डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

नुसत्या शब्दांनी सुखावण्याचा, कौतुकाच्या चार बोलांनी हरखण्याचा आणि तेवढ्याने स्वत:वर प्रसन्न होण्याचा काहींचा स्वभाव असतो. जनार्दन पांडुरंग त्यातले होते. अशी माणसे प्रसन्न फार लवकर होतात. प्रसन्न झाली की उन्मळून जाऊन प्रेम करतात. ज्याच्यावर प्रेम करतील त्याच्यासाठी सारे काही करायला सर्वस्वानिशी सज्ज असतात. मात्र काहीशा भोळ्या वाटणाऱ्या या माणसांची माणूस ओळखण्याची ताकद फार जबर असते. माणसांच्या त्यांच्या निवडी सहसा चुकत नाहीत. एखादे वेळी अशी निवड चुकलीच तर त्यासाठी ही माणसे स्वत:ला दोषी ठरवितात. तेवढ्यासाठी स्वत:ला जन्मभर क्षमा करीत नाहीत. तसे करण्यातला त्यांचा स्वत:वरचा राग त्या फसविणाऱ्या माणसावरच्या संतापाहून मोठा असतो. जनार्दन पांडुरंग मग तसेच जगले.  

जनार्दन पांडुरंग हे अपयशाचे नाव आहे. प्रखर बुद्धिमत्ता आणि तिला लीलया पेलून धरणारा दांडगा उत्साह आपल्या लहानखुऱ्या देहयष्टीत धारण करणाऱ्या या माणसात वाहून जाण्याचा दोष होता. आप्त, मित्र, जवळचे, दूरचे असे कुणीही त्याला ओढून नेऊ शकत असत. परिणामी खूप मोठी इच्छाशक्ती असूनही त्याला ती विवेकाने वापरता येत नसे. फार उशिरा मग त्याला आपला वापर झाल्याची जाण यायची; पण तोवर फार गोष्टी घडून गेलेल्या असायच्या.

माझ्या त्यांच्याविषयीच्या सगळ्या आठवणी दारिद्र्याच्या आहेत. एक अंधुकशी आठवण स्वप्नासारखी मनात कधी तरी येते. खूप श्रृंगारलेल्या एका मोठ्या लाकडी बैलावर आपण बसलो आहोत. अंगात न पेलणारी गुडघ्याखाली उतरणारी वुलनची जाडजूड शेरवानी आहे. डोक्याला भरजरी फेटा बांधला आहे. खाली घट्ट चुडीदार अन्‌ पायात चमकणारे बूट आहेत. समोर ढोलताशे वाजताहेत आणि ते कौतुक पाहायला खूप सारेजण भोवती जमले आहेत. 

पुढे कधीतरी त्या धूसर होऊन गेलेल्या स्वप्नाविषयी आईला विचारले तेव्हा ती तान्ह्या पोळ्याच्या दिवशीची गोष्ट असल्याचं तिनं सांगितलं. ती आठवण खरी असेल तर तेव्हा जनार्दन पांडुरंग बऱ्यापैकी सधन असले पाहिजेत. बाकी साऱ्या आठवणी गरिबीच्या, अभावाच्या, चणचण अन्‌ अडचणींच्या. कधी नुसताच ताक-भात तर कधी तसलेच काही भूक भागविणारे. कपडे तसे फारसे नसतच. त्यांनी कधी ते आणल्याचे वा घेतल्याचे आठवणीत नाही. नसतीलच घेतले. एक तर त्यांच्याकडे तेवढे पैसे नसत.

क्वचित कधी असलेच तरी कपड्यांसाठी बाजारात जाणे त्यांच्या प्रतिष्ठेच्या कल्पनांशी जुळणारे नव्हते. कपड्यासाठीच नव्हे तर दुसऱ्याही कशासाठी त्यांना बाजारात गेल्याचे कुणी कधी पाहिले नाही. साऱ्या बाजूंनी कोंडारा झाला तरी आपली मूळ प्रकृती आणि भूमिका न सोडणाऱ्या स्वाभिमानी अन्‌ काहीशा ताठर माणसासारखे ते सारा जन्म वागत राहिले. आई वारली तेव्हाचा प्रसंग तेवढा अपवाद. पार घायाळ आणि अपराधी होऊन ते तेव्हा पुरते कोसळून गेले होते. आईचा मृत्यू बाळंतपणात झाला. 
सातव्या वर्गाची परीक्षा होऊन तिचा निकाल लागला होता. मी वर्गात पहिला आलो होतो. मिळालेल्या बक्षिसांचा भारा घेऊन मी एकटाच घरी जायला निघालो होतो. रस्त्यात उलट दिशेने माझ्या काकांना रिक्षातून येताना पाहिलं. रिक्षा ही चैन असल्याच्या त्या काळात त्यांना तसं पाहून मला आश्चर्य वाटलं. त्यांचा चेहरा पाहिला तेव्हा मात्र काहीतरी विपरीत घडल्याचं जाणवलं. मी धावतच त्यांच्याजवळ गेलो.

‘तू ताबडतोब घरी जा’ असं मला म्हणतच त्यांनी तोंड वळवून घेतलं. एकाच वेळी ते रडवेले अन्‌ भांबावलेले दिसत होते. त्यांची रिक्षा जरा पुढे गेली अन्‌ तसेच मागे वळून त्यांनी मला हाक मारून जवळ बोलावून घेतलं आणि रिक्षात बसवून घेत मला जवळ ओढून घेतलं. मी काही न कळून भांबावून गेलो. सरकारी दवाखान्याच्या आवारात रिक्षा शिरेपर्यंत काकांनी मला काहीएक सांगितलं नाही; पण तिथं त्यांनाही राहवलं नाही. ‘तुझी आई गेली रे’, असं म्हणून ते रडायला लागले. पण क्षणातच स्वत:ला सावरत काहीशा कठोरपणे मला म्हणाले, ‘पण तू मात्र तिथं रडायचं नाही. तू रडलास तर जनार्दन वेडा होईल’.

माझं मन आपोआपच घट्ट झालं. पुढे आईचं शव उचलेपर्यंत माझे डोळे कोरडेच राहिले. दवाखान्यातील सूतिकागृहाच्या कक्षासमोर नुसता आकांत होता. नात्यातली सारी माणसं गोलाकार दाटीवाटीनं उभी होती. मधल्या मोकळ्या जागेत जनार्दन पांडुरंगांनी जमिनीवर लोळण घेतली होती. धाय मोकलून रडता रडता ते मध्येच बेशुद्ध होऊन निपचित पडत होते.
कुठल्या तरी एका क्षणी त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं. माझी वाट पाहत असल्यासारखे ते रडवेल्या स्वरात म्हणाले, ‘मी तुझा अपराधी आहे रे बाबा’. 

अंगात कुठून तरी बळ संचारल्यासारखा मग मीच पुढे झालो. त्यांना उठवून बसवीत घट्ट आवाजात म्हणालो, ‘रडू नका’.  ते मुकाटपणे उठून बसले. क्षणभर त्यांनी माझ्याकडे अविश्वासानं अन्‌ आश्चर्यानं पाहिलं. मग दोन्ही गुडघ्यांत डोके घालून ते हुंदके देत राहिले. त्यांची तोवरची माझ्या मनातील कठोर आणि बरीचशी भयकारी प्रतिमा त्या क्षणी साफ नाहीशी झाली. अगदी प्रथमच मला त्यांची थोडीशी दयाही आली. 

एरव्ही आकाशाला तडा जाईल असे संतापणारा, हाती लागेल त्या वस्तूने समोरच्याला मरेस्तोवर मारत सुटणारा, अनावर झाला की थरथरणाऱ्या सर्वांगाने आणि आग ओकणाऱ्या डोळ्यांनी समोरच्याचा ठाव घेत त्याच्यावर राग ओतणारा जनार्दन पांडुरंग हा नव्हता. साऱ्या मोहल्ल्यात एक अनाम दहशत असणारा, नात्यातल्याच नव्हे तर सभोवतालीच्या कुणाच्याही पोराला जराशाही चुकीसाठी अधिकाराने बडवून काढू शकणारा तो माणूसही हा नव्हता. आयुष्यातली सगळी उमेद हरवून गेलेला, पुढले पाऊल आणि पुढला क्षण याविषयीचा सारा विश्वास गमावून बसलेला अन्‌ डोळ्यापुढे प्रकाशाची साधी तिरीपही नसावी असे वाटायला लावणारा तेव्हाचा जनार्दन पांडुरंग पार वेगळा अन्‌ दयनीय होता.

त्यांचे वडील तलाठी होते. मी त्यांना त्यांच्या उतरलेल्या वयातच पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर अन्‌ पायांवर कोडाचे डाग होते. उंच व काटक देहयष्टीचे पांडुरंगपंत प्रेमळ अन्‌ हसरे होते, पण त्यांच्याही मनात जनार्दन पांडुरंगांची भीती होती. त्यांचे थोरले चिरंजीव वासुदेवराव अचाटच होते. ते खेड्यावर राहात. शेती अन्‌ एक छोटेसे दुकान चालवीत. अतिशय भावनाशील असलेल्या या गृहस्थांना काही लाडिक शौकही होते. त्यांना आणि पुढल्या काळात आम्हा साऱ्यांना सांभाळण्यात त्यांच्या पत्नीने सारे आयुष्य जे खडतर परिश्रम केले ती केवळ एक मुकी तपश्चर्या होती. विशेषत: आईच्या मृत्यूनंतर ती माझी आईच होऊन गेली. 

वासुदेव पांडुरंगांना नानाजी म्हणत. हे नानाजीही मनातून जनार्दन पांडुरंगांना वचकूनच असत. जनार्दन पांडुरंगांच्या अशा दहशतीचे कारण त्या काळात समजावून घेण्याचा मी प्रयत्न केला नाही. आता विचार करायला लागलो की ते जरा जरा लक्षात येते. शाळकरी अवस्थेत असतानाच ते सार्वजनिक जीवनात पडले. अन्‌ पडले ते एकदम स्वातंत्र्य लढ्यातले सैनिकच झाले. चौदा-पंधरा वर्षांचा कोवळा मुलगा तसल्या धाडसात उतरल्याचं स्वाभाविकच साऱ्या वडीलधाऱ्यांत कौतुक झालं. ब्राह्मण कुटुंबातला मुलगा संघात वा हिंदू महासभेच्या वर्तुळात न जाता खादीचे जाडेभरडे कपडे घालून काँग्रेसच्या बहुजन वर्तुळात वावरतो याचेही अनेकांना अप्रुप होते. त्यातून त्यांना वक्तृत्वाचे देणे होते. स्वातंत्र्याच्या लढ्यातली भाषणं जेवढी लढाऊ तेवढीच ओजस्वी असत. त्या काळात त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेकांच्या तोंडून मी त्यांच्या धाडसी व्याख्यानांची कौतुकं ऐकली आहेत. 

एका तालुक्याच्या गावी त्यांचं भाषण संपताच त्यांना अटक झाली. सभास्थानापासून पोलीस ठाण्यापर्यंत त्यांना पोहोचवून द्यायला सारी सभा मिरवणुकीनं स्वातंत्र्याचा जयघोष करीत गेली होती. पुढे त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी आणलं तेव्हा तिथेही प्रचंड मोठ्या समुदायानं त्यांचं स्वागत केलं होतं. लढ्यामागून लढे झाले. जनार्दन पांडुरंग त्यात सहभागी होत अन्‌ तुरुंगात जात राहिले. त्यांचं कौतुकही वाढत गेलं. हे सारं नुसतं भावणारंच नव्हतं, हरखून टाकणारं अन्‌ वाहावत नेणारंही होतं.

हे आपलं काम, ही आपली माणसं, हेच आता ध्येय अन्‌ हेच या पुढचं आपलं आयुष्य अशी त्यांची अवस्था होत गेली. त्यात शिक्षणाची वाट लागली. तलाठी बापाकडून फारसा मोठा वारसा यायचा नाही याचं भान हरवून गेलं. लढे आणि लोकप्रियता यांनी नको तेवढा आत्मविश्वास दिला. पण तो मजबूत व्हायला लागणारं पैशाचं वा दुसरं कोणतं पाठबळ त्यातून मिळणारं नव्हतं. लढ्यात सोबत येणारी माणसे लढ्यासाठी एकत्र येत असतात. त्यांच्याकडून होणारा प्रेमाचा वर्षाव हा त्या लढ्याविषयी त्यांच्या मनात असलेल्या निष्ठा प्रगट करणारा असतो. 

त्या लढ्याच्या समोर असणाऱ्या वा दिसणाऱ्या इसमाशी त्यांचा संबंध तेवढ्यापुरता व निमित्तमात्र असतो या वास्तवाचे भान भल्याभल्यांना होत नाही. जेमतेम सोळा-सतरा वर्षांचे वय असलेल्या जनार्दन पांडुरंगांना ते तेव्हा झाले नसेल तर तो दोष त्या वयाचा अन्‌ त्या जोशिल्या काळाचा म्हटला पाहिजे. जेमतेम इंटरपर्यंत शिक्षण अन्‌ ध्येय म्हणून पत्करलेली सात रुपये महिना पगाराची शिक्षकाची नोकरी, या स्थितीत आपण काहीतरी अदम्य करीत असल्याचा शहिदी समज घेऊन त्या काळातील अनेकांप्रमाणे त्यांनी आयुष्याची सुरुवात केली. 

नुसत्या शब्दांनी सुखावण्याचा, कौतुकाच्या चार बोलांनी हरखण्याचा आणि तेवढ्याने स्वत:वर प्रसन्न होण्याचा काहींचा स्वभाव असतो. जनार्दन पांडुरंग त्यातले होते. अशी माणसे प्रसन्न फार लवकर होतात. प्रसन्न झाली की उन्मळून जाऊन प्रेम करतात. ज्याच्यावर प्रेम करतील त्याच्यासाठी सारे काही करायला सर्वस्वानिशी सज्ज असतात. मात्र काहीशा भोळ्या वाटणाऱ्या या माणसांची माणूस ओळखण्याची ताकद फार जबर असते. माणसांच्या त्यांच्या निवडी सहसा चुकत नाहीत. एखादे वेळी अशी निवड चुकलीच तर त्यासाठी ही माणसे स्वत:ला दोषी ठरवितात. तेवढ्यासाठी स्वत:ला जन्मभर क्षमा करीत नाहीत. तसे करण्यातला त्यांचा स्वत:वरचा राग त्या फसविणाऱ्या माणसावरच्या संतापाहून मोठा असतो. जनार्दन पांडुरंग मग तसेच जगले. थोड्या कौतुकानं हरखत, जराशा गोष्टीनं दुखावत, जवळच्या मानलेल्या माणसांवर प्रेम करीत तर कधी अशा माणसांकडून फसवले गेल्याच्या भावनेनं स्वत:चा जळफळाट करून घेत.  

आईचा मृत्यू झाला तेव्हा मी अकरा वर्षांचा असेन. तोपर्यंत जनार्दन पांडुरंगांनी सर्वस्व गमावलं होतं. लहानपणच्या अस्फुट स्मरणातल्या श्रीमंतीचा मागमूसही कुठे उरला नव्हता. मधल्या काळातली सधनता ही जनार्दन पांडुरंगांची स्वत:ची एकट्याची उपलब्धी होती. नंतरचे भोग हीदेखील त्यांचीच मिळकत होती. स्वातंत्र्याचा लढा संपत आला होता. ज्या संघटनेत तोवरची हयात सर्वस्वानिशी घालवली तीत पात्र व अपात्र असलेल्या सर्वांच्या सत्ताकांक्षा पालवल्या होत्या. संघटनेतील मोठी माणसं हताश होऊन घरी बसली होती. एवढी वर्षे जिवाभावानिशी ज्या साथीदारांसोबत कष्ट उपसले अन्‌ तुरुंगाच्या वाऱ्या केल्या, त्यांनाही कधी नव्हे ती जनार्दन पांडुरंगांची जाण अन्‌ जात खुपू लागली. मग त्यांना स्वत:ची जाण नको तशी अस्वस्थ करू लागली असावी. त्यांची क्षमता ते ओळखत होते. आपल्या वाट्याला काय यायला हवे याविषयी त्यांच्या निश्चित कल्पना होत्या. आपण मनात आणू ते निश्चित घडणारच असल्याची कोणत्याही समर्थ मनाच्या माणसाची असावी तशी त्यांचीही स्वत:बाबतची समजूत होती.

आपण उपेक्षित ठेवलो गेलो, आपल्यावर ठरवून अन्याय केला गेला, त्याहूनही अधिक म्हणजे आपली फसवणूक झाली अशा खऱ्या-खोट्या भावनेने त्यांना ग्रासले. राजकारणाला समाज-कारणाचे नियम लागू पडत नाहीत हे समजण्याचे वयही तेव्हा नसावे. तेव्हाच्या संतापाच्या भरात त्यांना ते भानही उरले नसावे. राजकारणाची स्वत:ची म्हणून एक वेगळीच नियमावली असते. तिला नीतिमत्तेचे वा संतत्वाचे सोयरसुतक नसते. माणुसकी, विश्वास, वचने, हमी, शब्द यांसारख्या गोष्टी त्या क्षेत्रात तेवढ्याशा महत्त्वाच्या नसतात. त्यातली मैत्री खरी नसते अन्‌ त्यातल्या वैरालाही फारसा अर्थ नसतो. पण संत मोजायच्या मोजपट्ट्यांनी राजकारणी माणसे मोजण्याचे भाबडेपण आपल्यांतल्या अनेकांत असते तसे ते जनार्दन पांडुरंगांतही तेव्हा होते. पक्षाकडून पदाची, तिकिटाची वा तसली कोणतीच अपेक्षा नसताना केवळ आपली उपेक्षा होत असल्याची भावना त्यांना मग नको तेथे फरफटत घेऊन गेली. 

जेव्हा संताप अनावर झाला तेव्हा ज्या काँग्रेस संघटनेसोबत तोवरचे आयुष्य घालविले तिच्याशीच त्यांनी फारकत घेतली.  1952 च्या निवडणुकीत त्याआधी काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसणारे जनार्दन पांडुरंग जनसंघ या तेव्हा जेमतेम जन्माला आलेल्या पक्षाच्या एका अनोळखी उमेदवाराचा प्रचार खेड्यापाड्यांत करताना दिसू लागले. त्या दिवसांनी त्यांचे राजकारण पुरते संपविले. मात्र त्या निराशेतून स्वत:ला एका वेगळ्या क्षेत्रात सिद्ध करण्याची जिद्द जन्माला आली. मनात आणू ते करून दाखवू या विश्वासाचे पाठबळ होतेच. एव्हाना त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकपदाचा राजीनामा दिला होता. 

त्यांच्याजवळ नसलेली पदवी नियमानुसार त्यांच्या त्या पदाआड आली असणार. व्यवसायात उतरायचे ठरवून त्यांनी जो व्यवसाय निवडला तोही त्या काळात काहीसा अफलातून वाटावा असाच होता. 
सामान्य स्थितीतल्या व शिक्षकी पेशात अनेक वर्षे घालविलेल्या इसमाने मालमोटारीच्या धंद्यात शिरणे हा तेव्हाही सगळ्या जवळच्यांना अव्यापारेषु व्यापारच वाटला असणार. त्या काळात गावातील तैलिक समाजाचे बहुतेक लोक जंगल ठेकेदारीच्या व माल वाहतुकीच्या व्यवसायात होते. या समाजातील बहुतेकांचा जनार्दन पांडुरंगाशी अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता. त्या मंडळींच्या प्रोत्साहनामुळेही ते तिकडे वळले असण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.

‘जय-हिंद ट्रान्सपोर्ट कंपनी’ या नावाने सुरू झालेल्या या धंद्याला फार लवकर बरकत आली. वाफेवर चालणाऱ्या आठ-दहा मालमोटारी काही वर्षांतच घरासमोरच्या मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या दिसू लागल्या. बहुधा त्याच काळात त्यांनी आपले वडिलोपार्जित घर सोडले आणि स्वत:चे त्या काळाच्या मानाने औटहाऊस असलेले अतिप्रशस्त घर बांधले.  आपल्या आई-वडिलांसह व माझ्या आईसोबत ते या घरात नेमके कधी राहायला आले ते मला निश्चितपणे सांगता येणार नाही. एक तर तोवर माझा जन्म झाला नव्हता आणि नंतरच्या काळातही ते घर मला कधी आवडले नव्हते. 
त्या घराने आनंदाचे दिवस फारसे पाहिलेच नाहीत. उंची शेरवानी अंगात घालून सजवलेल्या लाकडी बैलावर बसल्याची स्वप्नासारखी असलेली आठवणही माझ्या वयाच्या अगदी आरंभीची, मी जेमतेम दोनतीन वर्षांचा असतानाची असावी. 

सलगपणे सारे आठवायचे वय झाल्यानंतरच्या आठवणी खरे तर अजिबात आठवू नयेत अशाच. या घरानं फक्त मृत्यू पाहिले. त्यात नवं असं कुणी आलं नाही. आलं ते जगलं नाही. माणूस नाही की प्राणी नाही. पुढे ते घरही क्रमानं आमच्यापासून तुटत अन्‌ दूर होत गेलं. प्रथम त्यातलं वैभव, मग सामानसुमान, चीजवस्तू आणि शेवटी खुद्द ते घरदेखील. 

प्रथम आजोबा गेले. नंतर काही आठवड्यांतच आजी. चित्रा नावाची माझी धाकटी बहीण आईसोबत तिच्या माहेरी गेली ती तिकडेच सर्वांगावर देवी उठून वारली. तिला सारेजण प्रेमानं पपा म्हणायचे. ती गेल्याचं मला कुणी सांगितलंच नाही. मराठी दुसरीत की तिसरीत शिकत असलेला मी मधल्या सुटीत घरी आलो तेव्हा समोरच्या व्हरांड्यात आई पार रिकामी रिकामी होऊन बसलेली दिसली. तिच्या डोळ्यांतले अश्रू आटले होते. शेजारच्या बायका तिच्या भोवती नुसत्याच हताश बसल्या होत्या.

पपा सात वर्षांची होती. माझ्याशी तिचं जुळायचंही खूप. पण का कुणास ठाऊक मला रडायला आलं नाही. मी तसा कोरडाच घरात गेलो. आतल्या मोठ्या हॉलमध्ये एका लोडाला टेकून जनार्दन पांडुरंग नुसतेच पडून होते. त्यांची नजर शून्यात. माझ्याकडे वळूनही न पाहता ते म्हणाले, ‘पपा गेली, तू काहीतरी खाऊन शाळेत जा’.  मी मुकाट्यानं मागे वळलो. बाहेरच्या ओसरीत तशाच बसून असलेल्या आईकडे एकवार पाहिलं. तिनं रडवेल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत दोन्ही हात पुढे केले. मी तिच्या कुशीत शिरलो तशी  मला घट्ट जवळ घेत ती हमसाहमशी रडायला लागली. मी तेव्हाही कोरडाच होतो. 

आई दुपारची माहेरून परतली तेव्हा, माझ्याशी वागले तशाच कोरडेपणानं जनार्दन पांडुरंग तिच्याशीही वागले असावे असं तेव्हाही माझ्या मनात आलं. पोटची सात वर्षांची पोर गेलेल्या आईला घरी आणायला जनार्दन पांडुरंग सोडा पण आमच्या घरचं कुणीही गेलं नव्हतं. तीच तेव्हाची तऱ्हा असावी, कदाचित तेच तेव्हाचं बाईचं प्राक्तन असावं. आईच्या कुशीतलं माझं तटस्थपण तिच्यापासून दूर होतपर्यंतच टिकलं. 

पपाच्या तोंडी मरतानाच्या, अखेरच्या क्षणी ‘बाळदादाचं’ म्हणजे माझं नाव होतं, एवढंच काहीसं आईनं म्हटल्याचं मला आठवत राहिलं. तसं ते आजही स्मरणात आहे. शाळेच्या रस्त्यावर मात्र माझा बांध फुटला अन्‌ हुंदका फुटू न देता मी रडत रडतच शाळेत गेलो... डोंगरे नावाच्या खादीचे स्वच्छ पांढरे कपडे घालणाऱ्या गुरुजींना आमच्या घरची शोकांतिका अगोदरच कळली असावी. 

मी शाळेत पोहोचलो तेव्हा मला जवळ बोलवून घेऊन त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरविला अन्‌ म्हणाले, ‘रडू नकोस, असे क्षण आयुष्यात येतच असतात’. एवढी साधी गोष्ट जनार्दन पांडुरंगही म्हणू शकले असते. ते या डोंगरे गुरुजींहून कितीतरी अधिक विद्वान अन केवढे तरी नावाजलेले होते. पण मग तसं का झालं नाही? हा प्रश्न तेव्हा मनात आला नाही, आज मात्र तो मनात येतो. तसे आज मनात येणारे प्रश्न आणखी मोठे आहेत अन्‌ ते मी विचारू नयेत असे सांगणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

गुरुजी म्हणाले, ‘तू घरी जा, मी तुला सुट्टी देतो’. माझ्या मनात आलं, घरी जाऊन तरी मी काय करणार होतो? माझी गरज कुणाला होती? मी वर्गातच बसून राहिलो. शाळा सुटल्यानंतर घरी गेलो तेव्हा काकांनी थोडे पैसे दिले, म्हणाले, ‘जा एखादा सिनेमा पाहून ये’. अन्‌ खरंच मी सिनेमाला गेलो. मला आजही स्वच्छ आठवतं, तो ‘होनाजी बाळा’ हा सिनेमा होता. कोणत्या तरी दरिद्री रांगेत मी बसलो होतो. लक्ष सिनेमात नव्हतंच. मागच्या रांगेत बसलेलं कुणीतरी पुटपुटलं, बिच्चारा, आजच याची बहीण वारली.  मी थिएटरमधून बाहेर पडलो. कोरड्या मनानं घरी गेलो. पण तो सारा अनुभव आजही जसाच्या तसा मनात आहे. काल घडला असावा तसा. पपाच्या मृत्यूच्या काही काळ अगोदरच जनार्दन पांडुरंगांच्या आयुष्यावर अवकळा उमटली होते. मालमोटारी प्रथम जुन्या होत होत पुढे मोडकळीला आल्या अन्‌ पुढे दिसेनाशाच झाल्या. 

घरावर दारिद्रयाची काळी छाया गडद होऊ लागली होती. आईची एकेकाळची पांढरी शुभ्र अन्‌ तलम पातळं प्रथम जुनकट आणि नंतर फाटकी दिसू लागली. घरातली गडीमाणसं अनिच्छेनं घर सोडताना डोळे पुसताना पाहिली, ‘कधीही बोलवा मी तुमच्यासाठी सारं काही सोडून येईन’, असं रडत म्हणणारी लक्ष्मीबाई अजून माझ्या डोळ्यांपुढे आहे. असं व्हायला घडलेलं कारण मला पुरेसं नसलं तरी काहीसं ठाऊक आहे. 

जनार्दन पांडुरंगांची बुद्धिमता आणि आर्थिक धडाडी लक्षात आलेल्या एका स्थानिक बँकेनं त्यांना मुख्य व्यवस्थापक म्हणून बोलावून घेतलं. तिथली त्यांची सहकारी माणसं नेमायचा अधिकारही त्यांना दिला. बँकेला प्रतिसादही चांगला मिळाला. अंगात स्वच्छ पांढरा शर्ट, तेवढेच शुभ्र अन्‌ तलम परीटघडीचे धोतर, काळा वा तपकिरी रंगाचा उंची कोट आणि डोक्यावर काळी टोपी असा वेष करून ते कारने ऑफिसात जात. तिथे त्यांना सारे वडीलकीच्या व अधिकाराच्या नात्याने मोठा मान देत. त्यांचा वचकही तसाच होता. जरब नावाची गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच असावी. 

ऑफिसातले करडेपण आणि वाहतुकीच्या व्यवसायातले आर्थिक यश या गोष्टींनी घरच्या, शेजारच्या, संबंधित आणि इतर साऱ्यांच्याच मनांत त्यांच्या- विषयीची एक अनामशी दहशतही त्याच काळात निर्माण केली असावी. नेमक्या याच सुमाराला जनार्दन पांडुरंगांच्या आयुष्यात ते विपरीत घडले असावे. बँकेच्या एका पाहणीचे वेळी तीत एकवीस हजारांची रक्कम कमी भरली. त्यासाठी जनार्दन पांडुरंगांना दोषी धरले गेले. 

मग पोलीस चौकशा, ठाण्यांच्या वाऱ्या, वकिलांची वर्दळ, घरात संशय आणि भयाचे वातावरण, क्वचित एखादे वेळी होणारी रडारड, सारेच अस्थिर आणि त्या अल्पवयात मला सारेच अनाकलनीय. कधी मला आईच्या माहेरी पाठवून दिले जायचे तर कधी गावातच असलेल्या आतेच्या घरी. परत आलो की लक्षात यायचे, घरातले काही कमी झाल्याचे. आई रडवेली अन्‌ जनार्दन पांडुरंग पार हताश अन्‌ अपराधी होऊन गेल्याचे दिसायचे. मग शेजारचे कुणी हळू आवाजात अन्‌ मायेनं सांगायचे.... ‘तुझ्या घरातल्या भांड्यांचा लिलाव झाला आज.’ 

कधी भांडी, कधी फर्निचर, तर कधी आणखी काही, असं होत होत एक दिवस सारं घर रिकामं झालं. घरातली माणसंही याच काळात कमी होत गेली. दर चारसहा महिन्यांनी घरून एखादी तिरडी बाहेर पडायची. पाहता पाहता घरातलं सारं काही साऱ्यांसकट नाहीसं होऊन गेलं. एवढ्या भरल्या घरात एक दिवस जनार्दन पांडुरंग आणि फारसं काही न समजणारा मी, एवढेच उरलो.  मग कुणीतरी मला सांगितलं की हे घरही जनार्दन पांडुरंगांनी गमावलं आहे आणि तेही आम्हाला लवकरच सोडावं लागणार आहे. 

त्यांच्या वडिलांनी कधीकाळी गावाबाहेर एक जमिनीचा तुकडा विकत घेतला होता. जनार्दन पांडुरंगांना त्याचं त्या काळात अप्रूप सोडा, फारसं महत्त्वही वाटलं नसणार. त्याचमुळे कदाचित तो तुकडा आजोबांनी स्वत:च्या वा जनार्दन पांडुरंगांच्या नावावर न घेता माझ्या नावाने घेतला होता. जनार्दन पांडुरंगांनी जेव्हा स्वत:चे सारे गमावले तेव्हा तो तुकडाच तेवढा अज्ञान मुलाच्या नावावरचा म्हणून शिल्लक राहिला. मग एक दिवस त्या तुकड्यावर तीन खोल्यांचे एक कामनिभाऊ घर उभे राहिले. गावाबाहेरच्या त्या घरात आम्ही राहायला गेलो तेव्हा ते पुरते रिकामे होते. 

आईच्या मृत्यूनंतर खेड्यात राहणाऱ्या अन्‌ तोवर शेतात राबायला लागलेल्या काकांना व काकूला शहरातल्या घरी बोलावून घेतलं होतं. नव्या घरात जनार्दन पांडुरंगांसोबत मी, ते दोघे अन्‌ जेमतेम चीजवस्तू एवढ्यांनी प्रवेश केला. सारे हरवले होते, पुढली सगळी भ्रांत होती, हाती काही उरले नव्हते. जुने घर मागे राहिले तेव्हा घरच तेवढे सुटले नव्हते. त्या घराची सारी इभ्रत, प्रतिष्ठा, मानमरातब हेही सगळे तेथेच राहून गेले होते. त्या घराचे अखेरच्या काळचे सारे धिंडवडे शेजाऱ्यांच्या अन्‌ ओळखी अनोळखी अशा साऱ्यांच्याच साक्षीने झाले होते. 

जनार्दन पांडुरंगांच्या पोलीस ठाण्यातल्या वाऱ्या सभोवतीच्या परिचयाच्या झाल्या होत्या. काही वर्षांपूर्वीचे जनार्दन पांडुरंगांचे लखलखते वैभव पाहिलेल्या अनेकांच्या मनात त्यांच्याविषयीची असूयाही असणारच. अपमान, कुचेष्टा, तिरस्कार आणि आपल्याच मानलेल्या माणसांकडून अशा वेळी होणारी अवहेलना व वंचना हे सारे त्या काळात त्यांच्या वाट्याला आले असणार. 

मात्र मन आणि मान असे सारे काही पार मोडून जाण्याच्या त्या काळातही जनार्दन पांडुरंग ताठ होते. कशाच्या का असेना बळावर त्यांचा स्वाभिमान पूर्वीएवढाच ताठर होता. आपण निरपराध असल्याची त्यांची धारणा आणि आपल्यावर ग्रहांनी नव्हे तर माणसांनी दुर्व्यवहार लादल्याची त्यांची खात्री त्या ताठरपणाला तेव्हा कारणीभूत झाली असावी. त्यांच्या हयातीत त्या साऱ्या घटनांविषयी मी कधी त्यांना विचारलं नाही. मनातून पार विदीर्ण होऊन गेलेल्या जनार्दन पांडुरंगांना माझ्या त्याविषयीच्या प्रश्नांनी पार मोडून टाकलं असतं. नंतरचा त्यांचा आयुष्यक्रम ही एका घायाळ माणसाची कालक्रमणा होती. ते कशानेही दुखावत, रागवत, चिडत, चडफडत, हळवे होत आणि कधी लहानशाही गोष्टीनं सुखावत. 

आपली व्यथा आपणच मुकाटपणे अनुभवण्याचा आणि तिची कुणाजवळ फारशी वाच्यता न करण्याचा काहींचा स्वभाव असतो. त्यातून जनार्दन पांडुरंगांना त्यांची दु:खं वाटून घेता येतील असं कुणी नव्हतंही. मी लहान, आई गेलेली, वडील भावाशी त्यांचं फारसं बोलणं नसलेलं, जुने मित्र दूर गेलेले, नात्यातली माणसे अनुभवून झालेली आणि अपयशाची कबुली द्यावी असं कुणी जवळचं नसलेलं. 

तशी कबुली देणं हा तसाही त्यांचा स्वभाव नव्हता. एकट्यानं दु:ख आणि अपमान गिळणं अन्‌ पचवणं हे काहींचं प्राक्तन असतं. जनार्दन पांडुरंगांच्या आयुष्यातला तो काळ तसा होता. प्रचंड कष्ट, तेवढाच मोठा मानसिक ताण आणि प्रत्येक बाबतीत होणारी नुसतीच ओढाताण या साऱ्या गोष्टी अनुभवत जनार्दन पांडुरंगांची आणि त्यांच्यासोबत घरातल्या प्रत्येकाची फरफट चालली होती. उपजीविकेचं कोणतंही साधन उरलं नव्हतं. काकांनी राखलेली शेतजमीन जनार्दन पांडुरंगांची पाठराखण करताना विकावी लागली होती. हाताशी फक्त जमिनीचा दीड एकराचा तुकडा. मग त्यात सारेच राबायचे. 

काकांनी मोट हाकायची अन जनार्दन पांडुरंगांनी पाणी सावरायचे. काकूच्या कष्टांना कुठला पारच उरला नाही. शाळेच्या वेळा सांभाळून मी कधी मोट तर कधी पाणी शाकारायचो. क्वचित कधी भाड्याने आणलेल्या बैलगाडीतून पिकलेला भाजीपाला बाजारातल्या दलालापर्यंत पोचवायचो तर एखाद्या सुटीच्या दिवशी रस्त्याच्या कडेने बागेतल्या संत्र्यांचे अन भाज्यांचे दुकान मांडून बसायचो. घरातली माणसं या काळात एकमेकांशी फारसं बोलायची नाहीत. बोलावंसंही काही नसायचं. गावाबाहेर राहायला गेल्यानं जुनी घरं, तिकडची रोज भेटणारी माणसं मागे राहिली होती. सकाळ संध्याकाळ राबल्यानं बोलाबिलायचं त्राणही फारसं राहत नव्हतं. 
जनार्दन पांडुरंगांचं मन अशा वेळी आणखी अपराधी व्हायचं. आपल्यामुळे हे भोग साऱ्यांच्या वाट्याला आले असं त्यांना वाटत राहायचं. मग ते नुसतेच शून्य नजरेनं काहीही न पाहता एकटेच विमनस्क बसून राहायचे. त्यांच्या भोवतीचं वातावरणही तसंच होतं.

एका बागेत असलेलं अन फळाफुलांच्या झाडांनी वेढलेलं हे घर कधी मनापासून हसलं नाही, कधी उत्साहानं उमललं नाही, अन कधी भरभरून बोललं नाही. घरात जेमतेम चार माणसं. पण त्यांच्यात एक अनाम अबोला होता. जनार्दन पांडुरंग त्यांच्या अपयशानं पिचलेले, इतरांच्या मनात त्यांच्यामुळे आपल्या वाट्याला हे दैन्याचे आणि कष्टाचे दिवस आल्याची जाणीव अन्‌ घरातला मुलगा या साऱ्यापायी आपलं लहानपण हरवून बसलेला. असेच काही दिवस गेले. 

एक दिवस जनार्दन पांडुरंगांनी नोकरी धरली. त्यांच्या इच्छेविरुद्ध अन्‌ घरच्या परिस्थितीनं नाइलाज उभा केला म्हणून. ज्या शाळेत ते मुख्याध्यापक राहिले अन्‌ जिच्या उभारणीत त्यांचा वाटा मोठा होता त्याच शाळेच मिडल्‌ स्कूलचे सामान्य शिक्षक म्हणून एक दिवस ते रुजू झाले. शाळेचे तेव्हाचे कर्तेधर्ते लोक त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि स्वातंत्र्य लढ्यातले सोबती असल्यामुळेच ते घडले असावे. 
शाळेच्या आवारात पाय ठेवल्याचा क्षण जनार्दन पांडुरंगांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणारा ठरला. त्यांचे पूर्वीचे सगळे मनोवैभव अन्‌ आत्मविश्वास त्या क्षणाने त्यांना परत मिळवून दिला. संस्थेतील त्यांचे सहकारी त्यांचे कर्तृत्व ओळखणारे होते. त्यांना कुणी मिडल्‌ स्कूलचे नव्याने शाळेत आलेले शिक्षक म्हणून पाहिले वा वागवले नाही. शाळेचे संस्थापक म्हणून साऱ्यांनीच त्यांच्याशी आदराचा व्यवहार ठेवला. 

व्यवस्थापनाच्या क्षेत्रात ते तरबेज होतेच. पाहता पाहता त्यांनी संस्थेच्या व्यवस्थापनाची सूत्रे हाती घेतली. शाळेचे स्वरूप नंतरच्या काळात बदलत गेले. भाड्याच्या किरट्या इमारतीत भरणारी ती ऐतिहासिक शाळा काही काळातच स्वत:च्या अतिशय भव्य इमारतीत भरू लागली. माझ्या आईशी भावाचं नातं मानणारे मुख्याध्यापक दादाजी कावडकर अन्‌ तात्याजी वघळे शाळा सांभाळत. शाळेचे अध्वर्यू म्हणून ओळखले जाणारे भाऊराव फडके अन तात्याजी घाटे इमारतीसाठी पैसा आणत आणि जनार्दन पांडुरंग प्रत्यक्ष बांधकामावर देखरेख ठेवीत अन साऱ्यांच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रांत वावरत. 

स्वातंत्र्याच्या लढ्यात एकत्र काम  केलेल्या त्या चौघांनी अत्यंत हिरीरीने अन मेहनतीने केलेले ते काम आजही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष द्यायला उभे आहे. एक गोष्ट आजही आठवते अन्‌ कधीकधी तिचे आश्चर्यही वाटते. जनार्दन पांडुरंगांच्या आयुष्यात मध्यंतरी एवढी उलथापालथ झाली असली तरी त्या चौघांत त्यांचा आवाज अन दरारा मोठा होता. त्यांचा शब्द साऱ्यांना अखेरचा अन्‌ प्रमाण होता. एकेकाळच्या जिवलग अन्‌ रोजच परस्परांना भेटणाऱ्या त्या शेजारी मित्रांत पुढे मतभेद झाले. पण मतभेदाच्या काळातही जनार्दन पांडुरंगांचा आवाज नेहमी वरचा, चढा आणि मानाचा राहिला.

हा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक सुखाचा नसला तरी समाधानाचा नक्कीच होता. नेमक्या त्या काळात शाळेने सर्व क्षेत्रांत प्रचंड नाव मिळविले. शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक आणि इतर बाबतीत आघाडी घेणाऱ्या त्या संस्थेने तेव्हा आपला रौप्य महोत्सव साजरा केला. जनार्दन पांडुरंगांच्या पुढाकाराने शाळेच्या दर्शनी भागावर म.गांधीचा पूर्णाकृती पुतळा बसविला गेला. तेव्हाचे रेल्वेमंत्री स.का. पाटील त्याच्या अनावरणाला आले होते. मुख्य सोहळ्याला जनार्दन पांडुरंगांच्या मित्र परिवारातील जुने मित्र आणि स्वातंत्र्याच्या लढ्यातले सोबती मारोतराव कन्नमवार होते. तेव्हा ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते. 

मुख्य सोहळ्यानंतर त्या सगळ्या वडीलधाऱ्यांना एकत्र बसून परस्परांशी एकेरीत बोलताना पाहून त्यांच्या अवतीभवती करणाऱ्या माझ्यासारख्या शाळकरी स्वयंसेवकांना गंमत वाटत होती. त्याच एका काळात जनार्दन पांडुरंगांना मी प्रसन्न हसताना अन्‌ मनापासून आनंदी होताना पाहिले. पण हा काळ टिकला नाही. वयाच्या पंधराव्या वर्षी मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो. एका सायंकाळी भाऊसाहेब फडके काळजीच्या चेहऱ्याने घरी आले. मला बाजूला नेऊन म्हणाले, ‘तुला नोकरी करायला तयार झालं पाहिजे.’ भाऊसाहेबांचा दरारा असा की काही एक न बोलता मी निमूटपणे त्यांना होकार दिला. 

मला महाविद्यालयीन शिक्षणासाठी कुठे पाठवू शकण्याची ऐपत जनार्दन पांडुरंगांकडे नव्हती ते मला तेव्हाही कळत होतं. शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी जनार्दन पांडुरंगांचा खटला कोर्टात सुरू होत असल्यानं त्यांच्या शाळेतल्या कामाला हरकत घेतली होती. परिणामी एक दिवस आपणच उभ्या केलेल्या शाळेतले हसरे दिवस सोडून ते घरी बसले आणि पुन: एकवार त्यांनी स्वत:ला बागेतल्या मोटेला जोडून घेतले. जनार्दन पांडुरंगांच्याच जागेवर मला मिडल्‌स्कुलात शिक्षक म्हणून लावून घेतले गेले. त्या दिवसापासून घराची सगळी आर्थिक जबाबदारी माझ्यावर आली, पण शाळेतली ती नोकरी टिकली नाही. 

पंधरा वर्षांचे माझे वय तेव्हाच्या नोकरीविषयक सरकारी नियमात बसणारे नव्हते. तीनच महिन्यांत सरकारी आक्षेप येऊन ती नोकरी गेली आणि आम्ही पुन: उघड्यावर पडलो. तशातच माझी बंगलोरजवळच्या विश्वनीडम या सर्वोदयी आश्रमात भरलेल्या एका आंतरराष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली. एकवीस दिवस चाललेले ते शिबीर संपवून मी परतलो तेव्हा रेल्वे स्टेशनवर मला उतरवून घ्यायला अनपेक्षितरीत्या आलेल्या काकांना पाहून मी चरकलो. भाऊसाहेब फडकेही त्यांच्यासोबत आले होते. 

माझ्याशी काही एक न बोलता त्यांनी मला एका रिक्षात बसवून गावाचा रस्ता धरला. पण रिक्षा घराच्या दिशेने न वळता भलत्याच दिशेला जाऊ लागली तसा मी चपापलो. मनात नको तशा शंका आल्या. पण काही वेळातच रिक्षा तुरुंगाच्या आवारात शिरली आणि माझ्या मनात तोवरच्या अनुभवांनी तयार केलेली निबर यंत्रणा क्षणात तिच्या संरक्षक कवचानिशी कार्यक्षम झाली. झाल्या प्रकाराचा झटदिशी अंदाज आला. जे कधीतरी व्हायचे ते झाले होते. जनार्दन पांडुरंगांना न्यायालयाने दीड वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यांना विभागीय कारावासात न्यायचे होते, पण त्या रवानगीपूर्वी मुलाची भेट व्हायची म्हणून त्यांचे जाणे विनंतीवरून लांबले होते.

मी मन पुरेसे घट्ट केले. गजाआडून झालेली त्यांची ती भेट कायमची स्मरणात राहणारी ठरली. गजापलीकडे ते सामान्य कैद्याच्या आडव्या-उभ्या बारीक रेषा असलेल्या पोषाखात उभे होते. माझे लक्ष त्याकडे नव्हते. सारा वेळ मी त्यांच्या डोळ्यांकडे पाहत राहिलो. त्यांत तेव्हाही आपण निर्दोष असल्याचा निर्वाळा होता. भेट संपता संपता ओलसर झालेल्या डोळ्यांच्या कडांचा अपवाद सोडला तर सारा वेळ ते निग्रहानं शांतपणे बोलत होते.

‘मी कुणाचीही फसवणूक केली नाही. मित्राला मदत करण्याच्या प्रयत्नात मी अडकला गेलो. ज्या माणसाला मदत करायला जाऊन मी हे माझ्यावर आणि आपल्या साऱ्यांवर ओढवून घेतलं तोही ऐन अडचणीच्या वेळी माझ्या बाजूनं उभा राहिला नाही. मी अपराधी नाही, अपराधाच्या भावनेनं माझ्यात कधी न्यूनगंड आला नाही. मी न केलेल्या अपराधाचं ओझं तू बाळगू नकोस... आणखी एक. मी एवढ्या अडचणीत कधी कुणाकडे मदतीचा हात पसरला नाही. माझ्या सुटकेनंतर तू कुणाला काही मागितलंस असं मला ऐकावं लागू नये.’ मी सारा वेळ गप्प होतो.

काहीही न बोलता मी माझ्या मनाशी तसा निर्धार केला. जरा वेळानं ते म्हणाले, ‘गेल्या वर्षीच्या परीक्षेत तू चांगला अभ्यास केलास. यंदा केला नाहीस. गेल्या वर्षीचा वर्ग तुला या वेळी मिळाला नाही. आता अभ्यास कर. आणि हो, आपले सगळ्यांशी आजवर राहिलेले संबंध सांभाळ.’  काही वेळात त्यांना आत घेऊन जाणारा अधिकारी आला. तो जनार्दन पांडुरंगांना ओळखणारा असावा. माझ्याकडे पाहून समजावणीच्या स्वरात तो हसत म्हणाला, बाबांची काळजी करू नका. आम्ही त्यांना ओळखतो. त्यांना आम्ही सांभाळू.

एकवेळ मी निरखून जनार्दन पांडुरंगांना पाहून घेतलं. पुन: कधीही तिथे न येण्याचा मनाशी निश्चय केला. परत फिरण्याआधी जनार्दन पांडुरंगच म्हणाले, ‘आता इथं येऊ नकोस, मला त्याचा त्रास होईल.’  नंतरची त्यांची भेट त्यांच्या सुटकेनंतरचीच. अचानक, अकस्मात  अ-अकल्पित. चांगल्या वर्तणुकीच्या कारणावरून त्यांना त्यांच्या शिक्षेत काही महिन्यांची सूट मिळाली आणि एका मध्यरात्री ते अचानक घरी आले. येताना त्यांनी तुरुंगात स्वत: विणलेल्या जाडजूड सतरंज्या आणल्या होत्या. त्यातल्या प्रत्येकीवर माझे नाव त्यांनी विणले होते. 

रात्र उलटून गेल्यानंतर घरी आलेले जनार्दन पांडुरंग सकाळी जागे झाले तेच मुळी जुन्यासारखे. मधला सारा काळ त्यांच्या लेखी अज्ञातासारखा झालेला दिसला. सकाळी ते पूर्वीसारखे मोटेमागे उभे राहिले. दिवसभरात ते परतल्याची बातमी गावात पसरली होती. त्यांचे सगळे चाहते घरात दाटीवाटीने घरी जमले होते. जनार्दन पांडुरंगांच्या बोलण्या-वागण्यात जराही कटुता नव्हती. एक प्रायश्चित पार पाडून आल्यासारखे, जुन्या कशाचीही खंत मनात उरली नसल्यासारखे त्यांचे वागणे होते. मला जाणवलेले आणि माझ्या मनावर कोरले गेलेले भाव हे की घरी आलेल्या कुणाच्याही मनात काल तुरुंगातून सुटून आलेल्या एका गुन्हेगाराला भेटायला आलो अशी भावना नव्हती. आमचे घर पूर्वीसारखे, सगळ्या अभावानिशी भरले असल्याचे तेव्हा जाणवले.

जे घडले ते का, हा प्रश्न मी जनार्दन पांडुरंगाना कधी विचारला नाही. मी तसे विचारण्याचा आघात ते सहन करू शकले नसते आणि दुसरा कुणी तो प्रश्न त्यांना विचारू शकेल अशी शक्यता नव्हती. परिणामी तो प्रश्न आजतागायत तसाच अनुत्तरित राहिला. आजच्या घटकेला मलाही त्याचे विश्वसनीय उत्तर देता येईल असे नाही. नेमका याच सुमारास माझा अहेरीचे राजे विश्वेश्वरराव यांच्याशी संबंध आला. त्यांना त्यांच्या राजकारणासाठी एक वृत्तपत्र हवे होते. तोपर्यंत मी वृत्तपत्रीय लिखाणाच्या क्षेत्रात काहीसा परिचित झालो होतो. राजेसाहेबांचा एक मोठा छापखाना नागपुरात होता. तो ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत चालवायची जबाबदारी मी पत्करली. माझ्यावरच्या विश्वासाने राजांनी तो गावात आणला. 1962 साली दसऱ्याच्या मुहूर्तावर त्या छापखान्यात एका साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू झाले.

त्या दिवशी जनार्दन पांडुरंगाच्या आयुष्याने एक नवे वळण घेतले. राजकारणाची त्यांची जाण अचूक होती. एवढ्या वर्षाचा सामाजिक आणि राजकीय अनुभव गाठीशी होता. शिवाय स्वातंत्र्य लढ्याच्या काळातले सोबती राजकारणात कुठे कुठे पोहोचले होते. वृत्तपत्राच्या निमित्ताने त्यांची विश्वेश्वररावांकडे बैठक सुरू झाली. त्यातून त्यांच्यातील प्रदीर्घ मैत्रीचे आणि त्या परिसरातील राजकारणाला वळण देणारे महत्त्वाचे पर्व सुरू झाले. 

साऱ्या महाराष्ट्रात स्वत:चा सुरक्षित मतदारसंघ असलेले विश्वेश्वरराव हे एकमेव काँग्रेसेतर आमदार होते. मात्र त्या आदिवासी नेत्याला अन्य पक्षांची व पुढाऱ्यांची आरंभी साथ नव्हती. जनार्दन पांडुरंगांनी आपला राजकीय अनुभव आणि व्यक्तिगत संबंध यांचा वापर करून त्यांच्या मागे सारे काँग्रेसविरोधी राजकारण उभे केले. परिणामी विश्वेश्वरराव केवळ आदिवासींचे नेते न राहता त्या परिसरातील एकूणच राजकारणाचे नेते झाले आणि जनार्दन पांडुरंग हे त्यांचे विश्वासू व एकमेव सल्लागार बनले. 

पुढची पंधरा वर्षे त्या परिसरातील राजकारणावर त्यांचा प्रभाव कायम राहिला. या काळात त्यांनी कार्यकर्त्यांच्या सभा घेतल्या, जाहीर सभांतून व्याख्याने दिली, मोठमोठ्या नेत्यांचे कार्यक्रम आयोजित केले आणि स्वत:चा मोठा मित्रपरिवार राजकारणाच्या क्षेत्रात उभा केला. विश्वेश्वररावांचा शब्द विरोधकांच्या राजकारणात प्रमाण होता आणि जनार्दन पांडुरंगांचा शब्द विश्वेश्वररावांनी प्रमाण मानला होता.

त्यांच्या सुदैवाने 1962 साली झालेल्या निवडणुकीत लोकांनी त्यांच्या संघटनेचा उमेदवार लोकसभेवर निवडून दिला तर राज्य विधानसभेत तिचे तीन प्रतिनिधी निवडून पाठविले. खुद्द दादासाहेब कन्नमवारांसारखा उपमुख्यमंत्रिपदावरचा लोकनेता तेव्हा जेमतेम सहाशेच्या बहुताने त्या परिसरात निवडून येऊ शकला. या यशाने जनार्दन पांडुरंगांची राजकारणातली महती उंचावली. 

हा माणूस दुसऱ्यांसाठी राबतो, याला स्वत:ला राजकारणातले कोणतेही पद नको ही गोष्ट त्यांच्याविषयीचा आदर वाढविणारी होती. त्या काळात घरातली वर्दळही खूप वाढली होती. आलेल्या प्रत्येकच कार्यकर्त्याच्या मनात त्यांच्याविषयी असणारा आदर आम्ही पाहत होतो. अंगात साधा खादीचा बंगाली कुडता, एक तलमसे स्वच्छ धोतर अन डोक्यावर काळ्या रंगाची, आत पुठ्ठा असलेली टोपी अशा साध्या पोशाखात ते नेहमी असत. 

त्यांच्या डोळ्यांत सहज साधा कुतूहलाचा भाव असे. कुणाच्याही लहानसहान यशाचे त्यांना मनापासून कौतुक वाटे. मग ते त्याच्याविषयी भरभरून बोलत अन्‌ कधी त्याच्याविषयी लिहीतही. या काळात त्यांनी असंख्य माणसे जोडली. त्यांतल्या अनेकांनी त्यांना आपले पालक मानले, काहींनी त्यांना आपल्या कुटुंबातला वडीलधारा म्हटले, काहींनी मार्गदर्शक तर काहींनी त्यांना आपले आप्त बनवून टाकले. त्यांचे हे असंख्य नातेवाईक मला नेहमीच भेटत अन थक्क करीत राहिले.

त्यांच्या या आप्तांत अहेरी आणि भामरागडच्या आदिवासींचा समावेश असणे समजणारे होते. पण तोवर अपरिचित असलेल्या अनेक स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी आमच्या घराला आपले मानले तेव्हा तो आम्हा सगळ्यांच्याच अचंब्याचा विषय झाला. सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्या काळात जनार्दन पांडुरंगांचे घर त्यांचे वाटू लागले होते. तसेच ते त्या घराशी वागतही होते. 

साऱ्या राजकारणावरचा त्यांचा प्रभाव जसजसा प्रस्थापित होत गेला तसतसे जनार्दन पांडुरंग प्रेमळ अन्‌ साधे होत गेले. कोणताही माणूस त्यांना जवळचा वाटावा अन्‌ कोणीही त्यांच्यावर हक्क सांगावा असे त्यांचे वागणे होते.  माझे एक दलित पत्रकार मित्र काही दिवस भेटले नाही तरी ते कासावीस व्हायचे आणि त्यांचा शोध घेत ते त्यांच्या आडवळणातल्या घरी पोहोचायचे. त्यांनी कौतुकाने पाठीवर दिलेली थाप अनेकांना महत्त्वाची वाटायची.

बॅ.राजाभाऊ खोब्रागडे राज्यसभेच्या सभापतिपदावर निवडले गेले तेव्हा त्यांचे स्वागत करणारी प्रचंड मिरवणूक गावात निघाली. तिच्या समाप्तीच्या वेळी  राजाभाऊ मला जवळ बोलावून म्हणाले, ‘आप्पाजींचा आशीर्वाद घ्यायला आपण घरी गेले पाहिजे.’ तेव्हा न जाणवलेले, पण नंतरच्या काळात हरघडी आश्चर्य वाटायला लावणारे हे जनार्दन पांडुरंगांचे वैशिष्ट्य कुणालाही गोंधळात टाकणारे होते.

या माणसाजवळ काय होते? पैसा नाही, इतिहासात नको तसा तुरुंगवास आहे, कुणाला मदत करावी अशी ऐपत वा कुवत नाही, अन्‌ तरीही माणसे त्यांच्यावर प्रेम करत. त्यांच्याशी विश्वासाने वागत. जणू त्यांच्या आयुष्यातली मधली ती वर्षे कुणाच्या मनात, स्मरणात राहिलीच नाहीत. हा माणूस कुणीतरी केलेल्या फसवणुकीनं नागवला गेला हीच साऱ्यांची वागणूक. परिणामी जनार्दन पांडुरंगही सारे विसरले. अन्‌ त्यांच्या पुढल्या आयुष्यात त्या कडू काळाच्या सगळ्या स्मृती हरवल्यागत झाल्या. नंतरचे त्यांचे आयुष्य हे एका प्रसन्न सेवानिवृत्ताचे जगणे होते. राजकारणात कुणाला काही मागायचे नसल्याने त्यांच्यावर कुणाचे दडपण नव्हते, स्वत:ला जमेल तेवढा वेळ त्यासाठी ते द्यायचे. बाकीचा काळ त्यांचा.

मग रोज सकाळी ते एका नव्या परिचिताकडे जायचे. नवी माणसंही त्यांना त्यांची दु:खं मोकळेपणी सांगत. घरातल्या वडीलधाऱ्या माणसानं काढून द्यावा तसा मार्ग ते त्याला समजावून देत. घरी परतले की जेवून विश्रांती घेत. तीन-चारच्या सुमारास साप्ताहिकाच्या कार्यालयात जात. सायंकाळी त्यांचे जुने मित्र नेमाने त्यांच्याशी गप्पा मारायला घरी येत. एव्हाना मी मिळवता झालो होतो. अन्‌ ते पुरते मोकळे होते. पण नंतरच्या काळातही त्यांचे स्वत:ला मध्यवर्ती मानून वागणे कायमच राहिले. आयुष्याच्या ऐन भरात आपल्या विश्वासातल्या माणसांनी आपली फसवणूक केली या गोष्टीचे स्मरणही त्यांच्या मनात नंतरच्या काळात सदैव राहिले. परिणामी घरात आणि बाहेर सावधगिरीचा सल्ला द्यायला त्यांना लहानसेही निमित्त मग पुरत असे.

आयुष्यभर गांधी-नेहरू आणि त्यांचा निखळ राष्ट्रवादी मार्ग यावर त्यांची श्रद्धा कायम राहिली. स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेताना आपल्याला त्यातले फारसे काही कळत नव्हते असे ते म्हणत. गांधीजींवर श्रद्धा होती, त्यांनी लढ्यात उतरायचे आणि तुरुंगात जायचे आवाहन केले म्हणून आम्ही त्या लढ्यात उतरलो असे ते सहजपणे सांगू शकत. नंतरच्या काळात ते काँग्रेसपासून दूर झाले. पण गांधीजींच्या विभूतिमत्त्वावरची त्यांची निष्ठा अभंग होती. स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव 72 साली झाला. त्यातल्या सत्काराला उत्तर देताना जमलेल्या पुढारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले, ‘गांधीजींनी जे करायला सांगितलं ते आमच्या पिढीनं निष्ठेनं केलं, आता तुमच्या इंदिरा गांधींनी तुम्हाला गरिबी हटविण्याचा कार्यक्रम दिला आहे, तो तुम्ही त्याच निष्ठेनं अंमलात आणला पाहिजे.’ 

1975 च्या आणीबाणीत मी तुरुंगात होतो. त्या घटनेनं ते व्यथित झाले. पण त्यांच्या जुन्या श्रद्धांवर तिचा परिणाम झाला नाही. आदिवासी समाजासाठी राबणाऱ्या संस्थेत काम केल्याने आणि असंख्य आदिवासी कार्यकर्त्यांशी संबंध आल्याने त्यांच्याविषयीचा जिव्हाळा त्यांच्यात नकळतच निर्माण झाला होता. बॅ.खोब्रागड्यांचे वडील देवाजीबापूंशी घरोबा असल्याने व राजकारणात आदिवासी व दलितांचे संघटन करण्यावर त्यांचा भर असल्याने त्या वर्गाशीही ते फार जवळिकीने राहिले. ही संघटना काँग्रेसविरोधी असली तरी तेव्हाच्या जनसंघालाही फार जवळची नव्हती. निवडणुकीतील गरज एवढ्यापुरतीच त्या पक्षाशी तिचा संबंध राहिला.

जनार्दन पांडुरंगांना त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागामुळे तशीही संघ परिवाराविषयी फारशी जवळीक कधी नव्हती. परिणामी काही मोजके जवळचे दोस्त सोडले तर त्यांना ब्राह्मण वर्गातच मित्र नव्हते. कणखर दिसणे वेगळे आणि असणे वेगळे. त्यासाठी द्यावी लागणारी आणि दिली गेलेली किंमतच माणसाच्या त्या वृत्तीचे देखणेपण प्रत्यक्षात वाढवीत असते. जनार्दन पांडुरंग कणखर होते. त्या स्वभावाची किंमत त्यांनी व त्यांच्या जवळच्या माणसांनी भरपूर मोजली होती. पाहणाऱ्यांना ते आयुष्यभर ताठ व कधी तर ताठरच दिसले होते. 

शहरातल्या एका अतिशय धनाढ्य व राजकारणात वजनदार असलेल्या उद्योगपतीशी त्यांचा झालेला वाद अजून अनेकांच्या स्मरणात आहे. ‘तुम्हाला तुमच्या पैशावाचून कोणतीही किंमत नाही. आम्ही त्याशिवायही सन्मानाचे आयुष्य काढले आहे’ हे जनार्दन पांडुरंगानी त्या धनवंतांना शहरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ऐकवले होते. समाजातल्या सच्चाईसमोर ते नेहमीच नम्र होत राहिले. जे कुणालाही जमणार नाही ते करून दाखविणाऱ्या कर्तृत्ववान माणसांविषयी त्यांना नुसताच आदर नव्हता, अशा माणसांविषयी भरभरून बोलायला त्यांना आवडायचे. बाबा आमट्यांची कुष्ठसेवा, नरहर कुरुंदकरांच्या बुद्धिमत्त व्यक्तित्वातले सौहार्द, राम शेवाळकरांच्या वक्तृत्वातली चमक, शहरातील अनेक तरुणांनी चोखाळलेल्या आयुष्याच्या वेगळ्या वाटा हे सारे त्यांना भावायचे. मग त्यांच्या कौतुकाला पार नसायचा. 

खूपदा मनात यायचे, हा माणूस आपल्या अर्धवट यशाची वा अपयशाची पूर्तता या मंडळींच्या वाटचालीत पाहत असावा. फार टोकाच्या आवडी आणि तेवढ्याच टोकाच्या नावडी घेऊन ते जगले. राजकारणात एवढी वर्षे राहूनही पैसे खाणारी राजकारणातली माणसे त्यांच्या कमालीच्या तिरस्काराचा विषय होत राहिली. अशी माणसे समाजाचा अपराध करतात असं ते कळवळून म्हणायचे. कन्नमवारांविरुद्ध त्यांनी अखेरच्या काळात राजकारणात रान उठविले. 1962च्या विधानसभेच्या ज्या निवडणुकीत दादासाहेब अवघ्या सहाशे मतांनी कसेबसे विजयी होऊ शकले तिची आखणी विरोधकांसाठी त्यांनीच केली; पण त्यांच्या जवळचा एखादा सामान्य कार्यकर्ता दादासाहेबांविषयी कधी अद्वातद्वा बोलू लागला वा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू लागला तर ते कमालीचे संतापायचे. म्हणायचे, ‘अरे, आज आम्ही वेगळ्या पक्षात आहोत म्हणून काय झाले? मारोतीविषयी कुणी काहीही बोलणार असेल तर ते मी खपवून घेणार नाही. तो आमचा स्वातंत्र्याच्या लढ्यातला साथीदार आहे, तो मोठा माणूस आहे.  समाजाचे नुकसान होईल असे तो काहीएक करणार नाही.’ 

जनार्दन पांडुरंगांचा अखेरचा काळ समाधानात, पुरेशा आनंदात पण काहीतरी करायचे राहून गेल्याच्या अस्वस्थ मानसिकतेत गेला.  ऐन उमेदीच्या काळात आलेल्या आपत्तींनी त्यांना पार मोडून काढले असले तरी पुढल्या आयुष्यातल्या उभारीने त्यांना काहीसे सावरले होते. या काळात त्यांनी स्वत:लाच उभारले नाही तर आपल्या जवळच्या अनेकांना उभे व्हायचे बळ दिले. अशा लोकांत त्यांनी ज्यांचा लोभ केला ती माणसे असल्याचे मला आश्चर्य नाही. त्यांच्या रागाला बळी पडलेल्या, त्यांच्या क्वचितच कधी संबंधात आलेल्या, त्यांना ऐकून वा त्यांच्याविषयी ऐकून त्यांना ओळखणाऱ्या अशा अनेकांचा त्यात समावेश होता.

जनार्दन पांडुरंगांच्या या मिळकतीचे मोल कोणते? माणसाची आयुष्यातली सर्वांत मोठी कमाई माणूस हीच असेल तर जनार्दन पांडुरंगांच्या श्रीमंतीला कडा नव्हती; पण पैसा हेच माणसाच्या ताळेबंदाचे सूत्र असेल तर मात्र त्यांच्याएवढा दरिद्री माणूसही जगात दुसरा नव्हता. एवढे सारे सोसून व अनुभवूनही जनार्दन पांडुरंगांच्या मनात कुणाविषयीची फारशी कटुता कधी राहिली नाही. पडत्या काळात ज्यांनी अपमान, अवहेलना केली त्यांच्याशीही पुढच्या बदललेल्या काळात ते प्रेमानेच वागले. एकवार त्यांच्या संबंधात आलेला माणूस कधी त्यांच्यापासून दूर गेल्याचे दिसले नाही. 

महत्त्वाची बाब ही की कोणत्याही माणसाशी बरोबरीच्या नात्याने त्यांना बोलता येई. आपल्यावर कुणाचे उपकार नाहीत, कुणाची काही चूक केलीच असली तरी तिची नको तेवढी किंमत आपण चुकविली असल्याचे त्यांच्या मनात यायचे. मग एक निश्चिंतपणही त्यांच्यात दिसायचे. प्रत्यक्षात जे अनुभवावे लागले ते एवढ्या टोकाचे होते की याहून आणखी वाईट यापुढे वाट्याला येणे शक्यच नाही असेही त्यांना कुठे तरी वाटत राहिले असावे.

मित्र, चाहते, आप्त, स्नेही आणि संबंधित अशा सगळ्यांचा मोठा वर्ग सभोवती असताना जनार्दन पांडुरंगांना मृत्यू आला. त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका वयाच्या साठाव्या वर्षी आला. आयुष्यात प्रथमच तेव्हा ते दोन तीन आठवडे अंथरुणाला खिळून होते. आणीबाणीच्या पर्वात मी तुरुंगवासात असताना त्यांना पुन: एकवार त्या विकाराने गाठले. त्या वेळी ते फार काळ पडून राहिले नाहीत. त्या विकाराची आणि त्यांची अखेरची भेट मात्र पुढे बऱ्याच दिवसांनी झाली होती.

दवाखान्यात राहणे त्यांना आवडत नसे. ‘मला घरी घेऊन चला’ असा त्यांचा हट्ट होता. डॉक्टरांसह सगळ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण ते कुणाचे ऐकेनात. त्याच आजारात डॉक्टरांना न जुमानता ते त्यांचे विडी ओढण्याचे आयुष्यभर सांभाळलेले एकमेव व्यसनही चालवीत. त्यांच्यावर रागावणे वा त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध काही करायला लावणे तेव्हाही कुणाला जमण्यासारखे नव्हते. त्यांना समजावण्याचे सारे प्रयत्न थकले तेव्हा कधी नव्हे तो पुढाकार घेऊन मी म्हणालो, ‘तुम्ही कुणाचेही ऐकणार नसाल तर मग सारे तुमच्याच इच्छेने होऊ द्या. त्याचे परिणामही तुम्हालाच सोसावे लागतील. या डॉक्टरांनाही मग काही करता येणार नाही.’ 

मी असे काही म्हणेन असे त्यांना वाटले नसावे. तेवढ्यानेही ते फार खोलवर दुखावले असावे. जरा थांबून त्यांनी माझ्याकडे एकवार शांतपणे पाहिले आणि आपली नजर तशीच रोखून धरत म्हणाले, ‘माझी फार चिंता करू नका. मला माझ्या इच्छेनं जगू द्या. येत्या आषाढी एकादशीला मी तुम्हा साऱ्यांना निरोप घेणार आहे.’ तेथे असलेले सारे अवाक्‌ झाले. क्षणभर मीही गोंधळून गेलो. मग डॉक्टरांची समजूत घालून अन्‌ जनार्दन पांडुरंगांना त्यांच्या इच्छेनुरूप राहू द्यायचे मनाशी ठरवून आम्ही घरी आलो. येताना वाटेतच त्यांना आवडणाऱ्या विड्यांच्या दोन डझन कट्‌ट्यांचा पुडाही विकत घेतला. त्यांना कशाहीसाठी आता कुणी हटका-बोलायचे नाही असे घरातल्या साऱ्यांनी ठरविले. जणू हृदयविकार वा तसले काही घडलेच नाही असे नित्याचे वातावरण घरात तयार झाले.

तशात साऱ्यांच्या मनातून हरवलेली ती आषाढी एकादशी आली. शनिवारचा दिवस असल्याने मी तेव्हाच्या माझ्या ठरलेल्या पद्धतीप्रमाणे आनंदवनात सकाळीच निघून गेलो. माझी पत्नीही तिच्या माहेरच्या कामानिमित्त अमरावतीला गेली होती. आम्ही सारेच आषाढी एकादशीचे ते माहात्म्य विसरून गेलो होतो अन्‌ तशात रात्री दहाच्या सुमारास आनंदवनातला फोन खणखणला. जनार्दन पांडुरंगांची तब्येत अचानक बिघडल्याचे घरून सांगितले गेले. बाबा आणि साधनाताई माझ्यासोबत यायला निघाले. त्यांना थांबवत अन्‌ ‘घरी पोहोचताच सारे काही कळवीन’ असे सांगत मी आनंदवन सोडले. तासाभरात मी घरी पोहचलो, पण तोवर सारे शांत झाले होते. जनार्दन पांडुरंगांनी त्यांचे आषाढी एकादशीचे वचन खरे केले होते. माझे एक वडीलधारे आतेभाऊ नेमके त्याच वेळी घरी आले. त्यांनाही झाल्या प्रकाराची माहिती कळली होती. दारात पाऊल ठेवत असतानाच माझ्याकडे वळून ते म्हणाले, ‘पाहा, त्यांनी आपला आजचा शब्द खरा केला.’ 

0

आज घरात फिरतो तेव्हा लक्षात येते जनार्दन पांडुरंगांच्या हातचा साधा चमचाही घरात नाही. जपून ठेवावी अशी कोणती वस्तूही त्यात नाही. तरीही आताचे घर त्यांच्या अदृश्य अस्तित्वाने भरले मात्र आहे.

Tags: जनसंघ काँग्रेस आणीबाणी आनंदवन महात्मा गांधी तारांगण Jana Sangh Congress Emergency Anandvan Mahatma Gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात