Diwali_4 नीती..
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

‘राजाने सिंहासारखे दिसावे, पण कोल्ह्यासारखे असावे’ असे कौटिल्य म्हणतो. त्याने राजासाठी एक व प्रजेसाठी दुसरीच नीती सांगितली आहे. ज्यातून राज्य म्हणजे सत्ता बळकट होते, तो राजाचा नीतिधर्म आणि ती ज्यातून दुबळी होते, तो त्याचा अनीती मार्ग असे तो म्हणाला. मात्र नीती हे मूल्य नीतीला पर्याय असतो हे मान्य करीत नाही. म्हणून कौटिल्याला त्याच्या याच नीति व्यवहारासाठी इतिहासाने कुटील म्हटले आहे.

एकट्याने वाढणारी मुले चांगलीही निघतात. एकलव्य हे त्याचे एक उदाहरण. ही मुले वाईटही निघू शकतात... कुटुंबात राहून मोठी झालेली मुलेही चांगलीच असतील याची तरी खात्री कुठे देता येते? कौरव मोठ्या तर पांडव लहान कुटुंबात होते. जर्मनीचा विली ब्रँड हा नोबेलविजेता पंतप्रधान अनाथाश्रमात वाढला. हिटलरही असाच एकटा वाढला. संस्कार हा शेवटी शक्यतेचाच विषय आहे, तो खात्रीचा नाही. येथे संस्कारांचे मोल कमी लेखायचे नाही. मात्र त्याचे स्तोम माजविण्याने व्यक्तिगत निर्णयक्षमतेची होणारी हानी कमी करणेही गरजेचे आहे.

 

आपल्या जीवनात दोन प्रबळ निष्ठा आहेत. एक जन्मदत्त- ती जन्माने मिळणारी, मिळवावी न लागणारी व आपोआप प्राप्त होणारी आहे. कुटुंब, कूळ, जात, धर्म व देश यांसारख्या बाबी माणसाला जन्मतः मिळतात. त्यांच्याविषयीचे प्रेम, आस्था आणि निष्ठा मनात सहजगत्या निर्माण होतात. दुसरी मूल्यनिष्ठा- ती कष्टसाध्य आहे. ती मिळवावी व मनात रुजवावी लागते. स्वातंत्र्य, समता, न्याय बंधुता, लोकशाही, मानवाधिकार इ. मूल्यांविषयीची ही निष्ठा आहे. ती सार्वत्रिक नाही. ज्यांनी ती आत्मसात केली, त्यांच्यातच ती दिसते. समाजप्रबोधन म्हणतात ते दुसरे-तिसरे काही नसून व्यक्तीला तिच्या जन्मदत्त निष्ठांकडून मूल्यनिष्ठांकडे वळविणे व नेणे हे आहे...

यातल्या जन्मदत्त निष्ठा स्वार्थाधिष्ठित असतात. स्वहित, कुटुंबाचे हित, कुळाचे, जातीचे, धर्माचे व अखेर देशाचे हित. आत्मनिष्ठेपासून देशनिष्ठेपर्यंतची चांगली नावे या हितांना देता येत असली, तरी त्यांची नाळ स्वार्थाशीच जुळलेली असते. याउलट मूल्यनिष्ठेचा संबंध नीतीशी असतो व तिचे नाते बहुधा त्याग या गुणाशी असते... जन्मदत्त निष्ठा व्यक्तीच्या विकासासोबत व प्रबोधनाच्या वाढीसोबत क्षीण होत जातात. मूल्यनिष्ठा मात्र त्या विकासासोबत बलशाली व कायम होतात. दुबळ्या मनांवर व मागे राहिलेल्या समाजांवर जन्मदत्त निष्ठांचा, तर प्रगल्भ मनांवर व प्रगत समाजांवर मूल्यनिष्ठांचा प्रभाव मोठा असतो. आदिवासींचे समाज जमातनिष्ठा धरून असतात, तर प्रगतिशील समाज मूल्यनिष्ठांची कास धरतात... सगळे अरब देश अजून धर्मनिष्ठेच्या जाळ्यात, तर पाश्चात्त्य व प्रगत देश लोकशाही आणि मानवाधिकार या मूल्यांच्या जवळ आहेत. जातीतल्या उमेदवाराला मत देणारे आपले लोक आणि आपल्या वर्णाचाही नसलेल्या ओबामाला मत देणारी अमेरिका यांच्यातला फरकही नेमका हाच आहे.

मूल्यनिष्ठांचा मूलाधार नीती हा आहे आणि तोच सगळ्या जीवनमूल्यांचाही आधार आहे. नीती हा शब्द आपल्या एवढ्या ओळखीचा आणि अंगवळणी पडलेला आहे की, अनीतीचे समर्थनही नीतीच्या बळावर करण्याचा प्रयत्न होत असलेला आपण अनेकदा पाहतो व प्रसंगी तो खपवूनही घेतो. नीतीची समर्पक व यथार्थ व्याख्या अजून कोणीही केलेली नाही. ज्यांनी ती केली, त्यांनाही तिच्या अपुरेपणाविषयीच्या शंका येतच राहिल्या. नीती हा शब्द नय या धातूपासून सिद्ध होतो. तिचा अर्थ नेणे, सन्मार्गाकडे वा सन्मार्गावरून नेणे असा होतो. नीती म्हणजे चांगूलपण, नीती म्हणजे सदाचार, नीती म्हणजे सन्मार्ग आणि नीती म्हणजे सद्‌विचार; हे सर्वमान्य असले तरी हे सारे नीती या मूल्याचे गुणवर्णन आहे, ते नीतीचा अर्थ सांगत नाहीत. एखादा माणूस नीतीमान आहे असे म्हणता येते. पण नीतीमान म्हणजे नेमके   काय, आणि नीती म्हणजे काय हे सांगता येत नाही. नीती ही व्यक्तीएवढीच समाजाची गरज आहे. तिच्या बळावर समाज उभे होतात, जगतात आणि टिकतात. नीती ही त्या दोहोंच्याही जगण्याची तऱ्हा आहे. तिच्यावर त्या जगणाऱ्यांएवढाच इतरांचा असलेला विश्वास तिला बळ देणारा आहे. ‘अ’ हा अमूक स्थितीत असा वागेल आणि ‘ब’ त्या स्थितीत तसाच वागेल हा विश्वास नीती जगवितो आणि समाज टिकवितो. नीती हे मूल्य जगन्मान्य असले तरी साऱ्या जगात त्याचे नियम सारखे नाहीत. ते स्थलपरत्वे भिन्न आणि कालपरत्वे वेगळे आहेत. चांगूलपणा, सदाचार, सद्‌विचार आणि विश्वसनीयता यासारखी नीतीची काही सूत्रे सार्वत्रिक असली तरी तिच्या प्रत्येकच नियमाचे तसे नाही. ते स्थलकालपरत्वे बदलणारे आहेत. चीनमध्ये स्त्रीचे पाऊल दिसणे ही अनीती तर अरबांमध्ये तिचा चेहरा दिसणे ही अनीती आहे. सगोत्र विवाह कुठे निषिद्ध तर कुठे नीतीमान्य आहेत. आदिवासींच्या अनेक जमातीत असणारे विवाहपूर्व लैंगिक स्वातंत्र्य नीतीत बसणारे तर सुसंस्कृत समाजात ते अनीतीचे ठरणारे आहे. खून हा कुठे नैतिक अपराध आहे तर कुठे ‘खून का बदला खून’ ही नीतीही आहे. साऱ्यांना हवी असणारी आणि तरीही स्थलकालपरत्वे भिन्न असणारी ही नीती म्हणजे मग नेमके काय?

नीतीची व्याख्या करण्याचे प्रयत्न अनेक झाले. नीती ही ईश्वरी आज्ञा आहे अशी तिची व्याख्या ईश्वरनिष्ठांनी केली. ईश्वर नित्य, शुद्ध, बुद्ध व स्वार्थातीत असल्याने त्याचा शब्द विवेकाचा असेल आणि तो सर्वांचे कल्याण करणारा असेल असे म्हटले गेले. सारा प्राचीन काळ व मध्ययुग या ईश्वरी नीतीच्या आधारे व तिच्या नियंत्रणात राहिले. ईश्वराचा कोप या जन्माएवढेच पुढच्याही अनेक जन्मांचे अकल्याण करणारा आणि मृत्यूनंतरच्या शिक्षेची तरतूद करणारा असल्याने त्याला आक्षेप घेण्याचे धाडस कोणी केले नाही. ईश्वराचा शब्द त्याला न मानणाऱ्यांनीही प्रमाण मानल्याचे दाखले तत्त्वज्ञांच्या चरित्रात आहेत. सॉक्रेटिसने जनतेच्या न्यायालयात स्वतःचा बचाव करताना डेल्फिच्या देवतेची साक्ष काढली होती. ‘सॉक्रेटिस हा अथेन्समधील सर्वात बुद्धिमान व ज्ञानी माणूस आहे’ हे त्या देवतेचे वचन असल्याचे न्यायालयाला सांगून त्याने आपली बाजू मांडायला प्रारंभ केला होता.

नीतीला ईश्वराची आज्ञा मानणारे लोक नीतीनियमांचे स्थलकालसापेक्ष असणे हे प्रत्यक्ष ईश्वराच्याही स्थलकालसापेक्ष असण्यामुळे आहे हे मनोमन मान्य करीत असतात. हिंदूंचा ईश्वर, मुसलमानांचा अल्ला आणि ख्रिश्चनांचे होली घोस्ट हे त्यांच्या मते भिन्न आहेत. तोराहमधील दैवते आणि बौद्धांचे श्रद्धापुरुष त्यांना वेगळे वाटतात. ईश्वर भिन्न आणि श्रद्धापुरुष वेगळे म्हणून त्यांच्या आज्ञा वेगळ्या आणि मानवी कल्याणासाठी त्यांनी घालून दिलेले नियमही वेगळे असे ते म्हणतात. एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या आदिवासींच्या जमातीतही दैवतांच्या वेगळेपणामुळे वेगळे जीवनाचार असल्याची उदाहरणे आहेत. त्यातून या ईश्वरांचे खाजगी वर्तनही परस्परभिन्न व प्रसंगी परस्परविरोधी राहिलेले आहे. अनेकवार माणसांनी शिरोधार्ह मानलेल्या नीतीमूल्यांच्या ते विरोधातही जाणारे आहे. ग्रीक पुराणातली दैवते, आपल्या काही वैदिक देवता, तोराह व जुन्या करारातील ईश्वरी पुरुष यांची चरित्रे या संदर्भात अभ्यासण्याजोगी आहेत. परिणामी या दैवतांच्या आज्ञेत व प्रभावाखाली असणारे वर्गही परस्परभिन्न व प्रसंगी परस्परविरोधी नीतीनियमांचे आचरण करणारे आहेत. एका धर्माने सांगितलेले आचरणाचे नियम दुसऱ्या धर्मात दुराचरणाचे ठरण्याचीही शक्यता याचमुळे निर्माण झाली आहे. त्याचमुळे ‘ईश्वराच्या आज्ञेनुसार यज्ञाच्या वेदीवर बळी दिलेला पशू थेट स्वर्गात जाणार असेल तर तू तुझ्या बापालाच बळी का देत नाहीस’ असा उद्धट प्रश्न यजमानांना विचारणारे चार्वाक भारतात पुढे झाले. धर्मगुरुची व ईश्वराची इच्छा सांगणाऱ्या ऋषीमुनींची व धर्मवेत्त्यांची कुलंगडी बाहेर आल्यानेही ईश्वरी वाणीचे हे महात्म्य पुढे संपले...

जी गोष्ट ईश्वराची तीच धर्मांची. धर्म ही समाज व व्यक्ती यांचे आयुष्य व्यापून त्यांच्या मागल्या व पुढल्या जन्मांचीही आखणी करणारे व त्या साऱ्यांवर नियंत्रण ठेवणारे बलशाली व सर्वव्यापी व्यवस्थापन आहे. धर्माची आज्ञा म्हणजेच नीती आणि धर्मशुद्ध व नीतीशुद्ध हे शब्द समानार्थी वापरले जावे एवढे अभिन्न. धर्मनियम सनातन आहेत आणि श्रद्धाशीलांच्या मते ते स्वयंसिद्ध आहेत. त्यांच्या संस्थापकांनी त्या सनातन नियमांचे संकलन व संपादनच तेवढे केले आहे. हिंदू धर्म वेदपूर्व असल्याची श्रद्धा हिंदूंमध्ये, तोराहपूर्वीही ज्यू धर्म असल्याची निष्ठा ज्यूंमध्ये आणि बायबल व कुराणाआधीही ख्रिश्चन व मुसलमान धर्म होतेच या श्रद्धा त्या धार्मिकांच्या. धर्म व धर्मग्रंथ अपौरुषेय असण्याच्या श्रद्धेमागचे कारणही हेच. परिणामी धर्माज्ञेचा अवमान हा नीतीतत्वाचा भंग आणि सनातनाचाही अपमान मानला गेला. नीतीचे नियम त्यामुळे पाळायचे ही साऱ्या  धार्मिकांची त्यामुळेच धारणा बनली. त्यामुळे विश्वाचे व्यवस्थापन सुचारू होते, असे मानले गेले...

धर्म अनेक आहेत. त्यामुळे धर्माज्ञांचे संग्रहही अनेक आहेत. जेवढे धर्माज्ञांचे संग्रह, तेवढेच नीतीच्या आदेशांचेही संग्रह- असा हा नीतिबहुल व्यवहार आहे. ईश्वरी आज्ञा सारख्या नाहीत आणि धर्माच्या आज्ञाही समान नाहीत. अशा वेळी सामान्य माणसाला पडणारा प्रश्न त्यांनी सांगितलेल्या बहुविध मार्गांपैकी कोणत्या मार्गाने जावे, हा आहे. धर्मविशेषांच्या अनुयायांना हा प्रश्न पडत नाही; ते आपापल्या धर्माज्ञेप्रमाणे व मानलेल्या ईश्वराच्या हुकूमाबरहुकूमच वागत असतात. धर्मनिरपेक्ष असणाऱ्या व ईश्वर मान्य नसणाऱ्यांसमोरचा तो प्रश्न आहे आणि नीतीच्या खऱ्या स्वरूपाचे आकलन या प्रश्नाच्या उत्तरातून होणारे आहे. उत्तर साधे आहे. नीती हे स्वयंभू मूल्य आहे. त्याला ईश्वर वा धर्माच्या कुबड्या लागत नाहीत. तो विवेकाचा निर्णय आहे आणि विवेक हा जेवढा धर्मातीत तेवढाच ईश्वरनिरपेक्ष आहे. ईश्वर वा धर्म यांची भीती घालून माणसांचे वर्तमान जीवन बांधू इच्छिणारे एक गोष्ट लक्षात घेत नाहीत. नीती ही भीतीतून जन्माला येत नाही. जेथे भीती असते, तेथे नीती नसते. भीतीतून आचरला जाणारा नीतिधर्म खराही नसतो. तो असतो साधा बचावधर्म. नीती हे निर्भयांनी आचरावयाचे मूल्य आहे आणि ते स्वयंपूर्ण व स्वयंसिद्ध आहे... तात्पर्य, नीती हे धर्मनिरपेक्ष मूल्य आहे. मात्र ते धर्मविरोधी वा धर्मबाह्य नाही. धर्म व नीती या समकक्ष बाबी नाहीत, एवढाच याचा अर्थ.

धर्म ही व्यवस्था, तर नीती हे मूल्याचरण आहे. धर्म हे संघटन तर नीती हा विचार आणि जीवनमार्ग आहे. धर्म ही आपल्या कक्षेत येणाऱ्यांना त्याच्या नियंत्रणात राखणारी व त्यासाठी ईश्वरापासून स्वर्ग-नरकापर्यंतच्या असिद्ध बाबींचा आधार घेणारी बाब आहे. नीतीला अशा कोणत्याही आधाराची गरज नाही. जे नियम व वर्तन आपल्या व्यवस्थेशी जुळणारे आणि तिला चालणारे आहे, ते धर्माला मान्य आहेत. नीती मात्र कोणत्याही एका धर्माच्या कवेत येणारे मूल्य नाही. ते सर्व धर्मांना कवेत घेणारे व तरीही धर्माबाहेर उरणारे मूल्य आहे. धर्म न मानणारे व धर्मबाह्य जीवन जगणारेही नीतीची मूल्ये मानतात आणि नीतिमान राहू शकतात. मात्र धर्माची सगळी सूत्रे वा नियम नीतिमूल्यांत बसणारे असतातच, असे नाही. नीतीला मान्य न होणाऱ्या अनेक बाबी धर्मात आहेत. नीतिमान माणूस धार्मिक असू शकेल, पण धार्मिक नीतीमान असेलच असे नाही.

ईश्वर आणि धर्म याखेरीज नीतीचे आधार इतरही अनेक असल्याचे सांगण्याचा प्रयत्न इतिहासात झाला. त्यातला एक आधार समाज हा आहे. ‘ज्यामुळे समाजाचे सर्वोच्च  कल्याण होते तो मार्ग म्हणजे नीतिमार्ग किंवा समाजकल्याण हीच नीती’ असे प्रतिपादन त्यातून पुढे आले. ते समाजमान्य व्हायला अर्थातच वेळ लागला नाही. मात्र समाजकल्याण म्हणजे नेमके काय, ते कशात आहे आणि ते म्हणजे पुन्हा कुणाचे व किती जणांचे कल्याणअसे प्रश्नही त्याच काळात पुढे आले. एका वर्गाने अमुक मार्ग समाजाच्या कल्याणाचा आहे असे म्हटले की दुसरा वर्ग त्या कल्याणाचा दुसराच मार्ग सांगताना दिसला. परिणामी, समाजकल्याण हीच कमालीची व्यापक, अस्ताव्यस्त व कुतरओढ करायला सोपी अशी संकल्पना बनली. या वादंगात नीतीचा अर्थ व प्रत्यक्ष नीतीही हरविली...

प्लेटोच्या संवादातील थ्रॅसिमॅकस म्हणतो, ‘समाजातील समर्थ माणसे करतात तोच न्याय व तीच नीती. ती तुम्हा दुबळ्यांना मान्य होणारी नसली, तरी तुमचा तिच्यापुढे नाइलाज होतो. सबब तीच टिकते व राहते म्हणून नीती ही तीच.’ या प्रतिपादनातले ‘बळी तो कान पिळी’ हे सूत्र उघड आहे व ते नीतिबाह्य आहे. नीतीचा समर्थ वा दुबळे असण्याशी संबंध नाही, तो फक्त ती नीती असण्याशी आहे. तो गुणविशेष नाही, तो मूल्यविशेष आहे. स्वतःला प्लेटोचा शिष्य म्हणविणाऱ्या ॲरिस्टॉटलनेही नीतीची एक व्याख्या केली. ती ‘महाजनो येन गतस्य पंथः’ अशी थेट महाभारताच्या धाटणीची आहे. थोर माणसे ज्या मार्गाने जातात, तो नीतिमार्ग किंवा सज्जनांचा मार्ग म्हणजे नीतिमार्ग असे तो म्हणाला. ॲरिस्टॉटलचा काळ हा अथेन्स या गणराज्याचा शेवट होण्याचा व ग्रीक साम्राज्याचा उदय होण्याचा आहे. आपल्या हयातीत ॲरिस्टॉटलने सॉक्रेटिस व प्लेटोसारख्या तत्त्वज्ञांचा सहवास अनुभवला आहे. शिवाय थेल्स ते पायथागोरस आणि ॲनाक्झिमँडरपासून थेट त्याच्यापर्यंत चालत आलेल्या ज्ञानी माणसांची परंपराही त्याच्यापुढे आहे. तरीही यांतले थेल्स आणि पायथागोरस स्वतःलाच ईश्वर समजत, हे दृष्टिआड कसे करायचे? आणि ॲनाक्झिमँडरने निराशेपोटी ज्वालामुखीच्या विवरात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली, हे तरी कसे विसरायचे? तरीही ॲरिस्टॉटलची व्याख्या जगाच्या अंगवळणी पडल्यासारखी व सर्वत्र उच्चारली जाणारी आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही.

अडचण एकच- ती सर्वमान्य होणारी मात्र नाही. मोठी माणसे चांगल्या मार्गानेच जाणार वा जातील, हे म्हणणेही सापेक्ष आहे. प्रथम ‘मोठी माणसे’ कोणती व ती कोणी ठरवायची, हा प्रश्न. पुढे मोठी माणसेही प्रसंगी घसरतात आणि थेट अतिसामान्यांच्याच नव्हे तर गुन्हेगारांच्या पातळीवर जातात, हे त्यांच्यातील अनेकांच्या चरित्रांवरून दिसते. इतिहासही त्याचा साक्षीदार आहे. दुसरा प्रश्न- थोर म्हणविणारी माणसे अनेकदा परस्परविरोधी दिशांनी व मार्गांनी जाताना पाहावी लागणे, हा आहे. अशा वेळी त्यांतल्या कोणामागून जायचे हा सामान्यजनांना पडणारा प्रश्न आहे. याबाबतीत आपले महाभारत ॲरिस्टॉटलच्या पुढे आहे. ‘मोठी माणसे परस्परविरोधी दिशांनी जात असतील, तर त्यांतल्या कोणाचा मार्ग अनुसरायचा’ या यक्षाच्या प्रश्नाला युधिष्ठिराने दिलेले उत्तर, ‘अशा वेळी माणसाने आपल्या विवेकबुद्धीने आपले उत्तर शोधावे व योग्य मार्ग निवडावा’ हे आहे... मात्र हे उत्तर दिसते तेवढे साधे नाही. विवेकबुद्धी म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशाने स्वच्छ व निर्लेप झालेली बुद्धी असे तिचे स्पष्टीकरण महाभारतातच पुढे आले आहे. अशी बुद्धी असणारी वा प्राप्त केलेली माणसे किती व कोणती, हा मग पुढचा प्रश्न.

अनेक तत्त्वचिंतकांनी नीतीला गृहीत धरले असून ती असतेच; एवढेच नव्हे, तर ती साऱ्यांना ठाऊकही असते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी तिला ऐतिहासिक सत्याचे नाव दिले आहे. तथापि, ही सारी पुन्हा नीतीची गुणवर्णने आहेत, त्या तिच्या व्याख्या नाहीत. नीती हे स्वयंभू मूल्य आहे. तिला ईश्वर वा समाजाच्या कुबड्यांची गरज नाही. समाज वा ईश्वराचा आधार घ्यावा लागला, तर नीती हे मूल्यच अर्धकच्चे व लंगडे होते. मग ते स्वयंपूर्ण राहत नाही. ईश्वराची आज्ञा कोण ठरवितो, हा प्रश्नही अशा वेळी शिल्लक राहतो. नीती ही धर्माज्ञा म्हणावी तर धर्माज्ञाही परस्परविरोधी असतात आणि धर्माच्या आज्ञा याप्रसंगी नीतीविरोधीही असल्याचे आढळते. एकाच देशात व एकाच धर्मात आढळणारी नीतिनियमांची व त्यावर आधारलेल्या नातेसंबंधांची आखणीही परस्परभिन्न आहे... नीती व तिचे नियम याबाबतचा एक वाद आणखीही आहे. एका समाजाने ठरविलेला नीतिमार्ग दुसऱ्याकडून अनीतीचा ठरविला जाणारच नाही, असे नाही. नीती हे सर्वमान्य मूल्य मानले, तर तिचे नियम साऱ्यांना सारखे व सर्व काळात लागू व्हावे लागतील. पण साध्याही गोष्टीत वेगवेगळे समाज वेगवेगळ्या तऱ्हांनी जगताना व तशा जगण्याला नीतीचे आचरण म्हणताना दिसतात.

आदिवासींच्या काही जमातींत मुला-मुलींना लग्नाआधी लैंगिक शिक्षण देणाऱ्या गोटुलसारख्या संस्था आहेत. प्रगत समाजाला हा प्रकार मान्य होणारा नाही. (ज्या जमातीत हे स्वातंत्र्य आहे, त्या या  व्यवहाराला समाजमान्य बाब ठरवितात आणि तिचा त्यांना जराही संकोच वाटत नाही. उलट प्रगत समाजात या बाबी नजरेआड घडत असल्या तरी तो त्याची वाच्यता करणे टाळतो, एवढेच.) हिंदूंमध्ये सगोत्री विवाह निषिद्ध, तर मुसलमानांमध्ये तेच सर्वाधिक पवित्र मानले जातात. महाराष्ट्रात मामा आणि भाची यांचे लग्न नियमबाह्य, तर आंध्रात ते नीतिमान्य आहे.

आपल्यापुढचा विचार येणाऱ्या काळाचा आहे. त्यात धर्म व धार्मिक समजुती दुबळ्या होतील तसे जाती, धर्म, पंथ इत्यादींनी निर्माण केलेले मानवी संबंधही सैल आणि शिथिल होतील. समाजधारणा वा समाजाची मान्यता या गोष्टीही त्यात मागे पडतील. लोकप्रियता हा निकष राहील. मात्र लोकप्रियता मिळविण्याचे मार्ग अनेक आहेत आणि त्यांत नीतीच्या मुखवट्याचाही एक मार्ग आहे. ‘राजाने सिंहासारखे दिसावे, पण कोल्ह्यासारखे असावे’ असे कौटिल्य म्हणतो. त्याने राजासाठी एक व प्रजेसाठी दुसरीच नीती सांगितली आहे. ज्यातून राज्य म्हणजे सत्ता बळकट होते, तो राजाचा नीतिधर्म आणि ती ज्यातून दुबळी होते, तो त्याचा अनीती मार्ग असे तो म्हणाला. मात्र नीती हे मूल्य नीतीला पर्याय असतो हे मान्य करीत नाही. म्हणून कौटिल्याला त्याच्या याच नीति व्यवहारासाठी इतिहासाने कुटील म्हटले आहे.

नीतीची समाजसापेक्ष नियमावली असते. ती कायदा वा व्यवस्था नसते. तीत धर्म असला तरी धर्मात ती असतेच, असे नाही. त्याहून महत्त्वाची बाब, ती सार्वत्रिक वा सनातन नाही म्हणून ती खरीही नाही... नीती ही समाजाची लहर (व्हिम) आहे, असे तिचे वर्णन आयन रँड या तत्त्वचिंतक व प्रतिभाशाली लेखिकेने केले आहे. ती समाजासोबत असेल वा असणार नाही. तिच्यामुळे समाज टिकतील, असेही नाही. पण समाजातील मोठ्या वर्गाला आवडते आणि म्हणूनच बहुधा ती हवीही असते, असे तिने म्हटले आहे. नीतीची जगन्मान्य अशी एक व्याख्याही त्याचमुळे होऊ शकत नाही असे ती म्हणते. लहर वा मर्जीची व्याख्या नाही, तशी मग नीतीचीही व्याख्या नाही. असेच मोठे उदाहरण द्यायचे तर सार्वभौम सत्ता वा राष्ट्र या संकल्पनांचे देता येईल. या संज्ञांच्याही सर्वमान्य होतील अशा व्याख्या राज्यशास्त्राला अजून करता आल्या नाहीत. तरीही त्या नीतीसारख्याच जगाला भावतात आणि जगभर त्यांचा साभिमान उच्चारही केला जातो. नीती हे एकाच वेळी सामाजिक व व्यक्तिगत मूल्य आहे आणि त्याचा संबंध कृतीएवढाच मनोव्यापाराशी आहे. त्यातही कृतीहून मनोव्यापाराशी असलेला त्याचा संबंध अधिक महत्त्वाचा आहे आणि तसाच तो समाज व कायदा यांनी मान्य केला आहे. कोणत्याही अपराधामागचा, तो करणाऱ्याचा हेतू तपासून पाहण्याची न्यायालयांची कार्यपद्धती यातूनच निर्माण झाली आहे. गुन्हा कोणता हे जेवढे महत्त्वाचे,  त्याहूनही तो का झाला हे तेथे अधिक महत्त्वाचे ठरते आणि हेतू चांगला असेल, तर प्रत्यक्ष गुन्ह्याकडे सहृदयतेने पाहिलेही जाते...

माणूस दिवसेंदिवस व्यक्तिकेंद्री होत गेला तरी समाजशील असण्याची वा राहण्याची त्याची धारणा क्षीण स्वरूपात का होईना शिल्लक राहील व सर्व काळात नसली तरी क्वचितप्रसंगी वा एकांतातही ती जागी होत राहील. गरज हाच तिचा एकमेव आधार नाही; वृत्ती हेही तिचे एक कारण आहे. आपली उपलब्धी सांगावी, आपले दुःख वाटून घ्यावे वा काळजी बोलून दाखवावी, या समर्थ व स्वयंपूर्ण माणसांनाही होणाऱ्या इच्छा आहेत. दुसरीकडे समाज ही दिवसेंदिवस पातळ व विरळ होत जाणारी बाब असली, तरी तशी होताना ती जास्तीची पसरट व समावेशकही होत जाणारी आहे. समाजाचा आकार बदलेल, पण त्याच्या कडा धूसर का होईना शिल्लक राहतील. स्वयंसंतुलन (ऑटो बॅलन्सिंग) हा समाजाचा क्वचितच कधी चर्चिला जाणारा पण महत्त्वाचा गुणधर्म अशा वेळी प्रबळ होईल. सारे सामावून घेताना व स्वतः पसरट होत जातानाही तो निराकार होणार नाही. रंग, रूप, आकार व वजन असे सारे बदलले तरी तो राहील आणि तो तसा राहिला असल्याचे जाणवतही राहील. पहिला क्रमांक मिळाल्यानंतर वा नोबेल मिळविल्यानंतरही त्या यशाचे खरे वा खोटे गमक सांगण्याचा मोह अनेकांना होताना आपण पाहतो. नीतीचे अस्तित्व यातून टिकेल. किंबहुना, जात व धर्मासारख्या जन्मदत्त व्यवस्था गेल्या तरी तिचे मोल कायम राहील. कारण ती व्यवस्था नाही, ती मूल्यस्वरूप आहे.

या काळातल्या नीतीच्या वर्तनाला धर्माच्या मान्यतेची, जातीच्या संमतीची, समाजाच्या आवडीची वा ईश्वराच्या मानलेल्या आशीर्वादाची गरज नसेल. माणसांच्या लेखी या गोष्टी निरर्थक म्हणून तेव्हा संपल्याही असतील. संबंधित व्यक्तीच्या मनाचा, विचाराचा, निर्णयाचा व विवेकाचाच तेवढा आधार नीतीला असेल. तेवढी मान्यता तिला पुरेशीही होईल. धर्माने यक्षाला दिलेल्या उत्तरातला विवेकाचा कौल असा अवतरेल. हा कौल व्यासाचा वा महाभारताचा नाही. प्रत्येकाच्या मनाचा व बुद्धीचा आहे. प्रश्न हा की, एवढा विवेक प्रत्येकाजवळ असेल की नसेल? आणि माणसाच्या मनाची चंचलता त्याला दर वेळी विवेकाचा कौल मागू देईल काय? या प्रश्नाचे उत्तर विजेचे बटण दाबावे आणि सारा अंधार उजळून जावा तसे लख्खकन वा एका क्षणात मिळणार नाही. असे बदल उत्क्रांतीतून येतात व उत्क्रांती हा विलंबाचा पण विश्वसनीय व्यवहार आहे. समृद्धीमुळे गरजा पूर्ण झाल्या असतील व गरजपूर्तीमुळे फसवेपण व तशा तऱ्हेचे इतर अपराधही कमी झाले असतील. मी स्वयंपूर्ण जगतो, तसा पुढचा माणूसही स्वयंपूर्ण जगतो. त्याला माझे वा मला त्याचे काही घेण्याची गरज नाही, ही भावनाच माणसात सुरक्षितता आणील व तीच पुढे व्यक्ती-व्यक्तीतील समांतर पण विश्वासाचे संबंध वा वेगळेपण कायम करील. या संबंधांचे स्वरूप आजच्यासारखे पुढाकार घेणारे (प्रो- ॲक्टिव्ह) नसेल, ते अंतरांचे असेल. त्यात अपेक्षांना स्थान नसेल. त्यात स्नेहाचा भाग असेल वा नसेलही.

माणसांच्या माणूस म्हणून असलेल्या गरजा मात्र न संपणाऱ्या आहेत. त्यांच्या पूर्तीसाठी त्याला असे संबंध राखणे भाग आहे. मात्र उद्याचे संबंध आजच्या संबंधांहून वेगळे राहणार आहेत. घर, कुटुंब, जात, वर्ग इत्यादींच्या मर्यादा सांभाळून व प्रसंगी राजकीय वा वैचारिक साम्यांमुळे आज दिसणारे संबंध समाजव्यवहाराच्या क्षीणतेसोबत क्षीण होतील. त्यांची जागा व्यक्ती-व्यक्तीतील संबंध घेतील आणि हे संबंध केवळ नीतीचे असतील. गांधीजी स्वतःला धार्मिक म्हणवत. भगवद्‌गीता हा त्यांना प्राणग्रंथ वाटे. पण मग ते अल्लालाही ईश्वराच्या बाजूला बसवीत. ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ म्हणून त्या अज्ञाताला आळवीत. कुराण आणि बायबलातली शिकवणही आपली म्हणून सांगत. त्यांच्या उपदेशाचा व शिकवणुकीचा भर हिंदूंवर वा मुसलमानांवर नसे. जगभरचे सगळे संत एकूणच मानवजातीच्या कल्याणाची प्रार्थना करतात. ज्ञानेश्वर त्याचे पसायदान हिंदूंसाठी मागत नाही, दुरितांसाठी मागतो आणि तुकोबाही अख्ख्या माणूसजातीच्या भल्याचे अभंग लिहितो. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, हा कोणत्याही एका धर्माचा सांगावा नाही; ती मनुष्यधर्माची शिकवण आहे आणि ती धार्मिक असण्याहून नैतिक अधिक आहे. मुळात कोणताही धर्म त्याच्या अनुयायांसाठीच तेवढा नसतो, तो साऱ्या मानवमात्रांसाठी असतो. वैदिक धर्माचे जागरण हे जसे मानवजातीसाठी होते, तसेच ते इस्लामचेही होते. साऱ्या जगाचा उद्धार आणि मानवमात्रांचे कल्याण हाच सगळ्या धर्मांचा मूळ हेतू असतो. त्याचे चाकोरीकरण त्याच्या संघटित स्वरूपात नंतर येते. येशू साऱ्यांचा असतो व साऱ्यांसाठी असतो. तसे चर्चचे नाही. जोवर सारी मानवजात एका कल्याणसूत्रात येते, तोवर ते नीतीचे असते. ते चाकोरीबद्ध झाले की, धर्म नावाच्या संघटनेचे होते.

जन्मतः सारेच जण संस्कारहीन असतात. ते नीतिमान वा  नीतिशून्य नसतात. नीती संस्कारांतून येते व रुजते. परवापर्यंत हे काम कुटुंब करायचे, समाजही ते करायचा. तेव्हाच्या पिढ्या जुन्यांचे ऐकायच्या. एकत्र कुटुंबपद्धतीत हे ऐकणे पिढ्यान्‌पिढ्या चालायचे. आता सारे बदलले आहे. मुलांना आई-वडिलांखेरीज दुसरा शेजार नसतो व शाळेत जाऊ लागताच त्यांचा तोही आधार कमी होतो आणि बऱ्याच ठिकाणी तो संपतोही. निवासी शाळा वा होस्टेलमध्ये राहणारी मुले कुणाचा संस्कार घेतात? मित्रांचा, संबंधितांचा, शाळेचा, वॉर्डनचा की आणखी कोणाचा? तो कितपत पुरेसा असतो? ही मुले स्वतःच आपले बरे-वाईट ठरवतात व मार्गक्रमण करतात... ज्या देशात एकट्याने जगण्याची पद्धत रूढ झाली आहे, तेथे या प्रश्नांची उत्तरे आणखी वेगळी शोधावी लागतात. एकट्याने वाढणारी मुले चांगलीही निघतात. एकलव्य हे त्याचे एक उदाहरण. ही मुले वाईटही निघू शकतात... कुटुंबात राहून मोठी झालेली मुलेही चांगलीच असतील याची तरी खात्री कुठे देता येते? कौरव मोठ्या तर पांडव लहान कुटुंबात होते. जर्मनीचा विली ब्रँड हा नोबेलविजेता पंतप्रधान अनाथाश्रमात वाढला. हिटलरही असाच एकटा वाढला. संस्कार हा शेवटी शक्यतेचाच विषय आहे, तो खात्रीचा नाही. येथे संस्कारांचे मोल कमी लेखायचे नाही. मात्र त्याचे स्तोम माजविण्याने व्यक्तिगत निर्णयक्षमतेची होणारी हानी कमी करणेही गरजेचे आहे.

माणूस समूहकेंद्री असो वा व्यक्तिकेंद्री- त्याला आत्मसंरक्षणासाठी व आत्मसन्मानासाठी नीतीची गरज राहील. तो ज्या देशात, वर्गात, भूभागात वा समुदायात राहील, त्यातील माणसांच्या चांगुलपणाविषयीचा विश्वास ही त्याची गरज असेल. ही माणसे चांगली वागतील आणि आपल्याला चांगले वागवतील, हा समजच त्याला जीवनावश्यक स्वस्थता लाभू देईल... उद्याचा समाज असा असेल. तो समृद्ध व संपन्न असेल. त्याच्या मूलभूत गरजा भागल्या असतील. त्याचे परावलंबन संपले असेल आणि त्याला इतरांकडून काही घेणे-देणे नसेल.

आपल्याविषयीचा सन्मान, समज आणि मान्यता एवढ्यावर त्याचे समाधान होईल. प्रगत व समृद्ध समाज असे असतील. ते आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण असतील. त्यातली माणसे परस्परांविषयीच्या सन्मानाने जगणारी असतील. समाजाचे जे वर्ग सन्मानापासून वंचित होते, तेही मग सन्मानाने जगू लागतील. अनेक जागी त्यांना तो सन्मान देण्याचे प्रयत्न आता होताना दिसतही आहेत. कृष्णवर्णीयांचा सन्मान अमेरिकेत वाढला. ‘निगर’ म्हणून हिणविली जाणारी ही माणसे तेथे प्रतिष्ठेने जगू लागली. समलिंगी संबंध ठेवणारेही आपल्याहून वेगळे नाहीत, हा समज वाढताना दिसला आणि माणसा- माणसांतील संबंधांचे स्वरूप ‘वरचे व खालचे’ असे न राहता समान पातळीवरचे होऊ लागले. हा परस्परांविषयीच्या विश्वासाचा परिणाम आहे आणि तो प्रत्येकाला असलेल्या नीतीच्या गरजेमुळे आला आहे. विश्वास ही गरजच नाही, ती प्रेरणा आहे आणि तेच सामर्थ्यही आहे. नीती हा त्याचमुळे उद्याचा धर्म आहे...

Tags: मूल्य चार्वाक ईश्वरनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष कौटिल्या आयन रँड अँरिस्टोटल प्लेटो महाभारत मुस्लीम हिंदू हिटलर बराक ओबामा नोबेल जर्मनी विली ब्रंड नीतिमान समाज विवेक धर्म सुरेश द्वादशीवार नीती मन्वंतर Muly Charwak Ishwarnirpeksh Dharmnirpeksh Koutilya Ayn Rand Aristotle Plato Mahabharat Muslim Hindu Hitlar Barac Obama Nobel Germany Willy Brandt Nitimaan Samaj Vivek Dharm Suresh Dwadashiwar Niti Manvantr weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात