Diwali_4 ... माझे घर आड आले
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

... त्याचे म्हणणे खरेच होते. आम्ही ते शांतपणे ऐकून घेत असतानाच खांद्यावर पिते पोर घेऊन फाटक्या वस्त्रातली एक गरीब मुलगी पुढे आली. पाहता पाहता तिने त्या बोलणाऱ्याची कॉलर पकडली आणि सारे अवाक्‌ होऊन पाहात असतानाच त्याच्या थोबाडीत लगावून ती त्वेषाने म्हणाली, ‘या भाड्याचे ऐकू नका साहेब, हा त्यांना मिळाला आहे. याचे स्वस्त धान्याचे दुकान आहे. त्यातले सारे धान्य हा त्यांना परस्पर देतो आणि आम्हांला उपाशी ठेवतो.’ तो तरुण स्वतःची सोडवणूक करून घेत होता. त्याच्या मदतीला कोणी येत नव्हते. साऱ्यांच्याच डोळ्यात त्या मुलीचे कौतुक होते... ती पुढे म्हणाली, ‘साहेब, माझ्या नवऱ्याला अण्णा लोकांनी (नक्षलवाद्यांनी) याच चौकात बकऱ्यासारखे कापले तेव्हा हा भडवा खदाखदा हसत होता. मी याचे पाय धरले. माझ्या नवऱ्याला वाचव म्हणून सांगून पाहिले. पण हा मलाही लाथाडत होता. याचे काय ऐकता? हा अण्णा लोकांचा भडवा आहे.’... 

मार्क्स समूहाजवळ सुरू होतो आणि व्यक्तीपर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. मी व्यक्तीजवळ सुरू होतो आणि तिच्याचजवळ पोहोचून थांबतो अशा शब्दांत गांधीजींनी त्यांचा मार्क्सच्या विचारसरणीपासूनचा वेगळेपणा स्पष्ट केला. या स्पष्टपणात एक द्रष्टेपण दडले आहे. सगळ्या समूहवादी व समूहाश्रयी विचारसरणी मागे पडणार व संपत जाणार आणि त्यांची जागा व्यक्तिकेंद्री व माणूससंबद्ध विचारप्रणाली घेणार हे गांधीजींना दिसत होते. समूहाच्या संदर्भात स्वतःचा विचार करणारी माणसे एक दिवस स्वतःच्या संदर्भात समूहाचा विचार करतील किंवा करणारही नाहीत याची जाण आलेला तो आपल्या काळातील पहिला महापुरुष होता... मात्र त्याचा व्यक्तिकेंद्री विचार समाज नाकारणाराही नव्हता.

व्यक्तीचे वेगळेपण आणि समाजाचे व्यापक अस्तित्व या दोन्ही गोष्टी एकाच वेळी लक्षात घेणारा ‘सिंधू आणि बिंदू’ यांच्यातील वेगळेपणाएवढाच त्यांच्या प्रकृतीतील साधर्म्याची सत्यता ध्यानात घेणारा होता. भारतीय तत्त्वपरंपरेत सिंधू आणि बिंदू यांचे साधर्म्य व वेगळेपण मान्य करणारा प्रवाह फार पूर्वी आला. पाश्चात्त्यांध्येही अशा परंपरा आहेत. मात्र हा परंपरागत अध्यात्मशाखीय विचार, समाज व माणूस यांच्या आजच्या आचार व विचारधर्मात आणून वसविण्याचा व त्याची सत्यता साऱ्यांच्या लक्षात आणून देण्याचा गांधीजींचा प्रयत्न त्या साऱ्यांहून वेगळा, त्या साऱ्यांहून भव्य आणि अत्याधुनिक होता. अजूनही त्याचे नवेपण कायम आहे आणि आताच्या जगाची वाटचालही त्याच दिशेची आहे.

वेगळेपण जाणवणे आणि परावलंबित्वाचीही जाण असणे हे आजचे स्वभाववैशिष्ट्य आहे... शांघायचा समुद्रकिनारा दंतूर आहे. त्याच्या मुख्य भूभागाला समांतर अशी लांबचलांब मोठी पण अरुंद बेटे आहेत. शिवाय बऱ्याचशा खाड्या आणि भूशिरांनीही तो किनारा गजबजला आहे. त्यातल्या बेटांवर अतिशय सुरेख, उंच आणि प्रकाशाने नटलेल्या वैभवशाली इमारती आहेत. मधल्या अरुंद खाड्यांत बोटींचा राबता आहे. त्यातून फिरणारी देशी व विदेशी माणसे, शाळकरी मुलामुलींचे देखणे झुबके, खूप नटलेले आणि बिनधास्त दिसणारे तरुणांचे आणि तशाच नखशिखांत आत्मविश्वासाने मिरविणाऱ्या तरुणींचे घोळके खाड्यांच्या दोन्ही किनाऱ्यांवर. त्यातल्या बोटींमधून साऱ्या सौंदर्याचा संगीतानिशी आस्वाद घेत आणि आनंदात... त्या सगळ्या सुरेख गर्दीत मी आणि माझे दोन स्नेही एका बोटीवर आहोत. तो विलोभनीय परिसर डोळ्यात साठवत आहोत. पाहता पाहता मी त्या दृश्याचा भाग बनतो. त्याचाच एक वाटा.

ते शांघाय आहे, ते चीनचे शहर आहे, त्यातली अवतीभवतीची माणसं चिनी आहेत, ती भारतीय नाहीत, मराठी नाहीत आणि त्यांच्या देशाशी आपल्या देशाचे एक युद्ध झडले आहे, झालेच तर त्या युद्धाच्या जखमा ताज्या आहेत आणि हे सारे क्षणात विस्मरणात जाते. मी तिथला होतो. मनाने. शांघायकर, चिनी. त्या देखण्या परिसराचा एक अंश आणि तो सगळा परिसरही मीच होतो... जरा वेळानं मनात येतं, या क्षणी आपल्यासोबत कोणी हवं होतं. ते चिनी नको, इथलं नको, असं नको, थेट आपलं, जवळचं, ओळखीचं, नुसतं भारतीयच नाही, मराठी, माझी भाषा बोलू शकणारं आणि समजू शकणारं... काही क्षणांपूर्वीचा माझा सिंधू बिंदू झाला असतो... मी मग मोबाईलवर कुणा एकाशी स्वतःला जोडून घेतो. मोबाईलवर आलेलं माणूसही असं हळवं की नुसतंच रडत असतं. एवढ्या दूरवरून आलेला एवढा जवळचा आवाज ऐकून त्याचं असं झालेलं असतं. तोही इथं असतो शांघायमध्ये आणि इथं असतो त्याच्याजवळ... वॉल्टर फ्रीडमन म्हणतो तसं, जग लहानच नाही तर ते सपाटही झालं असल्याचा, ते हाताच्याच अंतरावर नाही तर उराच्या अंतरावर आलं असल्याचा हा अनुभव.

हा मी नंतरही खूपदा घेतला. कोपनहेगनच्या समुद्र किनाऱ्यावर, स्टॉकहोमधल्या आल्फ्रेड नोबेलच्या घराजवळ, हेलसिंकीतल्या नोकियाच्या सुनसान हेडक्वार्टरजवळ, नॉर्वेतल्या बर्फाळ डोंगरावर परीसारखे नाचणाऱ्या मुलीला पाहून आणि सेंट पिट्‌सबर्गधल्या विलक्षण देखण्या वस्तुसंग्रहालयात... प्रवासात आणि मुक्कामात... तिथल्या माणसांशी बोलताना आणि त्यांचे धावते आयुष्य पाहताना... हो, मॅक्झिम गॉर्कीच्या घरासमोर उभा राहिलो आणि काही क्षणांत नाशिकातले तात्यांचे घर डोळ्यासमोर आले. रवींद्रनाथांची ठिकाणेही आठवली.. अद्वैतासोबतच द्वैत आणि द्वैतासोबतच अद्वैत. अध्यात्माचा अनुभव नाही पण तो तसा खराच असेल तर तो याहून वेगळा कसा असेल?

लक्षात येते ते हे की जगातले कोणतेही ठिकाण दूरचे नाही आणि तिथली माणसेही लांबची नाहीत. ती दूरची वा लांबची वाटण्याची कारणे माझ्याच मनात दडली आहेत. आपल्या मनाच्या खिडक्या बंद असल्याने ते दुरावे निर्माण झाले आहेत. हे आपल्याएवढे त्यांच्याही बाबतीत खरे आहे. मनाची खिडकी उघडी करणे हे दुसऱ्या कोणाचे काम नाही. ती आपणच खुली करायची असते. मग कोणताही देश, कोणताही माणूस वा कोणतेही क्षेत्र दूरचे वा परके राहत नाही आणि ते आपले झाल्याच्या आनंदाएवढा दुसरा आनंदही कोणता नाही... साहित्याची वा कोणत्याही कलेची निष्ठाच ही की जगातली माणसे सारखी असतात. त्यांची मने परस्परांहून वेगळी नसतात. त्यांच्या आनंद व दुःखांचे विषय सारखे असतात आणि त्यांची त्याविषयीची दृष्टीही एकच असते. मी जे पाहतो ते इतरांनाही पाहता येते आणि ते मला दिसते तसेच इतर साऱ्यांनाही दिसत असते. ज्या गोष्टीचा मला आनंद होतो ती इतरही साऱ्यांना आनंदी करते आणि माझ्या दुःखाचे विषय इतरांनाही दुःखी करीत असतात. त्यामुळे कोणतीही बाब ‘माझी’ वा ‘त्याची’ असत नाही. ती आपली सर्वांची असते.

शेक्सपियरच्या नाटकातली पात्रे इंग्लंड आणि युरोपातली असली तरी ती माझी होतात याचे कारण या वास्तवात शोधता येते. महाभारतातल्या पात्रांची सुखदुःखे माझ्याही सुखदुःखांचे विषय होतात याचेही कारण हेच... सर्वांभूती सारखेपण म्हणतात त्याचा अर्थ याहून वेगळा नाही... यातली अडचण एकच, शेक्सपियर असो वा व्यास, त्यांच्या प्रतिभेचे वैभवी मोठेपणच हे की त्याला देशकालाची क्षितिजे नाहीत. त्या भिंतीपल्याड जाऊन माणसातल्या खऱ्या जाणिवांपर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. ज्यांचे लिखाण, कविता, चित्र वा गाणे असे थेट अंतःकरणापर्यंत पोहोचते त्या साऱ्यांतच या कमीअधिक सामर्थ्याचा शोध आपल्याला घेता यावा. हे असे आतवर पोहोचायला प्रतिभाच लागते असेही नाही. साधे माणूसपणही असे आतवर येऊन भिडत असते. न पोहोचणारी माणसेच खरे तर दुबळी असतात. त्यांची कुंपणे त्यांच्याहून भारी असतात. आपल्याच मर्यादेत अडकलेल्या या माणसांना स्वतःपलीकडे जाता येत नसेल तर ती आपल्यापर्यंत तरी कशी पोहोचतील?

माझा एक शाळकरी मित्र होता. काशीनाथ. मॅट्रिकच्या वर्गापर्यंत आम्ही एकत्र होतो. पुढे मी कॉलेजात गेलो आणि तो विद्युत्‌ मंडळात लाइनमन म्हणून कामाला लागला. वर्षे लोटली. मी प्राध्यापक झालो. काशीनाथ होता तिथे आणि तसाच राहिला. मात्र त्याचे वागणे- बोलणे पूर्वीएवढेच अभिमानाने भरलेले राहिले. भेटला की आम्ही पूर्वीसारखेच बोलायचो. कधी घरी आला तर तो हक्कानं माझ्या पत्नीला ‘वहिनी, चांगला चहा कर’ म्हणायचा... काही वर्षांनी मी माझी पहिली कार घेतली. पहिल्याच दिवशी ती घेऊन कॉलेजात जात असताना पलीकडून येत असलेला काशीनाथ दिसला. त्याच्या सायकलच्या हँडलला विजेच्या तारांचे भेंडोळे अडकविले होते. मला पाहून तो ओरडला, ‘अरे, ही गाडी कोणाची?’... मी गाडी घेतल्याचे त्याला सांगायची मला लाज वाटली. काही एक न बोलता मी संकोचून जाऊन त्याला जवळ बोलावले. तोही रस्त्याच्या कडेला त्याची सायकल ठेवून जवळ आला. त्याला तसाच गाडीत घेऊन मी कॉलेजात गेलो. रस्त्यात त्याची नेहमीची टकळी चालू होती. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये नेऊन त्याला चहा पाजला आणि कमालीच्या संकोचाने आणि काहीसा भीतभीत त्याला म्हणालो, ‘काशीनाथ, अरे आपण गाडी घेतली बघ.’ त्यावर त्याने काय म्हणावं? अगदी सहज बोलल्यासारखा तो म्हणाला, ‘तू घेतलीस, अरे बरं झालं. आपल्यापैकी कुणाचकडे नव्हती ती’ .... त्या एका वाक्यानं काशीनाथ श्रीमंत झाला आणि त्यानं मला कायमचं दरिद्री बनवून टाकलं... हा काशीनाथ नंतरही भेटत राहिला. पूर्वीसारखाच. निर्मळ आणि निर्भेळ. त्याच्या तारांच्या भेंडोळ्यांनी त्याला बांधलं नाही आणि त्याच्या माझ्या मैत्रीत पुन्हा माझी गाडीही कधी आली नाही.

जे प्रसंग आणि ज्या व्यक्ती अशा घटनांनी आपल्या जीवनाचा भाग बनतात त्यात आपण प्रत्यक्ष अनुभवलेल्या बाबी वा जवळच्याच व्यक्ती असतात असे नाही. हिलरी क्लिंटन यांनी लिहिलेले ‘लिव्हिंग हिस्टरी’ हे आत्मचरित्र वाचताना व विशेषतः त्यातला बिल क्लिंटन व मोनिका लेवेन्स्की या प्रकरणाचा आलेख वाचत असताना हिलरींच्या मनाची झालेली अवस्था खोलवर हेलावून गेली. तशी मनःस्थिती अनुभवलेली जवळची माणसेही मग आठवली. त्या आठवांनी ती माणसे आणखी जवळ आणली आणि लक्षात आले, हिलरीही आता दूरच्या राहिल्या नाहीत. त्याही आपल्या आयुष्याचा भाग बनल्या आहेत... याहून महत्त्वाचा अनुभव बेनझीर भुट्टोंचे ‘डॉटर ऑफ द ईस्ट’ हे विलक्षण प्रत्ययकारी आत्मचरित्र अनुभवतानाचा. त्यातले दोन प्रसंग फार खोलवर परिणाम करून गेले. सिमला कराराच्या वेळी तिच्या वडिलांनी, झुल्फिकार अली भुट्टो यांनी सतरा वर्षांच्या बेनझीरला आपल्या सोबत आणले होते. इंदिरा गांधींशी त्यांची महत्त्वाची चर्चा सुरू असतानाही इंदिराजी आपल्याकडे कमालीच्या शोधक व आपुलकीच्या नजरेने पाहात असल्याची जाणीव बेनझीरला होत होती.

त्याविषयी लिहिताना ती म्हणते, इंदिराजींचे वडील पं.नेहरू हेही आपल्यासोबत इंदिराजींना परदेश दौऱ्यात न्यायचे. माझ्या वडिलांनी मला आपल्यासोबत आणलेले पाहून त्यांना त्यांचे ते दिवस आठवत असावे. कदाचित त्यांना त्यांच्या वडिलांची आठवणही होत असावी... हे वाचताना बेनझीर ही कोणा शत्रुदेशाच्या नेत्याची मुलगी राहिली नव्हती. शेजारच्या घरच्या जाणत्या मुलीसारखी झाली होती... त्या काळात सिमल्याच्या रस्त्यावरून फिरत असताना तिथल्या अनेक लॉकिनवारांनी तिला फुले देण्याचे आणि त्यांतल्या एकदोघांनी तिला थेट लग्नाची मागणी घालण्याचे धाडसही दाखविले. अशा वेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातली सीमारेषा वा युद्धबंदीचे कुंपण कुठे हरवते?

बेनझीरने तिच्या आत्मचरित्राचा आरंभच दि. 4 एप्रिल 1979 च्या पहाटे तिच्यावर गुदरलेल्या जीवघेण्या अनुभवाने केला आहे. पाकिस्तानचे पहिले लोकनियुक्त पंतप्रधानपद भूषविलेल्या तिच्या वडिलांना त्या पहाटे रावळपिंडीच्या केंद्रीय कारागृहात झिया उल हक्‌ या तेव्हाच्या लष्करशहाने फासावर चढविले होते. भयभीत होऊन त्या घटनेची सारी रात्र वाट पाहणारी बेनझीर तिच्या आईसोबत शेजारच्या पोलीस छावणीत रडत आणि ओरडून उठत होती... सकाळी तिला कारागृहाचे बोलावणे आले तेव्हा निदान आपल्या वडिलांचा मृतदेह आपल्या पाहाता येईल या आशेने ती तिच्या आईसोबत तेथे कशीबशी हजर झाली. मात्र ती पोहोचण्याआधीच झुल्फिकार अलींचे शव पाकिस्तानच्या लष्करी यंत्रणेने कोणा अज्ञात स्थळी हलविल्याचे तेथे तिला सांगण्यात आले. या प्रसंगातून जावे लागलेल्या बेनझीरचे मनासमोर उभे राहिलेले नुसते चित्रही पायाखालची जमीन हादरून टाकणारे होते. अशा वेळी बेनझीर ही झुल्फिकार अलींची मुलगी उरत नाही, पाकिस्तानची नागरिक व पुढे त्या देशाच्या पंतप्रधानपदावर दोनदा आलेली शक्तिशाली महिला राहत नाही, तिच्या आत्मचरित्राच्या नावासारखी ती मग पूर्वेची कन्याही नसते... साधी बेनझीर असते. कोणा अभागी बापाची एक असहाय आणि पिचलेली लेक असते. मग सगळी अंतरे मिटतात, दुरावे संपतात, वैरे विरघळतात आणि ती आपल्याचपैकी कुणीतरी एक होऊन जाते.

दुःख माणसांएवढेच प्रदेशांनाही जवळ आणते असे म्हणतात. पण ते पूर्णपणे खरे नसावे. कारण 2008 पर्यंत परका वाटलेला अमेरिका हा देश, त्याने बराक ओबामा या कृष्णवर्णी नेत्याला आपल्या अध्यक्षपदी निवडले त्या क्षणापासून मला व माझ्यासारख्या अनेकांना जवळचा व आपला वाटू लागला. ओबामा, बेनझीर वा हिलरी यांची नावे मोठी आहेत आणि ती जगाला ठाऊक आहेत म्हणूनच असे घडते असे नाही... 2007 च्या एप्रिल महिन्यात मी माझ्या अडीचशेवर सहकाऱ्यांच्या सोबतीने गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त अरण्यप्रदेशातून एक हिंसाचारविरोधी लोकयात्रा काढली. आसरअली या त्या जिल्ह्याच्या दक्षिणेकडील टोकावर असलेल्या गावाहून निघालेली ही यात्रा 25 दिवस चालून कुरखेडा-धानोरामार्गे गडचिरोलीला आली. त्या यात्रेदरम्यान जिमलगट्टा हे दाट अरण्यात  गडप असलेले गाव सोडून आम्ही कमलापूर या खेड्यात पोहोचलो. सगळे गावकरी, सारे मिळून दीडशेच्या आसपास असावेत, बायकापोरांसह गावाच्या कडेला एका रस्त्यावर गर्दीत आम्हांला भेटले. आमच्यातल्या एकाने -हिंसाचाराला भिऊ नका, आम्ही आणि सारा देश तुच्यासोबत आहोत. आम्ही हिंसेच्या विरोधात आहोत, कुठल्या वादाच्या विरोधात नाही.. इ.. इ.. सांगणारे भाषण केले. त्या गर्दीतून एक चांगला पोशाख केलेला तरुण पुढे आला. भाषण करणाऱ्याला मध्येच अडवून तो म्हणाला, ‘हे सांगायला तुम्हांला काय होते.. तुम्ही आज आहात, उद्या जाणार. आम्हांला त्यांच्यासोबत रहावे लागते. आम्हांला त्यांना मदतही करावी लागते. जोपर्यंत त्यांच्या ताब्यात आहोत तोपर्यंत आम्ही त्यांचेच ऐकणार.’

... त्याचे म्हणणे खरेच होते. आम्ही ते शांतपणे ऐकून घेत असतानाच खांद्यावर पिते पोर घेऊन फाटक्या वस्त्रातली एक गरीब मुलगी पुढे आली. पाहता पाहता तिने त्या बोलणाऱ्याची कॉलर पकडली आणि सारे अवाक्‌ होऊन पाहात असतानाच त्याच्या थोबाडीत लगावून ती त्वेषाने म्हणाली, ‘या भाड्याचे ऐकू नका साहेब, हा त्यांना मिळाला आहे. याचे स्वस्त धान्याचे दुकान आहे. त्यातले सारे धान्य हा त्यांना परस्पर देतो आणि आम्हांला उपाशी ठेवतो.’ तो तरुण स्वतःची सोडवणूक करून घेत होता. त्याच्या मदतीला कोणी येत नव्हते. साऱ्यांच्याच डोळ्यात त्या मुलीचे कौतुक होते... ती पुढे म्हणाली, ‘साहेब, माझ्या नवऱ्याला अण्णा लोकांनी (नक्षलवाद्यांनी) याच चौकात बकऱ्यासारखे कापले तेव्हा हा भडवा खदाखदा हसत होता. मी याचे पाय धरले. माझ्या नवऱ्याला वाचव म्हणून सांगून पाहिले. पण हा मलाही लाथाडत होता. याचे काय ऐकता? हा अण्णा लोकांचा भडवा आहे.’... माझ्या जवळ आणि यात्रेत सहभागी झालेल्या साऱ्यांजवळ त्याक्षणी जेवढे पैसे होते तेवढे सारे जमा करून आम्ही त्या अभागी पण शूर बाईची पूजा बांधली...

त्या यात्रेला आता पाच वर्षे झाली. पण ती मुलगी अजून डोळ्यासमोर येते. यात्रेतल्या साऱ्यांना ती घरच्यासारखी आठवते. आमच्यातले अनेकजण तिला अजून भाऊबीज पाठवतात. आता ती आदिवासी नाही आणि आम्ही नागर नाही. मनानं एक झालो आणि अजूनही तसेच आहोत. ती यात्रा एका अंधाऱ्या सायंकाळी गट्‌ट्याला पोहोचली. सोबतच्यांच्या राहण्याची व्यवस्था लागेपर्यंत मी तो गाव फिरून पाहिला. ते फिरणे अवघ्या दहा मिनिटांत संपले. तहान लागली म्हणून मग एका झोपडीसमोर उभे राहून मी प्यायला पाणी मागितले. जेते चार-पाच वर्षांचे एक उघड्या अंगाचे पोर बाहेर आले. त्याने मला घरातून पाणी आणून दिले. ...‘तुझ्या घरी कोणीच कसे नाहीत’ मी त्याला कुतूहलाने विचारले. ...‘होते ते सारे अण्णा लोकांनी कापले साहेब’ तो शांतपणे म्हणाला. आमच्या यात्रेतल्या एकाने मग त्या मुलाला दत्तकच घेतले.

माझे आता किती आप्त झाले? त्यांतले सख्खे कोणते आणि मिळवलेले कोणते? पण मला त्यांच्यात कुठला फरक जाणवत नाही... यात त्यांतल्या थोड्या लोकांचा उल्लेख आहे. पण अशा जवळच्यांची संख्या मोठी आहे... या माणसांच्या आपुलकीत देशांच्या, धर्मांच्या, जातीपातींच्या, भाषेच्या वा प्रदेशाच्या भिंती आडव्या येत नाहीत. त्यांची ख्याती वा नसलेपण उभे राहत नाही. त्यांची संपत्ती व गरिबी याही त्या जवळिकीच्या कसोट्या होत नाहीत... पण असे नेहमी का होत नाही? हे मन नेहमीच असे उघडे आणि मोकळे का राहत नाही? माझ्याच मर्यादा माझ्या मार्गात अशा का येतात?

माझ्यासमोर सागर, त्यासी आकाश टेकले

झाली असती त्रिवेणी, माझे घर आड आले

असं कोण म्हणालं? कोणी संत की कोणता कवी?

(‘मन्वंतर’च्या तिसऱ्या आवृत्तीत नव्याने समाविष्ट केलेल्या चार लेखांपैकी एक लेख.)

Tags: गडचिरोली डॉटर ऑफ द ईस्ट बेनझीर भुट्टों लिव्हिंग हिस्टरी हिलरी क्लिंटन शांघाय सुरेश द्वादशीवार Gadchiroli Daughter of the east Benazir Bhutto Living History Hillary Clinton Shanghai Suresh Dwadashiwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात