डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

मग आताचा मोदी-जोशी वाद कशासाठी? मोदी अडवाणींनाही नकोत आणि जोशी हे मोदींहून संघनेत्यांच्या अधिक जवळचे आहेत. जोशींचे नाव मोठ्या पदाच्या शर्यतीत नाही. त्या शर्यतीत मोदींचेच नाव महत्त्वाचे आहे आणि ते बाजूला सारायचे तर त्याचे वादग्रस्तपण अधोरेखित करणे गरजेचे आहे... मोदींना अमेरिकेचा व्हिसा नाही आणि युरोपात त्यांना येऊ दिले जात नाही. मोदींनी आपल्या राज्यात येऊ नये हे बिहारच्या नीतिशकुमारांनी त्यांना या आधी ऐकविले आहे आणि ओडिशाच्या नवीन पटनायकांनीही त्यांच्यावर प्रवेशबंदी लादली आहे. हे दोन्ही मुख्यमंत्री अजून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहेत हे येथे उल्लेखनीय. मोदींना नाकारणाऱ्यांची यादी येथे संपतही नाही.

नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीविषयीचे संघ व भाजपात सुरू असलेले सध्याचे वादळ मानवनिर्मित व खोटे आहे. खुद्द मोदींसकट सगळ्या माध्यमांना संभ्रमात टाकण्यासाठी ते उभे झाले आहे. ते उभे करण्यात संघाच्या ‘ऑर्गनायझर’ आणि भाजपच्या ‘कमल संदेश’ या मुखपत्रांनी बुद्‌ध्याच फसव्या भूमिका घेतल्या आहेत.

‘नरेंद्र मोदी हेच भाजपाचे पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार असून त्यांच्या आक्रमक व्यक्तिमत्त्वामुळे देशातील मतदारांचा मोठा वर्ग भाजपाकडे वळेल’ असे ऑर्गनायझरचे म्हणणे तर ‘मोदींच्या लढाऊ व्यक्तिमत्त्वाला भिऊन भाजपाचे अनेक मित्र त्या पक्षापासून दूर जातील’ ही कमल संदेशची शंका. मोदींमुळे भाजपचा उत्तर प्रदेश व ओडिशातील पाठिंबा वाढेल हा ऑर्गनायझरचा आशावाद तर मोदींच्या महत्त्वाकांक्षेला आवर घालण्याची गरज आहे हा कमल संदेशचा इशारा. ऑर्गनायझरवर संघाच्या नागपूरस्थ नेत्यांचा वरचष्मा तर कमल संदेशवर नागपूरच्याच गडकरी या भाजपाध्यक्षांचे नियंत्रण. संघाला गडकरींएवढा जवळचा असलेला एकही नेता आज भाजपमध्ये नाही आणि गडकरी यांची संघनिष्ठा निरपवाद म्हणावी अशी आहे.

संघाला मोदींचा लाभ हवा, त्यांचे लढाऊपण हवे, मात्र त्यांचे नेतृत्व नको. मोदींची संघनिष्ठा मोठी असली तरी त्यांच्या महत्त्वाकांक्षा तेवढ्याच बलशाली आहेत आणि त्यांची धास्ती भाजपाएवढीच संघालाही आहे. या स्थितीत ऑर्गनायझरने मोदींचे वकीलपत्र घेणे आणि कमल संदेशने त्यांच्या विरोधात किल्ला लढविणे समजून घेता येणारे आहे.  ही लढाई मोदी विरुद्ध जोशी किंवा मोदी विरुद्ध अडवाणी अशी नाही. ती मोदी विरुद्ध संघ अशी आहे आणि ती संघाच्या वतीने लढविण्याचे काम संघ व भाजपाच्या दोन मुखपत्रांनी संयुक्तपणे व ठरवून चालविले आहे.

संघ आणि भाजप यांचा ज्यांना अजूनही वेगळा विचार करावासा वाटतो त्यांनी तो तसा करायला हरकत नाही. मात्र तसे करणारी माणसे स्वतःखेरीज कोणाचीही फसवणूक करीत नाहीत हे त्यांनी लक्षात घेतलेच पाहिजे. भाजपवर संघाचे नुसते नियंत्रणच नाही, विद्यार्थी परिषद आणि विश्व हिंदु परिषदेसारखे भाजपाचे राजकारणही संघच निश्चित करतो. जुना जनसंघ आणि आताचा भाजप हे संघाचेच राजकीय चेहरे आहेत.

भाजप बलशाली होणे व त्याच्या हातून देशाची सत्ता आपल्या ताब्यात आणणे हे संघाचे स्वप्न नाही, ती त्याच्या कार्याची दिशा आहे. (देवरसांच्या काळात संघाने राजकीय भूमिका उघडपणे घ्यायला सुरुवात केली. नंतरचे राजेंद्रसिंह व सुदर्शन हे राजकारणावर भाषणे देतानाच देशाला दिसले. संघाशी संबंध असलेल्यांच्या नेमणुका सरकार दरबारी करण्यात याव्या अशा मागण्या वाजपेयींकडे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात याच सरसंघचालकांच्या सहकाऱ्यांनी केल्या. आघाडीधर्माचे कारण पुढे करून त्या करायला वाजपेयींनी नकार दिला तेव्हा संघ वाजपेयींवर संतापला. वाजपेयींना नंतरच्या काळात अद्दल घडवायलाही मग त्याने कमी केले नाही. ‘काही झाले तरी स्वयंसेवक असण्याचा माझा अधिकार ते हिरावून घेऊ शकत नाहीत’ हे वाजपेयींनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात काढलेले हताश उद्‌गार तेव्हाचे आहेत.)

या दिशेने जाण्याच्या पहिल्या प्रयत्नात झालेल्या गफलतीचा संघाला पश्चात्ताप आहे. 1999 मध्ये वाजपेयी-अडवाणी यांचे भाजपप्रणीत राओला सरकार सत्तेवर आले आणि ते 2004 पर्यंत टिकले. वाजपेयी आणि अडवाणी हे दोघेही संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असले तरी त्यांच्या राजकारणावर ‘लोकशाही’ एवढ्याच आघाडीधर्माच्या मर्यादा होत्या. त्यातून वाजपेयींची भूमिका व चेहरा जास्तीच लोकाभिमुख होता. लोकाभिमुख राहण्याच्या भूमिकेपायी व आघाडीधर्माच्या गरजेपायी वाजपेयींना संघाच्या भगव्या मागण्या दरवेळी मान्य करता आल्या नाहीत.

परिणामी संघाने वाजपेयींवर राग धरला व नागपूरच्या संघस्थानावर त्यांचा अपमान करायलाही संघाच्या नेत्यांनी मागेपुढे पाहिले नाही. वाजपेयींच्या सौम्य व मध्यममार्गी राजकारणावर संघातील कर्मठांचा असलेला राग अजून मावळला नाही. त्यातून मोदी हे वाजपेयींहून जास्तीचे स्वतंत्रच नाही तर उदंड म्हणता येतील एवढे मोकळे व गृहीत न धरता येणारे पुढारी आहेत... वाजपेयींच्या वेळी केलेली चूक मोदींबाबत करण्याची संघाची तयारी नाही व तशी त्याची इच्छा नसणे स्वाभाविकही आहे... त्यामुळे मोदींच्या नावाची नुसतीच चर्चा करून व त्या नावाचे वादग्रस्त असणे अधोरेखित करून ऐन वेळी ‘सर्वसंमतीचा उमेदवार’ म्हणून आपला माणूस पुढे करायचा संघाचा इरादा आहे. 85 वर्षांच्या बलोपासनेनंतर त्याला तशा महत्त्वाकांक्षा स्फुरल्या असतील तर तो त्याचा दोषही नव्हे.

अडवाणींना पक्षाध्यक्षपदावरून पायउतार व्हायला लावण्याचे संघाचे राजकारण या संदर्भात पाहिले पाहिजे. वाजपेयी निवृत्त आहेत आणि 2014 मध्ये अडवाणी 87 वर्षांचे (म्हणजे सल्लागाराच्या वयाचे) व्हायचे आहेत. अरुण जेटलींना नागपुरात वजन नाही आणि सुषमा स्वराज यांना संघस्थानावर प्रवेश नाही. तशाही त्या मूळ समाजवादी पक्षातून फर्नांडिसांमार्फत भाजपामध्ये आल्या आहेत.

वसुंधराबार्इंचे पंख कापले आहेत आणि उमा भारतींच्या नावावर उत्तर प्रदेशचा पराभव आहे. (तशीही ती साध्वी संघशरण आहेच) रमणसिंहांना राष्ट्रीय चेहरा नाही आणि येदियुरप्पांनी त्यांचा चेहरा गमावला आहे. प्रमोद महाजन हयात नाहीत आणि मुंडे कोणाला चालत नाहीत. खंडुरी, पर्रीकर यांसारख्या बाल खेळाडूंचा विचारही एवढ्यात व्हायचा नाही. या चर्चेत शहानवाज किंवा नकवी हे बसणारेही नाहीत हे साऱ्यांना सहज समजावे.

‘मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही’ असे गडकरी स्वतः म्हणाले असले तरी त्या पदाचा प्रत्येकच दावेदार आजवर तसे म्हणत आला आहे. (ते पद वाट्याला येऊनही सोडण्याची तयारी एकट्या सोनिया गांधींनाच गेल्या 70 वर्षांत दाखविता आली आहे) गडकरी नागपूरचे आहेत आणि संघाच्या महालस्थित कार्यालयाजवळचे आहेत. संघनेत्यांचा विश्वासू कार्यकर्ता अशीच त्यांची प्रतिमाही आहे... भाजपाचे अध्यक्षपद त्यांच्या वाट्याला येण्याच्या काही महिने अगोदर ‘तो आमचा उद्याचा नेता असल्याची’ चर्चा संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने मला बोलून दाखविली होती हेही येथे नमूद करण्याजोगे.

मग आताचा मोदी-जोशी वाद कशासाठी? मोदी अडवाणींनाही नकोत आणि जोशी हे मोदींहून संघनेत्यांच्या अधिक जवळचे आहेत. जोशींचे नाव मोठ्या पदाच्या शर्यतीत नाही. त्या शर्यतीत मोदींचेच नाव महत्त्वाचे आहे आणि ते बाजूला सारायचे तर त्याचे वादग्रस्तपण अधोरेखित करणे गरजेचे आहे...

मोदींना अमेरिकेचा व्हिसा नाही आणि युरोपात त्यांना येऊ दिले जात नाही. मोदींनी आपल्या राज्यात येऊ नये हे बिहारच्या नीतिशकुमारांनी त्यांना या आधी ऐकविले आहे आणि ओडिशाच्या नवीन पटनायकांनीही त्यांच्यावर प्रवेशबंदी लादली आहे. हे दोन्ही मुख्यमंत्री अजून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहेत हे येथे उल्लेखनीय. मोदींना नाकारणाऱ्यांची यादी येथे संपतही नाही. एके काळी रालोआत असलेल्या चंद्राबाबूंच्या तेलगु देसम्‌ला आणि पासवानांच्या जनता दलालाही त्यांची ॲलर्जी आहे. म्हणून आता त्यांना वाजपेयींनी 2002 च्या गुजरातेतील धार्मिक कत्तलीनंतर शिकविलेला ‘राजधर्म’ ऐकविला जातो.

वाजपेयींच्या कविता प्रकाशित करून मोदींचे अहंन्यपण वाढीव करून उजेडात आणले जाते. अडवाणी-मोदी तणावही मग प्रकाशात येतो. त्यासाठी अडवाणींची अलीकडची रथयात्रा गुजरातेतून काढू द्यायला मोदींनी दिलेला नकार पुढे केला जातो. मोदींची अशी कोंडी करण्याचे राजकारण येथेच थांबत नाही. या वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेची निवडणूक व्हायची आहे. ती आपण सहज जिंकू शकू अशी ठाम खात्री असलेल्या मोदींच्या विरोधात केशूभाई पटेल या गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांना मैदानात उतरविण्याचे राजकारण भाजपच्याच एका गटाने सुरू केले आहे.

केशूभाईंचे वय 82 वर्षांचे आहे. 1996 ते 2001 या काळात ते त्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर भाजपाचे नेते म्हणून निवडले गेले आहेत. मोदींनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे त्यांच्याच हातून घेतलीही आहेत. अलीकडेच झालेल्या दोन विराट सभांमध्ये केशूभार्इंनी मोदींवर जबर हल्ला चढविला आहे. त्यांचे राज्य पुढाऱ्यांचे नसून पेंढाऱ्यांचे व लुटारूंचे आहे अशी टीका केशूभार्इंनी केली आहे. तेवढ्यावर न थांबता गुजरातच्या आजच्या सरकारात कोणताही वर्ग सुरक्षित नाही असेही ते म्हणाले आहेत. केशूभार्इंच्या अशा एका सभेला 9 लाख लोक उपस्थित होते ही बाबही येथे लक्षात घ्यावी अशी आहे.

तात्पर्य, मोदींविरुद्ध सारे लोकशाही जग एकवटले आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अनेक पक्षांना ते न चालणारे आहेत आणि आता संघ व भाजपाच्या नव्या नेतृत्वाने त्यांचा कोंडमारा करून त्यांना एकाकी पाडण्याचे राजकारण उभे केले आहे. त्यासाठी त्यांच्याच राज्यात त्यांच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे काम केशूभाई या जास्तीच्या संघनिष्ठ नेत्याकडे सोपविण्यात आले आहे.

एका बाजूला मोदींना आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांना संपविण्याचे राजकारण करायचे यातील राजकारण कोणत्याही सामान्य माणसाला समजावे असे आहे. हे मोदींचे समर्थन नाही. मोदींचे राजकारण व शस्त्राचारी धर्मकारण तसे समर्थनीयही नाही... त्यांच्या नावावर राजकारणाचा वाद उभा करून ऐनवेळी गडकरींचे नाव समोर करण्याचा संघाचा खटाटोप स्पष्ट करण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे...

शिवाय संघाचा शब्द आमच्या पक्षाला शिरसावंद्य आहे असे म्हणायला मुरली मनोहरांसारखी वयोवृद्ध व अनुभवसमृद्ध माणसे भाजपात हारीने आहेत...प्रसिद्धीमाध्यमांनी मोदी-जोशी वाद नको तेवढा रंगवून सांगण्याचा चालविलेला सध्याचा प्रयत्न मग कोणाच्या फसवणुकीसाठी आहे?

Tags: सुरेश द्वादशीवार सेंटर पेज भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी मुरली मनोहर जोशी पंतप्रधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ center page suresh dwadshiwar Prime minister Rashtriya Swayamsevak Sangh Bharatiya Janata Party Narendra Modi Murali Manohar Joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात