डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

मागील वर्षभरापासून सुरेश द्वादशीवार यांची ‘तारांगण’ ही लेखमाला ‘साधना’तून प्रसिद्ध होत आहे.  या लेखमालेत आतापर्यंत अनंत भालेराव, यदुनाथ थत्ते, नरहर कुरुंदकर, जर्नेलसिंग भिंद्रानवाले, तारकेश्वरी सिन्हा, सुरेश भट, मा.सा.कन्नमवार, बाबा आमटे, राम शेवाळकर, चरणसिंग, राजे विश्वेश्वरराव, पंडित विष्णुदत्त शर्मा, सविता डेका यांच्यावरील लेख प्रसिद्ध झाले. यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या अंकात प्रमोद महाजन यांच्यावरील आणि तिसऱ्या अंकात ‘एका स्वातंत्र्यसैनिकाची शोकांतिका’ हे दोन लेख प्रसिद्ध होतील.  या सर्व 15 व्यक्तींवरील लेखमालेचे पुस्तक डिसेंबर 2011 मध्ये साधना प्रकाशनामार्फत प्रकाशित होईल. - संपादक  

अहेरीचे राजे विश्वेश्वरराव महाराज यांची नागपूरच्या आमदार निवासात अचानकपणे भेट झाली तेव्हा ते सहजपणे म्हणाले, ‘तुम्हाला कळले नसेल, राणीसाहेबांना कॅन्सर झाला आहे.’

एखादी साधी बातमी एखाद्याने तटस्थपणे द्यावी तसे त्यांचे ते सरळसाधे सांगणे पाहून मी क्षणभर अवाक्‌ झालो. पण तोच त्यांचा स्वभाव असल्याचे आठवले आणि माझे आश्चर्य मावळले. मोठाले विजय मिळाले तेव्हा ते हरखले नाहीत अन्‌ तेवढ्याच मोठ्या पराभवांनी ते खचले नाहीत. 1977 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा प्रचंड विजय झाला तेव्हा मतमोजणीच्या अखेरच्या काळात आपल्या पराभूत प्रतिस्पर्ध्यांचे सांत्वन करताना तर 1980 च्या निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या वेळी आपल्या विजयी प्रतिस्पर्ध्याचे तेवढ्याच खिलाडूपणे अभिनंदन करताना त्यांना मी पाहिले होते.

1997 मध्ये डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात राणीसाहेबांनी जगाचा निरोप घेतला तेव्हा त्यांच्या चितेजवळ शांतपणे उभ्या असलेल्या विश्वेश्वररावांनी शांतपणे म्हटले, ‘आज आपले घर तुटले’. या वेळी त्यांचा आवाज किंचित कापरा झाला होता. त्यांच्या डोळ्यांच्या कडाही जरा पाणावल्या होत्या. त्यांना तसे विकल झालेले माझ्या 35 वर्षांच्या संबंधात मी प्रथमच पाहत होतो. त्यांचा निरोप घेऊन परतलो तेव्हा तीनच महिन्यांनी खुद्द त्यांच्याच अंत्यदर्शनासाठी अहेरीला जावे लागेल, असे वाटले नव्हते.

राजकारणाच्या धकाधकीतही जेवढ्या शांत अन्‌ संयमीपणे त्यांनी सगळे आयुष्य काढले तेवढ्याच शांतपणे त्यांनी 27 मार्च 1998 ला जगाचा निरोप घेतला.

1962 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर चंद्रपुरातून ‘गोंडवाना’ या मराठी साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू झाले. चंद्रपूर व गडचिरोली परिसरातील आदिवासींच्या प्रश्नांना वाहिलेल्या या नियतकालिकाचे प्रकाशक राजे विश्वेश्वरराव होते आणि त्याच्या संपादनाची जबाबदारी मी पत्करली होती.

विश्वेश्वरराव हे तेव्हा सिरोंचा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेलेले आमदार होते आणि मी बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो. साप्ताहिकाच्या दुसऱ्या अंकाचे प्रकाशन आम्ही अहेरीला मोठ्या थाटामाटाने केले. राजांचे वडील कै.श्रीमंत राजे धर्मराव महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण न्या.भवानीशंकर नियोगी यांच्या हस्ते तेथे व्हायचे होते. त्याच समारंभात हे प्रकाशन झाले.

एक तरुण, संवेदनशील आणि उत्साही लोकप्रतिनिधी म्हणून तोवर मी विश्वेश्वररावांना ओळखत होतो. या समारंभात त्यांची पटलेली ओळख त्यांच्या अंगभूत मोठेपणाची जाणीव करून देणारी अन्‌ त्यांच्याविषयी वाटणारा आदर कायम करणारी व वाढविणारी होती.

ज्याच्या पुतळ्याचे अनावरण करायचे त्या माणसाविषयी सगळेच गौरवाने बोलत असतात. त्यातून कै.धर्मराव यांची रसिक अन्‌ दानी वृत्ती विदर्भ अन्‌ महाराष्ट्रातील अनेकांना अन्‌ अनेक संस्थांना कायमचे ऋणी करून गेली होती. त्यामुळे त्यांच्याविषयी भरभरून बोलण्याजोगे फार होते. बाकीचे वक्ते तसे बोललेदेखील.

एकटे राजे विश्वेश्वररावच तेवढे त्या सभेत वेगळे बोलले. आपल्या श्रद्धेय तीर्थरूपांचा यथायोग्य गौरव करणाऱ्या विश्वेश्वररावांनी तेथे जमलेल्या सहस्रावधी आदिवासींना उद्देशून तळमळीने म्हटले, ‘माझ्या वडिलांच्या सगळ्या गुणांचा अंगीकार करा. मात्र त्यांच्या व्यसनाधीनतेपासून दूर राहा.’

सगळी सभा, न्या.नियोगींसह अवाक्‌ झाली. न्या.नियोगींनी त्यांना जवळ घेऊन त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत म्हटले, ‘तुमच्या धिटाईने अन्‌ प्रामाणिकपणाने आम्हाला अंतर्मुख केले आहे.’  

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका त्या काळात एकाच वेळी होत. 1962 च्या निवडणुकीत राजांच्या नेतृत्वातील आदिवासी सेवा मंडळ अन्‌ जुन्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व काँग्रेसेतर पक्ष एकत्र आले आणि त्यांनी तेव्हा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदावर असलेल्या कै.कन्नमवार यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस पक्षाला जोरदार शह दिला.

त्या निवडणुकीत लोकसभेची जागा आदिवासी सेवा मंडळाच्या लाल शामशहा यांनी जिंकली तर चंद्रपूर आणि गडचिरोलीसह सिरोंचा ही विधानसभा क्षेत्रेही या आघाडीने पदरात पाडून घेतली. खुद्द कन्नमवारांनाही त्यांच्या सावली या निर्वाचन क्षेत्रातून तेव्हा जेते 600 मतांनी निवडून येणे जमले होते. विश्वेश्वरराव यांच्या राजकीय कायकीर्दीचा आरंभ असा तेजस्वी होता.

तेव्हाचे विश्वेश्वरराव आणि 35 वर्षांनंतरचे 1997 मधील विश्वेश्वरराव या दोहोंत वरवर पाहता कुणालाही फारसा फरक जाणवणारा नव्हता. त्यांचे दर्शनी रूप तसेच साधे अन्‌ तेवढेच राजबिंडे राहिले होते. शरीरप्रकृतीसारखाच त्यांच्या वागण्या बोलण्यात फरक नव्हता. शिवाय एवढ्या वर्षांत त्यांच्या पोषाखातही बदल झाला नव्हता. ठेंगण्या बांध्याचे, मजबूत अन्‌ काटक अंगाचे आणि सावळ्या वर्णाचे विश्वेश्वरराव डोक्यावर नेहमी आदिवासी सेवा मंडळाची काळी टोपी घालत. अंगात निळ्या रंगाचा लांब बाह्यांचा अर्ध्याएवढा मुडपलेला सदरा अन्‌ दीड टांगी जरा वर नेसलेले धोतर असा त्यांचा पेहराव असे. देखण्या अन्‌ वर्तुळाकार चेहऱ्यावर नेहमी प्रसन्न हास्य अन्‌ चष्म्याआडच्या पाणीदार डोळ्यांत सदैव सावधपण असे.

एवढ्या साधेपणातही त्यांच्या हालचालीतली ऐट अशी की पाहणाऱ्याला सहजपणे त्यांचे ‘राजेपण’ समजावे. त्यांच्या हाती सदैव एक चांदीची डबी असे. तीत पांढऱ्या सुपारीची मोठाली सुगंधी खांडे व दात कोरायच्या काड्या असत. सारा जन्म या एका व्यसनाखेरीज विश्वेश्वररावांनी दुसरा कोणताही षौक केला नाही.

एके काळी ते शिकार करीत. रस्त्यात मोटार ठेवून रात्रीच्या वेळी वाघाचा पायी माग काढत जंगलात फिरण्याचे धाडस त्यांच्यात होते. वाघाच्या शिकारी कायद्याने थांबल्या आणि त्या षौकाला त्यांनी कायमचा निरोप दिला.

आपण ‘राजे’ असल्याची त्यांची जाण कधी गेली नाही वा आपण आदिवासी असल्याचा अभिमानही त्यांनी कधी सोडला नाही. चंद्रपूरच्या एका सभेत हुल्लड करणाऱ्यांच्या गटाला उद्देशून ते शांतपणे म्हणाले, ‘माझ्यासारख्या आदिवासीला तुम्ही शहरी लोक हा हुल्लडीचाच धडा शिकविणार काय?’

1962 पाठोपाठ 67 साली झालेल्या निवडणुकीतही त्यांना भरघोस यश मिळाले. 71 च्या लोकसभा निवडणुकीत ते प्रथमच काँग्रेसच्या अब्दुल शफी यांच्याकडून पराभूत झाले. 77 च्या निवडणुकीत त्या पराभवाचा वचपा काढीत त्यांनी शफी यांचा प्रचंड पराभव केला. 80 च्या निवडणुकीत काँग्रेसचे शांतराम पोटदुखे हे त्यांच्या विरोधात विजयी झाले. नंतरच्या काळात त्यांना हवे तसे यश मिळाले नाही, पण त्यांच्यातली जिद्दही कधी संपली नाही.

विश्वेश्वररावांनी आरंभापासून विदर्भ राज्याच्या स्वप्नाचा ध्यास घेतला अन्‌ त्या मागणीसाठी आपले राजकारण राबवले. हा ध्यास एवढा तीव्र की, त्यात त्यांचे मूळचे आदिवासी सेवा मंडळ हरवले आणि त्याची जागा नागविदर्भ आंदोलन समिती या नव्या संघटनेने घेतली.

कै.बापूजी अणे आणि कै.ब्रिजलाल बियाणी यांच्यानंतर त्या चळवळीतील तेच एक तेव्हाचे नेते होते. मात्र याच काळात जांबुवंतराव धोटे यांचे नेतृत्व या चळवळीत पुढे आले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आक्रमकता आणि साऱ्या विदर्भाच्या पातळीवरील त्यांची स्वीकारार्हता मोठी होती. विश्वेश्वररावांच्या स्वभावातील ऋजुता अशी की, चळवळीतील आपल्या ज्येष्ठतेचा हेका न धरता त्यांनी जांबुवंतरावांचे नेतृत्व मोकळ्या मनाने मान्य केले आणि त्यांच्या नेतृत्वातील महाविदर्भ राज्य संघर्ष समितीच्या झेंड्याखाली आपला वेगळ्या विदर्भाचा आग्रह त्यांनी उभा केला.

पुढे जांबुवंतराव जेव्हा काँग्रेसच्या झेंड्याखाली गेले तेव्हा विश्वेश्वररावांनी त्यांच्यापासून आपली चळवळ आणि संघटना वेगळी केली. विदर्भाचे राज्य वेगळे करायचे तर त्या राज्याला विरोध करणाऱ्या पक्षांशी मैत्री करून अन्‌ त्या पक्षांच्या सरकारांची मनधरणी करून ते मिळविता येणार नाही. त्यासाठी आपल्या मागणीमागे जनमत उभे केले पाहिले आणि सत्तारूढ पक्षाशी संघर्ष जारी ठेवला पाहिजे या भूमिकेवर विश्वेश्वरराव ठाम होते. या भूमिकेमुळे त्यांना काँग्रेसजवळ जाता आले नाही.

तेव्हाचा जनसंघही विदर्भाच्या बाजूने नव्हता. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधाचे राजकारण उभे करण्यासाठी विश्वेश्वररावांनी जनसंघाची साथ घेतली तरी त्या पक्षाच्या विदर्भाविषयीच्या भूमिकेबद्दल त्यांच्या मनात एक अढी सदैव कायम राहिली.

रिपब्लिकन पक्ष व विशेषत: बाबू हरिदास आवळे यांच्याशी त्यांनी निखळ राजकीय मैत्री केली. तिचा आधार वेगळ्या विदर्भाची मागणी हाच होता. राजे विश्वेश्वरराव यांच्या भूमिकेचा विजय असा की, ते विदर्भाच्या ज्या भूमिकेवर अखेरपर्यंत ठाम राहिले त्याच भूमिकेवर पुढे भारतीय जनता पक्ष आणि नंतर विदर्भातील काँग्रेस पक्ष या दोहोंना पुढच्या काळात यावे लागले. आपल्या भूमिकेचा असा विजय त्यांना त्यांच्या हयातीतच पाहता आला.

कोणतीही भूमिका निष्ठा म्हणून पत्करली की तिच्यासाठी त्यागाला तयार व्हावे लागते. विश्वेश्वररावांच्या व्यक्तिमत्त्वाचे मोठेपण हे की, अशा प्रत्येक त्यागाच्या वेळी त्यांची निष्ठा अविचल राहिली. आपण केलेल्या त्यागाविषयीची वाच्यता करणे हेही त्यांनी अखेरपर्यंत निषिद्ध मानले.

कै.यशवंतराव चव्हाण, कै.दादासाहेब कन्नमवार, कै.वसंतराव नाईक व वसंतदादा पाटील यांच्यापासून शंकरराव चव्हाणांपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक मुख्यमंत्र्याने त्यांना त्यांच्या अनुयायांसह राष्ट्रीय प्रवाहात म्हणजे काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. पुढच्या काळातही ही निमंत्रणे थांबली नाहीत. काँग्रेस प्रदेशाचे तेव्हाचे निमंत्रण हे मंत्रिपद वा तत्सम मोठे पद भूषविण्याचेच आमंत्रण होते. विश्वेश्वररावांनी यांपैकी प्रत्येकाला अतिशय विनम्र पण ठाम नकार दिला.

त्यांच्या षष्ट्यद्धीपूर्तीनिमित्त अहेरीला झालेल्या मोठ्या सोहळ्याला तेव्हाचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण मुद्दाम आले होते. विश्वेश्वररावांच्या हजारो आदिवासी अनुयायांच्या साक्षीने शंकररावांनी त्यांना ‘वेगळे न राहता मुख्य प्रवाहात येण्याचे’ आवाहन केले. त्या आवाहनाबद्दलची आपली कृतज्ञता जाहीर करून ‘मला आहे तेथेच राहू द्या’ अशी नम्र विनंती विश्वेश्वररावांनी त्यांना केली.

मुख्यमंत्र्यांच्याच पातळीवर हे प्रयत्न थांबले नाहीत. महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर असताना खुद्द विजयालक्ष्मी पंडित यांनीही त्या प्रयत्नात भाग घेतला. तेवढ्यासाठी त्या अहेरीला आल्या आणि विश्वेश्वररावांचा नकार घेऊन परत गेल्या. पं.नेहरू पंतप्रधान असताना हे घडले ही बाब विजयालक्ष्मींचे पंडितजींशी असलेले नाते लक्षात घेतले की अतिशय महत्त्वाची ठरते.

त्यागाचीही एक अहंता असते. खूपदा ती नको तेवढी बोलकी होऊन कुरूप होते. विश्वेश्वररावांनी सत्तेपासून दूर राहण्याच्या वृत्तीपायी ज्या गोष्टींकडे पाठ फिरविली त्यांची कधी वाच्यता केली नाही. त्यांच्या या मूक त्यागाची कथा एवढ्यावर संपत नाही. आपल्या या वृत्तीबाबत त्यांना त्यांच्या जवळच्या माणसांच्या टीकेलाही जन्मभर तोंड द्यावे लागले.

‘तुम्हाला सत्ता नको असली तरी तुमच्यासोबत एवढी वर्षे घालविणाऱ्या आमचा विचार तुम्ही कधी करणार की नाही’ या त्यांच्या सत्तावंचित अनुयायांच्या प्रश्नाने त्यांचा कायमचा पिच्छा पुरवला. ही निष्ठावान माणसे आपापल्या आयुष्यांचे भांडवल घेऊन आपल्यासोबत एका संघर्षात उतरली. आपण मात्र त्यांना फारसे काही देऊ शकलो नाही ही व्यथा त्याचमुळे विश्वेश्वररावांना आयुष्यभर छळत राहिली.

टीकाकारांचा एक वर्ग आणखी होता. ‘हा माणूस स्वत: सत्तेपासून दूर राहतो अन्‌ आपल्या हट्टाखातर तो आपल्या मागासलेल्या अनुयायांनाही सत्तेचा लाभ मिळू देत नाही’ असे या वर्गाचे म्हणणे असे. सत्तेकडे पाठ फिरवून या माणसाने विकासाकडेही पाठ फिरविली अशी जहरी टीका या वर्गाकडून केली जाई.

आष्टीपासून सिरोंचापर्यंतचा अन्‌ अहेरीपासून जाराबंडीपर्यंतचा आदिवासी मुलूख तुमच्यामुळेच अप्रगत राहिला या टीकेला महाराजांजवळही उत्तर नव्हते. काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा तर वेगळ्या विदर्भाची भूमिका सोडावी लागते अन्‌ बाहेर राहिलो तर आपल्या प्रदेशावर आणि आपल्याच बांधवांवर मागे राहण्याची आपत्ती येते, अशा पेचात त्यांचे राजकारण अडकले.

याच काळात विदर्भाच्या बाजूने उभे राहिलेले नेते क्रमाने सत्तेच्या दिशेने वळत गेले. त्याच क्रमाने विश्वेश्वररावांनी ज्यांच्या भरवशावर राजकारणाची गणिते मांडली ती माणसेही हळूहळू त्यांना सोडून सत्तेच्या बाजूने गेली. या काळात विदर्भाच्या मागणीचे रंगही उडत गेले. परिणामी विश्वेश्वररावांचे राजकारण एकाकीपणे केलेल्या वाटचालीसारखे दुर्लक्षित होत गेले.

आपण आदिवासी असल्याच्या जाणिवेतून ते कधी बाहेर पडले नाहीत अन्‌ ते आदिवासींचे नेते असल्याची बाब गैरआदिवासींनाही कधी विसरता आली नाही. त्यामुळे विदर्भाच्या प्रश्नासाठी सत्तेशी कायमचे वैर करणारा हा निष्ठावान माणूस अखेरपर्यंत अहेरी परिसराचाच नेता राहिला.

स्वातंत्र्यात संस्थाने गेली अन्‌ जमीनदारी सरकारजमा झाली. स्वाभाविकच जुन्या राजवाड्यांना अन्‌ त्यांच्या वैभवांना उतरती कळा आली. अहेरीचेही वैभव ओसरले.

1962 नंतर विश्वेश्वररावांच्या आयुष्यावरही त्या बदलत्या काळाच्या छटा दिसू लागल्या. वॉक्झॉल नावाच्या फक्त धनवंतांनाच परवडू शकणाऱ्या मोटारगाडीतून एकेकाळी फिरणारे राजे विश्वेश्वरराव प्रथम जीपमधून अन्‌ नंतर एस.टी. बसमधून प्रवास करू लागले. साध्या रिक्षातून तर कधी पायीच रस्त्याने निघालेले विश्वेश्वरराव पाहिले की त्यांच्या चाहत्यांच्या काळजात तेव्हा कालवाकालव व्हायची.

काहीतरी मिळविण्याच्या हव्यासातून राजकारण करणाऱ्या माणसांनी मग विश्वेश्वररावांना अव्यवहारी ठरवायला सुरुवात केली. राजकारणाचा हिशेब नफा- तोट्याच्या भाषेत मांडणाऱ्या हिशेबी लोकांना विश्वेश्वररावांनी आपल्या निष्ठेखातर पत्करलेल्या या फकिरीचे मोल कळणारही नव्हते.

अहेरीच्या जमीनदारीला तिच्या बरखास्तीच्या काळात सात लाखांचे सालिना उत्पन्न होते. तेवढ्या वैभवात राजपुत्रासारखे वाढलेल्या विश्वेश्वररावांना आपली गावोगावची घरे, जमिनी, वाऱ्या मोलाने फुंकाव्या लागल्या. त्यांनी निष्ठेने गरिबी पत्करली. पण त्या साऱ्या काळात त्यांना हताश झालेले कोणी पाहिले नाही. रस्त्याने पायी निघालेल्या विश्वेश्वररावांची पावलेही राजाच्याच दिमाखात पडत अन्‌ त्यांच्या मुद्रेवर नेहमीच आशीर्वादाचा एक प्रसन्न भाव असे. त्याही काळात त्यांच्यासोबत निष्ठेने राहिलेल्या लोकांना त्यांच्याविषयी वाटणारा अभिमान कधी ओसरला नाही अन्‌ विश्वेश्वररावांनी त्या सर्वांशी असलेल्या आपल्या संबंधात कधी दुरावा येऊ दिला नाही.

विश्वेश्वररावांचे राजेपण गेले होते. सामान्य नागरिकाच्या वाट्याला येणारे आयुष्य ते जगत होते. पण जुन्या वैभवाच्या स्मृती मनातून जात नव्हत्या. त्यांना त्या विसरता आल्या तरी त्यांच्या जवळच्या माणसांना त्या टाकवत नव्हत्या. त्यातही घरातल्या ज्या वडीलधाऱ्या माणसांनी जुने वैभव प्रत्यक्ष भोगले व अनुभवले होते, त्यांना त्यांचा भूतकाळ सोडत नव्हता...

एका सायंकाळी मी राजांना हातात कागदाचा एक चिटोरा घेऊन वाड्याच्या वऱ्हांड्यात ठेवलेल्या मोठ्या आरामखुर्चीत चिंतामग्न होऊन बसलेले पाहिले.

जवळ जाऊन विचारले ‘काय झाले?’

 काहीएक न बोलता आणि माझ्याकडे वळूनही न पाहता त्यांनी हातचा कागद मला दिला. ती तार होती. त्यांच्या आर्इंनी, राजमाता राजकुंवर साहेबांनी ती पाठविली होती. ‘लोणची घालायची आहेत. पंधरा हजार रुपये तात्काळ पाठवा’ असा तीत आदेश होता... मला दडपल्यासारखे झाले.

ते हताश होऊन म्हणाले, ‘आईसाहेबांनी सारी श्रीमंतीच अनुभवली. त्यांना ती विसरायला सांगता येत नाही आणि आमचे आजचे दिवसही त्यांना सांगवत नाहीत.’

अहेरीच्या राजवाड्याएवढाच विश्वेश्वररावांच्या मनातील आर्इंचा रुबाब मोठा होता. गोऱ्यापान, उंच आणि सडपातळ बांध्याच्या राजकुंवरसाहेबांच्या चर्येवर राणीपणाचे तेज होते. मोठ्या  आणि निरभ्र डोळ्यांत दरारा व जरब होती. त्यांच्या हसण्याला मातृत्वाची एक हलकीशी किनारही होती. विश्वेश्वररावांवर त्यांचा फार जीव होता. राजांचे निर्व्यसनी असणे हे जसे त्याचे एक कारण तशी त्यांची मातृभक्ती हेही त्याचे कारण होते. आर्इंचा जेवढा धाक विश्वेश्वररावांना होता तेवढाच किंबहुना त्याहून अधिक तो त्यांच्या वडिलांना, थोरले राजे धर्मराव यांनाही होता.

थोरल्या राजांना मद्याचा अतिरिक्त षौक होता. गाणे बजावणे त्यांना आवडायचे. क्रीडा, स्पर्धांध्येही त्यांना रुची होती. शिवाय तेव्हाच्या राजेपणाला असावे ते इतर छंदही होते.

स्वाभाविकच महाराणी राजकुंवर साहेबांच्या सच्छील व्यक्तिमत्त्वाची त्यांना जरब होती. त्यांच्यासमोर यायला ते चाचरत. त्यांचे सगळे षौक वेगळ्या वाड्यावर चालत आणि माँसाहेबांचा मुक्काम शेजारच्या दुसऱ्या वाड्यात असे.

आपल्या आईची आठवण सांगताना विश्वेश्वरराव हळवे होत. एकदा म्हणाले, ‘वडिलांना आईचा धाक होता, त्यामुळे त्यांचे छंद वाड्यातही फारसे चालायचे नाहीत, आपल्या षौकाची सगळी साधने घेऊन ते भामरागडला जात. तिथल्या पामुलगौतम नदीच्या काठावर पण वाळूच्या पात्रात खूप झोपड्या बांधत, त्यातल्या एकीत त्यांचा मुक्काम असे. दिवसचे दिवस अन्‌ आठवडेच्या आठवडे ते तेथे राहत आणि परतले की काही दिवस तरी आईसमोर यायचे टाळत. 

अहेरीतल्या त्यांच्या राजवाड्याचे वैभव हरवले होते. समोरच्या बैठकीत एक साधी वेताची खुर्ची असायची. तीत ते स्वतः बसत. बाकीच्यांना तशीही त्यांच्यासमोर खुर्च्यांवर बसायची सवय नव्हती. भेटीला येणारी माणसे मग खाली अंथरलेल्या सतरंजीवर बसत. ती सतरंजीही पार विटून गेलेली असे...

राजकारणातले वैरी त्यांच्या राजेपणावर टीका करीत. विश्वेश्वरराव मात्र गेलेल्या राजेपणाने आणलेले रितेपण पाहत आणि अनुभवत शांत असत. त्यांना राजेपण नाकारता येत नसे आणि ते मिरवताही येत नसे. सारा मारा मग ते मुकाटपणे गिळत आणि स्वतःच स्वतःची समजूत काढत.

संपत्ती आणि सत्ता गेली की जवळची माणसेही दूर जातात. नेहमी भोवती असणारी गर्दी विरळ होत जाऊन दिसेनासे होतात. मैत्रीत दुरावा येतो आणि जवळची माणसेही तुटकपणे वागू लागतात.

साधे मुख्यमंत्रिपद गेले तरी वाट्याला आलेले माझ्या एका स्नेह्याचे असे एकाकीपण मी पाहिले आहे. ‘एरव्ही मी फोन घेऊन थकायचो. पद सोडल्यानंतरच्या एवढ्या दिवसांत आलेला फोन फक्त तुमचाच’ असे ते म्हणाले होते.

राजांजवळ एरव्ही दिसणारी धनवंत माणसे नंतरच्या काळात दिसेनाशी झाली. त्यांच्याकडून कर्जाच्या रकमा वसूल करायला येणारे अधूनमधून दिसायचे. पुढे तेही येईनासे झाले. फार थोडी, त्यांचे मोठेपण ओळखून त्यांचा आदर करणारी माणसे उरली. त्यांच्या पाठिंब्याच्या बळावर ज्यांना निवडणुकीत यश मिळविता येणार होते ती येत राहिली. बाकी सारा वाडा नुसता शुकशुकाटात दिसायचा...

मात्र याही काळात साऱ्या आदिवासी मुलुखातली त्यांची मनुष्यसंपन्नता अंगावर येताना दिसायची. ते गावात यायचे म्हटले की सारे गाव स्वच्छ व्हायचे. रस्त्यावर पाण्याच्या घागरी रित्या व्हायच्या, आंब्याची तोरणे सजायची, मिळतील त्या रानफुलांच्या माळा घरांवर चढायच्या, ते गावात आले की त्यांना पाटावर उभे करून सारा गाव त्यांचे पाय धुवायचा. बाया-माणसे पायावर डोके ठेवून त्यांचा आशीर्वाद घ्यायची. गावात नव्याने जन्माला आलेली मुले त्यांच्या पायावर आणून ठेवली जायची. त्या मुलांना राजांनी नावे द्यावी असा आग्रह व्हायचा. मग तेही ‘पवरी, मुंगरू, राजा, कन्ना...’ अशी नावे सांगायचे. राजांनी नाव दिलेल्यांच्या पिढ्या आजही अहेरी आणि भामरागडच्या परिसरात पाहता येतात.

विश्वेश्वररावांनी सुपारीएवढेच व्यसन पुस्तकांचेही केले. उत्तमोत्तम अन्‌ र्दुीळ पुस्तकांचा त्यांचा संग्रह मोठा होता. त्यांच्या बोलण्यात नेहमी नवनव्या ग्रंथांचे अन्‌ त्यांच्या प्रतिपादनांचे उल्लेख येत. इंग्रजी, हिंदी, मराठी, तेलगू, गोंडी अन्‌ माडिया या भाषांवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.

आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री एन.टी. रामाराव हे आपल्या तेलगू देसम या पक्षाच्या प्रचारासाठी त्यांना आदिलाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुद्दाम बोलवून घेत.

विश्वेश्वरराव अहेरीच्या परिसरातील आदिवासींचे साधे राजकीय नेते नव्हते. ते त्यांचे श्रद्धेय दैवतच होते. त्यांची गाडी गावात येऊन गेली किंवा त्यांच्या छायाचित्राचे पोस्टर गावात लागले एवढी गोष्ट त्यांच्या निवडणूक प्रचाराला पुरत असे. त्यांचे गावात येणे हा गावासाठी मोठा उत्सव असे.

अहेरीच्या राजवाड्यासमोर होणारा दसऱ्याचा सण हा त्या परिसराचाच महोत्सव असे.

आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दशकात विश्वेश्वररावांनी स्वत:ला आपल्या परिसराच्या शैक्षणिक विकासाला वाहून घेतले. डझनांनी शाळा उघडल्या अन्‌ शिक्षणापासून दूर राहिलेल्या त्या परिसरात महाविद्यालये उभारली. त्या संस्थांना भरभराटीचे दिवस नुकतेच कुठे येऊ लागले होते अन्‌ तशात त्यांनी जगाचा निरोप घेतला. पहाटे झोपेत असतानाच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.

ज्या दिवशी हे घडले त्याच दिवशी रात्री त्यांची सिरोंच्याला जाहीर सभा व्हायची होती. अखेरच्या क्षणापर्यंत लोकांसाठी आयुष्य झिजविण्याचे व्रत त्या कर्मयोग्याने असे पूर्ण केले.

अशा नेत्याचे यशापयश आपण कसे जोखायचे? निष्ठेसाठी ‘एकला चलो रे’ असे म्हणत आपण जो मार्ग पत्करला त्याच मार्गावर नंतर सारे आले हे पाहण्याचे भाग्य त्याला लाभले म्हणून त्याला यशस्वी म्हणायचे की आपल्या निष्ठांसाठी सत्तेसकट सगळ्या वैभवावर पाणी सोडण्याचा अव्यवहारीपणा त्याने केला म्हणून त्याला अपयशी ठरवायचे? राजकारणाचा हिशेब जोवर नफा- तोट्यात होतो तोवर विश्वेश्वरराव अपयशी ठरतात. मात्र हा हिशेब जेव्हा मूल्यांच्या भाषेत होतो तेव्हा विश्वेश्वरराव अजिंक्य ठरतात.

Tags: महाराणी राजकुंवर भामरागड सिरोंचा मूल्य विश्वेश्वरराव महाराज अहेरीचे राजे Maharani Rajkunwar Bhamragad Sironcha Price Vishweshwarao Maharaj Kings of Aheri weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात