Diwali_4 बंधुता
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

स्वातंत्र्य म्हणजे स्वयंनिर्णय आणि स्वयंनिर्णय म्हणजे आत्मनिर्भरता, म्हणजेच जबाबदारी घेण्याची क्षमता. अनेकांना ही जबाबदारीच नको असते. म्हणून मग आत्मनिर्भरता नको, स्वयंनिर्णय नको आणि स्वातंत्र्यही नको.’... ही माणसे मग वेड्यांच्या इस्पितळातल्या साऱ्यांनी मिळून तिथल्या डॉक्टरला वेडा ठरवावे तशी गांधी व रसेलला वेडा ठरवतात. मात्र उद्याचे जग त्या वेड्यांच्या मार्गावरूनच प्रवास करणार आहे आणि त्या मार्गाचे नाव बंधुता हे आहे.

स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांमधील विसंगतींसह सारे जग कवेत घेऊ शकेल एवढे बंधुता हे मूल्य व्यापक पण बेभरवशाचे आहे. ‘आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो. त्यात कायम असते ते केवळ राष्ट्रीय हित.’ हे चर्चिलचे विधान राजकारण व समाजकारणाएवढेच सगळ्या मानवी संबंधांनाही लागू होते. सख्खे भाऊ सख्खे मित्र असू शकतात आणि तेच एकमेकांचे हाडवैरीही होऊ शकतात. कौटिल्य म्हणाला, ‘राजाने शेजारी राज्याशी मैत्री करावी. पण त्या मैत्रीत सावधपण असावे. कारण पहिली मदत तोच करू शकतो आणि आक्रमण होणार असेल तर तेही त्याच्याच भूमीतून होत असते.’ गांधींनी साऱ्यांकडे भ्रातृभावाने पाहिले. मेकॅव्हिली मात्र म्हणाला, ‘जगात कोणीही विश्वासाचा नसतो’... एवढ्यावरही एक गोष्ट खरी व लक्षात घेण्याजोगी- या जगाच्या व्यवहाराचा व वाटचालीचा एकमेव आधार बंधुता हाच आहे. समाजव्यवस्था वा मानवी जीवनाची कोणतीही स्थिती विचारात घेतली, तरी तिचा आधार विश्वास हाच असतो. आणि बंधुतेचा अर्थही तोच असतो.

आपल्या घटनेच्या उद्देशपत्रिकेत बंधुता या मूल्यासमोर ‘व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता राखण्यासाठी’ असे म्हटले आहे. त्याआधी समता या मूल्याचे वर्णन करतानाही ‘प्रतिष्ठा व संधी याबाबतची’ असे शब्द आले आहेत. व्यक्तीची प्रतिष्ठा हा विषय एका वाक्याच्या उद्देशपत्रिकेत असा दोनदा येणे महत्त्वाचे आणि या घटनेने व्यक्तीला (समूहाला नव्हे) दिलेले मोल अधोरेखित करणारे आहे. घटनेने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकारही नागरिक या व्यक्तीला आहेत; त्यांच्या वर्गांना व समूहांना नाहीत. माणसाचे मूल्य मान्य करण्यावर घटनेचा भर असल्याचे सांगणाऱ्या या नोंदी आहेत. माणसे व्यक्ती म्हणून सुखरूप व्हायची व सुरक्षित जगायची असतील, तर तसे राहण्याविषयीचा व जगण्याविषयीचा विश्वास त्यांना वाटावा लागेल आणि हा विश्वास बंधुत्वाच्या वातावरणाखेरीज निर्माण होणार नाही.

संशय, वैर, भय वा असूया याही मानवी स्वभावाचा भाग असलेल्या बाबी आहेत आणि बंधुत्वाची सकारात्मक भावनाच त्यावर मात करणारी आहे. रशियाचा माजी हुकूमशहा ख्रुश्चेव्ह अमेरिकेच्या भेटीतील एका भाषणात म्हणाला, ‘आपण आपले नातेवाईक निवडू शकत नाही, तसे आपले शेजारीही आपल्या निवडता येत नाहीत. त्यामुळे असलेला शेजारधर्म सांभाळणे व निभावणे, ही आपली गरज आहे. तुमची भांडवलशाही आम्हाला आवडत नाही आणि आमचा साम्यवाद तुम्हाला पसंत नाही. पण आपण शेजारी आहोत आणि शेजारधर्म सांभाळणारेही आहोत. त्यामुळे आवडी बाजूला सारून आपल्याला एकत्र राहणे भाग आहे.’ ख्रुश्चेव्हच्या खवचटपणात जो शेजारधर्म आहे, तो विधायक करून घेतला की त्याचीच बंधुता होते. बर्ट्रांड रसेलने जागतिक सरकारचे (वन वर्ल्ड) स्वप्न पाहिले आणि त्यासाठी हयात झिजविली. गांधीलाही जगाचे एकीकरण हवे होते. सगळी माणसे सज्जन झाली आणि त्यांच्यातली भांडणे मिटली की, मग त्यांच्यात कुंपणे-भिंती वा सीमा राहतीलच कशा, असे तो म्हणायचा. मार्क्सला सरकार वाचूनचा एकसंध जागतिक समाज हवा होता. वर्ग आहेत म्हणून विषमता आहे आणि विषमता आहे म्हणून वाद आहेत. विषमता संपली की वाद जातील आणि ते मिटवायला लागणारी सरकारेही राहणार नाहीत, असे सांगून तो म्हणाला- सगळ्या श्रम करणाऱ्यांचा हितसंबंध एकच असल्यामुळे जग एक होईल. रसेल असो वा गांधी, नाही तर मार्क्स- त्यांच्या जागतिकीकरणाचे स्वप्न पुन्हा बंधुत्वाच्या व एकतेच्या पायावरच उभे व्हायचे होते. अडचण एवढीच की, कोणतीही इमारत उभी करताना आधी पाया घालावा लागतो. इथला प्रकार उफराटा आहे. हा पाया अजून दूरच नव्हे तर वर आहे आणि तिथवर आजच्या जगाला जायचे व उठायचे आहे.

जगाचा इतिहास शांततेचा व मैत्रीचा आहे की युद्धाचा आणि वैराचा आहे, हा चर्चेचा विषय होऊ शकेल. काहींच्या मते, हा इतिहास युद्धांचा आहे. शांतता ही दोन युद्धांच्या दरम्यानची अवस्था आहे आणि तिचा वापर नव्या युद्धाच्या तयारीसाठी होत असतो. याउलट, प्रत्यक्ष युद्धात गुंतलेल्या काही नेत्यांनी व देशांनी ‘आम्ही शांततेसाठी लढत आहोत’ असे म्हटल्याची नोंदही इतिहासात आहे. युद्धांना प्रागैतिहासिक काळापासूनचा इतिहास आहे. शिवाय जगात ती सर्वत्र लढविली गेली आहेत. आजही जग युद्धमुक्त नाही. प्रत्येकच खंडात युद्धे आहेत आणि जिथे ती दिसत नाहीत तिथे त्यांच्या तयाऱ्या आणि कुरबुरी आहेत. पूर्वी शेजारी देशांत युद्धे होत. आता खंडांमध्ये लढाया आहेत आणि त्या अंतराळातून लढविण्याची सोय आहे. झालेच तर, शांतता जागच्याजागी स्थिर राहिली असली तरी युद्धे नेहमी वेगानेच पुढे धावली आहेत. पूर्वीच्या लढाईत एक माणूस दुसऱ्याला मारत असे; आता शहरेच्या शहरे एका क्षणात नाहिशी करता येणाऱ्या व्यवस्था अस्तित्वात आल्या आहेत. पूर्वी माणसे रणांगणावर लढत; आताच्या लढाया कॉम्प्युटरवर बसून लढविता येतात.

रॉबर्ट मॅकन्‌मारा हे अमेरिकेचे संरक्षणमंत्री 1962 मध्ये म्हणाले, ‘अध्यक्षांनी युद्धाचा आदेश दिल्यापासून पहिल्या सहा मिनिटांत आम्ही दोनतृ तीयांशाएवढे जग बेचिराख करू शकतो.’ त्या वक्तव्याला आता 52 वर्षे झाली. या काळात झालेल्या शस्त्रविषयक प्रगतीने हा सहा मिनिटांचा काळ आता काही सेकंदांवरच आणला असेल. 2014 च्या एका पाहणीनुसार, जगात 26 हजारांहून अधिक अण्वस्त्रे युद्धसज्ज आहेत आणि त्यांतल्या कोणत्या अस्त्राने कोणत्या शहराचा वेध घ्यायचा, हे त्याच्या नाकावर बसविलेल्या कॉम्प्युटर चिपने त्याला सांगितले आहे. त्यामुळे ती चिप सक्रिय करणारी कळ दाबणे, एवढेच काम युद्धकर्त्यांसाठी शिल्लक राहिले आहे. जगातला कोणताही देश त्याच्या जवळच्या अण्वस्त्रांची खरी माहिती व संख्या उघड होऊ देत नाही. तरीही या पाहणीनुसार, त्यांची देशपरत्वे ज्ञात असलेली आकडेवारी अशी- अमेरिका 7315, रशिया 8000, इंग्लंड 225, फ्रान्स 300, चीन 250, भारत 110, पाकिस्तान 120, उत्तर कोरिया 10 आणि इस्राईल 60. (याखेरीज जगभरात रासायनिक अस्त्रांची भर मोठी आहे. एकट्या रशियाजवळ 39 हजार टनांहून अधिक ही अस्त्रे 1997 मध्येच होती.)

साऱ्या मानवजातीचा काही क्षणांत संहार करू शकेल एवढ्या या शस्त्रांच्या साठ्यासोबत सध्या जग आणि माणूस जगत आहे. यांतले प्रत्येक शस्त्र समाजातील व माणसातील बंधुत्वाच्या जीवावर उठले आहे आणि ते तसे बनविण्याची स्पर्धा साऱ्या जगात आहे. ही स्पर्धा खरी की तिच्यामुळे नाहीसे होणारे पण आजवर टिकलेले बंधुत्व खरे, हा आपल्यापुढचा प्रश्न आहे. माणसे शस्त्रांनी मारली जातात वा युद्धात मरतात, एवढेच खरेही नाही; ती युद्धावाचून वा वैरावाचूनही मारली जाऊ शकतात. ती धर्मांधतेपायी मारली जातात, तशी विचारांधतेपायीही मारली जातात. सत्तांधता हेही त्यांच्या घाऊक मरणाचे एक कारण असतेच. इतिहासात 14 हजारांहून अधिक युद्धांची नोंद आहे आणि त्यांतली बहुसंख्य धर्मयुद्धे आहेत. इतिहासाचा सांगावा मनात आणला, तर या युद्धांत मेलेल्यांची संख्या शेकडो कोटींच्या पुढे जाणारी आहे. त्यात मेलेल्यांना त्यांची बाजू धर्मवीर म्हणते तर दुसरी बाजू धर्मशत्रू. विचारांचे बळीही कोट्यवधींच्या संख्येत जाणारे आहेत. हिटलरने त्याच्या वर्णविद्वेषापायी मारलेल्यांची संख्या दोन कोटी, स्टालिनच्या कम्युनिझमने मारलेल्यांची संख्या पाच कोटी, तर माओच्या बळींची संख्या सात कोटी एवढी आहे. मारणारे आणि मरणारे ही सारीच माणसे होती. एकदेशीय आणि एकधर्मीय. तरीही त्यांच्यातील बंधुत्व कुठे लोपले होते... मात्र बंधुत्वाचे हे नष्टचर्य राज्य व धर्माच्या किंवा विचारसरणी व वैराच्या स्तरावरच संपत नाही. ते थेट समाजात, बाजारात, रस्त्यात व घरातही असते. मानसशास्त्राच्या मते, ते एकाच व्यक्तीच्या मनातही असते. त्याचमुळे कदाचित ‘सगळी युद्धे प्रथम मनात सुरू होतात व मग रणांगणावर येतात. ती थांबवायची, तर मने शांत व्हावी लागतात.’

ज्या महासत्तांची शस्त्रागारे अण्वस्त्रांनी भरली आहेत, त्यांचीच भीती जगाला आहे असे मात्र नाही. त्यांतल्या अनेकांना त्यांच्याजवळच्या शस्त्रांनीच एका मोठ्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. हिरोशिमा आणि नागासाकीवरच्या अणुहल्ल्यानंतर गेल्या 70 वर्षांत अण्वस्त्रांचा वापर करण्याचे धाडस त्यांच्यातल्या कोणाला झाले नाही, हे येथे लक्षात घ्यायचे. मात्र ज्यांच्यामुळे युद्धाचे  संकट ओढवू शकते, अशा शक्ती आणखीही आहेत. ‘अमेरिकेला तिच्या रक्तातच बुडवून मारू’ अशी आरोळी इराक व सिरियात सत्तेवर येऊ घातलेल्या इसिस या मुस्लिम संघटनेने व तिने स्थापन केलेल्या खिलाफतीने नुकतीच दिली आहे. हल्ला चढवायला शस्त्रेच लागत नाहीत; त्यासाठी प्रवासी विमानांनाही शस्त्र बनविता येते, ही गोष्ट न्यूयॉर्कवर तसा हल्ला चढवून ओसामा बिन लादेनने जगाला दाखविलीही आहे. परंपरागत शस्त्रे आहेत, तेवढीच परंपरागत वैरेही आहेत... शस्त्रांची भीतीही एका अनुभवानंतर नाहीशी होते. अमेरिकेने व्हिएतनामवर वर्षानुवर्षे बॉम्ब टाकले. पुढे त्या बॉम्बच्या पितळी कवचांची भांडी बनवून ती विदेशात पाठवण्याचा उद्योग व्हिएतनामच्या उद्योगी माणसांनीच सुरू केला.

बंधुता या सरळ-साध्या मानवी संवेदनेला एवढ्या सगळ्या शस्त्रागारांशी आणि त्यामागे उभ्या असलेल्या वैरांशी लढायचे व त्या युद्धात जिंकायचे आहे. उद्याचे जग बंधुतेचा हा विजय पाहणारही आहे.

6 ऑगस्ट 1945 या दिवशी सकाळचे 10 वाजून 58 मिनिटांनी हिरोशिमावर ‘लिटल्‌ बॉय’- छोटा अणुबॉम्ब अमेरिकेने टाकला. त्याने काही सेकंदांतच त्या शहरातल्या सर्व इमारतींची धूळ केली आणि 1 लाख 66 हजार स्त्री-पुरुषांचा बळी घेतला. तीनच दिवसांनी 9 ऑगस्टला नागासाकीवर ‘फॅट मॅन’ नावाचा दुसरा बॉम्ब तिने टाकला आणि त्याने तेवढ्याच काळात 80 हजार लोकांचे प्राण घेतले. शिवाय ते शहरही जमीनदोस्त केले. आताची अण्वस्त्रे त्या दोन बॉम्बहून हजारो पट जास्तीची शक्तिशाली व संहारक आहेत. हिरोशिमा आणि नागासाकी ज्यांच्या हातून घडले, ते अमेरिकेचे हवाई सैनिक पुढले सारे आयुष्य त्या नरसंहाराचा पश्चात्ताप करीत जगले. अणुबॉम्बचा जनक असणारा जे.रॉबर्ट ऑपेनहिमरही त्याचा शोक करीत राहिला. अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन म्हणाले, ‘ही शक्ती आमच्या शत्रूंच्या हाती लागली नाही, ही परमेश्वराचीच कृपा. यापुढे तिचा वापर कोणी करणार नाही.’... अणुबॉम्बचा शोध महायुद्धे थांबविणारा ठरला तरी स्थानिक व परंपरागत शस्त्रांनी लढवायची युद्धे मात्र त्यामुळे थांबली नाहीत. आताचे भय वेगळे आहे. या स्थानिकांच्याच नव्हे तर भूमिगतांच्या हाती अण्वस्त्रे पडतील काय, या भीतीने आता जगाला ग्रासले आहे.

युद्ध टाळण्याचे व शांतता राखण्याचे आजवर झालेले सगळे उपाय देश व राष्ट्र नावाच्या अव्याख्यातीत पातळीवर झाले. सत्तेचे संतुलन (बॅलन्स ऑफ पॉवर) हा त्यातला एक उपाय होता. जोवर शत्रूजवळ आपल्याएवढेच शस्त्रबळ आहे, तोवर विनाशाचा धोका त्याच्याएवढाच आपल्यालाही आहे म्हणून युद्ध नको म्हणायचे आणि त्यासाठी शत्रूहून मोठे वा त्याच्याएवढे शस्त्रबळ उभे करायचे. मग रशियाने नवे अस्त्र शोधले की, अमेरिका  त्याहून अधिक विनाशक शस्त्र शोधणार आणि भारताने अणुबॉम्बच्या पाच चाचण्या केल्या की पाकिस्तान त्याच्या सहा चाचण्या करणार. इस्रायलजवळ अणुबॉम्ब आहे म्हणून इराण तो बनविण्याच्या प्रयत्नाला लागणार आणि इराणकडे तो येण्याआधी इस्राईल आपल्याजवळचे त्याचे साठे वाढवीत जाणार. यातून युद्धाएवढेच वैर लांबणीवर पडते आणि अधिक धारदार होते...

दुसरा मार्ग सामूहिक प्रयत्नांचा. पहिल्या महायुद्धानंतर झालेली ‘लीग ऑफ नेशन्स’ची स्थापना ही त्याची पहिली परिणती. युद्धखोर देशाविरुद्ध जगातल्या सगळ्या शांतताप्रेमी देशांनी एकत्र यायचे व त्याला समज द्यायची. प्रसंगी साऱ्यांनी त्याविरुद्ध आपले सैन्य व शस्त्रबळही द्यायचे, ही त्यामागली भूमिका. परंतु लीगमध्ये प्रत्येकच देशाला नकाराधिकार (व्हेटो) देण्यात आला आणि सारे निर्णय सर्वसंमतीनेच घेण्याची अट पुढे आली. परिणामी, 1920 मध्ये जन्मलेली लीग 1945 मध्ये फारसे काही न करताच इतिहासजमा झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर याच भूमिकेतून आताच्या संयुक्त राष्ट्र संघटनेची (युनो) स्थापना झाली आणि तीत पाच बड्या राष्ट्रांपुरता नकाराधिकार राखीव केला गेला. ही संघटना अजून अस्तित्वात आहे. तिच्या काळात महायुद्धे झाली नाहीत, पण जगातल्या इतर लढाया थांबविण्यात तिलाही फारसे यश आल्याचे दिसले नाही. एक जागतिक व्यासपीठ उभारून त्यातून नैतिक प्रभाव उभा करण्यापलीकडे याही संघटनेला फारसे काही करता आले नाही.

याखेरीज विदेशातील वकिलाती, शिखर परिषदा, वार्तालाप असे सारे आहे आणि तरीही लढाया आहेत, तणाव आहेत. महायुद्ध संपले तेव्हा शीतयुद्ध आले. नंतरच्या काळात त्यातली दुसरी शक्ती दुबळी झाली तेव्हा शीतयुद्ध संपले नाही, त्याचे क्षेत्र आणखी विस्तारले. कारण हा आजवरचा सारा साधनांच्या चर्चेचा व युद्धाच्या परिणतीच्या आढाव्याचा भाग होता. तणावाची कारणे, वैराचे मूळ आणि ते उभ्या करणाऱ्या यंत्रणा यांच्या खऱ्या स्वरूपाकडे व त्यांच्या जवळ असलेल्या युद्धखोर यंत्रणांकडे फारसे पाहिले गेले नाही. चर्चा ‘देशांच्या’ झाल्या. ‘राष्ट्रां’दरम्यानच्या झाल्या. त्या ‘जागतिक’ होत्या आणि ‘आंतरराष्ट्रीय’ही होत्या. त्या संघटित समूहांच्या व समुदायांच्या होत्या... समाजाच्या वा व्यक्तींच्या नव्हत्या.

राज्य ही यंत्रणाच मुळात ‘संरक्षण’ नावाच्या युद्ध यंत्रणेशी संबद्ध आहे. तिचे सैन्य आहे आणि तिची शस्त्रागारेही आहेत. भारताजवळ लष्कर आहे, अण्वस्त्रे आहेत आणि युद्धाची यंत्रणाही आहे. त्या साऱ्या गोष्टी पाकिस्तान या देशाजवळही आहेत आणि दोन्हींकडील तशा यंत्रणांची कळ त्या देशांच्या जनतेच्या ताब्यात नसून सरकार नावाच्या संघटनेच्या हातात आहे. जोवर ती तशी आहे व राहणार आहे, तोवर शांतता नांदायची नाही आणि बंधुताही यायची नाही. मुळात राज्य, धर्म किंवा राजकीय संघटना यांच्यातली ही युद्धे आहेत; ती माणसांतली वा जनतेतली नाहीत. गांधींनी राज्याला अनावश्यक अडगळ म्हटले. त्याला आवश्यक पण अडगळच मानणारे आणखीही राजकीय विचारवंत जगात झाले व आहेत. वैर वा शत्रुत्व या बाबी व्यक्तीच्या मनात नसतात असे नाही. पण त्याला सक्रिय रूप आले तरी ते फार तर रस्त्यावरचे वा घरातले भांडण होणार. त्याला हिरोशिमा वा नागासकीचे स्वरूप येणार नाही. फार काय, ते न्यूयॉर्क वा मुंबईसारखेही असणार नाही. मात्र राज्य वा धर्म (आणि आताशा काहींना आवडणारा शब्द संस्कृती) यांच्यातला कलह घरातला वा वस्तीतला राहणार नाही; तो युद्धाचेच स्वरूप धारण करील.

उद्याचे जग समूहांचे असणार नाही, ते व्यक्तींचे राहणार आहे. अखेर जनता व लोक म्हणजे तरी काय? (आयन रँडच्या मते, तशी कोणती बाब अस्तित्वातच नसते. तो नुसता भ्रम असतो.) तो व्यक्तींचाच समुदाय असतो. तो पुरेसा धूसर व अज्ञातही असतो. तो तसा असल्यामुळे देशांची सरकारे वा नेते ‘त्याच्या भल्यासाठी’ युद्धे करतात... शिवाय कोणत्याही देशाच्या ‘जनतेला’ तिच्या सरकारच्या संरक्षणविषयक वा परराष्ट्रीय धोरणात कधी काही चुकीचे आहे असे वाटत नाही. ‘ती’ त्या पातळीवर जात नाही आणि ‘सरकार’ नावाचे प्रकरण तिला आपले पण दूरस्थच वाटत असते. समूहांच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यासारख्या सर्वच संघटना क्षीण होणार आहेत. त्यांच्या सीमारेषा आजच पुसट झाल्या आहेत. व्यक्तींवरची त्यांची बंधनेही सैल होत आहेत. धर्म व पंथांसारख्या संस्थांचे वजन व वर्चस्वही दुबळे होत आहे. (अपवाद आहेत, पण पूर्वीच्या व इतिहासाच्या तुलनेत ते नगण्य म्हणावे एवढे मर्यादित व थोडे आहेत) अमेरिकेचे सर्वाधिक व्यापारी दळणवळण रशिया व चीनशी आहे. युरोपने एक चलनव्यवस्था स्वीकारली आहे. दक्षिण अमेरिकेतील देश एकत्र आले आणि ब्रिक राष्ट्रांनी आपली बँक उभारण्याचा निर्णय घेतला. शीतयुद्धाच्याच नव्हे तर महायुद्धांच्या काळातही शत्रू राष्ट्रांचा प्रवास करणारे लोक होते आणि त्यांना तशी परवानगी होती. वैद्यकीय, शैक्षणिक, व्यावसायिक व तशाच इतर कारणांसाठी लोकांना जग खुले झाले आहे व होत आहे. त्याचा जो भाग अजून बंद आहे, तो फारसा चांगलाही  मानला जात नाही...

उद्याच्या व्यक्तिकेंद्री जगात साऱ्या सामूहिक संघटनांचे माहात्म्य कमी होईल आणि व्यक्तीला तिच्या आत्मभानाखेरीज दुसरे मोठे मार्गदर्शक केंद्रही नसेल. समाजाची नियंत्रणे क्षीण होतील आणि मार्क्स म्हणतो तसे राज्य ‘सुकत’ जाणार नसले तरी कोमेजले नक्कीच असेल. पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या पदाचे महत्त्व मोठे आहे. मात्र आपल्यासारख्या नवोदित देशात त्यांना कमालीचे भव्य व दिव्य स्वरूप असल्याचे आपण पाहतो. प्रगत देशातली स्थिती याहून वेगळी आहे. समाजात डॉक्टर असावेत, वकील असावेत किंवा उद्योगपती असावेत तसे राज्य कारभाराची यंत्रणा सांभाळण्यासाठी हे लोक हवेत, अशी भावना तिथे रुजली आहे. मोदी दूरचे वाटतात किंवा मनमोहनसिंगही लांबचे वाटायचे. अमेरिकेला ओबामा आपल्यातले वाटतात आणि डेव्हिड कॅमेरूनची इंग्लंडमधील स्थिती त्याहून वेगळी नाही... राज्य, पोलीस, न्यायालय व त्यांचा धाक वा धास्ती उतरली आहे आणि आपल्याच सारखी असलेली त्यातली माणसे आपल्याच सारख्या चुका सहजपणे करू शकतात अशी मानसिकताही सर्वत्र तयार होत आहे. धर्म, धर्मगुरू, पुरोहित वा आचार्य यांच्याकडेही पूर्वीच्या भक्तिभावाने पाहण्याचे दिवस संपले आहेत. पुढारी आणि समर्थक जवळ येत आहेत... हे एका देशात व वर्गात होत असताना सभोवतीचे जगही लहान होत आहे. दळणवळणाच्या वेगवान साधनांमुळेच हे होत नाही, तर माणसांच्या विचारांचा व मनांचा वेग वाढल्यामुळेही ते होत आहे.

जॉन.एफ्‌. केनेडी हे आमचे अध्यक्ष आमच्या देशाहून तुमच्याच देशात अधिक लोकप्रिय होते, ही गोष्ट एका अमेरिकी संपादकानेच प्रस्तुत लेखकाजवळ बोलून दाखविली आहे. बाजार हा नुसता बाजार राहिला नाही, जो जागतिक बाजार झाला. सांस्कृतिक व क्रीडांच्या स्पर्धांची क्षेत्रे त्यांच्या सभागृहांपुरती वा मैदानांपुरती मर्यादित उरली नाहीत, ती जागतिक झाली आहेत. संस्था व संघटना क्षीण होणे आणि त्याच वेळी व्यक्तीचे क्षेत्र विस्तारणे अशी ही दुहेरी व परस्परविरोधी दिशेने होणारी वाटचाल आहे. व्यक्तीचे क्षेत्र विस्तारणे हा तिच्या संबंधविस्ताराचा भाग आहे. भारतातली किती मुले आज विदेशात आणि किती परदेशी मुले भारतातील विद्यापीठांत शिकताहेत, येथील किती उद्योग व्यवसायात स्थिर आहेत आणि किती जण येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत याची मोजदाद अशा संदर्भात व्हावी लागणार आहे. त्यातून जुळणारे संबंध व माणसा-माणसात आलेली देशविदेशाची व जाती-धर्माची सीमा त्यात कुठे गळून पडली आहे, हेही पाहिले पाहिजे. विश्वबंधुत्वाच्या किंवा वसुधैव कुटुंबकम्‌च्या दिशेने पडलेली व पडणारी ही पावले आता  ओळखली पाहिजेत. नेते दूर राहतील आणि लोक जवळ येतील, अशी ही अवस्था आहे.

चीनमध्ये अमेरिकेने केलेली आर्थिक गुंतवणूक तिच्या भारतातील गुंतवणुकीहून 45 पटींनी अधिक असल्याचे वृत्त 2005 मध्ये प्रकाशीत झाले. चीन आणि अमेरिकेचे नेते राजकारणाच्या दोन ध्रुवांवर असताना हे घडले. पाकिस्तानचे नेते मधूनच भारताला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा देण्याची भाषा बोलतात. भारताचे लष्कर मुक्ती वाहिनी बनून पूर्व बंगालचा सोनार बांगला बनविते. ही सगळी त्याचीच उदाहरणे आहेत. रशियाची आताची युक्रेनमधील कारवाई आणि एके काळी चीनने तिबेटवर केलेली स्वारी यांचे वेगळेपणही येथे लक्षात घ्यायचे. त्यांच्याविरुद्ध जगात उसळलेला असंतोषाचा डोंबही मग येथे सकारात्मकरीत्या पाहायचा.

व्यक्तीला फार मोठी शक्ती संघटित करता येत नसल्याच्या नाइलाजामुळे आणि तिला आत्मबळाचाच आधार अखेरीस घ्यावा लागत असल्यामुळे उद्याच्या जगात तिला बंधुत्वाच्या, सहकार्याच्या आणि दूरस्थ का असेना पण सहजीवनाच्या यशस्वितेसाठीच प्रयत्न करणे भाग आहे. मात्र हा प्रवास एवढ्यावर थांबत नाही आणि थांबणार नाही. समूह व संस्था आज उभ्या आहेत त्या सामर्थ्याच्या, शक्तीच्या व अखेर शस्त्रांच्या बळावर. भय ही त्यांची निर्धारक शक्ती असते. सैन्ये, शस्त्रागारे आणि सरकारच्या संरक्षक यंत्रणाच नव्हे; तर समाजातील इतर संस्थासंघटनांचे बळ तरी वेगळे कुठे असते? कुठे पैसा तर कुठे दंडशक्तीच्या बळावर, म्हणजे बंधुतेच्या जीवावर त्यांची उभारणी होते. आइन्स्टाईन म्हणाला, ‘जर्मन फौजांची शिस्तबद्ध आणि ऐटदार कवायत पाहताना मनात आले- ही सगळी बिनकण्याची आणि बिना मेंदूच्या जिवंत बाहुल्यांची कवायत आहे. त्यांना आदेश देणारे व चालविणारेच खरे बलशाली आहेत आणि ही त्यांची निव्वळ साधने आहेत.’ आइन्स्टाईनने त्यासाठी जर्मनीचे नागरिकत्व टाकले आणि ज्यू धर्मही त्याचसाठी सोडला... आइन्स्टाईनच्या लिखाणात जर्मन युद्धकैद्यांच्या पॅरिसमध्ये झालेल्या परेडची गोष्ट नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस फ्रेंचांनी पकडलेल्या या युद्धकैद्यांना पॅरिसच्या रस्त्यावरून फिरविले गेले, तेव्हा त्यांना पाहायला त्यांच्यावरच्या रागाने व तिरस्काराने पेटून उठलेली सारी माणसे रस्त्यावर आली. ही माणसे त्या कैद्यांना पकडून रस्त्यातच मारतील, असे भय तेव्हा व्यक्त झाले. प्रत्यक्षात अंगावरच्या कपड्यांची लक्तरे झालेले, अनवाणी व फुटलेल्या पायांनी चालणारे, अर्धपोटी व उपाशी राहून अर्धमेले झालेले ते कैदी रस्त्यावर आले, तेव्हा सारा जमाव स्तब्ध झाला. काही वेळाने एका महिलेने पुढे होऊन त्यांतल्या एकाला आपल्याजवळचे पाणी प्यायला दिले आणि तेवढ्याने साऱ्या माणुसकीचाच बांध फुटला. रस्त्यावरची माणसे माघारी वळली आणि मिळेल ते खाद्यपदार्थ, पाणी आणि फळे घेऊन पुन्हा रस्त्यावर आली. आता त्यांनी त्या कैद्यांना खायला व प्यायला दिले... माणुसकीने शत्रुत्वाचा केलेला तो पराभव होता. बंधुतेच्या यशाचीही तीच पताका होती.

बंधुत्व, माणुसकी, मैत्र व ‘माणसांच्या’ मुक्तीसाठी या यंत्रणा नाहीशा व्हाव्यात, असे त्याच्या एवढ्याच कळवळ्याने गांधी आणि रसेलनेही सांगितले. ती माणसे तेव्हा अनेकांना वेडी वाटली. शांतता व बंधुतेचा आग्रह धरणारी माणसे जेव्हा राज्य, धर्म व संरक्षक यंत्रणा यांच्याविरुद्ध वा त्यांच्या विसर्जनाची भाषा बोलतात; तेव्हा ती त्यांचे म्हणणे तर्काच्याच मार्गाने पुढे नेत असतात. पण आजच्या समूहव्यवस्थेत जगणाऱ्यांना व स्वतःला सुरक्षित समजणाऱ्यांना त्यांच्यात विक्षिप्तपणा दिसतो. एरिक फ्रॉमने ‘फिअर ऑफ फ्रीडम’ लिहिले. त्यात ‘माणसांना स्वातंत्र्य वा खुलेपणा नकोच असतो’ असे तो म्हणाला. ‘माणसांना स्वातंत्र्याची भीती वाटते म्हणून तो त्याच्या बंदोबस्ताच्या नावाखाली स्वतःचा बंदोबस्त करून घेणाऱ्या यंत्रणा निर्माण करतो. कारण स्वातंत्र्य म्हणजे स्वयंनिर्णय आणि स्वयंनिर्णय म्हणजे आत्मनिर्भरता, म्हणजेच जबाबदारी घेण्याची क्षमता. अनेकांना ही जबाबदारीच नको असते. म्हणून मग आत्मनिर्भरता नको, स्वयंनिर्णय नको आणि स्वातंत्र्यही नको.’... ही माणसे मग वेड्यांच्या इस्पितळातल्या साऱ्यांनी मिळून तिथल्या डॉक्टरला वेडा ठरवावे तशी गांधी व रसेलला वेडा ठरवतात. मात्र उद्याचे जग त्या वेड्यांच्या मार्गावरूनच प्रवास करणार आहे आणि त्या मार्गाचे नाव बंधुता हे आहे.

‘मन्वंतरचा उत्तरार्ध’ या लेखमालेत एकूण 11 लेख प्रसिद्ध झाले आहेत- व्यक्ती, समष्टी, धर्म, नीती, न्याय, राजकारण, लोकशाही, सेक्युलॅरिझम, स्वातंत्र्य, समता, बंधुता. या सर्व लेखांचे पुस्तक ‘युगांतर’ या नावाने जानेवारी 2015 मध्ये साधना प्रकाशनाकडून येत आहे. - संपादक 

Tags: अणुबॉम्ब रॉबर्ट मँकमारा संयुक्त राष्ट्र संघटना नागासाकी हिरोशिमा जागतिक महायुद्ध जे.रॉबर्ट ऑपेनहिमर अल्बर्ट आईनस्टाईन बराक ओबामा जॉन.एफ्‌. केनेडी फिअर ऑफ फ्रीडम एरिक फॉर्म रसेल जवाहरलाल नेहरू कार्ल मार्क्स महात्मा गांधी मन्वंतराचा उत्तरार्ध बंधुता सुरेश द्वादशीवार Robert Mcnamara Anubomb J.Robert Oppenheimer Sanyukt Rashtr Sanghtana J.F.Kenndy Barac Obama Nagasaki Hiroshima Jagtik Mahayudh Albert Einstein Fair Of Freedom Eric Fromm Bertrand Russell Jawaharlal Neharu Karl Marx Mahatma Gandhi Manvantracha Uttrardha Bandhuta Suresh Dwadashiwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात