डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

नेहरूंना लखनौच्या तुरुंगात धाडले गेले त्यावेळी तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी राजबंद्यांवर कडक बंधन घातली होती. ‘हा तर तुरुंगातला तुरुंग आहे’ ही नेहरूंची त्यावरची नोंद. यावेळी मोतीलालजी नैनीच्या तुरुंगात बंद होते. तुरुंगात प्रचंड उकाडा होता आणि नेहरूंच्या बराकीत बरीच माणसेही कोंबली होती. या कारावासात त्यांना घरच्या आठवणींची ओढ लागली होती. आईच्या, पत्नीच्या आणि चार वर्षांच्या इंदिरेच्या आठवणींनी ते हळुवार झाले होते. मुलांचे हसणे ऐकायला येत नसे. महिलांचे आवाज नाहीत आणि एक दिवस त्यांना आठवले आपण कुत्र्यांचे भुंकणेही खूप दिवसांत ऐकले नाही. मग त्यांनी वाचनाकडे लक्ष वळविले. त्यांची ती भूक मोठी होती. एवढी की एकदा त्यांचा तुरुंगाधिकारी त्यांना म्हणाला ‘मला तुमची वाचनाची क्षमता कळतच नाही? मी माझे सारे वाचन वयाच्या बाराव्या वर्षीच पूर्ण केले आहे.’  

गांधीजींनी 1921 हे वर्ष त्यांच्या सहकाऱ्यांसोबत साऱ्या देशात अहिंसा, स्वदेशी, चरखा आणि भंगीमुक्तीसारख्या योजनांचा प्रचार करण्यात घालविले. नेहरूही अनेक जागी त्यांच्यासोबत होते. या देशात स्वातंत्र्य येईल ते याच जनतेच्या प्रयत्नांतून. शहरी बैठका व त्यातील चर्चा यातून ते येणार नाही. देश बळकट करायचा आणि स्वातंत्र्यासाठी सिद्ध करायचा, तर ग्रामीण भागातला शेतकरीच त्याच्या साऱ्या अडचणींवर मात करून उभा होणे गरजेचे आहे, ही बाब याच काळात त्यांच्या मनात गांधींनी आणखी रुजविली. 
ते गांधीजींकडे अधिकाधिक आकृष्ट होत गेले. त्यांच्या भाषणातली धर्मवचने त्यांना आवडायची नाहीत; मात्र फलाची आशा न धरता कर्म करीत राहण्याची गीतेतली शिकवण जेव्हा गांधीजी लोकांना समजावीत तेव्हा नेहरू भारावत आणि गांधीजींच्या आत्मसामर्थ्याची त्यांची जाण आणखी दृढ होत जाई. गांधीजींची ‘रामराज्य’ ही कल्पनाही त्यांना प्रथम बुचकळ्यात टाकत असे. पण गांधी त्याचा अर्थ कल्याणकारी राज्य असा करतात, हे लक्षात घेऊन तेही मग त्या संकल्पनेचा उच्चार करू लागले. चरखा हे स्वराज्याचे साधन होऊ शकेल, असे त्यांना प्रथम वाटले नाही. पण देशातील लाखो माणसे व स्त्रिया जेव्हा चरखा चालवू लागल्या आणि खादीची दुकाने ग्राहकांनी भरलेली दिसू लागली, तेव्हा चरख्यासारख्या साध्या गोष्टीला राष्ट्राचे प्रतीक बनविण्याचे गांधींचे सामर्थ्यही त्यांच्या लक्षात आले. 
गांधीजींची साधने साधी होती, पण त्यात सामर्थ्य ओतण्याचे त्यांचे बळ फार मोठे होते... याचा साक्षात्कार पुढे नेहरूंएवढाच साऱ्या देशाला मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी झालाही. असहकाराच्या चळवळीला जसजसा जोर चढत गेला, तसतसे सरकारचे अत्याचार वाढत गेले. प्रथम सर्व काँग्रेस नेत्यांच्या हालचालींवर व प्रवासावर सरकारने बंदी आणली. वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफ्फार खान ऊर्फ सरहद्द गांधी यांना त्यांच्या भाषणाखातर अटक झाली. गांधींनी देशाला हा अन्याय शांततेने सहन करायला सांगितले. मात्र त्यांचा असहकाराचा संदेश विलक्षण परिणामकारक ठरला. शेकडो सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोकऱ्या सोडल्या. वकिलांनी व्यवसाय बंद केले. विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळांमधून आपली नावे काढून घेतली. असहकाराच्या या आंदोलनामुळे देश बेकायदा बनेल, अशी भीती टागोरांना वाटली व ती त्यांनी गांधींना कळविली. गांधींचे त्याला उत्तर होते- ‘यातून देशभक्त घडतील’... 
1921 च्या जुलैमध्ये काँग्रेसने विदेशी मालावर बहिष्कार घालण्याचे देशाला आवाहन केले. या वेळी मुंबईत झालेल्या विदेशी कापडांच्या होळीच्या वेळी गांधीजी स्वत: हजरही राहिले. दुर्दैवाने याच सुमारास, ऑगस्ट महिन्यात केरळात मोपल्यांनी बंड केले. या बंडात तिथे राहणारे अरब वंशाचे लोक अग्रभागी होते. ब्रिटिशांचे राज्य गेल्याची अफवा त्या बंडाला कारण ठरली आणि तीत अनेक हिंदू व्यापाऱ्यांचा व सावकारांचा बळी गेला. सरकारने हे बंड कठोरपणे शमविले. मात्र त्याने हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या मोहिमेलाच तडा गेला. 
1924 मध्ये तुर्कस्तानच्या मुस्तफा केमाल पाशाने खिलाफतच रद्द केली, तेव्हा तिच्यासोबतच या मोहिमेचीही समाप्ती झाली. त्याआधी 10 मे 1921 या दिवशी नेहरूंच्या बहिणीचा- विजयालक्ष्मींचा (सरूप) विवाह रणजीत पंडित या तरुण वकिलाशी झाला. संस्कृतसह जगातील अनेक भाषांवर प्रभुत्व असलेल्या या रणजीत पंडितांनीच कल्हणाने काश्मीरच्या इतिहासावर लिहिलेल्या राजतरंगिणी या काव्यग्रंथाचा इंग्रजी अनुवाद केला. त्याला नेहरूंनी लिहिलेली प्रस्तावना भाषेच्या अभ्यासकांनी वाचलीच पाहिजे एवढ्या काव्यमय उंचीवर जाणारी आहे. 
दरम्यान, काँग्रेस नेत्यांच्या अटकेचे सत्रही देशात सुरू होते. अली बंधूंना अटक झाली. नेहरूंवर पकडवॉरंट निघाले. अशा धगधगत्या काळातच इंग्लंडच्या राजसत्तेला आपल्या राजपुत्राला- प्रिन्स ऑफ वेल्सला- भारताच्या सदिच्छा भेटीवर पाठविण्याची बुद्धी झाली. त्याची भेट भारतात सौहार्द निर्माण करील असा सरकारचा अंदाज होता, तो खोटा ठरला. काँग्रेस पक्षाने राजपुत्राचा अपमान न करता त्याच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम घोषित केला. 
मात्र राजपुत्राचे आगमन मुंबईत होताच त्या शहरात सरकारविरोधी दंगली उसळल्या. त्यात 50 जण पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडले, 400 वर लोकांना अटक झाली व त्या घटनेचे लोण साऱ्या देशात पसरत गेले. 
या प्रकाराचे प्रायश्चित्त म्हणून गांधीजींनी उपोषण आरंभले. देशातल्या दंगली त्यामुळे तत्काळ शमल्या आणि 22 नोव्हेंबरला गांधीजींनी ते उपोषण मागे घेतले. मात्र सविनय कायदेभंगाच्या चळवळीने देशातले वातावरण तापतेच ठेवले. सारे जीवनव्यवहार ठप्प झाले. बाजार, शाळा आणि सरकारी कार्यालये- एवढेच नव्हे तर लोकांनी आपापली घरेही बंद केली. राजपुत्राचे स्वागत मग अशा बंद भारताने केले... 
सरकारने काँग्रेस आणि खिलाफत या दोन्ही संघटनांवर 19 नोव्हेंबरला बंदी घातली. काँग्रेसचे तेव्हाचे अध्यक्ष देशबंधू दास यांच्यासह अनेकांना तुरुंगात टाकले गेले. देशबंधूंनी या वेळी देशाला दिलेला संदेश होता ‘सारा देशच तुरुंग झाला आहे. मात्र त्यातही काँग्रेसचे आंदोलन सुरू राहिले पाहिजे. माझ्या अटकेने वा मृत्यूने या कार्यावर कोणताही परिणाम होऊ नये.’ पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या सर्व प्रांतांत मग अटकसत्र सुरू झाले. सरकारने उत्तर प्रदेशची सगळी काँग्रेस कमिटीच सामूहिकरीत्या तुरुंगात टाकली. 
नेहरूंना व मोतीलालजींना सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली. तुरुंगातून त्या दोघांनीही जनतेला उद्देशून लिहिले, ‘स्वराज्य मिळेपर्यंत आताचा असहकाराचा अहिंसात्मक लढा अखंड चालू द्या.’ डिसेंबर 21 ते जानेवारी 22 या काळात मग सरकारनेही आपली सूड मोहीम राबविली. तीत 30 हजारांवर लोकांना अटक करून तुरुंगात डांबले गेले.  तुरुंगातले नेहरूंचे आयुष्य कमालीचे शिस्तबद्ध होते. सकाळी उठताच आपली राहण्याची जागा स्वच्छ करणे, आपले व वडिलांचे कपडे धुणे, व्यायाम, वृत्तपत्रांचे वाचन, सूतकताई आणि चर्चा. 
तुरुंगात असताना नेहरूंनी अनेक छंद जोपासले होते. त्यातला एक बागकामाचा. आपल्या सहकाऱ्यांसह तुरुंगातल्या छोट्याशा आवारात ते भाज्या पिकवत. त्यासाठी विहिरीचे पाणी मोटेने ओढून त्यांना पाणी देत. दुसरा त्यांचा छंद वाचनाचा आणि तिसरा जमिनीवर एखादे अंथरुण टाकून नुसतेच आकाश न्याहाळण्याचा. एका कारावासात त्यांनी सूतकताईच्या जोडीला विणकाम शिकून घेतले. ‘मी आता वस्त्रस्व यंपूर्णता मिळविली आहे’, असे त्या वेळी त्यांनी लिहून ठेवले. (आफ्रिकेच्या कारावासात असताना गांधीजींनी कातडे कमावण्याची व चपला शिवण्याची कला अवगत केली होती त्याची येथे आठवण व्हावी.) आपण फार चांगला स्वयंपाक करतो, असेही नेहरूंना वाटायचे. (मात्र त्यांच्या सोबत्यांच्या मते अंडी उकडणे आणि चहा करणे याखेरीज त्यांना काही येत नसे. देशातल्या सर्व नेत्यांत सर्वोत्तम स्वयंपाक करायचे ते सरदार पटेल. पुढे अहमदनगरच्या तुरुंगातला सारा काळ आपल्या सहकाऱ्यांचा स्वयंपाक ते बॅरिस्टरच करायचे आणि तो चवदारही असायचा.) 
काही काळ आपल्यासोबतच्या इतर कैद्यांना शिकविण्याची कामगिरी नेहरूंनी अंगावर घेतली, पण सरकारच्या निर्बंधांमुळे त्यांना ती थांबवावी लागली. तुरुंगात डासांचा त्रास असायचा. तो नेहरूंनाही हैराण करायचा. त्याने त्यांचे सारे अंग सुजायचे. 
एक दिवस त्यांना भेटायला म्युरिएल लेस्टर हा इंग्रजी मित्र आला. नेहरूंना तसे पाहून तो म्हणाला, ‘‘हे तुम्ही सहन करता?’’ नेहरू हसून म्हणाले, ‘‘पूर्वी हे सहन व्हायचे नाही. मी डास मारत बसायचो. पण मग मी तो हिंसाचार सोडला आणि डासांशी समझोता केला. आता ते त्यांचे काम करतात आणि मी माझे.’’ 
फेब्रुवारीच्या मध्याला गांधीजींनी असहकाराचे आंदोलन एकाएकी मागे घेतले. त्या वेळी उत्तर प्रदेशातील चौरीचुरा या खेड्यातील संतप्त जमावाने बावीस पोलिसांना त्यांच्या चौकीत कोंडून जिवंत जाळले होते. त्या हिंसेने गांधीजी कळवळले होते. मात्र त्यासाठी सत्याग्रह मागे घेण्याचा त्यांचा निर्णय नेहरूंसह कोणत्याही नेत्याला आवडला नाही. ‘सरकार दर वेळी असे निमित्त उकरून काढून स्वराज्याचा लढा थांबवील आणि मग देश कधी स्वतंत्रच होणार नाही’ अशा आशयाची पत्रे त्यांना नेहरूंसह इतर अनेकांनी पाठविली. 
मोतीलालजी म्हणाले, ‘‘जगाच्या एका कोपऱ्यात हिंसाचार झाला म्हणून साऱ्या जगाने त्याचे प्रायश्चित्त घ्यायचे असते काय?’’... मात्र गांधीजी ठाम राहिले. ‘‘जगासमोर अनेकदा केलेले खोटेपण स्वत:शी केलेल्या खोटेपणाहून क्षम्य असते. स्वत:शी केलेला खोटेपणा व मूल्यांची केलेली विटंबना सर्वाधिक क्लेषदायी असते,’’ असे ते म्हणाले. 
दि.24 फेब्रुवारीला दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीतही साऱ्यांनी गांधीजींवर त्यांच्या त्या निर्णयासाठी टीका केली. या वेळी गांधीजींनी त्यांना नेहरूंची आलेली टीकेची पत्रेही वाचून दाखविली आणि ‘‘सारे सहकारी तुरुंगात असताना व आपल्यावर नेतृत्वाची जबाबदारी असताना मी मूल्यांच्या बाजूने उभे राहायचे की नाही’’ असा प्रश्न त्यांनी साऱ्यांना विचारला. सारे अवाक्‌ झाले. मात्र त्यांना गांधीजींची बाजू पटल्याचे कुठे दिसले नाही. पुढे तुरुंगातून सुटका झाल्यानंतर काही काळ आनंद भवनात राहून 10 मार्चला गांधींच्या भेटीला नेहरू साबरमतीला गेले. मात्र ते तिथे पोहोचण्याआधीच पोलिसांनी गांधींना अटक केली होती. या वेळचा त्यांच्याविरुद्धचा खटला सर रॉबर्ट ब्रुमफिल्ड या न्यायाधीशासमोर चालला. त्यात गांधीजींना सहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली. 
मात्र या वेळी लिहिलेल्या आपल्या निकालपत्रात न्यायाधीशांनी नम्रपणे म्हटले, ‘कायदा व्यक्तिमाहात्म्य जाणत नाही. तुमचे वेगळेपण दृष्टीआड करणे मलाही कमालीचे अवघड वाटत आहे. तुम्ही देशाचे नेते आहात आणि जनतेची तुमच्यावर श्रद्धा आहे. तुमच्याशी मतभेद राखणारे लोकही तुम्हाला मानतात, हे मी जाणतो. तुम्हाला तुरुंगात टाकण्याची वेळ तुम्ही आमच्यावर आणणे ही साऱ्यांच्याच दु:खाची बाब ठरेल, हे मी जाणतो. या कारावासातून तुमची लवकर सुटका झाली तर त्याचा सर्वाधिक आनंद मला होईल, हे कृपा करून लक्षात घ्या.’ 
नेहरू साऱ्या खटल्याच्या काळात गांधींसोबत होते. न्यायाधीश व अधिकाऱ्यांचा वर्ग गांधीजींशी कमालीच्या आदराने वागत होता. शिक्षा ऐकून नेहरू खिन्न झाले. न्यायाधीशांच्या निकालपत्रानेही ते सद्‌गदित झाले. या  वेळी तेथे असलेल्या सरोजिनी नायडूंनी गांधींना झालेल्या त्या शिक्षेची तुलना प्रत्यक्ष येशू ख्रिस्ताला झालेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेशी करावीशी वाटली. ‘माणुसकीवर प्रेम करणारा, माणसांच्या सुखासाठी प्राण पणाला लावणारा व त्यासाठी प्रत्यक्ष मृत्यूला सामोरा जाणारा सहृदयी माणूस’ असे गांधींचे वर्णन करताना त्या पुढे म्हणाल्या, ‘‘गरिबांकडे गरिबाचे हृदय घेऊन जाणारा महात्मा येशूनंतर हाच झाला.’’ 
सारे नेते तुरुंगात आणि संघटनेला मार्गदर्शन करणारे बाहेर कोणी नाही, ही अवस्था संघटनेत अराजक उभे करणारी आणि त्यामध्ये अतिरेक्यांना प्रवेश करू देणारी होती. लोकांत उत्साह होता, पण तो संघटित करणारे एकट्या नेहरूंखेरीज दुसरे कोणी बाहेर नव्हते. नेहरूंनाही पाचच आठवड्यांनी अटक करून सरकारने तुरुंगात डांबले. ही स्थिती असहकाराचे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घ्यायला गांधीजींना भाग पाडणारी होती. त्यांच्यावर टीका करणाऱ्या साऱ्यांच्या, नेहरूंच्याही ती मागाहून लक्षात आली. आपला तुरुंगाबाहेरचा काळही नेहरूंनी खादी व स्वदेशीचा प्रचार करणे आणि त्यासाठी अलाहाबादेतील विदेशी कापडांची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर पिकेटिंग करण्यात घालविली. 
परिणामी, धमकी देण्याचा व सक्तीने वसुली करण्याचा आरोप त्यांच्यावर लावून सरकारने त्यांना अटक केली. नेहरूंनी स्वत:चा बचाव केला नाही. ते न्यायालयाला म्हणाले, ‘‘तुमच्या सत्तेसाठी तुम्ही आमची निष्ठा विकत घेऊ शकत नाही वा त्यासाठी आमच्यावर सक्ती करू शकत नाही. आम्ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत, त्यासाठी तुरुंगात जाण्याची माझी तयारी आहे.’’ जरा वेळाने काहीसे हसून ते म्हणाले, ‘‘तसाही तुरुंग आता मला नवा राहिला नाही. गांधीजींच्या नेतृत्त्वात देशासाठी लढण्याचे भाग्य मी अनुभवत आहे. त्याहून मोठी उपलब्धीही जगात दुसरी नाही.’’ 
त्यांना लखनौच्या तुरुंगात धाडले गेले. या वेळी त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी राजबंद्यांवर कडक बंधने घातली होती. ‘हा तर तुरुंगातला तुरुंग आहे’ ही नेहरूंची त्यावरची नोंद. या वेळी मोतीलालजी नैनीच्या तुरुंगात बंद होते. तुरुंगात प्रचंड उकाडा होता आणि नेहरूंच्या बराकीत बरीच माणसेही कोंबली होती. या कारावासात त्यांना आठवणींनी घरची ओढ लागली होती. आईच्या, पत्नीच्या आणि चार वर्षांच्या इंदिरेच्या आठवणींनी ते हळुवार झाले होते. मुलांचे हसणे ऐकायला येत नसे, महिलांचे आवाज नाहीत. आणि एक दिवस त्यांना आठवले- आपण कुत्र्यांचे भुंकणेही खूप दिवसांत ऐकले नाही. मग त्यांनी वाचनाकडे लक्ष वळविले. त्यांची ती भूक मोठी होती. एवढी की, एकदा त्यांचा तुरुंगाधिकारी त्यांना म्हणाला, ‘‘मला तुमची वाचनाची क्षमता कळतच नाही! मी माझे सारे वाचन वयाच्या बाराव्या वर्षीच पूर्ण केले आहे.’’ 
गांधीजींच्या दीर्घकालीन शिक्षेचा परिणाम हा की, तिने काँग्रेसमध्येच दोन भिन्न तट पाडले. एक त्यांच्या अहकाराच्या चळवळीच्या बाजूचा आणि सरकारशी कोणत्याही तऱ्हेचे सहकार्य न करण्याची भूमिका घेणारा, तर दुसरा येणाऱ्या निवडणुकीत भाग घेऊन विधी मंडळे ताब्यात घेऊ इच्छिणाऱ्यांचा. पहिला नाफेरवादी, तर दुसरा फेरवादी म्हणून ओळखला जाणारा. नाफेरवाद्यांचे नेतृत्व राजगोपालाचारी यांच्याकडे तर फेरवाद्यांचे मोतीलालजी आणि देशबंधू दास यांच्याकडे होते. 
जवाहरलाल मात्र आपल्या वडिलांच्या विरुद्ध असहकाराच्या बाजूने व नाफेरवाद्यांच्या गटात होते. फेरवाद्यांची बाजू ही की, स्वातंत्र्याचा लढा विधी मंडळाच्या कक्षेतही लढविता येईल आणि त्या व्यासपीठावर त्या लढ्याला अधिक मोठी प्रसिद्धी व मान्यताही मिळेल. शिवाय त्याला कायदेशीर अर्थाने राष्ट्रीय स्वरूप येईल. विधी मंडळातील पदे आम्ही स्वत:साठी वा आमच्या स्वार्थासाठी घेणार नसून स्वदेशाच्या लढ्यासाठी घेत आहोत. ही पदे त्या लढ्याच्या मार्गात येताना जेव्हा दिसतील, तेव्हा आम्ही ती तत्काळ सोडू. या फेरवाद्यांच्या बाजूला वल्लभभाई पटेलांचे वडीलबंधू बॅरि.विठ्ठलभाई पटेल येऊन मिळाल्याने ती आणखी भक्कम झाली. 
वल्लभभाई मात्र नेहरूंसारखे नाफेरवाद्यांच्या बाजूने राहिले. नाफेरवाद्यांचे म्हणणे असे की, निवडणुकीतील सहभागामुळे देशाचे स्वातंत्र्याच्या लढ्यावर केंद्रित झालेले लक्ष विचलित होईल. सत्तेची पदे मिळविण्याच्या आकांक्षेने लोक पछाडले जातील वा आपला लढा केवळ सत्तेसाठी आहे, अशी वृत्ती पक्षात निर्माण होईल. नेहरूंनी त्यावर मध्यम मार्ग काढला. त्यांच्या मते- काँग्रेसने निवडणूक लढवावी, ती जिंकावी; पण सत्तेची  पदे मात्र स्वीकारू नयेत. गांधींना हा पर्याय मान्य नव्हता. त्यामुळे जनतेत जास्तीचा गोंधळ माजेल व आपल्या उद्दिष्टांविषयी संशय निर्माण होईल, असे त्यांचे म्हणणे होते. हा वाद बराच चालला. 
अखेर मौलाना आझादांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या विशेष सभेत त्यावर तोडगा शोधला गेला. काँग्रेसने फेरवाद्यांना वेगळ्या नावावर निवडणूक लढविण्याची परवानगी दिली. परिणामी, मोतीलालजी व दास यांनी स्वराज्य पक्ष हे नाव घेऊन निवडणुका लढवण्याचे ठरविले. या वेळी देशबंधू दास यांनी जवाहरलालांचे मन वळविण्याचा व त्यांना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न केला, पण नेहरूंनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. हा काळ नेहरूंसाठीही निराशेचा होता. देशात आंदोलने होत होती. नागपुरात मोठा झेंडा सत्याग्रह होऊन त्यात हजारोंना अटक झाली होती. 
अमृतसरमधील गुरूंच्या अत्याचारांविरुद्ध तेथील शिखांनी शांततामय आंदोलन चालविले होते. त्यावर पोलिसांनी केलेला निर्दयी लाठीमार शांततामय निदर्शकांनी मुकाट्याने सहन केला होता. आपले आंदोलन पाहायला त्यांनी नेहरूंना बोलावले, तेव्हा ते तिथे गेलेही; मात्र जाताच त्यांच्यावर स्थानबद्धतेचा हुकूम बजावला गेला. त्याच वेळी पंजाबातल्या नभा या संस्थानाच्या राजप्रमुखाला इंग्रजांनी बाजूला हटवून त्याच्या गादीवर आपला प्रशासक बसविला. त्याविरुद्ध तिथल्या जनतेने केलेले आंदोलन बघायला नेहरू गेले. मात्र नभाच्या पोलिसांनी त्यांना अटक करून व त्यांच्या हातात बेड्या घालून स्थानिक पोलीस ठाण्यात नेऊन बंद केले. हा सारा प्रकार काही आठवडे चालला. त्यात नेहरूंना त्यांच्या सहकाऱ्यांसह दीड वर्षाची शिक्षा झाली. मात्र ते जेलपर्यंत पोहोचण्याआधीच सरकारने त्यांच्या मुक्ततेचा आदेश काढला. 
नंतरचा काही काळ अलाहाबादेत व कुटुंबाच्या सहवासात घालवीत असताना त्यांना आपण गमावलेले व गमवीत असलेले घरचे आयुष्य प्रथम जाणवले. आपण आपल्या पत्नीला अजून नीट ओळखले नाही. स्वतंत्रपणे काही करून दाखविण्याची व नेहरू कुटुंबाची खरी सून म्हणून आपली ओळख पटवून देण्याची तिची धडपडही आपण लक्षात घेतली नाही. आईच्या बिघडत जाणाऱ्या तब्येतीकडेही आपण लक्ष पुरवू शकलो नाही... अशा असंख्य विचारांनी ते या काळात फार हळवे झाले. 
मात्र, याच काळात त्यांनी अहमदाबाद नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूकही लढविली. तीत ते प्रचंड बहुमताने निवडून आले. या काळात देशबंधू दास (कलकत्ता), बॅरि.विठ्ठलभाई पटेल (मुंबई), बॅरि.वल्लभभाई पटेल (अलाहाबाद), चक्रवर्ती राजगोपालाचारी (मद्रास), डॉ.राजेंद्रप्रसाद (पाटणा) हेही नगर परिषदांचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. अध्यक्षपदी निवडून येताच नेहरूंनी अधिकारी व सभासदांची एक बैठक बोलावली. तीत ते म्हणाले, ‘‘मी येथे सत्तापदासाठी आलो नाही, सेवेसाठी आलो आहे. हे शहर तत्काळ स्वच्छ व येथील प्रशासन लगेचच गतिमान होणे गरजेचे आहे. स्वराज्याची हाक येताच मी माझे पद सोडून देईन, हेही लक्षात घ्या.’’
 हा काळ नेहरूंना प्रशासनाची कार्यपद्धती समजावून देणाराही होता. तथापि, नेहरूंच्या या कारकिर्दीवर केलेल्या अभिप्रायाची चार्ली अँड्र्यूज या पत्रकाराने केलेली नोंद अशी- ‘नेहरूंच्या समाजवादाविषयीची आपली मते कशीही असोत, मात्र या म्युनिसिपालटीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम निश्चितच प्रशंसनीय आहे.’ याच सुमारास नेहरू अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवडले गेले. परिणामी, दर दिवसाचे त्यांचे काम पंधरा तासांएवढे वाढले. 
डिसेंबर महिन्यात झालेल्या केंद्रीय व प्रांतिक विधी मंडळांच्या निवडणुकीत मोतीलालजी व दास यांच्या नेतृत्वातील स्वराज्य पक्षाने (अर्थातच काँग्रेसच्या पाठिंब्याच्या बळावर) प्रचंड विजय मिळविला. केंद्रात त्याचे 45 सभासद निवडून आले आणि सहयोगी पक्षांच्या मदतीने त्यात पूर्ण बहुमत मिळवून त्याच्या अध्यक्षपदी बॅरि.विठ्ठलभाई पटेल यांची निवड झाली. या सभागृहाला अधिकार मात्र फार थोडे व तेही मार्गदर्शनाच्या पातळीवरचे होते. खरी सत्ता गव्हर्नर जनरलच्या हाती होती. मात्र या निवडणुकीने मोतीलालजी व दास या दोन्ही नामांकित वकिलांची मैत्री आणखी घट्ट केली. दास हे कमालीचे परिणामकारक व शैलीदार वक्ते होते आणि त्यांची देशभक्ती संशयातीत होती. त्यांच्यात संघटनकौशल्याएवढीच प्रचाराचीही चांगली जाण होती. त्या निवडणुकीनंतर दक्षिणेत काकीनाडा येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाने नेहरूंची सरचिटणीस पदावरची निवड कायम केली. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद अली व नेहरूंचे मैत्र चांगले होते. त्यांच्यात   धार्मिक प्रश्नावर कडाक्याचे वाद होत. मौलाना धर्मनिष्ठ, तर नेहरू वृत्तीनेच सेक्युलर होते. मात्र त्यांचा स्नेह अतूट होता. नेहरू म्हणायचे, ‘मोहम्मद अलींची धार्मिकता कमालीची कडवी, तर गांधीजींची तेवढीच नम्र आहे. मात्र या दोघांचेही धार्मिक असणे सारखेच अतार्किकही आहे.’ 
केमाल पाशाने 1922 मध्ये तुर्की खिलाफत रद्द केली आणि देशातील मुसलमानांना काँग्रेसविषयी वाटणारा ओढा संपला. स्वाभाविकच हिंदू-मुस्लिम ऐक्यही मंदावले. हिंदू महासभेच्या लोकांनी या काळात बनारसमध्ये एक इस्लामविरोधी मोहीमही काढली. पण ती फार काळ चालली नाही. 1924 च्या फेब्रुवारीत गांधीजींना अपेंडिसायटीसच्या ऑपरेशनसाठी पुण्याच्या इस्पितळात हलविले गेले. डॉक्टर मरडॉक या ब्रिटिश लष्करी सर्जनने ही शस्त्रक्रिया केली. या वेळी मोतीलालजींसह नेहरू त्यांना भेटायला पुण्याला आले. याच वेळी ब्रिटिशांनी गांधीजींना झालेली पूर्वीची सहा वर्षांची शिक्षा माफ केली. तोवर त्यांनी दोन वर्षे तुरुंगात घालविली होती. मार्च महिन्यात त्यांनी पुन्हा ‘यंग इंडिया’ आणि ‘नवजीवन’ या पत्रांचे संपादन हाती घेतले. 
‘‘माझी देशभक्ती माझ्यापुरती वा भारतापुरती राखीव नाही, ती कोणाच्या विरोधात नाही, ती जगाच्या स्वातंत्र्याचे लक्ष्य समोर राखणारी आहे. माझा अहिंसेचा आग्रहही त्याचसाठी आहे’’ असे या वेळी ते म्हणाले. याच सुमारास मोतीलालजी व देशबंधू दास मुंबईला आले. त्यांची व गांधीजींची विधी मंडळातील प्रवेशाबाबत या वेळी झालेली चर्चा मतभेदातच संपली. तेव्हा काहीसे नाराज झालेले मोतीलालजी म्हणाले, ‘‘ठीक आहे. आपण या मतभेदावरच मतैक्य करू.’’ 
मोतीलालजींचा आत्मविश्वास प्रसंगी अहंकाराच्या पातळीवर पोचणारा होता. आपली भूमिका व आपले निर्णय यांच्या अचूकपणाविषयी त्यांची नेहमीच खात्री असायची आणि दुसऱ्या कोणासाठीही- अगदी गांधीजींसाठीही- ते त्यात बदल करायला तयार नसायचे. गांधींविषयीचा आदर होता, पण त्याच वेळी त्यांचा आत्मविश्वासही जबर होता. गांधीजींची भेट होण्याआधी मोतीलालजी मिशा राखायचे नाहीत. पुढे एक दिवस नेहरूंनी गांधीजींना त्यांचा मिशा वाढवायला लागण्याआधीचा फोटो दाखविला. त्यातले त्यांच्या चर्येवरचे आत्मविश्वासदर्शक कडवेपण, ओठांची ठाम ठेवण आणि उंच उचललेली हनुवटी गांधींनी पाहिली आणि ते नेहरूंना हसून म्हणाले, ‘‘हा माणूस एवढा ताठ का आहे आणि मला केवढ्या महत्त्वाकांक्षी माणसाशी लढावे लागत आहे, हे या फोटोने मला समजावले आहे!’’ 
नेहरू मात्र या मतभेदाने आणि पक्ष व देश यात त्यांनी निर्माण केलेल्या अनिश्चिततेच्या वातावरणाने कमालीचे वैतागले. मग बरेच दिवस त्या साऱ्यापासून दूर होत आनंद भवनात विश्रांतीला गेले. पण याच काळात कमला नेहरूंच्या तब्येतीने उचल खाल्ली. त्यांचा आजार बळावला. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन ते डेहराडूनला गेले. या वेळी मोतीलालजी, स्वरूपाराणी, विजयालक्ष्मी, रणजीत पंडित आणि नेहरूंची धाकटी बहीण कृष्णाही त्यांच्यासोबत होती. मात्र तिथेही कमला नेहरूंच्या प्रकृतीला आराम पडत नसल्याचे दिसून येताच डॉ.एम.ए. अन्सारी या मित्राच्या सल्ल्यानुसार त्यांना युरोपात स्वित्झर्लंडमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला गेला. परिणामी, सारे नेहरू कुटुंबच युरोपात गेले. 
दरम्यान, डेहराडूनला असताना दार्जिलिंगमध्ये देशबंधू दास यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले. मोतीलालजींचा खंदा समर्थक व मित्र हरपला होता. देशबंधूंच्या निधनाने मोतीलालजी मनाने खचल्यागत झाले. त्याच स्थितीत ते नेहरूंसोबत विदेशात गेले. देशबंधूंचे निधन साऱ्या देशानेही अतिशय दु:खद अंत:करणाने स्वीकारले. 

 

Tags: मोतीलाल नेहरू देशबंधू कमला नेहरू महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू deshbandhu kamala Nehru mahatma Gandhi Jawaharlal Nehru weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात