डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आणीबाणीच्या काळातील माझा तुरुंगवास

सुरेश द्वादशीवार यांनी चार वर्षांपूर्वी दिवंगत झालेल्या पत्नी जयाला उद्देशून लिहिलेल्या 30 दीर्घ पत्रांचे पुस्तक येत्या आठवडयात साधना प्रकाशनाकडून येत आहे. या पुस्तकात कौटुंबिक आठवणी तर आहेतच,  पण जास्त भाग व्यापला आहे तो राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटना घडामोडींच्या आठवणींनी! त्यातील एक प्रकरण आहे, 1975 मध्ये देशावर लादल्या गेलेल्या आणीबाणीच्या काळातील तुरुंगवासावर! नाशिक येथील कारागृहात 14 महिन्यांचा तुरुंगवास भोगलेले द्वादशीवार त्या वेळी 33 वर्षांचे होते. राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि पत्रकार संपादक अशी दुहेरी ओळख त्यांची त्या वेळी नागपूर-चंद्रपूर परिसरात होती. नंतरच्या अर्धशतकात लोकसत्ता व लोकमत या दैनिकांचे नागपूर आवृत्त्यांचे संपादक, आठ वैचारिक कादंबऱ्या व दहा वैचारिक पुस्तकांचे लेखक अशी त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे. मात्र ते त्या पलीकडे बरेच काही होते/आहेत, हे या नव्या पुस्तकातून चांगले कळते आणि त्याची एक झलक म्हणजे हे प्रकरण आहे. - संपादक

प्रिय जया,

दार्जिलिंगला असतानाच 25 जूनच्या रात्री देशात आणीबाणी लागू करण्यात आल्याची बातमी रेडिओवर ऐकली. अलाहाबाद न्यायालयाच्या त्या निकालानंतर राजीनामा देणे किंवा असे काही करणेे, हे दोनच पर्याय इंदिरा गांधींसमोर होते. त्यांनी त्यांच्या सल्लागारांच्या सहाय्याने दुसरा पर्याय निवडला होता. ती बातमी ऐकताच आपल्याला यात अटक होईल, असे मनात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी दार्जिलिंगहूनच डॉ. काशीकरांना फोन लावून माझी शंका बोलून दाखवली. ते म्हणाले, ‘परतण्याची घाई करू नका. मी तुम्हाला तिथूनच जपानला पाठवण्याची व्यवस्था करतो.’ मला ते सारे निरर्थक वाटत होते. बैठकीचा काळ संपताच मी नागपूरला व पुढे चंद्रपूरला परत आलो. तिथे विरोधकांचे अटकसत्र सुरू झाले होते. दर दिवशीच्या त्या अटकेच्या बातम्या कानांवर येत होत्या. माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी वा संघासारख्या संघटनेशी संबंध नव्हता, तरी माझे सरकारविरोधी लेखन व तरुण भारतचे प्रतिनिधित्व मला तुरुंगात पाठवण्यास पुरेसे आहे, हे लक्षात आले होते. तरीही डिसेंबर उजाडेपर्यंत मला अटक झाली नाही.

याच काळात शैलाचे लग्न गंगाधरशी झाले. त्याची तारीख 9 डिसेंबर ही होती. त्या आधी एक-दोन दिवस राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण चंद्रपूरला आले. त्यांच्या येण्याआधी एकच दिवस चंद्रपुरात भरलेल्या कुस्त्यांच्या राज्यस्तरीय सामन्याच्या वेळी कुणा अज्ञात इसमाने आणीबाणी विरोधी पत्रके वाटली होती आणि पोलीस त्याचा माग घेत होते. शंकररावांनी चंद्रपूरचे आमदार एकनाथ साळवे यांच्या घरी सायंकाळचा चहा घेतला. त्या वेळी उजव्या कम्युनिस्ट पक्षाचे एक नेते गणपतराव अमृतकरही तिथे होते. त्यांनी ती पत्रके बहुधा मीच लिहिली आणि त्यातली भाषा माझ्या वृत्तपत्रीय लिखाणाशी जुळणारी आहे, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्याच वेळी त्यांनी माझ्या अटकेचा आदेश पोलीस प्रमुखांना दिला. ते प्रमुख माझ्या संबंधातले असल्याने त्यांनी आमच्या घरी 9 तारखेला लग्न होणार असल्याचे शंकररावांना सांगितले. त्यावर त्यांना नंतर अटक करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. परिणामी 13 डिसेंबरला मला अटक होऊन माझी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली.

त्याआधी या घडामोडींची माहिती समजताच चंद्रपूरचे काँग्रेस खासदार अब्दुलभाई शफी आपल्या घरी आले. येताना त्यांनी शहराचे नगराध्यक्ष मनोहरराव कोतपल्लीवार यांनाही आणले. मला होणारी अटक अन्यायपूर्ण आहे आणि माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी वा संघटनेशी संबंध नाही हे ठाऊक असलेले शफी भैया म्हणाले, ‘मी आज रात्रीच मुंबईला जाऊन चव्हाण साहेबांची भेट घेतो आणि त्यांना हे सारे सांगतो.’ त्यावर मीच त्यांना अशा रदबदलीचा कोणताही उपयोग होणार नसल्याचे सांगितले. त्यांनी माझे काहीएक न ऐकता मला सामान बांधायला व आपल्या गाडीत बसायला सांगितले. मी मुकाटपणे त्यांच्यासमवेत गेलो. खरे तर मी शफीभैयांच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध काम केले होते. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना विरोधी पक्षांची जुळवाजुळव करून त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणणाऱ्यांतही मी होतो. पण शफीभैयांमध्ये एक अनोखे माणुसपण होते आणि ते त्यांच्या स्वभावधर्माचा भाग होते. आपले राजकारण अडचणीत आणून, ते तेव्हा मला मदत करू पाहत होते.

ते मला घेऊन नागपूरला त्यांच्या सदर भागातील घरी गेले. त्यांच्या पडदानशीन घरात मला दोन दिवस राहायला फर्मावले. रात्रीच्या विमानाने ते व कोतपल्लीवारजी मुंबईला गेले. शंकररावांना भेटले. पण माझ्या अपेक्षेप्रमाणे त्यातून काही निष्पन्न व्हायचे नव्हते व तसे ते झालेही नाही. रात्री उशिरापर्यंत त्यांचा फोन आला नाही, तेव्हा पुढचे सारे लक्षात घेऊन मी त्यांचे घर सोडले व वसूकडे राहायला आलो. तूही मग नागपूरला आलीस. एक रात्र तिथे काढून आपण सकाळच्या बसने चंद्रपूरला आलो. घरी एक दिवस घालवून मी चंद्रपूरचे ठाणेदार वसंत पाटील यांना फोन केला आणि मी कॉलेजात जात असल्याचे त्यांनाच सांगितले. कॉलेजातले सारे प्राध्यापक अन्‌ विद्यार्थी माझ्याकडे आश्चर्याने पाहात होते. मी शांतपणे पहिला वर्ग घेतला अन्‌ दुसरा घेत असतानाच कॉलेजचा कर्मचारी वर्गाच्या दाराशी आला अन्‌ मला खूण करून बोलवू लागला.

माझे बोलणे थांबवून दाराशी जात मी विचारले, ‘‘काय आहे?’’

त्यावर ‘‘साहेब, तुम्हाला घ्यायला पोलिसांची गाडी आली आहे.’’ तो म्हणाला.

‘‘माझा तास संपताच मी येतो, असे त्यांना सांग.’’

एवढंच म्हणून मी पुन: माझ्या तासास सुरुवात केली व तो पूर्ण झाल्यानंतरच बाहेर येऊन पोलिसांना भेटलो. वसंतराव पाटील हे ठाणेदार माझे स्नेही होते. माझ्या अटकेचा वॉरंट हाती देत ते म्हणाले, ‘तुम्ही तुमच्या स्कूटरने घरी जा. तासाभरात आम्ही तुम्हाला घ्यायला येतो.’ मी घरी आलो, तेव्हा तू अन्‌ घरचे सगळे माझी वाटच पाहत होतात. तुझे डोळे कोरडे होते अन्‌ तू एखाद्या शांत पुतळ्यासारखी वागत होतीस. काकूच्या डोळ्यांत पाणी होतं अन्‌ वडिलांच्या डोळ्यांत संताप. तशातच दोन घास खाऊन अन्‌ तू दिलेले कपडे अन्‌ अंथरुणाचा होल्डॉल घेऊन पोलिसांची वाट पाहत तुझ्याशी बोलत राहिलो... पोलिसांच्या गाडीत बसताना मी हळवा झालो, तू मात्र शांतच होतीस. तशीच एकटक पाहत होतीस.

गाडी घरापासून दूर जाताच सोबतचे पाटील म्हणाले, ‘भाऊ, आपण अगोदर माझ्या घरी जाऊ. तुमच्या वहिनीने तुमच्यासाठी पुरणपोळी बनवली आहे. ती खाऊनच मग पुढे जायचे.’ मी मनातून हललो होतो. पण तो  भाव चर्येवर येऊ न देता मी त्यांना हसून म्हणालो, ‘चला मग.’

पाटीलदादांकडून आम्ही सरळ पोलीस स्टेशनला आलो व पुढच्या प्रवासास लागलो. वाटेत वरोऱ्याला बस स्टँडजवळ गाडी थांबवायला सांगून मी स्टँडवर आलो. तेथून आनंदवनात बाबांना फोन केला. ते म्हणाले, ‘कृष्णाच्या जन्मस्थानी जात आहेस, सुखरूप परत ये.’ मग मीही त्यांना घराकडे लक्ष द्यायला सांगून त्यांचा तार्इंचा निरोप घेतला.

सायंकाळपर्यंत आम्हाला नेणारी पोलिसांची निळी व्हॅन अकोल्याला पोहोचली. पाटील यांच्या सूचनेवरून तीत मला ड्रायव्हरच्या शेजारची सीट दिली गेली. बाकीचे चार बंदी मागे, डब्यासारख्या मोठ्या जागेत होते. अकोल्याच्या पोलीस मैदानालगतच्या जागेत आमची व्यवस्था होती. तिथल्या अधिकाऱ्यांनी कॉट्‌स, गाद्या व ब्लँकेटची व्यवस्था केली होती. रात्रीचे त्यांनी आणलेले जेवण घेऊन आम्ही झोपलो. सकाळी मी माझ्या त्या शहरात राहणाऱ्या आतेबहिणीच्या घरी गेलो. आत्याही तिथेच होती. त्यांच्या भेटी घेऊन चौकीवर आलो आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. अंधार पडण्याआधीच आम्ही नाशिकला पोहोचलो. पण सोबतच्या पोलिसांनी आम्हाला सरळ तुरुंगात न नेता पंचवटीवर आणले. तेथील खडकाळ जागेतून वाहणाऱ्या गोदावरीत स्नान करूनच आम्ही कारागृहात आलो.

जेलच्या दारातून आत शिरताच शिपायांनी ते लगेच बंद केले. मागे अंधार झाला. पुढचे मात्र पाहायचे काही नव्हते. त्यानंतरचा 14 महिन्यांचा- 26 जानेवारी 1977 पर्यंतचा काळ तिथे घालवायचा होता. तो सुरू होताना, कधी संपेल याची कल्पना नव्हती. जेलमधले इतर कैदी म्हणायचे, ‘आमची शिक्षा संपताच आम्ही बाहेर जाऊ, पण तुम्ही?’

मी म्हणायचो, ‘तुम्हाला अपराधासाठी शिक्षा झाली. आम्ही अपराध न करता, येथे आलो. आमच्या कारावासाला आरंभ नाही अन्‌ शेवटही सांगता यायचा नाही.’ त्यावर तेच हळहळायचेे.

आपली भेटही आता थांबली. जेव्हा कधी तू जेलमध्ये यायचीस तेव्हा अन्‌ एरव्ही पत्रातून. हा काळ कधी संपेल याची तुलाही कल्पना नव्हती, मलाही अन्‌ देशालाही...

नाशिकचे मध्यवर्ती कारागृह एका विस्तीर्ण जागेवर गोलाकार उभे आहे. त्याभोवती परकोटवजा काळ्या दगडाची उंच भिंत बांधली आहे. या भिंतीवर दर काही फुटांच्या अंतरावर एक चौकी अन्‌ तिच्यात हाती बंदूक घेतलेला एक शिपाई आहे. कारागृहाच्या मध्यभागी एक उत्तर-दक्षिण लांबलचक रुंद रस्ता अन्‌ त्याच्या दोन्ही बाजूला कैद्यांना ठेवायला इमारती आहेत. रस्त्याच्या उजव्या हाताला लांब-रुंद बराकी अन्‌ डाव्या बाजूला दोन कैदी राहतील अशा भक्कम खोल्या आहेत. जेलच्या प्रवेशद्वारातून आत आले, की लगेच उजव्या हाताला क्वारंटाईनची इमारत आहे, तीत दोन-दोन जण राहतील अशा खोल्या आहेत. सामान्यपणे बडे नेते वा राजकीय कार्यकर्ते तिथे ठेवले जातात. पूर्वी या तुरुंगात फाशीची सोय होती, तेव्हा या इमारतीत फाशीचे कैदीही बंद असत. याच इमारतीत कधी काळी साने गुरुजी राहिले होते. त्यांची काही पुस्तके त्यांनी तिथेच लिहिली होती. त्या इमारतीच्या विरुद्ध बाजूला दवाखाना आणि एकांतवासाची शिक्षा झालेल्या बंद कैद्यांची जागा आहे. नंतर कैद्यांच्या राहण्याच्या खोल्या. रस्त्याच्या मध्यभागी एक गोलाकार इमारत असून तीत एक छोटेखानी ग्रंथालय व तुरुंगाचे कामकाज चालविणारे ऑफिस आहे.

मी रात्री आलो व मला बराकीत जागा दिली गेली. मी मुद्दाम दाराच्या जवळची जागा मागून घेतली आणि सोबत आणलेला होल्डाल पसरून त्यावर लागलीच झोपी गेलो. बराकीचे दरवाजे रात्री दहा वाजता बंद केले जात, ते पहाटे साडेपाचच्या सुमारास उघडण्यात येत. प्रत्येक बराकीमागे टिनाच्या मजबूत संडासांची व्यवस्था आहे आणि पुढच्या जागेतील खुल्या हौदात सतत पाण्याचे नळ पाणी फेकत आहेत. तिथेच साऱ्यांची स्नाने व त्याच नळांचे पिण्यासाठी पाणी. पहाटे उठलो अन्‌ बाहेर आलो. नाशिकची हवा तशीही थंड आणि मऊशार. काही क्षणांतच दोन दिवसांच्या प्रवासांचा क्षीण दूर झाला. मी अवतीभवतीची अन्‌ ओळखीच्यांची चौकशी करू लागलो.

सोबतच्या बंद्याने सांगितले, अनंतराव भालेराव क्वारंटाईनमध्ये आहेत. मी लागलीच तिथे गेलो तर तिथे मोठ्या माणसांचा खजिनाच हाती आला. त्यात मोहन धारिया होते, बापू काळदाते, प्रा.दाते, गंगाप्रसादजी अग्रवाल, किशोरभाई हे सारे. त्यांचा रोज सकाळी वाचनाचा वर्ग चालायचा. गंगाप्रसादजी जाडे विद्वत ग्रंथ वाचायचे अन्‌ बाकीचे ऐकून मग त्यावर चर्चा करायचे. अनंतरावांनी माझी ओळख करून दिली. मी त्या वर्गात सामील झालो.

तुरुंगात संघपरिवार व जनसंघाची माणसे सर्वात अधिक होती. त्या खालोखाल समाजवादी, काही संघटना काँग्रेसचे, काही चळवळीचे नेते, तर फार थोडे पत्रकार होते. तुरुंगात संघाची नियमीत शाखा भरायची. तीत त्यांच्या कवायती अन्‌ बौद्धिके चालायची. औरंगाबादचे प्रल्हादजी अभ्यंकर हे त्यातले कमालीचे चांगले वक्ते व संघटनेत बऱ्याच वरच्या पदावर असणारे गृहस्थ होते. त्यांची भाषणे मी आवर्जून ऐकायला जायचो. समाजवाद्यांकडे वक्ते फार होते. त्यात बापू काळदाते, अनंतराव भालेराव यांच्याशिवाय इतरही माणसे होती. बाकीचे लोक कधी इकडे तर कधी तिकडे जायचे, तर काही जण तुरुंगातल्या रस्त्यावर फिरून संध्याकाळ काढायचे. आरंभी तुरुंगातले कैदी साऱ्यांचे जेवण शिजवायचे. पण पुढे ते काम संघाच्या शिबिरात तयार झालेल्या अन्‌ स्वयंपाकात तरबेज असलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे घेतले. जेलच्या नियमानुसार राजबंद्यांना सकाळी चहा, नास्ता, दुपारी जेवण, मधल्या काळात एखादे फळ व रात्री पुन्हा जेवण दिले जायचे. पुढे त्यात दर दिवशी दिल्या जाणाऱ्या तुपाची भर पडली.

कधी बाहेरची माणसे फळांच्या गाड्या पाठवायची, तर सणासुदीला एखादे पक्वान्न. राजबंदी म्हणून कशाची कामे नव्हती. परिणामी माणसांच्या तब्येती सुधारू लागल्या आणि अनेकांचे शारीरिक वजनही वाढताना दिसले. पण तुरुंग ही माणसांना बरेच काही शिकण्याची आणि सोबतची माणसे वाचायला शिकवणारी जागा आहे. तुरुंगातील बंद्यांसमोर राणा भीमदेवी थाटात भाषणे देणारे काही जण आपली सुटका कधी होणार, म्हणून रात्र-रात्र रडायचे. एक गृहस्थ घरात वाघ पाळणारे म्हणून प्रसिद्ध होते. पण त्यांना असे कासावीस होताना लोक बघायचे. उलट तरुण माणसे उत्साहात होती. कार्यकर्ते अधिकाधिक संघटीत व आपल्या विचारांना धार परजताना दिसले. एरवी नम्र वाटणारी माणसे गुरकावून बोलत, तर काही माणसांवर थेट सर्वोदयी संस्कार झालेले दिसत.

वणीचे (जिल्हा यवतमाळ) ॲॅड. तात्या देशपांडे हे त्यांच्या चिरंजीवासह आमच्यासोबत होते. ते दुपारचा चहा करीत. आम्ही त्यांच्याभोवती जमून तो चहा घेत असू. एक दिवस ऐन चहाच्या वेळी एक सज्जन चेहऱ्याचेे पोक्त गृहस्थ अंगात साधी बंडी घालून अन्‌ कमरेभोवती पंचा गुंडाळून तिथे आले. मी तात्यांना विचारले, ‘‘तात्या, हे सर्वोदयी आहेत का हो?’’ त्यावर जराही मागे-पुढे न पाहता ते म्हणाले, ‘‘का? ते बह्यताड दिसतात म्हणून काय?’’

मीच गडबडलो. मग तात्यांनी त्या सद्‌गृहस्थांची ओळख करून दिली. ते ॲॅडव्होकेट होते अन्‌ तात्यांच्या जवळच्या नात्यातले होते. अशीच माणसे भेटत गेली. त्यांचा परिवार वाढतानाच ती माझ्याशी जुळत गेली.

रात्रीचे बहुधा आम्ही बाहेर अंथरुणे टाकून आकाशाखाली झोपत असू. तेव्हा मनात यायचे, कधी तरी याच वेळी तूही, मी पाहतो ते तारे अन्‌ त्यांनी भरलेले आकाश पाहात असशील. परळी वैजनाथचे लोखंडे हे त्या काळी फार निकटचे मित्र झाले. काही दिवसांनी चंद्रपूरचा विजय सगदेव आला आणि माझ्या बराकीत शेजारी राहिला. त्या बराकीत पंचांगकर्ते धुंडिराज शास्त्री दाते होते. सोबत सोलापूरची व पुण्याची काही माणसे होती. दातेशास्त्री तुरुंगातच नव्या वर्षाचे पंचांग तयार करत होते. बाकीचे त्यांना भविष्य विचारत होते. त्या साऱ्यांचा मुख्य प्रश्न ‘आमची सुटका कधी?’ हाच असे. काही दिवसांनी कुमार सप्तर्षी आले. त्याच सुमारास प्रमोद महाजन यांनाही तिथे आणले गेले. ते भूमिगत असल्याचे तोवर सांगितले जात होते. मात्र नंतर प्रवीण महाजन या त्यांच्या भावाने लिहिलेल्या ‘माझा अल्बम’ या आत्मचरित्रात ते अंबाजोगाईच्या घरातच दडून होते, अशी माहिती प्रकाशित झाली. मात्र त्या दोघांच्या येण्याने तुरुंगातील वक्त्यांच्या संख्येत वाढ झाली. गोपिनाथ मुंडे अगोदरच तिथे आले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाहीचा नामदेव सालोडकर व्यवसायाने न्हावी होता. एक दिवस तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘भाऊ, एक इच्छा आहे. ती तुम्ही पूर्ण कराल?’’

‘‘सांग.’’ मी म्हणालो.

‘‘तुरुंगात असताना, एक दिवस मोहन धारियाजींची दाढी करून द्यायची इच्छा आहे.’’ तो म्हणाला.

धारियाजींनी त्याला तात्काळ होकार दिला आणि माझ्या व क्वारंटाईनमधील सगळ्या बड्यांंच्या उपस्थितीत नामदेवने धारियांची दाढी करून दिली. दोघेही मनातून प्रसन्न झाले होते.

एक दिवस धारियांनी साऱ्यांना बोलावून आपण वेगवेगळ्या विचारसरणीबाबतचे अभ्यासवर्ग घेऊ, अशी सूचना केली. ती साऱ्यांना आवडली. वक्त्यांनी अभ्यास करून बोलायचे आणि ऐकणाऱ्यांनी त्याच्या नोंदी करून घ्यायच्या, असे सांगितले गेले. मग बापू काळदाते समाजवादावर, प्रमोद महाजन हिंदुत्ववादावर, स्वत: धारिया काँग्रेसच्या सेक्युलॅरिझमवर, मी मार्क्सवादावर अशा आठ-दहा दिवसांची व्याख्यानमालाच तिथे रंगली. त्यातून प्रमोदची आणि माझी मैत्री झाली. तो राज्यशास्त्रात एम. ए. करीत होता. मी त्याच विषयाचा प्राध्यापक होतो. मग तो त्याच्या नोट्‌स मला आणून त्या तपासायला द्यायचा. तेव्हापासून तो मला ‘सर’ म्हणायला लागला आणि अखेरपर्यंत त्याने मला ‘आहो-जाहो’ म्हणू दिले नाही. प्रमोद उत्कृष्ठ वक्ता होता. त्याच वेळी त्याची महत्त्वाकांक्षाही प्रखर होती. एक दिवस तो आमच्या बराकीत आला अन्‌ धुंडिराज शास्त्रींना म्हणाला, ‘‘माझा भविष्यावर विश्वास नाही, पण तुम्ही त्याचे अधिकारी आहात म्हणून विचारतो, मी या देशाचा पंतप्रधान कधी होईन ते सांगा.’’

शास्त्रीबुवा म्हणाले, ‘‘ते नाही सांगता येणार. पण तुमच्या आयुष्यात राजकारणाचे उंचीचे योग मात्र आहेत.’’

तो म्हणाला, ‘‘ते मलाही ठाऊक आहे. ते योग नकोत. मला माझ्या पंतप्रधानकीचं सांगा.’’

पुढे वाजपेयींच्या पहिल्या मंत्रिमंडळात तो संरक्षणमंत्री झाला. त्याची महत्त्वाकांक्षा वास्तवानेच अधोरेखित केली. दुर्दैवाने त्याचे नंतरचे दिवस निसरडे बनले. प्रमोदचे संरक्षण मंत्रीपद तेरा दिवस चालले. तेवढ्या अवधीत त्याने  देशातील उद्योगपतींशी व बड्या भांडवलदारांशी आपले संबंध जोडले. संघाचा आणि परिवाराचा एकूणच कनिष्ठ व मध्यमवर्गीय स्थितीचा त्याला तिटकारा होता. जनसंघाचे प्रदेश पातळीवरचे नेते एस.टी.ने वा रेल्वेने प्रवास करीत असतानाही, केवळ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी असलेला प्रमोद विमान वा टॅक्सीने प्रवास करायचा. या श्रीमंती सवयी त्याने त्या परिवारालाही लावल्या आणि तो परिवार साध्या पत्रव्यवहारावरून संगणकीय दळणवळणाच्या मार्गावर आला. संघाची अधिवेशनेही मग थाटात व साऱ्या दिमाखदार भपक्यानिशी होऊ लागली.

प्रमोद संरक्षण मंत्री असतानाच त्याने एम्स या खासगी कंपनीला भद्रावतीजवळ (चंद्रपूर जिल्हा) एक मोठी ‘ओपन कास्ट’ कोळसा खाण सुरू करण्याचा परवाना दिला. तो परवाना देण्याच्या काही महिने अगोदरच ए. पी. जे. अब्दुल कलाम समितीचा अहवाल केंद्र सरकारसमोर आला होता. त्या अहवालाने कोणत्याही संरक्षण प्रकल्पाजवळ खाणी उघडायला मनाई करण्याची शिफारस केली होती. त्यावरही प्रमोदने हा परवाना दिला, म्हणून भाजपाचेच एक नागपूरचे खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी पक्षाकडे त्याची तक्रार केली. सरकारकडेही चौकशीची मागणी केली. त्यावर संतापून प्रमोदने या पुरोहितांना एका बैठकीत सरळसरळ धमकी देऊन त्यांना पक्षाबाहेर काढण्याची भाषा उच्चारली होती. त्या वेळी मी लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचा संपादक झालो होतो. पुरोहितांनी मला भेटून त्यांची कथा सांगितली व त्यांचे गाऱ्हाणे जनतेपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. तेव्हा ‘ते तेरा दिवस’ या नावाचा अग्रलेख लिहून मी प्रमोदचा हा अगोचरपणा जनतेसमोर आणला.

त्यानंतर लगेच त्याचे मंत्रीपद व वाजपेयींचे सरकार गेले होते. पण प्रमोद माझा ‘प्रमाद’ विसरला नव्हता. एक दिवस तो नानाजी देशमुखांना घेऊन सरळ लोकसत्ताचे प्रमुख विवेक गोयंका यांना भेटला. त्या वेळी त्याने मला कामावरून कमी करावे, अशी मागणीच केली. विवेकजी मला ओळखत होते. त्यांनी प्रमोदची कशीबशी समजूत काढली. मात्र त्यामुळे ती खाण व्हायची राहिली नाही. पुढे तो वाजपेयींचा राजकीय सल्लागार झाला, तेव्हा कोणत्या तरी कारणाखातर मी दिल्लीला गेलो होतो. त्यानेे मला निमंत्रण व त्यासोबत गाडीही पाठवली. त्या वेळी तो पूर्वीसारखाच जवळकीने बोलला. त्याच्या तोंडचे ‘सर’ ऐकून मला कसेसेच झाले. तसे मी त्याला म्हणालो. तेव्हा ‘आपली जुनी नातीच कायम राहिली पाहिजेत’, असे तो म्हणाला होता. पण त्याची जुनी व घरची नाती मात्र तुटायला तेव्हाच सुरुवात झाली होती. त्या घटनाक्रमाचा शेवट प्रवीण या त्याच्याच धाकट्या भावाच्या हातून झालेल्या त्याच्या खुनात झाला.

तुरुंगात आमच्यासोबत गोपीनाथही होता. त्याचे प्रमोदच्या बहिणीशी लग्न व्हायचे होते. तो धाडसी आणि पुरेशा महत्त्वाकांक्षा बाळगून होता. नंतरच्या काळात तो आमदार झाला व पुढे पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होऊन राज्याचा उपमुख्यमंत्री झाला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याने लगेचच माझी दोन व्याख्याने त्याच्या परळी या गावात आयोजित केली होती. त्या वेळी त्याने मला एका धनवान व्यापाऱ्याकडे उतरविले होते. मी त्याच्याचकडे राहू असे म्हणालो, तेव्हा ‘माझे घर तुम्ही राहावे असे नाही’ असे तो खेदाने म्हणाला. परळीत माझे इतरही जेलमधील मित्र होते. गोपीनाथला राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवायची जिद्द होती आणि त्याला प्रमोदची मदत होती. त्याचसाठी प्रमोदने अविनाश धर्माधिकारींना पुण्याचे लोकसभेचे तिकीट मिळू दिले नव्हते. त्याविषयी मी प्रमोदच्या एका भेटीत विचारले, तेव्हा तो सरळपणेच म्हणाला होता, ‘त्याला राजकारणात आणले, तर तो आपल्या गोपीनाथचा प्रतिस्पर्धी नाही का होणार?’ दरम्यान गोपीनाथ महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री झाला व पुढे केंद्रीय मंत्री झाला. या काळात त्याने अनेक साखर कारखाने आपल्या क्षेत्रात उघडले. मात्र  दिल्लीला असतानाच कोणा अज्ञात कारणास्तव त्याचा मृत्यू झाला. तो मोटार अपघातात गेल्याचे सांगितले गेले. पण त्यावर अनेकांचा विश्वास बसला नाही.

गोपीनाथसंबंधीची एक आणखीही घटना येथे नोंदवण्याजोगी आहे. तू तुझ्या कुटुंबीयांसोबत माऊंट अबूला गेली होतीस. तिथे फिरतानाच एका बंगल्यावर तुला गोपीनाथ मुंडे या नावाची पाटी दिसली. तू तिथूनच मग मला फोन केलास. मी तुला फोन थांबवायला सांगून गोपीनाथला फोन लावून ती हकीकत सांगितली. तेव्हा तो म्हणाला, ‘वहिनींना तिथे थांबायला सांगा. मी बंगल्यावर फोन करून तेथील माणसांना निरोप देतो. ते मग वहिनींची व त्यांच्यासोबतच्या साऱ्यांची व्यवस्थाही करतील.’ तुला तुझ्या नियोजित प्रवासानुसार तिथे थांबता आले नव्हते, ही गोष्ट वेगळी... प्रमोदला प्रवीण महाजनने गोळ्या घातल्यानंतर त्याला बारा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले होते. त्या दिवसांत मी प्रमोदच्या अल्पावधीतील भरारीवर आणि त्याच्या असण्याच्या महत्त्वावर दोन लेख लिहिले. गोपीनाथचा त्यावर फोन होता. त्या लेखांचे प्रमोदच्या कुटुंबात सामूहिक वाचन झाल्याचा व ते लेख सर्वांना आवडल्याचा. (प्रमोदवर मी माझ्या ‘तारांगण’मध्येही एक सविस्तर लेख लिहिला आहे.)

गंगाप्रसादजींचा संबंध तुरुंगाबाहेरही कायम राहिला. सेवाग्राम, परंधाम आश्रमात तर कधी नागपूरच्या विनोबा अध्ययन केंद्रात. कुठे ते अध्यक्ष अन्‌ मी वक्ता, तर कुठे मी अध्यक्ष अन्‌ ते वक्ते. त्यांनी माझी भाषणे परभणी आणि वसमतला आयोजित केली. त्यातलेे वसमतचे व्याख्यान बापू काळदात्यांवरचे होते. गंगाप्रसादजी मुळात कार्यकर्ते होते. त्यांचे संतत्वाजवळ जाणारे माणूसपण त्यांच्या कार्यनिष्ठेतून आले होते. एक सच्चा गांधीवादी विचारवंत व तेवढाच गांधीजींच्या मार्गाने जाऊन काम करणारा कार्यकर्ता, अशी त्यांची मनोभूमिका होती. झालेच तर उंच्यापुऱ्या व धडधाकट देहाचे गंगाप्रसादजी मूळात प्रेमळ आणि मितभाषीही होते.

तुरुंगानंतर बापूंचा संबंध फारसा आला नाही. लातूरची विधानसभा केवळ वक्तृत्वाच्या जोरावर जिंकणारे बापू काळदाते 1977 मध्ये औरंगाबादमधून लोकसभेवर निवडून गेले. पुढे दोनदा देवेगौडांच्या जनता दल (सेक्युलर) कडून राज्यसभेवर जाऊन ते त्या पक्षाचे सक्रीय सचिव झाले. पण त्यांचा महाराष्ट्राशी मात्र यावा तसा संबंध नंतरच्या काळात आला नाही. नामांतराच्या चळवळीत ते एसेमसोबत दलितांच्या बाजूने लढले. त्यासाठी त्यांनी सगळ्या जुन्या स्नेह्यांशी- त्यात अनंतरावांपासून कुरुंदकरांपर्यंत सारे होते- अबोला धरला. पुढल्या काळात माझ्या औरंगाबादेत झालेल्या एका व्याख्यानाला ते श्रोत्यांच्या पहिल्या रांगेत उपस्थित होते. तिथे मी त्यांना वाकून नमस्कार केला, तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारून तुरुंगातल्या आठवणी काढल्या. अनंतराव मात्र त्यांच्याविषयी अखेरपर्यंत दु:खाचे कढ काढत राहिले. ‘ज्याच्याशी आयुष्यभराची मैत्री केली, एकच एक कॉमन वॉल असलेले घर बांधले; तो बापू माझ्याशी बोलतदेखील नाही’, असे म्हणताना त्यांचा कंठ दाटून आलेला मी पाहिला आहे. पुढच्या काळात बापूंची भेट झाली नाही. मी नंतर गेलो ते वसमतच्या सभेत त्यांना श्रद्धांजली वाहायलाच.

धारियांची सुटका 30 डिसेंबर 1976 या दिवशी पहाटे झाली. देशभरातील सारे विरोधी पक्षनेते एकत्र यायचे होते व ते सरकारशी पुढली बोलणी करणार होते. त्यासाठी त्यांना संबंधित स्थळी नेण्यात आले. 1977 च्या निवडणुकीनंतर ते देशाचे नियोजन मंत्री झाले. मंत्रिपदावर असतानाही त्यांनी माझ्याशी संपर्क राखला होता आणि नंतर स्थापन झालेल्या जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर त्यांनीच मला घेतले होते. एकदा धारियांना मी फोनवरून एक विनंती केली होती. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील धानाच्या गिरण्या चालविणाऱ्यांचे एक मंडळ एक दिवस घरी आले होते. सरकारने त्यांना त्यांच्या गिरणीतील दगडाचे रूळ काढून त्याऐवजी रबरी रूळ लावण्याचा आदेश काढला होता. त्या आदेशाला एक वर्षाची स्थगिती द्या, हे सांगायला ते आले होते. मी त्यांच्या समक्षच धारियांना तसा फोन लावला आणि त्यांनीही ती स्थगिती देण्याचे आश्वासन तत्काळ दिले. पुढे काही दिवसांनी त्यातले एक गिरणीमालक मला भेटले आणि म्हणाले, ‘एका गिरणीचे रूळ बदलण्याचा खर्च किमान बारा हजारांपर्यंत जातो. तुम्ही आमचे काही लाख रुपये वाचविले. तुम्ही आम्हाला अडवून धरले असते, तर प्रत्येक गिरणीकडून किमान दोन हजार रुपये घेऊन आम्ही तुम्हाला वा तुमच्या पक्षाला काही लाख रुपये दिले असते. पण तुम्हाला आणि तुमच्या मंत्र्यांनाही राजकारणातले अर्थकारण समजत नसावे.’ माझ्या अनभिज्ञतेवर व धारियांच्या साधेपणावर मनसोक्त हसून घेऊन ते गृहस्थ गेले. पुढे ही गोष्ट मी धारियांना सांगितली, तेव्हा तेही आमच्या या राजकीय भोळेपणावर मनापासून हसले. धारियांनी तुरुंगात असताना लिहिलेले ‘सफर’ हे आत्मचरित्र मी वाचले होते. त्यांच्याशी संबंधही अखेरपर्यंत चांगला राहिला. नागपुरात साजऱ्या झालेल्या त्यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या सोहळ्यात मी भाषणही केले.

मध्यंतरी एका छोट्याशा घटनेने आमच्यात काही काळ दुरावा आला. ज्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे ते अध्यक्ष होते, तिच्या विदर्भ शाखेचे अध्यक्षपद राम शेवाळकरांकडे होते. समितीजवळ फार मोठी जागा नागपूरच्या प्रमुख रस्त्यावर होती. त्या जागेचा कार्यालयासाठी उपयोग व्हावा, अशी मागणी करून शेवाळकर थकले होते. त्यांनी निराशेने पाठविलेले अखेरचे पत्र हा जणू काही त्यांचा राजीनामा आहे, असे समजून व तसे त्यांच्या कार्यकारिणीला सांगून धारियांनी तो ‘मंजूर’ केला. त्यांच्या जागी नेमलेल्या नव्या लोकांनी त्या जागेवर व्यावसायिक बांधकाम केले. जागा सार्वजनिक कामासाठी दिली गेली असल्याने, तिचा व्यावसायिक वापर नियमात बसणारा नव्हता. त्यावर खटला दाखल होऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्या समितीवर 156 कोटी रुपयांचा दंड बसवला. ते प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे. यातल्या राजीनामा प्रकरणावर मी लोकसत्तातून लिहिले, तेव्हा धारिया नाराज झाले. ही नाराजी पुढे बरेच दिवसांनी नाहीशीही झाली. त्यांच्या चर्येवर सदैव असणारे प्रसन्न हास्य मला नंतरही पाहता आले.

तुरुंगाबाहेर दीर्घकाळ माझा ज्यांच्याशी संबंध राहिला ते होते अनंतराव भालेराव. त्यांची लेखणी तेज, अभ्यास सखोल, भाषा धारदार अन्‌ शैली वक्तृत्वाची होती. त्यांचे ‘मराठवाडा’ हे दैनिक केवळ तेवढ्याच बळावर मराठवाड्यात चालायचे. ते मुंबईत असते तर तिथल्या ज्या संपादकांची नावे पुढल्या काळात घेतली गेली ती कधी पुढेही आली नसती. त्यांच्या व्यक्तिमत्वाची पहिली चमक मी अनुभवली ती अहमदनगरच्या राज्य पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली तेव्हा. त्यांच्या भाषणात तेव्हाच्या कन्नमवार सरकारवर टीका होती आणि कन्नमवार त्या अधिवेशनाच्या उद्‌घाटनाला यायचे होते. ऐन वेळी त्यांचा निरोप आला, ‘अनंतराव तो परिच्छेद वाचणार असतील, तर मी येणार नाही.’ मग तणाव अन्‌ वाटाघाटी झाल्या. अनंतराव कन्नमवारजींना फोनवर म्हणाले, ‘आपण दोघेही स्वातंत्र्यसैनिक आहोत. आपण एकमेकांच्या मतस्वातंत्र्याचा मान राखला पाहिजे!’ त्यावर कन्नमवारजी हसले आणि उद्‌घाटनाला आले. मात्र ते येईपर्यंत सारा सभामंडप तणावाखाली होता.

नाशिकच्या तुरुंगात असतानाच त्यांनी त्यांच्या दोन आठवणी आम्हाला सांगितल्या. त्यातली एक याच तुरुंगात त्यांनी अनुभवली होती. महाराष्ट्राचे माजी खाद्यमंत्री होमी तल्यारखान यांच्या व्यवहारातील भ्रष्टाचाराचे एक प्रकरण त्यांनी ‘मराठवाडा’मध्ये छापले. त्यातून दाखल झालेल्या बदनामीच्या खटल्यात त्यांना तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. ती शिक्षा नाशिकच्या कारागृहात भोगताना त्यांनी बायबल आणि ख्रिस्ती धर्माचा अभ्यास चालविला. त्या वेळी त्यांना भेटायला त्या वेळचे एक वयोवृद्ध व निवृत्त अधिकारी आले. त्यांनी येरवड्याच्या तुरुंगात गांधीजींना पाहिले होते. अनंतरावांसमोरची ख्रिस्ती धर्माची पुस्तके पाहून ते त्यांना म्हणाले, ‘ही पुस्तके वाचण्यापेक्षा तुम्ही तुमचा गांधीच वाचा. तो वाचून तुम्हाला येशू समजेल’ हे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता.

नेहरू, पटेल आणि मौलाना या तीन राष्ट्रीय नेत्यांचा त्यांनी प्रत्यक्ष घेतलेला अनुभव असाच प्रेरणादायी व ज्ञानवर्धक होता. हैदराबादचा लढा यशस्वी झाल्यानंतर हे तीनही नेते त्या प्रदेशाला भेट द्यायला विमानाने औरंगाबादला आले होते. तेथून निघालेला त्यांचा दौरा काही शहरांना व ग्रामीण भागांना भेट देणार होता. अनंतराव व अन्य कार्यकर्ते त्यांच्यासोबत निघाले. एका शहरात या नेत्यांचा मुक्काम ज्या सरकारी अतिथीगृहात होता, तिथे मुस्लिम स्त्रियांचा एक मोठा समूह त्यांच्या भेटीला आला. आपल्यावर भारतीय सैनिकांनी केलेले अत्याचार, त्यांनी मारलेली आपल्या घरची माणसे व केलेली लूटमार यांच्या अतिशय हृदयद्रावक कथा त्या स्त्रिया रडून सांगत होत्या. ते ऐकून गहिवरलेले मौलाना त्या समूहात शिरले आणि त्यातल्या एकेकीला समजावून त्यांची दु:खे ऐकू लागले. ते सारे पाहत असलेल्या नेहरूंना मग ते संतापून म्हणाले, ‘कशाचे सरकार आणि कशाचे आपले सैनिक, त्यांच्यात व आपल्यात काही फरक आहे की नाही? अशा सैनिकांचे राज्य चालवण्यापेक्षा आपणच सरकारातून बाहेर पडले पाहिजे.’ त्यावर त्यांच्याजवळ येत नेहरू म्हणाले, ‘मौलानासाहेब, आपला दौरा आता सुरू झाला आहे. या एकाच अनुभवावरून आपण आपले मत बनवू नका.’ सरदारही त्या वेळी बाहेर आले आणि क्षणभर त्या प्रकाराकडे पाहून, युद्धात हे चालणारच अशी मुद्रा करून पुन: आत गेले.

पुढे हे नेते बिदरला पोहोचले. तिथे हिंदू स्त्रियांचा असाच जमाव रडत-भेकत त्यांना भेटायला आला. रझाकारांनी त्यांच्या कुटुंबावर खून, बलात्कारांसह केलेले अत्याचार, डोळ्यांत पाणी आणून सांगू लागल्या. येथेही मौलाना त्या समूहात गेले आणि त्यांचे दु:ख पाहून सद्‌गदित झाले. नेहरूंना ते म्हणाले, ‘कशाचा धर्म आणि कशाचा देश? असे अत्याचार शिकवतो तो धर्म कशाचा आणि त्यातली माणसे तरी माणसे कशी म्हणायची?’ नेहरू त्यांना शांत करीत म्हणाले, ‘यासाठी मौलानासाहेब आपण दौरा पूर्ण झाल्याखेरीज कोणतेही मत बनवू नका, असे मी तुम्हाला सांगत होतो.’ सरदार मात्र याही ठिकाणी काही क्षणांसाठी बाहेर आले व त्या जमावावर एक कटाक्ष टाकून आत गेले.

तीन नेत्यांच्या तीन तऱ्हा त्यांच्यातील वेगळेपण आणि ऐक्य साऱ्यांना समजावून गेल्या. त्याच वेळी या देशाची भविष्यातील मध्यममार्गी वाटचालही त्यांनी साऱ्यांच्या ध्यानात आणून दिली.

तुरुंगातली एक आठवण माझ्या कायमची स्मरणात आहे. एक दिवस कुणी तरी एका विशेष वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले. ‘सद्यस्थितीत फक्त माझाच पक्ष या देशाला व येथील लोकशाहीला सुरक्षित राखू शकतो’ या विषयावर सगळ्या स्पर्धकांनी बोलायचे होते. जनसंघाच्या बाजूने प्रमोद होता. समाजवाद्यांच्या बाजूने बापू होते, संघटना काँग्रेसकडून कुडाळचे एक संपादक तर इतर पक्षांची बाजू मांडणारेही निश्चित झाले. पण आणीबाणी लावून त्या साऱ्यांना तुरुंगात डांबणाऱ्या काँग्रेसची बाजू कोण मांडणार? बऱ्याच वक्त्यांनी व कार्यकर्त्यांनी ती कोणालाही न आवडणारी बाजू मांडायला नकार दिला. अखेरची विनंती आयोजकांनी मला केली आणि मी ती साऱ्यांना न आवडणारी बाजू मांडायला होकार दिला.

दुपारच्या वेळी एका विस्तीर्ण वडाखाली सगळे जमले. धारियांपासून प्रल्हाद अभ्यंकरांपर्यंतचे दिग्गजही हजर झाले. वक्त्यांनी त्यांच्या जागा घेतल्या. मला प्रथम काँग्रेसची भूमिका मांडायची होती व अखेर साऱ्यांना उत्तरेही द्यायची होती. मी ती बाजू कशी मांडतो याची सर्वांनाच उत्सुकता होती. भाषणाची सुरुवातच मी आणीबाणीच्या समर्थनापासून केली. ‘देशाची अखंडता, सुरक्षितता व एकात्मता राखायची, तर त्यावर आजची आणीबाणी लादणे आवश्यक होते.’ असा आरंभ करून मी म्हणालो, ‘अखेर देश जयप्रकाशजींहून मोठा आणि त्याचे ऐक्य त्यांच्या सप्तक्रांतीहून श्रेष्ठ व महत्त्वाचे आहे. काही थोडे जण उणीव काढतात, म्हणून इंदिरा गांधींनी त्यांची जबाबदारी नाकारणे हा पळपुटेपणा झाला असता. साऱ्यांचा रोष पत्करून केवळ देशात सुरक्षितता नांदावी म्हणून त्यांनी ही आणीबाणी आणली आहे. तिला संसदेचे, न्यायालयाचे आणि देशातील बहुसंख्य जनतेचेही समर्थन आहे.’

पुढे म्हणालो, ‘या विरोधकांचे एक सोपे गणित आहे. ते म्हणतात, काँग्रेस पक्षाला 37 टक्के मते मिळतात. त्यामुळे देशातील 63 टक्के लोक काँग्रेसविरुद्ध आहेत. मी म्हणतो अरे, हेच गणित जरा तुमच्याही पक्षांना लावून बघा. प्रमोदजी, तुमच्या पक्षाला 6 टक्के मते मिळतात. याचा अर्थ 94 टक्के लोक तुमच्या विरुद्ध आहेत, असे त्याचे उत्तर येईल. समाजवाद्यांविरुद्ध 96 टक्के आणि संघटना काँग्रेसच्या बाजूने तर एकही टक्का मते नसल्याने सारा देशच त्यांच्याविरुद्ध असल्याचे स्पष्ट होते.’ माझ्या वाक्यांवर टाळ्या आणि हशा होत होता. त्यातली आक्रमकता मात्र बाकीच्या वक्त्यांंना एकदम बचावाच्या पावित्र्यात नेणारी ठरली. माझ्यानंतर इतरांची भाषणे झाली.

अखेर मी म्हणालो, ‘अरे तुमच्या पक्षाचे सोडा, पण तुमच्या राष्ट्रीय म्हणविणाऱ्या नेत्यांनाही त्यांचा मतदारसंघ सापडत नाही. प्रमोदजी, तुमचे वाजपेयी कधी रामपूर, कधी फूलपूर, कधी गुणा तर कधी दिल्ली असे का हिंडतात? बाकीच्यांची गोष्टच सोडा. मोरारजींना आता मतदारसंघ नाही, जगजीवनरामांना नाही, प्रत्यक्ष इथल्या धारियांनाही तो नाही. ही पाठबळ नसलेली माणसे आमचा पराभव कसा करणार!’

स्पर्धेच्या अखेरीस पुरस्कार वितरण झाले. ते प्रल्हादजी अभ्यंकरांच्या हातून. त्यांनी मला पहिला क्रमांक देऊन एक प्लॅस्टिकची थाळी तर प्रमोदला दुसऱ्या क्रमांकासाठी प्लॅस्टिकचाच एक पेला बक्षीस म्हणून दिला. त्यानंतरच्या काळात जो भेटेल, तो मला हसून म्हणायचा, ‘आता तुमची सुटका जवळ आली बरं का...’ त्यावर मी नुसतेच हसून मान हलवायचो.

1977 च्या 26 जानेवारीला गणराज्यदिनाच्या मुहूर्तावर आमची सुटका झाली. मात्र त्याआधीच्या काळात मला तुरुंगात अनेक कायमचे मित्र मिळाले होते. त्यात सर्व पक्षांच्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा समावेश होता. तुरुंगात असताना जया, तू चारदा मला भेटायला आलीस. एका मोठ्या हॉलमध्ये अनेकांच्या उपस्थितीत आपण भेटत होतो. तुझ्या चर्येवर कधी व्यथा वा दु:ख दिसले नाही. तू प्रसन्नपणे बोलायचीस. बाकीच्या गमतीजमती सांगायचीस. वडिलांच्या आजारपणात कुरुंदकर येऊन गेल्याचा सारा वृत्तांत तू तिथेच मला सांगितलास आणि हो, त्याच काळात इंग्रजी वाङ्‌मयात एम.ए.ची परीक्षा विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवून तू उत्तीर्ण झाली होतीस. तुला साधी एखादी भेट द्यायलाही तेव्हा माझ्याजवळ काही नव्हते. मी फक्ततुझा हात हातात घेऊनच तुझे अभिनंदन केले होते. त्या काळात एकदा शैला आणि गंगाधरही मला भेटून गेले होते.

तुरुंगाबाहेर पडल्यानंतर आमच्यातील अनेकांनी नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले व नंतरच घरी जाणारी गाडी पकडायला नाशिक स्टेशन गाठले.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके