डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जोतिबांचे काम आधी उभे होते आणि बहुजन समाजात वाङ्‌मयनिर्मितीच्या प्रेरणा नंतर जाग्या होतात. हरिभाऊंच्या कादंबऱ्यांपूर्वी आगरकरांचा सुधारणावाद जन्माला आलेला असतो. टिळक आणि गांधी, सुभाष आणि सावरकर यांच्या पश्चात्‌ स्वातंत्र्याची गाणी जन्म घेतात आणि आंबेडकरांच्या कार्यानंतर दलित साहित्याला उभारी येत असते... रवींद्रनाथांपासून बेंद्र्यांपर्यंतच्या आणि महाश्वेतादेवींपासून इंदिरा गोस्वामीपर्यंतच्या साहित्यिकांची मांदियाळी प्रत्यक्ष समाजकारणात होती आणि आहे. तरी त्यांच्यातल्या कोणी आम्ही जग बदलायला जन्माला आलो आहोत असे म्हटले नाही.

व्यवस्था परिवर्तन आणि साहित्य हा मराठीतील सगळ्या साहित्य संमेलनांच्या चर्चेचा आणि साहित्य प्रवाहातील विचारवंतांच्या चिकित्सेचा विषय आहे. न्या.रानड्यांनी भरविलेल्या पहिल्या ग्रंथोत्तेजक सभेपासून सुरू झालेली ही चर्चा आज एवढ्या वर्षांनंतरही सुरू आहे. अलीकडच्या बहुतेक संमेलनांत, (चंद्रपूरपासून चिपळूणपर्यंत) तर तिला नुसता ऊत आला आहे... ‘आजची समाजव्यवस्था अन्यायावर उभी आहे. धार्मिक, राजकीय, जातीय, आर्थिक आणि आता जागतिक असे या अन्यायाचे विराट आणि विक्राळ रूप आहे. त्याने महाराष्ट्रातील व देशातीलच नव्हे तर साऱ्या जगातील व्यवस्था ग्रासल्या आहेत. कॅनडापासून अर्जेंटिनापर्यंत, स्कॅन्डिनेव्हियापासून द.आफ्रिकेपर्यंत आणि स्पेनपासून जपानपर्यंतचे सगळे समाज या अन्यायाखाली भरडले जात आहेत. त्या भरडण्यामागे त्या समाजव्यवस्थांचा इतिहास आणि त्याने निर्माण केलेल्या परंपरा आपापल्या आयुधांनिशी उभ्या आहेत... हे सारे दूर करण्याचे व अन्यायाची जागा न्यायाला मिळवून देण्याचे सामर्थ्य लेखक आणि कवींच्या लेखणीत आहे; तो वर्ग आपल्या सामर्थ्याचा वापर पुरेशा प्रतिभेनिशी करीत नाही.’

हा या एकूण चर्चेचा परिपाठ आहे. साहित्यातील अशा चर्चेला आता एक शतकाहून अधिक आयुष्य लाभले आहे. भाषा तीच, मांडणी तीच, मांडणारेही तेच आणि व्यवस्थाही तीच... आपले अपयश लक्षात आलेली ही चर्चापीठे कधी राजकारणाची तर कधी अर्थकारणाची वा त्यातल्या बलवंतांची मदत घेतात. त्यांचे ऋणच नव्हे तर त्यांनी केलेले उपदेशपर मार्गदर्शनही मुकाट्याने ऐकून घेतात... हा सारा प्रकार ही चर्चा भरकटत गेल्याचा पुरावा मानायचा, की मुळात चुकीच्या गृहितांवर ती सुरू झाल्याचा परिणाम समजायचा?

मुळात कोणतीही समाजव्यवस्था, मग ती न्यायाची असो वा अन्यायाची, साहित्यातून जन्माला येत नाही. तिच्या निर्मितीची कारणे व संभव यांचा साहित्यकारणाशी फारसा संबंध नसतो व जो असतो तोही फार उशिरा आलेला असतो. ‘फ्रेंच राज्यक्रांती हा रूसो आणि व्हॉल्टेअरच्या साहित्याचा परिणाम आहे’ हे वाक्य खुद्द नेपोलियनने वापरले. ‘तोफांनी सरंजामशाही बुडविली, शाई साऱ्या व्यवस्था निकालात काढील’ असेही त्याने सांगून टाकले. मात्र हे सांगण्यामागचा त्याचा हेतू त्या दोन तत्त्वचिंतक लेखकांच्या मोठेपणाचा गौरव करण्याएवढाच मर्यादित होता. पुढे जाऊन हाच नेपोलियन म्हणाला ‘फ्रेंच राज्यक्रांतीचे फलितच मी आहे’. नेपोलियन लोकशाहीतला राज्यकर्ता नव्हता, तो सम्राट होता. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेसारखी फ्रेंच राज्यक्रांतीने पुढे आणलेली मूल्ये त्याच्या साम्राज्यव्यवस्थेत नव्हती. त्या व्यवस्थेत लोकाधिकारांचे हनन होते आणि शत्रूंच्या कत्तली होत्या...

मार्क्सने दिलेल्या क्रांतीच्या हाळीची परिणतीही याहून वेगळी नाही. त्याचा विचार अंमलात आणू म्हणणाऱ्यांनी त्याच्या विचारानुसार राज्य सुकू दिले नाही, ते अधिकच टवटवीत व जोरदार केले. मार्क्सचे आणि त्याच्या कामगार क्रांतीचे नाव घेत लेनिनने 40 लाख तर स्टॅलिनने 5 कोटी स्वकीयांचे बळी घेतले. त्याच विचारांचा वारसा सांगणाऱ्या माओने 7 कोटी स्वकीयांचे प्राण घेऊन आपला देश व समाज दरिद्री ठेवला. त्या समाजात ना न्याय होता, ना स्वातंत्र्य होते. समतेच्या नावाखाली गुलामगिरी तेवढी होती... साहित्यकारणाहून सत्ताकारण बलवत्तर असते आणि तेच व्यवस्थांना खरा आकार देते हा   इतिहासाचा धडा आहे. मात्र तो ढळढळीत दिसत असतानाही न स्वीकारण्याचे साहित्यकारण आपल्यात का होत असते...

आपल्या देशात आपले नेतृत्व, आपला पक्ष आणि आपली हुकूमत याखेरीज काही एक उगवू न देणाऱ्या फिडेल कॅस्ट्रोवर मराठीत कविता का लिहिल्या जातात? मी माझ्या आयुष्यात हजारो स्त्रियांचा भोग घेतला ही त्याची भाषा त्याच्या पराक्रमाचा पुरावा म्हणून का गौरविली जाते? हिटलर आणि मुसोलिनी यांनीही ‘विचार’ सांगितला. त्यासाठी ‘माईन काम्फ’सारखी पुस्तकेही त्यांनी लिहिली. जोवर त्यांचा जम होता तोवर त्यातल्या वंशवादी विचारांचा अंमल करीत तीन कोटीहून अधिक माणसांचे बळी त्यांनीही घेतले... आजच्या जगात व आपल्याही देशात त्या दोघांचे प्रशंसक आहेत आणि त्यांच्या लेखण्या धारदारही आहेत.

जगातील लोकशाह्यांमधील नियंत्रणक यंत्रणाही या हुकूमशहांच्या बंदोबस्ती राजवटीहून फार वेगळ्या नाहीत. त्यांचे राज्यकर्तेही आपल्या समाजकारणातील व सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांना वापरून घेत असतात. महाराष्ट्रातले कोणते थोर संपादक, कोणत्या पुढाऱ्यांच्या पालखीचे भोई म्हणून ओळखले गेले याची माहिती साऱ्यांना आहे. पदरी बाळगलेले पत्रकार, लेखक, कवी आणि चरित्रकार यांच्याही विषयी वेगळे लिहिण्या-सांगण्याची जाणकारांना गरज नसावी. अगदी विद्रोही आणि क्रांतिकारी म्हणविणाऱ्या लेखक-कवींनाही आमदारक्या देता येतात. त्यांतल्या काहींची भूक अभियांत्रिकी वा बी.एड.च्या कॉलेजांवरही भागविता येते. आपली लेखणी राजकीय पदांसाठी गहाण टाकणारे अनेक विचारवंत महाराष्ट्राला आता चांगले ठाऊकही आहेत. आपली सत्ता कायम करायला हुकूमशाहीत अशा माणसांची डोकी मारली जातात, लोकशाहीत ती विकत घेतली जातात. सत्तापदांची लालूच, अनुदाने, सन्मान, पुरस्कार आणि साहाय्याची तयारी अशी मोठी जंत्री त्यासाठी सत्ताधाऱ्यांना वापरता येते. 1975 च्या आणीबाणीत साऱ्या सामाजिक मूल्यांचे व मानवाधिकारांचे हनन झाले तेव्हा आपल्या साहित्यशूरांनी ज्या हिकमती केल्या त्यातून सारे उघडही झाले होते. या स्थितीत समाजात परिवर्तन कोण घडवून आणेल? आश्रितांकडून क्रांत्या होत असतात काय?

मराठी साहित्याला, साहित्यिकांना आणि साहित्य चळवळींना सत्ताकारणाचा आधार लागतो याची खंत किती करायची याचा विचार करायला लावणारे हे वास्तव येथेच संपत नाही. समाज परिवर्तनाचा वसा घेतलेल्यांचे आजचे आधार आणि त्यांचे स्वरूपही आता नीट लक्षात घ्यावे लागणार आहे. आम्ही परिवर्तनाचा, पर्यावरणाचा, आदिवासींचा, दलितांचा, स्त्रियांच्या, कामगारांचा, वेश्यांचा, एड्‌सबाधितांचा, ग्रामीण बेरोजगारांचा, धरणग्रस्तांचा आणि तसाच अनेकांच्या विकासाचा व पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे असे सांगणाऱ्यांचा व तसे करणाऱ्यांचाही उत्साही वर्ग आता जगभरच्या व आपल्याही समाजात आहे. त्यामुळे त्यातले अनेकजण चांगले बोलके व लिहितेही आहेत. समाजाच्या सेवेचे कंकण त्यांच्या मनगटाभोवती दिसत असल्याने त्यांच्या लिहिण्या-बोलण्याला एक गंभीर वजन आणि म्हटलेच तर त्यांच्याभोवती संतत्वाचे एक झिरझिरीत वलयही आहे. माध्यमे त्यांना महत्त्व देतात आणि समाजही त्यांच्याकडे आदराने पाहतो. त्यांच्यातला मोठा वर्ग स्वयंसेवी संघटना नावाच्या सेवासंस्था चालविणाऱ्यांचा आहे. आपला जन्म आणि जिम्मा समाजपरिवर्तनासाठी आहे, ही त्यांच्यातील अनेकांनी स्वत:विषयीची मनोन करून घेतलेली खात्रीही आहे...

प्रश्न विदेशी पैशावर स्वदेशाची सेवा बजावणाऱ्या वर्गाचाही नाही. त्यांच्या मागे-पुढे असणाऱ्या आणि त्यांच्यासकट समाजाच्या साऱ्या अर्थजीवनावर हुकूमत राखणाऱ्या देशी व विदेशी धनवंतांचा आहे. भारतातील 20 घराणी या देशातील साऱ्या अर्थकारणावर नियंत्रण ठेवणारी आहेत असे जे म्हटले जाते त्याचा अर्थ येथे नीट लक्षात यावा. ही नियंत्रक माणसे, सत्तेच्या नियंत्रकांएवढीच समाजजीवनावरही आपला कब्जा ठेवणारी आहेत. आपले साहित्यिक आणि त्यांचे साहित्य या बलशाली माणसांशी आणि त्यांच्या हाताशी असलेल्या संसाधनांशी स्पर्धा कशी करणार आहेत? सत्ताकेंद्रे आणि अर्थकेंद्रे याहून आपले हितसंबंध प्रतिभाकेंद्रात अधिक सुरक्षित आहेत आणि ते पुरेसे बळकट आहेत असे त्यांच्यातील कितीजणांना खरोखरीच वाटत असते?

व्यवस्था सांभाळणारे आणि तिच्या रक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे घटक फक्त राजकारणात व अर्थकारणातच नाहीत, समाजकारणात व संस्कृतीच्या क्षेत्राएवढेच ते आपल्या जाती व धर्मांच्या आखाड्यातही आहेत. आहे ती व्यवस्था टिकून राहणे हीच त्या घटकांच्या हितरक्षणाची हमी आहे. त्यांच्या संस्थासंघटना केवळ सामाजिक नाहीत, त्या असामाजिक व प्रसंगी हिंस्र होणाऱ्याही आहेत. ‘आमच्याविरुद्ध लिहाल-बोलाल तर खबरदार’ अशी त्यांची जरब असते. मग त्यांना सांभाळून लिहिणे व बोलणे हेच वाङ्‌मयीन मुत्सद्दीपण होते. अमुक सेनेला दुखवू नका, तमुक ब्रिगेडचा रोष नको, त्या संघाच्या वाटेला जाऊ नका आणि या संघटनेला चिथवू नका, अशीच सारी बोलणी. मग विचारवंत दबतात, लेखक थांबतात आणि कवींनाही आपापली सॉफ्ट लक्ष्ये शोधावी लागतात... एक आणखी सोय अशी की आपली माणसे सांभाळायची आणि इतरांवर आसूड ओढायचे. आमचा जातीयवाद हे पुरोगामित्वाचे तर त्यांचा जातीयवाद हे प्रतिगामित्वाचे लक्षण ठरवायचे. तसे करताना जातीयवादाला जातिद्वेषाची धार आणायची आणि धारदार लेखन केल्याचे समाधान मिळवायचे.

अशा शक्तिशाली यंत्रणांना तोंड देऊन समाजपरिवर्तन घडविण्याचे सामर्थ्य आपले लेखक आणि कवी कुठून आणतील? त्यांतले बहुतेकजण सुशिक्षित, पदवीधर, प्राध्यापक, सुस्थितीतले  आणि सध्याच्या व्यवस्थेचे लाभार्थी असणारे. एकेकाळचे क्रांतिकारक म्हणविणारेही. नव्या सुधारणांचा लाभ मिळविणारे. झिजलेल्या पिढ्या संपल्या. आताचे त्यांचे वारसदार बऱ्यापैकी सुस्थितीत असलेले आणि आहेत त्या व्यवस्थांना आधार मानू लागलेले... ही माणसे धर्मांच्या व्यवस्थांविरुद्ध लढणार? असे लढणाऱ्यांची लढाई नेहमी आपला धर्म सोडून इतरांच्या धर्मव्यवस्थांविरुद्ध असते हे सत्य आपण कधी लक्षात घेणार आहोत की नाही?... यांनी जातीविरुद्ध लढायचे? पण आपापल्या जाती आणि त्यांच्या व्यवस्था याच आता लाभकारी बनल्या असतील तर? त्यातून असे लढणारे स्वत:च्या जातिव्यवस्थेतील अन्यायाविरुद्ध न बोलता इतरांच्या व्यवस्थांवरच जास्तीचे आसूड उगारताना दिसत असतील तर?.. ही माणसे सत्तेविरुद्ध लढणार? पण ही सत्ता यांना अनुदाने देते, आमदारक्या-खासदारक्या देते, त्यांच्यात महाविद्यालये आणि आश्रमशाळांचे वाटप करते. शिवाय समित्या असतात. अनुदानांचा अनुग्रह असतो. त्यातून सत्तावाले स्वजातीय असतील तर त्यांच्याविरुद्ध लढणे हा जातिद्रोहही होतोच... अर्थव्यवस्थेविरुद्ध तरी हे कसे लढणार? कारण तसे लढायला श्रमिकांच्या आणि कामगारांच्या संघटना लागतात. लेखण्या हाताळणारे आणि कल्पिताच्या कथा-कादंबऱ्या करणारे ही लढाई कशी करणार? शिवाय ज्या अर्थव्यवस्थेविरुद्ध लढायची भाषा बोलायची तीत गुंतवणूक करणारे आणि तिचा लाभ घेणारे तरी दुसरे कोण असतात?

समाजव्यवस्था हा राज्यव्यवस्थेचा आणि अर्थव्यवस्थेचा परिपाक असतो. आपल्यातील जातिव्यवस्था हे तिचे जास्तीचे अंग आहेत. त्याचे प्रस्थापित व विस्थापित असे वर्ग केले तरी आजचे प्रस्थापित आणि आजचे विस्थापित शोधता येणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. जुनी व्यवस्था टिकत असेल तर ती टिकविण्याचे बळ जुन्या प्रस्थापितांत उरले आहे काय? आणि ते तसे नसेल तर मग ती टिकविणारे कोण याचीही चर्चा आता होणे गरजेचे आहे. राज्यशकट चालविणारे कोण आणि अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारे कोण? जातिव्यवस्थेचे लाभकारक कोण आणि तिचे आताचे रक्षक कोण? आपल्या राजकारणाचे जातीकरण झाले असेल तर त्या राजकारणाचे लाभार्थी तरी कोण?.. वास्तव हे की हे साहित्याचे प्रश्न नाहीत, ते समाजधारणेचे प्रश्न आहेत. समाजधारणा बदलणे हे लेखणीचे काम नाही. ती तिची जबाबदारीही नाही. ते नेतृत्वासमोरचे आव्हान आहे. आणि हे नेतृत्व राजकारणातले आणि अर्थकारणातले आहे. साहित्य हे समाजाचे सॉफ्टवेअर आहे. ते समाजाची मानसिकता चितारू शकते. समाजव्यवस्थेचे हार्डवेअर अर्थकारणाचे व राजकारणाचे आहे. त्याच्या चौकटीतच सॉफ्टवेअरचे काम चालत असते. त्याने हार्डवेअरच्या बदलाची स्वप्ने पाहायची असतात, ते बदलण्याची जोखीम पत्करायची नसते.

जाता जाता एक गोष्ट आपल्या साऱ्यांच्या परिचयाची व मुद्दाम नमूद करण्याजोगी. वाल्मीकी हा महाकवी रामायण लिहीत असतो. ते घडविणे हे प्रभू रामचंद्र या पराक्रमी राजपुरुषाचे काम आहे. व्यासांना महाभारत रचता येते, ते घडविता येत नाही. त्यासाठी कृष्णाची राजकारणपटुता आणि पांडवांचा पराक्रम लागतो. होरचे इलियड त्याने लिहिले तरी ते अँचिलस आणि हेक्टर यांच्या पराक्रमाने घडविलेले असते. त्यात हेलनच्या सौंदर्याचाही वाटा असतो... अलीकडची उदाहरणे द्यायची तर जोतिबांचे काम आधी उभे होते आणि बहुजन समाजात वाङ्‌मयनिर्मितीच्या प्रेरणा नंतर जाग्या होतात. हरिभाऊंच्या कादंबऱ्यांपूर्वी आगरकरांचा सुधारणावाद जन्माला आलेला असतो. टिळक आणि गांधी, सुभाष आणि सावरकर यांच्या पश्चात्‌ स्वातंत्र्याची गाणी जन्म घेतात आणि आंबेडकरांच्या कार्यानंतर दलित साहित्याला उभारी येत असते...

रवींद्रनाथांपासून बेंद्र्यांपर्यंतच्या आणि महाश्वेतादेवींपासून इंदिरा गोस्वामीपर्यंतच्या साहित्यिकांची मांदियाळी प्रत्यक्ष समाजकारणात होती आणि आहे. तरी त्यांच्यातल्या कोणी आम्ही जग बदलायला जन्माला आलो आहोत असे म्हटले नाही. तिकडे टॉलस्टॉय आणि हेमिंग्वेसारख्यांनीही आम्हांला जाणवले ते सांगितले अशी नम्र भूमिका घेत समाजकारणाचे सुकाणू हाती घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले नाही. जोतिबा आणि शाहू, टिळक आणि आगरकर, गांधी आणि आंबेडकर अशा माणसांचे हे उत्तरदायित्व आहे. ते आपल्या खांद्यावर घेण्याची भाषा कशासाठी करायची? कथा-कादंबऱ्या, कविता आणि ललित गद्य लिहिणारी आपण माणसे. या थोरा-मोठ्यांमुळे जे बदल घडतील ते सुसह्य आणि स्वागतार्ह व्हावे अशी मनोधारणा घडविण्याचीच जबाबदारी आपण घ्यायची. पाईकांनी नेतृत्वाची अभिलाषा करायची नाही.

समाज बदलण्याची, त्यात योग्य ते परिवर्तन घडवून आणण्याची आणि त्यात न्याय व समतेसारख्या मूल्यांची प्रतिष्ठापना करण्याची भाषा स्वागतार्ह. पण त्याच्या उत्तरदायित्वाची जोखीम आपल्या सामर्थ्यानुरूप स्वीकारणेच आवश्यक... ही सारी जोखीम घेण्याची जबाबदारी कोणाची ते ओळखणे आणि त्यांना साहाय्यभूत होणाऱ्या भूमिका घेणे महत्त्वाचे... वाल्मीकीला राम आणि व्यासाला कृष्ण होता आले तर ते नको आहे असे नाही. पण जोवर तसे होता येत नाही तोवर या भूमिकांचे वेगळेपण निदान आपल्यापुरते लक्षात घेतलेच पाहिजे. साहित्य व्यवहाराविषयीच्या निराशेतून हे लिहिले नाही, लेखन व्यवहाराकडे करावयाची मागणी केवढी असावी याविषयीच्या अपेक्षेतून हे लिहिले आहे. खोटे समाधान आणि खोटी खंत या दोन्ही गोष्टी आपल्या सांस्कृतिक आरोग्याला अपायकारक आहेत म्हणून हा लेखन-प्रपंच.

Tags: साहित्यकारण समाज मुसोलिनी हिटलर फिडेल कॅस्ट्रो मार्क्स नेपोलियन साहित्य सुरेश द्वादशीवार वाल्मिकी आणि राम fidel castro Sociology Musolini Hitler Marx Nepolian Literature Chikitsa Suresh Dwadashiwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके