डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

एप्रिल महिन्यात झालेल्या सत्याग्रहात पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराने स्वरूपाराणी रक्तबंबाळ झाल्या, पण त्याही स्थितीत त्या इतर सत्याग्रहींसोबत राहून तुरुंगात गेल्या. बाहेर त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली तेव्हा सत्याग्रहींनी अहिंसाही थांबवली आणि ते प्रत्यक्ष संघर्षात उतरले. या घटनेच्या बातम्या वाचून नेहरू प्रक्षुब्ध झाले आणि शांततामय सत्याग्रहांपासून दूर झालेल्यांची त्यांनी जाहीर निर्भर्त्सना केली. मात्र त्याच वेळी त्यांच्या मनात आले, ‘रक्तबंबाळ अवस्थेत धुळीत पडलेल्या आपल्या आईच्या जागी आपण असतो तर?’ एक महिन्यानंतर स्वरूपाराणी नेहरूंना भेटायला बरेलीच्या तुरुंगात गेल्या. त्या वेळी त्यांच्या कपाळाभोवती बँडेज बांधले होते. त्याचा त्यांना अभिमान वाटत असलेलाही नेहरूंना दिसला.   

गोलमेज परिषदेत फारसे काही साध्य होईल, असे नेहरूंना आरंभापासूनच वाटत नव्हते. त्या परिषदेत गांधीजी त्यांची नेहमीची भूमिका मांडतील आणि ऐकणारेही ती त्यांना ठाऊक असल्यासारखे ऐकतील. परिषदेतल्या साऱ्यांच्या भूमिका निश्चित आहेत आणि त्या सर्वांना ठाऊकही आहेत. गांधींना संपूर्ण स्वातंत्र्य हवे व तेही एकात्म भारताचे हवे. मुस्लिम लीगला विभक्त मतदारसंघ हवेत आणि ते मिळणार नसतील तर स्वतंत्र राष्ट्र हवे. हिंदुत्ववाद्यांच्या प्रतिनिधींना बहुसंख्येसाठी जास्तीचे प्रतिनिधित्व व विशेष धार्मिक अधिकार हवेत आणि दलितांना विभक्त मतदारसंघ हवेत. इंग्रजांना यातले सोईचे तेवढेच देता येईल आणि गैरसोईचे ते सारे ते सहजपणे अमान्यही करतील. प्रत्यक्ष गांधींनाही या परिषदेचे फलित कळत होते. 

दि.12 सप्टेंबरला ते फोलास्टोन या बंदरात उतरून लंडनला आले. तिथे त्यांचा मुक्काम म्युरिएल लेस्टन या भारताच्या बाजूने लढणाऱ्या महिलेच्या घरी होता. त्यांची पहिली व अनौपचारिक भेट भारतमंत्री सॅम्युअल होअर यांच्याशी झाली. ते काँझर्व्हेटिव्ह पक्षाचे होते. इंडिया हाऊसमध्ये झालेल्या या पहिल्याच भेटीत होअर यांनी ‘‘भारताला तत्काळ स्वातंत्र्य देण्याच्या मताचे आम्ही नाहीत. वसाहतीचे स्वराज्यदेखील आम्ही लगेच देणार नाही.’’ असे स्पष्टपणे ऐकविले. ‘‘मात्र वसाहतीच्या स्वराज्याच्या दिशेने काही पावले टाकण्याची आमची तयारी आहे.’’ असेही त्यांनी गांधींना सांगितले. गांधीजींना त्यांचा राग आला नाही, उलट त्यांच्या स्पष्टवक्तेपणावर प्रसन्न होऊन त्यांनी त्यांचे अभिनंदनच केले. 

पुढचा प्रकार साऱ्यांना अपेक्षित होता तसाच झाला. सारी परिषद हिंदू-मुस्लिम प्रश्न व त्या दोन धर्मांतील वेगळेपण आणि तेढ यावरच दीर्घ काळ चर्चा करीत राहिली. परिषदेला बरेच प्रतिनिधी हजर असल्याने त्यांच्यातही त्या प्रश्नावर दोन वा अधिक तट पडताना दिसले. मदनमोहन मालवीय, जयकर व मुंजे यांना हिंदूंचा देश हवा होता आणि त्यावर ते अडले होते. मुसलमानांसोबतचा कोणताही समान करार त्यांना नको होता. जीना आरंभी सौम्य व एकात्मतेची भूमिका घेत होते. मात्र त्याच वेळी त्यांच्या मनात पाकिस्तानच्या निर्मितीची भावनाही डोकावू लागली होती. या परिषदेत गांधीजींनी मुसलमानांबाबत जशी कडक भूमिका घेतली तशी हिंदूंबाबत घेतली नाही, अशी टीका नंतर झाली. मात्र सर्व वर्गांना सोबत घेण्याची भूमिका घेणाऱ्या नेत्याला जसे वागावे वा बोलावे लागते, तसेच गांधी बोलले व वागले होते. परिषदेतले दृश्यही गांधींविरुद्ध सारे असेच मग होत गेले. 

मुसलमान, शीख, दलित या सगळ्यांनाच वेगळे मतदारसंघ हवे होते आणि ते आगाखानांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले दिसले. ते वेगळ्या मतदारसंघांपुढे जाऊन नोकऱ्या व शिक्षणातही राखीव जागांपर्यंत पोहोचले होते. गांधीजींविषयीचा विद्वेष असणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनाही त्या परिषदेत गांधींना काही मिळू द्यायचे नव्हते. परिणामी, स्वदेशातले बाकीचे विरोधक आणि इंग्रज सरकार हे सारेच त्यांचे विरोधक बनलेले दिसले. या स्थितीत ती परिषद फारशी पुढे सरकणार नव्हती आणि तशीच ती सगळ्या अपयशासह शेवटापर्यंत गेली. 

अखेरच्या क्षणी गांधीजी तेथील अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधींना उद्देशून म्हणाले ‘‘प्रथम स्वातंत्र्याच्या प्रश्नावर आपण एक होऊ या. आपसातले मतभेद व मतदारसंघांच्या विभागणीचे प्रश्न नंतर आपसात सोडवू या...’’ यावर त्यांचे उत्तर मात्र ‘आधी मतभेद व विभक्त मतदारसंघांचा प्रश्न आणि मगच स्वातंत्र्य’ असे होते.. यावर ‘तुम्ही तुमच्या जातीय व्यवस्थेवर राजकीय तोडगा काढू शकत नसाल, तर सरकार तो काढेल’’ असे बजावून पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी ती परिषद संपविली. 

अपेक्षेनुसारच अपयशी झालेल्या त्या परिषदेनंतर गांधीजी परतीच्या प्रवासाला निघाले. या वेळी त्यांना झालेले सवार्धिक दु:ख दलितांनी केलेल्या विभक्त मतदारसंघांच्या मागणीचे होते. ही मागणी हिंदू धर्मात व देशातही फूट पाडणारी आणि दलितत्वाला कायद्याची मान्यता देणारी आहे, असे त्यांच्या मनाने घेतले. परतीच्या प्रवासात त्यांनी त्यांचे चरित्रकार रोमाँ रोलाँ यांची 5 डिसेंबरला भेट घेतली. दि.28 डिसेंबरला भारतात परतताच त्यांना मिळालेले पहिले वृत्त नेहरू आणि गफार खान यांच्या अटकेचे होते. ‘व्हाईसरॉयांनी दिलेली ही ख्रिसमस भेट आहे,’ अशी त्या वृत्ताची संभावना करून गांधीजींनी पुन्हा एकवार देशाची सूत्रे हाती घेतली. 

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नेहरूंना अटक झाली होती. अपेक्षेनुसार शेते पिकली नव्हती आणि सरकार शेतसारा कमी करायला वा शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार उतरून द्यायला तयार नव्हते. उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीने त्याही स्थितीत शेतकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. गुजरातमध्येही तसाच प्रकार होता. नेहरूंनी गांधींना तार करून त्यांचा सल्ला विचारला, तेव्हा- ‘तुमच्या विवेकाने निर्णय घ्या.’ असे त्यांनी तारेनेच नेहरूंना कळविले. गोलमेज परिषदेच्या बातम्यांमुळे देशातील जहालांएवढाच धर्मांध शक्तींनाही जोर चढला होता. हिंदू व मुसलमान आपसातील तेढ वाढवीत होते. इंग्रज सरकारच्या प्रतिनिधींएवढेच प्रशासनही त्यांना प्रोत्साहन देत होते. लॉर्ड इर्विन यांनी गांधी व काँग्रेस यांना दिलेला बरोबरीचा दर्जा त्यांच्या अजून पचनी पडला नव्हता. या स्थितीत उत्तर प्रदेशच्या मुसलमानांचे एक नेते तसद्दुक अहमद खान शेरवानी आणि काँग्रेसमधील हिंदुत्ववादी मताचे पुढारी पुरुषोत्तमदास टंडन यांनी काँग्रेसकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन करण्याची मागणी मांडली. या मागणीतले खरेपण आणि राजकारण या दोन्हींची कल्पना नेहरूंएवढीच सरदारांनाही होती. मात्र त्यांच्या प्रचारामुळे शेतकऱ्यांमध्येच फूट पडेल, अशी धास्ती त्या दोघांनाही वाटत होती. 

परिणामी, उत्तर प्रदेश काँग्रेसने शेतकऱ्यांना एका सौम्य आंदोलनाचे आवाहन केले. सरकारने करात सूट दिली नाही तर शेतकऱ्यांचे आंदोलन उभे करण्याची सूचना गुजरात  काँग्रेसने सरकारला दिली. उत्तर प्रदेशच्या प्रांतिक सरकारने या घटनांची दखल घेत राज्यात अटकसत्र सुरू केले. ते सत्र पुढे गुजरात व बंगालपर्यंतही गेले. यातच पहिली अटक नेहरूंना झाली. हा काळ बंगालमध्येही वाढत्या असंतोषाचा होता. बंगाली जनतेला गांधी-इर्विन करार मुळातच आवडला नव्हता आणि त्यातल्या सशस्त्र क्रांतिकारकांनी ठिकठिकाणी त्याविरुद्ध उठाव आणण्याचे प्रयत्नही केले होते. सरकारनेही आपल्या दडपशाहीला सुरुवात करून कलकत्त्याजवळ हिजीली या गावी एक मजबूत तुरुंग उभारला आणि त्यात क्रांतिकारकांसोबतच काही लढाऊ काँग्रेस कार्यकर्त्यांना डांबले. या तुरुंगात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, त्याच सुमारात मिदनापूर येथे तीन ब्रिटिश न्यायाधीशांचे खून झाले.

बंगालमध्ये यानंतर सरकारचा तीव्र कोप ओढवणार म्हणून नेहरूंनी कलकत्त्याला भेट दिली. तेथील काँग्रेस कमिटीला काही काळ दम धरण्याची व गांधीजींचा निर्देश येण्याची वाट पाहा, अशी सूचना केली. या वेळी त्यांना दोन क्रांतिकारी तरुण भेटायला गेले आणि त्यांनी ‘तुमचा शांततावाद आमच्या मार्गात अडथळे उत्पन्न करतो, तो आवरता घ्या’ अशी धमकी दिली. नेहरूंनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा ‘तुम्ही आमचं ऐकणार नसाल, तर आम्ही जे इतरांचे केले तेच तुमचेही करू’, असे त्यांना ऐकविले. 

नेहरू अलाहाबादला परतले तेव्हा उत्तर प्रदेशातला शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आला होता. बंगाल व उत्तर प्रदेशच्या काँग्रेस कमिट्यांनी तेव्हा एकाच वेळी देशात तीव्र आंदोलन उभे करण्याची, स्वदेशीची व सविनय कायदेभंगाची चळवळ नव्याने सुरू करण्याची मागणी केली. या काळात वायव्य सरहद्द प्रांतही अशांत झाला होता. सरकारने खान बंधूंना चर्चेसाठी दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले. पण ते नाकारून त्यांनी गांधीजींची भेट घेण्याची तयारी केली. परिणामी, 24 डिसेंबरला सरकारने त्या दोघांना त्यांच्या इतर सहकाऱ्यांसोबत अटक केली. नेहरूंनाही तुरुंगाबाहेर राहायला आता दोनच दिवस उरले होते. 

अलाहाबादहून कर्नाटकातील काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला ते यायला निघाले. वाटेत सोबत असलेल्या कमला नेहरूंना त्यांच्या आजाराखातर त्यांनी मुंबईच्या इस्पितळात दाखल केले. मात्र  कर्नाटकच्या वाटेवर असतानाच उत्तर प्रदेश सरकारने टंडन यांना अटक केल्याची बातमी त्यांना समजली व ते मागे वळले. अलाहाबादला पोहोचण्याआधीच त्यांना चौकीच्या छोट्याशा स्टेशनवर अडवत ‘अलाहाबादेत प्रवेश करता येणार नाही, असे पोलिसांनी बजावले. तो आदेश झुगारून नेहरू अलाहाबादला आले आणि तेथील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून ‘तुमचा आदेश मला मान्य नसल्याचे’ त्यांनी कळविले. त्या पत्राला जिल्हाधिकाऱ्याने लिहिलेल्या उत्तरात नेहरूंच्या नावाचे स्पेलिंग चुकले होते. त्यासाठीही त्याला खडसावणारे पत्र नेहरूंनी नंतर लिहिले. 

मात्र त्यांना अलाहाबाद जिल्ह्याच्या सीमेवर लगेचच अटक करून तुरुंगात बंद केले. त्यांच्यावरील खटलाही तुरुंगातच चालविला गेला. त्याच दिवशी गांधी व पटेल यांनाही देशाच्या अन्य भागात अटक झाली आणि कोणत्याही सुनावणीवाचून त्यांचीही तुरुंगात रवानगी झाली. मुंबईला पोहोचताच गांधीजींनी लॉर्ड लिनलिथगो यांना तार करून भेटीची मागणी केली. तिला दिलेल्या उत्तरात व्हाईसरॉयने या भेटीत बंगाल, उत्तर प्रदेश व वायव्य सरहद्द प्रांत यात जे घडले आणि यासंबंधीचे जे आदेश सरकारने काढले, त्यांची चर्चा या भेटीत करता येणार नाही- असे कळविले. गांधीजींना नेमक्या त्याच गोष्टी बोलायच्या होत्या. 

आपल्या उत्तरात त्यांनी लिहिले, ‘काँग्रेस पक्ष पुन्हा एकवार सविनय कायदेभंगाची तयारी करीत आहे. तशी चर्चा त्याच्या कार्यकारिणीत सुरू आहे. तुम्ही बोलणी करणार नसाल, तर ते आंदोलन मला फार काळ थांबविता येणार नाही.’ त्यावर ‘मी सत्याग्रहाच्या भयापोटी बोलणी करणार नाही’ हे विलिंग्डन यांनी गांधींना कळविले. दुसऱ्याच दिवशी 6 एप्रिलला गांधींना सरकारने अटक केली. ‘अहिंसेपासून ढळू नका, सत्याग्रहापासून दूर जाऊ नका आणि स्वातंत्र्याचे लक्ष्य विसरू नका’ हा त्यांचा त्या वेळचा देशाला संदेश होता. 

त्याच वेळी नेहरू व शेरवानी हेही तुरुंगातच होते. त्यात शेरवानींना सहा महिन्यांची व दीडशे रुपये दंडाची, तर नेहरूंना दोन वर्षांची आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली गेली. त्यावर ‘शिक्षा सुनावण्यातही धर्म आडवा येतो काय?’ या शेरवानींच्या प्रश्नाला न्यायालयाने उत्तर देणे टाळल्याचे दिसले. त्यानंतर सरकारने काँग्रेस पक्षच बेकायदा असल्याचा सार्वत्रिक आदेश काढला. दि.10 जानेवारीला देशभरातील सर्व काँग्रेस नेत्यांना अटक करण्यात आली आणि नंतरच्या चार महिन्यांत ऐंशी हजार लोक तुरुंगात पाठविले गेले. 

या वेळी सत्याग्रहात सामील झालेल्या अनेक स्त्रियांनाही अटक झाली. स्त्रियांचा सहभाग वाढू नये, म्हणून सरकारने त्यांना सक्तमजुरीच्या व कठोर शिक्षा सुनावण्याचे धोरणही या वेळी आखले. नेहरूंच्या आई स्वरूपाराणी व त्यांच्या दोन बहिणींना या वेळी अटक होऊन त्यांनाही प्रत्येकी एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली गेली. अनेकींना दोन व तीन वर्षांच्या शिक्षा झाल्या. मात्र त्यामुळे त्यांचा उत्साह मावळल्याचे वा त्यातल्या पुरुष सत्याग्रह्यांवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे कुठे दिसले नाही. साध्या घोषणा देणाऱ्या वा एकत्र येणाऱ्यांनाही असे कारावासात डांबले जात होते. 

सर सॅम्युअल होअर या वेळी पार्लमेंटमध्ये म्हणाले, ‘‘या वेळी युद्धविराम होणार नाही.’’ एप्रिल महिन्यात झालेल्या सत्याग्रहात पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराने स्वरूपाराणी रक्तबंबाळ झाल्या, पण त्याही स्थितीत त्या इतर सत्याग्रहींसोबत राहून तुरुंगात गेल्या. बाहेर त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली तेव्हा सत्याग्रहींनी अहिंसाही थांबवली आणि ते प्रत्यक्ष संघर्षात उतरले. या घटनेच्या बातम्या वाचून नेहरू प्रक्षुब्ध झाले आणि शांततामय सत्याग्रहांपासून दूर झालेल्यांची त्यांनी जाहीर निर्भर्त्सना केली. मात्र त्याच वेळी त्यांच्या मनात आले, ‘रक्तबंबाळ अवस्थेत धुळीत पडलेल्या आपल्या आईच्या जागी आपण असतो तर?’ एक महिन्यानंतर स्वरूपाराणी नेहरूंना भेटायला बरेलीच्या तुरुंगात गेल्या. त्या वेळी त्यांच्या कपाळाभोवती बँडेज बांधले होते. त्याचा त्यांना अभिमान वाटत असलेलाही नेहरूंना दिसला.
 

Tags: suresh dwadashiwar swarup rani nehru satyagrah jawharlal nehru weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात