डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

इतिहासाचा वापर सत्ताकारणासाठी करणारे खूप आहेत. त्या बळावर आपले खरेखोटे अभिमान मिरवणारेही फार आहेत. त्याखेरीज इतिहासातली वैरे उकरून काढून त्यावर वर्तमानात रण माजवणारेही साऱ्यांना चांगले ठाऊक आहेत.

मात्र इतिहास हा समाजाचा अनुभव आहे आणि अनुभवाएवढा चांगला शिक्षक दुसरा नाही याची जाणीव ठेवून इतिहासातले काय जागवायचे आणि काय विझवायचे याचा विवेक राखणारा विष्णु शर्मा त्या साऱ्यांच्या भाऊगर्दीत वेगळा, अनोखा आणि आदरणीय वाटावा असा आहे.

‘इथं राणी रूपमती नर्मदाजीच्या दर्शनाला यायची... दूरतक देखिए, दूर आसमाँ धरती को छूता है वहाँ एक चमकीली लाईन दिखाई देती है. वह है नर्मदाजी.’

मांडूगडाच्या दक्षिण टोकावर असलेल्या रूपमती महालाच्या प्रशस्त आवारात उभ्या असलेल्या पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंना गाईड नर्मदा नदी दाखवीत होता.

‘कहाँ है? मुझे तो कही नजर नही आती’ पंडितजी म्हणाले.

खूप वेळ पाहूनही गाईडला दिसणारी नर्मदेच्या पाण्याची चकाकती रेषा त्यांना काही केल्या दिसत नव्हती.

‘नही दिखाई?’ गाईड जरासा थांबला. मग मिस्किलसं हसून म्हणाला, ‘सही है आपको दिखाई भी नही देगी.’

‘क्यों’ पंडितजींनी विचारलं.

‘पंडितजी, दर्शन तो श्रद्धा की बात है और आप ठहरे सेक्युलर राज के विज्ञानवादी प्रधानमंत्री।’

गाईडच्या वाक्यानं सभोवतीचे सारे धास्तावून अवाक्‌.

नेहरूंचा क्षणात उफाळून येणारा राग ठाऊक असणारे सारे त्या गाईडवर संतप्त. क्षणभर स्तब्धता. पण भडका उडत नाही. जरा वेळानं पंडितजी दोन्ही हातांच्या तळव्यांची वर्तुळं दुर्बिणीसारखी डोळ्यांना लावतात अन्‌ हसून गाईडला म्हणतात, ‘हां, देखो, अब मुझे भी नर्मदाजी के दर्शन हुए विज्ञान की नजरसे।’ साऱ्यांचा जीव भांड्यात पडतो.

पंडितजींना हे ऐकवणारा गाईड होता पं. विष्णुदत्त शर्मा... मांडूगडावरच्या त्यांच्या छोटेखानी कौलारू घरासमोर आमची गाडी थांबली तेव्हा 92 वर्षं वयाचे शर्माजी घरावर चढून त्यावरची कौलं शाकारत होते. मांडूगडावरच्या अशरफी महालाच्या वाटेवरचं ते घर गरीब होतं. पडवीत झोपाळा अन्‌ काही साध्या खुर्च्या. बाकी पुस्तकं अन्‌ त्यांना आयुष्यभरात मिळालेल्या पुरस्कारांची कशीबशी ठेवलेली रास.

अशरफी महालाच्या श्रीमंत कथेच्या पार्श्वभूमीवर ते घर शर्माजींच्या साधनेची संपन्नता आणि त्या साधनेनंच त्यांना चिकटू न दिलेली पैशांची श्रीमंती सांगणारं होतं.

कमळांनी भरलेल्या सरोवराच्या पाण्यालगत उभ्या असलेल्या अशरफी महालालाच जलमहाल असं म्हणतात. तो तसाही जहाजाच्या आकाराचा आहे. त्याच्या समोरच्या पटांगणातून थेट वरच्या मजल्यापर्यंत जाणारा भक्कम दगडांनी बांधलेला एक उंचच उंच जिना आहे.

बादशहानं म्हणे आपल्या गरोदर राणीला तो जिना चढून वर चलायची गळ घातली पण ती आढेवेढे घ्यायला लागली, तेव्हा त्या जिन्याच्या प्रत्येक पायरीसाठी एक अशरफी म्हणजे सोन्याचं नाणं तिला द्यायची त्यानं तयारी दर्शविली. बादशहाचं मन राखायला आणि त्यानं दिलेली नाणी घ्यायला ती महाराणी मग तो उंच जिना चढून गेली होती... म्हणून त्या महालाचं नाव झालं अशरफी महाल.

शर्माजींच्या घराभोवतीचं बांबूचं फाटक बाजूला सरकवून आम्ही अंगणात आलो. त्या अंगणातील फुलांच्या झाडांच्या गर्दीत एक गवताचं छोटेखानी छप्पर अन्‌ त्याखाली भगवान शिवाची खूप मोठी अन्‌ सुंदर मूर्ती होती.

मांडूगडावर दिलीपकुमार आणि   वहिदाच्या ‘दिल दिया दर्द लिया’ या सिनेमाचं शूटिंग झालं होतं. त्यातली ही मूर्ती दिलीपकुमारांनी शर्माजींना नजर केली होती.

आम्ही पडवीत दाखल होईपर्यंत शर्माजी घराच्या छपरावरून उतरून खाली आले होते. इंदूरहून प्रकाशीत होणाऱ्या नई दुनियाच्या राहुल बारपुत्यांनी, मांडूगडावरचा हा म्हातारा पाहिल्याखेरीज मांडू समजायचा नाही असं बजावलं होतं. ‘मांडू पहा वा पाहू नका. त्यातला राणी रूपमती आणि बाज बहादूरचा शृंगारदेखील एखादेवेळी पाहू नका. त्या गडावर सर्वाधिक पाहण्यासारखं काही असेल तर तो आहे पं. विष्णु शर्मा. त्याला पहा. नशिबात असेल तर तो भेटेल. आणखी नशीबवान असाल तर बोलेल’ असं ते म्हणाले होते.

या विष्णुजींनी मांडूगडाचा इतिहास इंग्रजीत सहा खंडांधून लिहिला होता. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशचे बडे पाहुणे अशा महनीय व्यक्तींसाठी ते गाईड म्हणून काम करायचे. त्यांच्या अशा वर्णनानेच छाती दडपून गेली होती. त्यातून त्यांनी नव्वदी ओलांडली होती. बधले तर ठीक नाही तर तापट म्हणूनही ते प्रसिद्ध.

जो माणूस पंडित नेहरूंसारख्या अधिकारी इतिहासकाराला तसले काही ऐकवू शकतो तो आमच्याशी कसा वागेल याचीही एक धास्ती होतीच. राहुलजींनी शर्माजींच्या काही गमतीही आपल्या खास इंदुरी ढंगात सांगितल्या होत्या.

डॉ. राधाकृष्णन हे राष्ट्रपतिपदावर असताना एकदा मांडूगडावर आले. शर्माजींनी थेट राष्ट्रपतींच्या ढंगाचा पेहराव अंगावर चढवून त्यांना मांडूगड दाखविला. निरोपाच्या वेळी राष्ट्रपती शर्माजींना म्हणाले, ‘तुमची काही वाक्यं मला लिहून घ्यायची आहेत’ शर्माजी म्हणाले, ‘तुमच्या आधीही खूप मोठी माणसं इथं आली अन्‌ माझ्याकडून मांडू समजावून घेऊन गेली पण त्यांनी असलं काही मागितलं नाही.’

अन्‌ वर ‘वो उनमें से थे, जो कछु लेत कछु देत. अन्‌ तुम्ही असे की कछु लेत और कछु लिख लेत.’

वर तशा आशयाचा महाराजा भोजाच्या नावावर असलेला एक श्लोकही त्यांनी राष्ट्रपतींना तेव्हा ऐकवला होता.

माणसे एकाच एका वेडाने ग्रासली असली की त्यांच्या हातून अभूतपूर्व कामे होतात. विष्णु शर्मांना मांडूगडाचे वेड होते. सारे आयुष्य त्यावर घालवूनही त्यातले अजून काहीतरी हाती यायचे राहून गेले असल्याचा समज त्यांना अस्वस्थ करणारा होता. न समजलेले समजून घ्यायला ते तेव्हाही पायपीट करीत. रस्त्याच्या कडेचे दगड उचलून पाहत. बांगडीचा एखादा तुकडाही त्यांना इतिहासात नेई आणि कोणत्या स्मृती कुठे दडल्या आहेत याचा त्यांना असलेला शोध सुरू राही. अशी माणसे सत्तेला भीत नाहीत आणि नेहरूंसारख्या नेत्याशी बरोबरीच्या नात्याने बोलण्याचे किंवा राष्ट्रपतींची चेष्टा करण्याचे धाडसही त्यांना जमणारे असते.

पडवीतल्या छोटेखानी बैठकीवर येऊन बसताबसताच म्हाताऱ्यानं माझ्या हाती पाटी पेन्सिल देऊन आपल्याला कमी ऐकू येत असल्याचं सांगितलं अन्‌ डोळे मिटून मिस्किलपणे जोडलं, ‘बाकी सब आज भी ठीक है’ मी अन्‌ माझ्या पत्नीनं त्यांना वाकून नमस्कार केला तेव्हा अस्सल मराठीत ते म्हणाले, ‘मराठी दिसताय.’

आम्ही होकारार्थी मान हलवताच आपल्या दमदार मराठीत ते बोलू लागले. ‘तुमची मराठी ही एकदम जोरकस भाषा आहे. तशीच ती बोलली पाहिजे. इतिहासाचार्य राजवाडे एकदा कुठल्याशा संस्थानिकाच्या भेटीला गेले तेव्हा ते श्रीमंत दिवसाचेच गादीवर लोळत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. राजवाडे संतापून म्हणाले, तुमच्या बापजाद्यांचा इतिहास लिहायला आम्ही दिवसरात्र दऱ्याखोऱ्या पालथ्या घालतो आणि तुम्ही असे गादीवर दिवसाचे लोळता काय? तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे. पुढे त्या श्रीमंतांच्या झालेल्या भेटीत आपल्या इतिहास संशोधनासाठी राजवाड्यांनी त्यांना आर्थिक मदत मागितली. त्यावर श्रीमंतांनी आपल्या आर्थिक अडचणी सांगायला सुरुवात केली. राजवाडे म्हणाले, ‘ पैशाची एवढी अडचण असेल तर एक बाई कमी ठेवा.’

जरा थांबून शर्माजी म्हणाले ‘अशा दमदार मराठीचा मला मोह आहे.’

अन्‌ विचारलं, ‘मांडूगड पाहिला?’

‘हां. आज दिवसभर हिंडतो आहोत यांच्यासोबत.’

मी शेजारच्या दुसऱ्या गाईडकडे पाहत म्हणालो.

‘असं पाहू नका. मनानं पहा. या वास्तूतल्या इतिहासाची जाण ठेवून पहा. इतिहास वजा केला की मांडू दगड आणि चुन्याचा ढिगारा होतो. It`s nothing but a pile of lime & stones. इतिहास मिसळला की मांडू एक सजीव परंपरा होते. तुम्ही तसा मांडू पहा.’

गोरा गव्हाळ वर्ण, मजबूत हाडापेराची उंच देहयष्टी, डोक्यावर पांढऱ्याशुभ्र केसांचे विखुरलेपण, चेहरा लांबोळका-काहीसा हरींद्रनाथ चट्टोपाध्यायांसारखा. बोलण्याची ढबही हरींद्रनाथांनी यांच्यापासून घेतली असावीशी. पांढरी सुरवार, सदरा अन्‌ त्यावर लांब बाह्याचे लाल स्वेटर असा पेहराव. प्रत्येक शब्दावर जोर अन्‌ आवाजात त्याच्या मोलाची जाण.

‘या गडावरच्या पत्थरांची एक भाषा आहे. ते दगड येणाऱ्याजाणाऱ्याशी बोलतात. ती जुबाँ समजून घेता आली पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी बोलून बघा.’

‘पंडितजी, तुम्ही इथं आयुष्याची पन्नासावर वर्षं घालविली. तुमची या दगडांशी दोस्ती आहे. आम्ही आज इथं आलो अन्‌ तेही काही दिवसांसाठी. एवढ्या थोड्या ओळखीत ते आमच्याशी कसे बोलतील?’ मी.

‘बोलतील, बोलतील. जरा दिल लावून बघा.’

मनात आलं दिल लावायला आम्हांला दगडच का मिळावे? पण ज्यांना दगडांचा दिल कळतो त्या भाग्यवान दिलवंतांची केवढी पुण्याई! असा पुण्यवान दिलवाला पुढ्यात बसला होता अन्‌ त्याच्या शब्दांतून त्याचं दगडावरचं दिल बोलत होतं.

‘काय बोलतात हे पत्थर तुमच्याशी?’

‘खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा मी रात्रीचा इथल्या जामा मशिदीच्या भव्य वास्तूतून हिंडत होतो. अन्‌ अचानक त्या चिरेबंदी इमारतीतले काही दगड हातच्या विजेरीच्या प्रकाशात आपल्याला खुणावताहेत असं वाटलं. जवळ गेलो तेव्हा त्यांचं वेगळेपण जाणवलं... मी विचारलं, अरे भई, तु यहाँ कहाँ से आये? त्यांच्यातला एक म्हणाला, एक जमाने में हम सब भगवान आदिनाथ के मंदिर में रहा करते थे. तुम्हारे आदमीयों ने बाद में इसे पलट दिया... मशिदीत कधी न दिसणारी कमळाच्या फुलांची वेलबुट्टीदार कुसर त्या दगडांवर खिन्न हसत होती..’ शर्माजी म्हणाले.

‘मग मी आणखी बारकाईनं पाहू लागलो अन्‌ हळूहळू त्या बेजान पत्थरांवरचा जिवंत माणसांचा बलात्कार मला दिसू लागला. आज जी वास्तू जामा मशीद म्हणून सांगितली जाते ते मूळचं आदिनाथाचं मंदिर आहे. या मंदिराच्या मध्यभागी असलेल्या कोरीव चौकटीत कधीकाळी प्रभू रामचंद्राच्या मूर्ती होत्या. त्या चौकटीच्या बाजूला एक उंच सिंहासन होतं. ते सम्राट विक्रमादित्याचं आहे. सिंहासनाच्या पायऱ्या जिथं सुरू होतात तिथं असलेल्या चौथऱ्यावर त्या प्रतापी राजाचे न्यायाधिकारी बसत. सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या उंच सज्जात राणीमंडळ येऊन बसे... माझ्या थकल्या डोळ्यांपुढे त्या अंधारातही त्या सगळ्या गोष्टी सजीव होऊन आल्या. आजही ती दृष्यं मला भेटत असतात...’

‘या मशिदीच्या मागे असलेल्या हुशंगशहाच्या मकबऱ्यावर फुलांची दगडी कमान आहे. तिथल्या शिवालयाच्या खुणा आणखी स्पष्ट आहेत. The whole Muslim history of Mandu is built
on Hindu foundation... येणारी माणसं नुसती बाज बहादूर-रूपमतीच्या प्रेमकथेचं वेड घेऊन येतात. ती कथा गोडही आहे, पण तो सारा सहा वर्षांचा मामला. तिचं प्रेम, तिची आत्महत्या हे सारं चटका लावणारं आहे. पण मांडव पंधराशे वर्षांचा आहे... इथं कधीकाळी सात लाखांची वस्ती होती. इथल्या मातीत तिची आणि त्या माणसांची राख मिसळली आहे. या जमिनीवर जपून पाय ठेवा. घराणी आली, गेली. राजे आले आणि गेले. काही थोर तर काही हलकट. या गडानं त्या साऱ्यांच्या थोरवीच्या अन्‌ क्षुद्रत्वाच्या खुणा अजून जपल्या आहेत...’

इतिहासात अनेक मंदिरांच्या मशिदी झाल्या आणि अनेक मशिदींच्या इतिहासाने नुसत्याच वास्तू बनविल्या. मंदिरांची खंडहरे आणि मशिदींचे ढिगारे झाले. त्या सगळ्याच पूजागृहांच्या दगडांना कधीकाळी त्यांच्या भाविकांचे हात लागले आहेत. त्या भाविकांच्या वंशजांच्या मनातल्या त्यांच्या पूर्वजांनी उभारलेल्या त्या वास्तूंच्या आठवणी आता पुसूनही गेल्या आहेत. फार कशाला, त्या पूजागृहांसमोर कधीकाळी नतमस्तक झालेल्या लोकांचे वर्तमान वारसही त्या कहाण्या आता विसरले आहेत.

विष्णु शर्मा हा म्हातारा त्या आठवणी जपणारा होता. त्यांच्या बारीकसारीक खुणा मनात साठवणारा होता. आल्यागेल्याजवळ त्या त्यांच्या मूळ स्वरूपाएवढ्याच सजीव करून सांगणारा विष्णु शर्मा हा एक जिवंत इतिहास होता.

माळव्यातील धारच्या पश्चिमेला 35 अन्‌ इंदोरहून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडूगडाचा इतिहास दहाव्या शतकात सुरू होतो. त्या शतकाच्या आरंभी परमार या राजपूत राजांनी त्यावर आपली सत्ता कायम केली. हे घराणे पुढची चार शतके त्या गादीवर राहिले. त्यातल्या प्रतापी व त्यागी राजांची नावे इतिहासाने आपल्या पटलावर कायमची कोरून ठेवली आहेत.

राजा भोज, रुद्रवर्मन, प्रतापवर्मन यासारख्या राजांनी मांडूचे आणि त्याभोवतीच्या माळव्याचे ऐश्वर्य वाढविले. साऱ्या जगातून येणाऱ्या व्यापाऱ्यांची आणि ज्ञानी माणसांची ती एकत्र येण्याची आणि व्यापारउदिमाएवढीच ज्ञानवैभवाच्या देवाणघेवाणीची भूमी बनली.

मंदिरे आली, राजवाडे उभे राहिले, बाजारपेठा बांधल्या गेल्या, त्यात प्रशस्त मार्ग आले, हत्तीवर बसून बाजारहाट करता येण्याएवढ्या सोयी तयार झाल्या. माणसे प्रतिष्ठित आणि स्त्रिया सुरक्षित झाल्या. त्यातून साहित्य, कला, संगीत, शिल्प, नाटक आणि तत्त्वचिंतनाच्या परंपरा अंकुरल्या आणि विस्तारल्या. राजे न्यायी होते. त्यांच्या न्यायपद्धतीच्या आणि न्यायदानाच्या कहाण्या कवितांसारख्या सर्वतोमुखी झाल्या.

विक्रमादित्याचे सिंहासन, भोजराजाचा प्रतिभाविलास, रुद्रवर्मन-जयवर्मन आदींचा पराक्रम यांनी मांडूगड उत्तरेतच नाही तर साऱ्या भारतात ख्यातकीर्त व प्रतिष्ठाप्राप्त झाला. मांडूच्या सत्तेचा विस्तारही याच काळात झाला. त्याची धास्त उत्तरेत दिल्लीपर्यंत आणि दक्षिणेत कर्नाटकापर्यंत पोहोचली.

नंतरच्या काळात झालेल्या मोगली आक्रमणाने हे वैभव लुबाडले. उरलेसुरले जमीनदोस्त केले. त्यात साहित्य संपले, संगीत लयाला गेले, शिल्पांचे नाक-कान कापले गेले, नाटकांवर पडदा पडला आणि तत्त्वचिंतनाच्या परंपरेपुढे अल्लाचा पूर्णविराम कोरला गेला. माणसांच्या कत्तली झाल्या आणि स्त्रियांवर बलात्कार झाले. समाज भयभीत आणि माणूस मुका झाला. शासकांची मर्जी आणि लहर हा कायदा आणि ते सांगतील तो न्याय बनला.

या छिन्नभिन्न जीवनाच्याही सगळ्या खुणा मांडूने आपल्या अंगावर जपल्या आहेत. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानातून इतिहासाच्या प्राध्यापकांचा एक मोठा जत्था इथं आला. मांडू समजून घेताना त्यांतल्या सहृदय माणसांना अश्रू आवरता आले नाहीत. इथल्या भग्न अवशेषांकडे पाहून त्यांचा पुढारी म्हणाला, ‘या पापासाठी मी माझ्या पूर्वजांना कधीही माफ करणार नाही...’

0

मांडूच्या एवढ्या साऱ्या इतिहासात बाज बहादूरचा वाटा फक्त 1555 ते 1562 या सात वर्षांचा.

रूपमती ही एका गुराख्याची देखणी अन्‌ गाणारी पोर. बाज बहादूर शिकारीच्या वाटेवर असताना ती त्याच्या नजरेत भरली. तिचं लावण्य अन्‌ गाणं यावर लुब्ध झालेल्या बहादूरनं तिला आपल्यासोबत चलण्याची विनंती केली अन्‌ ती  त्याच्यासोबत गेली.

मात्र जाताना, मी तुझ्या जनानखान्यातील इतर स्त्रियांसोबत राहणार नाही आणि नर्मदेचं दर्शन जिथून होईल तिथेच माझा मुक्काम असेल अशा अटी तिने घातल्या. त्यासाठी बाज बहादूरनं तिला मांडूच्या दक्षिणेला वेगळा महाल बांधून दिला.

पुढे आदमखान या अकबराच्या सरदाराकडून बाज बहादूर पराभूत झाला आणि चित्तोडला पळाला. आदमखानाची नजर रूपमतीवर गेली अन्‌ त्यानं तिला आपल्या महालात बोलावलं. त्या वेळी रूपमतीनं विष पिऊन मृत्यू जवळ केला... रूपमती आणि बाज बहादूर यांची प्रेकहाणी इथं संपली. पण प्रेमाला अमरत्वाचं वरदान असल्याने ती नंतरच्या काळात काव्य, गायन, संगीत आणि नाटकांच्या रूपाने अमर झाली.

पंडितजी बोलत होते. कधी रंगून, कधी हरवल्यासारखे.

मी विचारलं, ‘तुमचा मुस्लिम राज्यकर्त्यांवर राग आहे काय?’

‘नाही. मी त्यांचा आंधळा द्वेष कसा करू? त्यांच्यातली काही माणसं खूप चांगली होती. औरंगजेब हा एक असा चांगला राजा होता.’

मी काही म्हणणार एवढ्यात ते म्हणाले, ‘जरा थांबा. सगळं ऐका. त्याचा शिवाजीवरचा राग, त्याच्या साम्राज्याला असलेल्या विरोधाच्या आव्हानावरचा राग होता. शिवाजी पुन्हा हाती लागता तर त्यानं शिवाजीला मारलंही असतं. संभाजीला त्यानं मारलंच. पण शाहूला त्यानं मारलं नाही. त्याच्या धर्मश्रद्धांनाही धक्का लावला नाही. राजकारणातल्या क्रोधाची धर्मावरच्या रागाशी गल्लत करायची नसते... उज्जैनच्या महांकाल मंदिराचे पुजारी एकदा औरंगजेबाला भेटायला गेले. म्हणाले, महांकालाच्या दिव्यासाठी तूप कमी पडतं. बादशहानं आदेश काढला, महांकालाला दरदिवशी दोन मण तूप पोहोचवायचा. शिवाय उत्पन्नादाखल महांकालाला त्यानं पागोळी बांधून दिल्या... लोकांना खरा इतिहास सांगा. काही लपवून ठेवायचं नाही... इतिहास माणसं घडवतो, मनं बनवतो, माणसांना खरं समजलंच पाहिजे, वर्तमानातलं आणि इतिहासातलंही.’

शिवाजी महाराजांनी मशिदींना तनखे अन्‌ अनुदाने बांधून दिली हे इतिहासात साऱ्यांनी वाचले आहे. अकबराने हिंदू मंदिरांचे रक्षण केल्याच्या कहाण्याही इतिहासात आहेत. महाराजांच्या सेनेत अनेक मुसलमान शिलेदार आणि सेनाधिकारी होते आणि औरंगजेबाच्या फौजेतही मिर्झा राजा जयसिंगांसारखी माणसे होती. राजकारण आणि धर्म यांच्या सीमारेषा ज्यांना ओळखता आल्या त्या डोळस राजांची चरित्रे आणि औदार्याचा वसा देशाला समजावून सांगण्याचा विष्णु शर्मांचा प्रयत्न होता.

 ...पण शर्माजी गडावरचे गाईड होते. त्यांच्याकडे येणाऱ्यांनाच ते या गोष्टी सांगू शकत होते. त्यांना औरंगजेबाच्या दुष्टाव्या-एवढ्याच त्याच्या चांगुलपणाच्या गोष्टी ठाऊक होत्या. पण त्या ऐकायला येणाऱ्यांची संख्या लहान होती. शर्माजी पुढारी नव्हते, धर्मगुरू नव्हते, बुवा-बाबा वा कोणत्या पंथाचे प्रचारक नव्हते. ती सगळी माणसे जातिधर्माच्या नावाने समाज पेटवत निघाली असताना विष्णु शर्मा नावाचा हा लहानसा झरा ती आग कशी विझवणार होता? अशी माणसे वाळवंटातल्या ओलाव्यासारखी दिलासाच तेवढी देऊ शकतात. त्यातला वणवा विझवू शकत नाहीत.

0

इतिहासाचा वापर सत्ताकारणासाठी करणारे खूप आहेत. त्या बळावर आपले खरेखोटे अभिमान मिरवणारेही फार आहेत. त्याखेरीज इतिहासातली वैरे उकरून काढून त्यावर वर्तमानात रण माजवणारेही साऱ्यांना चांगले ठाऊक आहेत. मात्र इतिहास हा समाजाचा अनुभव आहे आणि अनुभवाएवढा चांगला शिक्षक दुसरा नाही याची जाणीव ठेवून इतिहासातले काय जागवायचे आणि काय विझवायचे याचा विवेक राखणारा विष्णु शर्मा त्या साऱ्यांच्या भाऊगर्दीत वेगळा, अनोखा आणि आदरणीय वाटावा असा आहे.

त्याला शिवराय समजले आणि औरंगजेबही कळला. त्यांचे धर्मकारण कुठवर जाऊन थांबते आणि राजकारण कुठे सुरू होते याची त्याला असलेली जाण पक्कीच नाही तर शहाणीही होती.

विष्णु शर्मांसारखा माणूस इतिहासावर अधिक प्रेम करतो की वर्तमानावर? इतिहास त्याला खुणावत असेल पण आपल्याला वर्तमान जपायचे आहे याचे त्याला असलेले भान अधिक मोठे होते.

इतिहासातील माणसे ज्या गोष्टींसाठी लढली अन्‌ मेली त्यांतल्या अनेक गोष्टींचे निरर्थक असणे त्याला चांगले समजले होते. त्या गोष्टींसाठी निदान आपले वर्तमान नासवले जाऊ नये याची त्याला काळजी होती. इतिहास हा वर्तमानाचा या अर्थाने खरा शिक्षक ठरणारा आहे.

पंडितजींनी मांडूगडावर ग्रंथ लिहिले. आपल्या अध्ययनाचा देशात आणि जगात सन्मान झालेला पाहिला. नेहरूंपासून जगातल्या अनेक थोरामोठ्यांशी त्यांनी संबंध राखला. देशविदेशांतील सत्ताधाऱ्यांचे पाहूणपण स्वीकारले. जे सांगायचे ते कोणाचीही भीडुर्वत न ठेवता सांगितले. पण त्यांच्यातला विद्यार्थी अखेरपर्यंत जिवंत, कोवळा आणि कमालीचा जागा होता.

इतिहासाचे पहिले धडे त्यांनी थेट जॉन मार्शलजवळ घेतले. याच मार्शलने हरप्पा-मोहेंजोदारोचा शोध लावला होता. शर्माजींच्या घरून निघताना आम्ही त्यांना पुन्हा वाकून नमस्कार केला.

तेव्हा म्हणाले, ‘तुमच्या फिरण्यात तुम्हाला इथं काही वेगळं जाणवलं तर जाण्यापूर्वी मला सांगायला विसरू नका.’

...त्या गडावर सकाळचे फिरत असताना राणी रूपमतीच्या महालाच्या मागच्या बाजूने एक धडधाकट अंगाचा पस्तिशीतला खेडूत गड चढून येताना दिसला. त्याने खांद्यावर एक जाडजूड बोचके घेतले असल्याचे वरून दिसत होते. तो जसजसा जवळ येऊ लागला तसतसे ते बोचके नसून एक मुलगी असल्याचे लक्षात येत गेले.

सारा गड चढून तो रूपमतीच्या महालाच्या पुढच्या प्रशस्त अंगणात दाखल झाला तेव्हा त्याला धाप लागली होती. माझ्या पत्नीने त्याला सोबत आणलेले पाणी प्यायला दिले. तेव्हा खांद्यावरच्या सहा-सात वर्षांच्या मुलीला खाली उतरून ठेवून तो ते प्याला. मग त्याने ते मुलीलाही प्यायला दिले.

‘समोरच्या बाजूला चांगला रस्ता असताना एवढा गड चढून का आलात?’ मी त्याला विचारले.

‘समोरची वाट लांबची आहे. ही पायवाट अवघड असली तरी जवळची आहे.’ त्यानं उत्तर दिलं.

‘आणि ही मुलगी’ मी प्रश्नार्थक नजरेनं विचारलं.

‘माझी मुलगी आहे. तिला शाळेत घालायला आणली आहे. आम्ही शिकलो नाही. तिनं शिकावं असं मनात आहे.’ त्यानं सारं धडाधडा अन्‌ सहजपणे सांगितलं.

आपल्या मुलीच्या शिक्षणाची त्या निरक्षर बापाला असलेली तळमळ मला अन्‌ माझ्या पत्नीला, आम्ही दोघेही शिक्षक होतो, खोलवर हेलावून गेली.

मनात आले राणी रूपमती हा इतिहास आहे. ही मुलगी हे आताचे वर्तमान आणि उद्याचे भविष्य आहे.

0

या घटनेला खूप वर्षे लोटली. पं. विष्णु शर्मा गेले. राहुलजी बारपुत्यांनीही जगाचा निरोप घेतला. त्यानंतरच्या काळात बडवाणीजवळच्या कसरावद या खेड्यात नर्मदेच्या काठावर बाबा आणि साधनाताई आमटे नर्मदा आंदोलनासाठी मुक्कामाला येऊन राहिले. त्यांच्या भेटीला कसरावदला आलो तेव्हा पुन्हा एकवार मांडूगडावर जायचे मनात आले अन्‌ तसा गेलोही.

नवे काही पाहायचे नव्हते अन्‌ जे दिसत होते त्यातल्या प्रत्येकाला शर्माजींची आठवण चिकटली होती. जामा मशीद पुन्हा पाहिली. आता तीत नमाजाची रस्म अदा होत नाही. ज्या देवळात पूजा नाही त्याचे शिल्प होते तसे हे आदिनाथाचे प्राचीन मंदिर अन्‌ नंतरच्या काळात त्याची झालेली जामा मशीद आता नुसतेच एक शिल्प बनली होती... रूपमतीचा महाल पुन्हा पाहिला पण पूर्वीची नजर येत नव्हती अन्‌ तेव्हाचा जिव्हाळाही मनात उतरत नव्हता... जलमहालाच्या दिशेने जायला निघालो तेव्हा, वाटेतले पंडितजींचे रिकामे कौलारू घर कसे दिसेल या विचारानेच व्याकूळ झालो आणि न जाता थांबलो.

या वेळी मांडू सोडला तो तेथे पुन्हा कधी न परतण्याच्या इराद्याने. माणसामुंळे वास्तू जिवंत असतात. मांडूचे जिवंतपण निदान माझ्यापुरते पं. शर्मामुंळे टवटवीत होते. आताचा मांडू म्लान दिसला.

 (ऑगस्ट महिन्यातील ‘तारांगण’मध्ये राम शेवाळकर यांच्यावरील लेख प्रसिद्ध होईल.)

Tags: नर्मदा पं. जवाहरलाल नेहरू रूपमती बाजबहादूर मांडू Narmada Pt. Jawaharlal Nehru Rupmati Baja Bahadur Mandu weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात