Diwali_4 व्यक्ती
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

रशियात मार्क्स सत्ताधारी बनला. पुढे चीनमध्येही तो सत्तेवर आला. त्याच्या सत्तेने त्याला नको असलेली माणसे व वर्ग मारले आणि संपविले. मात्र त्या प्रक्रियेत जे भरडले जाऊ नयेत, तेही भरडले. वणवा लागला की वाळल्याबरोबर ओलेही जळते. म्हणून त्या प्रकाराकडे सहानुभूतीने पाहणाऱ्यांनी त्याचीही भलावण केली... पण दीडशे वर्षातच मार्क्स मोडीत निघाला. त्याची क्रांती हे थोतांड असल्याचे त्याच्याच अनुयायांनी सांगायला सुरुवात केली. प्रथम रशियाने व नंतर चीनने त्याचे तत्त्वज्ञान झुगारले, त्याचे पुतळे हटविले आणि त्याच्या अनुयायांच्या पुतळ्यांना चक्क मूठमातीही दिली. 

येणारे जग व्यक्तींचे असेल, समूहांचे नसेल. कुटुंब, वंश, वर्ण, जात, पंथ, धर्म आणि देश या समूहाधारित संस्था व त्यावर आधारलेल्या सगळ्या परंपरा, चालीरीती, रुढी, समजुती व सगळेच समूहाधारित व्यवहार क्षीण होत जाऊन कालांतराने नाहिसे होतील. व्यक्तीचे समष्टीवरचे अवलंबून असणे संपले असेल व ती स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर बनली असेल. त्या प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. दुबळी मानसिकता आधार शोधते आणि सबळ माणसे स्वावलंबी होतात. व्यक्ती परावलंबी असली की समष्टी बलवान होते मग तीत ईश्वर, धर्म, राज्य, कुटुंब व तसल्याच इतर संरक्षक संस्था जन्माला येतात.

व्यक्ती स्वयंपूर्ण झाली आणि तिचे परावलंबन संपले की या साऱ्या व्यवस्था धूसर होत पडद्याआड जातात. स्वयंपूर्ण व्यक्तींचा परस्परसंबंध त्यांची जागा घेतो. तो आजच्यासारचा समष्टीरूप वा संस्थासंबंद्ध नसतो. तो व्यक्तीकेंद्री व व्यक्तींचे इतरांशी बरोबरीचे संबंध जपणारा समुदायच होतो. व्यक्तीला हवे ते त्यात टिकते बाकी सारे असूनही परिणामशून्य होते. असा नवा समाज कसा असेल? त्यातल्या व्यक्तींचे परस्परसंबंध कसे असतील आणि त्यात व्यवस्थापन नावाची गोष्ट असेल की असणार नाही?... आणि असलीच तर ती कशी असेल?... व्यक्तींचे राग-लोभ आणि विचारविकार व्यक्तिगत असतील. त्यामुळे त्यांचे मैत्र व विरोधही कमालीचे मर्यादित व स्थानिक असतील. समूहांची, समाजांची वा देशांची आज असणारी युद्धे त्यात असणार नाहीत. संबंधही समूहांचे नसतील, व्यक्तींचे असतील आणि व्यक्ती फारतर भांडण करू शकते युद्ध लढवू शकत नाही...

स्वयंपूर्ण व्यक्तींच्या परस्परसंबंधांचा व्यवहार असा अस्तित्वात येईल. उद्याच्या जगातला माणूस स्वयंपूर्ण असेल आणि तसा असल्यामुळे तो एकाकीही असेल. स्वयंपूर्ण होत जाणारी माणसे, कुटुंबे आणि समाज हे परावलंबी नसल्यामुळे आणि संपूर्णतः स्वावलंबी असल्यामुळे तसेही एकाकी होत असताना आपण आज पाहत आहोतच. उद्या त्यांच्या वाट्याला येणारे हे एकाकीपण तापदायक वा जीवघेणे असेल की समाधानाचे आणि आनंददायी असेल?... त्या जीवनात त्याच्या सर्व भौतिक गरजा या काळात झालेल्या व पुढे होणाऱ्या आर्थिक व औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीमुळे पूर्ण झाल्या असतील. नुसत्या पूर्णच नव्हे तर आताच्या प्रगत विज्ञानाने त्या त्याच्या हातातोंडाशी आणून ठेवल्या असतील. विज्ञानाच्या साधनांनी सगळी कामे स्वतःकडे घेतल्याने व्यक्तीची व प्रसंगी समाजाचीही प्रत्यक्ष कामाची गरज संपली असेल. हे जीवन मागे वळणारे वा मागे वळून पाहणारे असणार नाही. ते समोर वा वर पाहणारे असेल, कदाचित तेच खरे जीवनही असेल...

प्लेटो म्हणाला जे पूर्ण असते  तेच सत्य आणि जे अपुरे असते ते असत्य. त्या हिशेबाने आजचे जीवन अपुरे, तर उद्या येणारे ते जीवन पूर्ण असेल. आजवरचे जगणे जिवंत राहण्यासाठी, अन्नासाठी, पाण्यासाठी, निवारा आणि सुखोपभोगांच्या उपलब्धीसाठी होते; पुढचे जगणे केवळ जगण्यासाठी असेल... बाहेर न पाहता ते आत पाहण्यासाठीही असेल. समूहांच्या मागे वा त्यांच्यासोबत न जाता स्वतःसोबत राहण्या-जगण्यासाठी आणि जमलेच तर स्वतःचा शोध घेण्यासाठी असेल... गांधी म्हणाला, मार्क्स समाजापाशी सुरू होऊन व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो; मी व्यक्तीपाशी सुरू होतो आणि तिच्याचजवळ पोहोचत व थांबत असतो. उद्याचा माणूस समाजाच्या, समूहाच्या, वर्ग वा जाती-धर्मांच्या कुबड्यांवाचूनचा असेल. त्याच्यावर त्यांनी आणलेल्या सर्व निर्बंधांपासून मुक्त असेल आणि त्याच वेळी तो त्या साऱ्यांहून उंचही झालेला असेल... त्याला यशस्वी वा मोठे ठरवायला आपले निकष लागू पडणार नाहीत...

आज माणसांचे यश त्यांच्या उपलब्धीतच शोधले जाते. भौतिक, आर्थिक, ज्ञानविषयक, नैतिक आणि लोकप्रियतेच्या मापदंडांवर ते मोजले जाते. ते नेहमी दुसऱ्या कोणाच्या वा कशाच्या तरी संदर्भात तोलले व पाहिले जाते. मागे किती राहिले, पुढे कोण उरले, किती उंची गाठली आणि किती पायऱ्या अजून चढायच्या राहिल्या- असे सारे दुसऱ्यांच्या संदर्भात... पण समाज व समूहांचे म्हणजे दुसऱ्यांचे हे संदर्भच उद्याच्या जगात नसतील तर आणि त्या जगात माणसाने निसर्गावरही मात केली असेल, तर? त्या जगात माणसाला कोणाशी व कशाशी जुळवावे लागेल? देहाशी, मनाशी, बुद्धीशी आणि असलाच तर सजीवपण नावाच्या आत्म्याशी...?  हा प्रवास बाहेर जाणारा वा बाहेरचा असणार नाही. तो बाहेरून आत जाणारा असेल. या प्रवासात दुसऱ्या कुणाची साथ हवी असते? की, ती नकोच असते?... हा प्रवास सुखरूप व्हायचा असेल वा तो तसा झाल्याचे जाणवायचे असेल तर तसे जाणवून देणारी ही साथ कुणाची असते, कशाची व कशी असते? किंवा ती कशी असू शकेल वा असावी? ‘मन केले ग्वाही’ अशी, की आणखी कशी?

...मात्र या समस्या आजही आहेत. देहाशी जुळविण्याच्या, मनाला मारण्याच्या, बुद्धीला उत्तरे देण्याच्या आणि सजीवपण सानंद बनविण्याच्या. या समस्या नंतरही राहणारच असतील, तर मग हा प्रवास कशासाठी? हा प्रवास न संपणारा असतो काय? की, प्रवास हेच आपले जगणे असते? ज्याला अंतिम ध्येय वा सत्य वगैरे म्हणायचे ते खरेच काही असते, की तोही एक मागाहून उलगडणारा भ्रमच असतो? हाती आलेल्या आणि खऱ्या वाटलेल्या सत्याच्या पलीकडे काही उरते वा असते की नाही, की तोच साऱ्याचा शेवट असतो? पण तेच सततचे, निरंतर, अखंड आणि अनादिअनंत असेल; तर ते सुरू कसे होणार आणि संपणार तरी कसे आणि कुठे? जगभरची सगळी तत्त्वज्ञाने इथे येऊन का थांबतात? की, तो त्यांचाही शेवटच असतो? ज्ञानाला मर्यादा असते, ही बाब कोणताही ज्ञानमार्गी वा बुद्धिवादी मान्य करणार नाही. ते त्याचे अढळपण खरे असते, की ती त्याची मुजोरीच असते? ज्ञानी म्हणविणारी वा ज्ञान प्राप्त झाल्याचे ज्यांच्याविषयी सांगितले गेले ती माणसेही चळलेली इतिहासाने पाहिली आहेत. अगदी परमेश्वर म्हणविणारेही याला अपवाद राहिले नाहीत... मग जे उरते ते काय आणि उरतच नसेल, तर अनादिअनंत तरी काय?

मला आहेत ते सारे विचार व विकार मी ईश्वर मानले गेलेल्यांत पाहतो. साधू-संत आणि ऋषी-मुनींदेखील या जंजाळांपासून मुक्त नसतात. मग सारे काही मागे टाकून जेथे आणि ज्यांच्याजवळ पोहोचायचे, तिथे हाती यायचे असते तरी काय? आणि तिथे पोहचणे हे आनंददायक तरी कसे असेल? तिथे पोहोचता आले तरी तिथे काम कोणते असेल? आणि त्यात मिळवायचे तरी काय असेल?  एक आणखी प्रश्न- तो नुसता अभाव असतो काय? पण मग अभाव हे ध्येय वा साध्य कसे असू शकेल?... तो स्वभाव असतो काय? पण मग तो आताही आहेच. ती गती असते काय? ती आता आहे, नंतर आहे आणि तशीच ती तिथे पोहोचल्यानंतरही राहणारच आहे. गतीचे एक शास्त्र आहे. ती फारच शक्तिशाली बनली की स्थिर वाटू लागते. तसे तिथे होत असावे काय?... आणि तिथे पोहोचल्यावरही एवढे प्रश्न शिल्लक राहतच असतील तर तिथे जायचे तरी कशासाठी?...

पण माणसे गेली. जातात. ‘गेलेली’ मोठी होतात. ‘पोहोचलेली’ वंदनीय होतात... की हे पोहचणे वा वंदनीय होणे हे सारे सापेक्षच असते?... आम्हाला वाटले म्हणून वा आम्ही ठरविले म्हणून. खरेच आपण कुठे जातो वा पोहोचतो काय हा प्रश्न आहे. पोहोचल्यासारखे असतात वा तसे पोहोचल्याचे सांगतात त्यांना तरी तसे खरोखरीच वाटत असेल काय? आणि ते तसे असतात काय?... एखाद्या ब्रह्मर्षीला कुत्र्याचे हाडूक खावेसे मग का वाटते? किंवा एखाद्या परमकारुणिकाला त्याच्या आजारपणातही डुकराच्या मांसाचा मोह का होतो? आपल्या ब्रह्मचर्याची परीक्षा घेतलीच पाहिजे, असे एखाद्या महात्म्याला का वाटते आणि  गुरुदेव वगैरे असणाऱ्यांना अविश्वसनीय वाटावेत असे विकार का खुणावतात?

श्वेताश्वतरोपनिषदात एक सूक्त आहे. ‘एकोहम्‌ बहुस्यात’.  मी एक आहे आणि मला बहुविध वा सारे काही व्हायचे आहे. या बहुविधतेत वा साऱ्यांत चांगल्यासोबत वाईटही असते की नाही? त्यातले काही एक नसेल, तर ते पूर्ण तरी कसे होईल? आणि नसेल, तर ते अपूर्णच ठरेल की नाही? ही स्थिती उपनिषदातल्या अपेक्षेच्या पूर्तीनंतरची असेल; तर ज्यांनी उपनिषदांना हातही लावला नाही, ती माणसे त्याहून वेगळी वा कमी का लेखायची असतात?...

नवे विचार जन्माला येत नाहीत आणि जुने कालबाह्यही झाले आहेत. आताचे चॉम्स्कीसारखे नवतत्त्वचिंतकही सांगता-लिहितात ते भाषाविषयक, शब्दविषयक वा शब्दांच्या अचूक वापराविषयीचे. त्याचे मोल कमी नाही. पण समाजजीवनावरचा त्याचा परिणाम नगण्य ठरणारा व म्हणूनही कदाचित अज्ञात राहिलेला असावा. कारणे अनेक आहेत. जुन्यांना त्यांच्या प्राचीन चौकटी सोडवत नाहीत आणि त्यांतले जे विचार करू शकतात, त्यांना जुन्या आचारांतून सवड मिळत नाही. पुढ्यातला आचार एवढा अंगवळणी पडलेला, आवडलेला, गुंतवणारा, संरक्षण देणारा आणि सर्वव्यापी की- त्यात गुंतून राहणे हेच त्यांना पुरेसे वा निधान वाटते... ही स्थिती आहे त्या वास्तवाची मांडणी करण्याची व तीतच तिची उत्तरे शोधण्याची... एक गोष्ट आणखीही नमूद करण्याजोगी- ज्याला विचार मानले, विशेषतः गेल्या काही दशकांत विचारसरणी म्हणून जिला डोक्यावर घेतले, ते सारे विधायक होते की प्रतिक्रियेच्या स्वरूपातले? ती वाटचाल होती, की रस्त्याच्या कडेने नुसतेच भरकटणे होते? सरळमार्गी रीत होती की ओढाताण?... विधायक वाटचालीत एक समग्रपण असते. ती साऱ्यांचा व साऱ्यांना कवेत घेणारा विचार करते. मध्यंतरीच्या काळात जन्माला आलेले विचार असे होते काय? ते वर्गांचे, समूहांचे, गर्दीचे, व्यक्तिविशेषाचे, एकारलेले, टोकाचे वा स्वतःखेरीज इतरांना नाकारणारे व विचारांच्या गणितातून वजा करणारे होते काय? आज जे सामाजिक पर्यावरण आपण पाहतो; त्यात विधायक किती, मध्यवर्ती किती, प्रतिक्रियेचे किती, टोकाचे किती आणि टाकाऊ किती? ही सगळी देन गेल्या दोन शतकांची आहे...

समाजाचा सामग्ऱ्याने विचार करण्याची पद्धत व दिशा आपण कधी सोडली, ती कुणी सोडायला लावली आणि ज्या कोणी ती सोडायला लावली त्याचे समाजाला देणे काय आणि त्याने समाजाचे केलेले उणे काय?

मार्क्स हा असा पहिला माणूस आहे... कष्ट करणारे, घाम गाळणारे, श्रम विकणारे आणि त्याच्या मोबदल्यात गुजराण करणारे म्हणजेच लोक, म्हणजेच समाज, म्हणजेच जनता आणि म्हणजेच जग- असे तो म्हणाला... मार्क्सच्या विचारांचा प्रभाव तब्बल दोनशे वर्षे टिकला. नुसता टिकलाच नाही, तो अमलात आणणाऱ्या राजवटी जगात अस्तित्वात आल्या. त्यांनी मार्क्सला नको असलेले वर्ग नष्ट केले वा तसे करण्याचा प्रयत्न केला. वर्गहीन समाज उभा करण्याचा किंवा तेव्हाचा उभा समाज आडवा करून एका समांतर परिप्रेक्ष्यात आणण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी ती क्रांती मानली. तशी काही प्रमाणात ती होतीही. कारण तोवर वंचित असलेले वर्ग त्यामुळे सारे मिळवू शकले नसले, तरी आपल्याला ते मिळेल अशा स्वप्नाच्या जवळ आले. रशियात मार्क्स सत्ताधारी बनला. पुढे चीनमध्येही तो सत्तेवर आला. त्याच्या सत्तेने त्याला नको असलेली माणसे व वर्ग मारले आणि संपविले. मात्र त्या प्रक्रियेत जे भरडले जाऊ नयेत, तेही भरडले. वणवा लागला की वाळल्याबरोबर ओलेही जळते. म्हणून त्या प्रकाराकडे सहानुभूतीने पाहणाऱ्यांनी त्याचीही भलावण केली... पण दीडशे वर्षातच मार्क्स मोडीत निघाला. त्याची क्रांती हे थोतांड असल्याचे त्याच्याच अनुयायांनी सांगायला सुरुवात केली. प्रथम रशियाने व नंतर चीनने त्याचे तत्त्वज्ञान झुगारले, त्याचे पुतळे हटविले आणि त्याच्या अनुयायांच्या पुतळ्यांना चक्क मूठमातीही दिली.

नंतरच्या काळात मार्क्सचे समांतर अवतार जगात निघाले आणि तसे ते निघणे स्वाभाविक होते. वंचितांचे वर्ग ही सार्वत्रिकता होती. ते जगभर होते. जिथे श्रीमंती आणि वैभव होते तिथे तर ते होतेच, पण जिथे संपत्तीचा मागमूस नव्हता तिथेही ते होते. धनवंतांच्या जगात ते दरिद्री होते आणि दरिद्री समाजात ते अवमानित होते. त्यांतल्या काहींची वंचना खरी, भौतिक व वास्तवातली होती; तर अनेकांची भ्रामक, मानसिक व कल्पनेतली होती. दुःख मात्र साऱ्यांचे सारखेच होते...

आता या घटकेला मी एका दांपत्याच्या सहवासात आहे. ते उच्च-मध्यम वर्गात जमा होणारे. त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत. मुले विदेशात आहेत आणि त्यांना मिळणारे वेतन यांच्या मोजण्याबाहेरचे आहे. त्यातल्या एकाने अडीच कोटींचा बंगला घेतला आहे आणि त्याच्याजवळ 50 लाखांच्या गाड्या आहेत. दुसरा भारतात असला तरी दरमहा युरोपच्या वाऱ्या करतो. मोठ्या शहरात घर असलेला, पत्नीला नोकरी मिळालेली आणि तोही मुलांसह आनंदात जगणारा... या दांपत्याचे दुःख वेगळे आहे. कधी नव्हे ते सारे   आहे, पण ते भोगायची क्षमता नाही. मुले दूर आहेत, घर रिकामे आहे, डॉक्टर खाऊ देत नाही, आजार पचवू देत नाही आणि इच्छा व वासना मरत नाहीत. बार्इंचे आणखी वेगळे. त्या पदवीधर आहेत, समाजात वावरतात; मात्र त्यांचा नवरा समाधानी नाही आणि त्याच्या कुरकुरींना अंत नाही... हे कोणा एका मध्यम वर्गीय कुटुंबाचे वर्णन नाही, ते अनेकांना लागू होणारे आहे. ते तसे नाही हे दाखविणारे फार आहेत, पण त्यांचे फसवेपण लपूनही राहणारे नाही.

दुसरे एक दांपत्यही असेच. मुले-मुली उच्च शिक्षित. ते दोघेही चांगल्या निवृत्तिवेतनावर. घर मोठे. पण आपण कधी तरी दलित होतो, तेव्हाची दुःखे आठवत नाहीत. ती आजोबांनी आणि कदाचित वडिलांनी अनुभवलेली. आपण सुखात वाढलो, दलितत्वाचे लाभच तेवढे आपल्या वाट्याला आले, ते भोगले आणि भोगतोही. पण मग ती सल कायम राहते. ‘गेल्या पाच हजार वर्षांत झालेला’ अवमान आणि उपेक्षेची, छळाची आणि अस्पृश्यतेची आच ती नाही. तिची व्यथाही नाही. पण ती नाही याचेच एक दुःख आहे. मग ते सारे कल्पनेने आठवायचे आणि त्यावर मनोन कवने रचायची. त्यावर बोलायचे, लिहायचे, प्रसंगी व्याख्याने द्यायची... पण ते सारे करताना जाणवते ते म्हणजे, ही तर हवेतली हवा. यातले आता काही खरे नाही... पण हे असेच खोटे लिहिले पाहिजे. ते टिकविण्यातच आपले वेगळेपण आहे...

एक महिला कर्मचारी. तिचा पगार पुरेसा. नवरा बाहेरगावी राहणारा. पगारी. सन्मान वगैरे सारे आहे. अडचण नाही. पण अभाव अनुभवते. गैरसमज नको, हा अभाव सार्वत्रिक आहे. सारे असून काही नसल्यासारखा... एक आणखी अनुभव यात आणण्यासारखा. ते दांपत्य मुसलमान आहे. तो एका मान्यताप्राप्त सरकारी हायस्कूलच्या  मुख्याध्यापकपदावरून निवृत्त. ती पदवीधर. घरी एक खासगी शाळा. तीत चारशेवर विद्यार्थी. तिचे माहेरही सुस्थितीतले. तिला हवे ते पुरविणारे. मुलगी सुरेख. पण जरा डोक्यात हवा असलेली आणि मुलगा देखणा, उंचापुरा, भरदार. पण त्याला मौलवी व्हायचे... साऱ्या घरावर आपण निराधार असल्याचे सावट. अल्लामियाँ काहीएक ऐकून घेत नाही, याचेच दुःख. अजमेरच्या ख्वाजालाही एवढ्या यात्रांनंतर पाझर फुटत नसल्याची खंत... हवे ते सारे आहे, पाहिजे ते मिळणारे आहे, वंचना नाही, अभाव नाही आणि तरीही काहीच नाही. यात भुकेचा मुद्दा हरतो. वंचनेची कविता हरवते, अभावामुळे  माणसे हत्यारबंद होतात; हीच मग करमणूक वाटू लागते. या साऱ्यांना याआधीच्या वादविश्वात कोणते स्थान आहे?  

माझ्या आयुष्याची 22 वर्षे मी माडिया या जमातीसोबत व तिच्या संपर्कात राहून घालविली. अंदमान आयलँडर्स एवढी मागासलेली जमात म्हणून ती देशात प्रसिद्ध आहे. तिच्यात 30 वर्षांपूर्वी नरबळी घडले आणि लग्नानंतर बाईने अंगावर काही न घालण्याची प्रथा वीस वर्षांपूर्वी तिच्यात होती. भोवताली अठराविश्वे दारिद्य्र. माणसे जमेल तशी शेती करणारी. मिळेल ती शिकार करणारी. बालमृत्यू आहेत, आजाराने होणारी मरणे आहेत. खायला मिळाले नाही तर उपास आहेत. घाण, माशा असे सारेच सोबतीला आहे. पण या माणसांच्या चेहऱ्यांवरचे हास्य कधी मावळत नाही. त्यांतल्या बायका दिवसातून दोनदा तरी एकत्र येऊन नाचायच्या थांबत नाहीत. त्यांची गाणी सामुदायिक आहेत आणि ती त्या साऱ्या मिळून म्हणतात. इथे दुःख उपस्थित आहे आणि तरीही ते कुठे नाही.

या वास्तवाला तरी वरच्या तत्त्वचर्चेत कोणते स्थान आहे?

येणारे एकटेपण कसे घालवायचे, हा प्रश्न माझ्याच नात्यातल्या साठी ओलांडलेल्या एका उच्च शिक्षित महिलेचा. ‘माणसे समाजापासून तुटत जातील, ती एकटी होतील असे तुम्ही सांगता; ही माणसे मनानेही एकाकी होत असतील की नाही?’ हे तिच्या प्रश्नाचे स्वरूप... त्यावरचे उत्तर, ‘आता तुम्ही एकाकी आहात की नाही?’ हे होते. ‘घरात आहात, कुटुंबात आहात, मुले आहेत, नातू-सुना सारे आहेत; पण त्यांतले किती जण किती काळ तुम्हाला रमवतात? की, त्यांच्यात रमण्याचे बहाणेच तुम्ही करता की नाही? त्या साऱ्यांच्या गर्दीत तुमचे एकाकीपणच तुमच्या सोबतीला असते की नाही?’ माझ्या या उत्तरावर त्यांनी काही म्हटले नाही... पण ते न म्हटल्यावाचूनही समजण्याजोगे होते.

सुशिक्षित व सुसंस्कृतांचे वर्ग नसतात, त्या व्यक्ती असतात. त्या व्यक्तींच्या एकत्र येण्याला आपण समूह किंवा वर्ग हे गतकालीन नाव देतो. समाज, समुदाय ही नावेही तशीच आहेत... इतिहासजमा होत जाणाऱ्या ‘समाजा’सारखी... जरा वेळाने मीच त्या बार्इंना विचारले, ‘हे एकाकीपण वा एकटेपण तुम्हाला जगवते, तुम्हाला वाढवते आणि तुमच्या आवडी-निवडी निभावते. तुमच्या जगण्या-वागण्यात यामुळे काही कमीपण आले आहे काय? या स्थितीने तुम्हाला समर्थ बनविले की दुबळे?’... त्यावरचे त्यांचे उत्तर, ‘तसे तर आजही एकाकीपण आहे आणि सोबतीला सारे आहेत. फक्त  सोबत मागे पडते वा अपुरी पडते, असे वाटते. ही स्थिती कधी दुबळे वाटायला लावते, तर कधी स्वयंपूर्णतेचा अनुभव देते.’

‘मग उद्याची स्थिती याहून फार वेगळी कशी असेल?’ मी म्हणालो. ‘फार तर त्यातले साऱ्यांचेच अपुरेपण वाढले असेल किंवा आपले स्वयंपूर्णपण खऱ्या अर्थाने पूर्णही झाले असेल... सोबतीने चालताना सोबतचा कधी तरी थांबतो आणि आपण चालतच राहतो. अशा वेळी लक्षात येते- आतापर्यंतचे सोबतचे चालणे ही गरज नव्हती, तो संस्कार होता आणि संस्कार हे बंधनही असतेच. नंतरचे बंधनावाचूनचे चालणे स्वयंपूर्णतेचे, स्वतःचे आणि सर्वांगीण अनुभवाची खरी ओळख पटविणारे असते की नाही? आजवरचे अनुभव एकारलेले, एकांगी आणि एकाच बाजूचे होते असे वाटायला लावते की नाही?’

...त्यावर ते बोलणेच संपले होते. पण बाई नाराज नव्हत्या, प्रसन्न होत्या; निदान मला तशा वाटल्या होत्या.

 ही नाती मग राहतील, की तीही जातील? या प्रश्नाची दोन उत्तरे आहेत. पहिल्यानुसार ती जाऊ शकतात. ती गेलेली दाखविणारी उदाहरणे जगात अनेक आहेत. स्कॅन्डेनेव्हिएन देशात 60 टक्क्यांएवढे पुरुष व स्त्रिया लग्नावाचून जगतात. फ्रान्स व इटलीसारख्या देशात कमालीच्या मोकळ्या म्हणाव्या अशा लिव्ह इन रिलेशनशिपला स्थान आहे आणि त्यात राहणारी माणसे व स्त्रिया त्या देशांच्या पंतप्रधान व राष्ट्रपतिपदापर्यंत पोहोचल्या आहेत. वन मॅन फॅमिली, वन वुन फॅमिली किंवा गे मॅरेजेस ही सगळी या बदलत्या व्यवस्थेची उदाहरणे आहेत... या प्रश्नाचे दुसरे उत्तर- ही नाती राहतील, पण त्यांचे स्वरूप बदलले असेल हे आहे. आजची नाती श्रेष्ठत्व-कनिष्ठत्व, वर्चस्व आणि शरणभाव, आज्ञार्थी वा आज्ञाधारक अशा संबंधांवर उभी आहेत. उद्याचे संबंध समता आणि ममता यावर उभे असतील.... हा काळ समूहांचा नाही. कुटुंब, वर्ग, जात, पंथ, धर्म आणि देश यांसारख्या कुंपणांचा नाही. तो सर्वस्वी एकट्याचा, अमर्याद आणि म्हणूनच सर्वसमावेशक व सनातन आहे. त्यातल्या विचार-आचाराला तत्कालीन संदर्भ असतील, पण त्यांचे स्वरूप तात्कालिक वा लागलीच कालबाह्य होणारे नसेल.  त्याला इतिहास, वर्तान व भविष्य असे सारे असेल; पण ते एकत्र आणि वर्तानात एकवटलेले व तसे अनुभवता येणारे असेल... हा माणूस व्यक्ती असेल, समष्टी असेल, जग असेल, विश्वही असेल आणि ते सारे असताना तो स्वतःही असेल.

आजवर लक्षात आलेला पण चर्चेला न घेतलेला एक प्रश्न इथे उल्लेखनीय ठरावा असा आहे. कुटुंब, जात, वर्ग वा देश हेसमूह माणसांना जोडण्याचे काम अधिक करतात की तोडण्याचे? ही समाजाची बांधणूक आहे की विभागणी? जगभरच्या युद्धांचा इतिहास काय सांगतो? ती धर्मांसाठी, देशांसाठी, विचारसरणीच्या प्रसारासाठी आणि सामाजिक वर्चस्वासाठी झाली व अजून होत आहेत. यातल्या व्यक्तींचे परस्परांशी कोणतेही वैर नाही. त्यांच्यात वाद, भांडण वा साधा मतभेदही नाही. त्या बाजू समुदायांच्या एकत्रीकरणापासूनच सुरू होतात. किंबहुना, समुदायच त्यासाठी बांधले जातात. कशापासून तरी संरक्षण हवे म्हणून वा कुणावर तरी आक्रमण करायचे म्हणून. वर्चस्वासाठी लढती असतात, समतेसाठी वा बंधुत्वासाठी कोणी लढत नसतो.

प्रत्येकच जण असा, वेगळा, समष्टीरूप आणि विश्वरूप असेल; तर त्याचे इतरांशी संबंध कसे असतील?  की, ते असणारच नाहीत?... संबंध असतील, पण त्यांचे आताचे स्वरूप तेव्हा नसेल. या संबंधांतील परावलंबन पूर्णपणे संपले असेल आणि त्याच्या स्वावलंबनात साऱ्यांचे परस्परावलंबन समाविष्ट असेल. त्याचा विचार त्याचा असेल आणि समाजाचाही असेल. बिंदूचे सिंधूत रूपांतर होईल आणि त्याचे बिंदू असणेही कायम राहील... त्यातला समन्वय कसा असेल, हा प्रश्न आहे... उत्तर साधे आहे. आजच्या बदलत्या काळातले व्यक्ती-व्यक्तींमधले संबंध बदलले आहेत की नाहीत? हा बदल आपण सारे अनुभवत आहोत की नाहीत? तो साराच सुखद नाही, पण तेवढाच तो दुःखदही नाही. हाच वाढेल, विस्तारेल आणि आज काही अंगात जाणवणारा, व्यक्तिगत आणि सामाजिक अशा सर्व बाजूंनी जाणवू लागेल. त्याचीही सवय हळूहळू होईल आणि एक दिवस हे अनुभवांतर हा इतिहासाचा भागही बनेल.

Tags: कार्ल मार्क्स प्लेटो मन्वंतर सुरेश द्वादशीवार चीन रशिया साम्यवाद रूढीपरंपरा चोम्स्की मिडिया विचारसरणी धर्म व्यक्ती समाज महात्मा गांधी China Russia Rashiya Samyvaad Rudhiparmpara Chomsky Midiya Vicharsahrni Dharm Vykti Samaj Mahtama Gandhi Karl Marx Plato Manvantar Suresh Dwadashiwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात