डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

वैज्ञानिक सत्याला मानवी मूल्यांची साथ

ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि माणुसकी या सनातन व सेक्युलर तत्त्वांचा यापुढचा प्रवास स्वयंपूर्ण व्यक्तींच्या मैत्रीपूर्ण समाजाच्या प्रस्थापनेच्या दिशेने होईल. त्यातील व्यक्ती निखळ माणूसपण जगणारी असेल. तिच्या मनोधर्मावर जात, धर्म, वंश यांसारखी प्राचीन पुटे असणार नाहीत. ती समर्थ, समजूतदार, विज्ञाननिष्ठ आणि विचारी असेल. ती रूसोच्या कल्पनेतील निसर्गानवासारखे वन्यजीवन जगणारी नसेल. शिक्षित, सुसंस्कृत, स्वयंपूर्ण आणि आपल्या व आपल्या सोबतच्या साऱ्यांच्या सामर्थ्य व मर्यादांचे आकलन असणारी असेल. 

नीती जेवढी धर्मनिरपेक्ष तेवढेच विज्ञानही धर्मनिरपेक्ष आहे. त्याहीपुढे जाऊन सगळे ज्ञानच धर्मनिरपेक्ष किंवा सेक्युलर आहे असे म्हणता येईल. धर्म, वंश, जात, भाषा किंवा आताच्या प्रादेशिक चौकटीत वाढलेल्या संस्कृती यांसारख्या जन्मदत्त निष्ठांपैकी कोणत्याही निष्ठेला ज्ञान-विज्ञानाचा आणि नीतिमूल्यांचा येत्या काळातील वेग आणि विजय रोखता येणार नाही. जन्मदत्त निष्ठांच्या चौकटी मजबूत असण्याच्या काळातही त्यांना या मूल्यांचा वेगच तेवढा कमी करता आला. त्यांचा प्रवास पूर्णपणे थांबविणे त्यांना तेव्हाही जमले नाही. ज्या काळात या चौकटींच्या मागे समूहमन आणि त्या मनामागे श्रद्धांची बळकटी उभी होती त्या काळात जर त्या श्रद्धा नव्या जीवनमूल्यांना थोपवू शकल्या नसतील तर आताच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सर्वस्वी व्यक्तिकेंद्री मानसिकतेच्या युगात त्यांना ते जमणे अशक्यही आहे. नव्या मन्वंतराला सामान्य माणसांनी घडविलेल्या कायद्यांचा, घटनांचा आणि लोकशाही व्यवस्थांचा भक्कम आधार आहे आणि तो जुन्या जन्मदत्त निष्ठांची मान्यता व बळकटी काढून घेणारा आहे.

वयात आलेल्या स्त्रीपुरुषांवर कोणतेही बंधन, अगदी लैंगिक स्वातंत्र्याविषयीचा निर्बंधही आता कोणाला घालता येणार नाही. तसे त्यांच्या आईवडिलांएवढेच जातिधर्मांनाही करता येणार नाही. जगभरातील प्रगत देश एके काळी निषिद्ध मानलेल्या समलिंगी विवाहांना मान्यता देऊ लागले आहेत. समूहाने दिलेले सतीसारखे, केशवपनासारखे किंवा आताच्या खाप पंचायतींनी दिलेल्या प्रतिगामी निवाड्यांसारखे निर्णय आताच्या व्यवस्थेला नुसते अमान्यच नाहीत तर ते दंडनीय अपराधही ठरणारे आहेत.

विज्ञानाने जगाच्या उत्पत्तीचा शोध सुरू केला आहे. स्वित्झर्लंड आणि फ्रान्सच्या सीमेवर भूपृष्ठाखाली कित्येक मीटर खोल, अठरा मैल लांबीचे व तीन मीटर व्यासाचे प्रचंड गोलाकार रिंगण त्यासाठी तयार केले आहे. या रिंगणात दर सेकंदाला हजारो किलोमीटर वेगाने प्रवास करणारे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचे सूक्ष्म कण सोडून त्यांची टक्कर घडवून आणली जात आहे. अशा पहिल्याच टक्करीने घडविलेल्या महास्फोटात (बिग बँग) नवे जडद्रव्य (मॅटर) निर्माण झाल्याचे वैज्ञानिकांना आढळले आहे. जडद्रव्यापासून चेतन (याला त्यांनी सध्या दिलेले नाव आहे, ॲन्टी मॅटर) वेगळे करण्याचा आणि जड-चेतन विश्वाची निर्मितिप्रक्रिया समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

यशाच्या मार्गावर असलेला हा प्रयोग खरोखरीच सफल झाला तर आजचा माणूस उद्या नव्या विश्वाची निर्मिती करून ‘ईश्वरा’चा समकक्ष होणार आहे. त्या स्थितीत ईश्वराने केलेली विश्वनिर्मिती, त्याने जन्माला घातलेले धर्म, त्याचा अवतार वा त्याचे पुत्र बनून आलेले धर्मसंस्थापक आणि चिरंतन सत्याची गुत्थी आमच्याच शिकवणीत आहे असे सांगणारे सगळेच ऐतिहासिक महाभाग कुठे जातील? त्यांच्यावर वर्षानुवर्षे निष्ठा ठेवून तलवारी नाचवणारे आणि त्यांच्या मागे लागून आयुष्ये घालविणारे त्यांचे अनुयायी तरी कुठे असतील? जड चेतनाच्या चर्चांनी सगळा प्राचीन तत्त्वविचार भरून राहिला आहे. त्याचे वैय्यर्थ या प्रयोगातून स्पष्ट होईल की अपुरेपण? की त्या प्रश्नाची सारी नवीच उत्तरे उद्याच्या जगाच्या हाती येतील?

विज्ञान हे कठोर व मूल्यनिरपेक्ष शास्त्र आहे. सत्याचा शोध घेताना मानवी श्रद्धावृत्तीचा अडसर त्याच्या मार्गात येत नाही. हे जग अणुंचे बनले आहे या आपल्याकडील कणादाच्या  किंवा ग्रीसमधील डेमॉक्रिटसच्या संशोधनाकडे धर्माने झाकोळून टाकलेल्या शतकांना दुर्लक्ष करणे जमले तसे ते आता करता येणार नाही. शिवाय आताच्या पिढ्या पूर्वीच्या तुलनेत अधिक विज्ञाननिष्ठ आहेत हे जगभरच्या शिक्षण व्यवहाराने स्पष्ट केले आहे. जुन्या श्रद्धांची विज्ञानाच्या आधारे चिकित्सा करणे या पिढ्यांना जमणारेही आहे.

विज्ञानाने सिद्ध केलेल्या प्रमेयांचे वैशिष्ट्य हे की ती सार्वत्रिकतेच्या आणि सर्वकालीनतेच्या म्हणजेच सनातनत्वाच्या कसोटीवर खरी ठरत असतात. पदार्थविज्ञानापासून वैद्यकशास्त्रापर्यंतच्या सर्वच शास्त्रांतील प्रमेयांना आणि संशोधनांना हे लागू होणारे आहे. अणुबॉम्ब अमेरिकेचा असला किंवा भारताचा असला तरी तो सारखाच विध्वंसक असतो आणि अंतराळात सोडलेली अवकाशयाने पाश्चात्य देशांएवढीच पौर्वात्य देशांच्याही ज्ञानभांडारात जास्तीची व नवी भर घालत असतात. शास्त्रीय ज्ञानाचे खरेपण देशकालाच्या मर्यादांनी बाधित होत नाही की धर्म आणि संस्कृतीच्या समजुतींनी संकोच पावत नाही. आपल्यापुढला प्रश्न, ते स्वीकारायचे की नाही एवढाच असतो. जे ते स्वीकारायला नकार देतात त्यांच्यामुळेही त्याच्या खरेपणाला कुठे उणेपण येत नाही.

पायथॅगोरसची प्रमेये आणि युक्लिड व टॉलेीचे संशोधन त्यांच्या काळात जेवढे खरे होते तेवढेच ते आजही खरे आहे. आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त पूर्वीएवढेच आजही प्रस्थापित आहेत. कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांची प्रमेये धर्मसंस्थांनी अमान्य केली तेव्हाही खरी होती आणि त्या प्रमेयांना मान्यता देणे त्या संस्थांना भाग पडले तेव्हाही खरीच राहिली. वैज्ञानिक सत्यांना पुरावा लागत नाही. ती स्वयंसिद्ध असतात. अमक्याने म्हटले किंवा तमुकाने पाठिंबा दिला यासारख्या शब्दप्रामाण्याने त्यांचे खरेपण प्रमाणित होत नाही. उलट तसे प्रामाण्य ज्यांना लागते त्यांच्याच खरेपणाविषयी शंका घ्यावी लागत असते व नेमका तशा चिकित्सेचा काळ आता आला आहे.

विज्ञानाला धर्माच्या मर्यादा नाहीत. राष्ट्रांच्या सीमा त्याचा प्रकाश अडवू शकत नाहीत. माणुसकी आणि विज्ञान यांच्यातले हे साम्य पुन्हा एकवार वंशधर्मापासून देश व राष्ट्रांपर्यंतच्या साऱ्या व्यवस्थांचे संकुचितपण लक्षात आणून देणारे आहे. त्या व्यवस्थांचे अनैसर्गिक असणेही त्यामुळे सिद्ध होणारे आहे. देश आणि राष्ट्रांच्या सीमांबाबत सामान्यपणे ध्यानात घेतले न जाणारे एक वास्तव येथे नोंदविले पाहिजे. आजच्या जगातील बहुतेक देशांच्या सीमा 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आखल्या गेल्या आहेत. सगळ्या युरोपची आजची राष्ट्ररचना पहिल्या महायुद्धानंतर स्वयंनिर्णयाच्या अधिकारतत्त्वानुसार करण्यात आली. ऑस्ट्रिया, हंगेरी, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया यांसारखे देश त्यातून जन्माला आले. सोव्हिएत युनियनची शकले होऊन अस्तित्वात आलेल्या डझनभर देशांचा इतिहास दोन दशकांहूनही मोठा नाही. भारतासारख्या प्राचीन देशाच्या पूर्व व पश्चिम सीमा 1947 मध्ये, म्हणजे साठ वर्षांपूर्वी निश्चित झाल्या. त्याची उत्तर सीमा अजून ‘चर्चेत’ अडकली आहे. सारे आफ्रिका खंड हेही असेच नव्याने जन्माला आलेले आणि आपल्या अस्तित्वाची पुरती ओळख अजूनही न पटलेल्या देशांचे आहे. जमातींची राज्ये, भाषांचे देश, नेत्यांनी आखलेल्या सीमा असेच त्यांचे स्वरूप अजून राहिले आहे. तात्पर्य, जगातील दोन तृतीयांशाहून अधिक देश अलीकडच्या काळात जन्माला आले.

आजचे बहुसंख्य देश आणि राष्ट्रे यांचे आयुष्य त्यामुळे दीडशे वर्षांहून अधिक मोठे नाही. हे देश अस्तित्वात येण्याआधी, त्या प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यात देशाभिमान किंवा राष्ट्राभिमान या नावाने जी भावना अस्तित्वात होती ती कोणती व कशी होती? ती त्यांच्या राजांच्या किंवा सम्राटांच्या हुकूमतीच्या सीमेएवढीच विस्तारित किंवा मर्यादित असणार. देश किंवा राष्ट्र या भावनेऐवजी वंश-धर्माच्या किंवा भाषासंस्कृतीच्याच सीमांविषयीच्या भावना त्या जागी असणार आणि त्या अर्थातच आखलेल्याही नसणार. तात्पर्य, दीड ते दोनशे वर्षांपूर्वी राष्ट्र वा देश म्हणून ज्या भावना अस्तित्वात होत्या त्याही समूहाधारित समजांच्या बळावरच उभ्या होत्या. ज्या काळात समूहाधारित समजांच्या जागा व्यक्तिगत जाणिवा घेतील त्या काळात या समजांचा प्रभाव कितीसा उरेल?

वास्तव हे की, देशांच्या सीमांचे माहात्म्यही त्या सीमांपासून दूर व सुरक्षित अंतरावर राहणाऱ्या वर्गांच्या मनातच खोलवर ठसले असते. या सीमा दूर आहेत ही भावना त्यांच्यात सुरक्षिततेचे आश्वस्तपण निर्माण करते. या भावनेने जागविलेला विश्वासच मग भक्तीचे रूप घेतो. राष्ट्रभक्ती हे याच रूपाने देशाने दिलेल्या मध्यवर्ती सुरक्षेचे दुसरे नाव असते. देशाचे जे प्रदेश सीमावर्ती आहेत आणि ज्या वर्गांना या सीमांच्या कडेने जगावे लागते त्यांची मानसिकता समजून घेण्याचे प्रयत्न फारसे कोणी करीत नाही. त्यांच्या शेजारधर्माचाच नव्हे तर आप्तधर्माचाही या सीमांनी शेवट केला असतो. या सीमा प्रत्यक्षात दिसत नाहीत. अनेक देशांच्या सीमा आखलेल्याही नाहीत. सीमावर्ती प्रदेशांसाठी आणि समाजांसाठी त्या नुसत्या अनैसर्गिकच नव्हे तर त्यांना त्यांच्या आप्तस्वकीयांपासून तोडणाऱ्या आणि त्यांच्या छोट्याशा जागेत त्यांना बंदिस्त करून ठेवणाऱ्या काटेरी कुंपणासारख्या शत्रुवत वाटत असतात. त्या भागातील माणसांना बोलके करता आले तर त्यांच्या अशा भावना आपल्याला कळूही शकतात.

विज्ञानाने जगाची समृद्धी वाढविली आणि त्याच्या विकासाला वेग दिला. विज्ञानाचे आणखी एक वैशिष्ट्य हे की ते निखालस माणुसकीला जवळचे आहे. मुळात माणूस धर्म वा जातिनिरपेक्षच होता. वर्ण, वंश आणि देश यांच्या बांधील संस्कारांपासूनही तो मुक्त होता. लहान मुलांएवढाच मूळचा माणूसही या मर्यादांची जाणीव नसणारा व सर्वस्वी आत्मप्रेरणेनुसार जगणारा होता. जीवित रक्षण, उपजीविका आणि भयमुक्ती एवढ्याच साध्या व सरळ अपेक्षा घेऊन तो जगत होता. त्याच्यात श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भावना असलीच तर ती व्यक्तिगत बळाच्या व बुद्धीच्या संदर्भातील होती. श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या भावनेचा संस्कार त्याच्यावर नंतरच्या काळात धर्मादि चौकटी जन्माला आल्यानंतर झाला आहे. आपले अंगभूत बळ ज्यामुळे  वाढेल त्या आयुधाच्या, चाकाच्या, अग्नीच्या, पाणी आणि शेतीच्या मागे तो आरंभी लागला. निर्मितीच्या साधनांएवढे त्याला दुसरे काही आपले न वाटण्याच्या अवस्थेत तो एके काळी राहिला आहे. त्याच्या मनात आलेल्या श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या, आपपरभावाच्या, स्वकीय-परकीयत्वाच्या आणि एकूणच द्वैताच्या भावना उत्तरकालीन आहेत. त्या जातिधर्मासारख्या पुढे निर्माण झालेल्या किंवा काहींनी जाणीवपूर्वक जन्माला घातलेल्या संस्कारांनी घडविल्या आहेत. त्यामुळे ज्ञानविज्ञान किंवा तंत्रज्ञान हीच माणसांची सर्वाधिक जुनी, निसर्गदत्त व विश्वसनीय साधने ठरणारी आहेत. त्यांचे असणे सार्वत्रिक आहे. त्यांचे कल्याणकारी असणे सार्वकालीन आहे. त्यांनी माणसामाणसांत स्पर्धा आणली असेल, मात्र वैर, दुरावा किंवा शत्रुत्व आणले नाही. तो सगळा उत्तरकालीन व सांस्कृतिक म्हणविणाऱ्या समूहाधारित व्यवस्थांचा परिणाम आहे. विज्ञानाने माणसाला तेव्हा साथ दिली. नंतरच्या श्रद्धाशील म्हणविणाऱ्या विज्ञानविरोधाच्या काळातही ते माणसासोबत राहिले आणि यापुढच्या विकासाच्या वाटचालीतही ते माणसांसोबत राहणार आहे.

वैज्ञानिक सत्याचा आग्रहदेखील एका संयमी मर्यादेपर्यंतच धरता येतो हेही येथे नोंदविले पाहिजे. त्याचा टोकाचा आग्रहही विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. एखाद्या अणुवैज्ञानिकाने साऱ्या जगाचा विध्वंस एका क्षणात करू शकणारे अस्त्र उद्या निर्माण केले आणि त्याच्या यशाची परीक्षा घेण्याचा आग्रह धरला तर तो मान्य करायचा काय, हा प्रश्न येथे महत्त्वाचा ठरावा. वैज्ञानिक सत्याचा पुरावा मागणारी टोकाची माणसे, ही परीक्षा घेतली पाहिजे असा आग्रह धरणारच नाहीत याची खात्री कोण देईल? नेमक्या या वेळी वैज्ञानिक आग्रहांना मानवी मूल्यांच्या विचारांची जोड देणे महत्त्वाचे ठरते. यापुढचा काळ वैज्ञानिक प्रगतीचा आणि तिला द्याव्या लागणाऱ्या मानवी मूल्यांच्या साथीचा राहणार आहे.

उद्याच्या काळात माणसे जोडू शकणाऱ्या ज्ञान व विज्ञान या साधनांना हवी असणारी जोड जन्मदत्त निष्ठांची नाही. मूल्यनिष्ठांची आणि ज्ञानाधिष्ठित विचारांची साथ यापुढे त्याला लागणार आहे. या वाटचालीचा मार्ग तयार आहे. त्यावरून जाण्याचे बळच तेवढे एकवटायचे आहे. ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान आणि माणुसकी या साऱ्यांना समान असलेले सूत्र त्यांच्या सनातनत्वाचे आहे. तसेच त्यांच्या व्यक्तिसापेक्ष व कमीअधिक उंचीचे, ज्ञानधारणेचे, अध्ययनकौशल्याचे आणि अभिक्रमशीलतेचे आहे. त्यांचा समूहांशी, समुदायांशी किंवा एकूण समाजाशी येणारा संबंध त्यांच्या फलश्रुतीनंतरचा आहे. ज्ञान आणि विज्ञान ही समूहाने करावयाची उपासना नाही. आधुनिक ज्ञानविज्ञानाएवढीच प्राचीन धर्ममुल्यांतील ज्ञानोपासनादेखील व्यक्तिगत होती हे येथे लक्षात यावे. आजच्या जगात ही साधना कुणालाही अनिर्बंधपणे करता यावी. विज्ञान वा तंत्रज्ञानाच्या प्रयोगशाळेत, एकांतात किंवा अभिक्रमशील व्यक्तीला हव्या त्या जागी ती करता यावी. ही प्रयोगशीलता निसर्गाच्या सानिध्यातही फलद्रूप होईल. तिच्या निर्मितीवर समुदायाला हक्क सांगता येणार नसला तरी तिचा लाभ साऱ्यांच्या वाट्याला येऊ शकेल.

धर्म, वंशासारख्या जन्मदत्त निष्ठांचा संदर्भ या व्यक्तिगत यशाबाबत सर्वस्वी गैरलागू ठरेल. त्यावर देशाचा आज असलेला अधिकारही फार काळ टिकणार नाही. आजच या अधिकाराचे जतन पेटंटसारख्या व्यवस्थांमधून करावे लागत आहे. व्यक्तीने मिळविलेल्या यशात ती इतरांना सहभागी करून घेईल किंवा तसे तिला करणे जमेल. मात्र तो त्या व्यक्तीने समाजासाठी केलेल्या सेवाकार्याचा भाग ठरेल. तो समुदायाच्या हक्काचा भाग होणार नाही. या मूल्यांचा प्रवास ऊर्ध्वगामी असेल आणि त्यांना तो परस्परांच्या हातात हात घालून करावा लागेल. केवळ विज्ञान वा तंत्रज्ञान पुढे गेल्याने होणारा विकास ऊर्ध्वगामी असला तरी परिपूर्ण असणार नाही. शिवाय तो मूल्यविहीनही असेल. विज्ञानाची मर्यादा अशा वेळी विचारात घ्यावी लागेल. ते व्यक्तीला समृद्ध बनविणारे असले तरी शहाणे बनविणारे नाही. त्यासाठी व्यक्तीला ज्ञान व ततत्त्वचिंतन यांचीच मदत घ्यावी लागेल.

विज्ञान ताकद देईल आणि ज्ञान ती ताकद कशासाठी वापरायची याची बुद्धी देईल. ज्ञानावाचून विज्ञान आंधळे आणि विज्ञानावाचून ज्ञान पांगळे असते. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि माणुसकी या सनातन व सेक्युलर तत्त्वांचा यापुढचा प्रवास स्वयंपूर्ण व्यक्तींच्या मैत्रीपूर्ण समाजाच्या प्रस्थापनेच्या दिशेने होईल. त्यातील व्यक्ती निखळ माणूसपण जगणारी असेल. तिच्या मनोधर्मावर जात, धर्म, वंश यांसारखी प्राचीन पुटे असणार नाहीत. ती समर्थ, समजूतदार, विज्ञाननिष्ठ आणि विचारी असेल. ती रूसोच्या कल्पनेतील निसर्गानवासारखे वन्यजीवन जगणारी नसेल. शिक्षित, सुसंस्कृत, स्वयंपूर्ण आणि आपल्या व आपल्या सोबतच्या साऱ्यांच्या सामर्थ्य व मर्यादांचे आकलन असणारी असेल.

प्लेटोने ज्या तत्त्वज्ञ माणसाचे स्वप्न पाहिले त्याच्या जवळ जाणारी ही माणसे असतील. आईबापांकडून होणाऱ्या जन्मदत्त संस्कारांचे सगळे पापुद्रे घासूनपुसून नाहीसे करणारी एक शिक्षणपद्धती अशा माणसाच्या निर्मितीसाठी प्लेटोने सांगितली. नव्या व्यवस्थेत ते साध्य होऊन व्यक्तीची सहज ऊर्जा सबल आणि सक्रिय होईल. तिच्यावर परंपरांनी घातलेली सारी बंधने नाहीशी होतील आणि व्यक्ती आपल्या साऱ्या सामर्थ्यानिशी जगाच्या व्यवहारात सहभागी होऊ शकतील. झालेच तर अशा व्यक्ती अरविदांनी पाहिलेल्या समर्थ मनाच्याही वाहक असतील. आजच्या माणसाच्या सहज ऊर्जा त्याच्यावर असलेल्या अनैसर्गिक बंधनांनीच अधिक ग्रासल्या आहेत. येणाऱ्या समाजात ही बंधने नसतील आणि मानवी ऊर्जा तिच्या नैसर्गिक स्वरूपात प्रगट झालेली दिसेल. या ऊर्जेला व्यक्तीने आत्मसात केलेल्या बुद्धीचाच तेवढा आवर असेल आणि ही बुद्धी या ऊर्जेचा गैरवापर होऊ न देण्याची काळजी घेतानाही त्या काळात दिसेल.

Tags: नीती ज्ञान विज्ञान चिंतन   सुरेश द्वादशीवार values knowledge science chintan suresh dwadashiwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात