डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

1960 मधील अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केनेडींकडून निक्सन पराभूत झाले तेव्हाची निक्सन यांची प्रतिक्रिया ‘त्यांचा राजकीय विजय झाला असला तरी आमचा नैतिक विजय झाला आहे’ अशी होती. त्यावरचे केनेडींचे भाष्य ‘तुमच्या वाट्याला नेहमी असेच नैतिक विजय येवोत’ हे होते...  आपल्या समाजवाद्यांनाही राजकीय विजयाहून नैतिक विजयाने होणारा आनंद मोठा वाटत आला आहे. त्यांच्याजवळ राजकीय विजय थोडे आणि नैतिक विजय फार आहेत. तशा विजयांनी त्यांना राजकारणातून बाद केले. परिणामी तो वाद उरला तरी तो लढविणारी माणसे राहिली नाहीत. आज तसेही त्याचे उत्तरायण झाले आहे. पक्षाची कार्यालये कुठे नाहीत, कार्यकर्ते उरले नाहीत आणि कामगारांच्या संघटनांनीही इतरांचे झेंडे खांद्यावर घेतले आहेत.

1935 ते 65 या काळात समाजवादी पक्षाने ‘काँग्रेसला पर्याय ठरू शकणारा पक्ष’ अशी आपली प्रतिमा उभी केली. जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, आ. नरेंद्र देव, रावसाहेब आणि अच्युतराव हे पटवर्धन बंधू यांच्यासारखे राष्ट्रीय स्तरावरील नेते, मध्याच्या डाव्या बाजूला असलेले व हमखास लोकप्रिय होणारे तत्त्वचिंतन आणि नेते व संघटना यांच्यामागे उभे असलेले स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाचे तेजस्वी वलय यांसारख्या अनुकूल बाबी सोबत होत्या.

कामगार चळवळीतले संघटन जबर असल्याने त्याला दीर्घकालीन स्थैर्य व राष्ट्रीय मान्यता लाभण्याच्या शक्यताही मोठ्या होत्या. महाराष्ट्रापासून आसामपर्यंत व पंजाबपासून केरळपर्यंत संघटना उभी होती आणि तिचा वैचारिक दराराही मोठा होता. पं. नेहरूंशी पक्षाच्या नेत्यांचे संबंध रागलोभाचे असले तरी त्यात आत्मीयतेचा अंश अधिक होता... परंतु करंटेपणा हा व्यक्तींएवढाच काहीसा संघटनांचाही गुण असावा. आपले सद्‌गुणच आपल्यावर उलटावे आणि आपल्या चांगुलपणाचेच ओझे होत जावे तसे काहीसे या पक्षाचे झाले.

‘नीती’ हे मूल्य मोठे आणि सनातन असले तरी त्याचीही एक अहंता असते आणि ती संबंधितांना खूपदा समाजापासून तोडत नेणारी व एकाकी बनविणारी असते. समाजवाद्यांच्या करंटेपणाचे स्वरूप असे होते. त्यांच्या आजच्या अज्ञातवासाचे कारणही तेच आहे. ‘समाजवादी दाखवा आणि....’ अशा पाट्या राजकारणात लावाव्या लागाव्या अशी एकेकाळच्या त्या थोर पक्षाची आताची स्थिती दयनीयच नाही, शोक करावी अशी आहे.  1960 च्या दशकात हा पक्ष सोडून जयप्रकाश विनोबांसोबत तर पटवर्धन बंधू जे. कृष्णमूर्तींसोबत गेले. नरेंद्र देवांना 52 च्या पराभवाने राजकीय विचारवंत बनविले तर लोहियांना त्यांच्या फटकळपणाने कधी संघटनकुशल होऊ दिले नाही. प्रथम कम्युनिस्ट पुढे गेले, नंतर जनसंघाने त्यांना मागे टाकले आणि पुढे तर प्रादेशिक पक्षांनीही त्यांच्यावर मात करायला सुरुवात केली... आताचे मुलायमसिंग किंवा लालूप्रसाद हे स्वतःला समाजवादी म्हणवितात, पण त्यांचे समाजवादी असणे समाजवाद्यांनाच मान्य होण्याची शक्यता फारशी नाही.

राजकारणात विचारसरणी महत्त्वाची असतेच. पण ती माणसांच्या आधाराने उभी होते. तशी होत असताना ती माणसांचे गुणधर्मही घेत असते. परिणामी विस्तारणाऱ्या संघटनेचे स्वरूप एकात्म वा एकसंध उरण्याची शक्यता कमी असते. (तशा संघटना फक्त हुकूमशाहीत वा हुकूमशाहीसदृश एकचालकानुवर्ती व्यवस्थांमध्येच उभ्या राहतात) हा विस्तार त्यातल्या विविधांगी स्वरूपानिशी स्वीकारायला एक मोकळे व तेवढेच विकेंद्रित मन लागते. ते ज्या संघटनांना विकसित करता येत नाही त्या आजच्या कम्युनिस्टांएवढ्या त्यांच्या कुंपणात राहतात वा समाजवाद्यांसारख्या झिजत जाऊन नामशेष होतात.

जनसंघाचा भारतीय जनता पक्ष झाला तेव्हा त्याने आपली विचारसरणीच नाही तर राजकारणही पातळ करून घेतले. वाजपेयी संघाचे स्वयंसेवक असण्याहून नेहरूंचे वारसदार अधिक होते आणि त्यांचे तसे असणे संघातील कर्मठांना आवडणारे नव्हते हे येथे लक्षात घेण्याजोगे. याउलट तत्त्वचिंतनात कानामात्रेचा बदलही खपवून घेणार नाही अशी भूमिका घेणारे पक्ष व संघटना होत्या तेवढ्याच राहिल्या व संकोचत जाऊन इतिहासजमा झाल्या.

धर्मव्यवहारातले असे उदाहरण द्यायचे तर ते साऱ्यांना पोटात घेऊन वाढत गेलेल्या वारकरी संप्रदायाचे आणि कायम मर्यादित राहिलेल्या दत्तसंप्रदायाचे देता येईल... अब्दुल रहमान अंतुले जेव्हा संघाला अरबी समुद्रात बुडवायला निघाले होते तेव्हा त्या अचाटपणाचा ‘अब्दुलभाई, तुम्हारा चुक्याच’ असा आपल्या खास शैलीत गौरव करताना पु.ल.नी लिहिले. ‘एकदा संघाला बुडवून झाले की मग समाजवाद्यांना बुडविण्याचा कार्यक्रम हाती घेता येईल. त्याला समुद्र नको. त्यासाठी आपला तानसा तलावही पुरे..’

राजकारणातली प्रत्येक कृती सत्तेजवळ वा सत्तेवर जाण्यासाठी आणि हाती आलेली सत्ता  राखण्यासाठी आखायची असते. त्याचवेळी आपण सत्तेबाबत निरिच्छ आहोत हे भासवायचेही असते. वर हे निरिच्छपण ‘दाखविण्यासाठी’ आहे हे संबंधिताला चांगले ठाऊकही असावे लागते.

सत्ता ही तिरस्करणीय बाब नाही, समाजात हवे ते बदल घडवून आणण्याचे ते साधन आहे व ते आपल्या ताब्यात ठेवणे हे प्रत्येकच राजकारणी माणसाचे ध्येय असणे त्याचमुळे भाग आहे. समाजवाद्यांनी सत्तेविषयीचा निरिच्छपणा नुसता दाखविलाच नाही तर ती तिरस्करणीय असावी अशाच तऱ्हेचे राजकारण त्यांनी केले. आपण उचलत असलेले प्रत्येक पाऊल आपल्याला सत्तेपासून दूर ठेवणारे किंवा सत्तेवरून खाली उतरविणारेच असेल असा त्यांचा प्रयत्न राहिला.

1952 च्या निवडणुकीत त्या पक्षाचे अल्पमतातील सरकार केरळात पट्टम थाणु पिल्ले यांच्या नेतृत्वात सत्तेत आले. पण सत्तेवर टिकून राहण्यापेक्षा आपण ती कधी सोडतो याचीच काळजी त्याने अधिक घेतली. पुढे एका गोळीबाराचे निमित्त करून व त्याची नैतिक जबाबदारी स्वतःकडे घेऊन त्याने राजीनामा दिला. अशोक मेहता या समाजवादी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नियोजन मंत्र्याने रुपयाचे पहिले अवमूल्यन करून इतिहास घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

‘जातीय त्रिकोण’ हे भाबडे पुस्तक लिहिणाऱ्या या अर्थतज्ज्ञाने 1966 च्या जून महिन्यात अवमूल्यनाचा हा निर्णय घेतला तेव्हा भारतासारख्या कृषिप्रधान देशात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर केलेले अवमूल्यन देशाच्या अर्थव्यवस्थेवर केवढा विपरीत परिणाम करील याचे चित्र अर्थतज्ज्ञांनी देशासमोर रंगविले.त्या निर्णयाने मेहतांएवढीच त्यांची समाजवादी दृष्टीही साऱ्यांच्या चेष्टेचा विषय बनली.

पुढल्या काळात ‘समाजवादी’ चंद्रशेखरांनी त्यांच्या औट घटकेच्या पंतप्रधानकीच्या काळात देशाचे सोने गहाण टाकण्याचा निर्णय घेतला तेव्हा एका रात्रीतून त्यांची लोकप्रियता शून्यावर आली. मोरारजी सरकारच्या काळात फर्नांडिसांसारखे नेते मंत्रिपदावर असतानाही विरोधी नेत्यांसारखेच कसे वागले याची नोंद येथे वेगळी करण्याची गरज नाही. दरदिवशी एक नवे सरकारविरोधी पत्रक वा वक्तव्य काढण्यात ही माणसे गर्क होती...

तात्पर्य, सत्तेबाहेर राहण्याची प्रतिज्ञा केलेले राजकारणी अशीच समाजवाद्यांची प्रतिमा तयार झाली. संयुक्त समाजवादी व प्रजा समाजवादी अशी त्याची दोन शकले पुण्यात झाली तेव्हा त्या दोन्हींचे राष्ट्रीय अध्यक्ष पुणे म्युनिसिपालिटीच्या राजकारणात लक्ष घालताना दिसले...1960 मधील अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केनेडींकडून निक्सन पराभूत झाले तेव्हाची निक्सन यांची प्रतिक्रिया ‘त्यांचा राजकीय विजय झाला असला तरी आमचा नैतिक विजय झाला आहे’ अशी होती.

त्यावरचे केनेडींचे भाष्य ‘तुमच्या वाट्याला नेहमी असेच नैतिक विजय येवोत’ हे होते... आपल्या समाजवाद्यांनाही राजकीय विजयाहून नैतिक विजयाने होणारा आनंद मोठा वाटत आला आहे. त्यांच्याजवळ राजकीय विजय थोडे आणि नैतिक विजय फार आहेत. तशा विजयांनी त्यांना राजकारणातून बाद केले. परिणामी तो वाद उरला तरी तो लढविणारी माणसे राहिली नाहीत. आज तसेही त्याचे उत्तरायण झाले आहे. पक्षाची कार्यालये कुठे नाहीत, कार्यकर्ते उरले नाहीत आणि कामगारांच्या संघटनांनीही इतरांचे झेंडे खांद्यावर घेतले आहेत.

मूळ समाजवादी असलेल्या काही उत्साही तरुणांनी 1960 च्या दशकात त्यांच्या संघटना स्वतंत्रपणे उभ्या केल्या. युक्रांद ही त्यातली. राष्ट्रसेवादलाच्या शाखाही काही जागी स्थापन केल्या. मराठवाड्याच्या गावखेड्यांत समाजवादी कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या शाळा व कॉलेजे अजून तग धरून आहेत. पण मूळ संघटनाच जेव्हा गळाठली आणि ती राष्ट्रीय ते प्रादेशिक व पुढे स्थानिक अशी बारीक व क्षीण होत गेली तेव्हा त्या संघटनाही कोमेजल्या.

त्यातच पुणेकर समाजवाद्यांनी मराठवाड्यातल्या साथींना कमी लेखण्याचे व हैदराबादच्या मुक्तिलढ्यातील त्यागाएवढाच त्यांचा अनुभव व अभ्यासही आपल्या पुस्तकी कसोट्यांवर चुकीचा ठरविण्याचे राजकारण केले. विदर्भात ते तसेही कमी होते आणि होते त्यांना उद्धरण्याचीच भूमिका पुणेकरांनी घेतल्याने तेथेही तो पक्ष वाढला नाही. अखेर पुण्यात संपले तेव्हा ते राज्यात संपले आणि देशातही दिसेनासे झाले. परिणामी वाद राहिला, त्यावर निष्ठा ठेवणारी काही मोजकी माणसे राहिली, त्यांच्यासोबत समाज मात्र उरला नाही.

समाजवादाचा विचार आजही देशातील 40 टक्क्यांएवढ्या लोकांना त्यांचा वाटणारा आहे. वंचितांचे व अन्यायग्रस्तांचे वर्ग तो आपला मानणारे आहेत. आजचे अनेक पक्ष त्यांच्या मूळच्या डाव्या भूमिकांपासून दूर गेले आहेत. खुली अर्थव्यवस्था असे जिचे गोंडस वर्णन केले जाते ती मुळात भांडवलशाही आहे आणि तिचे देशात स्वागत करायला एकेकाळी स्वतःला समाजवादी म्हणविणारा काँग्रेस पक्ष पुढे झाला आहे.

संघ, जनसंघ वा भाजप यांचा या संदर्भात विचार करण्याचे कारण पूर्वी नव्हते आणि आजही नाही. उरलेल्या प्रादेशिक पक्षांचे खरे स्वरूप एक तर जातींचे वा भाषेचे आहे. शिवाय त्यांना प्रादेशिक मर्यादाही आहेत. महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस हे जसे याचे उदाहरण तसेच ते रिपब्लिकन पक्षाबाबतही खरे आहे. सबब कष्टकरी माणसांना राष्ट्रीय पातळीवर आपला वाटावा असा एकही पक्ष आज देशात नाही. नाइलाजाने मतदान करणाऱ्यांची संख्या त्याचमुळे देशात मोठी आहे व मते विकणाऱ्यांचे समर्थनही यात शोधता येणारे आहे. 

ग्रीक पुराणात फिनिक्स पक्षाची गोष्ट आहे. तो राखेतून पुन्हा जन्म घ्यायचा आणि उंच आकाशात झेप घ्यायचा. समाजवाद्यांजवळ विचारांचे बळ आहे. त्या बळावर ते फिनिक्ससारखे पुन्हा उडताना दिसतात की फिनिक्सच्या दंतकथेसारखे तेही एक दंतकथा म्हणूनच आपल्या स्मरणात राहतात हे यापुढे पाहायचे आहे.

Tags: सेंटर पेज सुरेश द्वादशीवार भांडवलशाही खुली अर्थव्यवस्था समाजवादी कष्टकरी माणसे center page suresh dwadshiwar values moral victory capitalism open economy socialist weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात