डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

शिक्षकांसाठी साने गुरुजी : एक आत्मीय आचारसंहिता

‘आज गुरुजी असते तर?’ या प्रश्नावरही लेखकाने विचार केला आहे. त्यांचे उत्तर असे आहे की, साने गुरुजींनी शाळाबाह्य मुलांसाठी काम केले असते. सिग्नलवरच्या मुलांजवळ बसून ते बोलले असते. वंचितांविषयीचे गुरुजींचे प्रे लक्षात घेऊन आम्ही ही प्रेरणा जगवायला हवी, असे लेखकाला वाटते. आज समाजमाध्यमांच्या (सोशल मीडिया) गतिमान युगात ‘गोष्ट हरवली आहे’. आज गोष्टी सांगणाऱ्या शिक्षकांची गरज आहे. गुरुजींची आंतरभारतीची कल्पना अस्तित्वात आली, तर राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीयता पक्की होत जाईल, असे लेखकाला मनापासून वाटते. ‘शाळा आहे : शिक्षण नाही’ या पुस्तकामुळे हेरंब कुलकर्णी शिक्षकसमुदायात अप्रिय ठरले होते, पण आता त्यांनी स्वत:ला बदलून घेतले आहे. केवळ उणिवांवर आणि नकारात्मकतेवर बोट न ठेवता, सकारात्मकतेने शिक्षणपरिवर्तन आणि पर्यायाने समाजपरिवर्तन यासाठी ते जागरण करत आहेत. ‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’ हे पुस्तकसुद्धा त्यांच्या परिवर्तनवादी प्रकल्पाचाच एक भाग आहे.

हेरंब कुलकर्णी यांचे ‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’ हे पुस्तक जुलै 2017 मध्ये प्रकाशित झाले आणि अवघ्या पाच महिन्यांत या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली. यावरून या पुस्तकाची उपयुक्तता आणि मौलिकता लक्षात यावी. हे केवळ साने गुरुजींचे चाकोरीबद्ध चरित्र नव्हे; लेखकाने आधुनिक काळासाठी आणि विशेषत: शिक्षकांसाठी साने गुरुजींच्या विचारांचा आणि कार्याचा लावलेला हा कालोचित अन्वयार्थ आहे. शिक्षकांनी स्वत:हून, स्वत:साठी स्वेच्छेने अनुसरायची आचारसंहिता, असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. शिक्षकी पेशाला आलेली मरगळ, आत्ममग्नता, आत्मतुष्टता, विफलता, निष्क्रियता आणि साचेबद्धता पळवून लावण्यासाठी ‘साने गुरुजी’ नावाची बहुगुणी लस शिक्षकसमुदायाला टोचावी लागेल, अशी लेखकाची भावना आणि भूमिका आहे.

हे पुस्तक लिहिण्यासाठी लेखकाने भरपूर भटकंती केली. विविध संदर्भसाधने अभ्यासली, तसेच अनेकांशी चर्चाही केली. शिक्षक हुशार असण्याबरोबरच संवेदनशील आणि उत्तरदायी असणं महत्त्वाचं, असं लेखकाला वाटतं. शिक्षक जितका स्वप्नाळू, भाबडा आणि भावुक, तितका तो अधिक चांगला शिक्षक होण्याची शक्यता जास्त, असे हेरंब कुलकर्णी यांचे मत आहे. या झपाटलेपणातून त्यांनी साने गुरुजी जिथे जिथे गेले ती सगळी क्षेत्रे भक्तिभावनेने धुंडाळली. शिक्षकांना प्रेरणा देण्यात आज प्रशासन अयशस्वी ठरत आहे. चांगल्याचं कौतुक नाही आणि वाईटाला शिक्षा नाही, असा प्रशासनाचा स्वभाव बनला आहे. ‘नाणे गुरुजींची गाठ पडल्यावर साने गुरुजींची आठवण या मुलांनी का ठेवावी?’ असा प्रश्नही लेखकाने मनोगतातच उपस्थित केला आहे.

शिक्षणातील ध्येयवाद आणि भावनांक विकसन या गोष्टी खूप दूर गेल्या आहेत, ही बाब लेखकाला अस्वस्थ करते आहे. या अस्वस्थतेतूनच शिक्षकांपुढे साने गुरुजींना ‘रोल मॉडेल’ म्हणून उभे करण्याच्या हेतूने या पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाची मांडणी दोन भागांत केली आहे. पहिल्या भागात शिक्षक म्हणून साने गुरुजी कसे घडत गेले, याची माहिती आरंभीच्या 88 पृष्ठांपर्यंत दिली आहे. दुसऱ्या भागात म्हणजे पुढील 67 पृष्ठांध्ये साने गुरुजी आजच्या शिक्षकांना कसे साह्यकारी आणि मार्गदर्शक ठरू शकतात, याचे तपशीलवार विवेचन केले आहे. पहिल्या प्रकरणात साने गुरुजींची जडण-घडण कशी झाली याची माहिती दिली आहे. दि.17 जून 1924 ते 29 एप्रिल 1930 या सहा वर्षांच्या काळात गुरुजींनी अमळनेर येथील शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली.

याच काळात वसतिगृहाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. मुले प्रेमाने कशी बदलू शकतात, याचा वस्तुपाठ म्हणजे गुरुजींचे त्या वसतिगृहातील उपक्रम होते. शिक्षकाची नोकरी 1930 मध्ये सोडून त्यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. तुरूंगात असताना त्यांनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक आणि ‘धडपडणारी मुले’ ही त्रिखंडात्मक कादंबरी लिहिली. गुरुजींनी एकंदर 113 पुस्तकं लिहिली. नोकरी सोडल्यावर हाती असलेल्या केवळ 19 वर्षांत सामाजिक-राजकीय काम, प्रचंड प्रवास यातून मिळालेल्या वेळात त्यांनी इतकं प्रचंड लेखन केलं. जगातील उत्कृष्ट अशा 17 कलात्मक ग्रंथांचे अनुवाद केले.

महाराष्ट्रात संतसाहित्याखालोखाल सर्वांत जास्त वाचलं गेलेलं पुस्तक म्हणजे ‘श्यामची आई’ आहे, असे निरीक्षण नोंदवले आहे. आंतरभारती हे गुरुजींचं अपुरं राहिलेलं स्वप्न आहे. अवघ्या 51 वर्षांच्या आयुष्यात गुरुजींनी केलेले लेखन आणि कार्य थक्क करणारे आहे. स्वातंत्र्यसेनानी म्हणून गुरुजींनी सात वर्षे तुरुंगवास भोगला. तुरुंगात संध्याकाळी सर्व कैदी आत घालताना गुरुजी 120 पानांची वही मागवून घेत आणि सकाळी ती लिहिलेली वही हातात देत, इतका त्यांच्या लेखनाचा आवाका दांडगा होता. साने गुरुजींच्या अंगी टोकाचा नि:स्पृहपणा होता, याचे अनेक दाखले या पुस्तकात आले आहेत. गुरुजी आयुष्यभर अनिकेत अशा फकिरी वृत्तीने जगले. उपासमारीने जन्मभर त्यांची पाठ पुरविली, तरी त्यांनी स्वाभिमान सोडला नाही.

113 पुस्तके लिहिणाऱ्या गुरुजींची लेखनाची जागा केवढी, तर 5 फूट बाय 3 फूट आकाराची मोरीसारखी अरुंद जागा. तिथे खाली बसून ते लिहीत. त्या छोट्या जागेला ते ‘स्फूर्तिंदिर’ असे म्हणत आणि तुरूंगाला ‘कृष्णमंदिर’ म्हणत. गुरुजींचे साहित्य प्रत्यक्ष कृती करण्यास प्रेरणा देणारे, कृतिप्रवण करणारे आहे. साने गुरुजींनी आपल्या विद्यार्थ्यांची भांडी घासली, कपडे धुतले, प्रसंगी घाण साफ केली; कधी त्यात कमीपणा मानला नाही. मातृहृदयी गुरुजींचा स्वभावच मुळी स्त्रीप्रधान होता, याचे अनेक किस्से लेखकाने या पुस्तकात सांगितले आहेत. साने गुरुजींच्या विचारांत, लेखनांत व भाषणांत नित्यनूतनता आणि ताजेपणा होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्राचीन भारतीय परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर मिलाफ साधला गेला होता.

मातृभक्ती, गरिबांविषयीचा कळवळा, देशसेवा, धैर्य, निसर्गप्रे, राष्ट्रीय एकात्मता, समाजवाद, श्रमाची प्रतिष्ठा या प्रमुख रंगांनी गुरुजींचे आयुष्य रंगले होते. साने गुरुजी हे ‘रडके लेखक’ होते, अशी प्रतिमा त्यांच्या विरोधकांनी जाणीवपूर्वक निर्माण केली आहे. तथापि, गुरुजी कधी स्वार्थासाठी रडले नाहीत. यासंदर्भात एका ठिकाणी ते म्हणतात, ‘चांगलं होण्यासाठी मी जितका रडलो, तितका कशासाठीच रडलो नाही.’ इतक्या सगळ्या सद्‌गुणांचा समुच्चय असलेले साने गुरुजी हे शुभंकर आणि मंगलकारी सत्शक्ती होते, हे लेखकाचे विधान काळजाची पकड घेते. ‘साहित्यिक साने गुरुजी’ या प्रकरणात लेखकाने गुरुजींच्या साहित्यसंपदेचा विस्ताराने परामर्श घेतला आहे. गुरुजींच्या लेखनात प्रेम, निष्ठा, सेवा, सहकार्य, उदात्तता, शुचिर्भूतता, मांगल्य यांची दाटी असते. त्यांच्या लेखनात जोरदारपणा आहे; चैतन्य, ताजेपणा आणि प्रेरकता आहे; साधुत्व, शुचित्व, सौंदर्य व उदात्त जीवनाची आकांक्षा, ओढ व तळमळ आहे. ते जीवनवादी साहित्यिक होते. साहित्याच्या आस्वादापेक्षा त्या साहित्यातून जीवन बदलण्याचा आग्रह धरणारे होते. ह्याच  प्रकरणात लेखकाने तोत्तोचान, फ्री ॲट स्कूल, टू सर विथ लव्ह, टीचर, नीलची शाळा, ज्युलियाची डायरी, माझे विश्व मुलांचे या (शिक्षकांनी लिहिलेल्या) जगप्रसिद्ध पुस्तकांची संक्षेपाने ओळख करून दिली आहे.

‘शिक्षकांनी लिहिले पाहिजे’ हा आग्रह लेखकाने धरला आहे. साने गुरुजींप्रमाणे आजच्या शिक्षकांनी खेड्यापाड्यांतील लोकसाहित्याचे संकलन करावे, असे हेरंब कुलकर्णी यांना वाटते. गुरुजींचे जगणे आणि लिहिणे हे एकरूप झालेले होते. ते एके ठिकाणी म्हणतात, ‘माझ्या लेखनाला हात लावाल, तर माझ्या हृदयाला हात लावाल.’ ‘सृष्टीचे मित्र साने गुरुजी’ या लेखात लेखकाने साने गुरुजींचे निसर्गप्रेम अधोरेखित केले आहे. गुरुजींसाठी निसर्ग हाच शिक्षक आणि निसर्ग हाच अभ्यासक्रम होता. सृष्टीचे विस्तीर्ण स्वरूप हा गुरुजींना महाकाव्याचा विषय वाटतो. कोकणात जन्मलेल्या गुरुजींना निसर्गदृश्ये दिसली नाहीत, तर ते कासावीस होत. मोठमोठे राजकीय संघर्ष करणारे गुरुजी वृत्तीने खूप हळुवार होते. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन फुलांचा जन्मोत्सव साजरा केला होता. यातून निसर्गाविषयीचे प्रेमविद्यार्थ्यांमध्ये संक्रमित करणे, हाच त्यांचा हेतू होता.

‘पांडुरंग साने नावाचा ज्ञानपिपासू विद्यार्थी’ या प्रकरणाच्या सुरुवातीलाच लेखकाने असे विधान केले आहे की, चांगला शिक्षक हा अगोदर चांगला विद्यार्थी असतो, हे अक्षरश: खरे आहे. साने गुरुजींची खरी जडणघडण शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी असतानाच झाली. गुरुजींमधला ज्ञानपिपासू विद्यार्थी अखेरपर्यंत जागृत होता. गुणांपेक्षा ज्ञानार्जनाला जीवनात अधिक महत्त्व आहे, हे त्यांना विद्यार्थिदशेतच उमगले होते. विद्यार्थिदशेतच त्यांच्या लेखाला 75 रुपयांचे बक्षीस मिळाले होते. त्यात आणखी 25 रु. टाकून ते ‘ज्ञानकोशा’चे ग्राहक बनले होते. दारिद्र्यातही मिळालेल्या पैशाचा उपयोग चैनीसाठी न करता, ज्ञानसाधनेसाठीच करण्याची तळमळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. बालवीर पथकात काम केल्यामुळे त्यांच्या मनात सामाजिकता विकसित झाली होती. ‘साने गुरुजी शिक्षक म्हणून कसे होते?’ या प्रकरणात गुरुजींची पहिली आणि अंतिम ओळख ही शिक्षक म्हणूनच होती, असे लेखकाने म्हटले आहे.

धाक, दहशत, दरारा नसलेले ते शिक्षक होते. गुरुजी शिकवू लागले की, मुलांना त्यांचा तास संपूच नये, असे वाटे. त्यांची वाणी अंत:करणाची पकड घेणारी होती. त्यांनी स्वत:च विकसित केलेले अध्यापनाचे तंत्र ज्ञानरचनावादी होते. पुस्तक आणि परीक्षा यांच्या पलीकडे जाऊन ते शिकवत असत. गुरुजींचा तंत्रापेक्षा एकरूपता आणि उत्स्फूर्तता यावर असलेला विश्वास आणि त्यांचा विषयाचा व्यासंग आजच्या शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे. भाषाविषय शिकविण्यात गुरुजींचा हातखंडा होता. त्यांच्या बोलण्यात करुणरस असे आणि शिकवताना त्यांच्या डोळ्यांत नकळत पाणी येत असे, इतके ते पाठ्यविषयाशी समरस होत. जे शिकवायचं, त्यात शिक्षकाचीच एवढी समरसता असल्यावर विद्यार्थी समरस होणारच!

गुरुजींनी वसतिगृहाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे त्या छात्रालयाचं अनाथपण गेलं. मुलांचे उदास चेहरे फुलून जात. ते मुलांना शिक्षा न करता प्रेमाने बदलवण्याचा प्रयत्न करत. ते आई बनून मुलांची सेवाशुश्रूषा करत. त्यांना मुलांविषयी टोकाची काळजी असे. प्रेमातून, स्नेहभावातून परिवर्तन होतं, हे त्यांच्या शिक्षणविषयक तत्त्वज्ञानाचं मूलसूत्र होतं. ते मुलांना समानतेची शिकवण आपल्या कृतीतून देत. आपली चूक झाल्यास मुलांची माफी मागण्याइतका उमदेपणा गुरुजींकडे होता. त्यामुळे शिक्षणातील उच्च तत्त्वं शिकविण्याची ‘छात्रालय’ ही एक प्रयोगशाळा बनली. गुरुजींनी ‘छात्रालय’ दैनिक सुरू केले. रात्रभर जागून गुरुजी दैनिक लिहून काढत.

शिक्षक असण्याचा त्यांना अभिमान होता. शिक्षक असणं हीच त्यांची जीवनप्रेरणा अगदी अखेरपर्यंत कायम होती. ते नेहमी म्हणायचे, ‘मुले म्हणजे देवाघरचा संदेश आपणास देणारे प्रेषित. मुले म्हणजे आनंदाचे माहेरघर. मुले म्हणजे चैतन्याचे कोवळे कोंब.’ सहा वर्षांच्या शिक्षकाच्या नोकरीत फक्त प्रेम आणि प्रेम हीच त्यांनी त्यांच्या अध्यापनाची, वर्तनाची आणि संवादाची भाषा ठेवली होती. चार भिंतींच्या आतील शिक्षणाला गुरुजी एका मर्यादेपर्यंतच महत्त्व देत असत. देशातील राजकारण, समाजकारण यांपासून शिक्षण आणि शाळा वेगळ्या काढता येणार नाहीत, हा विचार ते विद्यार्थ्यांना देत. भविष्यात या मुलांमधून आत्ममग्नतेची बेटं तयार होणार नाहीत, याची ते दक्षता घेत. मुलांचा अपमान करू नये व  मुलांमधील न्यूनगंड वाढवू नये, असे त्यांना वाटे. शिक्षणच अर्थोत्पादक व्हावे, असा त्यांचा आग्रह होता. शिक्षक हीच खरी शिक्षणसंस्था होय, अशी त्यांची दृढ धारणा होती. ‘आपले जीवन व्यापक प्रश्नांशी जोडणे म्हणजेच शिक्षण होय,’ अशी त्यांनी शिक्षणाची सोपी व्याख्या केली होती. शिक्षणाने माणूस अधिक संवेदनशील व समाजाभिमुख व्हावा, ही त्यांची अपेक्षा होती.

ते केवळ कोरडा उपदेश करणारे नेते नव्हते, तर स्वत: कोणत्याही कामात अग्रभागी असत. त्यांनी विद्यार्थ्यांचा भावनांक वाढविण्याचा प्रयत्न केला. शब्दांनी जाणीव करून देण्यापेक्षा स्पर्शातून ते काम करत. गुरुजींनी आपल्या समाजाच्या हृदयावर आणि संवेदनशीलतेवर जीवनभर काम केले. म्हणूनच ते 70 वर्षांनंतर कालसुसंगत आहेत, असे लेखकाचे आग्रही प्रतिपादन आहे. आपलं शिक्षक असण्याचं कौशल्य विकसित करण्यासाठी गुरुजी महत्त्वाचे आहेत, असे लेखकाला वाटते. ‘आजच्या शिक्षकांसाठी साने गुरुजी’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात लेखकाला-

1. साने गुरुजींनी केलेले प्रभावी अध्यापन,

2. विद्यार्थी असल्यापासूनची तीव्र ज्ञानलालसा,

3. शिक्षक म्हणून सातत्याने लेखन करून मुलांसाठी साहित्यनिर्मिती,

4. बालसाहित्यात योगदान,

5. विद्यार्थ्यांना अतीव प्रेमाने हाताळण्याची शैली,

6. मुलांना सन्मान देणं,

7. विद्यार्थ्यांना समृद्ध करण्याचे प्रयत्न,

8. विद्यार्थ्यांना विविध अनुभव देणं,

9. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करणं,

10. राष्ट्रीय व सामाजिक समस्यांविषयी मुलांना सतत जागृत ठेवणं. इत्यादी गोष्टींसाठी साने गुरुजी अनुकरणीय वाटतात. मुलांना आतून बदलण्याची तळमळ, मुलांवरचं नि:स्सीम प्रेम आणि अध्यापनात झोकून देण्याची गुरुजींची वृत्ती आजच्या शिक्षकांनी अंगीकारण्यासारखी आहे. एके काळी खेड्यातील शिक्षक हे संस्कारांचे शक्तिपीठ होते. आज राज्यात साडेसात लाख शिक्षक आहेत; पण व्यवस्थेवर शिक्षकसमुदायाचा काहीच प्रभाव नाही, याबद्दलची खंत लेखकाने व्यक्त केली आहे. साने गुरुजींचा आदर्श नजरेसमोर ठेवून शिक्षकांनी लेखनाकडे गंभीरपणे बघायला हवं. त्यासोबतच शैक्षणिक विषयांवर आणि आपले शाळेतले प्रयोग, शिक्षणातल्या प्रश्नांवरचं भाष्य पालकांना दिशा देईल, असं लेखन शिक्षक म्हणून करायला हवं, असं लेखकाला वाटतं. शिक्षणातून साक्षरतेचं प्रमाण किती वाढलं, यापेक्षा समाजातील संवेदनशीलतेची पातळी किती वाढली, हे लेखकाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

‘आज गुरुजी असते तर?’ या प्रश्नावरही लेखकाने विचार केला आहे. त्यांचे उत्तर असे आहे की, साने गुरुजींनी शाळाबाह्य मुलांसाठी काम केले असते. सिग्नलवरच्या मुलांजवळ बसून ते बोलले असते. वंचितांविषयीचे गुरुजींचे प्रेम लक्षात घेऊन आम्ही ही प्रेरणा जगवायला हवी, असे लेखकाला वाटते. आज समाजमाध्यमांच्या (सोशल मीडिया) गतिमान युगात ‘गोष्ट हरवली आहे’. आज गोष्टी सांगणाऱ्या शिक्षकांची गरज आहे. गुरुजींची आंतरभारतीची कल्पना अस्तित्वात आली, तर राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीयता पक्की होत जाईल, असे लेखकाला मनापासून वाटते. ‘शाळा आहे : शिक्षण नाही’ या पुस्तकामुळे हेरंब कुलकर्णी शिक्षकसमुदायात अप्रिय ठरले होते, पण आता त्यांनी स्वत:ला बदलून घेतले आहे. केवळ उणिवांवर आणि नकारात्मकतेवर बोट न ठेवता, सकारात्मकतेने शिक्षणपरिवर्तन आणि पर्यायाने समाजपरिवर्तन यासाठी ते जागरण करत आहेत. ‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’ हे पुस्तकसुद्धा त्यांच्या परिवर्तनवादी प्रकल्पाचाच एक भाग आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने खचून-पिचून गेलेल्या शिक्षकसमुदायाची उमेद जागविण्याचा आणि समकालीन शिक्षकांचे स्वभान तसेच समाजभान जागृत करण्याचा सकारात्मक प्रयत्न केला आहे.

 

शिक्षकांसाठी साने गुरुजी

लेखक : हेरंब कुलकर्णी

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे 30.

पृष्ठे : 158 ।

मूल्य : 160 रुपये  

Tags: साने गुरुजी शिक्षकांसाठी साने गुरुजी हेरंब कुलकर्णी heramb kulkarni shikashakansathi sane guruji sane guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके