डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

येथील कम्युनिस्टांनी मार्क्सच्या विचारांच्या पोथ्या बनविल्या आणि त्याचा शब्द न्‌ शब्द त्यांना येथे जसाच्या तसा अमलात आणायचा आहे, अशी नेहरूंची धारणा होती. या देशाची व समाजाची स्थिती आणि मानसिकता मार्क्सचे चष्मे लावलेल्यांना कधी कळायची नाही. त्यासाठी गांधीजींचीच स्वच्छ नजर आत्मसात करावी लागेल. राजकीय व आर्थिक बाबींची काही उत्तरे गांधीत एखादे वेळी नसतील, तरी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सारी उत्तरे केवळ त्यांच्याच जवळ आहेत. येथील गरिबांचे मन व आत्मा त्यांनाच गवसला आहे, या निर्णयावर मग नेहरू येत. मात्र देशाला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवून चालणार नाही; त्यात आर्थिक उभारणीसाठी आणि गरिबांच्या उत्थानासाठी प्रयत्न करूनच भरीवपण आणावे लागेल. राजकीय स्वातंत्र्य हे साधन आहे, तर समाजाचे कल्याण हे आपले खरे साध्य आहे.

Gandhiतेरा वर्षांच्या अंतराने नेहरू युरोपात आले होते. या काळात जेवढा बदल भारताच्या राजकीय व सामाजिक स्थितीत झाला तेवढाच, किंबहुना त्याहूनही अधिकच युरोपात झाला होता. मुळात ते सहा महिन्यांसाठी युरोपात आले होते; पण कमला नेहरूंची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जाणे, देशातले राजकीय वादंग तसेच असणे आणि युरोपात एकाहून एक मोठ्या घडामोडी होताना पाहणे यामुळे त्यांचा मुक्काम लांबला. तरी त्यांचा अधिकांश काळ- 21 महिन्यातील- स्वित्झर्लंडमधील मोन्टाना येथील सॅनिटोरियममध्ये कमला नेहरूंच्या शुश्रूषेतच गेला. या वेळी रशियात राज्यक्रांती झाली होती. झारची सत्ता जाऊन तिथे प्रथम मेन्शेव्हिक व पुढे त्यांना घालवून लेनिनच्या नेतृत्वातील बोल्शेव्हिकांचा पक्ष सत्तेवर आला होता. लेनिनचाही 1923 मध्ये संशयास्पद मृत्यू झाला आणि रशियन राजसत्तेची सूत्रे स्टालिनच्या हाती आली होती. मार्क्सवादाचा झेंडा खांद्यावर घेतलेले जगभरचे अनेक जण तो सर्वत्र फडकाविण्याची भाषा तेव्हा उत्साहात बोलत होते. जगभरच्या कामगारांत त्याने आशा जागवली, तर उद्योगपतींना अंतर्मुख केले होते... 

पहिल्या महायुद्धाने युरोपात सगळी उलथापालथ केली होती. देशांच्या सीमा बदलल्या होत्या. नवे देश जन्माला आले होते. जर्मनीला ‘लीग ऑफ नेशन्स’मध्ये पूर्वी न मिळालेले स्थान मिळाले होते. इंग्लंडमध्ये कोळसा कामगारांचा संप सुरू होता आणि त्या देशाने रशियाशी संबंध तोडले होते. निकाराग्वेत क्रांती झाली होती. झेकोस्लोव्हाकियात सत्ताबदल झाला होता आणि पोलंडमध्ये सत्ताबदल होऊन पिल्‌सुडस्की सत्ताधारी झाला होता. पूर्वेत चीनमध्येही चँग कै शेखने नानकीनवर कब्जा केला होता. जपानचे जुने राजे जाऊन तिथे नवे व युद्धाकांक्षी राजपुत्र हिरोहिटो सत्तेवर आले होते. 

नेहरूंनी युरोपात रोमाँ रोलाँ यांची भेट घेतली. त्यांनी गांधीजींचे जागतिक स्तरावरचे पहिले चरित्र लिहून त्यांना जागतिक कीर्ती व मोठेपण प्राप्त करून दिले होते. हिटलरविरुद्ध संघर्ष करणाऱ्या व पुढे आत्महत्या करणाऱ्या टौलारलाही नेहरू या काळात भेटले. मोतीलालजींची मादाम सन्‌ यत्‌ सेनशी भेट झाली होती. तो काळ युरोपातील समाजवाद्यांच्या व साम्यवाद्यांच्या हिटलरविरुद्ध झालेल्या सख्याचा होता. फार काळ टिकलेल्या त्यांच्या मैत्रीचा व्हायचा तो परिणाम नेहरूंवरही झाला. आरंभी हे सख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरांवर होते आणि दोन्ही स्तर परस्परांच्या सोई सांभाळत होते. हे दोन्ही वर्ग फॅसिझमविरुद्ध लढणारे असल्यानेही नेहरूंना त्यांच्याविषयी आरंभी कुतूहल व आपुलकी होती. फॅसिझमचे क्रौर्य हे जसे त्यांच्या रोषाचा विषय होते, तसे इंग्लंड व फ्रान्स या लोकशाही देशांनी त्यांच्या ताब्यातील वसाहतींचे चालविलेले शोषण हाही त्यांच्या रोषाचा विषय होता. फॅसिस्ट देश क्रौर्य लपवत नाहीत आणि स्वत:ला लोकशाहीवादी म्हणविणारे देश वसाहतींचे शोषण दडवत नाहीत, ही बाब त्या दोहोंपासूनही नेहरूंना दूर नेणारी होती. ब्रिटनचा समाजवादी पक्षही तेव्हा भारताला स्वातंत्र्य देण्याच्या बाजूचा नव्हता. गांधीजींच्या स्वदेशी चळवळीने इंग्लंडमधील, विशेषत: मँचेस्टरमधील- अनेक कापड गिरण्या व उद्योग बंद पाडले होते. त्यामुळे तिथे बेरोजगारी ओढवलेल्या कामगारांची बाजू घेणे आणि त्यासाठी गांधीजींच्या चळवळीला विरोध करणे तेथील समाजवाद्यांनाही भाग होते. 

तात्पर्य- हा सारा कमालीचा गोंधळात टाकणारा काळ होता. त्यातच जागतिक मंदीचे संकट येऊ घातले होते. ‘लीग ऑफ नेशन्स’ची परिणामशून्यता दिवसेंदिवस उघड होती. चर्चिलचे इंग्लंडच्या राजकारणातले वजन वाढले होते आणि चर्चिल साम्राज्यवादाचे समर्थक व वसाहतींना स्वातंत्र्य देण्याबाबत कमालीचे कडक व विरोधी धोरण स्वीकारणारे  होते. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या विरोधात, लेबर पार्टी तिच्या अडचणींमुळे विरोधी भूमिका घेणारी, समाजवादी जवळचे वाटले तरी दुबळे आणि कम्युनिस्ट रशियासमर्थक असले तरी त्यांची राजवटही फॅसिस्टांसारखीच हुकूमशाही. यातले कोणीच आपली बाजू घेण्याजोगे नव्हते आणि त्यातले कोणी भारताचे मित्र होऊ शकणारेही नव्हते. 

या वेळेपर्यंत नेहरूंनी मार्क्स वाचला नव्हता. तो त्यांनी 1930 मध्ये अभ्यासाला घेतला. मात्र युरोपातील वास्तव्याने त्यांना भांडवलशाही व साम्राज्यवाद यांचे नाते जसे समजावून दिले, तसेच फॅसिझम व कम्युनिझम यांच्यातील अतिरेकी राज्यवाद आणि त्यांचे माणसांकडे पाहण्याचे क्षुद्रपणही ध्यानात आणून दिले होते. भांडवलशाहीला उद्योग उभा करायला आणि ते चालवायला कच्चा माल लागतो तसे स्वस्त मजुरीत मिळणारे कामगारही लागतात. या दोन्ही गोष्टींसाठी भांडवलशाही देशांना वसाहतवादाचा स्वीकार करणे भाग असते. वसाहतीतून त्यांना कच्चा माल आणि मजूर या दोन्ही बाबी सहजपणे व अत्यल्प मोबदल्यात आणता येतात. भांडवल जसजसे वाढते तसतशी या कच्च्या मालाची व मजुरांची गरज वाढत जाते. परिणामी, वसाहतवाद वाढत जातो. भांडवलदार देश आपसात जी युद्धे करतात, तीही मोठ्या वसाहतींचा ताबा मिळविण्यासाठी. मग दक्षिण अमेरिका, आफ्रिका, मध्य आशिया, द.आशिया व दक्षिण-पूर्व आशियातील देश गुलाम बनविले जातात. त्यामुळे वसाहतवाद संपवायचा तर त्यासाठी केवळ साम्राज्यवादाशी लढणे उपयोगाचे नाही; त्यासाठी खरा घाव भांडवलशाहीवरही घातला पाहिजे, या निर्णयावर नेहरू आले. 

त्याच वेळी फॅसिझममध्ये माणूस हे साधन व राष्ट्र हे साध्य होते. साध्यासाठी साधनाचा बळी देता येतो. हे साध्य म्हणजेही अधिकाधिक सत्ता व अधिकार. ते मिळवायला माणसे गुलाम करता येतात. त्यांना कमी मोबदला देऊन त्यांच्यावर जास्तीचे श्रम लादता येतात. स्वातंत्र्य, समता व न्याय यासारख्या मूल्यांचा बळी देता येतो. फॅसिस्ट हुकूमशहा सांगेल ती पूर्व दिशा, तिला विरोध करतील ते देशाचे विरोधक व सत्तेचे द्रोही ठरविले जातात. कम्युनिझममध्ये कामगारांचे राज्य येते, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात ते कामगारांचे न राहता त्यांचे म्हणविणाऱ्या पक्षाचे असते. तो पक्षही स्वतंत्र नसतो. त्यावर त्याच्या नेत्याचा एकाधिकार चालतो. ती कामगारांची हुकूमशाहीही नसते, प्रत्यक्षात त्या नेत्याची ती हुकूमशाही असते. त्याला विरोध हाच मग मरणदंड ठरतो. 

नेहरूंचा या वेळचा पेच हा की, त्यांना भांडवलशाही मान्य होणारी नव्हती आणि फॅसिझमही चालणारा नव्हता. कम्युनिझममध्ये जोवर समाजातील दुर्बलांच्या वर्गांचा विचार होतो तोपर्यंत तो विचार त्यांना चालणारा होता, मात्र त्यातले क्रौर्य व हुकूमशाही अजिबात मान्य होणारी नव्हती. ही विचारपद्धती मग नेहरूंना गांधीजींच्या अंत्योदयाच्या विचारापर्यंत पोहोचविणारी ठरली. गांधीजी अखेरच्या माणसाचे कल्याण हेच आपले ध्येय मानत. मात्र त्यासाठी ते इतरांना मारण्याची भाषा बोलत नसत. समाजाच्या उत्थानाची ते चर्चा करीत आणि त्यासाठी त्यांना वसाहतीची गरज नव्हती. माणूस, माणसाचे श्रम आणि त्याचे स्वतंत्र असणे याच बाबी माणसाला खऱ्या सत्यापर्यंत व आनंदापर्यंत पोहोचवितात व भारताचीही गरज तीच आहे, असे ते मानत. त्यामुळे गांधीच भारताला त्याच्या कल्याणाच्या दिशेने नेणारा नेता आहे इथवर नेहरूंचा विचार जात असे. मात्र हा विचार करताना नेहरूंना इतर राज्य- पद्धतींमधल्या चांगल्या गोष्टीही जाणवतच होत्या. 
मोठे उद्योग आणि त्यातले प्रचंड उत्पादनाचे तंत्र ही भांडवलशाहीची बाजू आणि नियोजनबद्ध विकासाची कम्युनिस्टांनी रशियात स्वीकारलेली कार्यपद्धती. या यांत्रिक आणि तांत्रिक बाबींना जोड द्यायची तर ती गांधीजींची. त्यांचा अंत्योदय, त्यांची करुणा, त्यांची माणुसकी, सर्वधर्मसमभाव आणि देशाएवढीच माणसांविषयी त्यांना वाटणारी आस्था. यंत्रांना करुणेची जोड कशी द्यायची असते, उद्योगांना माणूसपण कसे शिकवायचे असते आणि शस्त्रांवर शांतीचा संस्कार कसा घडवायचा असतो- असे नेहरूंच्या मनात यायचे. मार्क्सचा विरोधविकासवाद हा नेमक्या याच वळणाने जाणारा आहे. कामगारांच्या क्रांतीनंतर भांडवलशाहीतील प्रचंड उत्पादन करणारे उद्योग कायम राहतील, पण त्यावरील मूठभर उद्योगपतींची मालकी संपेल. सारे कारखाने व उत्पादनाची मोठी तंत्रे कामगारांच्या मालकीची होतील, असे मार्क्स मानतो. 
नेहरूंना मोठे उद्योग हवे होते, मात्र त्यांचा लाभ गरिबांच्या व सामान्य  माणसांच्या वाट्याला यावा असे त्यांना वाटत होते. यात त्यांना अंत्योदय दिसे आणि समाजाचे आर्थिक उत्थानही पाहता येई. मार्क्सने सांगितलेली कामगारांची हुकूमशाही आणि त्याने क्रांतीतील हिंसेचे केलेले समर्थन मात्र त्यांना मान्य नव्हते. ‘मार्क्सचा विचार हा कामगार व शेतकऱ्यांच्या कल्याणाचा अखेरचा विचार आहे आणि त्याच्या चौकटीत हे जग बसवायचे आहे.’ हे आपणही मनात आणायचे नाही, हा लेनिनने आपल्या अनुयायांना दिलेला संदेश याच स्वतंत्र वृत्तीमुळे नेहरूंना पटणारा होता. 

इंदिरा गांधींना 1933 मध्ये लिहिलेल्या एका पत्रात लेनिनचे कौतुक करताना ते म्हणतात : ‘मार्क्सचा जो विचार रशियात लागू होईल तो युरोपात लागू होईलच असे नाही. इंग्लंडला लागेल ते फ्रान्सला लागणार नाही. स्थल-काल परिस्थिती ही विचारांना वळण व वेगळेपण देत असते, ही लेनिनची भूमिका मला मान्य होणारी आहे.’ नेमक्या याच बाबीसाठी नेहरू भारतातील कम्युनिस्टांवर टीका करीत. येथील कम्युनिस्टांनी मार्क्सच्या विचारांच्या पोथ्या बनविल्या आणि त्याचा शब्द न्‌ शब्द त्यांना येथे जसाच्या तसा अमलात आणायचा आहे, अशी नेहरूंची धारणा होती. 

या देशाची व समाजाची स्थिती आणि मानसिकता मार्क्सचे चष्मे लावलेल्यांना कधी कळायची नाही. त्यासाठी गांधीजींचीच स्वच्छ नजर आत्मसात करावी लागेल. राजकीय व आर्थिक बाबींची काही उत्तरे गांधीत एखादे वेळी नसतील, तरी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सारी उत्तरे केवळ त्यांच्याच जवळ आहेत. येथील गरिबांचे मन व आत्मा त्यांनाच गवसला आहे, या निर्णयावर मग नेहरू येत. मात्र देशाला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवून चालणार नाही; त्यात आर्थिक उभारणीसाठी आणि गरिबांच्या उत्थानासाठी प्रयत्न करूनच भरीवपण आणावे लागेल. राजकीय स्वातंत्र्य हे साधन आहे, तर समाजाचे कल्याण हे आपले खरे साध्य आहे. त्याचमुळे गांधी मला कधी कधी अतिशय मागासलेल्या विचारांचे वाटत असले तरी त्यांच्या एवढा क्रांतिकारी विचार करणाराही मला दुसरा कोणी दिसत नाही.’ असे त्यांनी या काळात नोंदविले आहे. नेहरू युरोपात असताना ब्रुसेल्स येथे भरलेल्या साम्राज्यवादविरोधी नामवंतांच्या परिषदेला गेले. तीत लीग ऑफ ॲन्टिइम्पेरियालिझम ही संघटना स्थापन झाली. ॲल्बर्ट आइन्स्टाईन, मादाम सन्‌ यत्‌ सेन व रोमा रोलाँसारख्या थोरामोठ्यांचा तीत समावेश होता. नेहरूही त्या संघटनेचे सभासद झाले. मात्र ही संघटना फारशी चालली नाही. तिने घेतलेल्या ज्यूविरोधी भूमिकेमुळे आइन्स्टाईन तिच्यातून प्रथम बाहेर पडले. पुढे गांधींनी लॉर्ड हॅलिफॅक्स व लॉर्ड इर्विन यांच्याशी केलेल्या करारामुळे त्या संघटनेने नेहरूंनाही बाहेर पडायला लावले. प्रत्यक्षात त्या संघटनेवर कम्युनिस्टांचा ताबा होता. साम्राज्यवादाविरुद्धचे एक व्यासपीठ म्हणूनच नेहरूंनी त्यात सहभाग घेतला. 

याच काळात युरोपात वास्तव्य करणाऱ्या काही क्रांतिकारी कार्यकर्त्यांचीही नेहरूंनी भेट घेतली. पण ते त्यांच्यामुळे फारसे प्रभावित झाले नाहीत. त्यातले बरेच जण कमालीची सामान्य बुद्धी असलेले होते. श्यामजी कृष्ण वर्मा हे वयोवृद्ध क्रांतिकारक कमालीचे संशयी बनले होते आणि आपल्याकडे येणारा प्रत्येकच जण सरकारी हेर असल्यासारखे वागत होते. त्यांचे मानसिक संतुलनही वयोमानानुसार बिघडले होते. एके काळचा त्यांचा दरारा ओसरला होता आणि त्यांचे आयुष्य दयनीय म्हणावे असे झाले होते. राजा महेंद्रप्रताप हा क्रांतिकारी इसम त्यांना भेटायला आला तोच मुळी विचित्र पोषाखात. त्याच्या अंगावरच्या कपड्यांना नुसतेच खिसे होते आणि त्यात कागदांची भेंडोळी होती. ‘ही सारी सामग्री मी माझ्याजवळ सदैव ठेवतो असे म्हणणारे हे प्रताप सारे जग हिंडले होते. तुर्कस्तानात काही काळ राहिलेले मौलाना ओबेदुल्लाही नेहरूंना याच वेळी भेटले. त्यांनी संयुक्त भारताची एक योजना तयार केली होती. पण नेहरूंना ती कागदावरच चांगली वाटली. मादाम कामांचीही त्यांनी भेट घेतली. या वेळी त्या ठार बहिऱ्या झाल्या होत्या आणि प्रत्येकावर प्रश्नांची सरबत्ती करीत होत्या. नेहरूंनाही त्यांनी सोडले नाही. इतरांची उत्तरे ऐकायला मात्र त्या तयार नव्हत्या. नेहरूंनी त्यांचे वर्णन ‘फ्रेंच राज्यक्रांतीच्या पुस्तकातून अवतरलेली स्त्री’ असे केले आहे. बरकतशहा या क्रांतिकारी इसमालाही ते भेटले. दीर्घ काळ भूमिगत राहिलेल्या या इसमाने पुढे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे आत्महत्या केली. 

येथेच नेहरूंना सरोजिनी नायडूंचे बंधू वीरेंद्रनाथ चट्टोपाध्यायही भेटले व त्यांचा चांगला स्नेह जुळला. चम्पकारमण पिल्ले या नाझी कार्यकर्त्याशीही  त्यांची भेट झाली. अतिरेकी राष्ट्रवादाने पछाडलेल्या या पिल्लेईचा 1930 च्या दशकातच बर्लिनमध्ये मृत्यू झाला. वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय दारिद्र्यात जीवन कंठत होते. त्यांचे कपडे मळलेले आणि फाटकेही होते. मात्र ते हसरे होते. बोलण्यात कडवटपणा नव्हता. स्वातंत्र्यासाठी आपण पत्करलेल्या गरिबीचा त्यांना अभिमान होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांचा मॉस्कोत मृत्यू झाला, एकाकी आणि मित्रहीन अशा अवस्थेत. याच काळात त्यांची दोन अमेरिकेन स्नेह्यांशी मैत्री जुळली. रॉजर बाल्डविन हा मानवी अधिकाराच्या क्षेत्रात काम करणारा, तर दुसरा जन्माने भारतीय लेखक असलेला. लहान मुलांसाठी आकर्षक पुस्तके लिहिणाऱ्या या लेखकानेही पुढे अमेरिकेतच आत्महत्या केली. मोतीलालजी इंग्लंडला परत येईपर्यंतचा काळ नेहरूंनी प्रवास व स्थळांना दिलेल्या भेटीत घालविला. ते नॉर्वेत असताना पायाखालचा कच्चा बर्फ कोसळल्याने ते खोल दरीत पडले व काही काळ इस्पितळात राहिले. त्याआधीही एका धबधब्याखाली स्नान करीत असताना ते असेच अपघातग्रस्त झाले होते. 

मात्र या काळात त्यांच्या लक्षात आलेली व दीर्घ काळ परिणाम करणारी बाब इंग्लंडची न्यायालये व सरकार तेथील कामगारांना न्याय देत नसल्याची आणि आपल्याच श्रमिकांशी दुष्टाव्याने वागणाऱ्या उद्योगपतींना साथ देत असल्याची होती. ही बाब नेहरूंना जगभरच्या कामगारांची दु:स्थिती व त्यांचे होणारे शोषण समजावून देणारी ठरली. रशियात 1924 मध्ये क्रांतीच्या होणाऱ्या वर्धापनदिनाचे निमंत्रण त्यांना व मोतीलालजींनाही आले. मोतीलालजी रशियात जायला फारसे उत्सुक नव्हते, पण नेहरूंनी त्यांना आग्रह करून सोबत नेले. लहानगी कृष्णाही त्यांच्यासोबत होते. रशियात सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण होते. मोतीलालजींना मात्र तो सारा प्रकार काँग्रेसच्या अधिवेशनासारखाच वाटला. मॉस्कोतील क्रेमलिनच्या राजवाड्याशेजारी एक अतिशय देखणे व संपन्न चॅपेल आहे. त्यात स्त्रियांची गर्दी होती. मात्र चॅपेलच्या प्रवेशद्वारावरच मार्क्सचे वचन कोरले होते. ‘धर्म ही अफूची गोळी आहे.’ मॉस्कोत त्यांचा मुक्काम चार दिवसांचा होता. या काळात त्यांनी क्रांतीच्या वर्धापनदिनाचा सोहळा अनुभवला. तेथील नृत्ये पाहिली. माणसांच्या अंगावर साधी वस्त्रे असलेली व त्यावर कोट वा गरम कपडा नसल्याची बाबही त्यांना चकित करून गेली.
 
या मुक्कामात दोन्ही नेहरूंनी कालिनीन या रशियाच्या तत्कालीन अध्यक्षांची भेट घेतली. तीन खोल्यांच्या साध्या घरातले त्यांचे वास्तव्यही त्यांना चकित करून गेले. त्या घरात शोभेच्या व चैनीच्या वस्तू नव्हत्या. परराष्ट्रमंत्री चिचेरीन यांचे घर त्याहून लहान आणि साधे होते. मात्र त्यांनी नेहरूंना दिलेली भेटीची पहाटे चार वाजताची वेळ मोतीलालजींचा संताप वाढविणारी होती. मग ती बदलून पहाटेच्या एक वाजताची करण्यात आली. नंतर त्यांनी लेनिनच्या समाधीलाही भेट दिली. मॉस्कोच्या भव्य लाल चौकात क्रेमलिनच्या राजवाड्याभोवती असलेल्या किल्लेवजा भिंतीजवळ ही समाधी आहे. त्यातले लेनिनचे रूप नेहरूंना फारसे आकर्षक वाटले नाही. समाधीत रशियन मातीचा वास होता. मात्र लेनिनचा देह आणि चर्या यावर एक कमालीचा आदर वाटायला लावणारा ताठा होता. त्याच्या ओठांवर किंचितसे हसू होते. आयुष्यभर केलेल्या कष्टांचा आणि त्यात मिळविलेल्या यशाचा त्यावर अभिमान होता. त्याचा देह गणवेषात होता आणि त्याच्या एका हाताची मूठ वळलेली होती... मरणातही त्याचे हुकूमशहा असणे जाणवत होते, ही त्याविषयीची नेहरूंची नोंद. (प्रस्तुत लेखकाने 2012 मध्ये लेनिनच्या समाधीला भेट दिली. या वेळी त्याच्या अंगात काळ्या रंगाचा सूट, पांढरा शुभ्र शर्ट आणि गळ्यात काळ्याच रंगाचा टाय होता. त्याचे गोरेपण त्यावरच्या पावडरीमुळे आणखी उठावदार दिसत होते. मात्र पुतळ्यात व छायाचित्रात दिसणारी लेनिनची उंची त्यात दिसली नाही. त्याचा देह लहानखुरा व काहीसा ठेंगणा म्हणावा असा दिसला. मात्र त्याच्या चर्येवरचा हुकूमशहाचा करडेपणा तसाच होता. तो एकाच वेळी आकर्षक व आदरणीयही होता. समाधिगृहातले वातावरण शांत व गंभीर होते. पहाऱ्याला असलेले सैनिक एकेकाला अदबीने पुढे सरकायला सांगत होते. लेनिनचे शव पाहणाऱ्यावर एक खोलवर परिणाम करणारे हे वातावरण मात्र नक्कीच होते.) 
रशियन हुकूमशाहीत मोतीलालजींचा जीव रमला नाही आणि त्या देशाने लोकशाही कधीच अनुभवलीच नाही, हे नेहरूंच्याही मनात येत राहिले. मार्क्सवादी क्रांतीने राजेशाही संपविली, सरंजामदार निकालात काढले आणि  श्रमिकांना व कुळांना मोकळे केले, एवढेच. मात्र स्टालिनच्या काळात त्याही दोन वर्गांना वेठीला धरून त्याने लष्करी व आर्थिक विकासाच्या कार्यक्रमाची जी कमालीची क्रूर म्हणावी अशी कठोर अंमलबजावणी केली, ती नेहरूंनाही नजरेआड करता येणारी नव्हती. त्यामुळे मार्क्सची तत्त्वे मान्य, पण कम्युनिस्टांची राजवट अमान्य- अशी काहीशी त्यांच्या मनाची अवस्था होती. तशातच त्यांना भारतात परतण्याचे वेध लागले होते. (ऑर्थर पामर या अमेरिकन राजदूताने विसाव्या शतकात जगात झालेल्या हुकूमशहांनी मारलेल्या व मरायला लावलेल्या माणसांची एकूण संख्या 16 कोटी 90 लाख एवढी सांगितली आहे. त्यात हिटलरने दोन कोटी, स्टालिनने पाच कोटी तर माओने मारलेल्या सात कोटी माणसांचा समावेश आहे. या आकड्यात युद्धात मेलेल्यांची संख्या समाविष्ट नाही. या तीन हुकूमशहांखेरीज जगातल्या बाकीच्या लहानसहान हुकूमशहांनी उरलेल्यांचे जीव घेतले आहेत. ही आकडेवारी तेव्हाही अंगावर शहारे आणणारी होती व आजही आहे.) 

भारतातले राजकारण दीड वर्षात बदलले नव्हते. शस्त्राचाऱ्यांनी ठिकठिकाणी पाडलेल्या खुनांची संख्या वाढली होती. 1926 मध्ये मुस्लिम धर्मांधांनी स्वामी श्रद्धानंदांची हत्या केली होती. त्यांच्या मृत्यूने नेहरू कळवळले. श्रद्धानंदाची देशभक्ती, धाडस व सर्वांना सोबत घेण्याची वृत्ती त्यांना परिचित होती. इंग्रज पोलिसांनी त्यांच्या छातीवर बंदुकांच्या बायोनेट्‌स रोखल्या, तेव्हा त्या थोर देशभक्ताने आपली विशाल छाती त्यांच्यासमोर उघडी करून त्यांनाच आव्हान दिले होते. नेहरूंच्या मनात त्या साऱ्या आठवणी तरळल्या आणि भारतात शक्यतो लवकर परतण्याची त्यांची तळमळ वाढली. 

नेमक्या यावेळी इंग्लंडमधील कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या स्टॅनले-बाल्डविन सरकारने भारतासाठी सांविधानिक सुधारणा सुचवायला जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिशनची स्थापना केली. या कमिशनमधील सगळेच सभासद ब्रिटिश असल्याने त्याला आरंभापासूनच भारताच्या रोषाला सामोरे जावे लागले. हे कमिशन पाठविण्यामागे इंग्लंडचे राजकारणही कारणीभूत होते. हे कमिशन काँग्रेस व अन्य पक्षांत एकवाक्यता घडवून आणेल आणि त्याच वेळी हिंदू व मुसलमान यांच्यातील दुभंगही दूर करील, असे सांगितले गेले. प्रत्यक्षात मात्र इंग्लंडमध्ये पुढील वर्षी निवडणुका व्हायच्या होत्या आणि त्यात कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष पराभूत होणार, अशी चिन्हे दिसत होती. आपल्या पश्चात येणारे लिबरल पक्षाचे सरकार भारताला जास्तीची स्वायत्तता देईल, ही भीती कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला व भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांना वाटत होती. त्यामुळे कमिशन नेमण्याचा अधिकार आपणच वापरावा व भारताला शक्यतो मर्यादित स्वायत्तता द्यावी, हा सायमन कमिशनच्या नियुक्तीमागचा खरा हेतू होता. भारतीय नेत्यांनाही तो चांगलाच कळणारा होता. त्यामुळे या कमिशनमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नसल्याचा मुद्दा पुढे रेटत भारतात सायमनविरोधी आंदोलनाची तयारी सुरू झाली. प्रत्यक्षात ते आंदोलनही देशव्यापी व प्रचंड म्हणावे असे झाले. 
दि.8 नोव्हेंबर 1927 ला या कमिशनच्या नेमणुकीची बातमी नेहरूंना ते मॉस्कोत असतानाच समजली आणि ते भारतात परतण्याच्या तयारीला लागले. परतताना ते लंडन मार्गे आले. जॉन सायमन हे नामांकित वकील होते आणि मोतीलालजींचा त्यांच्याशी व्यावसायिक संबंधही होता. प्रिव्ही कौन्सिलसमोर सुरू असलेल्या एका खटल्यात ते दोघे एकाच अशिलाची बाजू लढवीतही होते. त्यामुळे लंडनला येऊन व सायमन यांच्याशी बोलणी करून मोतीलालजींनी ते काम हातावेगळे केले. त्यांच्या एका भेटीच्या वेळी नेहरूही त्यांच्यासोबत होते. काँग्रेस पक्षाचे 1927 चे अधिवेशन याच सुमारास मद्रासमध्ये व्हायचे होते. त्याला हजर राहण्यासाठी नेहरू कुटुंब मग कोलंबो मार्गे मद्रासला पोहोचले. या साऱ्या काळात कमला नेहरू आणि कृष्णा कुटुंबासोबत होत्या. मोतीलालजी मात्र मद्रासला न येता युरोपातच काही काळ थांबले.

 

Tags: simon commission lenin's mausoleum rasian revolution motilal Nehru pandit jawaharlal nerhu सायमन कमिशन लेनिन समाधी रशियन क्रांती मोतीलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात