डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

क्वात्रोचीच्या स्मरणयात्रा काढणे आणि जमेल तेवढे गांधी कुटूंबाला बदडत राहणे हे यापुढेही त्यांना करता येणार आहे. क्वात्रोची जिवंत असताना त्यांच्या त्या खेळाला मिळालेली खुळखुळ्याची साथच तेवढी त्यांच्यासोबतीला आता असणार नाही.

ऑटोव्हिओ क्वात्रोची या इटालियन दलालाचा दि. 14 जुलैला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाला हे चांगले झाले नाही.

सिसिली या माफियांना जन्म देणाऱ्या इटलीच्या बेटावर 1938 साली जन्माला आलेल्या या क्वात्रोचीने 1974 पासून परवापर्यंत भारताचे राजकारण बऱ्यापैकी ग्रासले होते. राजीव गांधींच्या संपर्कात आलेल्या या दलालाने देशात बरीच कंत्राटे मिळविली आणि राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात बोफोर्स तोफांच्या खरेदीप्रकरणात त्यांचेच नाव गुंतवून त्यांना निवडणुकीत पराभूत करायलाही तोच कारण ठरला.

बोफोर्स प्रकरणातील 64 कोटींच्या दलालीचा लाभ त्याच्यामार्फत राजीव गांधींनाच मिळाला असल्याची हाकाटी त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेल्या विश्वनाथ प्रताप सिंगांनी केली. माध्यमांनी केलेल्या आरोपांच्या गदारोळात पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष पराभूत होऊन विश्वनाथ प्रताप सिंगांचे अल्पजीवी सरकार देशात सत्तेवर आले. तेव्हापासून 2011 पर्यंत आलेल्या साऱ्या सरकारांनी या 64 कोटींची चौकशी आपल्या परीने करून पाहिली. 1 लक्ष 80 हजार कोटींचा टू जी घोटाळा, तेवढ्याच मोठ्या रकमेचा कोळसा घोटाळा, त्याच्या जवळपास येणारा कर्नाटकातील खाण घोटाळा असे आताचे मोठे घोटाळे पाहिले की 64 कोटींची तेव्हाची रक्कम साधी चिरीमिरी वाटावी अशी आहे.

मात्र राजीव गांधी आणि काँग्रेस पक्ष यांना गुन्हेगार ठरविण्याच्या मानसिकतेतून बोफोर्सच्या तोफांचा गडगडाट विरोधकांनी वाजता ठेवला. साऱ्या चौकशा, खटले, साक्षीपुरावे आणि कनिष्ठ न्यायालयांपासून वरिष्ठ न्यायालयांपर्यंतचे सारे काही होऊन त्यात काहीएक निष्पन्न झाले नाही. अखेर 2011 मध्ये दिल्लीच्या मेट्रोपॉलिटन न्यायालयाने हा खटलाच थांबविण्याचा आदेश चौकशी यंत्रणांना दिला.

परिणामी विरोधकांच्या हाती आलेला व त्यांनी 30 वर्षे खुळखुळत ठेवलेला एक राजकीय खुळखुळा निकालात निघाला. आता क्वात्रोचीही मेल्याने ते सारे प्रकरणच विस्मरणात जाण्याची सोय झाली. गांधी कुटुंबाला कोणताही आरोप चिकटत नाही आणि तो वर्षानुवर्षे करीत राहिलो तरी जनतेचाही त्यावर विश्वास बसत नाही याची खात्रीच या साऱ्या इतिहासाने विरोधकांना पटविली असणार. मात्र बोफोर्स शमल्याने आणि क्वात्रोची मेल्याने विरोधकांचा गांधीद्वेष काही संपायचा नाही.

क्वात्रोचीच्या स्मरणयात्रा काढणे आणि जमेल तेवढे गांधी कुटूंबाला बदडत राहणे हे यापुढेही त्यांना करता येणार आहे. क्वात्रोची जिवंत असताना त्यांच्या त्या खेळाला मिळालेली खुळखुळ्याची साथच तेवढी त्यांच्यासोबतीला आता असणार नाही. ​​​​​​​

Tags: ऑटोव्हिओ क्वात्रोची सुरेश द्वादशीवार लास्ट पेज suresh dwadshiwar Ottavio Quattrocchi last page weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात