Diwali_4 धर्म
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

जगातला कोणताही धर्म आपल्या प्रश्नांची सरळ व खरी उत्तरे देत नाही. ‘श्रद्धा ठेवा, तुम्हाला तुमचे उत्तर सापडेल’ हे त्याचे सगळ्या प्रश्नांना दिलेले एकमेव उत्तर असते. ते पुरेसे नाही, शिवाय ते फसवेही आहे. श्रद्धा ठेवली की, शंका विचारणे थांबते आणि त्या विचारणे थांबले की, प्रश्नही उरत नाहीत. प्रश्नांना उत्तरे देण्याचा हा मार्ग नसून, तुमचे प्रश्न हे प्रश्नच नव्हेत; हे तुम्हा-आम्हाला ऐकविण्याचा हा प्रकार आहे. उत्तरे वेदात आहेत, बायबल हे सर्व प्रश्नांचे उत्तर आहे आणि जगातली सारी ग्रंथालये जाळून टाका, कारण तुमच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे कुराणात आली आहेत, इथपासून उत्तरे शोधणारा, ती देणारा आणि योग्य वेळी योग्य मार्ग दाखविणारा तो ‘वर’ बसला आहे, असे या उत्तराचे पुढचे शेपूट आहे.

धर्म हा समाजाएवढाच व्यक्तीलाही आपल्यात राखणारा व स्वतःसोबत फिरवणारा जगङ्‌व्याळ श्रद्धाव्यूह आहे. त्यात नव्याने शिरणे वा त्यातून बाहेर पडणे, या दोन्ही गोष्टी अवघड. कारण सारे काही व साऱ्यांना सारे व्यापून तो काही अंगुळे उरणारा आहे. माणसे त्यात जन्मतात, वाढतात, राहतात, मरतात (आणि पुन्हा त्यातच जन्म घेतात, असे म्हटले जाते). यातून सुटका नाही आणि सुटका व्हावी असे वाटू नये, एवढा तो साऱ्यांच्या अंगवळणीही पडला आहे... एके काळी त्याचा पगडा आणखी मोठा व भारी होता. आताशा तो बराचसा हलका व प्रसंगी पाहून न पाहिल्यासारखे करता येण्याएवढा लहान होऊ लागला आहे.

माणसे धर्माज्ञा वाचून जगत-वागत नाहीत. बहुसंख्य हिंदूंनी वेद वाचलेले नसतात आणि उपनिषदेही अभ्यासलेली नसतात. तेवढ्याच मुसलमानांनाही कुराण, हदिस वा शरियत यांचा पत्ता नसतो. ख्रिश्चनही सारे बायबल न वाचता नव्या करारापाशीच थांबत असतात... मुळात हे ग्रंथ अवघड नाहीत. समजायला सोपे आहेत. पण त्याभोवती उभी असलेली श्रद्धेची तटबंदीच एवढी भक्कम की ती त्यांच्याविषयीचा दरारा उत्पन्न करून सामान्य माणसांना त्यांच्यापासून दूर ठेवते. त्याला जुळलेली परंपरा मोठी व शतकानुशतकांएवढी जुनी आहे. जुन्या पिढ्यांनी स्वीकारलेल्या श्रद्धेवर नव्या पिढ्या त्यांच्याही श्रद्धांची पुटे चढवीत जातात. या पुटांचीच जाडी एवढी की, त्या आडचे धर्म, त्यांचे ग्रंथ आणि त्यांतले त्यांचे जन्मकालीन वास्तव पार दूरचे, जुने व श्रद्धेय होऊन जाते. एवढे की, त्यासाठी आपले वर्तमान बाजूला सारायला माणसे तयार होतात.

सांस्कृतिक वादंगांच्या नावावर लढविली जाणारी आताची धार्मिक युद्धे, हाणामाऱ्या, खून, स्फोट आणि हिंसाचार ही मग सारी त्याच जुन्या बाबींच्या नव्या अहंकारांची परिणती होते. पूर्वीचे धर्मवीर आताचे धर्मयोद्धे होतात. अहंता तीच, अभिमान तोच आणि अज्ञानही तेवढेच. ते सारे घेऊन माणसे रस्त्यावर येतात. माणसांसाठी धर्म असतात, माणसे धर्मासाठी नसतात हे सत्यच मग त्या धावपळीत हरवून जाते.

ज्ञान-विज्ञान, तत्त्वज्ञान आणि आधुनिक शिक्षण या साऱ्यांच्या संस्कारांनी एक दुसराही नवा व वेगळा वर्ग आता समाजात उभा झाला आहे. तो बोलका आणि प्रश्न विचारणारा आहे. खरे तर त्याचीही परंपरा मोठी आहे. भारतात ती चार्वाकांनी सुरू केली, ख्रिश्चनात विज्ञानवाद्यांनी व पुढे धर्मसुधारकांनी ती पुढे नेली, इस्लाममध्ये ती उशिरा व क्षीणरीत्या सुरू झाली. पण नव्या पिढ्या व विशेषतः युद्धाचे चटके अनुभवावे लागत असलेल्या मुस्लिम स्त्रिया यांच्यात आता ती मूळ धरते आहे...

यापुढे हीच परंपरा वाढणारी आहे. जगभरचे सगळे प्रगत व लोकशाही देश स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवू लागले आहेत आणि सर्वधर्म समभाव हा जगभरच्या समाजांसमोरचा आदर्श झाला आहे. या विकासाला विरोधही आहे. तो प्रतिक्रियेच्या स्वरूपाचा व प्रसंगी हिंस्र होणारा आहे. मात्र प्रगत विचार थांबविण्याएवढे मोठे सामर्थ्य आता त्याच्यात फार थोडे व फार थोड्या जागी उरले आहे.

धर्माच्या दोन बाजू आहेत. एक उपकारकर्त्याची आणि दुसरी स्थितिवादी असण्याची... या दोन्ही बाजू दुबळ्या व कालविसंगत होण्याचा हा काळ आहे. एकट्या विसाव्या शतकाने त्याचा पाया हादरवून खिळखिळा केला. जगाची व्यक्तिकेंद्री वाटचाल वेगवान झाली आणि तिचा हा वेग सगळ्या स्थितिवादाला मागे टाकणारा आहे. धर्म व धर्मसंस्कार मागे पडत असल्याचे भय अनेकांच्या मनात आहे. मात्र या उपकारकर्त्या स्थितिवादी संस्थेने केलेले महत्कार्य आणि लादलेली हानी या दोन्ही गोष्टी येथे लक्षात घ्याव्यात, अशा आहेत. धर्माने समाज स्थिर केले आणि संघटित राखले. त्याला एक दीर्घकालीन व्यवस्था देऊन व्यक्तीचे जीवन नियमबद्ध व आश्वस्त केले. गेल्या पाच हजार वर्षांचा इतिहास या वास्तवाची साक्ष देणारा आहे...

मात्र त्याचबरोबर धर्माची दुसरी बाजूही तेवढीच महत्त्वाची आहे. धर्माचा संबंध श्रद्धेशी असल्याने व सगळ्या श्रद्धा, विचार व तर्कविरोधी असल्याने धर्माने विचार व तत्त्वज्ञान संपविले. विज्ञानाचा विनाश केला. धर्ममार्गी समजांखेरीज अन्य ज्ञानांकुरांचा त्याने निषेध केला. धर्माच्या अभिमान्यांनी त्यांच्या प्रचार-प्रसारासाठी युद्धे घडविली. जगाच्या इतिहासात नोंद असलेल्या 14 हजारांहून अधिक युद्धांपैकी 80 टक्क्यांएवढी युद्धे धर्माखातर झाली व त्यांत कोट्यवधी माणसांना बळी जावे लागले. एकट्या 14 व्या शतकात भारतात झालेल्या धर्मयुद्धांत 40 लाख माणसे ठार झाली. त्या वेळी भारताची लोकसंख्या 12 कोटींहूनही कमी होती. (ही युद्धे केवळ हिंदू-मुसलमानांतली नव्हती. शैव आणि वैष्णवांतली, तशी हिंदू धर्माच्याच पंथोपपंथांतली होती) धर्मांची युद्धे आणि त्यांच्यातली तेढ अजून मोठी आहे.

सांस्कृतिक कलह (कल्चरल क्लॅश) असे नवे व गोंडस नाव त्यांना आता दिले जात असले, तरी त्या धर्मांच्याच लढाया आहेत... उद्याच्या व्यक्तिकेंद्री जगात धर्म राहतील, पण त्यांचे बांधबंदिस्तीचे सामर्थ्य संपले असेल. धर्माभिमान हा कवितांचा विषय असेल. धर्म विरळ होत जात कालांतराने इतिहासजमा होतील आणि तोवर त्यांच्याकडे मानसोपचाराचे व दिलासा देण्याचेच काम तेवढे उरेल. पूर्वजन्म, पुनर्जन्म वा मृत्यूनंतरच्या वा दुसऱ्या जगाच्या अस्तित्वाची भीती घालून व्यक्तीचे वर्तमान ताब्यात ठेवण्याचे व तिच्या भविष्यावर नियंत्रण आणण्याचे त्याचे अजून शिल्लक असलेले सामर्थ्य तेव्हा संपले असेल.

जगभरातील धर्मांच्या जन्मतारखा सांगता येतात. पवित्र प्रेषितावर पहिली आयत (अल्लाचा पहिला संदेश) उतरल्याची तारीख, येशूने पठारांवरील प्रवचनांना केलेली सुरुवात, भगवान बुद्धाला झालेल्या ज्ञानप्राप्तीचा मुहूर्त किंवा महावीराने त्याच्या अनुयायांना पहिला उपदेश केला तो दिवस. हिंदू आणि ज्यू हे धर्म स्वतःला प्राचीन म्हणवत असले आणि वेद हे अपौरुषेय असल्याचे व तोराह हा ईश्वरी ग्रंथ असल्याचे सांगत असले, तरी त्यांच्या निर्मितीच्या नोंदी इतिहासात नसणे एवढेच त्यांच्या अपौरुषेयत्वाचे कारण आहे व ते अविश्वसनीय आहे. वेदांचे रचयिते इतिहासाला ज्ञात आहेत. त्यांतल्या प्रत्येक सूक्ताच्या आरंभी त्याच्या रचयित्या ऋषीचे नाव आहे. तशी तोराहची निर्मितीही काळाला ठाऊक आहे. त्याला त्याच्या आरंभाची स्थिती ज्ञात नसणे, एवढी त्यातली अडचण आहे...

धर्म ही मानवी निर्मिती आहे आणि तिचा ईश्वराशी संबंध नाही. झालेच तर धर्मनिर्मिती ही ऐतिहासिक घटना आहे. ती तशी असल्याने धर्म हे त्यांच्या निर्मितीच्या स्थल-काल-परिस्थितीचेही अपत्य आहे. येशूला त्याच्या काळातील सत्तेचे व सत्ताधाऱ्यांचे अस्तित्व ठाऊक होते व मान्यही होते. ‘गिव्ह अन टू सीझर्स, व्हॉट इज सीझर्स’ असे तो त्याचमुळे म्हणतो. ‘गणराज्यांचा पराभव करणे अवघड आहे. तो करायचा असला, तर त्यातील गणांमध्ये फूट पाडली पाहिजे’ हे बुद्धाने अजातशत्रूला केलेले साम्राज्यवाढीचे मार्गदर्शनही तत्कालीन राजसत्तेचे अस्तित्व व माहात्म्य धर्ममान्य ठरविणारे आहे. पैगंबराला प्रत्यक्ष हाती तलवार घेऊनच राज्य राखावे व विस्तारावे लागले. वेदांमध्ये सुर- असुरांच्या लढाया आहेत. त्या लढायांतील इंद्राच्या सेनेचा पराक्रम आहे. दैवतांनी गुरे पळविल्याच्या व जमिनी ताब्यात घेतल्याच्या कथा आहेत आणि तोराह हा ग्रंथदेखील याहून वेगळा नाही...

या सगळ्या धर्मग्रंथांचे मुळातून साधे वाचन केले, तरी त्या काळातली माणसेही आजच्यासारखीच चांगली आणि वाईट व नीतिमान आणि स्खलनशील होती, हे लक्षात येते. अगदी सत्ययुगातली माणसेही असत्य बोलतच होती. धर्मांच्या जन्माआधी माणसे बंधनांवाचून राहत होती काय हा इथला प्रश्न, आहे आणि त्याचे उत्तर नकारार्थी आहे. माणसे पूर्वीही समूहांच्या बंधनात होती. अगदी निआंडरथल काळात ती तशी होती आणि माकडांच्या टोळ्यांतून माणूस म्हणून बाहेर पडण्याआधीही तशीच होती. ज्यांना धर्मसंस्थापक म्हणतात, त्यांनी तीच जुनी बंधने काळानुरूप बदलून घेऊन सूत्रबद्ध व संघटित केली. मात्र आपण माणूस असल्यामुळे आपले सांगणे कोणी ऐकणार नाही; म्हणून त्या शहाण्या माणसांनी ती ईश्वराच्या वा अल्लाच्या नावावर किंवा ज्ञानधारणेच्या अधिकाराच्या आधारावर सांगितली, एवढेच.

धर्म ही अशी ऐतिहासिक घटना आहे आणि ती सनातन वा अनादिअनंत  असल्याचे सांगणे, हा तीत ज्यांचे हितसंबंध अडकले आहेत त्यांचा आविर्भाव आहे. ‘शेवटचा ख्रिश्चन ख्रिस्तासोबतच सुळावर चढला’ हे म्हणणेही याच अर्थाने खरे आहे. आजचे सनातनी व नवे विचारवंत यांच्यातला संघर्ष यातून उद्‌भवणारा आहे. त्यातली सनातन्यांची ताकद अजून मोठी राहिली आहे आणि ती त्यांना मिळवावी लागली नाही. माणसाला धर्म हा जातीसारखाच जन्माने प्राप्त होतो. धर्मांचा तौलनिक अभ्यास करून त्यात योग्य वाटलेला धर्म निवडण्याचा उद्योग माणसे करीत नाहीत. तसा जन्माने मिळालेला धर्म कोणी अभ्यासून टाकत वा नाकारतही नाही. ज्या थोड्यांनी ते केले; त्यात चार्वाक होते, बुद्ध आणि महावीर होते, जीझस आणि महंमद होते.. आंबेडकर हे त्यांतले अलीकडचे उदाहरण. पण त्यांनी जुनाच एक धर्म त्यात कालानुरूप बदल करून स्वीकारला. त्यांच्या अध्ययनावर श्रद्धा असणाऱ्यांनी त्यांचे अनुयायी म्हणून पुन्हा तो फारसा न अभ्यासता तसाच आत्मसात केला.

जगातला कोणताही धर्म आपल्या प्रश्नांची सरळ व खरी उत्तरे देत नाही. ‘श्रद्धा ठेवा, तुम्हाला तुमचे उत्तर सापडेल’ हे त्याचे सगळ्या प्रश्नांना दिलेले एकमेव उत्तर असते. ते पुरेसे नाही, शिवाय ते फसवेही आहे. श्रद्धा ठेवली की, शंका विचारणे थांबते आणि त्या विचारणे थांबले की, प्रश्नही उरत नाहीत. प्रश्नांना उत्तरे देण्याचा हा मार्ग नसून, तुमचे प्रश्न हे प्रश्नच नव्हेत; हे तुम्हा-आम्हाला ऐकविण्याचा हा प्रकार आहे. उत्तरे वेदात आहेत, बायबल हे सर्व प्रश्नांचे उत्तर आहे आणि जगातली सारी ग्रंथालये जाळून टाका, कारण तुमच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे कुराणात आली आहेत, इथपासून उत्तरे शोधणारा, ती देणारा आणि योग्य वेळी योग्य मार्ग दाखविणारा तो ‘वर’ बसला आहे, असे या उत्तराचे पुढचे शेपूट आहे.

तुम्ही प्रश्न काढू नका म्हणजे तुम्ही तुमची चिंता करू नका, ते ओझे त्या ‘वर’च्यावर वा ग्रंथावर टाका आणि निश्चिंत व्हा. दुःखे आहेत, अभाव आहेत आणि आपदाही आहेत; पण ते सारे पाहिले तरच ते आहे, ते पाहायचे नाही असा एकवार निश्चय केला की, मग ते सारे उरते कुठे?... प्रश्नांबाबत एक बाब आणखीही- धर्माची बाजू घेणारे नेहमीच आपला धर्म तर्काधिष्ठित आहे आणि तो सगळ्या प्रश्नांची तर्कशुद्ध उत्तरे देतो असे म्हणतात. अट एकच, प्रश्न ‘काय’ हा असावा. ‘कसे’ हाही असायला हरकत नाही. फक्त तो ‘का’ हा नसावा. वेद काय म्हणतात आणि कसे म्हणतात इथपर्यंत सारे ठीक; पण ते तसे का म्हणतात, हे विचारायचे नसते. ते बुद्धाला आणि पैगंबरालाही विचारायचे नसते. कारण त्या प्रश्नात एक ‘पाखंड’ दडले आहे आणि ते कोणत्याही धर्माला वा धर्मशरणाला मान्य नाही.

विज्ञानाच्या वाढीने धर्मश्रद्धेच्या क्षेत्राचा संकोच झाला. मात्र धर्मासारख्या बाबी एकाएकी संपत नाहीत. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्या शिल्लक राहतात. त्यांचे पाठीराखे व हितसंबंधी त्यांच्या पताका उंच ठेवण्याचा प्रयत्न करतात. अमेरिकेसारख्या देशात एकाला लागून दुसरे चर्च गर्दी करून उभे आहे- आपल्याकडे ग्रोग्री मारुती आणि गणपती आहेत, तसे. त्यांत नियमित जाणारे जातात आणि दर्शन घेतात. बाकी संकटाच्या वेळी जातात. इतर त्याकडे लक्ष न देता पुढे जातात. चर्चमधला देव आणि आपले गणपती-मारुती आपापल्या जागी असतात. जाणाऱ्यांना गेल्याचे समाधान मिळते...

तशाही या आता दिलाशाच्या बाबी झाल्या आहेत. माणसे चर्चमध्ये गर्दी करतात, मंदिरांत रांगा लावतात, मशिदीत हजारोंनी जमतात; तो त्यांच्या सवयीचा भाग असतो आणि  काहींसाठी मानसोपचारातल्या दिलाशाचा. त्यांतल्या ज्ञात्यांना यातून काही मिळायचे वा व्हायचे नाही, हे कळते. अज्ञान्यांनाही ते कळतच असते; फक्त त्यांचा खुळा आशावाद संपलेला नसतो... शिवाय धर्म ही धंद्याचीही बाब आहे आणि तो बिनागुंतवणुकीचा व शंभर टक्के लाभ देणारा धंदा आहे.

भारत सरकारजवळ 300 टन सोने आहे, तर भारतातल्या मंदिरांजवळ असलेले सोने 30 हजार टनांहून अधिक आहे. देश गरीब आणि देव धनवंत- भक्त उपाशी आणि ईश्वर तुपाशी, असे हे त्याच्या एरवी रंगविल्या जाणाऱ्या दैवी रूपाहून वेगळे आणि कुरूप रूपडे आहे.... जाहिरातीचे शास्त्र ज्यांनी अभ्यासले, ते सांगतील की; त्या शास्त्रात प्रथम सांगितली जाणारी बाब ‘जगात सर्वाधिक खपणाऱ्या गोष्टी दोन आहेत त्यांतली एक ईश्वर आणि दुसरी सेक्स’ ही आहे.

चार्वाकांनी वेदांना धूर्त, भंड आणि निशाचरांची निर्मिती म्हटले. त्यांचा पंथ इतरही सर्व धर्मांवर खोटेपणा व फसवणुकीचा आरोप करणारा असल्याने सारेच धर्म त्यांना जपणाऱ्या राजसत्तांसोबत चार्वाकांविरुद्ध एकत्र आले. त्या संघर्षात चार्वाकांचा एकही ग्रंथ त्यांनी शिल्लक ठेवला नाही. त्यांच्यावरची टीका आहे, पण त्यांचा ग्रंथ नाही... भारतीयांच्या धार्मिक सहिष्णुतेसमोर संशयाचे प्रश्नचिन्ह उभे करणारे हे प्रकरण आहे.

तिकडे सॉक्रेटिस नव्या पिढ्यांना पाखंड शिकवतो म्हणून त्याला विष दिले गेले. मार्टिन ल्यूथर हा पोप व चर्च यांच्यावर टीका करतो म्हणून त्याला जिवंत जाळले गेले. इस्लाममध्ये तर चिकित्सकांची व टीकाकारांची परंपरा जन्मालाच येणार नाही याची काळजी घेतली गेली. जी आली, ती विसाव्या शतकात आणि तीही भारतात. पण तिचे उद्‌गाते दुर्लक्षिले व वाळीत टाकले गेले. कारण प्रस्थापित धर्मांची व त्यांवरील समाजाच्या श्रद्धेची (तर्काची वा चिकित्सेतून येणाऱ्या समजाची नव्हे) ताकद सदैव मोठी राहिली व अजूनही ती तशीच आहे. या ताकदीविरुद्ध मार्क्स हरला आणि जगभरच्या कम्युनिस्ट राजवटीही हरल्या, तरीही या लढाईत धर्माने त्याची झिलई गमावली आहे. तो पूर्णपणे श्रद्धेचा विषय न राहता समजून घेण्याचा व प्रसंगी सांभाळून घेण्याचाही विषय बनला आहे. तसेही धर्म जन्माला येणे आता थांबले आहे. ईश्वरांनीही जन्म घेणे थांबविले आहे.

जगातील मोठ्या धर्मांपैकी सर्वांत अखेरीस जन्माला आलेला धर्म म्हणजे इस्लाम. त्याची मुहूर्तमेढ रोवणारा हजरत सलीवुल्ला वसल्लम महंमद पैगंबर याचा काळच इ.स.570 ते 632 हा आहे. नंतर अनेक लहान व छोटे वर्गच त्यांचे स्थानिक धर्म सांगताना व स्वीकारताना दिसले. कारण उघड आहे. समाजाच्या ज्या मानसिकतेत ईश्वर वा धर्म जन्माला येतात, ती मानसिकता आता समाजानेच टाकली आहे. जुने धर्म आहेत, त्यांच्या प्रथा व परंपरा पिढ्यानुपिढ्या चालत आल्या आहेत. फारशी चिकित्सक बुद्धी न वापरता त्या जशाच्या तशा स्वीकारणे व जुन्या पिढ्यांनी नव्या पिढ्यांकडे सोपविणे, एवढेच आता घडताना आपण पाहतो. त्यातही नव्या पिढ्या व विशेषतः स्पर्धेच्या जगात धावावे लागणाऱ्यांचे वर्ग त्या प्रथा-परंपरांपासूनही आता दूर जाताना दिसत आहेत.

धर्म वा धर्माने मान्यता दिलेली दैवते आपल्या प्रार्थनांना प्रतिसाद देतात, ही जुनी श्रद्धाही आता विरळ होत चालली आहे. पूर्वीचे यज्ञ संपले आणि महापूजा राजकारणात गेल्या. यात्रांना जाणारेही अनेक जण प्रवास वा साहस म्हणून त्यांना जाताना दिसतात. अगदी हजला जाणारेही एक मोठी सहल केल्यासारखे जातात आणि त्यांतले नवे लोक स्वतःला हाजी वगैरे म्हणवून घेत नाहीत. मंदिरांत जाणाऱ्यांची संख्या कोणत्या काळात- परीक्षेपासून लग्नादी मुहूर्तांपर्यंत- वाढते ते लक्षात घेण्यासारखे आहे. सवयीने जाणे आणि भाविक वृत्तीने जाणे यात अंतर आहे. सुशिक्षितांच्या समाजात भजनी मंडळे वाढली, पण त्यांतली आताची वेळ काढण्याची व मन रमविण्याची वृत्ती उघड दिसावी एवढी ठळक आहे. रामायण ही मालिका प्रथम दाखविली गेली, तेव्हा रस्ते ओस पडायचे आणि दूरदर्शनच्या संचांभोवती माणसे गर्दी करायची. तीच मालिका दुसऱ्यांदा आली, तेव्हाचा तिचा प्रेक्षकवर्ग नगण्य होता आणि ‘हनुमान झाला तरी तो असा उडतो काय’ असे प्रश्न घरातली मुलेच आई-वडिलांना विचारताना दिसली...

ज्ञान-विज्ञानाने मनाचा ताबा घेतला की, धर्म व श्रद्धा मागे सरतात आणि विचार, चिंतन, शंका व प्रश्न त्यांची जागा घेतात. कुठे हे बोलण्या-वागण्यात दिसते, तर कुठे ते मूकपणे प्रगटताना दिसते. तत्त्ववेत्त्यांची चरित्रे आणि एकूणच इतिहास पाहिला, तर खऱ्या विचारवंतांनी व तत्त्ववेत्त्यांनी धर्मश्रद्धा नाकारल्याचे व त्यांच्यातील अनेकांनी त्यासाठी फार मोठी किंमत मोजल्याचेही दिसते. आजच्या जगात या श्रद्धेपासून स्वतःला दूर राखणारी आणि तरीही समाजाच्या आदराला पात्र झालेली अनेक माणसे सांगता व दाखविता येतील. धर्मश्रद्ध असण्याचा नीतिनिष्ठ वा आदरणीय असण्याशी फारसा संबंध नाही. नीतिनिष्ठ असणारी माणसेही धर्मश्रद्ध असतीलच, असे नाही. धर्मश्रद्धा व नीतिनिष्ठा यांची दोन स्वतंत्र परिमाणे आहेत. मुळात धर्म ही संस्थाही तिच्या शिकवणुकीपासून आपल्यापर्यंत पूर्णपणे वा फारशी नीतीच्या मार्गाने आली आहे, असेही म्हणता यायचे नाही.

आपल्याच धर्मातील लोकांना अस्पृश्य लेखून गावकुसाबाहेर ठेवणारे धर्म नीतिमान कसे म्हणता येतील? स्त्रीला देवी म्हणायचे आणि तिचा अनन्वित छळही करायचा, ही बाब धर्मात बसली तरी नीतीत  कशी बसेल? धर्मयुद्धाच्या नावाने परधर्मीयांच्या नुसत्याच कत्तली करणारे आणि त्यांच्या मुंडक्यांचे मनोरे रचणारे नीतिशुद्ध कसे असतील? ‘परधर्मीयांना दिलेला शब्द पाळण्याचे बंधन तुमच्यावर नाही; त्यांच्या घरात घुसण्याचा, त्यांची मालमत्ताच नव्हे तर स्त्रियाही वापरण्याचा व त्यांच्या जागी संतती उत्पन्न करण्याचा अधिकार तुम्हाला आहे’- ही धर्माची शिकवण नीतीचे नाव कसे सांगू शकते? काळ्या वर्णाच्या लोकांना फसवून आणून त्यांची गोऱ्या देशांत गुलाम म्हणून विक्री करणारे माणसांचे व्यापारी येशूचे अनुयायी कसे ठरतात आणि त्यांना नीतिमान तरी कसे म्हणता येते?...

चांगली माणसे नीतिमान असावी लागतात; ती धर्मश्रद्ध असलीच पाहिजेत, असे नाही. अशाही घटनांचे व आचाराचे समर्थन करणारी माणसे म्हणतात- हे आचरण धर्माचे नसून त्याचा चुकीचा अर्थ लावणाऱ्या व्यक्तींचे आहे. त्यासाठी धर्मांना जबाबदार धरण्याचे कारण नाही. मात्र हा युक्तिवाद दोन्ही बाजूंनी केवळ फसवाच नव्हे, तर खोटाही आहे. मुळात धर्म अशा व्यवहारांना पाठिंबा देतो, त्याचे समर्थन करतो व प्रत्यक्षात तसे वागायला सांगतोही. ख्रिश्चन धर्माच्या लोकांनी ज्यूंना जिवंत जाळण्याचे केलेले पोग्रोम्स हे धर्मकार्यच होते. प्रोटेस्टंट पंथाच्या शिकवणुकीतही हे पोग्रोम आहेत... स्वतंत्र विचार करणारी स्त्री ही चेटकीण आहे आणि प्रत्येक चेटकीण ही मृत्युदंडाला पात्र आहे, हा समज सामान्य ख्रिश्चनांचा नव्हता; तो पोपचा आदेश होता आणि त्यानुसार साऱ्या युरोपात लक्षावधी स्त्रिया जिवंत जाळल्याही गेल्या. इस्लामच्या शिकवणीत परधर्माची, विशेषतः ख्रिश्चन व ज्यूंखेरीजची माणसे ही माणसे नव्हेतच, ती शेळ्या-मेंढ्यांसारखी प्राणिमात्रेच तेवढी आहेत, असे म्हटले आहे...

दुसरे असे की- धर्म ही व्यवस्था नीतीच्या बाजूने उभी राहिली असती, तर तिने या गोष्टींना आवर घालण्याचा तरी प्रयत्न केला असता. पण इतिहासातला कोणताही हिंदू शास्त्री अस्पृश्यतेविरुद्ध बोलत नाही. पोप पोग्रोम्स थांबवू शकले नाहीत. इस्लामला कत्तली व स्त्रियांवरचे अत्याचार रोखता आले नाहीत आणि बौद्धांनाही समाजात समता व बंधुता आणता आली नाही. जपानमध्ये बुद्धाच्या अनुयायांनी शिंटो धर्माच्या लोकांशी केलेली धर्मयुद्धे व त्यांतील हिंसाचार, चीनमध्ये त्यांनी उघडलेल्या युद्धतंत्राचे शिक्षण देणाऱ्या संस्था आणि आजच्या काळात बौद्ध धर्मगुरूंनी जपानपासून श्रीलंकेपर्यंत युद्धखोरांशी राखलेले प्रत्यक्ष संबंधही येथे नोंदविण्याजोगे आहेत.

‘बुद्धिस्ट वॉरफेअर’ हा मायकेल जेरिसन व मार्क जेरीज यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ या साऱ्यांचे सचित्र पुरावे देणारा आहे. धर्म अशा वेळी निष्प्रभ व निष्क्रिय का होतात; प्रसंगी ते या अधर्माचरणात व अनीतीत सहभागी का होतात, हा संशोधनाचा विषय नाही. मुळातच ते या गोष्टींना प्रोत्साहन देणारे होते व आहेत व हे वास्तव आहे. धर्मासाठी प्राण देण्याची भाषा आता पोवाड्यांत व गाण्यांतच उरली आहे आणि मार्क्सने धर्माला ज्या काळात अफूची गोळी म्हटले, तो काळही आता मागे पडला आहे. धर्मवीर वा धर्मयोद्धे म्हणून आज ज्या संशयितांना काहींचे समूह डोक्या-खांद्यांवर घेतात, ते त्यांच्या स्वधर्मप्रेमाहून परधर्मद्वेषासाठीच अधिक प्रसिद्ध आहेत. महात्म्यांचा खून  करणाऱ्यांना धर्मवीर म्हटले जाणे, ही बाब आपल्याही माहितीतली आहे आणि देशाच्या पंतप्रधानांवर मशिनगनचा मारा करून त्यांचा बळी घेणाऱ्यांना धर्मयोद्धे म्हणून मानाचा शिरोपा देणारे धर्मगुरूही आपल्या परिचयातले आहेत...

मार्क्सने ज्या काळात धर्माला अफूची गोळी म्हटले, तो 19 व्या शतकाचा काळ आहे. त्या काळात धार्मिक समजुतींचा मानवी मनावरचा पगडा घट्ट व मोठा होता. या जन्मीचे दारिद्य्र तुम्हाला मागच्या जन्मातील पापकृत्यांमुळे प्राप्त झाले आहे आणि मागल्या जन्मीच्या सत्कृत्यांमुळेच आजच्या धनवंतांच्या वाट्याला त्यांचे सुखोपभोग आले आहेत, हे धर्माचे तेव्हाचे सांगणे होते. पूर्वजन्म, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक इत्यादी गोष्टी कष्टकरी वर्गाच्या अशाच फसवणुकीसाठी धर्माने जन्माला घातल्या; म्हणून मार्क्सने त्याला अफूची गोळी म्हटले. पुनर्जन्म व पूर्वजन्म या संकल्पना आता अविश्वसनीय व हास्यास्पद झाल्या आहेत. कोणताही गरीब माणूस त्याची विपन्नावस्था पूर्वजन्मीच्या कर्मांमुळे त्याला प्राप्त झाली, हे मान्य करणार नाही आणि धनवंतांचे सुखोपभोग त्यांच्या पूर्वकर्मांमुळे त्यांना मिळाले, हेही स्वीकारणार नाहीत... धर्माने या गोष्टींचा बागुलबुवा उभा करण्याचे खरे कारण, पूर्वजन्म वा पुनर्जन्माचे नाव घेऊन त्याला माणसांचा आताचा जन्म नियंत्रित करायचा व धर्मगुरूंच्या ताब्यात ठेवायचा होता, हे आहे.

धर्म आणि राजकारण ही क्षेत्रेही एकमेकांशी जुळलेली व समकक्ष असावीत अशी वाटणारी आहेत. अमेरिका व युरोप हे खंड उत्तर आशिया आणि आफ्रिकेचा मोठा भाग व ऑस्ट्रेलिया ख्रिश्चन, चीन-जपान हे बौद्ध व अन्य स्थानिक धर्मांचे, मध्य आशिया मुसलमानांचा तर भारत हिंदूंचा- अशी ही भौगोलिक विभागणी जेवढी धार्मिक, तेवढीच राजकीयही आहे. धर्मांच्या लढाया व त्यांतल्या तेढीही जेवढ्या धार्मिक, तेवढ्याच राजकीयही असतात. भारत व पाकिस्तानमधील तेढ नुसती राजकीय वा प्रादेशिक नाही, ती धर्मकेंद्रीही आहे. ‘धर्म राजकारण समवेत चालती’ ही कविता केवळ चांगल्या अर्थानेच खरी नाही. राजकारणासाठी धर्म व धर्मासाठी राजकारण वापरण्याचे प्रकारही जगात फार झाले व आहेत. राजकारण हे क्षेत्र धर्माला प्रसंगी जवळ करणारे आहे. मात्र त्यात स्वधर्मप्रेमापेक्षा परधर्मद्वेष अधिक मोठा आहे. एके काळी अमेरिकेत रोमन कॅथॉलिक पंथाची माणसे निवडून येत नसत. पण प्रथम केनेडी व नंतर क्लिंटन यांनी तो इतिहास बदलला. ओबामाने तर तो नव्यानेच लिहून काढला.

भारतात धर्मज्वर आहे. तो मुस्लिम देशांहून कमी आहे आणि त्या ज्यांच्याजवळ सांगण्यासारखे तत्त्वचिंतन वा कार्यक्रम नाही, ते ज्वराचा वापर करणारे आहेत. त्यातले फोलपण समाजाला व मतदारांनाही कळणारे आहे. त्याची भूल अजून थोडी शिल्लक असली, तरी त्याचा जास्तीचा वापरच ती निरर्थक ठरवणार आहे. अखेर समाजाला ढोंगेही फार काळ आवडत नाहीत. उद्याचे जग या व्यूहांपासून मुक्त होत जाणार आहे. ते धर्ममुक्तच नाही, तर धर्माधिष्ठित राजकारणाच्या सर्वंकष नियंत्रणातूनही मोकळे होणार आहे. माणसे मनाने मुक्त व आत्मनिर्भर होत असतानाच या प्रक्रिया घडून येणार आहेत. ही मुक्ती युद्धमुक्तीकडे व एका दीर्घकालीन शांततेकडे नेणारी आहे. माणसांची मने या काळात कितपत बदलतील, हा प्रश्न तरीही अनेकांच्या मनात रेंगाळणार आहे. मात्र त्याचे उत्तर सोपे आहे. ही मने बदलतात. आपल्या जुन्या पिढ्या व त्यांची मानसिकता मनःचक्षूंसमोर आणली की, आपण त्यांच्याहून वेगळे व फार पुढचे आहोत, हे कळते आणि उद्याच्या पिढ्या डोळ्यांसमोर आणल्या की आपण फार मागे व जुने आहोत, हेही समजते. हा बदल केवळ आपल्यातला नाही, जगातला आहे...

अखेर धर्मही संस्कारांनीच पुढे जातात- जुन्यांचा नव्यांवरील संस्कार. आता जुनेच तो संस्कार पातळ, शिथिल व दिसेनासा करीत असतील तर... अनुकरण हाही मार्ग आहे. पण अनुकरण करावे, असे धर्माचरण तरी किती जण करतात? शिवाय नव्या काळाला त्याची गरज तरी कुठे आणि कशी पडायची आहे? धर्मांचा हा इतिहास सामान्यपणे सांगितला जात नाही. सांगितला गेला तरी तो इतरांच्या धर्मांचा सांगितला जातो. धर्मातील सत्कृत्ये, सत्पुरुष आणि त्यांची चांगली शिकवणच तेवढी सांगितली जाते. नव्या पिढ्यांवरील चांगल्या संस्कारांसाठी ते आवश्यक वाटत असले, तरी धर्मांचा तेवढाच इतिहास पुरा व खरा नाही. खरा इतिहास नव्या पिढ्यांनाही समजला पाहिजे आणि तो कुणी सांगत नसले तरी उद्या तो त्यांनाही कळल्यावाचून राहायचा नाही.

ज्ञानाच्या स्फोटाच्या आताच्या काळात हे घडणारच आहे. पण तसे न घडले तरी त्या इतिहासाएवढेच त्याच्या धर्म या विषयाशी येत्या समाजाला फारसे देणे-घेणे राहणारही नाही... त्याचा भर धर्मव्यवस्थेवर, धर्मनियमांवर व त्यांनी घालून दिलेल्या समाजाच्या घडीवर असणार नाही, कारण समूह व समाजच तेव्हा कालबाह्य होतील. उद्याच्या व्यक्तिकेंद्री व्यवस्थेला धर्माहून नीतीशी अधिक कर्तव्य असेल आणि नीती ही धर्मनिरपेक्ष आहे.

Tags: धर्मयुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर महमंद पैगंबर समाज व्यक्ती बायबल चार्वाक नीती बराक ओबामा कार्ल मार्क्स हिंदू इस्लाम श्रद्धा मार्क जेरीज मायकेल जेरिसन बुद्धिस्ट वॉरफेअर सुरेश द्वादशीवार मन्वंतर धर्म Dharmyudhe Dr.Babasaheb Ambedkar Muhammad Paigambar Samaj Vykti Bible Charwak Niti Barac Obama Karl Marx Hindu Islam Shardha Mark Jerryson Michael Jerison Buddhist WarFare Suresh Dwadashiwar Manvantar Dharam weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात