Diwali_4 समष्टी
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

‘‘पन्नास वर्षांपूर्वी माझ्या वडिलांना हॉटेलातही प्रवेश न देणाऱ्या या महान देशाच्या अध्यक्षपदाची पवित्र शपथ मी आज तुमच्या साक्षीने घेत आहे...’’ बराक ओबामा यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारताना केलेल्या भाषणातले हे वाक्य अनेकांना हेलावून गेले, कारण त्यात एका विलक्षण जागतिक सत्याचे अधोरेखन होते... जगभरातील अनेक देश व समाज आता अशा पातळीवर जगताना दिसू लागले आहेत. अरब देशांनी अमेरिकेच्या सामर्थ्याशी वैर धरले आहे पण प्रत्येक अरबी कुटुंबातला किमान एक जण अमेरिकेत शिकत वा राबत त्या देशाची व स्वतःची श्रीमंती वाढवीत आहे. या अरब पोरांचे वैभव एवढे की, त्यांच्यासमोर आपल्या स्थितीची खंत वाटावी, अशी तेथील भारतीय तरुणांची स्थिती आहे...

आयर्व्हिंग वॉलेसने 1950 च्या दशकात त्याची ‘द प्राईझ’ ही जगप्रसिद्ध कादंबरी लिहिली. नोबेल पारितोषिके कशी दिली जातात आणि त्यातल्या पारितोषिकप्राप्तांची निवड कशी होते इथपासून, त्यामागचे राजकारण व ते देताना होणाऱ्या सगळ्या चांगल्या-वाईट घडामोडींची कमालीची उत्कंठावर्धक कथा त्या कादंबरीत आली आहे. काही वर्षांपूर्वी स्कॅन्डेनेव्हिअन देशात असताना या कादंबरीतली सगळी महत्त्वाची स्थळे, पारितोषिके दिली जाणाऱ्या समारंभाचे स्थान, त्याआधीच्या मेजवानीची जागा आणि आल्फ्रेड नोबेलचे निवासस्थान अशा सगळ्या गोष्टी पाहिल्या; तेव्हा तिकडचे लेखक व कादंबरीकार आपल्या वर्ण्य विषयाचा केवढा प्रचंड अभ्यास करतात, याची कल्पना आली. (प्रत्यक्षात आपण ही कादंबरी कशी लिहिली यावर वॉलेसने जे पुस्तक नंतर लिहिले, त्याच्याही काही दशलक्ष प्रती जगात खपल्या आणि वाचल्या गेल्या.)

या कादंबरीत स्कॅन्डेनेव्हिअन देशांतील (डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन आणि फिनलँड) एकेकटे राहण्याची- ‘वन मॅन’ आणि ‘वन वुमन फॅमिली’ची- चर्चा विस्ताराने आली आहे. पुरुष लग्नावाचून राहतात, तशा स्त्रियाही लग्नावाचून राहतात. त्यांची आपसात मैत्री असते, पण तिच्यावर लग्नातल्यासारखी बंधने नसतात. बलात्कार नाही, सक्ती नाही; राजीखुषीचे आणि मर्जीचे सारे संबंध. ते सन्मानाने राखले व जपले जातात. एखाद्या स्त्रीला मूल हवेसे वाटले, तर ती तिला आवडणाऱ्या पुरुषाकडून ते करून घेते. मात्र तसे करताना त्याच्यावर लग्नाची वा मुलाच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याची सक्ती करीत नाही. आपले मूल ती स्वतःच वाढविते. अशी मुले वाढविणाऱ्या पुरुषांच्याही कहाण्या त्या देशांत आहेत. वॉलेसने त्यांचेही विस्ताराने वर्णन केले आहे. माणसे बिचकत नाहीत. सहज-साधी राहतात. प्राण्यांनी आणि पाखरांनी राहावे, तशी; पण सभ्य आणि सुसंस्कृत म्हणावे अशी... ही पातळी गाठायला कोणत्याही समाजाला फार काळ जाऊ द्यावा लागत असेल वा तसे वेगळे अनुभव त्याच्या वाट्याला यावे लागत असतील... एक गोष्ट मात्र खरी- ही अवस्था त्या समाजाने भीतीतून जवळ केली नाही; स्वातंत्र्याच्या मागणीतून त्याने ती आत्मसात केली आहे... ती अनुकरणीय वा आदर्श आहे की नाही, हा प्रश्न महत्त्वाचा असला तरी तो आपला आहे; त्यांचा नाही. त्यांनी ती दीर्घ अनुभवातून जाऊन स्वीकारली आणि त्यांना ती मानवली आहे.

पौर्वात्य देशांना हे अवघड व अनैतिक वाटावे, असे प्रकरण आहे. मात्र अशा प्रकरणांकडे पाहण्याची त्याचीही जुनी व कर्मठ वृत्ती आता मोकळी व सैल झाली आहे. प्रथम ‘दृष्टिआड ते सृष्टिआड’ म्हणून दुर्लक्ष. पुढे ते आले, तरी आपल्यापर्यंत पोहोचले नाही याचे समाधान. नंतर ते पोहोचले तरी इतर वर्गांत, आपल्यात नाही- हा विश्वास... आणि अखेर ‘हे कधी तरी येणारच होते, तसे ते आता आले’ अशी मनाची समजूत... ‘मातृत्व हा स्त्रीचा अधिकार आहे. तो प्राप्त करण्यासाठी तिला लग्न करण्याची गरज नाही’ हा निर्णय आपल्या सर्वोच्च न्यायालयाने 1970 च्या दशकात दिला. तो तसा मिळविण्यासाठी बंगालच्या कर्मठ कुटुंबातील चार नोकरदार मुलींनी त्या न्यायालयाचा दरवाजा तेव्हा ठोठावला होता.

हे प्रकरण आणखीही वाढले. या निकालाचा आधार घेत एका तमिळ मुलीने आपले आई-वडील आपल्याला मातृत्वाचा अधिकार मिळवू देत नाहीत, अशी तक्रार पोलिसात नेली होती. गेल्या वीस वर्षांत अगोदर निषिद्ध ठरविलेल्या अनेक गोष्टी आपल्यात आल्या. मुले-मुली मोटारसायकलवरून एकमेकांना घट्ट धरून (मिठी मारूनच) जाताना दिसू लागली. सिनेमात चुंबने आली, स्त्री-पुरुष मैत्रीच्या कक्षा रुंदावल्या. लग्नावाचून एकत्र राहणे आले आणि समलिंगी विवाहांनाही कायदेशीर मान्यता मिळू लागली... स्कॅन्डेनेव्हिअन देशांच्या पूर्वेला दूर अंतरावर भारत आहे, पण पश्चिमेकडे असे सरकण्याची त्याची गती मात्र मोठी आहे.

त्या देशांतले हे आयुष्य स्वतंत्र आहे, मोकळे आहे; परंतु केवळ स्वतंत्र वा मोकळे असल्याने ते आदर्श वा अनुकरणीय मात्र ठरत नाही. स्टॉकहोममधील एका सायंकाळची गोष्ट. मी माझ्या प्रवासी स्नेह्यांसोबत शहराच्या मुख्य चौकातील एका ओट्यावर मावळतीचा अनुभव घेतो. त्या देशात रात्री अकरापर्यंत दिवसाचा उजेड संधिप्रकाशासारखा रेंगाळत असल्याने त्या वेळेला संध्याकाळ म्हणायचे की रात्र, हे न कळणारे. चौकात खूप माणसे आहेत- स्थानिक आणि बाहेरची. हातात बिअरच्या लहान बाटल्या व तसलीच पेये घेतलेली आणि ओट्यांवरच्या गप्पांत रंगलेली. त्यात तरुणांचाच भरणा मोठा. वयस्कही होते, पण ते आपापल्या जोडीदारासोबत. सारे काही आणि सरणारे काही आपल्या मिटमिटत्या डोळ्यांनी पाहत... आनंद मात्र साऱ्यांच्याच चेहऱ्यांवर. मोकळेपण, गंमत, गजबजलेली चर्चा, हास्यविनोद आणि मधूनच हास्याचा एखादा मोठा कल्लोळ.

तशातच एक विचित्र दृश्य. त्या चौकातच माणसांनी भरलेल्या ओट्यालगत एक तरुण स्त्री बेशुद्धावस्थेत कधीची पडलेली. वय फार नसावे. वीस-पंचविशीचे. तरुणपण, देखणेपण, कपड्यांची उंची- असे सारे आहे. सोनेरी केसांच्या त्या युवतीच्या सोनेरी भुवयाही मिटलेल्या. तिचा श्वास चालू, बाकी हालचाली मात्र थांबलेल्या.. तिच्याकडे कुणाचेच लक्ष नाही. कुणी बघणारेही नाही... जरा वेळाने दोन मुली येतात. तिच्याजवळ थांबतात अन्‌ काहीएक न बोलता वा करता आल्या मार्गाने चालू लागतात... त्या देशात पोलीस नसावेत; नाही तर एव्हाना त्यांच्यातल्या कुणी तरी या प्रकाराची दखल घेतली असती... शेवटी न राहवून मीच शेजारच्या स्थानिकाला विचारतो. तो गोंधळतो. तिकडे इंग्लिश न समजणारीच माणसे अधिक. जरा वेळाने दुसऱ्याला विचारतो. त्याला इंग्रजी समजणारे... जराही चिंतेचा सूर न काढता तो म्हणतो, ‘‘ती ड्रगच्या नशेत आहे. ती उतरली की,  उठेल आणि जाईल’’... आपण आपला आनंद तिच्यासाठी का घालवायचा, असा त्याचा सूर.

उपरोक्त दोन दृश्यादरम्यान उद्याचे येणारे जग आपल्याला आता पाहायचे आहे.

भारतात याची सुरुवात वेगळ्या पातळीवर होत आहे. वर उल्लेखिलेल्या बंगाली मुलींच्या वेगळेपणाहून एक आणखीही मोठे व भव्य जग या देशात अवतरत आहे. विदेशांत काम करणाऱ्या भारतीय तरुण-तरुणींनी 2010 या एकाच वर्षात देशाच्या (व त्यांच्या कुटुंबांच्या) गंगाजळीत 89 अब्ज डॉलर्सची भर घातली आहे. नंतरच्या काळात ती क्रमाने वाढत गेली आहे. कॅनडा, अमेरिका, इंग्लंड व ऑस्ट्रेलियासारख्या देशांच्या उच्चमध्यम वर्गात जमा होणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे. मोठी घरे, मोठ्या मोटारी, ऐषारामी जगणे असे सारे करून या तरुणांनी देशाला एवढा पैसा दिला आहे. अवघ्या पंचवीस वर्षांपूर्वी स्वप्नवत्‌ वाटल्या असत्या, अशा या गोष्टी आहेत. एकट्या महाराष्ट्रातील घरटी एक माणूस आता विदेशात आहे आणि तिथल्या हवेएवढाच श्रीमंतीचाही आस्वाद तो घेत आहे...

आपली मुले तिकडच्या जगात सुखी आहेत, अशा समाधानात इकडे जगणारे त्यांचे आई-वडील आणि जुन्या पिढीतले लोक मात्र त्यांच्या आठवडी फोनची, महिना-अखेरच्या मनिऑर्डरीची आणि वर्ष-दोन वर्षांत त्यांच्याकडून येणाऱ्या विदेशवारीच्या तिकिटांची वाट पाहत आपल्या जुन्याच घरात थांबले आहेत. एके काळी त्यांना वाटणारी मुलांच्या भविष्याची चिंता संपली आहे. आताची त्यांची चिंता त्यांच्या स्वतःच्या भविष्याची व अखेरीची आहे.... आजचा प्रश्न- ही चिंता स्वातंत्र्याच्या व सुरक्षिततेच्या पातळीवर नेऊन निकालात काढण्याची आहे... तशा सोई अस्तित्वात आल्या आहेत, येत आहेत आणि पुढेही येणार आहेत.

विमा कंपन्या आल्या, त्या कुटुंबातील कर्त्या माणसाच्या पश्चात त्याचे कुटुंब सुरक्षित व आत्मनिर्भर होऊ शकावे, म्हणून. वृद्धाश्रम ही समाजाची अशीच गरज आहे आणि एके काळी त्यांच्याकडे दयनीय म्हणून पाहण्याची समाजाची दृष्टी बदलली आहे. संवादाची वेगवान माध्यमे, टेलिफोन आणि संगणकांपासून थेट दूरदेशीच्या माणसाला पाहत त्याच्याशी बोलण्याची व्यवस्था- ही त्याच गरजपूर्तीची निर्मिती आहे. प्रवासाची वेगवान साधने आली आहेत. आपल्या देशातील सोई इतरांना उपलब्ध करून देण्याचा प्रकार वाढला आहे. पाकिस्तानशी वैर असतानाही त्या देशाचे नागरिक भारतातील वैद्यकीय सेवेचा लाभ घेत. आता तर हा प्रवास बऱ्याच अंशी खुला झाला आहे. ‘काश्मिरातील प्रत्यक्ष नियंत्रणरेषा अजूनही राहील, पण ती असून-नसून सारखी होईल’, हे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांचे वक्तव्य व त्याला इतरांनी न घेतलेला आक्षेप इथे आठवावा असा आहे.

मागासलेले समाज कमालीचे एकसंध व घट्ट असतात. त्यांतल्या व्यक्तीला समाजाचा घटक म्हणूनच जगता येते. तिला स्वतंत्र असण्याचा वा वागण्याचा अधिकार नसतो. समाज जसजसा प्रगत होतो तसतसा तो मोकळा व सैल होतो. त्याचे समाजकेंद्री असणे जाते आणि व्यक्तिकेंद्री होणे सुरू होते. कधी काळी सारे जगच मागासलेले, म्हणून आपापल्या टोळीत एकसंध व घट्ट होते. जे समाज अजून तसे आहेत, त्यांचे तसे असणे टिकलेही आहे. तिथे व्यक्ती हीच समष्टी आणि समष्टी हीच व्यक्ती असते. एकासारखा दुसरा आणि दुसऱ्यासारखाच तिसरा. एका पातळीवरचे ते संस्कारित लष्करीकरणच असते. भाषा तोकडी, जग लहान आणि गरजा थोड्या. त्यामुळे शब्दविस्तार नाही आणि आयुष्येही कळपातल्या पाखरांपासून वेगळी नाहीत. वेगळेपण असलेच तर ते स्वभावगत... साऱ्यांना जमातीत राहायचे असते, त्यासाठी साऱ्यांशी जुळवून घ्यायचे असते. समाजाबाहेर जगता येत नाही आणि आहे त्या समाजात मोकळीक (स्पेस) नाही. मी अशा जमातीत दिवस काढले आहेत. माणसे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एका शिस्तीत असतात. स्त्रियाही तशाच. भांडणे होतात, पण ती लगेच मिटतात वा मिटविली जातात. आपले जग याहून वेगळे आहे. इथे व्यक्तींना मोकळीक आहे. ती कुटुंबापासून समाजापर्यंत सर्वत्र आहे. जगण्या-वागण्यात वेगळेपण आहे आणि त्याहून अधिक हे की, त्यात कोणाच्याही जगण्याचे उद्याचे पाऊल कोणते, ते आज कोणाला खात्रीपूर्वक सांगता येत नाही.

खुलेपणा व मोकळीक येत असताना आणि स्वातंत्र्याचा अनुभव विस्तारत असताना आणखीही काही गोष्टी झाल्या. पाश्चात्त्य देशांत घटस्फोटांचे प्रमाण वाढले. तिथे 60 ते 70 टक्क्यांएवढीही लग्ने टिकत नाहीत. घटस्फोट ही बाब दुर्दैवाची मानण्याचा प्रकारही तिथे उरला नाही. ती तशी मानावी, अशीही बाब राहिली नाही. मन मारून व मान घालवून एखाद्यासोबत वा एखादीसोबत आयुष्य काढण्याहून वेगळे होणे आणि स्वतंत्र जगणे वाईट नाही. वाईट एकच- भारतात स्त्रियांना स्वयंपूर्ण होऊ देणाऱ्या संधींची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे घटस्फोटित स्त्री आपल्याकडे सन्मानाने जगू शकेल याची अजून खात्री देता येत नाही. तथापि, हा काळ बदलायला फार दिवस लागायचे नाहीत. मुळात लग्ने उशिरा करण्याची वा न करण्याची वृत्ती, त्यातून केलेली लग्ने  टिकतील की नाही याविषयीच्या शंका आणि घटस्फोटातली त्यांची परिणती हा प्रकार आता नुसता पाश्चात्त्यही राहिला नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्याचे प्रमाण मोठे आणि दयनीय आहे. हा प्रकार हळूहळू जागतिक म्हणावा असाही होत आहे.

एलिझाबेथ टेलरने सात लग्ने केली. त्यांतली दोन एकाच पुरुषाशी दोनदा केलेली. फ्रान्सचे आताचे अध्यक्ष फ्रॅन्कोईस होलेंडे हे त्यांच्या नव्या मैत्रिणीसोबत विवाहावाचून राहतात. त्यांची पहिली मैत्रीण सेगोलाईन रॉयल हिला त्यांच्यापासून चार मुले झाली. फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निकोलस सार्कोझीकडून ही सेगोलाईन फार थोड्या मतांनी पराभूत झाली. मात्र एवढ्या खुल्या देशात व स्वतंत्र माध्यमांच्या पर्यावरणात तिच्या मुलांविषयी वा तिच्या अविवाहित राहण्याविषयी तिला कधी कोणी प्रश्न विचारलेला दिसला नाही. ती सारी तिची व्यक्तिगत बाब मानली गेली. स्वतः निकोलस सार्कोझी हेही ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आपली मैत्रीण कार्ला ब्रुनी हिच्यासोबत राहत. त्यांनी लग्न केले, तेही तिने एका मुलीला जन्म दिल्यानंतर... मात्र या सगळ्या समाजात कुटुंब अजून साऱ्यांना जुन्या आठवणींसारखे खुणावते. आपले कुटुंब सुखी असल्याचे वारंवार सांगणारी बराक ओबामांसारखी माणसे अमेरिकेत आहेत, तर ‘मला अमेरिकेची अध्यक्ष होण्याआधी आजी व्हायचे आहे’ असे हिलरी क्लिंटन म्हणत असते. जुन्या आठवणी सुटत नाहीत आणि नवे वास्तव दृष्टिआड करता येत नाही, याची ही उदाहरणे. यातले खरे कोण आणि देखावा करणारे कोण, हाही एक प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर ज्यानेत्याने आपल्या परीने शोधून घ्यायचे आहे...

जगतात ते जाहिराती करीत नाहीत आणि जाहिरातीत कोणी जगत नाहीत, हे इथे लक्षात घ्यायचे. ‘‘पन्नास वर्षांपूर्वी माझ्या वडिलांना हॉटेलातही प्रवेश न देणाऱ्या या महान देशाच्या अध्यक्षपदाची पवित्र शपथ मी आज तुमच्या साक्षीने घेत आहे...’’ बराक ओबामा यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारताना केलेल्या भाषणातले हे वाक्य अनेकांना हेलावून गेले, कारण त्यात एका विलक्षण जागतिक सत्याचे अधोरेखन होते... जगभरातील अनेक देश व समाज आता अशा पातळीवर जगताना दिसू लागले आहेत. अरब देशांनी अमेरिकेच्या सामर्थ्याशी वैर धरले आहे पण प्रत्येक अरबी कुटुंबातला किमान एक जण अमेरिकेत शिकत वा राबत त्या देशाची व स्वतःची श्रीमंती वाढवीत आहे. या अरब पोरांचे वैभव एवढे की, त्यांच्यासमोर आपल्या स्थितीची खंत वाटावी, अशी तेथील भारतीय तरुणांची स्थिती आहे... थोड्याफार फरकाने आपल्या शहरी (विशेषतः महानगरी) व ग्रामीण भागाचे चित्रही असेच आहे आणि ही अवघ्या जगातील सगळ्या देशांत व समाजात पाहता यावी अशी अवस्था आहे.

स्कॅन्डेनेव्हिअन देश हे जगातील सर्वाधिक श्रीमंत देश आहेत. शिवाय ‘राहण्यायोग्य’ ठरविल्या गेलेल्या जगातील पहिल्या पाच देशांत त्यांचा समावेश आहे. माणसे संपन्न आहेत आणि त्यांना संपन्न माणसांची दुःखे आहेत. दुःखे, अभाव, विषमता वा वंचना या गोष्टी फक्त गरिबांच्याच वाट्याला येतात, हा आपल्याकडचा लाडका भ्रम आहे. त्या भ्रमावर आपण कविताही बऱ्याच लिहितो. मार्क्स एकदा म्हणाला, ‘‘मी जगातली सारी व साऱ्यांची दुःखे नाहीशी करण्याचे आश्वासन देत नाही. माणसांना माणसांची दुःखे असावीत, एवढेच माझे म्हणणे आहे. भूक हे जनावराचे दुःख आहे. ते माणसाच्या वाट्याला येऊ नये.’’ स्कॅन्डेनेव्हिअन व युरोपीय अन्य देशांतील दुःखे मार्क्सच्या या म्हणण्यानुसार माणसांची आहेत. दारिद्य्ररेषेखाली जगणाऱ्यांची दुःखे प्राण्यांच्या पातळीवरची असून ती दूर करणे, एवढेच स्वप्न माणसांच्या जातीने बाळगायचे आहे. सगळीच दुःखे संपली, तर माणूस थांबेल आणि त्याची प्रगतीही थांबेल... सबब- दुःखे हवीत, प्रश्न हवेत; फक्त ते सारे केवळ माणसांच्या पातळीवरचे हवे. आपल्यापुढचे आव्हान दुहेरी आहे. एक- माणसांना असलेली प्राण्यांची दुःखे कमी करण्याचे आणि दुसरे- माणसांना असलेली माणसांची दुःखे अधिक आव्हानात्मक करण्याचे...

सगळ्या विकसनशील राष्ट्रांपुढची समस्या ही अशी आहे. यात एक अपुरेपण आणि एक समाधान आहे. माणसांना जनावरांच्या पातळीवरून वर आणण्यात मिळाले, ते समाधान आणि अजून काही माणसे त्या पातळीवर आली नाहीत, हे अपुरेपण. पण या प्रवासाची दिशा निश्चित आहे. ती ऊर्ध्वगामी म्हणजे वर जाणारी आहे... भारतातली साठ टक्के माणसे 1960 च्या दशकात दारिद्य्राच्या सीमारेषेखाली होती. गेल्या 50 वर्षांत त्यांची संख्या 25 टक्क्यांहून कमी झाली आहे. 5 टक्क्यांचा मध्यम वर्ग 40 टक्क्यांवर गेला, तर जगभरातील पहिल्या 10 धनवंतांत भारतातील तीन माणसे जाऊन बसली... 1960 च्या आरंभी जेमतेम 50 लाख टेलिफोनधारक असलेल्यांचा देश आता 80 कोटी मोबाईलधारकांचा झाला आणि एके काळचे त्याचे रिकामे रस्ते आता मोटारसायकली व मोटारींनी भरून वाहू लागले. ग्रामीण भागात माणशी अडीचशे रुपये रोजगार मिळू लागला आणि शंभर रुपयांत 35 किलो धान्य मिळू शकेल अशी  व्यवस्था झाली... हा देश जपानला अर्थकारणात 2031 पर्यंत मागे टाकेल आणि जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता बनेल, असे जग म्हणू लागले. अर्थकारणातील बदलाचा परिणाम लोकजीवनावर आहे आणि आताचा कामगारही मालकाचे म्हणणे मुकाटपणे ऐकून घेत नाही. श्रीमंतांना सावध जगणे भाग झाले आणि गरिबांनाही निर्भयपणे जगता येणे शक्य झाले आहे.

ए.पी.जे.अब्दुल कलाम म्हणतात- एक दिवस हा सारा देशच समाधानी आणि संपन्न होईल. त्या वेळी दारिद्य्राची कवने लिहिणाऱ्यांचे दिवस संपतील. तसे ते आजही त्यांची गाणी त्यांच्या पूर्वजांच्या आठवणींवरच बेतत आहेत; पुढे त्या आठवणीही धूसर होतील. माणसांच्या म्हणविणाऱ्या प्रश्नांचा व येत्या काळातील त्यांच्या सोडवणुकीचा प्रश्न आहे आणि तो वाटतो तेवढा सहज-सोपा नाही. युद्धे नसतील पण मतभेद असतील समूहांच्या हाणामाऱ्या नसतील पण व्यक्तींचे वाद असतील. आणि माणसे एकटी व एकाकी असल्याने आजच्याहून जास्तीची अनियंत्रित व संवेदनशील असतील... मात्र माणसे समूहांहून अधिक संस्कारक्षमही असतात आणि त्यांच्या गरजपूर्तीच्या व विकासाच्या सोयी-शक्यता दिवसेंदिवस अधिकाधिक निर्माणही होत आहेत... मनोनिग्रह, संतापरोधन यावर केवळ मानसोपचारच नाहीत, तर थेट चांगली औषधे आहेत आणि ती बाजारात आली आहेत; तरीही या दुःखांचे मोल मोठे असेल. त्यांची उंची आणि सामर्थ्यही अधिक असेल.

‘डुकरांच्या समाधानाहून ॲरिस्टॉटलचे असमाधान श्रेष्ठ आहे’, असे मिल म्हणाला. ॲरिस्टॉटलचे असमाधान तत्त्वज्ञाने जन्माला घालते. स्वतंत्र, मुक्त, मोकळ्या व भौतिक गरजा भागलेल्या माणसाची दुःखेही ॲरिस्टॉटलच्या दुःखासारखी काही नवी निर्मिती करणारीही असतील. कुणी सांगावे, ती दुःखे सुंदर व हवीशी वाटावी अशीही असतील. बुद्ध वा शंकराचार्यांच्या तृष्णेला दुःखाचे नाव कसे देता येईल? माणसांचे विचार-विकार याही काळात कायमच राहणार असल्याने अशा गुणवेत्त्यांचे कौतुक असेल, विकाराधीनांविषयीची चीड असेल, त्यातल्या कशाची आस नसली तरी प्रशंसा ही आजच्यासारखीच प्रोत्साहक तर हेटाळणी खचविणारी असेल. माणूस हा माणूस म्हणून वाढेल किंवा माणूस म्हणूनच कमजोरही होईल... एक मात्र खरे- तो पुन्हा पशूच्या पातळीवर येणार नाही. समाज दिसेल आणि समुदायही दिसतील, मात्र त्यांतले एकसंधत्व गेले असेल. त्यांचे आजचे वर्चस्व इतिहासजमा झाले असेल. त्यात आताच्या मैत्राची जागा क्लबसंस्कृतीने घेतली असेल... हा एकटा जीव समर्थ असेल की नाही, की तेव्हाही हे समुदायच समर्थ असतील, असा प्रश्न एखाद्याच्या मनात येऊ शकतो...

आजवरचा इतिहास सांगतो, समूह निर्जीव असतात. त्यात प्राण फुंकणारा कोणी तरी एकटाच असतो. तो राम असेल, कृष्ण असेल... बुद्ध, जीझस, शिवाजी वा गांधी असेल किंवा तो हिटलरदेखील असेल... अशा प्रेरणा देणाऱ्यांचीच संख्या उद्याच्या जगात मोठी असेल तर?... आणि तेव्हाचे प्रगत वर्ग त्या प्रेरणांचे बरे-वाईटपण तपासून घेणारे असतील तर? त्याएवढे आनंददायी तरी दुसरे काय असेल? पिचलेल्या आणि स्वत्व नसलेल्या गर्दीहून एकच जिवंत व स्वयंप्रेरित माणूस मोलाचा आणि अशा माणसांचे जगही मोठे. ‘स्वतंत्र बुद्धीने निर्णय करू शकणारा व वागू शकणारा एक माणूस म्हणजेच बहुमत’, असे कोण म्हणेल? एखादा समाज एखाद्याच काळात फार लांबची झेप घेताना दिसतो. त्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रांतली मोठी माणसे एकत्र व समांतर कामे करताना दिसतात.

अत्रे म्हणाले, 19 व्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात महापुरुषांचे पेवच फुटलेले दिसले. अमेरिकेच्या राज्यक्रांतीचा काळ असाच होता. गांधींचे सारे अनुयायीच हिमालयाच्या उंचीचे होते. या माणसांत मतभेद असतात, पण त्या साऱ्यांचे अखेरचे ध्येय एक असल्याने त्यांच्या कामाची दिशा ही एकच असते. समाजाच्या इतिहासातला हा अभ्युदयाचा काळ असतो. थेल्स किंवा पायथागोरस ते सॉक्रेटिस व ॲरिस्टॉटल ही ग्रीसमधली तत्त्ववेत्त्यांची मालिका नुसती काळाने मोठी नव्हती, ज्ञानानेही मोठी होती. एक गोष्टही तेवढीच खरी- नंतरचे ग्रीसचे अंधारयुगही तेवढेच मोठे आणि गडद होते. अरबांच्या तत्त्वविचाराचा काळही एवढाच मोठा आणि भारी होता. तो संपला, तेव्हा सुरू झालेले अंधारपर्वही मोठे होते. यातली महत्त्वाची व लक्षात घ्यायची बाब ही की, यातले ज्ञान, तत्त्वज्ञान आणि बुद्धीची झेप हे त्या काळातील थोड्या व्यक्तींचे कर्तृत्व होते; तर त्यांच्यावर नंतर आलेले अंधाराचे सावट ही झुंडीची, गर्दीची आणि समुदायाची सावली होती. ग्रीकांचे तत्त्वज्ञान प्रथम रोमनांनी मोडीत काढले आणि पुढे ख्रिश्चन धर्माने त्याचा शेवट केला. अरबांचे तत्त्वचिंतन इस्लामने संपविले आणि भारतातली ज्ञान-विज्ञानाची परंपरा इथल्याही धार्मिक अंधश्रद्धेने निकालात काढली.

ज्ञान व्यक्तिगत, तर समजुती समूहगत असतात. ज्ञान हे विचाराचे तर श्रद्धा हे विचार थोपविणाऱ्या वृत्तीचे अपत्य असते.  समाजाच्या सुशिक्षित वा अशिक्षित किंवा प्रगत वा अप्रगत असण्याशी याचा संबंध नाही. माणूस नावाच्या गोष्टीचाच तो सद्‌गुण वा दुर्गुण विशेष आहे. कमालीची सेक्युलर माणसे सश्रद्ध असलेली आपण पाहिली आणि थेट कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर असणाऱ्यांना मंदिरात जातानाही पाहिले. धार्मिक माणसे अधार्मिक कृत्यांत अडकलेली आणि धार्मिक नसणारी माणसे सत्कृत्ये करीत असलेलीही आपण पाहिली... म्हणून हा समाजधर्म नाही, तो व्यक्तीचा मनोधर्म आहे.

मध्यंतरी एक बातमी साऱ्यांनी वाचली. भारतीय सैनिकाचा शिरच्छेद करून पाकिस्तानी सैनिकांनी त्याचे डोके फुटबॉलसारखे खेळात वापरले. हे असे वापरले गेलेले डोके त्याच्या जिवंतपणी देवाला नमस्कार करणारे आणि त्याच्या निर्जीव अवस्थेत त्याचा भयकारी खेळ करणारेही दिवसातून पाच वेळा नमाज पढणारे. धर्म माणसाला सत्प्रृवत्तच बनवतो, असे नाही. त्याचा उन्माद वा अतिरेक त्याला क्रूर आणि विक्राळही बनवतो. आपल्या देशातील धार्मिक दंगली शेकडो लोकांचे प्राण घेतात. सामूहिक बलात्कारासारख्या बीभत्स गोष्टी घडवितात. वर तिचे कर्ते स्वतःलाच धर्मवीर असल्याचे टिळे लावतात. सबब, हा कोणत्याही एका देशाचा वा धर्माचा विशेष नाही; तो माणुसकीतला कमीपणाच तेवढा आहे. तर, समष्टी अशी आहे. जगभरात तिचा वर्ग, धर्म आणि झेंडा वेगळा आहे; पण ती आतून सारखी आहे. तिच्या तशा असण्यात अनेकांचे हितसंबंध गुंतले आहेत. ती टिकली, तर ते हितसंबंध टिकतील आणि ती संपली वा सैल झाली, तर यांचेही वर्चस्व कोसळेल.

आताचा समष्टीकडून व्यक्तीकडे जाणारा काळ या माणसांचे आसन डळमळीत करणारा आहे आणि आजची वाढलेली सामूहिक हिंसा हा त्या आसनांच्या बचावाचाच हिंस्र प्रयत्न आहे... एक गोष्ट मात्र यातूनही बळ देणारी. वरवर दिसणाऱ्या या हिंस्र वेगळेपणाच्या तळाशी असलेले माणूसपण अखंड असेल आणि तेच नित्य असेल, तर त्याचाच आधार यापुढच्या काळात जगाला मिळेल. हे माणूसपण वर्गाचे, जातीचे, धर्माचे वा देशाचे नसेल; व्यक्तीचे असेल. व्यक्तीचे विभाजन होत नाही; वर्गांचे, देशांचे व धर्माच्या नावावर माणसांचे विभाजन होते आणि हे विभाजनच सगळ्या अनर्थाला कारण ठरते. विभाजन जाईल आणि व्यक्ती मोकळी होईल. तिचे देश-धर्माविषयीचे अभिनिवेश जातील, बाहेरच्या संस्कारांहून आतून येणारे आदेश तिला महत्त्वाचे वाटतील. हे जग मग शांततेचे होईल, ते माणसांचे असेल. उद्याचे जग हे ईश्वरांचे, धर्मसंस्थापकांचे, राज्यकर्त्यांचे वा पुढाऱ्यांचे असणार नाही; ते सामान्य व स्वयंपूर्ण माणसांचे असेल.

Tags: जे.एस.मिल कार्ल मार्क्स हिलरी क्लिंटन निकोलस सार्कोझी सेगोलाईन रॉयल कार्ला ब्रुनी फ्रॅन्कोईस होलेंडे स्कॅन्डेनेव्हिअन एलिझाबेथ टेलर बराक ओबामा आल्फ्रेड नोबेल द प्राईझ आयर्व्हिंग वॉलेस समष्टी मन्वंतर सुरेश द्वादशीवार J.S. Mill Karl Marx Hillary Clinton Karla Burni Nicolas Sarkozy Segolene Royal Francois Hollande Elizabeth Taylor A.P.J.Abdul Kalam Dr. Manmohan singh Scandinavian Barac Obama Alfred Nobel The Prize Irving Wallace Samshti Manvantar Suresh Dwadashiwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात