डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

1857 च्या युद्धातील हिंदू-मुस्लिम तेढ लक्षात घेऊन हिंदुस्थानात दोन संसद भवने असावीत; त्यातले एक हिंदूंचे व दुसरे मुसलमानांचे असावे, अशी योजना 1858 ते 1860 च्या दरम्यान तयार केली गेली. तीही यथावकाश बारगळली. या सबंध काळात येथील मुसलमानांचा वर्ग वेगळेपणाची व वेगळ्या राष्ट्रीयत्वाची भाषा बोलतच होता. शाह वलीउल्ला व सर सय्यद अहमद यांच्या भाषेचे स्वरूप अनुक्रमे टोकाचे आणि सौम्य असे असले, तरी तिचा आशय एकच होता. मुसलमानांकडून त्यांचे वेगळे राष्ट्रीयत्व असे सांगितले जात होते आणि देशाची फाळणी करायला इंग्रज सत्ताही आरंभापासून तयारच होती.

मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये झाली असली, तरी तिची मानसिकता घडविण्याची प्रक्रिया त्याआधी कित्येक वर्षेच नव्हे, तर अनेक शतके होत होती. सावरकरांच्या मते, या प्रक्रियेचा आरंभ पवित्र कुराणापासून म्हणजे इसवी सनाच्या सातव्या शतकापासून होतो; तर आंबेडकर तो आणखी तीनशे वर्षांनंतर आलेल्या हदीस या कुराणभाष्यापासून होतो, असे मानतात. प्रथम धर्माच्या वेगळेपणाखातर विभक्त मतदारसंघ मागणे, पुढे त्या संघांची संख्या वाढवून घेणे, अल्पसंख्य असल्याचे वा राष्ट्रीयत्व वेगळे असल्याचे सांगून विविध सवलती इंग्रज सरकारकडून मिळविण्याचा प्रयत्न करणे आणि भारताचे स्वातंत्र्य दृष्टिपथात आल्यानंतर व त्याचे भावी राज्यकर्ते धर्माने हिंदू असतील हे लक्षात आल्यानंतर फाळणीची व पाकिस्तानची मागणी करणे, हे सारे त्या मानसिकतेचे कालानुरूप बदलत गेलेले पवित्रे आहेत. सावरकरांना आणि आंबेडकरांना हे स्पष्टपणे सांगणे व नोंदविणे जमले, कारण ते देशाच्या मध्यवर्ती प्रवाहाचे वा स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करीत नव्हते.

देशाच्या (वा घराच्याही) सांभाळाची जबाबदारी ज्याच्यावर असते, त्याच्यावर आपली गृहछिद्रे दडविण्याचे उत्तरदायित्वही येत असते. टिळक-गांधी-पटेल वा नेहरू यांना मुस्लिम मानसिकतेचा हा इतिहास ठाऊक नव्हता, असे नाही. मात्र, सारे कळत असतानाही देश व घर एकत्र ठेवण्याच्या त्यांच्यावरील जबाबदारीमुळे त्यांनी तसे न म्हणता देशाच्या परंपरागत ऐक्याच्या कहाण्या समाज व जगाला ऐकविल्या. हजरत सलीवुल्ला वसल्लम महंमद पैगंबर यांनी मदिनेत (त्या शहराचे जुने नाव यथ्रेब असे होते) त्यांचे जे राज्य स्थापन केले, त्याचे वर्णन उम्मत्तुल वाहिदा असे केले जाते. सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या त्या त्यांच्या पहिल्या राज्यात साऱ्यांना धर्मस्वातंत्र्य होते आणि त्यातले लोक आपापल्या धर्माची उपासना त्यांच्या श्रद्धेनुसार करीत होते.

मदिनेत ज्यू बहुसंख्य होते व बहुसंख्येचा मान राखायला राज्यातील साऱ्यांनी जेरुसलेम या ज्यूंच्या पवित्रस्थळाकडे तोंड करून प्रार्थना करावी, असा आदेश पैगंबराने काढला. त्या वेळी त्याच्यासोबत मक्केहून आलेल्या मोहाजिरांनी त्याला मक्केकडे पाहून प्रार्थना म्हणण्याची मुभा मागितली. ती त्याने नाकारली. राज्य चालवायचे आणि बहुसंख्य माणसांना राजी राखायचे, तर आपलीच भूमिका बरोबर असल्याचे त्याने त्यांच्या गळी उतरविले. परिणामी, ज्यूंएवढेच धर्मस्वातंत्र्य तेथील बौद्धांना, मूर्तिपूजकांना आणि ख्रिश्चनांसह इतरांनाही मिळाले. मात्र, पुढे मदिनेवर पैगंबराच्या धर्मविरोधकांनी हल्ले चढविले, तेव्हा त्याने तलवार हाती घेतली आणि जिहादचा नारा दिला. त्याच्या त्या भूमिकेने मदिनेतील धर्मस्वातंत्र्य संपविले आणि तेथील प्रजेसमोर इस्लामचा स्वीकार किंवा मृत्यू असा पर्याय ठेवला गेला. थोड्या कालावधीतच मदिना मुस्लिम बनले व पैगंबराचा राज्यविस्तारही वाढत गेला. जिंकलेल्या सगळ्या मुलुखापुढे इस्लामचा स्वीकार वा मृत्यू हाच पर्याय ठेवला गेल्याने अल्पावधीतच सारा मध्य आशिया इस्लामच्या झेंड्याखाली आणणे पैगंबराला व त्याच्या पश्चात खलिफाच्या पदावर आलेल्या त्याच्या चार निष्ठावंत अनुयायांना जमले.

नंतरच्या काळात या धोरणात बदल केला गेला. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम हे एकाच परंपरेतले किताबी धर्म होते. (त्यातील प्रत्येकाचा एकच पवित्र धर्मग्रंथ होता) आदाम व ईव्ह यांना मानणारे आणि ईसा व मुसा यांनाही आपले समजणारे ते धर्म असल्याने पुढील कत्तलीतून त्यांना सूट दिली गेली. मात्र, त्यांच्याजवळचे ईश्वरी संदेश अनुक्रमे तोराह व बायबल हे कालबाह्य झाले असल्याने आणि कुराण हा ईश्वराचा नवा कोरा संदेश असल्याने त्यांनी त्यांचे संदेश कुराण शरिफानुसार दुरुस्त करून घ्यावे, व जगण्याचा अधिकार मिळवावा, असे त्यांना सांगितले गेले. मात्र, तसे जगण्यासाठीही कर द्यावा लागेल, अशी आज्ञा त्यांना ऐकविली गेली. हा नियम हिंदू, बौद्ध वा अन्य बिगरकिताबी धर्मांच्या लोकांना लागू नव्हता. त्यांनी इस्लामचा स्वीकार करायचा किंवा मरायला तयार व्हायचे, यातलाच एक पर्याय निवडायचा होता.

कुराण व हदीस यांच्यानंतरच्या काळातील आज्ञाही अशाच कर्मठ व इस्लामवाढीला पोषक होत्या. राज्यकर्ते मुस्लिम असतील, तरच त्या राज्यात मुसलमानांनी राहावे; ते तसे नसतील, तर त्यांना बदलून तेथे मुस्लिम राज्यकर्ते आणण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. ते जमणार नसेल, तर तो प्रदेश सोडून मुस्लिम राज्यकर्त्यांच्या राज्यांचा त्यांनी आश्रय घ्यावा, असे या धर्माने सांगितले. मुसलमान राज्यकर्त्याचे राज्य म्हणजे दारूल इस्लाम आणि इतर राज्यकर्त्यांचे राज्य हे दारुल एर्ब ठरविले गेले. दारुल एर्बचे रूपांतर दारुल इस्लाममध्ये करणे, हे निष्ठावान मुसलमानांचे कर्तव्य आहे, असेही धर्माने सांगितले. हे कर्तव्य पूर्ण करता येत नसेल, तर हिज्र करणे (म्हणजे तो देश सोडणे) हा पर्यायही त्याने सांगितला. मक्केतून हिज्र करून मदिना गाठणे भाग पडलेल्या पैगंबरामुळे या हिज्रला एक धार्मिक प्रतिष्ठाही प्राप्त होती. सावरकरांच्या मते, हाच प्रकार भारताला त्याच्या फाळणीपर्यंत नेणारा ठरला. आंबेडकरांनाही ही मानसिकता फाळणीकडे नेणारी असल्याचेच वाटत आले.

काँग्रेस, सर सय्यद अहमद खान (सहकाऱ्यांसोबत) टिळक व गांधी यांच्यासमोरचे पहिले ध्येय स्वातंत्र्य हे होते. त्यात त्यांना देशातील तीस टक्के मुसलमानांची साथ हवी होती. त्यामुळे या इतिहासाची जाण मनात ठेवूनही त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे राजकारण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. टिळकांनी जीनांसोबत केलेला लखनौ करार आणि गांधींनी हाती घेतलेली खिलाफतची चळवळ त्याचसाठी होती. हिंदुत्ववाद्यांना मुसलमानांच्या या भूमिकेविरुद्ध सरळ युद्ध हवे होते, तर कम्युनिस्टांना कोणताही धर्म मान्य नसल्याने या स्थितीकडे एक इतिहासजमा बाब म्हणून पाहणारा त्यांचा पक्ष होता.

इस्लामचा भारतावरील पहिला हल्ला सातव्या (म्हणजे इस्लामच्या स्थापनेच्या) शतकातलाच आहे. नंतरची सातशे वर्षे त्याचे हल्ले भारतावर होत राहिले. शेवटी चौदाव्या शतकातच त्याला येथे पाय रोवून आपली गादी स्थापन करता आली. या सातशे वर्षांतच मक्का आणि मदिनेपासून पश्चिमेकडे इस्लामने आपला विस्तार सारा मध्य आशिया, उत्तर आफ्रिका व युरोपात थेट स्पेनपर्यंत वाढविला. इस्लामला त्याच्या प्रसार व विस्ताराच्या कार्यात सर्वांत मोठा अडथळा व विरोध भारतात झाला, हे सांगणारा हा घटनाक्रम आहे.

चौदाव्या शतकानंतरची चार शतके मुसलमान राज्यकर्त्यांनी भारतावर राज्य केले. मात्र, त्यांना हा देश मध्य आशियासारखा इस्लाममय करणे जमले नाही. जगभरच्या मुस्लिम धर्मगुरूंच्या मनात असलेले या अपयशाचे शल्य मोठे आहे. तसे करण्याचा प्रयत्न इस्लामने भारतात केला नाही, असे मात्र नाही. दिल्लीत शेरशहा सूरीचे राज्य असताना त्याचा धर्मगुरू शेख नुरुद्दीन मुबारक याने त्याला कुराणाच्या आज्ञेनुसार भारतातील मूर्तिपूजकांसमोर इस्लामचा स्वीकार वा मृत्यू असे पर्याय ठेवण्याची मागणी मांडली; तेव्हा तिला नकार देत ‘हे राज्य चालवायचे तर मला येथील स्थानिकांचे साह्य हवे आणि त्यासाठी त्यांच्या धर्मभावनांना धक्का न लावणे मला आवश्यक आहे, असे उत्तर त्याने दिले.

नंतरचा प्रयत्न अकबराच्या काळात जमालुद्दीन या तेव्हाच्या धर्मगुरूने केला. अकबर हा उदारमतवादी राज्यकर्ता होता. त्याला येथील जनतेची मान्यता हवी होती. जमालुद्दीनच्या गटाने त्याच्यावर जेव्हा फार दबाव आणला, तेव्हा अकबराने त्याच्यासकट एक हजार धर्मगुरूंना अटक करून त्यांना दिल्लीच्या रस्त्यांवर फासावर लटकवले. धर्मगुरूंच्या त्या बंडाचे नेतृत्व जहांगीर या अकबराच्या राजपुत्रानेच तेव्हा केले. (जहांगीराचे बंड अनारकलीसाठी होते, ही दंतकथा आहे.) पुढे जाऊन अकबराने इस्लामचाच त्याग केला व दिनेइलाही हा नवा धर्म स्थापन केला. राज्यकर्त्यांच्या अडचणी राजकीय असतात. त्याआड धर्माने आलेले त्यांना चालत नाही. इस्लाममध्ये धर्म व राज्य यांची मुळात नसलेली फारकतही या निमित्ताने भारतातच प्रथम झाली, हे येथे नोंदविले पाहिजे.

पुढील काळात सत्तेवर आलेल्या औरंगजेबावर धर्मांधतेचा आरोप होतो, तो काहीसा खराही आहे. मात्र उज्जैनच्या महाकालेश्वराला त्याने आर्थिक मदत केली. इनामे व जमिनी दिल्या. त्याला पागोळ्या बांधून दिल्या. धर्मांतरासाठी त्यानेही हत्याकांडाचा आश्रय घेतला नाही. औरंगजेबाने संभाजीराजांना मारले; पण येसूबाई व शाहूला प्रेमाने वागविले, हेही इतिहास सांगतो. राजकारणाची आणि सत्ता टिकविण्याची गरज धर्मांधता व अतिरेकी धर्मश्रद्धा यांना मुरड घालते, याचीच ही उदाहरणे आहेत. औरंगजेबाच्या पश्चात दिल्लीचे साम्राज्य मोडकळीला आले. त्याचा वारस असलेला बहादूरशहा जफर 1857 च्या युद्धात पराभूत होऊन पकडला गेला आणि इंग्रजांनी त्याची रवानगी ब्रह्मदेशात केली. त्याआधी 1818 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचाही पराभव केला होता. तात्पर्य, दिल्लीतील मुसलमानांचे राज्य जाऊन भारतात इंग्रजी राज्याची स्थापना झाली. इस्लामच्या भाषेत तोपर्यंत दारुल इस्लाम असलेला भारत दारुल एर्ब झाला होता. भारतात इंग्रजी राज्य आल्याचा येथील हिंदूंवर कोणता परिणाम झाला, याची चर्चा फार होते. मात्र, त्याचा मुसलमानांवर झालेला परिणाम फारसा चर्चिला जात नाही. तो महत्त्वाचा आहे व त्याचे स्वरूप दोन तऱ्हेचे आहे.

सातशे वर्षांच्या कष्टाने आपण मिळविलेले व चारशे वर्षे राखलेले राज्य गमावले आहे आणि एके काळी राज्यकर्ते असलेले आपण आता सामान्य प्रजाजन बनलो आहोत, याचे शल्य साऱ्या मुसलमान समाजात होते. त्यात एका मोठ्या श्रद्धावानांचा वर्ग ‘दारुल एर्ब झालेला हिंदुस्थान पुन्हा एकवार इस्लामच्या ताब्यात आणून दारुल इस्लाम करावा’, असे मानणारा होता. त्याचा राग हिंदूंवर कमी आणि इंग्रज या त्यांच्या हातून राज्य हिसकावून घेणाऱ्या नव्या आक्रमकांवर अधिक होता. इंग्रजांचे राज्य घालविणे व त्याजागी बहादूरशहा जफर वा त्याच्या वंशजाला आणणे, हे त्याचे ध्येय होते. या वर्गाने उत्तर प्रदेशातील देवबंद या गावी त्याच्या धर्मपीठाची स्थापना केली.

इंग्रजांनी आणलेल्या शिक्षणाचा व त्याच्या नव्या राजकारणाचा लाभ घेणाऱ्या नवशिक्षितांचा दुसरा वर्ग होता. इंग्रजांचे राज्य आज ना उद्या येथून जाईल व हिंदुस्थान स्वतंत्र होईल, असे वाटणाऱ्या या वर्गात- स्वतंत्र हिंदुस्थानात येणारे राज्य मुसलमानांचे असणार नाही, ते हिंदू बहुसंख्यकांचे असेल- हे समजणारे होते. यापुढे हा देश दारुल इस्लाम होणार नाही आणि इंग्रजांच्या पश्चात हिंदूंच्या राज्यात राहणे आपल्याला भाग पडेल, हे लक्षात आलेला हा वर्ग इंग्रजांच्या मदतीने आपले बळ वाढविण्याचा प्रयत्न करणारा आणि जमेल तेव्हा देशाच्या ज्या प्रदेशात मुस्लिम बहुसंख्य असतील त्याचे नवे राज्य निर्माण करू पाहणारा होता. या वर्गाने अलिगढ येथे आपले पीठ स्थापन करून त्याचे विद्यापीठातही रूपांतर केले.

पहिला वर्ग धर्मश्रद्ध कर्मठांचा, तर दुसरा नवशिक्षित उदारमतवाद्यांचा (मात्र मुस्लिम राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता असणारा) होता. पहिल्या वर्गाचे नेतृत्व मुल्ला-मौलवी आणि धर्मगुरूंकडे, तर दुसऱ्याचे सर सय्यद अहमद या अलिगढ विद्यापीठाच्या प्रमुखाकडे होते. सय्यद अहमद यांच्याच शिकवणीची परिणती मुस्लिम लीगच्या स्थापनेत व पुढे पाकिस्तानच्या निर्मितीत झाली. मुसलमानांचा 1857 च्या युद्धातील सहभागही यासंदर्भात तपासून पाहणे आवश्यक आहे. हा वर्ग देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता, की पुन्हा एकवार हिंदुस्थानचे रूपांतर दारुल इस्लाममध्ये करण्यासाठी प्राणांची बाजी लावत होता, हे फार लक्षपूर्वक पाहावयाचे प्रकरण आहे. या लढ्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांत सावरकर सर्वांत पुढे होते. त्यांनी त्याचे वर्णन ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’ असे केले आणि त्यातील हिंदू व मुसलमानांच्या सहभागाला राष्ट्रीय ऐक्य म्हणत त्याचे प्रचंड कौतुकही केले.

सावरकरांच्या सुदैवाने त्यांच्या त्या ग्रंथाला लाला लजपत राय, भगतसिंग आणि सुभाष बोस यांसारखे राष्ट्रीय नेते प्रकाशक म्हणून लाभले. देशातील स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळावे, हाच त्यामागचा त्या साऱ्यांचा हेतू होता. मात्र, सावरकरांनी त्यांच्या समर्थनार्थ मांडलेले सर्व मुद्दे अलीकडच्या संशोधकांनी पार खोडून काढले आहेत. तो ग्रंथ लिहितानाची सावरकरांची दृष्टी इतिहासकाराची नसून एका कडव्या देशभक्ताची होती, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. मुस्लिम इतिहासाचे सूक्ष्म संशोधन करणाऱ्या एका मराठी अभ्यासकाने तर त्या लढ्याचे वर्णन ‘1857 चा जिहाद’ असेच केले आहे. त्यातले हिंदू राजे स्वतःच्या राज्यांसाठी, तर मुसलमानांचे वर्ग दारुल इस्लामसाठी लढत होते, हे वास्तव त्याने कमालीच्या प्रबळ पुराव्यानिशी मांडले आहे.

हिंदू व मुसलमानांतील तेढ त्या युद्धाच्या काळातही पूर्णपणे संपली नव्हती. ‘एका म्यानात दोन तलवारी जशा राहू शकत नाहीत तसे हिंदू आणि मुसलमान एका देशात राहू शकत नाहीत’ असे शाह वलीउल्ला हा महान मुस्लिम संत तेव्हाही म्हणत होता. ‘येथे एक तर मुसलमान राहतील किंवा हिंदू’ असे त्याचे म्हणणे होते. त्यामुळे यासंदर्भातील देशभक्त लेखकांची आणि संशोधक-अभ्यासकांची मते फार तारतम्याने पाहावीत, अशी आहेत. या वेळेपर्यंत गांधी, टिळक वा काँग्रेस यांचा रीतसर उदयही झाला नव्हता, हे येथे लक्षात घ्यायचे. त्याच वेळी प्रथम काँग्रेस व पुढे गांधी यांच्यासमोर या स्थितीने निर्माण केलेला पेचही यातून लक्षात यावा असा आहे.

येथे आणखीही एका महत्त्वाच्या घटनाक्रमाची नोंद करणे आवश्यक आहे. देशाच्या राजकारणात तेव्हा हिंदू व मुसलमान या दोन पक्षांखेरीज इंग्रज हा तिसराही शक्तिशाली पक्ष होता आणि त्याच्या हाती सगळी सत्तासूत्रे होती. त्याच्या ब्रिटनविषयक हितसंबंधांना अनुरूप अशी धोरणे तो आखत होता आणि त्यानुसार तो येथील पक्षांशी संबंध राखत होता. आपले राज्य भारतात कायमचे राहणार नाही, हे समजण्याएवढे शहाणपण तेव्हाही त्याला होते. यथाकाळ हा देश स्थानिकांच्या हाती सोपवावा लागेल, याची त्याला जाणीव होती. त्यामुळे येथील जनतेला नव्या राजकारणाची सूत्रे शिकविणे व त्यात त्यांचा सहभाग वाढविणे, हे त्याला आवश्यक वाटत होते. (हिटलर-मुसोलिनी किंवा स्टालिन किंवा माओ या हुकूमशहांहून इंग्रजी राज्यकर्त्यांचे हे वेगळेपण लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यांना केवळ लुटारू म्हणून काळ्या रंगात रंगविण्यात अर्थ नाही.) मात्र, हे करीत असताना इंग्रजांचा वर्ग आपल्या राजकीय हितसंबंधांना प्राधान्य देत होता, हे लक्षात घेणेही गरजेचे आहे.

एतद्देशीयांना प्रशासनात व राज्यव्यवहारात सहभागी करून घेण्याच्या योजना इंग्रजांनी 19 व्या शतकातच आखायला सुरुवात केली. येथील लोकांना प्रशासनात घेता यावे, यासाठी पहिला प्रातिनिधिक सुधारणा कायदा त्यांनी 1892 मध्येच केला. पुढे 1909, 1919 आणि 1935 असे सुधारणा कायदेही याच हेतूने त्यांनी केले. भारताच्या फाळणीच्या योजनाही त्यांनी त्याच काळात आखायला सुरुवात केली. हिंदू व मुसलमान यांच्यातील दुही हा त्या फाळणीचा आधार त्यांना सोईचा होता. त्यानुसार 1852 मध्ये ब्लंट या तेव्हाच्या गव्हर्नर जनरलच्या मुख्य सचिवाने भारताच्या फाळणीची पहिली योजना तयार केली. दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंतचा भारत वेगळा आणि दिल्लीच्या उत्तरेकडे काश्मीरपर्यंतचा देश वेगळा, असे या योजनेचे स्वरूप होते. कंपनी सरकारकडे भारताचा ताबा असतानाच ही योजना आखली गेली, हे येथे लक्षात घेण्याजोगे आहे.

ही योजना ब्रिटिश सरकारनेच मान्य केली नाही. नंतर 1857 च्या युद्धातील हिंदू-मुस्लिम तेढ लक्षात घेऊन हिंदुस्थानात दोन संसद भवने असावीत; त्यातले एक हिंदूंचे व दुसरे मुसलमानांचे असावे, अशी योजना 1858 ते 1860 च्या दरम्यान तयार केली गेली. तीही यथावकाश बारगळली. या सबंध काळात येथील मुसलमानांचा वर्ग वेगळेपणाची व वेगळ्या राष्ट्रीयत्वाची भाषा बोलतच होता. शाह वलीउल्ला व सर सय्यद अहमद यांच्या भाषेचे स्वरूप अनुक्रमे टोकाचे आणि सौम्य असे असले, तरी तिचा आशय एकच होता. मुसलमानांकडून त्यांचे वेगळे राष्ट्रीयत्व असे सांगितले जात होते आणि देशाची फाळणी करायला इंग्रज सत्ताही आरंभापासून तयारच होती. हा प्रकार टिळक, गांधी व काँग्रेस यांच्या जन्मापूर्वी सुरू झाला आणि त्यांच्या उदयकाळातही होत होता, हे लक्षात घेतल्याखेरीज या एकूण प्रश्नाचे समग्र आकलन होण्याची शक्यता कमी असते. यातील धर्मश्रद्ध कर्मठांचा देवबंदपीठामागे एकत्र झालेला दारुल इस्लामवादी समूह इंग्रजांविरुद्ध लढायला तयार होता; त्यासाठी तो काँग्रेसच्या इंग्रजविरोधी लढ्यात सहभागी व्हायलाही सिद्ध होता, कारण त्याचे उद्दिष्ट पुन्हा एकवार हा देश दारुल इस्लाम बनवणे हे होते. तर अलिगढ पीठासोबत गेलेला नवसाक्षरांचा वर्ग इंग्रजांशी सहकार्य करायला सिद्ध होता, कारण त्याला हा देश पुन्हा दारुल इस्लाम होणार नसून हिंदू बहुसंख्याकांचा होणार, हे कळत होते.

काँग्रेसचा संघर्ष इंग्रजांशी होता. त्यात सहकार्य देणारा वर्ग देवबंदवाल्यांचा होता, तर अलिगढवाले काँग्रेसला हिंदू संघटन म्हणणारे होते. ज्याचे सहकार्य मिळते ते हिंदुस्थानला दारुल इस्लाम बनवू इच्छिणारे आणि ज्यांचे सहकार्य घ्यावे ते इंग्रजांशी सहकार्य करणारे, अशी काँग्रेससमोरची त्या काळातली खरी अडचण होती. देशाच्या फाळणीसाठी काँग्रेस व गांधी यांना जबाबदार धरणाऱ्या टीकाकारांचा वर्ग सामान्यपणे या घटनाक्रमाची नोंद घेत नाही. ज्यांनी आरंभापासून 1925 पर्यंत द्विराष्ट्रवादाची भूमिका जाहीरपणे घेतली ते पक्ष, त्यांचे पुढारी आणि त्यांना साथ देणारे लोक फाळणीला जबाबदार असतात; की ‘माझ्या देहाचे तुकडे झाल्यानंतरच या देशाचे तुकडे करा’, असे म्हणणारा निःशस्त्र माणूस तिचा अपराधी असतो? ‘हिंदू आणि मुसलमान ही दोन राष्ट्रे आहेत’ असे म्हणणारे सर सय्यद अहमद ते महंमद अली जीना हे फाळणीला जबाबदार; की इंग्रजविरोधी संघर्षात मुसलमान व हिंदू एकत्र असावेत म्हणून लखनौ करार करणारे टिळक आणि त्याच हेतूने खिलाफतची चळवळ काँग्रेसला करायला लावणारे गांधी तिला जबाबदार असतात?... ज्यांच्या भूमिका घट्ट आणि मने धर्मांधतेने भारली आहेत, त्यांचे या संदर्भातले मत महत्त्वाचे; की या घटनाक्रमाकडे तटस्थपणे पाहू शकणारी आणि विचारांच्या वाटेने जाणारी माणसे यासंदर्भात खरी?

अलिगढ पीठासोबतचा वर्ग शिक्षितांचा होता आणि कोणताही नव्याने जागा होणारा समाज जसा शिक्षितांचे व ज्ञानवंतांचे नेतृत्व स्वीकारतो, तसा मुसलमानांतील तरुणांचा वर्गही अलिगढसोबत जाणारा होता. याचीच परिणती जीनांच्या पुढील वाटचालीत व त्यांच्या फाळणीच्या मागणीत नंतरच्या काळात झाली. जीना काँग्रेसमध्ये होते. ते टिळकांचे वकील होते. त्यांच्यासोबत त्यांनी लखनौ करार केला होता. पण टिळकांएवढीच काँग्रेस ब्रिटिशविरोधी होती. त्यामुळे जीना बॅरिस्टर असले, तरी ते कर्मठ व बहुसंख्य मुसलमानांचे नेते बनू शकत नव्हते. देवबंद पीठ त्यांच्या विद्वत्तेकडे साशंकतेने पाहणारे होते आणि अलिगढचे पीठ त्यांची विद्वत्ता मान्य करूनही त्यांना काँग्रेसचे- म्हणजे ब्रिटिशविरोधी म्हणून आपले मानायला राजी नव्हते. ज्या दिवशी जीनांनी काँग्रेसची साथ सोडली व ते मुस्लिम लीगचे नेते झाले, तेव्हा अलिगढवाले स्वेच्छेने त्यांच्यासोबत आले आणि देवबंदच्या लोकांना तोवर सत्य उमगत गेल्याने नाइलाज म्हणून का होईना जीनांसोबत जाणे भाग पडले.

ज्या दिवशी जीनांनी पाकिस्तानची मागणी केली, त्या दिवशी ते साऱ्या मुसलमानांचे सर्वोच्च नेते बनले आणि त्यांचा शब्द त्या समाजात प्रमाण झाला. बॅ. महंमद अली जीना हे सुन्नी वा शिया या मुसलमानांमधील दोन प्रमुख पंथांपैकी एकाही पंथाचे नव्हते. इस्माईल खोजा या मुसलमानांमधील एका अतिशय अल्पसंख्य पंथातून ते व त्यांचे कुटुंब आले होते. त्यांचे आजोबा धर्माने लोहाना समाजाचे हिंदू होते. काठेवाडातून आलेल्या त्या कुटुंबावरील आरंभीचे संस्कारही धार्मिक म्हणावेत असेच होते. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी इस्लामचा स्वीकार केला होता. महंमद अलींचे वडील पुंजा जीनाभाई हे काठेवाडचा प्रदेश सोडून त्यांच्या वडिलांच्या व्यवसायाच्या निमित्ताने कराचीला गेले. त्यांचा व्यवसाय वाढत असतानाच एका इंग्रजी फर्मशी त्यांचे संबंध आले.

महंमद अलींचा जन्म 1879 मध्ये कराचीत झाला. त्यांचे बालपणही काही काळ तेथेच गेले. पुढे त्यांच्या आत्याच्या- मानबार्इंच्या सूचनेवरून त्यांना शिकायला मुंबईला पाठवले गेले. तिथे ते रमलेही. आपल्या अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे शाळेत व अन्यत्र ओळखले जाणारे महंमद अली पुढे वडिलांच्या व्यवसायासाठी वयाच्या 18 व्या वर्षी इंग्लंडला गेले. पण तेथील शैक्षणिक वातावरणाचे मोठे आकर्षण वाटल्याने व्यवसाय सोडून 1893 मध्ये ते लिंकन इनमध्ये प्रविष्ट झाले. अतिशय चांगल्या तऱ्हेने त्यांनी बॅरिस्टर ही पदवी 1896 मध्ये प्राप्त केली आणि ते मुंबईत परतले. अल्पावधीतच एक यशस्वी वकील म्हणून त्यांनी त्या शहरात स्वतःचे नाव मोठे केले. इंग्लंडमध्ये असताना त्यांचा संबंध दादाभाई नौरोजींशी आला.

दादाभार्इंनी हाऊस ऑफ कॉमन्सच्या लढविलेल्या निवडणुकीत त्यांच्या प्रचारकार्याची धुराही जीनांनी वाहिली. दादाभार्इंमुळेच हिंदुस्थानातील राजकीय व आर्थिक स्थितीची त्यांना ओळख पटली. इंग्रजांनी भारताची चालविलेली लूट दादाभार्इंनी त्यांच्या ग्रंथांमधून अतिशय विस्तृतपणे व परिणामकारकरीत्या मांडली आहे, तीही जीनांना त्यांच्या संबंधांतून समजली. त्याच वेळी तेथील हिंदू-मुसलमान यांच्या संबंधांची व त्यातील तेढीचीही त्यांना पूर्ण कल्पना आली. राजकीय नेतृत्वाची आवड असणारे जीना प्रकृतीने अतिशय उच्चभ्रू आवडी असलेले ॲरिस्टोक्रॅटिक गृहस्थ होते. ते सामान्य माणसांत सहसा मिसळत नसत. मात्र, त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक व वकिलीतील त्यांचे यश त्यांना चाहत्यांचा मोठा वर्ग मिळवून देत होते.

तो काळ नेमस्तांच्या मवाळ व सनदशीर वाटचालीचा होता. त्या वर्गाला एक नामांकित व मुस्लिम समाजातून आलेला बॅरिस्टर आपल्याशी जुळला असणे आवश्यक व लाभकारकही वाटत होते. त्यातून जीनांना त्यांचे धर्मनियम व धर्मबंधने फारशी मंजूर नव्हती. ते कधी मशिदीत जायचे नाहीत, नमाज पढायचे नाहीत, देशी भाषेत सहसा बोलायचे नाहीत. (जीनांनी देशी भाषेतून आपल्या जनतेशी संवाद साधावा व त्यासाठी तुम्ही त्यांचे मन वळवावे, अशी विनंतीवजा सूचना करणारे पत्र पुढे गांधीजींनीच जीनांच्या पत्नीला- श्रीमती बेट्टी यांना लिहिले) एखाद्या महालवजा इमारतीत राहणारे, इंग्रजी पद्धतीचा पोशाख करणारे व त्या भाषेतच बोलण्याचा आग्रह धरणारे जीना इस्लामला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी विनासायास करत.

वयाच्या 43 व्या वर्षी 18 वर्षांच्या पारशी मुलीशी लग्न करून त्यांनी त्या दोन्ही समाजांत मोठी खळबळ उडविली होती. इस्लामला वर्ज्य असणारा मांसाहार (पोर्क) ते अतिशय आवडीने घेत. त्यांच्या तशा एका जेवणाची आठवण त्यांचे तत्कालीन सहकारी असलेले बॅ.महंमद करीम छागला यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवली आहे. जीना भारतात आले, तेव्हा येथील मुस्लिम समाज देवबंद व अलिगढ या दोन पीठांत विभागला होता. जीना हे त्यांच्या आधुनिक दृष्टीमुळे व इंग्रजी प्रवृत्तीमुळे देवबंदच्या मुल्ला- मौलवींमागे जाणारे नव्हते; मात्र त्यांना सर सय्यद आणि त्यांच्या अलिगढी सहकाऱ्यांचे नेतृत्वही मान्य होणारे नव्हते.

मुळात जीनांचा पिंड कोणाचे अनुयायी होणारा नव्हताच. आपण नेते आहोत आणि नेतृत्व करण्यासाठीच आपला जन्म आहे, असा स्वतःविषयीचा विश्वास त्यांनी आरंभापासून मनात बाळगला होता. इंग्लंडमधील लोकशाही मूल्यांचा संस्कार घेऊन आलेल्या जीनांना आरंभी हिंदू व मुस्लिम यांच्यातील टोकाचे भेद व एकारलेपण मान्य नव्हते. ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करून देश स्वतंत्र करायचा तर हे दोन्ही वर्ग एकत्र राहिले पाहिजेत, अशीच त्यांची आरंभीची धारणा होती. त्यांचे नेमस्तपण त्यांना कायद्याजवळ राखणारे आणि जहालांपासून दूर ठेवणारेही होते. टिळकांच्या जाज्वल्य देशभक्तीविषयी त्यांना आदर होता. त्यामुळे टिळकांवरील अनेक खटल्यांत त्यांनी त्यांचे वकीलपत्रही घेतले होते. पुढे 1916 च्या लखनौ करारात त्यांनी टिळकांच्या बरोबरीने भागही घेतला होता. त्यांच्याविषयी साशंक असणारा मुसलमानांचा वर्ग क्रमाने त्यांचे काँग्रेससोबतचे सहकार्य आणि त्यातील मुस्लिमांच्या स्थानाबाबतचा त्यांचा आग्रह पाहून त्यांच्यावर विश्वास ठेवू लागला होता. लखनौ कराराने त्यांचे ते नाते पक्केही केले होते. दि.1 ऑगस्ट 1920 या दिवशी लोकमान्यांचा मुंबईच्या सरदारगृहात मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्या शवाला प्रथम खांदा देणाऱ्यांत गांधीजींसोबत जीनाही होते, ही बाब येथे लक्षणीय म्हणून नोंदविण्याजोगी आहे.

Tags: सुरेश द्वादशीवार टिळक पुंजा जीना भाई इस्माईल खोजा मोहम्मद अली जीना गांधीजी आणि त्यांचे टीकाकार दादाभाई नौरोजी सर सय्यद अहमद फाळणी ब्लंट जिहाद 1857 दिनेईलाही अकबर शेख नरुद्दीन मुबारक खिलाफत चळवळ लखनौ करार दारूल एर्ब दारूल इस्लाम पैगंबर जेरूसलेम हदीस मुस्लिम लीग 1906 gandhiji ani tyanche tikakar suresh dwadshiwar Tilak Punja Jinabhai Ismail Khoja Mohammad Ali Jina Dadabhai Nauroji Sir Sayyad Ahemad Falani Blunt Zihad 1857 Dineilahi Akbar Shekh Naruddin Mubarak Khilafat chalwal Lakhnav karar Darul Erb Darul Islam Paigambar Jerusalem Hadis Muslim League 1906 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके