतिहासजमा केले...

1919 पर्यंत गांधींनाही इंग्रजांची साम्राज्यशाही उपकारक वाटत राहिली. ते स्वतःला ब्रिटिश साम्राज्याचा नागरिक म्हणवीत होते. परंतु त्या वर्षी झालेल्या जालियनवाला बागेतील हत्याकांडाने त्या साम्राज्यशाहीचे जुलूमी व प्रलयकारी चित्र त्यांच्यासमोर उभे केले. परिणामी, हे साम्राज्य सैतानाचे आहे, असे ते म्हणू लागले. त्या काळापर्यंत गोखल्यांच्या भाषेत, ‘ब्रिटिश साम्राज्य ही सुधारणेची संधी वा वरदान आहे’ असे मानणाऱ्या गांधींना मग सगळा साम्राज्यवादच सैतानी दिसू लागला. त्यांनी केवळ इंग्रजांच्या साम्राज्यवादाविरुद्धच नाही तर हिटलर, मुसोलिनी आणि फिजो यांच्या साम्राज्याविरुद्धही भूमिका घ्यायला सुरुवात केली. सगळ्या हुकूमशहांच्या व साम्राज्यवाद्यांच्या विरोधात भूमिका घेणारे गांधी रशियन हुकूमशाहीच्याही विरोधात होते, हे वेगळे सांगण्याचे कारण नाही. रशियाच्या साम्राज्यवादाविरुद्ध त्यांनी फार प्रगट भाष्य केले नसले, तरी नेहरूंच्या रशियाप्रेमावर ते मनातून सक्त नाराजच होते. लाहोर काँग्रेसचे अध्यक्षपद वल्लभभार्इंना न देता नेहरूंना देण्याचे गांधीजींच्या मनातले एक महत्त्वाचे कारण नेहरूंवरील रशियन साम्यवादाचे गारूड उतरविणे, हेही होते.

चीनचा हुकूमशहा माओ त्से तुंग हाही मार्क्सवादाचा आग्रही पुरस्कर्ता होता. मार्क्सप्रणीत समता आणण्यासाठी त्याने चीनवर जी हुकूमशाही लादली, तिचे स्वरूप कमालीचे पाशवी होते. त्याच्या राजवटीत सात कोटी चिनी माणसे मारली गेली. त्याच्या मृत्यूपर्यंत तो देश अर्धपोटी व अर्धनग्न राहिला. त्याचमुळे कदाचित ‘भांडवली श्रीमंतीपेक्षा समाजवादी दारिद्य्र चांगले’ अशा निरर्थक व भ्रामक कवितांनी त्याने त्याच्या अनुयायांना झुलवीत ठेवले असावे. त्याचा मृत्यू होताच चीनने डेंग हसियाओ पिंगच्या नेतृत्वात तेथील मार्क्सवाद माओसकट संपविला... या माओनेही साम्यवादी क्रांतीचा एक वेगळा विचार मांडला आहे. चीन आणि भारतासारख्या कृषिप्रधान देशात  कामगार फार नसल्याने व आहेत तेही संघटित नसल्याने कामगारक्रांती होणार नाही, असे तो म्हणाला. या देशात भांडवली शोषण नाही, त्याऐवजी येथे शहरे खेड्यांचे शोषण करतात- असे त्याचे म्हणणे होते. खेड्यात तयार होणारा कच्चा माल अल्पदराने खरेदी करून शहरी कारखानदार त्याचे पक्क्या मालात रूपांतर करतात. पुढे हाच माल ते चढ्या दराने खेड्यांना विकतात. परिणामी, शहरे व्यापारी आणि खेडी हा त्यांचा बाजार होतो. शहरी व्यापाऱ्यांकडून होणारे आपले शोषण जेव्हा असह्य होते, तेव्हा खेडी संघटित होतात आणि शहरांना घेराव करतात. त्या संघर्षात खेड्यांचा विजय होतो आणि शहरातील उत्पादनाची साधने त्यांच्या ताब्यात जातात. माओची समतावादी क्रांती अशी होती... माओला स्वतःला मात्र त्याची ही क्रांती चीनमध्ये घडविता आली नाही. त्याचा हा विचारही गांधींच्या उत्तरकाळात जगापुढे आला.मात्र गांधींचे द्रष्टेपण त्याच्या या योजनेला विधायक उत्तर देणारे आहे.

शोषक सामर्थ्यवान आणि साधनसंपन्न असल्यामुळेच त्याला इतरांचे शोषण करता येते. ज्या आयुधांच्या बळावर त्याला हे शोषण करणे जमते, ती आयुधे त्याच्या हातून काढून घेऊन शोषितांकडे सोपविली आणि त्यांना या शोषणाला तोंड देण्याएवढे सामर्थ्य मिळवून देता आले, तर शोषण थांबते. शोषक शांत होतात आणि शोषितही सुखी व समाधानी होतात. गांधींच्या ग्रामस्वराज्याच्या विचारात शहरातली शोषणाची साधने खेड्यात पोहोचविण्याची योजना आहे. खेडी स्वयंपूर्ण नाहीत म्हणून त्यांचे शोषण होते. ती स्वयंपूर्ण झाली आणि आपल्या गरजांची पूर्ती स्वतःच करू लागली, तर त्यांचे शोषण कोणालाही करता येणार नाही. गांधींचे ग्रामस्वराज्याचे स्वप्न अशा स्वयंपूर्ण ग्रामराज्याचे होते. त्यांचे खेडे आजच्यासारखे दरिद्री, अंधारे, घाण आणि मागासलेले नव्हते. त्यांच्या खेड्यात नाट्यगृहापासून सगळ्या सांस्कृतिक साधनांची उपलब्धी होती. त्यांनी पाहिलेले सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे स्वरूपही आजच्यासारखे वरून खाली होत गेलेल्या सत्तेच्या वाटपासारखे नव्हते. त्यांच्या स्वप्नातला भारत हा स्वयंपूर्ण ग्रामराज्यांचे संघराज्य होता. त्यातले प्रत्येक गाव व खेडे स्वयंपूर्ण राहणार होते. स्वबळावर स्वतंत्रपणे उभे राहू शकणाऱ्या या खेड्यांचे शहराकडून होऊ शकणारे शोषण त्यात राहणार नव्हते. माओच्या नवमार्क्सवादाला गांधींनी दिलेले उत्तर असे होते.

मात्र भारतातील मार्क्सवाद्यांचा गांधींवरील राग वैचारिक असण्याहून राजकीय अधिक होता. जगभरचे व आपलेही मार्क्सवादी (यात समाजवाद्यांचाही समावेश आहे) देशातील जनतेसमोर मार्क्सचे ‘शेतकरी व कामगारांच्या राज्याचे’ स्वप्न ठेवत आले. ‘आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुम्हाला राज्य देऊ,’ हा त्यांचा नारा होता. भारतात कम्युनिस्ट पक्षाची रीतसर स्थापना 1925 मध्ये झाली. त्याआधीही त्या विचाराची माणसे भारतात सक्रिय होतीच. मात्र त्यांचे लक्ष्य असलेला भारतीय शेतकरी व कामगार त्यांच्यासोबत कधी गेला नाही. तो त्यांच्या काळातही ‘गांधीजी की जय’ म्हणत गांधींसोबत राहिला. मार्क्सवाद्यांचा जनतेच्या हातून झालेला पहिला पराभव भारतात व तोही गांधींच्या नेतृत्वात झाला. सगळ्या मार्क्सवाद्यांना छळत आलेले हे कायमचे शल्य आहे. स्वाभाविकच त्यामुळे कोणताही मार्क्सवादी लेखक वा विचारवंत गांधींना कधी न्याय देऊ शकला नाही व देणार नाही, हे उघड आहे. गांधींची लोकप्रियता थोडीशी आपल्या वाट्याला यावी म्हणून त्यांचे गोडवे गाणे वा त्यांच्यासोबत राहण्याचे नाटक करणे वेगळे आणि त्यांच्याविषयीची खरी आस्था बाळगणे वेगळे आहे. मार्क्सवाद्यांचे एक दुर्दैव हे की, त्यांच्या पक्षाची स्थापना भारतात होताच त्यावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली. या बंदिस्त अवस्थेत त्या पक्षाच्या काही नेत्यांनी देशात क्रांतिकारी कारवाया केल्या. त्यात पकडले गेलेले अनेक जण कित्येक वर्षे तुरुंगात राहिले. इंग्रजांचे राज्य देशावर असेपर्यंत कम्युनिस्ट पक्ष हा अंधारात राहून काम करणाराच पक्ष होता.

येथील मार्क्सवाद्यांनी माओची नक्कल करीत तेलंगण विभागात शेतकऱ्यांचा सशस्त्र उठाव घडवून आणण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात केला. कॉ.बी.टी. रणदिवे हे त्यांचे नेते होते. जमीनदारांची व मोठ्या शेतकऱ्यांची कत्तल आणि त्यांच्या ताब्यातील जमिनीचे भूमिहीनांत वाटप हे त्या आंदोलनाचे स्वरूप होते. प्रत्यक्षात हे आंदोलन फार काळ चालले नाही आणि केंद्रीय गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी ते कठोरपणे मोडूनही काढले. या आंदोलनकाळातली एक घटना येथील कम्युनिस्टांचे क्रांतीविषयक अदूरदर्शीपण सांगणारीही आहे. आपल्या आंदोलनाला रशियाची मदत मिळावी म्हणून रणदिव्यांनी त्यांचे एक शिष्टमंडळ रशियात स्टालिनच्या भेटीला पाठविले. स्टालिनने त्यांना विचारलेला पहिला प्रश्न तुमचे आंदोलन देशाच्या नेमक्या कोणत्या भूभागात सुरू आहे, हा होता. या शिष्टमंडळाने तेलंगणचा प्रदेश त्याला  नकाशात दाखवताच तो अनुभवी क्रांतिकारक मनातून हसला आणि म्हणाला- अरे, असा उठावच करायचा आणि त्याला आमच्या शस्त्रास्त्रांची मदत घ्यायची, तर त्यासाठी किमान देशाच्या सीमेवरचा वा समुद्र- किनाऱ्यावरचा प्रदेश निवडायचा. आमची मदत भारत सरकारच्या ताब्यातील प्रदेश ओलांडून तुमच्यापर्यंत येणार कशी आणि तुम्ही ती वापरणार कशी? सशस्त्र आंदोलनाची आखणी साऱ्या विचारानिशी करता न येणे, हे त्या क्रांतिवीरांचे अपयश येथे लक्षात घेण्याजोगे आहे. पुढल्या काळात गांधीजींचे एक अनुयायी आचार्य विनोबा भावे यांनी नेमक्या याच भागात त्यांच्या भूदानाच्या चळवळीचा आरंभ केला, हेही येथे नोंदविण्याजोगे.

मार्क्सवादातून हिंसा वजा केली आणि त्यात लोकशाहीची भर घातली की, त्याचा समाजवाद होतो. या विचाराचा आधार घेणारे समाजवादी पक्ष साऱ्या जगात जन्माला आले तसे ते भारतातही आले. मात्र इथल्या समाजवाद्यांनाही ‘मार्क्स अधिक लोकशाही’ या चौकटीत जेवढा गांधी बसतो तेवढाच मान्य होणारा होता. त्याचा बाकीचा विचार हा त्यांच्याही टीकेचाच विषय होता. त्यांचा प्रवास मात्र असा की, स्वतःला समाजवादी म्हणवून घेणारे त्याचे सगळे दिग्गज नेते- मग ते जयप्रकाश असोत वा लोहिया- हे पुढल्या काळात गांधीशरण झाले. एवढे की, त्यांच्यातल्या काहींनी गांधी विचारासाठी समाजवादही सोडला. 1935 मध्ये काँग्रेस समाजवादी पक्ष या औपचारिक नावाची एक संघटना काँग्रेसमध्ये सहभागी झाली. जयप्रकाश, लोहिया, आचार्य नरेंद्र देव, पटवर्धनबंधू, अरुणा असफअली हे त्या संघटनेचे महत्त्वाचे नेते होते. 1942 च्या चले जावच्या आंदोलनाच्या आरंभी गांधीजींसह पटेल, नेहरू व आझाद यांच्यासारखे काँग्रेसचे आघाडीचे नेते सरकारने तुरुंगात डांबले. या काळात या समाजवादी नेत्यांनी भूमिगत होऊन ती चळवळ चालविली व जिवंत ठेवली. त्यामुळे या नेत्यांच्या नावाभोवती एक विलक्षण असे तेजोवलय तेव्हा निर्माण झाले होते.

देश स्वतंत्र झाल्यानंतर 1952 मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत समाजवादी पक्ष केरळ या एका राज्यात सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून आला. मात्र ते सरकार फार काळ आपले बहुमत राखू शकले नाही. या निवडणुकीत समाजवादी पक्ष काँग्रेसचा पर्याय म्हणून उभा राहू शकेल, अशी आशा अनेकांनी बाळगली होती. मात्र देशातील बहुतेक सर्व भागांत त्या पक्षाचा मतदारांनी दारुण पराभव केला. या पराभवाने त्यातील अनेक नेत्यांनाच वैफल्य आणले. जयप्रकाश पक्षापासून दूर झाले आणि पुढे विनोबांच्या नेतृत्वात भूदान आंदोलनात सामील झाले. पटवर्धन बंधू जे. कृष्णमूर्तीचे अनुयायी होऊन राजकारणापासून दूर झाले. नरेंद्र देवांना त्या निवडणुकीत आपली अनामत रक्कमही वाचविता आली नाही. लोहिया राहिले, मात्र त्यांच्या स्वभावाने त्यांना फारसे अनुयायी मिळू दिले नाहीत. देशभरच्या समाजवाद्यांचे एक वैशिष्ट्य हे की, त्यांच्यातला प्रत्येकच जण हा एक स्वतंत्र विचार असतो. त्यामुळे तो पक्ष केवळ नेत्यांचाच झाला आणि त्याला मतदार वा अनुयायी फारसे लाभले नाही. हा दोष विचारांहून अधिक व्यक्तींचाच मानला पाहिजे. काँग्रेसजवळ विचार नाही आणि ‘गांधींचा विचार पूर्ण नाही’ अशी टीका करणारा समाजवाद्यांचा वर्ग आपला विचार कधी उभा करू शकला नाही. त्या वर्गाजवळ संघटनकौशल्य नावाची गोष्टही अभावानेच होती. (आज भारतात समाजवादी म्हणून राजकारणात असलेले मुलायमसिंह, लालूप्रसाद किंवा पासवान हे पुढारी समाजवादी तर नाहीतच... खरे तर ते नेमके काय आहेत, हे आता त्यांनाही सांगता येणार नाही.) मात्र समाजवाद हा शब्द लोकप्रिय असल्याने तो गांधींनाही चिकटविण्याचे व ‘गांधीप्रणीत समाजवाद’ हा नवाच आकृतिबंध जन्माला घालण्याचे काम संघप्रणीत भाजपपासून देशभरच्या काँग्रेसेतर पक्षांनी 1977 च्या सुमारास केले. आता ते सारेच जनतेच्या विस्मरणात गेले आहे.

मार्क्स इतिहासजमा झाला आहे आणि समाजवाद पुस्तकात व काही थोड्यांच्या स्वप्नात शिल्लक राहिला आहे. दक्षिण अमेरिकेत आणि आफ्रिकेत काही देश ते नावच तेवढे चालवीत आहेत. मात्र या सबंध काळात या स्वतःला डावे म्हणविणारे विरोधक व टीकाकारांनी मोडून काढायला घेतलेला गांधीविचार शाबूत राहिला आहे. झालेच तर, तोच उद्याचा विचार असेल, असे अनेक विचारवंतांना आता वाटू लागले आहे.

Tags: समाजवादी पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष सुरेश द्वादशीवार गांधीजी आणि मार्क्सवादी गांधीजी आणि त्यांचे टीकाकार समाजवादी Samajvadi party. Indian Communist party Suresh Dwadashivar Gandhiji aani Marksvadi va samajvadi Gandhiji aani tyanche tikakar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके