डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मधु लिमये यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने चिंतन

1 मे हा जागतिक कामगार दिवस आणि याच दिवशी समाजवादी पक्षाचे नेते मधू लिमये यांच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत व नानासाहेब गोरे यांच्या निधनाला एकोणतीस वर्षे. दोन्ही समाजवादी नेते आपल्या सार्वजनिक व राजकीय जीवनात साधनशुचिता, साधेपणाने जीवन जगणारे व विलक्षण प्रतिभा आणि व्यासंगी म्हणून ख्यातनाम होते. ते आयुष्यभर समाजवादी चळवळीचे शिलेदार म्हणून जगले. पण ज्या चळवळीसाठी दोघांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले होते ती चळवळ आज काय स्थितीत आहे, याचा धांडोळा या दोन्ही समाजवादी नेत्यांच्या जन्म व मृत्युदिवसाच्या निमित्ताने घ्यायला हवा. त्यामुळे या विषयावर माझा हा लेख बेतलेला आहे. 

महात्मा गांधीजींच्या नंतर भारतीय सामाजिक, राजकीय जीवनात समाजवादी म्हणून ओळखले जाणारे लोक अत्यंत कसदार, बुद्धिमत्ता असलेले व बहुसंख्य निष्ठावानही होते. अजून समाजवादी पक्षाच्या स्थापनेला नव्वद वर्षेपण झाली नाहीत. परंतु समाजवादी पक्षाचा भारतीय समाजमनावर म्हणावा तसा परिणाम झालेला दिसत नाही. याची काय कारणे असतील? हा प्रश्न वेळोवेळी माझ्या मनात येत असतोच.

आज माझ्या आवडत्या दोन नेत्यांच्या जन्म व मृत्युदिनानिमित्ताने अंतर्मुख होऊन विचार करत असताना, आणीबाणीच्या काळात मुख्यतः विदर्भातील प्रवासात एस. एम. जोशी व नानासाहेब गोरे यांच्या सोबत बऱ्याच मनमोकळ्या गप्पा करायला संधी मिळाली. त्यात अमरावती जिल्ह्यातील एका खेड्यात एक गृहस्थ नानासाहेबांच्या पाया पडून म्हणाले, ‘‘मी समाजवादी पक्षाच्या स्थापनेपासून पक्षात आहे. आणीबाणीच्या काळात माझ्या एवढ्याशा लहान गावात आपण व एस. एम. जोशी यांनी भेट दिली.’’ मग सद्गगदित ते होऊन रडायला लागले.

योगायोगाने तेव्हा समाजवादी पक्ष एक झाला होता. बडोदा डायनामाइट केसमध्ये जॉर्ज फर्नांडिस हे अध्यक्षस्थानी होते. पण तुरुंगात होते.

नानासाहेबांच्या रात्रीच्या मुक्कामाची सोय अमरावती येथील श्रीमती दुर्गाताई जोग (रावसाहेब - अच्युतराव पटवर्धन यांच्या मावशी) यांच्या घरी केलेली होती. तेथे आल्यावर ते मला म्हणाले ‘‘सुरेश, समाजवादी पक्षाचे नुकसान व फाटाफुटीचे राजकारण आम्ही नेत्यांनी केले आहे. पण देशभरात जागोजागी आज जसे ते गृहस्थ पाया पडून गहीवरून बोलत होते, असे अनेक लोक देशभरात आहेत. भारतीय हिंदू पत्नीला तिचा नवरा दारू पिऊन लाथा-बुक्क्यांचा मार देऊन, शिव्यांची लाखोली वाहूनदेखील ती बाई वटसावित्रीच्या दिवशी पुढचे सात जन्म हाच नवरा दे म्हणून वर मागते. तसेच आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. पक्षाचे विभाजन आम्ही नेत्यांनी केले आहे. देशभरातील पक्षाचे कार्यकर्ते मात्र समाजवादी म्हणून आम्हांला तेवढाच आदर देतात. म्हणून समाजवादी पक्ष जिवंत राहणार असेल तर या अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांच्या भरवशावरच राहणार आहे. आमच्यासारख्या नेत्यांमुळे नाही.’’

आज नानासाहेबांच्या एकोणतिसाव्या पुण्यस्मरण दिवसाच्या निमित्ताने मला शेहेचाळीस वर्षांपूर्वीचा तो प्रसंग डोळ्यांसमोर येण्याचे मुख्य कारण म्हणजे, समाजवादी पक्षाचे आज जे स्वरूप आहे, त्याबद्दल धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणे. खरे पाहता आज समाजवादी पक्ष आहे का? ही फार मोठी शोकांतिका आहे.

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीमध्येदेखील सर्वसामान्य लोकांच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाहीये. उलट आताच्या काळात तथाकथित विकासयोजनांमुळे काही कोटी लोक विस्थापित झाले असून त्यात भारतीय लोकसंख्येच्या तुलनेत फक्त साडेआठ ते नऊ टक्के आदिवासींचे विस्थापन सरासरी 75टक्के आहे. तीच कथा शेतकऱ्यांची आहे. शेतकरीवर्गाला आत्महत्या करण्याची पाळी येणे हे आपल्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीमध्ये सगळ्यांत मोठे अपयश आहे. जवळपास पाच लाख शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. यातील अर्धे शेतकरी महाराष्ट्र राज्यातील विदर्भातील आहेत.

कोरोना या नवीनच नावाच्या रोगाने आपल्या देशाच्या स्वास्थ्यसेवेची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली गेली आहेत. तसेच शिक्षण हे जवळपास खाजगी क्षेत्रात जात आहे. खरे तर ही सगळी कल्याणकारी कामे सरकारने करावयाची असताना सरकार जवळपास प्रत्येक जबाबदारीमधून आपले अंग काढून खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देत आहे. रेल्वे, विमान, जहाजे, रस्ते स्टीलचे, नफ्यात चालत असलेले कारखाने व सगळ्यांत संवेदनशील विषय स्वरंक्षण उद्योग. या क्षेत्रात नुसते खाजगी लोक नाहीत तर विदेशी गुंतवणूक करायला मोकळे करून देशाच्या रक्षणासाठी धोका निर्माण करणारी केवढी मोठी गोष्ट आहे. आणि हे सगळे देशभक्तीचा मंत्र जपत सुरू आहे.

काल जागतिक मजदूर दिवस होता. ज्या मजुरांच्या कैक वर्षे केलेल्या आंदोलनामुळे त्यांना काही सवलती देण्यात आल्या होत्या त्या वर्तमान सरकारने जवळपास सर्वच संपवून खाजगी मालकांच्या सोयीसाठी बहुसंख्य मजूरवर्गाला एवढ्या प्रदीर्घ काळ केलेल्या लढाईमुळे मिळालेल्या सर्व सवलती रद्द करण्यात येत आहेत. दलित, महिला यांच्या अत्याचारात होत असलेली वाढ व सर्वांत गंभीर आव्हान अल्पसंख्याक समुदायांना सतत भीतीच्या मानसिकतेमध्येे राहायला भाग पाडणे, एवढे सगळे मुद्दे अजूबाजूला असताना त्या विरोधात संघर्ष करण्याची गरज असताना समाजवादी पक्षाचे अस्तित्व नसणे केवढी मोठी नामुष्कीची गोष्ट आहे.

विधिवत पक्षाची स्थापना 1933-34 मध्ये नाशिक तुरुंगात झाली अशी एक माहिती आहे. दुसरी माहिती पाटण्याला अंजुमन इस्लामिया हॉलमध्ये. नाशिकनंतर एक वर्षांनंतर 1934 मध्ये समाजवादी पक्षाच्या स्थापनेचा दिवस आहे. आणि हे सगळे काँग्रेसमध्ये राहून सुरू होते. वास्तविक 29 जुलै 1901 रोजी अमेरिकेत सोशालिस्ट पार्टीच्या स्थापनेचापण इतिहासात दाखला आहे. म्हणजे जयप्रकाश नारायण यांच्या जन्माच्या एक वर्ष आधीच. नंतर त्याच अमेरिकेत शिक्षणासाठी 1922-1929 अशी सात वर्षे जयप्रकाश नारायण अमेरिकास्थित आपले शिक्षण घेत असताना कुठल्या अमेरिकन सोशालिस्ट सोबत परिचित झाले, माहीत नाही. पण त्यांच्या एका पोलंडच्या मित्राकडून मार्क्सवादी साहित्य घेऊन, ते भारतात येण्याअगोदर मार्क्सवादी होऊन परत आले अशी माहिती आहे. तसेच दुसरे नेते डॉ. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण आपले अमेरिकेतील शिक्षण संपल्यावर भारतात आले होते. नेमक्या त्याच वेळी डॉ. राम मनोहर लोहिया जर्मनीमध्ये आपल्या शिक्षणासाठी गेले, 29 व 30 जानेवारी 1933 ला हिटलरची जर्मन चान्सलरपदी निवड झाल्यावर. दोन महिन्यांनंतर आपले शिक्षण संपल्यावर ते भारतात परत आले.

 आणखी एक योगायोग म्हणजे डॉ. लोहिया यांनी आपला (Salt Taxation in India)  हा प्रबंध हिटलर चान्सलर होण्याच्या फक्त सहा दिवस आधी म्हणजे 24 जानेवारी 1933 रोजी मार्गदर्शन (Gaid)  करणाऱ्यांना सोपवून ते मार्च 1933 मध्ये जर्मनी सोडून भारतात परत आले. 

वास्तविक इतर विद्यार्थ्यांप्रमाणे लोहियादेखील इंग्लंडला शिक्षणासाठी गेले होते. पण तेथील वर्णद्वेषी वातावरण पाहता त्यांनी इंग्लंडऐवजी जर्मनीत जायचे ठरवले. इकडे भारतात दांडी मार्च सुरू होणार होता, तर प्रत्यक्ष जर्मनीमध्ये पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या झालेल्या नामुष्कीनंतर हिटलरद्वारा नाझी पक्षाची स्थापना 1920 मध्ये करण्यात आली होती. हिटलरने एका वर्षात या पक्षावर आपली पकड मजबूत केली होती आणि दहा वर्षांत तो जर्मनीच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचला होता. नेमका त्याचा चढता आलेख डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या डोळ्यांसमोर होता.

नाझीवादाबद्दल आपले मत व्यक्त करून पीएचडीची डिग्री घेऊन लोहिया भारतात परतले. म्हणजे समाजवादी पक्षाचे दोन्ही महत्त्वाचे नेते प्रथम आणि द्वितीय विश्वयुद्धाच्या मधल्या काळात अमेरिका व जर्मनीमधून आपले शिक्षण संपवून परत आले होते. दोघांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी तेथील परिस्थिती जवळून बघितली होती.

भारतात महात्मा गांधीजींच्या दांडी सत्याग्रह व त्यानंतर देशात सुरू असलेल्या घडामोडींच्या काळात दोन्ही नेत्यांनी भारतात पाऊल ठेवले. या तुलनेत आचार्य नरेंद्र देव हे दोघांपेक्षा वरिष्ठ होते (31 ऑक्टोबर 1889 जन्म व मृत्यू 19 फेब्रुवारी 1956) ते एकूण 67 वर्षे जगले. डॉ. राम मनोहर लोहिया (23 मार्च 1910 जन्म व मृत्यू 12 ऑक्टोबर 1967) सत्तावन्न वर्षाचे एकूण आयुष्य जगले. जयप्रकाश नारायण (11 ऑक्टोबर 1902 जन्म - मृत्यू 8 ऑक्टोबर 1979) यांच्या वाट्याला एकूण 77 वर्षांचे आयुष्य आले. म्हणजे तीनही नेत्यांमध्ये जेपींच्या वाट्याला लोहियांपेक्षा वीस वर्षे जास्त व आचार्य नरेंद्र देवांपेक्षा दहा वर्षे जास्त आयुष्य आले होते.

जेपींच्या सत्याहत्तर वर्षांच्या आयुष्यात बरेच उतार- चढाव आहेत. ते 1934 मध्ये समाजवादी पक्षाचे महासचिव तर 1954 मध्ये सर्वोदय लोकसेवक झाले. माझे व्यक्तिगत मत आहे की, जयप्रकाश नारायण आणि जवाहरलाल नेहरू यांच्यातील व्यक्तिगत मैत्रीमुळे डॉ. राम मनोहर लोहिया यांनी अत्यंत असभ्य भाषेत जेपींवर आरोप केले. त्यांच्या हेतूंबद्दल शंका व्यक्त केल्यामुळे जयप्रकाश नारायण अत्यंत दुखावले गेले. अनायासे 1951 पासून आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती व त्या चळवळीला मिळत असलेले यश हे समाजवादी पक्षाच्या वा कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने चालत असलेल्या ‘कसेल त्याची जमीन’ या ‘जबरन जोत’ आंदोलनापेक्षा जास्त असल्याचे पाहून जयप्रकाश नारायण प्रभावित झाले. कारण विनोबांच्या भूदान आंदोलनात कुठल्याही प्रकारची जोरजबरदस्ती नव्हती. सर्व काही प्रेम आणि आपापसांतील सामंजस्यपूर्ण वातावरणात जवळपास पन्नास लाख एकर जमीन मिळणे हा जगातला एकमेव चमत्कार आहे.

एरवी महाभारतकालीन दुर्योधनाच्या विधानाप्रमाणे सुईच्या भोकाएवढीपण जमीन देण्यास तयार नाही म्हणून आपल्या देशात बहुसंख्य कोर्टात चालू असलेल्या केसेस हे कशाचे द्योतक आहे? म्हणून जयप्रकाश नारायण यांनी सर्वोदयाची कास धरली.

आचार्य नरेंद्र देव देशाच्या स्वातंत्र्याच्या दहा वर्षांच्या आत (1956) गेलेे. उरलेल्या नेत्यांमध्ये डॉ. राम मनोहर लोहिया यांनी समाजवादी पक्षासाठी जिवापाड मेहनत घेतली. खुप कल्पक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर ‘अगडे-पिछडे’ जातीचा थिसिस ‘सौ में पावे पिछड़ा साठ.’सारखी अत्यंत महत्त्वाची घोषणा देत उत्तर भारतात या मुद्द्यावर बरेच प्रयत्न केले. (त्यांच्यामुळेच कर्पूरी ठाकूर, मुलायमसिंह, लालू प्रसाद यादव, रामविलास पासवान यांच्या सारखे नेते या ‘अगडे-पिछडे’ सिद्धान्ताचे प्रॉडक्ट आहेत.)

आणि महत्त्वाचे म्हणजे ‘पिछड्या’ (मराठीत मागास वर्गीय) जातीतल्या सायकल रिक्षा चालक लोकांना मी सत्तरच्या दशकात नजरेशी नजर न मिळवताना व ‘हुजूर मायबाप सरकार’ म्हणत कमरेपासून लवून नमस्कार करतांना पाहिले आहे. हातात जे पैसे दिले ते कुठल्याही प्रकारची खळखळ न करता घेऊन जात असताना पाहिले आहे.

आता रिक्षात बसण्याच्या आधी डोळ्यांत डोळे घालून ‘साहब कहां जाना है? इतना भाड़ा देना होगा।’ आणि उतरल्यावर जर का थोडे कमी दिले तर तो हुज्जत करून आपले ठरलेले भाडे वसूल केल्यानंतरच जाऊ देतो. हा आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांना दोनशे वर्षे लागली. ‘अगडे-पिछड़े’ या मुद्द्यावर उत्तर भारतात आज इतर मुद्दे आहेत, पण आत्मविश्वास वाढला आहे हे वास्तव आहे. यात समाजवादी, बीएसपीचेही फार मोठे योगदान आहे. पण समाजवादी व बीएसपीच्या वा समस्त आंबेडकरी चळवळीतील अनुयायांच्या अवसरवादी धोरणांमुळे आज हा वर्ग हिंदुत्ववादींचा ‘हरावल दस्ता’ म्हणून काम करत असलेला पाहून परिवर्तन एका वर्तुळात फिरत आहे. यात सगळ्यांत कळीचा मुद्दा ‘ब्राह्मण-गैरब्राह्मण’ या वादावर पुनर्विचार करावा असे कुणाला वाटत नाही. कारण महात्मा फुले यांच्या काळात नुकतीच पेशवाई संपत आली होती पण पीळ कायम होता. म्हणूनच फुले ब्राह्मण्याचे टीकाकर झाले व त्याही काळात त्यांच्या सोबत काही ब्राह्मण सहकारी होते. तीच गोष्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची. जेधे,‐जवळकर या सत्यशोधक जोडीने त्यांना ‘‘तुमच्या सोबतचे ब्राह्मण बाजूला कराल तर आम्ही तुम्हांला साथ द्यायला तयार आहोत.’’ असे सांगतले. बाबासाहेबांनी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, मी ब्राह्मण्याचा विरोधक आहे. ब्राह्मणांचा नाही. आणि माझ्या सोबत बरेच ब्राह्मण सहकारी आहेत आणि मी त्यांना काढून तुमची मदत घेणार नाही. बहुतेक अशा तऱ्हेने जातीच्या प्रश्नावर आज जाती-निर्मूलनाचे काम करत असलेल्या लोकांना नरेंद्र मोदी तेली जातीचा आहे, तर बऱ्याच लोकांना समर्थन करताना पाहिले आहे. तीच कथा दलित वा अल्पसंख्याकांची. या समाजाच्या लोकांवर आक्रमण करण्यात ओबीसी जातीचे लोक - मग भागलपूर असो की गुजरातमध्ये झालेल्या दंगली - बहुसंख्येने ओबीसी सामील झाले आहेत. वुलगढी, खैरलांजी, सहरानपूर, मुजफ्फरनगर, खर्डा, भीमा कोरेगाव येथील दंगलीमध्ये मी स्वतः जातीने चौकशी करून हा मजकूर लिहीत आहे व खैरलांजी, भीमा कोरेगाव या घटनांपासून ब्राह्मणविरोधी मित्रांना सतत आवाहन करत आहे की मध्य जातींमध्ये जो जातीयवाद व मुस्लिम द्वेष आहे त्याची दखल घेऊन त्यांना समजावून सांगायची गरज आहे. आज या घडीला बीजेपी व संघाच्या हरावल दस्त्याचे कामे करत आहेत. नरेंद्र मोदी, उमा भारती, विनय कटियार किंवा गल्लीबोळांतील कार्यकर्ते संघाच्या मधल्या काळात त्यांनी या समाजांना हिंदू असल्याची जाणीव करून देण्यात यश संपादन केले आहे. 

खरे पाहता महात्मा गांधीजींच्या खुनानंतर संघाचे लोक तोंड लपवत फिरत होते. पण 1960 नंतर डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या गैर-काँग्रेसवादापायी संघाच्या राजनीतिक शाखेला म्हणजे जनसंघाच्या वाट्याला स्थापने (1950) नंतर सत्ता मिळण्याची सुरुवात 1967 च्या संविद सरकारांची मुहूर्तमेढ 1963 मध्ये कोलकाता अधिवेशनात झाली. मधू लिमये यांच्या विरोधात व जॉर्ज फर्नांडिस तर प्रत्यक्ष कलकत्ता येथे जाऊन उघड विरोध केला होता. व गैर-काँग्रेसवादाला पाठिंबा देणाऱ्या लोकांची तोंडे काळी होतील इतक्या कडक भाषेत बोलले होते आणि आश्चर्य म्हणजे तीन चतुर्थांश लोक जॉर्ज फर्नांडिस यांनी दिलेल्या भाषणामुळे प्रभावित झाले होते. पण डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या शेवटच्या भाषणाने सर्व वातावरण बदलले व गैर-काँग्रेसवादाचा प्रस्ताव पास झाला. पण 1963 मध्ये कोलकाता अधिवेशनात कसून विरोध करणारे जॉर्ज फर्नांडिस यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या पर्वात एनडीएचे हनुमान बनून गुजरात दंगलीचे समर्थन करून आयुष्यभराची सेक्युलर समाजवादी ओळख कसे विसरले हे राहून राहून आश्चर्य वाटते.

म्हण आहे ना की स्वभावाला औषध नाही. लोहिया प्रेम करायचे ते समोरचा माणूस गुदमरून जाईल इथपर्यंत. आणि द्वेष करायला लागले तर कुठल्याही थराला जात. ज्याची दोन उदाहरणे पुरेशी होतील. पहिले उदाहरण जवाहरलाल नेहरू यांच्या संदर्भातील आहे. (जन्म 14 नोव्हेंबर 1889 व मृत्यू 27 मे 1964) जवळपास लोहिया आणि जवाहरलाल नेहरू यांच्या वयात एकवीस वर्षांचे अंतर होते. म्हणजे त्या काळात होणाऱ्या लग्नाच्या वयाचा विचार केला तर जवळजवळ बाप-लेकाच्या वयाइतके. तरीही लोहिया जर्मनीमधून शिक्षण संपल्यावर भारतात परत आल्यावर - कोलकाता, वर्ध्याहून निघून आल्यावर - जवाहरलाल नेहरू यांनी सांगितले की तुम्ही अलाहाबाद येथे आनंदभवनमध्येच राहायला या व काँग्रेसचे परराष्ट्रमंत्री म्हणून काम करा. डॉ. राम मनोहर लोहिया अलाहाबाद येथे जवाहरलाल नेहरूंनी आग्रह केला म्हणून बरेच दिवस आनंदभवनात राहिले आहेत व परराष्ट्र धोरणावर बऱ्याच पुस्तिका तयार करण्यात पुढाकार घेतला आहे. पण लोहियांनीच आपल्या आठवणींमध्ये लिहिले आहे की, माझ्या आयुष्यात इतका वाईट चहा फक्त आनंदभवनातच मला प्यायला मिळाला आहे.

ते ‘‘जवाहरलाल नेहरू माझे हिरो आहेत,’’ हेपण बोलले आहेत. नेमके प्रकरण काय आहे की ते दिवसेंदिवस जवाहरलाल नेहरूंबद्दल कटू होत होत एक प्रकारे त्यांचे शत्रू नंबर एक होऊन बसले?

ठीक आहे, नेहरू स्वातंत्र्याच्या नंतर सलग चौदा वर्षे पंतप्रधान पदावर होते व सत्ताधारी पक्षाच्या काही ना काही चुका वा धोरणात्मक निर्णय चुकीचेपण असू शकतात. पण इतक्या टोकाला जाऊन व्यक्तीगत पातळीवर टीका फक्त संघाचे लोक व कम्युनिस्ट लोक करतात. परंतु समाजवादी लोकांमध्ये डॉ. राम मनोहर लोहियांनी केलेले प्रहार नेहरू व जयप्रकाश नारायण यांच्याबद्दल मर्यादा सोडून केलेले आहेत. हाच लोहियांचा स्वभाव त्यांची शक्ती आणि व्यक्तिगत दुर्बलतेचे लक्षण होते. यामुळे त्यांनी डिसेंबर 1963 मधे कोलकात येथे झालेल्या अधिवेशनात गैर-काँग्रेसवाद हा सिद्धान्त मांडला आहे. ज्याला मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस यांनी कसून विरोध केला आहे, पण दुर्दैवाने बहुसंख्य लोहियावादी म्हणवून घेणाऱ्यांमध्ये लोहियांची प्रतिभा तर नाही दिसत. पण त्यांच्या आक्रमक रूपाची नक्कल बऱ्याच लोकांनी सुरू केली आहे व तेवढेच करण्यात ते धन्यता मानतात. बाकी समाजवादी चळवळीचा या देशात वा जगातील घडामोडींचा काहीएक संबंध नाही.

थोडक्यात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अंधभक्तांपासून ‘लोहिया बचाव मोहीम’ सुरू करण्याची गरज आहे. नाहीतरी म्हण आहे ना की, कुठल्याही महात्म्याच्या शिष्यांपासूनच त्या महात्म्याला धोका असतो. कमी-अधिक प्रमाणात हाच धोका समाजवादी चळवळीला आज चाळीसपेक्षा जास्त वर्षे झाला आहे. याच धोक्याच्या धक्क्यात वयाच्या साठीमध्ये मधू लिमयेपण सापडले होते. (1980 - 82 आजारपण फक्त निमित्त होते!) काँग्रेसबद्दल बरेच पॉझिटिव्ह भूमिका घेऊन बोलत व लिहीत होते. ते इतर समाजवादी लोकांपेक्षा जास्त संवेदनशील आणि सज्जन होते. एस.एम. जोशी यांच्या स्कूलमधून गेल्यामुळे व साने गुरुजी यांच्या सोबत खान्देशमध्ये आयुष्याच्या सुरुवातीच्या संस्कारांचा परिणाम म्हणून ते 1982 नंतर खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाची काळजी घ्यावी यासाठी प्रयत्न करत होते. पण त्यांची तब्येत व त्यापेक्षा गेली चाळीस-पन्नास वर्षे सोबत असलेल्या सहकारी मंडळींचे पतन पाहून ते अजून नाउमेद झाले होते. तरी बरे झाले ते 1995 मध्ये गेले. अन्यथा 2002 मध्ये त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा जॉर्ज फर्नांडिस व नितिश कुमारसारख्या मित्रांच्या झालेल्या पतनानंतर (ज्यांना त्यांनी मोठे व्हायला सतत मदत केली आहे.) कदाचित त्यांनापण साने गुरुजींच्या वाटेने जावे लागले असते. आज त्यांना या जगात येऊन शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. आणि या जगाचा निरोप घेऊन सत्तावीस वर्षे होत आहेत. याबद्दल त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना माझ्यातर्फे एकच मागणे आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोक्याची सूचना खूप सुरुवातीला देण्यात मधूजी पहिल्या काही लोकांमध्ये होते. त्यांनी दाखवून दिलेला धोका किती बरोबर होता हे आज  पुन्हा सांगायची गरज नाही. फक्त त्यांच्या जन्मदिवसाच्या व तेही शंभराव्या दिवशी तरी संघमुक्त भारताची शपथ घेऊ या. हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश खैरनार,  नागपूर, महाराष्ट्र

 माजी राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवादल
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके