डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नक्षलवादग्रस्त प्रदेशात आमची लोकयात्रा

सुरेश द्वादशीवार यांनी चार वर्षांपूर्वी दिवंगत झालेल्या पत्नी जयाला उद्देशून लिहिलेल्या 30 दीर्घ पत्रांचे पुस्तक येत्या आठवडयात साधना प्रकाशनाकडून येत आहे. या पुस्तकात कौटुंबिक आठवणी तर आहेतच, पण जास्त भाग व्यापला आहे तो राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटना घडामोडींच्या आठवणींनी! त्यातील एक प्रकरण आहे, 1975 मध्ये देशावर लादल्या गेलेल्या आणीबाणीच्या काळातील तुरुंगवासावर! ते मागील अंकात प्रसिद्ध केले होते. पुस्तकातील आणखी एक प्रकरण येथे प्रसिद्ध करीत आहोत. ‘नक्षलवादग्रस्त प्रदेशात आमची लोकयात्रा’ हे प्रकरण या अंकात प्रसिद्ध करण्यासाठी आणखी दोन कारणे आहेत. एक- ती लोकयात्रा समाप्त झाली त्याला या आठवड्यात (15 एप्रिल) 14 वर्षे पूर्ण होत आहेत. दुसरे कारण, गेल्याच आठवड्यात छत्तीगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात 22 जवान ठार झाले आहेत. - संपादक  
 

प्रिय जया, 

आसरअली हे गावठाण महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व टोकाला एका उंच पठारावर वसले आहे. सिरोंचाच्या पूर्वेला 26 किलोमीटर अंतरावर असलेल्या या पठाराच्या पूर्वेच्या पायथ्यापासून इंद्रावतीचा वेगवान प्रवाह वाहतो. काही अंतरावर कालेश्वर या तीर्थक्षेत्राशेजारी तो गोदावरीला मिळतो. दि.20 मार्च 2007 या दिवशी रात्री आठच्या सुमारास आपण सोबतच्या दोन-अडीचशे स्त्रीपुरुषांसोबत आसरअलीला पोहोचलो. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घातलेले हिंसाचाराचे थैमान रोखण्यासाठी सामान्य माणसांची एक लोकयात्रा काढायचे आपण ठरवले होते. आसरअलीपासून गडचिरोलीच्या उत्तर टोकापर्यंत व गोंदिया जिल्ह्यातल्या देवरीपर्यंत जाऊन ही लोकयात्रा 25 दिवसांनी गडचिरोलीला समाप्त व्हायची होती. नक्षलवाद्यांच्या अतिशय क्रूर कारवायांच्या बातम्या रोजच्या रोज छापून मी वैतागलो होतो. पूर्वी ते बंदुकांनी माणसे मारत, आता ते कुऱ्हाडी व सुऱ्यांनी माणसांना कापत आणि त्यांची प्रेते रस्त्यात ठेवून दहशत निर्माण करीत. अनेक घरातल्या वयात आलेल्या पोरी पळवून ते त्यांना आपल्या भोगदासी बनवत आणि त्यांनाही बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण देऊन आपल्या पथकात सामील करत. मारल्या गेलेल्या आदिवासींचा आकडा पाचशेच्या वर गेला होता. पोलिसांची व निमलष्करी दलांची पथके होती, पण ती सडकांवरून जात. नक्षल्यांना सारे जंगलडोंगर पाठ होते. परिणामी, अडीच-तीन हजारांवर असलेल्या पोलिसांना दीड-दोनशे नक्षल्यांचा बंदोबस्त करता येत नसे. आदिवासी भयभीत होते. अज्ञान व अभाव यांनी ग्रस्त होते. त्यांना नेतृत्वही नव्हते. परिणामी नक्षल्यांपुढे ते हतबल होते आणि सरकारी यंत्रणा त्यामुळेही फारशी हालचाल करीत नव्हती. 

आपण नुसत्याच बातम्या लिहितो, त्यावर अग्रलेख तयार करतो, प्रत्यक्षात मात्र आपण या शब्दकामाठीखेरीज काहीच करीत नाही, याची खंत सारखी मनाला बोचत होती. तशात माझी सोमनाथच्या एका कार्यक्रमात प्रकाशशी भेट झाली. माझ्यासोबत आमचा पुत्रवत्‌ असणारा स्नेही देवेंद्र गावंडे हाही होता. प्रकाशचा लोकबिरादरी आश्रम भामरागडजवळ आहे आणि तो साराच परिसर नक्षल्यांनी व्यापलेला आहे. ते प्रकाशला त्रास देत नाहीत, कारण लोकबिरादरीच्या कामावर आदिवासी समाधानी आहेत. त्याचा नक्षल्यांनाही वचक आहे, मात्र कडव्या विचारांच्या संघटनेत माथेफिरू लोक कमी नसतात. गडचिरोली कॉंग्रेस अध्यक्ष मालू बोगामी यांना नक्षल्यांनी झाडाला बांधून कापून काढले होते. त्यामुळे प्रकाश हा त्यांच्या हिंसाचारातला अडसर होता, की माऊंट बॅटन गांधीजींबाबत म्हणाले तसा व्यवस्थेचा ‘वन मॅन आर्मी’ होता- असाच प्रश्न अशा वेळी मनात यायचा. तो स्वत:ही नक्षल्यांच्या हिंसाचाराने चिंतित होता. त्याच काळात छत्तीसगडमध्ये सलवा जुडूम नावाची आदिवासींची संघटना नक्षल्यांविरुद्ध लढायला सज्ज झाली होती. तेही काम पाहावे, मग आपण आपला उपक्रम ठरवावा, असे तेव्हा मनात आले. देवेंद्रने लगेच छत्तीसगडचा दौराही करून घेतला. 

लगेचच आम्ही आमचा कार्यक्रम व घ्यावयाची भूमिका आपल्या बैठकीत निश्चित केली. त्यात या नियोजित यात्रेत ‘तुम्ही या’ असे कुणालाही म्हणायचे नाही, कारण तिथे यायला सांगणे हे संकटाला सामोरे जाण्यासारखे होते. जे स्वत:हून येतील, त्यांना सोबत घ्यायचे. आपला लढा नक्षल्यांच्या विचारांशी नाही, तर त्यांच्या हिंसाचाराविरुद्ध आहे. त्यामुळे त्यात होणारी भाषणे हिंसाचारावर रोख असणारी असावीत. नक्षल्यांनी लोकमत आपल्याकडे वळवून उद्या निवडणुकीत भाग घेतला, तर त्यांच्या तशा लोकशाहीकरणाचे स्वागत करावे. आपण त्यांच्या विरुद्ध नसून त्यांच्या हिंसाचाराविरुद्ध आहोत, हे स्पष्ट असावे. ही भूमिका नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अहेरी आदी ठिकाणी सभा घेऊन लोकांना सांगावी आणि त्यांना स्वत:हून त्यात येण्याचे आवाहन करावे. या प्रकरणात आपण सरकारची मदत, संरक्षण वा आर्थिक साह्य घेऊ नये. कोणत्याही मंत्र्याला वा पुढाऱ्याला या यात्रेत सहभागी करू नये. त्यांना यायचेच असेल, तर त्यांनी पक्षाचा झेंडा व प्रचार सोडून यावे. यात्रेला ‘लोकयात्रा’ असे नाव द्यावे. त्यात एक राष्ट्रध्वज असावा आणि त्याच्या समोरच्या पथकाच्या हाती महात्मा गांधींचे तैलचित्र असावे. 

आमच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत गेला. लोक पैसे द्यायला पुढे येत. सहभागाबाबत मात्र ते फारसे बोलत नसत. या यात्रेसाठी नागपुरात माझे मित्र गिरीश गांधी यांच्या नेतृत्वात एक समिती बनवली गेली. तिने यात्रेचा अर्थव्यवहार व अन्य व्यवस्था सांभाळावी, असे ठरले. चंद्रपूरहून आसरअलीला सगळ्या यात्रेकरूंना गाड्यांंनी पोहोचवले. एक गाडी सोबत ठेवायची, यात्रेकरूंच्या जेवणासाठी एक केटरर असावा इ. इ. एवढ्या गोष्टी ठरल्यानंतर मी व देवेंद्र आलापल्लीला गेलो. तेथील पोलीस हेडक्वार्टर्समधील अधिकाऱ्यांंशी बोलून नक्षलग्रस्त गावे व क्षेत्रे यांची माहिती व त्यातून जाण्याचा मार्ग निश्चित केला. गडचिरोलीचे एस. पी. जैन आम्हाला उदारपणे सारे सहकार्य करीत होते. एक गोष्ट मात्र आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितली, ‘आम्हाला पोलीस संरक्षण नको.’ त्यावर ‘सुरक्षा हे आमचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही काम करतो’, असे त्यांनी उत्तर दिले. मग मी त्यांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना फोन करून आमच्यातील वाद सांगितला. ते समजुतीच्या सुरात म्हणाले, ‘तुम्ही तुमची यात्रा चालू द्या. पोलिसांना त्यांचे काम करू द्या. ते तुमच्यासोबत दिसणार वा असणार नाहीत, याची काळजी ते घेतील. ते तुम्हाला कोणतीही अडचण करणार नाहीत, पण नागरिक म्हणून तुमच्या रक्षणाची जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही. ती त्यांनी कशी घ्यायची, ते त्यांना ठरवू द्या.’ 

आमच्या यात्रेला हिरवा झेंडा दाखवायला एका सत्पुरुषाने यावे, असे साऱ्यांना वाटले. त्यासाठी मी ब्रह्मपुरीजवळच्या अड्याळ टेकडीवर राहणारे राष्ट्रसंत तुकडोजीमहाराजांचे शिष्य- तुकारामदादा गीताचार्य यांना भेटून तशी विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. नंतर राम शेवाळकर व बाबा आमटे यांचा आशीर्वाद घ्यायला देवेंद्र आणि मी वणी आनंदवनात गेलो. शेवाळकर गहिवरलेच होते. ‘तुम्ही फार मोठी जोखीम पत्करत आहात, हे लक्षात ठेवा.’ असे सांगून त्यांनी आम्हाला निरोप दिला. बाबा मात्र म्हणाले, ‘ही यात्रा मलाच काढायची होती... पण तुम्ही ती काढत आहात, तर तुम्हाला माझ्या शुभेच्छा!’ 

लोक भेटत होते. येण्याची तयारी सांगत होते. चंद्रपूरच्या खादी भांडारात तिरंगी झेंडे घ्यायला गेलो, तर तिथे असलेले सगळेच जण त्यांची येण्याची तयारी असल्याचे  सांगू लागले. आमचा उत्साह वाढत होता, तसे तिकडे नक्षलवाद्यांनी आमच्या यात्रेविरुद्ध गावोगावी पत्रके लावणेही सुरू केले होते. यात्रा सुरू होण्याच्या दहाच दिवस अगोदर फुलबोडीगट्टा या खेड्याजवळ भूसुरुंगाचा मोठा स्फोट घडवून नक्षल्यांनी पोलिसांचे सुरुंगविरोधी वाहनच उडवून दिले होते. त्यात दोन पोलिसांचा मृत्यू झाला होता. हा स्फोट आमच्या यात्रेला भीती घालण्यासाठी असल्याचे पोलिसांचेही मत होते. त्यातून त्यांचे खाते व आमच्यात एक वाद सुरू झाला. आमची यात्रा आसरअली, सिरोंचा, आलापल्ली व गडचिरोली अशा प्रमुख मार्गावरून जावी असे पोलिसांचे म्हणणे होते; तर ती नक्षलवाद्यांचे तळ असलेल्या, त्यांनी ज्या गावात लोकांची हत्या केली, त्या गावांना जोडणाऱ्या आणि मुख्य रस्त्यावरून न जाता जंगलमार्गे आदिवासींच्या गावातून जावी, असा आमचा आग्रह होता. तसे केले तर आमच्या यंत्रणेवर फार ताण पडेल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यांनी ते जेव्हा फार ताणून धरले, तेव्हा ‘आम्ही आमच्या मार्गाने जाऊ. तुम्हाला संरक्षण द्यायचे नसेल, तर नका देऊ’, असे नम्रपणे बजावून एका बैठकीतून मी व देवेंद्र बाहेर पडलो.  

अखेर पोलिसांनी आमचे म्हणणे मान्य केले. मात्र ही गावे एकमेकांपासून फार अंतरावर असल्याने त्यांना आमच्या यात्राकाळात भेटी देता येणार नाहीत. सबब, गावात फिरताना व गाव सोडताना पायी चालायचे व मधले जंगली रस्ते वाहनातून जायचे, असे त्यांचे म्हणणे मान्य करायचे आम्ही ठरवले. यात्रेच्या काळात पोलिसांची पथके एकदम फार पुढे किंवा मागे असत. ती आमच्यासोबत कधी दिसत नसत. एखाद्या वेळी त्यांच्यातले कुणी तरी येऊन धोक्याच्या सूचनाच तेवढ्या देऊन जात. 

यात्रेकरूंना राहायला आश्रमशाळा उपलब्ध करून द्या, ही आमची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य करूनही संबंधित खात्याने नाकारली. या शाळांमध्ये नक्षलवादीच पुष्कळदा रात्रीच्या मुक्कामाला येतात, असे त्या खात्याचे म्हणणे होते. अखेर जेथे जागा मिळेल तिथे मुक्काम करायचा, असे ठरवून वा यात्रेकरूंना ‘आपल्यासोबत फक्त अंथरूण-पांघरूण तेवढे घ्या,’ असे सांगून आपण निघण्याचा निश्चय केला. 

आपल्या गाड्या आसरअलीला 20 मार्चला आल्या. तेव्हा गावकऱ्यांनी ढोल-ताशे वाजवून आपले स्वागत केले. त्यांनी त्या रात्रीच्या जेवणाची सोय केली होती. त्यामुळे साऱ्यांचा हुरूप वाढला. या वेळी यात्रेकरूंसोबत नागपूरहून गिरीश गांधी, अनंत घारड, जनमंचचे कार्यकर्ते व अनेक सहकारी मित्र आले होते. सभेला उशीर नको म्हणून आम्ही जेवणाआधीच सभेची तयारी केली. गावकऱ्यांनी लाऊडस्पीकर आणला होता. पहिलाच दिवस असल्याने त्या वेळी नागपूरहून पत्रकारांचा मोठा ताफाही आला असल्याने मी सविस्तर भाषण केले. त्यात ‘आमचा लढा नक्षलवादाशी नसून त्यांच्या हिंसाचाराशी आहे. त्यांनी लोकशाही मार्गाने यावे. तसे ते आले, तर आम्ही त्यांचे स्वागतच करू.’ असे पुन्हा स्पष्ट केले. सभेत गावकऱ्यांसोबत आजूबाजूच्या गावचे लोकही हजर होते. एकाने दिलेल्या माहितीप्रमाणे त्यात नक्षलवाद्यांचे काही सहकारीही सामील होते. सभेनंतर जेवणे आटोपून आम्ही शाळेच्या आवारात, कुणाच्या अंगणात, तर कुणाच्या माड्यांवरील गच्चीवर झोपायला गेलो. दि. 21 ला सकाळी झेंडावंदन करून यात्रेला आरंभ करायचा होता. 

सकाळच्या झेंडावंदनाला यात्रेकरू व गावकरी अशी पाचशेवर माणसे होती. त्यात स्त्रियांची संख्याही लक्षणीय होती. आपल्या यात्रेकरूत मोहम्मद जिलानी हा एन. सी. सी.चा जिल्हा प्रमुख सहभागी होता. तो त्याच्या गणवेशात ध्वजवंदनाला हजर होता. त्याच थाटात त्याने झेंडा फडकवला व राष्ट्रगीत होऊन तुकारामदादांनी त्यांचे आशीर्वादपर भाषण दिले. त्या गर्दीत स्त्रियांसोबत तूही होतीस. आदल्या दिवशी सारे यात्रेकरू चंद्रपूरला आपल्या घरी आले होते. त्यांच्या जेवणावळी, नंतरचा प्रवास, रात्रीची गैरसोय हे सारे असतानाही तू उत्साहात होतीस. साऱ्या गोष्टीत पुढे होऊन स्त्रियांशी बोलून त्यांचा उत्साह वाढवीत होतीस. माझी पत्नी असण्याहून तू माझी सहकारीच अधिक असल्याची जाणीव करून देणारा तो क्षण आणि काळ होता. 

चहा व फराळ होऊन साऱ्यांनीच पडघमच्या दिशेने चालायला सुरुवात केली. तिथला मुक्काम एका मांडवात होता. पुढे अंकिसा करून दुसऱ्या दिवशी आपण सिरोंचाला पोहोचलो. तेथील महाविद्यालयाच्या आवारात यात्रेचा मुक्काम होता. सारे यात्रेकरू तेथील गोदावरीवर स्नानाला गेले. रात्रीची सभा ग्रामपंचायतीच्या आवारात होती. याच जागी मासा आत्राम या आदिवासी मुलाला- त्याने पोलिसांत नोकरी मिळवली म्हणून नक्षल्यांनी भर बाजारात कापून ठार मारले होते. सभेला भरपूर गर्दी होती. रात्रीच्या पत्रकार परिषदेतील अनुभव मात्र वेगळा होता. इथल्या अनेक पत्रकारांना नक्षलवादी हे ‘रॉबिनहूड’सारखे गरिबांचे कैवारी वाटत होते. त्यांनी बरीच हुज्जत घातली, तेव्हा ‘मासासारखी पन्नासावर नावे सांगून यांना हात-पाय छाटून मारणारे कोण असतात? तुम्ही त्यांच्यामुळे सुरक्षित आहात की पोलिसांमुळे? आजवर जे पोलीस या भागात शहीद झाले, ते स्वत:साठी की तुमच्यासाठी?’ असे प्रश्न मलाच त्यांना विचारावे लागले. पुढे मजल-दरमजल करीत ही यात्रा गट्ट्याहून आत जंगलात शिरली, ती थेट जिमलगट्ट्यापर्यंत व तिथून परतून आलापल्लीला आली. येथे व अहेरीला भव्य जाहीर सभा झाली. तिथून ती पेरीमिली करून भामरागडला पोहाचली. प्रकाशचा मुक्काम हेमलकसाला नव्हता आणि असता तरी त्याच्याकडे जाणे यात्रेने टाळले असते. भामरागडहून आलापल्लीला येऊन आम्ही पुन्हा कसनसूर, जाराबंडी असे करीत रामपूरला पोहोचलो. तेथील स्वस्त धान्याचे दुकानदार आमच्यावर चालून आले. त्यांच्याकडे येणारे धान्य ते सरळ नक्षलवाद्यांना पोहोचवीत असल्याची आमची माहिती होती. त्यांनी सभेतच आमच्याशी वाद घातला, तेव्हा खांद्यावर एक छोटेसे पोर घेतलेली तरुण स्त्रीच त्यांच्यावर  ओरडून उठली. ती म्हणाली, ‘यांच्याकडे लक्ष देऊ नका साहेब. आमचे धान्य हे लोक नक्षलवाद्यांना देतात.’ पुढे जाऊन ती म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला या दुकानदारांसमोर नक्षलवाद्यांनी कापून मारले. मी त्याच्या पाया पडून त्याला वाचवा म्हणत होते आणि हा खदाखदा हसत होता.’ तिचे बोलणे ऐकून आमच्याच अंगावर शहारे आले. एका यात्रेकरूने त्याच्याजवळचे एक हजार रुपये तिला दिले व तिचे सांत्वन केले. नंतरच्या काळात असे अनुभव ऐकत व घेतच आम्ही पुढे जात राहिलो. कुठे घरचा माणूस रस्त्यावर आणून कापला होता, तर कुठे मुलाला मॅट्रिकच्या परीक्षेला बसू दिले, म्हणून त्या मुलादेखत त्याच्या आज्याचे हातपाय कुऱ्हाडीने तोडले होते. आम्ही सिरोंचाला असतानाच, पुढे चंद्रपूर महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष झालेला नंदू नागरकर यात्रेत सामील झाला. तो जिल्ह्याच्या भाजी व्यापार संघटनेचा अध्यक्ष होता. आमच्या यात्रेत दर दिवशी ताजा भाजीपाला पाठविण्याची व्यवस्था त्याने केली. पुढे त्याने साऱ्या स्वयंपाकाचाच ताबा घेतला. नंदू नंतर आपल्याही घरचा माणूस झाला. अजूनही तो व त्याची पत्नी पुष्पा आपल्या घरच्या माणसांसारखीच माझी सोबत करीत आहेत. 

आमची यात्रा जाराबंडी या क्रांतिकारी गावात पोहोचली, तेव्हा गावकऱ्यांनीच आम्हाला एका घरी नेऊन, त्यातला तरुण मुलगा नक्षलवाद्यांनी भर रस्त्यात कसा मारला, हे सांगितले. त्या रात्री एका शाळेच्या आवारात आम्ही झोपलो असताना, दोन पोलीस घाईघाईने माझ्याकडे आले आणि ‘गावाच्या आसपासच नक्षली टोळ्या आल्या आहेत, सबब साऱ्यांना सावध करा,’ असे सांगू लागले. मी रात्रीच्या अंधारात उघड्यावर झोपलेल्या आमच्या सगळ्यांना जागे करून पोलिसांचे म्हणणे सांगितले. त्या धावपळीत माझा पाय मुरगळला. तेव्हा सवीसोबत आलेल्या सरिता जोशीने तेवढ्या रात्री पायाला मॉलिश करून त्यावर क्रेपबँडेज बांधले. ते बँडेज मग यात्रा संपेपर्यंत माझ्या पायाला बांधलेलेच राहिले. 

जाराबंडी या गावाचे माहात्म्य असे की, शहीद बाबूराव शेडमाके यांचे हे जन्मगाव. 1957च्या युद्धात त्याने दोन हजार आदिवासींची फौज उभी करून आष्टीपासून सिरोंचापर्यंतचा सारा मुलुख स्वतंत्र केला होता. पुढे तो नातेवाइकांच्या फितुरीमुळे पकडला गेला, तेव्हा सरकारने त्याला चंद्रपूरच्या कारागृहासमोरील पिंपळाच्या झाडाला लटकावून फाशी दिले. आजही त्याचा मृत्युदिन येथे हुतात्मादिन म्हणून पाळला जातो. 

याच काळात साऱ्यांना मनाने जखमी करणारी एक घटना घडली. नागपुरात नव्यानेच सुरू झालेल्या एका दैनिकाला मुलाखत देऊन बाबा आमटे म्हणाले, ‘ही यात्रा म्हणजे पोलिसांच्या संरक्षणात चाललेला निव्वळ देखावा आहे. अशी यात्रा मी कधीच काढली नसती.’ बाबांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे मला जमणारे होते. त्यांची भारत-जोडो यात्रा पंजाब आणि काश्मिरात पोलिसांचे ताफे मागे-पुढे घेऊनच निघाली होती. आमच्या यात्रेसंबंधीचे सारे वास्तव त्यांना ठाऊक असताना त्यांनी असे म्हणावे, याचा सर्वांनाच अतिशय संताप आला. आनंदवनाचे एक विश्वस्त व बाबांचे जुने सहकारी श्रीधरराव पद्मावार आमच्या यात्रेत होते. त्यांनीच पत्रकारांशी बोलून बाबांना खरे काय ते ऐकवले व तसे पत्रही त्यांनी बाबांना पाठविले. त्यामुळेच की काय, पण नारायण हक्के हा बाबांचा अतिशय जुना व जवळचा सहकारी लगेचच आमच्या यात्रेत सहभागी झाला. 

ही यात्रा पुराडा या गावी असताना मी केवळ पाणी प्यायला एका झोपडीत गेलो. तिथे फक्त सहा वर्षे वयाचा एक मुलगा राहत होता. त्यानेच मला पाणी दिले. ‘घरची सारी माणसे कुठे आहेत?’ असे मी त्याला विचारले, तेव्हा तो सहजपणे म्हणाला, ‘त्यांना अण्णा लोकांनी कापले साहेब.’ मी त्याला सरळ सभेत आणले आणि त्याची कथा साऱ्यांंना सांगितली. आमच्यातल्या एका यात्रेकरूने त्याला तत्काळ दत्तक घेतल्याचे व त्याच्या शिक्षणाचा सारा खर्च करण्याचे त्याच वेळी जाहीर केले. त्याच सुमारास कुमार सप्तर्षी हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत यात्रेत सहभागी होण्यासाठी पुण्याहून आले होते. 

अशीच एक विलक्षण गोष्ट एटापल्लीचीही आहे. या तालुक्याच्या गावातच सीमा सुरक्षा दलाच्या बांधकाम विभागाचे एक मोठे पथक आहे. त्या भागातील रस्त्याचे बांधकाम ही त्याची जबाबदारी. त्या विभागाचे प्रमुख अभियंते गणेशन हे होते. त्यांची नक्षलवाद्यांनी कुऱ्हाडीचे 28 घाव घालून हत्या केली होती. हत्येच्या जागेवरील त्यांच्या रक्ताचे डाग अजून तसेच होते. त्यांना मारण्याआधी नक्षल्यांनी त्यांचे डोळे काढले होते. आमच्या सोबतचे श्रीधरराव पद्मावार यांनी त्यांच्या कुटुंबीयांना 25 हजार रुपये द्यायला नंतर गडचिरोलीच्या पोलीसप्रमुखांच्या स्वाधीन केले. एटापल्लीजवळच्याच उडेरा या खेड्यात गावकऱ्यांनी  वर्गणी जमवून उभारलेला गांधीजींचा पुतळा नक्षल्यांनी त्यावर गोळ्या झाडून तोडला होता. आम्ही त्या गावाला भेट देऊन तसा पुतळा पुन्हा त्या गावाला देऊ, असे जाहीर केले. यात्रा संपल्यानंतर एकाच महिन्यात तसा पुतळा त्याच्या मूळ जागेवर आम्ही उभा केला. पुढे त्याला हात लावण्याची हिंमत नक्षलवाद्यांनी केली नाही. 

रेपनपल्ली, कमलापूर ते कोरची अशा सगळ्याच गावांत नक्षल्यांच्या क्रौर्याच्या कथा आहेत. एकेका खेड्यात त्यांनी मारलेल्या माणसांच्या ज्या अभागी स्त्रियांना वैधव्य आले, त्यांची संख्याही मोठी आहे. अशा गावात आम्हाला पाच ते पंधरापर्यंतच्या अनेक दुर्दैवी स्त्रिया पाहता आल्या. आपली हडकुळी पोरे कडेवर घेतलेल्या त्या स्त्रियांनी सांगितलेली त्यांच्या नवऱ्यांची हत्या करतानाची घटना ऐकताना जीव कासावीस होत होता. अशा स्त्रियांची आणि त्यांच्या घरांची समजूत कोण आणि कशी काढणार? आमच्या सभा आणि यात्रा याही गोष्टी मग मला निरर्थक वाटू लागल्या. पण एक गोष्ट नक्कीच साध्य झाली. ‘तुम्ही एकटे नाहीत, आम्हीही तुमच्यासोबत आहोत’, ही भावना त्या क्षेत्रांत आम्हाला जागवता आली. शहरातली माणसे आमच्या व्यथा जाणतात, आमच्या प्रश्नांची व संकटांची जाणीव त्यांना आहे- ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्हाला यश येताना दिसत होते. लोकयात्रेत सव्वादोनशेहून अधिक स्त्री-पुरुषांचा सहभाग होता आणि ते सारे जण स्वत:च्या जीवावर उदार होऊन आले होते. अहिंसेवर नुसतीच व्याख्याने देण्याहून आपले काम कमी मोलाचे नाही, ही जाणीव आमच्यातील साऱ्यांचा उत्साह वाढवीत होती. एक दिवस शिवसेनेचे जिल्हास्तरावरील नेते स्वामी तेथे आले. एक दिवस चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर आले. पुढे नागपूरची स्वातंत्र्यसंग्राम सेनेतील माणसे आली. ही माणसे आदिवासींशी बोलत होती. त्यांचे म्हणणे ऐकून घेत होती. हे एकतर्फी बोलणे नव्हते, तो संवाद होता आणि तो प्रसंगही डोळ्यांत अश्रू आणणारा होता. 

यात्रेचे हे यश पाहूनच गोंदियाचे जिल्हाधिकारी व पोलीसप्रमुख आम्हाला भेटायला गडचिरोली तालुक्यात आले आणि त्यांनी आमची यात्रा त्यांच्या जिल्ह्यात किमान देवरीपर्यंत आणण्याची विनंती केली. देवरी हे महाराष्ट्र- मध्य प्रदेश महामार्गावरील अखेरचे गाव. तेही नक्षल्यांच्या हैदोसासाठी प्रसिद्ध. आम्ही त्यांचे म्हणणे ऐकून गडचिरोली जिल्ह्यातील एक-दोन गावे सोडून त्या जिल्ह्यात गेलो. तिथल्या खेडुतांनीही आमचे ढोल-ताशांनी स्वागत केले. सभांना गर्दी केली. नक्षल्यांच्या क्रूर कथा ऐकवल्या. अखेरच्या दिवशी ते दोन्ही अधिकारी आम्हाला भेटायला आमच्या मुक्कामी आले. त्यांनी आमचे आभार मानले. पुढे वडसा करीत वडस्याहून आमची यात्रा नियोजित दिवशी गडचिरोलीस पोहोचली. 

गडचिरोलीत पोलीस अधीक्षक जैन यांनी यात्रेकरूंच्या स्वागताचा भव्य सोहळा आयोजित केला होता. एका मोठ्या मंडपात जमलेल्या हजारांवर स्त्री-पुरुषांच्या सभेला उद्देशून मी आमच्या यात्रेचे अनुभव सांगितले. त्यातले भयावह वास्तव तिथल्याही अनेकांना ठाऊक नव्हते. आमच्यासोबत पोलिसांना शरण आलेला एक वीसेक वर्षे वयाचा तरुण नक्षलवादी होता. त्याने सात जणांना कापून मारले होते. त्याला मी विचारले, ‘माणसे कापताना तुला काहीच कसे वाटले नाही?’ तो म्हणाला, ‘पहिल्या व दुसऱ्या वेळेला त्रास झाला. पुढे कोंबड्या व बकऱ्या कापाव्यात, तशी मी माणसे कापत होतो.’ अशा कथांनी ऐकणारे हादरत होते. सभेत जैन यांचेही छोटेसे भाषण झाले. देवेंद्र गावंडे यांनी आपण ‘लोकयात्रेची दैनंदिनी’ प्रकाशित करणार असल्याचे जाहीर केले. ती प्रकाशितही झाली. त्या दैनंदिनीत या यात्रेतील सगळ्याच भीषण अनुभवांची कहाणी विस्ताराने आली आहे. 

या यात्रेने आम्हालाही अनेक विलक्षण गोष्टी शिकवल्या. दहशतवाद म्हणजे काय, माणसे मारणे म्हणजे काय, भयाचा अर्थ कोणता, समाजच्या समाज धाकात ठेवणारा दरारा कसा असतो, नुसत्या धमकावणीने गावे कशी बंद होतात, स्त्रियांचे कामावर येणे कसे बंद पाडले जाते... शाळा कशा बंद केल्या जातात आणि माणसे जिवंत असली तरी, त्यांची मने कशी मेलेली असतात- हे सारे तिने शिकवले. सरकारचे कामकाज अशा भयावह अवस्थेत कसे चालते वा चालत नाही, पुढारी नुसती व्याख्यानेच कशी देतात, त्यांच्यातल्या कोणालाच या भयग्रस्तांना भेटून दिलासा द्यावा, असे का वाटत नाही- वगैरे... वगैरे... आमच्या यात्रेत 239 स्त्री-पुरुष होते. अतिशय सामान्य परिस्थितीतले गरीब आणि अभावाचे चटके अनुभवलेली ही माणसे जे धाडस दाखवतात, ते या वरिष्ठांना का दाखवता येत नाही? जोगा मडावी हा आदिवासी कार्यकर्ता तेलुगू, माडिया आणि हिंदी या सगळ्या भाषेत बोलणारा माझा जुना मित्र होता. तो तिकडच्या साऱ्यांशी हृदयसंवाद साधत असे.  त्याच्या बोलण्याने माणसे कशी सुखावत होती ते आम्हाला पाहता आले. आपल्या जेवणा-खाण्याची व्यवस्था करणारा राजू चोरडिया व त्याच्यासोबतची माणसे व स्त्रिया या तर कोणतेही आवाहन नसताना आल्या होत्या. संरक्षणावाचून राहत अन्‌ राबत होत्या. लहानांचे मोठेपण आणि मोठ्यांचे लहानपण असे सारेच या यात्रेने शिकवले. कुठे पोलीस पुढाकार घेत, तर महसूल विभाग मागे असे. सहकार खात्याचे काम बंदच असे. एखादा पोलीस विभागच कार्यरत कसा असतो आणि तोच सारी सरकारी यंत्रणा कशी चालवितो, हे या वेळी पाहता आले. 

एस. पी. जैन हे अतिशय उत्साही पोलीसप्रमुख होते. त्यांची नागा पत्नी इंद्रमालौ जैन ही जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी होती. त्यांनी त्यांच्या मुलीला प्राणहिता हे गडचिरोली जिल्ह्यातील नदीचे नाव दिले होते. यात्रेनंतर इंद्रमालौ ही गडचिरोलीची जिल्हाधिकारी म्हणजे जैनांच्या वरची अधिकारी झाली. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करताना मी जैनांना म्हणालो, ‘तुम्ही आमच्या वहिनींना सॅल्यूट मारताना मला एकदा बघायचे आहे.’ 

आपली यात्रा 15 एप्रिल 2007 या दिवशी संपली. त्या वेळी उडेराच्या आदिवासींना गांधीजींचा पुतळा द्यायचे दिलेले आश्वासन स्मरणात होते. नंतरच्या 2 ऑक्टोबरला गांधीजींच्या जन्मदिनी तो उभारायचा, असे आम्ही ठरवले होते. तसा पुतळा तयार करण्याची व्यवस्था मी गिरीश गांधींच्या मदतीने नागपुरातच केली. तो तयार होताच जैनांना फोन करून तो नेण्याची व त्याची उभारणी करण्याची विनंती केली, तसे त्यांनी तत्काळ केलेही. 

आमच्या यात्रेतील सगळ्याच सहकाऱ्यांसोबत आपण मग 2 ऑक्टोबरला उडेराला गाड्या करून गेलो. गाव रंगीबेरंगी तोरणांनी शृंगारले होते. गावकरी दुतर्फा उभे होते. आम्ही गाड्यांतून उतरून पुतळ्याच्या स्तंभासमोर उभे राहिलो. जैन यांनी मलाच पुतळ्याचे अनावरण करण्यास सांगितले. मी मात्र ते काम आमच्यातील सर्वांत वयोवृद्ध यात्रेकरूने व उडेराच्या सरपंचाने करावे, अशी सूचना केली. टाळ्यांच्या गजरात आणि गांधीजींच्या जयजयकारात पुतळ्यावरील पडदा बाजूला झाला. लोकयात्रेचा खरा शेवट येथे झाला. त्या पुतळ्याचे स्मरण करीतच मग आपण सारे आपापल्या घरी परतलो. 

‘या यात्रेने काय साधले?’ हा प्रश्न स्वाभाविकच अनेकांनी विचारला. पण स्फोट होत होते, वाहने उडवली जात होती, नक्षल्यांचे भय कायम होते अन्‌ त्यातही त्यांचे फलक अन्‌ त्यांची पथके पाहूनही आपली सव्वादोनशेवर माणसे अन्‌ स्त्रिया त्या मरणाच्या वाटेवरून 25 दिवस चालतच राहिल्याच ना! पोलीस म्हणतात, या यात्रेनंतर नक्षल्यांच्या हिंसाचाराला किमान दीड वर्ष आळा बसला होता. पण त्याहून महत्त्वाची उपलब्धी म्हणजे, या यात्रेने सामान्य माणसांचा जागा केलेला पराक्रम व साहस हे होते. ही माणसे अशी मृत्यूच्या अरण्यातून एरवी कशी चालत गेली असती? आणि जया, आपण तरी तसे कशाला गेलो असतो? 

यात्रेनंतर मुख्यमंत्र्यांनी मला, गिरीश गांधींना आणि देवेंद्रला मुंबईला बोलवून घेतले. त्या परिसराच्या अडचणी समजून घेतल्या. स्वस्त धान्याच्या दुकानातला सारा माल नक्षली उचलून नेतात, आश्रमशाळेतल्या मुलांना पौष्टिकच काय- पण साधाही आहार पुरेसा मिळत नाही. ती गरीब पोरे चालता-चालता पडून बेहोश होतात. नक्षल्यांनी मारलेल्या लोकांच्या विधवांना वेळच्या वेळी साह्य मिळत नाही. पोलिसांचे अहवाल व महसूल खात्याचे हिशेबही तपासले पाहिजेत, कारण त्यांच्यातच मतभेद आहेत. सरकारने पोलीस यंत्रणा मजबूत केली पाहिजे. जंगल विभागात वावरण्याचा सराव असलेली माणसे आणली पाहिजेत इ. इ. 

विलासरावांनी सारे शांतपणे ऐकून घेतले. त्यांच्यासोबतच संबंधित खात्यांचे अधिकारी आमच्या बोलण्याच्या नोंदी करीत राहिले. त्यावर कारवायाही झाल्या. पण जया, जी गोष्ट केंद्र सरकारला जमली नाही, राज्यांना करता येत नाही- ती सव्वादोनशे नि:शस्त्र स्त्री-पुरुषांच्या शांततामय यात्रेने होणार नाही, हे आपल्यालाही कळत होते. गांधीजी म्हणायचे- सत्याग्रहाचा किती परिणाम विरोधकांवर होतो, हे पाहणे महत्त्वाचे नाही; तो सत्याग्रही माणसांचे मन किती मजबूत करतो, हे पाहणेच अधिक महत्त्वाचे. आपली मने तशी झाली की नाही, कोण जाणे! पण जया, नंतरच्या काळात माझ्या मनाला भय कधी शिवले नाही आणि तुझ्या? ते तर मी तुझ्या आजारपणात अनुभवतच होतो. 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके