डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

आजच्या समाजाचे स्थैर्य आणि उद्याच्या समाजव्यवहाराचे अस्तित्व यांचा मूलाधार धर्म नाही, ते नीतिमूल्यांचे क्षेत्र आहे. समुदायांना धर्माची गरज असते. ती व्यवस्था म्हणूनही लागत असते. नीती समाजाएवढीच व्यक्तींसाठीही मौलिक ठरते व तशीच ती राहणारही असते. झालेच तर धर्माहून नीती हे अधिक प्रबळ मूल्य आहे. धर्माला ईश्वराचा आधार लागतो. स्वर्ग-नरकासारख्या लोभ-भयाच्या कुबड्या लागतात. अवतारी महात्म्यांचे किंवा ईश्वरी ग्रंथांचे शब्दप्रामाण्य लागते. नीतीला यातले काही नको. त्या स्वयंभू मूल्याचा एकमेव आधार माणसाचे मन वा त्याचा विवेक हे आहे. ते प्रत्येकाजवळ आहे.

धर्म किंवा धार्मिक शिकवण या गोष्टी सार्वत्रिक किंवा सनातन असतात या उक्तीएवढे असत्य दुसरे नाही. धर्म सनातन मानले जातात आणि तसे ते मानणाऱ्यांत त्यांचे अनुयायीच तेवढे असतात. धार्मिक शिकवण ही कधी सनातन नसते. ती कालानुरूप बदलत असते.

हिंदू वा वैदिक धर्म हा जगातल्या सर्वाधिक प्राचीन धर्मांपैकी एक आहे. त्याचे स्वरूप आणि शिकवण या दोन्ही गोष्टी कालानुरूप बदलल्या आहेत. नुसत्या बदलल्या म्हणणेही पुरेसे नाही. त्याचे पूर्वीचे स्वरूप आणि शिकवण या दोहोंनाही त्याच्या नंतरच्या स्वरूप व शिकवणीने छेद दिला आहे. वेदांनी आणि ब्राह्मण ग्रंथांनी यज्ञाचे महत्त्व सांगितले. यज्ञ ही सगळ्या इच्छांची पूर्तता करणारी यंत्रणा आणि मंत्रणा असल्याची त्यांनी ग्वाही दिली. त्या ग्रंथांचा प्रभाव दीर्घकाळ समाजमनावर राहिलादेखील. नंतरच्या काळात आलेल्या उपनिषदांनी मात्र यज्ञ या फुटक्या नौका आहेत आणि त्या भवसागर तरून जायला पुरेशा नाहीत, एवढेच नव्हे तर कुठे पोहोचवायलाही त्या विश्वासाच्या नाहीत असे सांगून वेदांना आणि ब्राह्मण ग्रंथांना छेद दिला.

उपनिषदांची संख्या मोठी असली तरी त्यात ईशावास्य, ऐतरेय, बृहदारण्य, तैतिरिय, कठ, छांदोग्य, केन, मुंडक, मांडुक्य आणि श्वेताश्वतर या दहा उपनिषदांचे माहात्म्य मोठे आहे. मात्र या दहांमध्येही एकवाक्यता नाही. त्यात नुसत्या परस्परविसंगतीच नाहीत तर परस्परविरोधही आहे. अशा अडचणीतून वाट काढण्याचा जुन्या ऋषींनी शोधलेला मार्ग, विसंगती वा विरोध असणाऱ्या उक्तींना प्रक्षिप्त ठरविणे हा आहे. उपनिषदांचे सार व समन्वय साधणारा बादरायणाचार्यांचा ब्रह्मसूत्र हा ग्रंथ त्याचसाठी सिद्ध झाला आहे. दहाही प्रमुख उपनिषदांमधील परस्परविरोध, हा विरोधच कसा नाही किंवा त्यात सुसंगतीच कशी आहे हे सांगून ब्रह्मसूत्रांनी उपनिषदांची एकवाक्यता प्रतिपादन केली आहे. हे करण्यामागे वैदिक परंपरेचे अखंडत्व सांगण्याचा तत्कालीन ऋषिमुनींचा प्रयासच तेवढा आहे. तो कमालीच्या प्रातिभ आणि बौद्धिक पातळीवरून केला गेला असला तरी त्याचे तोकडेपण सामान्य वाचकांच्याही लक्षात येणारे आहे.

मुळात ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे वेदही एका वेळी रचले गेले नाहीत. ऋग्वेदाच्या निर्मितीची प्रक्रिया कित्येक शतके चालली आहे. ती एकाच जागी व एकाच भूमीतही झाली नाही. ती कोणा एका ऋषीनेही केली नाही. अपौरुषेय मानल्या गेलेल्या या वेदाची सूक्ते अनेक ऋषींना अनेक जागी साक्षात्कारासारखी समोर दिसली असे मानले गेले. त्यामुळे मूळ ऋग्वेदातही वचनांची आणि उक्तींची विविधता आहे. त्यात विसंगती आणि परस्परविरोधही आहे. ऋग्वेदाच्या रचयित्या ऋषींमध्ये एकवाक्यता वा समन्वय होता असेही त्यांच्या चरित्रांवरून दिसत नाही. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलाच्या रचयित्याची, दीर्घतमसकामाची कथा तर त्याच्या थोरवीवर संशयाचे प्रश्नचिन्ह उभे करणारीही आहे. तात्पर्य, मूळ वेदांची परंपराही एक वा एकात्म नाही. चिकित्सक अभ्यासाचा आपल्या व जगभरच्या धर्मपरंपरांमध्ये आढळणारा अभाव धर्मग्रंथांमध्ये असलेल्या अशा विसंगतींकडे किंवा विरोधांकडे आपले लक्ष जाऊ देत नाही एवढ्याच एका कारणामुळे या परंपरांचे अखंडपण (किंवा सनातनत्व)टिकले आहे.

भगवत्‌गीतेवर शंकराचार्यांनी लिहिलेल्या भाष्याहून अगदी वेगळे भाष्य ज्ञानेश्वरांनी लिहिले. त्या दोघांनाही खोडून काढत लोकमान्यांनी त्यांच्या गीताभाष्याची रचना केली. ती करीत असताना शंकराचार्यांनी लावलेले गीतेतील श्लोकांचे अर्थ कसे अपुरे व चुकीचे आहेत हेही त्यांनी दाखवून दिले. त्याही अगोदर रामानुज, मध्व आणि निंबार्कांनी गीतेवर त्यांची भाष्ये लिहिली व त्यांत आपापल्या पूर्वसूरींचे कुठे समर्थन तर कुठे खंडन केले. यातल्या मध्वाचार्यांची मजल तर शंकराचार्यांना कलियुगातील राक्षस म्हणण्यापर्यंत गेली... या साऱ्या भाष्यांमध्ये शिरून त्यांची वेगवेगळी व तौलनिक मांडणी करण्याचे आणि त्यांचा तसा अभ्यास करण्याचे प्रयास फारसे कुणी केले नाहीत. सामान्य माणसांना आवडेल अशा श्रद्धेच्या अंगाने त्यांची मांडणी पुरोहित, प्रवचनकार आणि कीर्तनकार करीत राहिले. परिणामी गीतेचा एकच एक, पाठ करण्यापुरता वापर समाजात होत राहिला. त्यातून श्रद्धेचे अखंडपण टिकले. चिकित्सेच्या वाटा मात्र रुद्ध झाल्या. आपल्याकडील बहुतेक सर्वच धर्मपरंपरांच्या वाट्याला अशी परिणती आली आहे. जगभरच्या इतर धर्मपरंपरांचा इतिहासही याहून वेगळा नाही.

पवित्र कुराणातील पहिला संदेश इ.स. 610 मध्ये पहिल्या आयतीच्या रूपात अल्लाकडून प्रेषितावर उतरला. पुढची बावीस वर्षे म्हणजे प्रेषित अल्लाला प्यारे होईपर्यंत हे संदेश त्यांच्यावर उतरत राहिले. कुराणामधील 90 सुरे त्यांच्यावर ते मक्केत असताना तर पुढचे 24 सुरे यथ्रेब (पुढच्या काळातील मदिना) येथे उतरले असे इतिहास सांगतो. प्रत्यक्षात आताच्या कुराणपाठात मक्केतील आणि मदिनेतील सुरे त्या क्रमाने संग्रहित असल्याचे दिसत नाही. उदा. पहिली आयत, सुरे फातिहा ही मक्केतील तर दुसऱ्या क्रमांकाची आयत सुरे बखर ही मदिनेतील आहे. आजचे कुराण पवित्र प्रेषिताच्या पश्चात बारा वर्षांनी तिसरे खलिफा व प्रेषिताचे जावई उस्मान यांच्या कारकीर्दीत सिद्ध व प्रमाणित केले गेले. त्यासाठी उस्मानने अनेकांजवळ उपलब्ध असलेले पाठ एकत्र करून त्यांचे संपादन केले. ते करताना त्यात आलेले ‘अपपाठ व प्रक्षिप्त भाग’ गाळले. त्यानंतर कुराणाचे उर्वरित पाठ (पुन्हा वाद नको म्हणून) जाळून नाहीसे केले. प्रमाणप्रत तयार करताना उस्मानने आयेशा या प्रेषिताच्या पत्नीजवळ असलेला पाठही नाकारला. पुढे 300 वर्षांनी इब्ने मुक्ल, इब्ने मुसा आणि इब्ने मुजाहिद या तीन मुस्लिम संतांनी ते पुन्हा बगदादच्या गादीच्या देखरेखीखाली प्रमाणित केले. प्रेषिताच्या पश्चात गादीवर आलेल्या खलिफांची परस्परांविरुद्ध युद्धे झाली. त्यात आयेशाने अलीविरुद्ध झालेल्या उंटांच्या लढाईत भाग घेतला. चारपैकी तीन खलिफांचे खून झाले. हा सारा इतिहास लक्षात घेतला की कुराणाची प्रत तयार होत असतानाच त्यावरून बरेच राजकारण वाहून गेले हे लक्षात येते. नेमक्या याच गोष्टीवर मौलाना आझादांनी त्यांच्या कुराणभाष्यात बोट ठेवून आजची कुराणाची प्रत मूळ प्रतीहून वेगळी आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. नवव्या शतकात झालेल्या अरब विचारवंतांनी कुराणाचे ईश्वरी असणे नाकारले आहे.

हीच बाब गौतम बुद्धाच्या धर्माबाबतही खरी आहे. बुद्धाचा काळ इ.स. पूर्व 600 वर्षांचा तर त्याचे पहिले अश्वघोष रचित चरित्र इ.सनाच्या पहिल्या शतकातले म्हणजे सातशे वर्षांनी लिहिलेले. त्रिपिटक हा (सूत्तपिटक, विनयपिटक आणि अधिधम्मपिटक या नावांनी ओळखला जाणारा 42 ग्रंथांचा) संग्रह पुन्हा इ.सनाच्या पहिल्या शतकात श्रीलंकेतील वट्टगामिनी या राजाच्या देखरेखीखाली संपादित झालेला. त्यात अनेक अपपाठांचा व प्रविष्ट बाबींचा समावेश मधल्या काळात झाला आहे. ‘तुमच्या शिष्यांच्या उपदेशात एकवाक्यता नाही’ अशी तक्रार कालाम जमातीच्या लोकांनी बुद्धाजवळ त्याच्या हयातीतच केली तेव्हा ‘त्यातला ज्याचा जो उपदेश तुमच्या बुद्धीला पटेल त्याचाच खरा माना’ असे उत्तर त्यांना बुद्धाने दिले. कालामसूत्तात आलेली ही कथा प्रत्यक्ष बुद्धाच्या काळातच त्याच्या धम्मात पाठभेद उभे झाले होते हे सांगणारी आहे. त्रिपिटकाचा काळही अशोकाचे साम्राज्य जाऊन भारतात पुन्हा वैदिक धर्माची उपासना सुरू झाल्याचा आहे.

बायबलच्या जुन्या करारात नोंदविलेला सगळा इतिहास, त्यात झालेल्या पिढ्या, त्यांचे राजे आणि त्यांचे नोंदले गेलेले अमर्याद आयुष्य या साऱ्यांचा हिशेब मांडला तरी जगाची निर्मिती सहा हजार वर्षांमागे नेता येत नाही. सबब ऐतिहासिक चिकित्सेत त्याचे खरेपण टिकत नाही. नव्या करारात येशू ख्रिस्ताची चार चरित्रे (गॉस्पेल्स) आहेत आणि ती मॅथ्यू, मार्क, ल्यूक्‌ आणि जॉन या संतांनी लिहिली आहेत. नव्या कराराचे संपादन ख्रिस्ताच्या निर्वाणानंतर 325 वर्षांनी रोमचा सम्राट कॉन्स्टंटाईन याच्या काळात झाले. या संपादनासाठी जी श्रद्धावानांची समिती नेमली गेली तिच्यासमोर येशूची एकूण 80 चरित्रे होती. ती सारी बाद ठरवून ही चार चरित्रे नव्या करारात समाविष्ट करण्यात आली.

महत्त्वाची बाब ही की या संपादनापर्यंत येशूकडे साधा माणूस म्हणून पाहिले जात होते. त्याला ईश्वराचा पुत्र हा दैवी दर्जा या संपादनाच्या काळातच दिला गेला. तो देण्यासाठी (पूर्वीच्या ग्रीक साम्राज्यात दिवंगत राजाला ईश्वराचा दर्जा देताना व्हायचे तसे) ज्ञानी संतांच्या सभेत मतदानही झाले... महत्त्वाची बाब ही की नव्या कराराच्या संपादनानंतर येशूची त्याला माणूस म्हणून रंगविणारी इतर चरित्रे नाहीशी केली गेली. यात सेंट फिलीप आणि मेरी मॅकडेलिनी यांच्या नावावर असणाऱ्या येशूच्या चरित्रांचाही समावेश आहे. 1945 व 1950 मध्ये भूमध्य सागराच्या किनाऱ्यावर सापडलेल्या अनेक हस्तलिखित पोथ्यांमधून या चरित्रांच्या अस्तित्वाचे पुरावे जगाच्या हाती आले आहेत... कॉन्स्टंटाईनच्या साम्राज्यात सूर्यपूजकांचा प्राचीन धर्म व येशूच्या अनुयायांनी आणलेला नवा धर्म यांच्यात उत्पन्न झालेल्या तणावावर मात करण्यासाठी कॉन्स्टंटाईनने स्वतः येशूच्या धर्माचा स्वीकार केला व त्याला राजधर्माचा दर्जा दिला. आपल्या साम्राज्यात इतर धर्मांवर श्रद्धा ठेवणे हा मृत्युदंडाला पात्र असणारा गुन्हा ठरविला. मात्र तसे करताना त्याने त्याच्या जुन्या सूर्यपूजकाच्या धर्मातील अनेक गोष्टी, रूढी व परंपरा नव्या धर्मातही आणल्या.

राजकीय गरज व त्यासाठी करावी लागलेली ही सगळी सामाजिक हिकमत लक्षात घेतली की धर्माचे मानवी रूपच उघड होते. ही शहानिशा प्रत्येकच लहानमोठ्या धर्माच्या मूळ मानवनिर्मित व राजकारणप्रभावित स्वरूपापर्यंत नेता येते. तिच्यातून हाती येणारे वास्तव त्याच्या खऱ्या व ऐतिहासिक स्वरूपाच्या जवळचेही असते. मात्र हे त्याविषयीच्या सविस्तर चिकित्सेचे ठिकाण नव्हे. 

सत्याचे एक लक्षण हे की ते सार्वत्रिक आणि सर्वकालीन असते. वर आलेली धर्मनिर्मितीची आरंभीची वर्णने पाहिली की जगातला कोणताही धर्म या लक्षणांवर खरा उतरत नाही. वेदांचे म्हणणे उपनिषदे खोडून काढत असतील आणि आपल्याच शिष्यांनी केलेला उपदेश जरा पारखून घ्या असे एखादा महान धर्मसंस्थापक स्वतःच लोकांना सांगत असेल तर त्याच्या मूलभूत खरेपणाविषयीचा विश्वास कसा बाळगायचा? मक्केत नम्र व सहनशील असणारा धर्म मदिनेत तलवार हाती घेत असेल आणि एके काळी सर्वधर्मसमभाव (उम्मतुल वाहिदा) सांगणारा धर्म पुढे जिहाद-बासैफ वर उतरत असेल तर त्याचे कोणते स्वरूप खरे मानायचे? येशूला मानव मानणारा इ. सनाच्या आरंभापासून 325 वर्षे चालत आलेला त्याचा धर्म खरा असतो की राजकीय सोयीसाठी त्याला नंतरच्या काळात आलेले राजधर्माचे स्वरूप खरे मानायचे असते? धर्मग्रंथात आलेली चार चरित्रे खरी मानून नाकारलेली बाकीची चरित्रे कशाच्या बळावर आज खोटी वा त्याज्य ठरवायची असतात? सबब सर्वकालिकतेच्या कसोटीवर धर्मांना उतरता येत नाही. तीच बाब सार्वत्रिकतेच्या कसोटीविषयीचीही आहे. जे भारतात खरे व सुखकर असेल ते पाश्चात्त्यांत आणि चीनमध्येही तसेच असले पाहिजे आणि जे धर्मसत्य एका समाजाला ग्राह्य व आनंददायी असेल ते इतरांनाही तसे वाटावे की वाटू नये? धर्मांच्या सार्वत्रिक चांगुलपणामुळे सर्वत्र सौहार्द का निर्माण झाले नाही आणि जगाचा इतिहास धर्मयुद्धांचाच इतिहास का झाला असावा?

धर्म म्हणजे सारेच वाईट असे येथे चुकूनही सुचवायचे नाही. धर्मांची शिकवण जेव्हा नीतिमूल्यांचे अवधारण करीत येते तेव्हा ती व्यक्ती आणि समाज यांना उपकारक व कल्याणप्रदच ठरत असते. जगातील सर्व धर्मांना त्यांच्या चांगल्या तोंडवळ्यासाठी या नीतिमूल्यांचा आधार घ्यावा लागला आहे. धर्मांमध्ये सार्वत्रिकता व सनातत्व असलेच तर ते केवळ या नीतिमूल्यांविषयीच आढळणारे आहे. खरे बोलावे, वडिलांची आज्ञा पाळावी, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ही शिकवण हिंदू वा बौद्ध नाही, ती इस्लामची वा येशूच्या धर्माचीही नाही. ते नीतीचे सांगणे आहे. ते धर्मनिरपेक्ष व सेक्युलर आहे. धर्म आणि नीती या दोन वेगळ्या बाबी आहेत.

धर्म ही व्यवस्था तर नीती हे मूल्य आहे. धर्म या नीतिमूल्यांची नेहमीच धारणा करतात असेही नाही. माणसामाणसांतली विषमता ही अनीती आहे आणि तिला जगातल्या सर्व धर्मांची मान्यता आहे. स्त्रियांना दुय्यम दर्जा देणे ही अनीती आहे आणि ती सर्वच धर्मांनी केली आहे. इतर धर्मांच्या लोकांना दिलेला शब्द पाळण्याची तुमच्यावर सक्ती नाही अशी शिकवण देणारे धर्म जगात आहेत. अन्य धर्मीयांच्या घरात त्यांच्या इच्छेविरुद्ध प्रवेश करणे, राहणे, त्यांच्याकडून आपली सरबराई करून घेणे, फार कशाला त्यांच्या स्त्रियांच्या ठिकाणी सक्तीने संतती उत्पन्न करणे यालाही मान्यता देणारे धर्म जगात आहेत... तात्पर्य, नीतीत धर्म असतो, धर्मात नीती असतेच असे नाही.

वास्तव हे की, धर्म सनातन नसून नीतीमूल्येच तेवढी सनातन आहेत. ती सर्वकालीन माहात्म्य राखणारी आणि सार्वत्रिक कल्याणकारी ठरणारीही आहेत. सत्य व अहिंसेसारखी किंवा सदाचरणाचा आग्रह धरणारी मूल्ये पूर्वी खरी होती, आज खरी आहेत आणि पुढेही ती तशीच राहणार आहेत. समाज एकजिनसी असला तरी त्यांचे मोल तेवढेच आणि उद्या तो विकेंद्रित किंवा व्यक्तिकेंद्री झाला तरी तसेच. नीतीचा संबंध चांगुलपणाशी व योग्यायोग्यतेशी आहे. तो मृत्युपूर्व वा मरणोत्तर मिळवावयाच्या कोणत्याही काल्पनिक सुखाशी वा मुक्तीशी नाही. आजच्या समाजाचे स्थैर्य आणि उद्याच्या समाजव्यवहाराचे अस्तित्व यांचा मूलाधार धर्म नाही, ते नीतिमूल्यांचे क्षेत्र आहे.

समुदायांना धर्माची गरज असते. ती व्यवस्था म्हणूनही लागत असते. नीती समाजाएवढीच व्यक्तींसाठीही मौलिक ठरते व तशीच ती राहणारही असते. झालेच तर धर्माहून नीती हे अधिक प्रबळ मूल्य आहे. धर्माला ईश्वराचा आधार लागतो. स्वर्ग-नरकासारख्या लोभ-भयाच्या कुबड्या लागतात. अवतारी महात्म्यांचे किंवा ईश्वरी ग्रंथांचे शब्दप्रामाण्य लागते. नीतीला यातले काही नको. त्या स्वयंभू मूल्याचा एकमेव आधार माणसाचे मन वा त्याचा विवेक हे आहे. ते प्रत्येकाजवळ आहे. त्याचे सामर्थ्य कमीअधिक असणे हा इतिहासजमा होत असलेल्या समूहकेंद्री मानसिकतेचा परिणाम आहे. मात्र त्याचे अस्तित्व सार्वत्रिक आहे. त्यात असलेली बऱ्यावाईटाची जाण सनातन आहे. नव्या व्यवस्थेत जग लहान आणि सपाट करणारा संस्कार या मनांचाही विस्तार करणारा व त्याच्या समजुतीच्या कक्षा रुंदावणारा राहणार आहे.

समूहांचे स्थान स्वयंपूर्ण व्यक्तींचा मैत्रीपूर्ण समाज घेत असतानाच धर्माची जागा यापुढे नीतिमूल्ये घेणार आहेत. समाजातील सगळीच माणसे नीतिमूल्यांचे पालन करतील याची शाश्वती कोण आणि कशी देईल, असा प्रश्न स्वाभाविकपणेच येथे विचारला जाईल. नीतीमूल्यांचा प्रभाव स्वयंशासनासारखा असतो. त्यांची अंमलबजावणी स्वतःखेरीज कोणी करायचीही नसते. आपल्याखेरीज दुसऱ्या कोणी ती मूल्ये आपल्यावर लादणे हा नीतिमूल्यांचा मुळातून पराभव ठरतो. धर्माचे नियम, राज्याचे कायदे आणि समाजाच्या रूढी यांच्या मागे कोणत्या ना कोणत्या तऱ्हेची दंडशक्ती उभी असते. तिच्या भयाने त्या व्यवस्थांच्या नियमांचे पालन समाज व व्यक्तींकडून होत असते. नीतिमूल्ये स्वयंभू आहेत, त्यांच्या मागे असलेले सामर्थ्य आत्मशक्तीचे व विवेकाचे आहे. प्रत्येक व्यक्तीजवळ आत्मसामर्थ्य आणि विवेकशक्ती आहे असा नीतिव्यवस्थेचा दावा आहे. ही नीतिव्यवस्था आजवर सबळ न होण्याचे कारण समाजात असलेला वेगवेगळ्या तऱ्हेच्या दंडशक्तीचा प्रभाव हे आहे.

नव्या समाजव्यवस्थेत व्यक्ती सबल होणार असल्यामुळे या दंडशक्तींचा प्रभाव कमी होणार आहे. त्याच वेळी व्यक्तीचे आत्मबल वाढून तिच्यावरचा नीतिमूल्यांचा प्रभावही बळकट होणार आहे. साऱ्या अराज्यवाद्यांची नीतिमूल्यांबाबतची ही भावना आहे. आजवर जुन्या व्यवस्थांच्या संस्काराुंळे ती प्रत्यक्षात येऊ शकली नसली तरी जेव्हा जुन्या व्यवस्थाच मागे पडतील तेव्हा तिच्या खऱ्या अवतरणाचा अनुभव समाज व व्यक्ती घेऊ शकणार आहेत. 

Tags: कालसापेक्ष धर्म आणि सनातन नीतिमूल्ये चिंतन नितीमुल्ये मुल्ये धर्म सुरेश द्वादशीवार chintan origin of religion morals religion suresh dwadashiwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात