डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

लाहोरला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्षपदावरून भाषण करताना नेहरूंनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. त्याच भाषणात त्यांनी समाजवादाचा पुरस्कार करून देशातील तरुणांचा वर्गही स्वतःला जोडून घेतला. नेहरू व सुभाष यांचे एकत्र येणे आणि त्यांनी समान पवित्रे घेणे हे त्याचमुळे यापुढल्या काळात शक्य झाले. त्यांच्यातले हे सख्य 1939 पर्यंत शाबूतही राहिले. त्या वर्षी भरलेल्या त्रिपुरा काँग्रेसच्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी गांधीविरोधी भूमिका घेतली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढायला सिद्ध झालेल्या जर्मनी व इटलीतील नाझी आणि फॅसिस्ट या राजवटींची मदत घेण्याची त्यांची तयारीही साऱ्यांच्या लक्षात आली. ही बाब गांधी, पटेल व नेहरू यातल्या कोणालाही मान्य होणारी नव्हती.

त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर सुभाषबाबूंनी काही काळातच फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची काँग्रेसांतर्गत स्थापना केली. स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र करण्याच्या हेतूनेच त्यांनी हा पक्ष स्थापन केला. मात्र, बंगालखेरीज देशाच्या अन्य भागात त्याला फारसे अनुयायी मिळाले नाहीत. शिवाय त्रिपुरा काँग्रेसच्या अनुभवाने काँग्रेस पक्ष गांधींभोवती जास्तीचा संघटितही झाला होता. या काळात सुभाषबाबूंवर करडी नजर ठेवायला सरकारने त्यांना त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवले होते. त्यासाठी त्या घराभोवती पोलिसांचा खडा पहाराही चोवीस तास राखला होता. सुभाषबाबू मात्र स्वस्थ नव्हते. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडला घ्यावी लागत असलेली माघार त्यांना अस्वस्थ करत होती आणि इंग्लंडच्या अडचणीचा उपयोग करून घेण्यासाठी जर्मनी वा इटलीची मदत घेण्याच्या योजना ते आखत होते.

दि. 16 व 17 जानेवारी 1941 ची मध्यरात्र उलटून गेल्यानंतर सुमारे 1 वाजून 25 मिनिटांनी त्यांनी आपले थोरले बंधू शरदबाबू व पुतण्या शिशिर यांच्यासोबत पोलिसांना गुंगारा दिला आणि ते बिहारमधील गोमोह या रेल्वे स्टेशनवर कारने पोहोचले. (ही कार आता सुभाषबाबूंच्या निवासस्थानासमोर त्यांची स्मृती जागवीत उभी आहे) तिथे पोहोचल्यानंतर महम्मद झियाउद्दीन हे नाव धारण करून मजल-दर मजल करीत ते अफगाणिस्तानात पोहोचले. या काळात त्यांनी नाव बदलले, पठाणाचा पोशाख अंगावर चढवला आणि स्थानिक मित्रांच्या मदतीने ते पुढे रशियापर्यंत पोहोचले. त्यांच्या सुटकेची बातमी आनंद बझार पत्रिका आणि हिंदुस्थान स्टँडर्ड या वृत्तपत्रांनी प्रकाशित केल्यानंतरच पोलिसांना व देशाला कळली. (आता उपलब्ध झालेल्या सरकारी कागदपत्रांवरून त्यांच्या सुटकेला त्यांना ब्रिटिशांनीच अप्रत्यक्षपणे मदत केल्याचे निदर्शनाला आले आहे. कलकत्त्याहून निघाल्यापासून थेट पेशावर व काबुलपर्यंत त्यांच्यासोबत असणारा, त्यांची व्यवस्था पाहणारा भगतराम तलवार ऊर्फ रहमत खान हा सरकारचा हेर होता आणि तो सुभाषबाबूंच्या प्रत्येक हालचालीची माहिती प्रथम ब्रिटिश सरकारला व पुढे रशियन सरकारला देत होता. सुभाषबाबूंसारखा आक्रमक विरोधक महायुद्धाच्या काळात भारतात असण्यापेक्षा भारताबाहेर राहिलेला बरा, असे वाटल्यावरून सरकारने त्यांच्या सुटकेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असावे, असे या  कागदपत्रांवरून लक्षात येते. या तलवारने 1941 नंतर दोन्ही सरकारांना पुरविलेल्या माहितीची सगळी कागदपत्रे आता उपलब्ध आहेत.)

काबुलला पोहोचल्यानंतर भगतराम तलवारच्या मदतीने सुभाषबाबूंनी रशियन वकिलातीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी झाला, तेव्हा ते स्वतःच तेथील जर्मनीच्या वकिलातीत पोहोचले. रशियाचे इंग्लंडशी असलेले दुराव्याचे संबंध लक्षात घेऊन त्याही देशाची मदत आपल्या लढ्याला मिळेल काय याची चाचपणी त्यांनी मॉस्कोत केली होती. मात्र, ती मिळण्याची शक्यता दिसत नाही, हे ध्यानात आल्यानंतरच ते तेथील जर्मन दूतावासात पोहोचले होते. जर्मनमधील वकिलातीत हॅन्स पिल्गर या अधिकाऱ्याने त्यांचे स्वागत केले. मात्र त्यांना जर्मनीत प्रवेश देण्याआधी जर्मन सरकारने त्यांची चरित्रविषयक सारी माहिती या पिल्गरकडून मागवून घेतली. ती 2 फेब्रुवारीला हाती आल्यानंतरच जर्मनीच्या परराष्ट्र खात्याने त्यांना बर्लिनला येण्याची परवानगी दिली. त्याच वेळी त्यांनी रशियामार्गे जर्मनीत यावे, असेही त्यांना कळविण्यात आले. मात्र जर्मनीच्या या दूतावासाने त्यांना प्रथम इटलीत रोमला नेऊन पुढे तिथून जर्मनीत नेले.

ते इटलीत आले, तेव्हा त्यांच्या तोवरच्या इतिहासाची माहिती घेतलेल्या मुसोलिनीने एका कोरड्या सहानुभूतीखेरीज त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. (या मुसोलिनीने रवींद्रनाथ टागोरांना निमंत्रण देऊन बोलविले होते. गांधीजी रोममध्ये असताना मुसोलिनीच्या पत्नीने त्यांच्यासाठी जेवणाचा डबा स्वतः नेऊन पोहोचविला होता. नेहरूंना मुसोलिनीने अगत्याने दोनदा निमंत्रण दिले. पण नेहरूंनी त्याच्या कारकिर्दीचा इतिहास लक्षात घेऊन ते स्वीकारायला नम्र नकार दिला होता, हे येथे उल्लेखनीय.)

या पार्श्वभूमीवर त्याने सुभाषबाबूंबाबत दाखविलेली अनास्था सहज लक्षात यावी अशी आहे. तीच अनास्था सोबत घेऊन ते जर्मनीला गेले. मात्र तिथेही सात महिने उलटेपर्यंत जर्मन सरकारने त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. या काळात सुभाषबाबूंनी अनेक पत्रे पाठवून जर्मन सरकारकडे भेटीची मागणी केली. त्याला बऱ्याच दिवसांनी प्रतिसाद देऊन रिबेनट्रॉप हा त्या देशाचा परराष्ट्रमंत्री त्यांना भेटायला राजी झाला. त्यांच्या भेटीत सुभाषबाबूंनी जर्मनीने भारतावर तत्काळ स्वारी केल्यास तेथील जनता ब्रिटिश सरकारविरुद्ध उठाव करील, व  जर्मनीला विजयी करील असे त्याला सांगितले. रिबेनट्रॉप खुळचट नव्हता. तो सुभाषचंद्रांची सारी माहिती सोबत घेऊनच त्यांना भेटत होता.

त्याने सुभाषबाबूंना एकच प्रश्न विचारला, ‘‘पण मग गांधींचे काय?’’

त्यावर उत्तर देताना सुभाषबाबू म्हणाले, ‘‘त्यांची ऊर्जा आणि लोकमानसावरची पकड आता संपली आहे. शिवाय ते इंग्रजांशी केव्हाही समझोता करायला तयार असतात, असेही आता जनतेला वाटू लागले आहे.’’

रिबेनट्रॉप म्हणाला, ‘‘पण आमची माहिती वेगळी आहे. गांधी आजही भारतीय जनतेचे सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत आणि त्यांचा शब्द त्यांच्या पक्षात व देशात प्रमाण मानला जाणारा आहे.’’

यावर सुभाषबाबूंनी त्यांना गांधीजींनी इर्विन व इतर व्हाईसरॉयांशी केलेल्या समझोत्यांचा तपशील ऐकवला. मात्र रिबेनट्रॉप बधला नाही. कोणतीही प्रतिक्रिया न देता वा न दाखवता त्याने सुभाषबाबूंना निरोप दिला. या वेळी ते कमालीचे निराश झाले. पुढे तब्बल एक वर्ष उलटल्यानंतर हिटलरने सुभाषबाबूंना केवळ काही मिनिटांसाठी भेट दिली. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याने त्यांना मदतीचे मोघम आश्वासन दिले. त्याचा परिणाम एवढाच की, बर्लिनमध्ये इंडिया सेंटर स्थापन झाले आणि तिथे एक रेडिओ केंद्रही उभारले गेले. नंतरच्या काळात सुभाषबाबू त्यावरून भारताला उद्देशून भाषणे करताना दिसले. याच काळात सुभाषबाबूंच्या नियंत्रणात तीन हजार भारतीय युद्धकैद्यांचे एक पथक जर्मनीने सोपविले. हे युद्धकैदी उत्तर आफ्रिकेत जर्मनांशी लढत असताना रोमेलने कैद करून जर्मनीत पाठविले होते. ही फौज घेऊन आपल्याला रशियामार्गे भारताकडे नेण्याचा आग्रहही सुभाषबाबूंनी या काळात जर्मन सरकारकडे धरला. मात्र, 1942 मध्ये जर्मनीने भारताऐवजी रशियावरच हल्ला केल्यामुळे सुभाषबाबूंच्या त्याविषयीच्या आशा मावळल्या. त्या स्थितीत त्यांनी जपानची मदत घ्यावी, असे त्यांना जर्मनांनी सुचविले. तोवर जपानने दक्षिण आशियातील ब्रह्मदेशासह अनेक देश आपल्या ताब्यात आणले होते. सुभाषबाबूंनी ती सूचना मान्य केल्यानंतर त्यांना लागलीच विमान देऊन जपानकडे न पाठविता एका मंदगती पाणबुडीतून दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून मादागास्करपर्यंत पोहोचविण्यात आले. या प्रवासात आणखी सात महिन्यांचा कालावधी गेला. मादागास्करमध्ये ते जपानी पाणबुडीवर स्वार होऊन त्यांच्या पुढच्या मोहिमेवर निघाले, तेव्हा तिकडे जर्मनीच्या पराभवाला सुरुवात झाली होती आणि इटली पराभवाच्या गर्तेत बुडाला होता.

अलीकडे प्रकाशित झालेल्या जर्मन सरकारच्या कागदपत्रांतून हिटलरचे सुभाषबाबूंबद्दलचे एक मत उघड झाले आहे. त्या दोघांची भेट संपल्यानंतर सुभाषबाबू त्यांच्या दालनातून बाहेर पडले, तेव्हा हिटलरचे सावध खुनशीपण जागे झाले. आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून तो म्हणाला, ‘‘या इसमावर नजर ठेवा, कधी काळी आपण भारत ताब्यात घेतलाच तर पहिली अटक याला करा.’’ आता एवढ्या वर्षांनी कागदोपत्री उघड झालेल्या या संवादातून सुभाषबाबूंना जर्मनीनेही फारशा आस्थेने वागविले नाही, हे लक्षात येते.

सुभाषबाबू जपानी पाणबुडीतून दक्षिण आशियात पोहोचताच जपानने तोवर पकडलेले भारतीय युद्धकैदी त्यांच्या आधिपत्याखाली दिले व त्या फौजेला आझाद हिंद फौज (इंडियन नॅशनल आर्मी) म्हणून मान्यताही दिली. प्रत्यक्षात ही फौज सुभाषबाबू तिथे पोहोचण्याआधीच 1941 मध्ये फुजिवामा नावाच्या जपानच्या लष्करी अधिकाऱ्याने स्थापन केली होती. ब्रिटिश सैन्यासोबत लढताना सोबत घ्यावयाची पथके असे या लष्कराचे मूळचे स्वरूप होते. 1943 च्या जुलैमध्ये सुभाषबाबू इकडे येताच त्या पथकांची सूत्रे त्यांच्याकडे सोपविली गेली.

इथवरच्या प्रवासात त्यांनी जपानच्या विद्यापीठात केलेले एक भाषण महत्त्वाचे आहे. ‘स्वतंत्र भारताला लोकशाही चालणारी नाही’, असे ते त्यात म्हणाले. ‘भारतातील विषमता व जातीयता मोडून काढायची असेल, तर त्यात काही दशकांसाठी एक समर्थ हुकूमशाही सरकारच अस्तित्वात यावे लागेल’, असेही ते म्हणाले. त्याआधी त्यांनी कम्युनिस्ट व फॅसिस्ट या दोन्ही हुकूमशाह्यांमधील सर्वंकष सत्ता ज्यात एकवटली असेल असे सरकारच भारतात आणावे लागेल, असे अनेकवार म्हटले आहे. ही भूमिका त्यांना गांधी, नेहरू, पटेल व एकूणच काँग्रेस यांच्यापासून दूर राखणारी आहे. तो काळ युद्धाचा व स्वातंत्र्यलढ्याचा असल्याने त्यांच्या या वक्तव्याची तेव्हा फारशी दखल घेतली गेली नाही. मात्र त्यातून प्रगट झालेले त्यांचे मन स्पष्ट होते. पुढे जाऊन त्यांनी फॅसिस्टांचा वंशवर्चस्ववाद आपल्याला मान्य  नसल्याचे व त्यांची ज्यूविरोधी धर्मांधताही आपल्याला मंजूर नसल्याचे म्हटले. मात्र त्यातील हुकूमशाही व एकाधिकार यांचा त्यांनी कधी निषेध केला नाही. ज्यांची मदत घ्यायची त्यांची निंदा करणे योग्य नसल्याने तसे झाले असावे, असा समज करून घेतला, तरी त्यांचे एकूणच लोकशाही, लोकलढा व भारतीय जनता यांच्याविषयीचे आकलनही त्यातून स्पष्ट होणारे आहे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी पक्ष व संघटना यांच्यापासून दूर होण्याची जोखीम पत्करून रशिया, जर्मनी, इटली व जपान यांसारख्या देशांची मदत मिळविण्याचा प्रयत्न करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस या साहसी नेत्याचा जन्म 23 जानेवारी 1897 या दिवशी तेव्हाच्या ओरिसामधील कटक या शहरात झाला. त्यांचे वडील जनकनाथ बोस हे तेथील प्रख्यात वकील होते. काही काळ ते बंगालच्या विधी मंडळाचे सभासदही होते. त्यांच्या आईचे नाव प्रभावती. नेताजी हे त्यांच्या 14 भावंडांपैकी नववे. अतिशय कुशाग्र बुद्धीच्या या मुलाने आयसीएस होऊन सरकारात मोठा हुद्दा मिळवावा, ही त्यांच्या वडिलांची इच्छा; तर ऐन विद्यार्थिदशेतच स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी होण्याच्या प्रेरणेने सुभाषबाबू अस्वस्थ. त्याच अवस्थेत भारतीयांबद्दल अनुदार उद्‌गार काढणाऱ्या एका ब्रिटिश प्राध्यापकाला बदडून काढण्याचा पराक्रमही त्यांच्या नावावर नोंदविलेला. आयसीएस व्हायला ते इंग्लंडला गेले व ती परीक्षा मेरिटमध्ये चौथ्या क्रमांकानिशी त्यांनी उत्तीर्ण केली. मात्र ब्रिटिशांची नोकरी पत्करण्याऐवजी भारतात येऊन स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी होणे त्यांनी पसंत केले. गांधीजींची भेट घेतल्यानंतर त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ते काँग्रेसचे बंगालमधील ज्येष्ठ नेते देशबंधू चित्तरंजन दास यांचे सहकारी म्हणून काम करू लागले. देशबंधूंची कलकत्त्याच्या मेयरपदी निवड झाली, तेव्हा सुभाषबाबू त्या महापालिकेचे मुख्याधिकारी बनले. त्याच काळात त्यांनी स्वराज व फॉरवर्ड ही वृत्तपत्रे सुरू करून ती लोकप्रिय केली. आयसीएसचे पद व अधिकार देशाच्या स्वातंत्र्यासाठी सोडायला तयार झालेल्या सुभाषबाबूंच्या लोकप्रियतेला तत्काळच मोठे उधाण आले. देखणे व्यक्तिमत्त्व, ज्ञानाचे तेज, घराण्याची प्रतिष्ठा आणि त्यागाची तयारी या साऱ्या गोष्टींनी त्यांना तेव्हाच ‘डार्लिंग ऑफ बेंगॉल’ बनवून टाकले आणि तरुणांचे मोठे समूह त्यांच्या नेतृत्वामागे निष्ठेने उभेही राहिले.

गांधीजींनी सुरू केलेल्या असहकारितेच्या आंदोलनात तरुणांचे नेते म्हणून सुभाषबाबूंनी हिरीरीने भाग घेतला. मात्र चौरीचुऱ्याच्या हिंसाचारानंतर गांधींनी ते आंदोलन मागे घेतले, तेव्हा ते निराश झाले. ‘गांधींच्या नेतृत्वातील प्रतिभा संपली’ अशी टीकाही त्यांनी त्या काळात केली. पण पुढे गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला, तेव्हा त्यांना त्यांच्या नेतृत्वातले स्फुल्लिंग अजूनही तेवढेच दीप्तिमान असल्याचे जाणवले व तेही त्यांनी लिहून ठेवले. काँग्रेस पक्षात 1928-29 च्या सुमारास ‘वसाहतीचे स्वराज्य की संपूर्ण स्वातंत्र्य?’ या मुद्यावरून दोन तट पडले. गांधीजींसह राजाजी, पटेल, राजेंद्रबाबू, मौलाना व इतर ज्येष्ठ नेते वसाहतीच्या स्वराज्याच्या बाजूने तर नेहरू, सुभाष व तरुणांचा मोठा वर्ग संपूर्ण स्वातंत्र्याच्या बाजूने उभा राहिला. हा वाद ब्रिटिश सरकारने पुढे केलेले गोलमेज परिषदेचे आवाहन व त्यासाठी काँग्रेसने पुढे केलेल्या अटींना सरकारने दिलेला नकार यामुळे आपोआपच निकालात निघाला.

परिणामी, लाहोरला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्षपदावरून भाषण करताना नेहरूंनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. त्याच भाषणात त्यांनी समाजवादाचा पुरस्कार करून देशातील तरुणांचा वर्गही स्वतःला जोडून घेतला. नेहरू व सुभाष यांचे एकत्र येणे आणि त्यांनी समान पवित्रे घेणे हे त्याचमुळे यापुढल्या काळात शक्य झाले. त्यांच्यातले हे सख्य 1939 पर्यंत शाबूतही राहिले. त्या वर्षी भरलेल्या  त्रिपुरा काँग्रेसच्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी गांधीविरोधी भूमिका घेतली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढायला सिद्ध झालेल्या जर्मनी व इटलीतील नाझी आणि फॅसिस्ट या राजवटींची मदत घेण्याची त्यांची तयारीही साऱ्यांच्या लक्षात आली. ही बाब गांधी, पटेल व नेहरू यातल्या कोणालाही मान्य होणारी नव्हती. नेमकी तेव्हापासून नेहरूंना त्यांच्याहून वेगळी भूमिका घेणे आवश्यक झाले.

भारतातून बाहेर पडल्यापासून व जर्मनीत बराच काळ निराशेत घालविल्यानंतर सुभाषबाबू सिंगापूरला पोहोचले, तेव्हा दुसऱ्या महायुद्धाने अनेक वळणे घेतली होती. नाझींचा 1941 मध्ये सर्व आघाड्यांवर विजय होत होता. मात्र ते सिंगापूरला 1943 मध्ये पोहोचेपर्यंत रशियन आघाडीवर त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. पर्ल हार्बरवरील जपानच्या हल्ल्याने दिलेल्या धक्क्यातून सावरलेली अमेरिकाही पॅसिफिक क्षेत्रात जपानला जोरकस प्रत्युत्तर देऊ लागली होती. दक्षिण-पूर्व आशियातच केवळ जपानच्या फौजा आघाडी घेत होत्या. त्यांच्या पाठिंब्याच्या बळावरच सुभाषबाबूंनी 1943 मध्ये पुन्हा एकवार आझाद हिंद फौजेची उभारणी केली. या वेळी भारतातील सारे काँग्रेस नेते तुरूंगात आणि चले जावची लोकचळवळ जोरात होती. सशस्त्र क्रांतिकारकांचे सारे तळ मात्र उद्‌ध्वस्त झाले होते.

सैन्यभरती, प्रशिक्षण, निधी संकलन व नियोजन या कामात गढलेल्या सुभाषबाबूंनी साऱ्या दक्षिण-पूर्व आशियाचा दौरा याच काळात पूर्ण केला. त्यांची लोकप्रियता शिखरावर पोहोचली होती. त्यांनी आपल्या फौजेसाठी जे नियम केले, ते मात्र त्यांची व गांधीजींच्या विचारांची दिशा एकच असल्याचे सांगणारे होते. त्यांच्या सैनिकांनी त्यांच्याशी व स्वातंत्र्याच्या ध्येयाशी एकनिष्ठ राहायचे होते. त्या सेनेत स्त्री-पुरुष समता होती. झाशीच्या राणीच्या नावाचे एक पथकच त्या सैन्यात होते. ते सैन्य पूर्णतः धर्मनिरपेक्ष होते. त्यात धर्मभेद नव्हता आणि जातिभेदही नव्हता. सिंगापुरातील चेट्टियार समाज मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिलेले निमंत्रण सुभाषबाबूंनी धर्मनिरपेक्षतेच्या कारणाखातरच तेव्हा नाकारले होते. त्या सेनेतील पथकांनाही गांधी, नेहरू व आझाद अशी नावे त्यांनी दिली होती.

 दि.6 जुलै 1944 रोजी सुभाषबाबूंनी प्रत्यक्ष गांधीजींना उद्देशून रेडिओवर एक भाषण केले. त्यात त्यांनी गांधीजींचा उल्लेख ‘राष्ट्रपिता’ असा केला. ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सुरू केलेल्या या लढ्याला मी तुमचे आशीर्वाद व शुभेच्छा मागत आहे,’ असे त्यात ते म्हणाले. दि.7 जानेवारी 1944 या दिवशी आपला लढा पुढे नेण्यासाठी त्यांनी सिंगापूर सोडले व आपले मुख्यालय रंगूनला हलविले. त्या वेळी भारतावरील त्यांच्या हल्ल्याला जपान सरकारने मान्यता दिली होती. मात्र जपानचे उद्दिष्ट इंग्रज सेनेला ब्रह्मदेशात येता येणार नाही म्हणून पराभूत करण्याएवढे मर्यादित, तर सुभाषबाबूंचे ध्येय भारताचे स्वातंत्र्य हे होते. त्यांच्या सेनेला इंफाळ या आताच्या नागालँडच्या राजधानीत मोठा विजय मिळाला. मग त्यांचे मुख्यालय रंगूनहून मंडालेजवळ आले. सेनेचा आशावाद उंचावला होता आणि तिचे पुढचे लक्ष्य कोहिमा हे होते.

मात्र त्याच वेळी ब्रिटिशांच्या मोठ्या फौजेने पुढे येऊन आझाद हिंद फौजेला रोखले व माघार घ्यायला भाग पाडले. याच सुमारास जपानच्या सरकारनेही त्यांना माघार घेण्याचा आदेश दिला. रंगूनहून 21 ऑगस्टला भाषण करताना सुभाषबाबूंनी आपले अपयश जाहीर केले. जंगलाचा डोंगराळ मुलूख, त्यात पावसाची संततधार आणि जखमींची मोठी संख्या यामुळे त्यांच्या सेनेचे माघारीच्या वाटचालीत फार हाल झाले. मात्र त्या साऱ्या प्रवासात सुभाषबाबू आपल्या सैनिकांसोबत राहिले. जर्मनीने 1945 च्या मेमध्ये व त्यानंतर ऑगस्टमध्ये जपानने दोस्त राष्ट्रांपुढे शरणागती स्वीकारली. परिणामी, त्यांच्या तुटपुंज्या बळावर उभा झालेला सुभाषबाबूंचा लढाही संपुष्टात आला.

दोस्त राष्ट्रांच्या फौजा दक्षिण-पूर्व आशियाचा प्रदेश जसजशा व्यापू लागल्या तसतसा सुभाषबाबूंचा व त्यांच्या सेनेच्या संचाराचा संकोच होऊ लागला. अखेर तिथून सुटका करण्यासाठी ऑगस्ट 45 च्या मध्याला ते बँकॉकहून सायगाव आणि तिथून पुढे तैपेईच्या मार्गाने टोकियोला जायला एका लष्करी विमानात चढले. हे विमान आधीच त्यात भरलेल्या मोठ्या सामग्रीच्या वजनाने उडेल की नाही, अशी शंका तेथील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तरीही सुभाषबाबू त्यात हट्टाने चढले आणि हे विमान वाटेत कोसळून त्यातच सुभाषबाबूंचा अंत झाला. टोकियो शहरात तेथील हिंदी जनतेने सुभाषबाबूंचे एक छोटेखानी स्मारक आता उभे केले आहे.

सुभाषबाबूंच्या मृत्यूची बातमी आली, तेव्हा नेहरू  कळवळले. त्या वेळी त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंची नोंद करून ठेवली आहे. ‘कोणत्याही योद्ध्याला त्याच्या अखेरच्या काळात ज्या वेदनांचा सामना करावा लागतो, त्यातून सुभाषची सुटका झाली’ एवढेच ते म्हणू शकले. पुढे त्यांनी लिहिले, ‘सुभाषबाबूंच्या देशभक्तीविषयी गांधीजींसह कोणाच्याही मनात कधी संशय नव्हता. त्यांचा मार्ग आम्हाला मान्य नसला, तरी ती त्यांची निवड होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना जे योग्य वाटले, तेच त्यांनी केले. तथापि, त्यांचा मार्ग चुकला, हे तेव्हाही माझ्या मनात होते. त्यांना विजय मिळाला असता, तरी त्याचे श्रेय जपानला गेले असते. शिवाय बाहेरच्या एखाद्या देशाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून द्यावे, ही गोष्ट समाजमनाच्या स्वास्थ्याचीही निदर्शक ठरली नसती.’ सुभाषबाबूंच्या जयंतीनिमित्त 1946 मध्ये बोलताना ते म्हणाले, ‘‘आम्ही एकमेकांचे सहकारी होतो. स्वातंत्र्याचा लढा आम्ही खांद्याला खांदा लावून 26 वर्षे लढलो. मी त्यांना सदैव माझा धाकटा भाऊ मानले. आमच्यात मतभेद होते. पण त्यांच्या मनाच्या स्वच्छतेविषयी व त्यातील देशभक्तीविषयी माझ्या मनात कधी शंका आली नाही. त्यांचा लढा साऱ्यांना सदैव स्फुरण देणारा असेल. कदाचित त्यांच्यासारखा विचार माझ्या मनात आला असता, तर मीही त्यांच्या मार्गाने गेलो असतो.’’

नेहरू व सुभाष यांच्यातील मतभेद फॅसिझमबाबतच्या त्यांच्या परस्परविरोधी भूमिकांमधून येणारे होते. फॅसिझमचा लढा खुद्द सुभाष लढवीत असतील, तरी मी त्यांच्याविरुद्ध उभा राहीन, असे नेहरू म्हणाले होते. सुभाषबाबूंना स्वातंत्र्यासाठी हिटलर, मुसोलिनी आणि पुजोही चालणारा होता. नेहरूंना यातले कोणीही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासोबत चालणारे नव्हते. हा फरक विचारातला आहे, व्यक्तीतला नाही.

(सुभाषबाबूंच्या अपघाती मृत्यूची घटना बंगालमधील अनेकांना तेव्हा संशयाची वाटली. ते त्या अपघातातून सुटले असणार व त्यांनी अन्यत्र आश्रय घेतला असणार, या आशेवर त्यातली अनेक माणसे वर्षानुवर्षे राहिली व आजही ती तशी आहेत. या संशयाचा लाभ गांधी व नेहरू यांच्यावर रोष धरणाऱ्या भारतातील अन्य राजकारणी माणसांनी नंतरच्या काळात घेण्याचा प्रयत्न केला. कुठल्याशा आश्रमातले एक बाबा हेच सुभाषबाबू आहेत इथपासून ते हिमालयात अजूनही हयातच आहेत इथपर्यंतच्या अफवा या मंडळींनी त्या काळात उठवल्या. नेहरू व काँग्रेस यांच्या भयानेच ते प्रगट होत नाहीत, ही अफवाही या संशयी लोकांनी मोठ्या प्रमाणावर पेरली. वास्तव हे की, सुभाषबाबूंना ते हयात असते तर प्रगट होण्यापासून व भारतात येण्यापासून कोणीही अडवू शकले नसते. त्यांची लोकप्रियता कायम होती आणि त्यांच्याशी मतभेद असतानाही नेहरूंना त्यांच्याविषयी वाटणारी आत्मीयता मोठी होती. ब्रिटिश सरकारने आझाद हिंद सेनेच्या पराभूत सैनिकांवर आणि अधिकाऱ्यांवर दिल्लीच्या लाल किल्ल्यात जेव्हा देशद्रोहाचा खटला दाखल केला, तेव्हा नेहरू अनेक वर्षांनंतर अंगावर काळा कोट चढवून त्यांच्या बाजूने वकील म्हणून उभे राहिले. नंतरच्या काळात नेहरूंच्या सरकारने त्या साऱ्यांचे सन्मानपूर्वक पुनर्वसनही केले. मात्र नेहरूंवर राग असणाऱ्यांनी सुभाषबाबूंविषयीचा संशय जिवंत राहील याचाच अखेरपर्यंत प्रयत्न केला. सध्या देशात सत्तेवर असलेल्या सरकारने त्यांच्या मृत्यूची चौकशी करायला एक आयोगही आता नेमायला कमी केले नाही. याआधीच्या सरकारांनीही असे अनेक आयोग नेमले आणि त्यांनी सुभाषबाबू हयात नसल्याचाच निर्वाळा दिला. मात्र, सत्याला शेवट असला तरी संशयाला शेवट नसतो आणि त्याचा वापर राजकारणी माणसांएवढा दुसऱ्या कोणालाही चांगला करता येत नाही.)

Tags: गांधीजी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस सुरेश द्वादशीवार गांधीजी आणि त्यांचे टीकाकार आझाद हिंद फौज फोरवर्ड ब्लॉक ‘डार्लिंग ऑफ बेंगॉल’ Gandhiji aani Netaji Subhashchanda Bose सुभाषचंद्र बोस Suresh Dwadashiwar Gandhiji aani tyache tikakar Aazhad Hind Fauz Darling Of Bangle Forward Block Subhashchandra Bose weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात