डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मराठीतील वैश्विकता आणि आत्मग्रस्तता

हूंग चांग आणि जॉन हलिडे यांनी लिहिलेले माओ त्से तुंगाचे ताजे चरित्र माझ्या संग्रही आहे. सहाशे पानांच्या या पुस्तकाच्या शेवटी दीडशे पानांची ग्रंथ व दस्तऐवजांची सूची संदर्भ म्हणून वापरल्याची त्यात नोंद आहे. एवढ्या अध्ययनाची तयारी आणि जिध्द मराठीच्या किती उपासकांत आहे? फार कशाला? गांधीजी समजून घ्यायला आम्हांला अजून लुई फिशर आणि इंदिरा गांधींसाठी कॅथराईन फ्रँकची मदत घ्यावी लागते. मार्गारेट थॅचर आणि हिलरी क्लिंटनसारखी उघडी आत्मचरित्रे आपल्या राजकारण्यांनी सोडा पण लेखकांनी तरी कुठे लिहिली? स्वतःच्या अनुभवाखेरीज अनुभव नाही आणि आपल्या परिसराखेरीजचे पर्यावरण समजून घेण्याची तयारी नाही. अशा तुटपुंज्या बळावर आणि मुंबई-मालवण-नाशिक हा परिसर सांभाळत मराठीचे ऐवजदार विश्वाला गवसणी कशी घालणार?

दुरितांचे तिमिर जावो,  विश्व स्वधर्मसूर्ये पाहो,  अशी विश्वाच्या कल्याणाची  आळवणी करणाऱ्या मराठी भाषेतील साहित्याभोवती प्रादेशिकता, जातीयता आणि  नुसतीच व्यक्तिगतता यांची कुंपणे कधी उभी राहिली?  की या तुकड्यांच्या अहंताच  स्वधर्मसूर्ये म्हणून बलशाली झाल्या?  यातले वास्तव मराठीच्या सूर्योदयाच्या काळातले की तिच्या मावळतीची चिंता करू लागलेल्या आताच्या काळातले? नव्या जमिनी अधिक सकस असतात,  त्या धुपल्या की त्यात तणाखेरीज फारसे काही उगवत नाही असे  म्हटले जाते. मात्र तणांनाच भाले मानण्याची प्रवृत्ती बलशाली होत असेल तर... किंवा पूर्वी फारसे काही पिकलेच नाही असे कुणी म्हणणार असेल तर...?  मराठी ही जगातली पंधराव्या क्रमांकावर असलेली दहा कोटी माणसांची मातृभाषा  आहे. जर्मन,  फ्रेंच आणि जपानी भाषेच्या ती जवळ जाणारी आहे. इटालियन,  मेक्सिकन  व अरबी भाषांहून जास्त बोलली जाणारी आहे. तिला एक हजार वर्षांचा इतिहास आहे.  तिने मोगलांचे आक्रमण सोसले आणि ब्रिटिशांचे दडपणही सहन केले आहे. एवढ्यावरही ती टिकली आणि जगली असेल तर आताच्या स्वातंत्र्यात ती खंगेल आणि संपेल असे म्हणणारी माणसे गडकऱ्यांच्या चिंतातुरांहून वेगळी नाहीत हे नम्रपणे सांगावे  लागेल. ‘मराठी उतरणीला लागली’ ही भाषा मराठी भाषिकांची नाही. साहित्य सेंलन  नावाच्या उत्सवाला जमणाऱ्यांची व त्यात भाषणे करणाऱ्यांची ती बोली आहे. (मुंबई सोडावी लागलेल्या आणि आता पुण्याच्याही अनेक भागांतून हलू लागलेल्या मराठी माणसांच्या मनातली ही भीती आहे काय?  

विदर्भ हा एकेकाळी मध्यप्रांताचा भाग होता.  मराठवाड्यावर परवापर्यंत निजामाचे आसफशाही राज्य होते,  मध्यप्रांताची भाषा हिंदी तर निजामशाहीत उर्दूचा वरचष्मा होता. तरीही त्या दोन भागांत मराठीची चिंता करताना  कोणी दिसत नाही. तो त्या प्रदेशातील लोकांचा मराठीविषयीचा भरवसा मानायचा की  त्यांच्यावर संवेदन शून्यतेचा वा माघारलेपणाचा ठपका ठेवून मोकळे व्हायचे?)  भाषेतले साहित्य वा ती बोलणाऱ्यांची संख्या यावर तिचे मोठेपण वा भवितव्य ठरत  नाही. त्या भाषेतून प्रगटणाऱ्या ज्ञानाच्या बळावर तिचे माहात्म्य ठरत असते. संस्कृत ही  भाषा आज लोप पावलेली दिसत असेल तरी तिचे अध्ययन करणारे व तिच्या ग्रंथांधील  ज्ञानाचा ठाव घेणारे असंख्य लोक जगात आहेत. इंग्लंड व जर्मनीतल्या किती  तत्त्वचिंतकांनी त्या भाषेच्या अध्ययनावर आपली उंची वाढवून घेतली हे येथे आठवण्याजोगे आहे. भाषा हा समाजाच्या अनुभवाचा हुंकार असतो. तो अनुभव जेवढा सकस आणि समृध्द व त्याची अभिव्यक्ती जेवढी दमदार आणि समर्थ तेवढी ती भाषाही  मोठी,  उंच आणि अधिक व्यापक क्षेत्र कवेत घेणारी होते.  मराठी भाषेएवढाच तिच्या साहित्याचा इतिहास मोठा आहे. तो घडविण्यात महाराष्ट्रातील सर्व जाती,  पंथ व धर्मांतील संतांपासून शाहिरांपर्यंतच्या,  बखरकारांपासून  विचारवंतांपर्यंतच्या आणि राजकारणाएवढेच समाजकारणाचे नेतृत्व करणाऱ्यांच्या  कर्तृत्वाचा वाटा मोठा आहे.

असे साहित्य नंतरच्या काळात चौरस होत न जाता  एकारलेले होत गेले असेल आणि ‘सारे काही वाचा’ इथपासून ‘त्यांचे वाचू नका’ असे सांगण्यापर्यंत पुढे वा मागे गेले असेल तर त्याची कारणे भाषेच्या बलाबलात शोधायची  नसून समाजाच्या कमी-अधिक झालेल्या उंचीत शोधायची  असतात... वास्तविक शिक्षणाच्या प्रसारामुळे वाचकांची संख्या  वाढली. गाव तेथे ग्रंथालय उभे झाले,  लेखकांची संख्या वाढली, प्रकाशकांचा धंदा वाढला. महाराष्ट्र हे इंग्रजी ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा सर्वाधिक स्वीकार करणारे राज्य असले तरी या राज्यात मराठी वृत्तपत्रांना मिळविता आली तेवढी वाचकसंख्या इंग्रजी वृत्तपत्रांना मिळविणे जमले नाही. देशातही सर्वाधिक खप असलेली पहिली  दहा वृत्तपत्रे ‘राष्ट्रीय’च आहेत. मराठी वा देशी भाषा आणि त्यांचे  वाचक कमी झाल्याचे हे लक्षण नव्हे... ‘मराठी साहित्याचे वाचक  कमी झाले वा होत असतील’  तर मात्र त्याची कारणे अन्यत्र  शोधावी लागतील आणि त्याही वेळी दूरचित्रवाहिन्या आणि त्यांचे  वाढते आक्रमण हे सवंग व अनेकांचे आवडते कारण पुढे करून  चालणार नाही. जगातल्या ज्या देशात दूरचित्रवाहिन्या फार पूर्वी आल्या आणि  त्यांची सेवा भारतातल्या व महाराष्ट्रातल्या त्यांच्या सेवेहून मोठी  आहे त्या देशात ग्रंथांचा खप व पुस्तकांचे वाचक वाढले आहेत.  इंग्रजीत वा युरोपात प्रकाशित होणाऱ्या सामान्य लेखकाच्या  कादंबरीची पहिली आवृत्तीच काही लाखांची निघते. ही बाब तेथे  वाचकांची परंपरा मोठी असल्यामुळे घडली नाही. नीत्शेसारख्या  तत्त्वज्ञानी माणसाच्या पुढे जगप्रसिध्द झालेल्या ग्रंथाच्या फक्त सहा  प्रती खपायला जर्मनीत कित्येक वर्षे लागली होती. नंतरच्या  काळात मात्र पुस्तकांची पाने छापून होताच ती वाचायला  वाचकांच्या रांगा छापखान्यांसमोर उभ्या झालेल्याही त्या भागाने पाहिल्या.

आपल्याकडे अशा घटना घडल्या नाहीत असे नाही.  लोकमान्यांच्या गीतारहस्याची पहिली आवृत्ती अवघ्या काही  तासांत लोकांनी रांगा लावून व विकत घेऊन संपविली. पाच आणि  सहा हजारांची आवृत्ती खपायला काही दिवस पुरे पडले अशा  कहाण्या अलीकडेही आपण ऐकल्या आहेत. तत्त्वचिंतनपर व  अवघड विषयांवर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांच्या आवृत्त्या अशाच  हातोहात खपल्याची मराठीत उदाहरणे आहेत. ही उदाहरणे  अपवाद म्हणून सोडून द्यायची नाहीत. तीच आजच्या  काळजीवरचा खरा उपाय सांगणारी आहेत. जागतिक व राष्ट्रीय  वाङ्‌मयाच्या परिक्षेत्रात आपण व आपले वाङमय कुठे बसणारे आहे आणि जागतिक व संगणकीय दृष्टी असणारा आजचा व  उद्याचा वाचक यांना ते कितीसे भावणारे आहे या प्रश्नाचा आता  फार परखड व अंतर्मुख होऊन विचार करणेच गरजेचे आहे.  रवींद्रनाथांनी आपली कविता बंगालीत तर गांधीजींनी त्यांचे  निम्मे लेखन गुजरातीत केले. ते समजून घ्यायला जगाने ते आपल्या भाषेत नेले वा त्यांची भाषा शिकून आत्मसात करण्याचा प्रयत्न  केला. अनेक अरब आणि अफगाणिस्तानी, व्हिएतनामी आणि  कझाकी लेखकांच्या वाट्याला,  त्यांची भाषा मराठीहून कमी  बोलली वा वाचली जात असतानाही हे भाग्य आले. निकॉस  कझीनझाकीससारखा ग्रीक लेखक साऱ्या जगात वाचला गेला. फार कशाला,  प्रथम बंगाली व नंतर कानडी कादंबऱ्यांची,  उर्दू आणि पंजाबी आत्मचरित्रांची,  मल्याळी आणि हिंदी कवितांची भाषांतरे करून भारताने वाचली. अनेक मराठी माणसांच्या वाङ्‌मयीन आवडीही त्यावर समृद्ध झाल्या. असा दावा  मराठीतील किती ग्रंथांना व प्रतिभावंतांना आपल्या नावे करता  येईल?  मात्र त्यासाठी रवींद्रनाथ आणि गांधी,  टॉलस्टॉय आणि  कझीनझाकीस, टोनी मॉरिसन आणि माथाई, शरदबाबू आणि  भैरप्पा किंवा अमृता प्रीतम आणि तेहमिना दुर्राणी यांच्याएवढ्या  उंचीचे लिहावे लागते. त्याआधी त्यांचे वाचावे आणि  अभ्यासावेही लागते. आपल्या वाङ्‌मयाचा भूगोल एकदा याही  अर्थाने पाहिला पाहिजे. आमच्या वाचनाला मर्यादा आहेत.  नेहरूंच्या इंग्रजी लेखनातले लालित्य,  पटेलांच्या पत्रव्यवहारातले  हार्द, गांधीजींच्या लिखाणातले सहजसाधे पण भिडणारे आपलेपण  आणि आंबेडकरांच्या लेखणीतली दाहकता तरी आम्ही कुठे  समजून घेतली?

लेखक नावाची एक वेगळी जात आहे आणि  तिच्याखेरीज इतरांच्या लिखाणांची दखल नको ही आपल्या  समीक्षकांनी स्वतःभोवती आखून घेतलेली मर्यादा आहे. तिचे  संकुचितपण आपण कधी लक्षात घ्यायचे की नाही?  ‘अणुरेणूहुनिया थोकडा,  तुका आकाशाएवढा’  यात नुसते अध्यात्म वा भक्तिभाव नाही, ते अतिशय श्रेष्ठ दर्जाचे साहित्य आहे  हे तरी आमच्या समीक्षकांनी सांगायचे की नाही?  ‘ज्ञानेश्वर आणि तुकाराम या साहित्यिकांनी जी भाषा समृद्ध केली तिचे आम्ही  लेखक वा कवी आहोत हे म्हणतानाही मला संकोच वाटतो’  असे  सुरेश भटांना बहुधा याचमुळे म्हणावेसे वाटले असेल.  एवढ्या उंचीवर जाणारे कितीजण आणि कोण ते फार कठोरपणे  पाहिले पाहिजे. ऑर्थर हेली,  आयर्व्हिंग वॅलेस किंवा आताचा डान ब्राऊन ही इंग्रजीतली पहिल्या श्रेणीची नावे नाहीत. पण त्यांच्या  अध्ययनाच्या खोलीचा आणि उंचीचा आवाका पाहिला की  आपल्या लेखकांनाही भोवळ यावी. टॉलस्टॉय आणि दोस्तोव्हस्कींना जाऊन शंभर वर्षे झाली. हेमिंग्वेच्या निधनालाही  काही दशकांचा काळ लोटला. पण त्यांची तर नावेही आम्ही  उच्चारू नयेत. उगाच एखाद्याला मराठीतला दोस्तोव्हस्की  म्हणायचे आणि दुसऱ्या कुणाला शरदबाबू ठरवायचे यातले समाधान मोठे असले तरी खोटे आहे. मग अशी माणसे आणि  त्यांची पुस्तके नव्या पिढ्यांच्या (आणि आता आठवी- नववीतली मुलेही इंग्रजी व इतर भाषांतरित पुस्तके वाचू लागली  आहेत) हाती लागली आणि त्यांनी आमच्या लेखकांना हात लावायला नकार दिला तर त्या अपराधाचा दोष त्या मुलांना  द्यायचा की वाङ्‌मयाच्या उपासकांनी स्वतःकडे घ्यायचा?

गावोगाव वृत्तपत्रे आणि नियतकालिके निघू लागली. दैनिकांच्या  साप्ताहिक पुरवण्यांपासून दिवाळी अंकांपर्यंत साऱ्यांना ढिगाने  वाङ्‌मय नावाचा मजकूर लागू लागला. त्यातून लेखक उदंड झाले  आणि कवींचेही पीक जोरात आले. त्यातल्या कितीकांना आताच्या स्पर्धेत उंच उभे राहता आले आणि त्यातल्या  कितीजणांची पुस्तके आवर्जून वाचावी असे वाचकांना वाटले?..  शेवटी अमूक एक पुस्तक वाचलेच पाहिजे,  ते न वाचल्याने  आपली उंची वाढणार नाही असे वाचकांनाही वाटावेच ना?  अमूक एक लेखक वा कवी महान असल्याचे कोणा समीक्षकाने  सांगायचे आणि तो समीक्षक फार थोर असल्याचे त्या लेखकाने  म्हणायचे. एकमेकांची अशी पाठ खाजविणारी फार मोठी माणसे  आपल्या मायबोलीच्या आवारात आहेत. अमूक हा महान का,  तर तो कोणी वाचत नाही म्हणून किंवा वाचला तरी समजत नाही  म्हणून. आणि तो सामान्य का,  तर तो सारे वाचतात आणि वाचून समजू शकतात म्हणून... परिणामी वाचली न गेलेली अनेक माणसे आपल्या वाङ्‌मय प्रांतात मोठी झाली आणि खऱ्या मोठ्यांना  मोठेपण न देण्याचे विलक्षण कामही त्या क्षेत्रात फार झाले.  

हूंग चांग आणि जॉन हलिडे यांनी लिहिलेले माओ त्से तुंगाचे  ताजे चरित्र माझ्या संग्रही आहे. सहाशे पानांच्या या पुस्तकाच्या शेवटी दीडशे पानांची ग्रंथ व दस्तऐवजांची सूची संदर्भ म्हणून वापरल्याची त्यात नोंद आहे. एवढ्या अध्ययनाची तयारी आणि जिध्द मराठीच्या किती उपासकांत आहे? फार कशाला? गांधीजी  समजून घ्यायला आम्हांला अजून लुई फिशर आणि इंदिरा  गांधींसाठी कॅथराईन फ्रँकची मदत घ्यावी लागते. मार्गारेट थॅचर  आणि हिलरी क्लिंटनसारखी उघडी आत्मचरित्रे आपल्या  राजकारण्यांनी सोडा पण लेखकांनी तरी कुठे लिहिली?  स्वतःच्या  अनुभवाखेरीज अनुभव नाही आणि आपल्या परिसराखेरीजचे पर्यावरण समजून घेण्याची तयारी नाही. अशा तुटपुंज्या बळावर  आणि मुंबई-मालवण-नाशिक हा परिसर सांभाळत मराठीचे  ऐवजदार विश्वाला गवसणी कशी घालणार?  मग आहे त्यातलेच  काही थोर ठरणार किंवा महान ठरविले जाणार.  इंग्रजीतल्या ललित वाङ्‌मयाची परंपरा मोठी आहे हे या  साऱ्याचे उत्तर नाही. पाउलो कोएलो किंवा ओरहाम पामुख या  लेखकांनाही परंपरा नाही. अरबी आणि अफगाण लेखकांना तर सांगता यावा असा इतिहासही नाही. उर्दू आणि पंजाबीलाही तो  नाही. टोनी मॉरिसन ही कृष्णवर्णीय अमेरिकन लेखिका नोबेल  विजेती होत असेल तर तिच्या मागे आपण कोणती परंपरा उभी  करणार असतो?  टॉलस्टॉयच्या ॲना कॅरेनिना या कादंबरीचे  पहिले वाक्य ‘सगळ्या घरांचे आनंद सारखे असले तरी त्यांच्या  दुःखांचे चेहरे मात्र वेगळे असतात’ हे आहे. खरे तर,  वास्तव याहूनही वेगळे आहे.

घरांच्याच नाही तर माणसांच्याही आनंद व  दुःखांचे विषय सारखे आहेत आणि जगभरची दुःखे व आनंद यांचा  चेहराही एकच आहे. आपल्या दुःखाला व आनंदाला विराट  परिमाण देणे हे प्रतिभेचे काम आहे. ती फोटोग्राफी नाही, चित्रकृती  आहे. मराठीत अशी विराट परिमाणे घेऊन माणसे आली नाहीत  असे नाही. त्यांची संख्या अर्थातच थोडी असणार. तशी ती माणसे  जगातही अल्पसंख्यच असतात. मात्र ती झालीच नाहीत असे  कोणी म्हणणार नाही. अशी उंची गाठलेली नावे प्रत्येक शतकात  आणि दशकातही दाखविता येतील. अशा कितीकांचे मोठेपण  आपल्या समाजातील ज्या घटकांनी अलीकडे संकोचून व आक्रसून टाकले त्यांचाही विचार या संदर्भात कधीतरी व्हावा  लागणार आहे.  मराठीत महाकाव्य का जन्माला आले नाही हा प्रश्न वामन  मल्हारांपासून अलीकडच्या एका सेंलनाध्यक्षांपर्यंतच्या अनेकांनी आजवर विचारला. त्याची उत्तरेही त्यांनी त्यांनी  आपापल्या परीने दिली. मात्र या प्रश्नाचे खरे उत्तर वाङ्‌मयात वा  त्याच्या समीक्षेत नाही. ते समाजात आहे व त्यातच ते शोधावे  लागते.

महाकाव्ये जन्माला यायची तर पराक्रम आणि प्रतिभा यांना  एकत्र यावे लागते. प्रभू रामचंद्रांचा पराक्रम आणि वाल्मीकीची  प्रतिभा दोन्ही एकत्र आले की रामायण जन्माला येते. श्रीकृष्णाचे  पूर्णत्व आणि व्यासांची प्रातिभा उंची यांच्या एकत्र येण्यातून  महाभारत जन्म घेते. ॲचिलसचा पराक्रम आणि होरची दृष्टी  इलियडची निर्मिती करते... प्रतिभा आणि पराक्रम यांचा असा  संगम मराठीत झाला नाही. महाराष्ट्र प्रांतात प्रतिभेने पराक्रमाचा  उपहास अधिक केला तर पराक्रमाने तिची उपेक्षाही तशीच केली. राजकारण हे पराक्रमाचे क्षेत्र तर साहित्य हा प्रतिभेचा प्रांत आहे.  मराठी माणसांनी राष्ट्रीय पातळीवर आपले नाव आपल्या  पराक्रमाच्या व त्यागाच्या बळावर मोठे केले याची राजकारणातील  अनेक उदाहरणे सांगता येतील. त्यात छत्रपतींपासून लोकमान्यांपर्यंतची आणि स्वातंत्र्यवीरांपासून बाबासाहेबांपर्यंतची उत्तुंग माणसे आहेत. मराठी प्रतिभेने त्यांची दखल कितीशी  घेतली? लोकमान्यांवर त्यांच्या एका मराठी अनुयायाने  संस्कृतातून महाकाव्य लिहिले. मराठीतील कुणाला त्यांच्यावर,  शिवरायांवर,  सावरकर व आंबेडकरांवर ते लिहावेसे वाटले नाही.... तशी त्यांना इच्छा झाली नाही की आपला आवाका  कमी पडेल या भीतीने त्यांना ग्रासले?  मराठी माणसांच्या  पराक्रमाविषयी उदासीन राहिलेली ही प्रतिभा मग गांधी, रवींद्रनाथ  वा नेहरू-पटेलांपर्यंतचा आणि मौलाना-नेताजींचा पल्ला कशी  गाठू शकेल?  कधीकधी मनात येते गुजराती साहित्याने गांधीजींचे ऋण जसे  मान्य केले तसे मराठी साहित्यप्रांताला आपल्यावर असलेल्या महापुरुषांच्या उपकाराचे ओझे अजून कसे जाणवले नाही?  

गांधीजींच्या गुजराती लिखाणाने त्या साहित्याचा चेहरामोहराच  नव्हे तर सारी प्रकृती बदलून टाकली. महाराष्ट्रात जोतिबांपासून लोकमान्यांपर्यंत आणि आंबेडकरांपासून विनोबांपर्यंतची मोठी  माणसे साध्या मराठीतून लिहीत आली. त्यांच्या लिखाणाचा  आणि वाणीचा प्रभाव साऱ्या मराठी मानसावर पडला. त्यानेच  मराठी जीवनाच्या वाटा प्रशस्त केल्या. मराठीची म्हणावी अशी  कल्पनासृष्टीही त्यांनी विकसित केली... मराठी साहित्याचा प्रांत  या साऱ्यांपासून दूर,  तटस्थ,  कोरडा आणि विरक्त का राहिला? जनमानसावर एवढी मोहिनी घालणाऱ्या या महापुरुषांना त्याने  साहित्यिक म्हणून मान्यता का दिली नाही?  त्या माणसांची उंची  त्या मान्यतेशिवाय कमी व्हायची नव्हती पण ती न दिल्याने  समाजाच्या मनातून मराठी साहित्य उतरले की नाही? आपल्या या मर्यादांना आपल्यातील जातीयवाद आणि त्या बळावर उभे राहिलेले आताचे राजकीय दुराग्रह कारणीभूत झाले  आहेत काय? राष्ट्रीय आणि प्रादेशिक अशा सगळ्याच  नेतृत्वापासून आपली प्रतिभा जी दूर राहिली तिचे कारण कशात  शोधायचे?  

उच्चवर्णीय लेखकांना (एखादा सन्माननीय अपवाद  वगळला तर) दलित जीवनावर लिहिता येत नाही आणि दलित  लेखकांनी सवर्णांच्या सुख-दुःखांकडे पाठ फिरवलेली असते. शहरी लेखकांनी ग्रामीण जीवनाचे रेखाटलेले चित्र बेगडी तर  विदर्भातल्या माणसाने मुंबईवर लिहिलेले सारे दूरस्थासारखे. असे का? सवर्णांना आंबेडकरांविषयीचा जिव्हाळा नाही आणि  दलितांना टिळक दूरचे आहेत... आजच्या राजकारणी नेत्यांचे  उल्लेख या संदर्भात वेगळे करण्याचे कारण नाही. हिंदू लेखक  मुसलमान जीवनाविषयी अनभिज्ञ तर मुस्लिम लेखकही हिंदू  जीवनपध्दतीपासून दूर राहिलेले. ब्राह्मण-ब्राह्मणेतर,  मराठा- मराठेतर,  ओबीसी आणि दलित अशी जातींची कुंपणे आपल्या प्रतिभेभोवती नाहीत असेच आम्ही जाहीरपणे सांगू. पण तसे सांगणे कितीसे प्रामाणिक असेल?  साहित्य वा कोणताही कलाप्रकार यांची उंची तो ज्या  समाजाच्या खांद्यावर उभा असतो त्याच्या उंचीबरहुकूम कमी  किंवा अधिक होते. प्रतिभा ही बाब कितीही व्यक्तिगत असली तरी  वाळवंटात वाढायला लागणारे झाडांचे सामर्थ्य सारेच प्रतिभावंत कसे आणू शकतील?  त्याला अनुकूल असे सामाजिक पर्यावरणही लागतच असते. ते निर्माण करणे ही केवळ प्रतिभावंतांची  जबाबदारी नाही. समाजाचे राजकीय व सामाजिक नेतृत्व करणाऱ्यांचे त्याविषयीचे उत्तरदायित्व मोठे आहे. हे नेतृत्वही तशाच गुंत्यात अडकले असेल तर मग केवळ कलाप्रकारच ठेंगणे  राहत नाहीत,  सारे समाजजीवनच उथळ व तुटक होत असते.

Tags: विदर्भ मराठवाडा मातृभाषा हॉन हलिडे हुंग चांग मराठी साहित्य महात्मा गांधी सुरेश व्दादशीवार vidarbha marathwad matrubhasha hon halide hung chang Marathi sahitya mahatma Gandhi Sursh dwadashiwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके