डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

धर्म माणसाचे मन गढूळ करतो, कारण त्याचा भर जुनाट व न सुटलेल्या प्रश्नांच्या कोड्यांवर असतो. त्यामुळे सरळ व प्रबळ विचारांचे मार्ग अडतात. मंदिरे, मशिदी किंवा कर्मकांडे हे प्रकार त्यांना आक्रमक बनवितात. तरीही नेहरूंना भगवद्‌गीतेची शिकवण आवडे. माणसांना माणसांची भाषा कळत असताना आणि जगातले वास्तव अवगत करून घेण्याची क्षमता त्यांच्यात असताना त्यात हा ईश्वर कशाला हवा, असा प्रश्न मग त्यांना पडायचा. डॉ.कैलाशनाथ काटजू म्हणत, ‘‘नेहरू परमेश्वराच्या जवळच असत, पण त्यांचे तसे असणे समाजाला कळत नसे. कर्माला बांधून घेण्याची व फलाची आसक्ती न धरण्याची गीतेची शिकवण ज्याने आत्मसात केली, तो ईश्वराच्या जवळच असेल की नाही? ईश्वराकडे त्याची मागणी व्यक्तिगत नसेल आणि न बोलताही तो समाजाच्या कल्याणाची मागणी मनात बाळगत असेल, तर तो वास्तवात ईश्वराच्या जवळ असेल की नाही?’’ 

या काळात तुरुंगातच असलेले बापूही स्वस्थ नव्हते. रॅमसे मॅक्‌डोनाल्ड जाहीर करणार असलेला जातीय निवाडा त्यांना अस्वस्थ करीत होता. विशेषत: त्यातील दलितांच्या राखीव जागांची सूचना त्यांना देश व धर्म यात फूट पाडणारी आणि स्वातंत्र्याचे आंदोलन दुबळी करणारी दिसत होती. त्यांनी होअर यांना या वेळी लिहिलेल्या पत्रात ती चिंता व्यक्त करताना म्हटले ‘ब्रिटिश सरकार दलितांसाठी राखीव मतदारसंघ निर्माण करणार असेल, तर त्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू करण्याखेरीज माझ्याजवळ दुसरा मार्ग उरणार नाही.’

हे पत्र लिहिताना त्यांच्यासोबत सरदार पटेल व महादेवभाई देसाईच तेवढे होते. नेहरूंना या घटनांची माहिती नव्हती. ती समजताच नेहरूंनी या एकूणच भूमिकेविषयी आपली काहीशी नापसंती बापूंना कळवली. त्यांना पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘स्वातंत्र्याचे खरे मोल समाजातील पीडितांच्या उत्थानात पाहायचे आहे. मात्र त्यासाठी स्वातंत्र्याच्या मूळ लढ्याहून आपली दृष्टी विचलित होऊ नये, एवढीच माझी चिंता. राजकीय प्रश्नांसाठी तुम्ही धार्मिक व आध्यात्मिक मार्गांचा अवलंब करता, तेव्हा मी गोंधळतो. पण तुमच्यासारख्या जादूगाराला मी उपदेश तरी कसा करणार?’

नेहरूंना तेव्हाच्या कायदेभंगाच्या चळवळीत आलेली शिथिलता चिंताजनक वाटत होती. मात्र ‘पुणे करारा’ने त्याच्या शेवटालाही एक चांगले निमित्त मिळाल्याचा त्यांना आनंद झाला. तरीही तुरुंगात असताना गांधीजींना सरकारने या वेळी दिलेल्या अनेक सोईसवलतींमुळे नेहरू अस्वस्थ झाले होते.

दलित नेत्यांच्या वारंवार होणाऱ्या भेटी, त्यांना मार्गदर्शन व त्यांच्याशी चर्चा करण्याची सोयच सरकारने त्यांना उपलब्ध करून दिलेली या वेळी देशाला दिसली. ‘‘गांधीजींचे लक्ष सविनय कायदेभंगाकडून दलित मुक्तीच्या लढ्याकडे वळवणे, ही काँग्रेस व सरकार या दोहोंसाठीही एक चांगली बाब आहे,’’ असे या वेळी भारतमंत्री सॅम्युएल होअर पार्लमेंटमध्ये म्हणालेही. मात्र पुणे कराराने साऱ्या दक्षिणेतील दलितांमधला उत्साह वाढलेला व त्यांची सर्व धर्मांविषयीची तेढही वाढलेली दिसली. गांधीजींचा उपदेश समन्वय व शांततेचा असला, तरी पुणे कराराने दलितांमध्ये सबलीकरणाचा संदेश रुजला होता.

याच वेळी राजेंद्रबाबूंनी कलकत्त्याला काँग्रेसचे अधिवेशन भरविण्याचे जाहीर केले, तर सरकारने ते होऊ न देण्याचा चंग बांधला. या अधिवेशनाला जायला निघालेल्या स्वरूपाराणींना असनसोल येथे अटक करून पाच दिवस तुरुंगात डांबले गेले. कलकत्त्याच्या मार्गावर असणारे हजारो काँग्रेस कार्यकर्ते असेच पकडले गेले. पण त्याही स्थितीत अधिवेशन यशस्वी होऊन त्यात सरकारविरोधी ठराव मंजूर केले गेले. अधिवेशन भरले आहे, त्यात चर्चा चालल्या आहेत आणि पोलिसांची पथके त्यावर चाल करून त्यातील माणसांना पकडून नेत आहेत, असेही दृश्य त्या वेळी देशाला दिसले. दरम्यान, कर्मठ हिंदूंचा पुणे कराराला असलेला विरोधही टोकदार होताना दिसला. आंबेडकरांवरही तो करार केल्याबद्दल टीका होऊ लागली. त्या साऱ्यांना शांत करण्यासाठी गांधीजींनी मग 21 दिवसांचे उपोषण जाहीर केले. ‘आत्मशुद्धी’साठी केलेले हे उपोषण 8 मे रोजी सुरू झाले. नेहरूंना हाही प्रकार आवडला नाही. तरीही त्यांनी ‘आमचे तुमच्यावरील प्रेम कायम आहे,’ अशी तार गांधींना पाठविली.

सविनय कायदेभंग थांबला होता. त्याऐवजी गांधीजींनी व्यक्तिगत सत्याग्रह सुरू करण्याची घोषणा केली होती. याच वेळी त्यांनी साबरमती आश्रम कायमचा सोडला. ब्रिटिशांना ती गांधीजींची माघार वाटली. त्यामुळे गांधीजींनी भेटीच्या वेळी केलेल्या मागण्या व्हाईसरॉयने फेटाळल्या. अठरा महिने चाललेल्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात एक लाखाहून अधिक लोक तुरुंगात गेले होते. आताचा व्यक्तिगत सत्याग्रह तेवढा मोठा राहणार नव्हता. सबब तुरुंगातील राजबंद्यांची सुटका करा, ही गांधींची मागणी सरकारने फेटाळली. दि.31 जुलैला सरकारने गांधीजींनाच अटक करून येरवड्याच्या कारागृहात आणले. मात्र पाचच दिवसांनी त्यांची मुक्तता करून त्यांनी पुणे शहराबाहेर कुठेही जाऊ नये, असा आदेश त्यांना दिला. तो त्यांनी अमान्य केल्यानंतर त्यांना एक वर्षांची शिक्षा सुनावली गेली. या वेळी गांधींनी पुन्हा एकवार बेमुदत उपोषणाची घोषणा केली. तेव्हा सरकार त्यांना काही अटींसह मुक्त करायला तयार झाले. गांधीजींनी त्या अटी पुन्हा अमान्य केल्या, तेव्हा त्यांना इस्पितळात दाखल केले गेले आणि पुढे दोनच दिवसांनी त्यांना सोडूनही देण्यात आले.

याच काळात नेहरूंना डेहराडूनच्या तुरुंगातून नैनीच्या तुरुंगात हलविले गेले. मात्र स्वरूपाराणींची प्रकृती अचानक बिघडल्याने लवकरच त्यांची सुटका केली गेली. या वेळी ते पाच महिने तेरा दिवस मोकळे राहिले होते. आता कारावास नेहरूंच्या अंगवळणी पडला होता. लहान, मोठे, स्वच्छ, घाणेरडे आणि जीव घुसमटणारे असे सारे तुरुंग त्यांनी अनुभवले होते. दि.26 डिसेंबर 1931 रोजी मुंबईला जायला निघाले असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. या वेळी त्यांना तब्बल चार वर्षे तुरुंगात काढावी लागली. दि.4 सप्टेंबर 1935 या दिवशी ते अल्मोडाच्या तुरुंगातून बाहेर पडले.

तुरुंगवास हा एक कमालीचा चमत्कारिक संस्कार आहे. तो माणसाला अंतर्मुख बनवतो. कधी निराश करतो, तर कधी त्याच्या आशा जागवतो. त्यात स्नेही नसतात, सोबती नसतात, जवळचे वा बाहेरचे वाटावे असेही कोणी नसतात. त्यातून नेहरूंची उंची असलेल्या माणसाशी जवळीक साधण्याचे धाडस त्यांच्या सत्याग्रही सहकाऱ्यांतील अनेकांना जमतही नसे. मग नेहरूंनी आकाशाशी मैत्री केली. ते आकाशाचे बदलते रंग तासन्‌तास पाहत. त्यातून उडत जाणारे पक्षी पाहत. तुरुंगात येणारे व राहणारे पोपट आणि कबुतरांची निरीक्षणे करीत. त्यांचे प्रेम, त्यांच्यातल्या हाणामाऱ्या  आणि त्यांचा नंतरचा सहवास हे सारे त्यांच्या मनावर कोरले जाई. एका कारावासात त्यांची एका खारीशी मैत्री झाली. ती त्यांच्या गुडघ्यावर येऊन बसे आणि तिच्या ऐटबाज हालचाली पाहत नेहरूंचा वेळ चांगला जाई. कधी उंच आकाशात घिरट्या घालणाऱ्या घारी आणि गरुड दिसत. नेहरू त्यांचीही मनात नोंद ठेवत. त्यांना योगासनांचा नाद होता. दर दिवशी सकाळी किमान पंधरा मिनिटे ते शीर्षासन करीत. प्राणायाम आणि योगिक आसने करीत. पुढे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी एडगर स्नो या संपादकाला शीर्षासनाचे लाभ समजावून सांगितले, तर ‘स्टेट्‌समन’च्या संपादकासोबत प्राणायामही दीर्घ काळ केला. प्रकृतीचे महत्त्व व सुदृढ शरीराचे माहात्म्य त्यांना त्यांच्या कुटुंबातील आजारी माणसांनीच लक्षात आणून दिले होते. वय वाढत गेले तसतसे ते गंभीर होत गेले. त्यांचे अधीरेपण व चटकन्‌ निर्णयावर येण्याचा त्यांचा स्वभाव मंदावत गेला. ते जास्तीचे हळवेही होत गेले.

तुरुंगातले अधिकारी कैद्यांशी दुष्टाव्याने वागत. 1933 मध्ये आपण पाचशे सत्याग्रह्यांना चाबकांनी फोडून काढल्याची कबुली सरकारनेच इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये दिली. त्याआधी ‘शांततामय सत्याग्रह करणारेही आपले शत्रू आहेत, सबब त्यांनाही दयामाया दाखवण्याचे कारण नाही.’ असे सरकारकडून सांगण्यात आले. नेहरू अशा वेळी अस्वस्थ होत. तुरुंगाधिकाऱ्यांकडे ते तक्रारी करीत व सत्याग्रह्यांना भेटून त्यांना धीर देत. तुरुंगात माकडेही फार येत. त्यांच्याविषयीचा एक प्रसंग नेहरूंच्या मनावर कायमचा कोरला गेला. तुरुंगातल्या कैद्यांनी माकडाचे एक पिलू पकडले आणि त्याला दोराने बांधून ते त्याच्याशी खेळू लागले. काही वेळातच मोठ्या माकडांची एक झुंड तुरुंगात उतरली.

प्रथम त्यांनी कैद्यांना भिववून दूर केले आणि आपल्या पिलाला पोटाशी घेऊन त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवरून बाहेर उड्या घेतल्या. तुरुंगात आणि प्रत्यक्ष बराकीत कधी साप येत, विंचवांचा वावर असे. पालीही येत, पण त्या येत आणि जात. त्यांचा फारसा उपद्रव नेहरूंना झाला नाही. त्यांना वाचायला फार लागे. ते कादंबऱ्याही वाचत. पण त्यातून त्यांना समाधान मिळत नसे.

एकदा त्यांनी ‘डिक्लाईन ऑफ द वेस्ट’ हे पुस्तक जेलरला मागितले. मात्र ते पाश्चात्त्यविरोधी असल्याचे सांगून जेलरने ते त्यांना द्यायला नकार दिला. ‘मॉरल मॅन अँड इम्मॉरल सोसायटी’ या पुस्तकाने त्यांना बरेच विचारप्रवृत्त केले आणि त्यांच्या धर्मविषयक समजुतीही त्याने पक्क्या केल्या. त्यांच्या मित्राने पाठविलेले कॅथॉलिसिझमवरचे ग्रंथही या काळात त्यांनी वाचले. त्यात त्यांना सेवाधर्म आढळला. शिवाय हिंदू आणि मुसलमान धर्मातले मानवी मूल्यही त्यांच्या लक्षात आले. पण त्याहून प्रोटेस्टंट पंथातले स्वातंत्र्य त्यांना अधिक भावले. मात्र त्यातला ज्यूविरोध व धर्मश्रद्धांना कडवे बनवण्याचा प्रकार त्यांना आवडला नाही. त्यापेक्षा त्यांना चीनच्या ताओचे तत्त्वचिंतन अधिक आवडले.

जीवनाबाबत त्यात आलेले दर्शन त्यांना काही काळ नीतीचा अधिक विचार करायला लावणारे वाटले. शांतता हाच जीवनाचा खरा मार्ग आहे, हे मूल्यही मग त्यांना आपले वाटले. शिवाय वर्तमानातील समाजाचे कल्याण मृत्यूनंतरच्या जगातील आनंदाहून मोठे आहे, हेही त्यांना मनोमन वाटू लागले. संघटित धर्म हे कालांतराने कडवे व आक्रमक होतात आणि त्यात हितसंबंधांची गर्दी होते व ते युद्धाच्या दिशेने जातात, असेही त्यांचे मत या वेळी बनले. धर्म माणसाचे मन गढूळ करतो, कारण त्याचा भर जुनाट व न सुटलेल्या प्रश्नांच्या कोड्यांवर असतो.  त्यामुळे सरळ व प्रबळ विचारांचे मार्ग अडतात. मंदिरे, मशिदी किंवा कर्मकांडे हे प्रकार त्यांना आक्रमक बनवितात. तरीही नेहरूंना भगवद्‌गीतेची शिकवण आवडे. स्वामी विवेकानंदांचे लिखाण व उपदेश पटत असे. भगवद्‌गीता हा ग्रंथ ते आपल्यासोबतही सदैव बाळगत. मात्र गांधीजींसह अनेक पुढाऱ्यांच्या भाषणात येणारे ईश्वराचे व धर्मांचे संदर्भ त्यांना आवडत नसत.

माणसांना माणसांची भाषा कळत असताना आणि जगातले वास्तव अवगत करून घेण्याची क्षमता त्यांच्यात असताना त्यात हा ईश्वर कशाला हवा, असा प्रश्न मग त्यांना पडायचा. डॉ.कैलाशनाथ काटजू म्हणत, ‘‘नेहरू परमेश्वराच्या जवळच असत, पण त्यांचे तसे असणे समाजाला कळत नसे. कर्माला बांधून घेण्याची व फलाची आसक्ती न धरण्याची गीतेची शिकवण ज्याने आत्मसात केली, तो ईश्वराच्या जवळच असेल की नाही? ईश्वराकडे त्याची मागणी व्यक्तिगत नसेल आणि न बोलताही तो समाजाच्या कल्याणाची मागणी मनात बाळगत असेल, तर तो वास्तवात ईश्वराच्या जवळ असेल की नाही?’’

‘कोणत्याही आदर्शाच्या उपलब्धीसाठी सगळ्या अडथळ्यांवर मात करीत आणि व्यक्तिगत त्याग करीत निर्भयपणे पुढे जात राहणे, ‘हाच खरा धर्म’- ही जॉन ड्युर्इंची धर्माची व्याख्या नेहरूंना मान्य होती.

एकोणिसाव्या शतकातली लोकशाहीही नेहरूंना आवडणारी नव्हती. सगळी विषमता व तीत दडलेले अन्याय यावर घातलेल्या राजकीय पांघरुणासारखी ती होती, असे ते म्हणत. तीत न्याय नाही, राजकीय समता नाही, समाजात कुठल्याही तऱ्हेची सत्यता नाही आणि त्यातले शोषण संपले असेही नाही. त्यातला वर्गसंघर्ष व वर्गीय शोषण कायमच होते, असे ते म्हणत. या वेळी तुरुंगात असताना त्यांनी ‘दास कॅपिटल’ व ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ हे दोन्ही ग्रंथ बारकाईने वाचले. त्यातली अन्यायाची समाप्ती व तिच्यासाठी करावी लागणारी समाजक्रांती यातला तर्क त्यांना आवडला. मात्र त्यात केलेली हिंसेची तरफदारी त्यांना कधी रुचली नाही. इंदिराला या वेळी लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात-

‘मार्क्स इतिहासाचा विज्ञाननिष्ठ अभ्यास करतो. त्याची प्रमेये शास्त्रशुद्ध असतात. तो तर्कनिष्ठ आहे. पण माणूस आणि समाज तर्कानेच जातो, असे मात्र नाही. तरीही मार्क्स समाजाच्या वर्तमान स्थितीशी थांबत नाही, ती बदलण्याचा कार्यक्रम देतो. तो कृतिशील विचारवंत आहे. स्वत:ला मार्क्सवादी म्हणवणाऱ्या त्याच्या पुढच्या अनुयायांनी त्याच्या शास्त्राला आक्रमक बनविले, हा त्यातला दुर्दैवी भाग.’ मात्र मार्क्सवाद्यांनी मार्क्सच्या विचारांची केलेली पोथीही त्यांना आवडली नाही. लेनिनने मार्क्सच्या कार्यक्रमात वर्तमान राजकीय स्थितीला अनुकूल असे जे बदल केले, ते मात्र नेहरूंना आवडणारे होते. या संदर्भात त्यांनी एन्जल्सचे एक वाक्यही इंदिरेला लिहिलेल्या पत्रात उद्‌धृत केले आहे- ‘मार्क्स हा मार्क्सवादी नव्हता, ही आपल्यावरील ईश्वराची कृपाच मानली पाहिजे.’

रशियाच्या राज्यकर्त्यांनी आखलेल्या व यशस्वीपणे राबविलेल्या पंचवार्षिक योजनांचे नेहरूंना आकर्षण होते, मात्र त्या राबविताना त्यांनी हाताळलेली हुकूमशाही अतिशय क्रूर आणि विद्रूप होती. भारत हा युरोपसारखा उद्योगप्रधान देश नव्हता. त्याचे प्रश्न शेतीशी व नव्या उद्योगांच्या उभारणीशी जुळले होते. त्यांच्यावरील नियंत्रण आणि त्यांच्या उत्पन्नाच्या न्याय्य वाटपापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला काही अवधी द्यावा लागणार होता. शिवाय मार्क्सला हवी असलेली क्रांती शस्त्राचारी होती. तिचे स्वरूपच हिंस्र होते. उद्योगपतींची हत्या आणि नायनाट यावरच त्याचा विश्वास होता.

याउलट, भारतात गांधीजींच्या प्रभावामुळे हिंसा हा पर्याय शिल्लकच राहिला नव्हता. हिंसेशिवाय राज्यक्रांती करता येणे शक्य आहे, हे गांधींनी येथे सिद्ध केले होते. जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त हित अहिंसेच्या व शांततापूर्ण नियोजनाच्या मार्गाने भारतात साध्य करता येण्याजोगे होते. नेहरूंना मार्क्सवाद पटणारा होता. पण त्याचे ते अतिशय कठोर चिकित्सकही होते. डाव्यांनी केलेले शोषणही त्यांना मान्य होत नव्हते. शोषण व्हायचेच असेल तर ते राज्याने केले पाहिजे आणि त्यातून येणाऱ्या संपत्तीचा लाभ समाजाला झाला पाहिजे, असे ते म्हणत. त्यासाठी वर्गांचे संघर्ष नकोत. सरकारचे कायदे हवेत आणि त्यांना जनतेची साथ हवी.

Tags: इंदिरेस पत्र मार्क्सवाद सुरेश द्वादशीवार महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू letter to Indira markswad suresh dwadashiwar mahatma Gandhi Pandit Jawaharlal Nehru weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात