डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

असा विषय हाताळतानाही क्रौर्य, हिंसा या गोष्टी प्रत्यक्ष दाखवण्याची निवड नंदितानं केली आहे. गोष्टींच्या गोफातली कुठलीच पात्रं ठळकपणे रंगवलेली नाहीत. तरीही त्यांना जे सांगायचं ते ती पुरतंच सांगतात. एरवी टाळीबाज वाटतील अशी वाक्यही ही माणसं सहजपणे बोलून जातात. परिस्थितीचा उद्‌गार असल्यासारखी. त्यातून फिराक हेच सांगतो... दंगल थांबलीतरी क्रौर्य थांबत नाही, काही खदखदणारं उरतंच पुन्हा कधीतरी उफाळण्यासाठी.

जगातल्या चित्रपटांच्या संस्कारानं आणि बदलत्या आत्मभानामुळे भारतीय चित्रपटांतबदल होताहेत त्यातला एक म्हणजे महत्त्वाच्या घटनांची दखल चित्रपटकर्ते आता लगोलग घेत आहेत. घटनांचं डॉक्युमेंटेशन वाटेल असं काही किंवा त्याबद्दल अगदी पोटातून वाटलेलं काही किंवा त्या अनुशंगानं सुचलेल्या भविष्य दर्शी कल्पनांबद्दल काही त्यांच्या चित्रपटांतून येतं आहे... हे चित्रपट त्रुटीरहित नाहीत पण हे केवळ बॉस ऑफिसवर नजर ठेवून केलेले मात्र नक्कीच नाहीत. सत्तरच्या दशकातल्या ‘आर्ट फिल्म्स’सारखेही ते दिसत नाहीत. संतोष सिवनचा तामीळ‘टेररिस्ट’, गजेंद्र अहिरेचा मराठी फमामबाप’, हिंदीत डोर, ब्लॅक फ्रायडे, परझानिया, यू होता तो क्या होता, आमीर, मुंबई मेरी जान, द वेन्सडे ही काही उदाहरणं. याच चित्रपट मालिकेत बसेल असा नुकताच येऊन गेलेला चित्रपट ‘फिराक’.

पठडीपेक्षा वेगळ्या कथाचित्रपटांतून अभिनेत्री म्हणून दिसणारी नंदिता दास हिचा हा पहिला दिग्दर्शन-प्रमोग, पहिलेपणाची कुठलीही खूण न दाखवणारा. संवेदनशील विषयाची मनस्पर्शी कथनशैली, धक्का तंत्राचा वापर करणारी तरी ओंगळता टाळणारी दृश्यदर्शनाची आणि जोडणीचीशैली यातून फिराक नेटकेपणानं पडद्यावर उलगडतो. कथा-पटकथा लेखिकांनी (नंदिता दास, शुचीकोठारी) आणि दिग्दर्शिकेनं चित्रीकरणपूर्व तयारी अगदी आखीव रेखीव केलेली असणार ही बाबवर उल्लेख लेल्या प्रकारच्या बहुतेक सगळ्या चित्रपटांतून जाणवते. मोठे स्टार किंवा खूप मोठं बजेट नसूनही या नेटकेपणामुळे हे चित्रपट आवडले न आवडले तरी मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतात. ‘फिराक’ म्हणजे तलाश-शोध. (दुरावा असाही एक अर्थ या चित्रपटाच्या माहितीत दिलेला आहे.)गोध्राच्या घटनेनंतर गुजरातमध्ये झालेली दंगल आटोयात येताना आणि त्यानंतर महिन्याभरानं घडणाऱ्या घटनांतून हा शोध घडतो. अशी निवड केल्यावर ‘गोध्राबद्दल का कुणी चित्रपट बनवतनाही ‘असं विचारणारे निघतातच. ज्याला तो काढायचा त्यानं तो काढावाच. पण आपल्यापुढे दिग्दर्शक जे मांडतो ते आपण सुजाणतेनं पहावं ही प्रेक्षक म्हणून आपण करायची गोष्ट असते.चित्रपट सुरू होतानाच पडद्यावर वाक्य येतं ‘हजार खऱ्या घटनावर आधारित एक काल्पनिक निर्मिती.’ कथनासाठी वापरलेल्या ‘आनसांम्बल नॅरेटिव्ह स्ट्रचर’चा हे वाक्य पाया घालतं. वरकरणी संबंध नाही असं वाटणाऱ्या छोट्या गोष्टींची गुंफण करून एकसंध अर्थबोधाचा अनुभव देणारी ही रचनापध्दती दिग्दर्शिकेनं परिणामकारकरित्या वापरली आहे. ‘क्रॅश’ या ऑस्कर विजेत्या, समीक्षक आणि प्रेक्षकांना आवडलेल्या चित्रपटाच्या प्रभावामुळे आपल्याकडे हे तंत्र बरंच वापरलं जायला लागलंय. पण फिराक मध्ये ते ‘एक नाविन्यपूर्ण तंत्र’ एवढंच रहात नाही. ही रचनापध्दती योग्य वाटते त्याचं आणखी एक कारण आहे. झुंडीच्या मानसिकतेतून घडणाऱ्या दंगलीच्या घटनेशी असंख्य माणसांचा एकाच वेळी संबंध असतो. त्यात एक विशिष्ट व्यक्ती हिरो किंवा व्हिलन अशी बहुतांशीवेळा नसतात. कुणाचं क्रौर्य, कुणाचं शौर्य किंवा कुणाचं भोगणं, कुणाची अपराधीपणाची भावना यातलं कमी अधिक दाखवणं अवघडच असतं. त्यामुळे कथनातही एकाच पात्राला अधिक महत्त्व न देता सगळ्यांच्या गोष्टीतलं आपापलं वेगळेपण सांगताना शहराची गोष्ट सांगणं ही पध्दत‘फिराक’ मध्ये चपखल बसते. मग नसीरुद्दीन शहानं बुजुर्ग गायकाचं पात्र रंगवलेलं असो किंवा छोट्या मोहम्मद समाद या नवख्या बालनटानं दंगलीत अनाथ झालेल्या मुलाचं पात्र रंगवलेलं असो. संपूर्ण चित्रपट रचनेच्या संदर्भात दिग्दर्शिका सर्वांकडे योग्य तेवढंच लक्ष देते. कुणा एकाला अधोरेखित करत नाही. अधोरेखित होते ती भीती. तिचं निराकरण किंवा निचरा करण्याचे, सुरक्षितता मिळविण्याचे माणसांचे प्रयत्न या प्रक्रीयेचा शोध ‘फिराक’ घेतो. मग दृश्मांमध्ये वेळोवेळी येणारे दरवाजे... बंदराहणारे, प्रयत्नानी उघडावे लागणारे, सहज उघडणारे, कसल्याशा दबावानं उघडावेच लागणारे, जळितानं उघडेच पडलेले... या शोधाची खूण बनून सामोरे येतात.

चित्रपटाला सुरुवात होते ती जमीन खणून दमलेल्या माणसापासून. जमेल तेवढा मोठा खड्‌डा करून त्या कबरीत मावतील तेवढी प्रेतं त्यांनं मांडली आहे. तेवढ्यात त्याचा साथीदार त्याला आवाज देतो. एक डंपर येतो. अर्थातच मृतदेह घेऊन. माती ओतल्यासारखे ते ओतून जातो. पुन्हा ती दोघं कामाला लागतात. एका महिलेचं प्रेत तो सुलट करतो आणि दचकतो. दोघांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह. आपल्याला प्रेताचा चेहरा दिसतो... कपाळावर कुंकू असतं. पण त्यापरिस्थितीत धर्मादखल घेऊन काही करण्यासारखी त्या दोघांची स्थितीच नसते. अशा धक्का तंत्रानं सुरू झालेला चित्रपट पुढे मात्र फक्त माणसं आण त्यांचा भवताल याविषयी संवाद आणि संगीतातून‘बोलतो.’ कथा एकदम एक महिन्यानं पुढे जाते. दंगली नंतरचा एकदिवस आपल्यासमोर उलगडणार असतो. पोटात भीती, अविश्वास घेऊन शांत होत जाणारं अहमदाबाद. गजबजलेले मोठे रस्ते पण आता शुकशुकाट. पत्नी मुनीरा आणि बाळाला घेऊन हनीफ रिक्षावाला आपल्या घरी परततो. रिक्षा गीबोळातून जाताना दंगलीच्या खुणा दिसतात. दंगली दरम्यान कुणा समीरसाब यांच्या मुळे ते शहराच्या सुरक्षित भागात राहिल्याचं संवादातून आपल्याला कळतं. घराशी पोचल्यावर दिसते ती सर्वस्वाची राख. मुनीराची मैत्रिण ज्यो तीच्या भावानं हे केलं असावं असा ते दोघं अंदाज बांधतात. आत्ता येतो असं सांगून तो निघून जातो. त्या भमाण वातावरणातही कुणा श्रीमंताकडचं ठरलेलं लग्न उरकलं जाणार असतं. तिथं मेंदी लावण्याचे चांगले पैसेमिळतील म्हणून ज्यो ती मुनीराला बाळासकट स्कुटीवरून घेऊन जाते. आपल्या कपाळावरची टिकली तिला लावते आणि म्हणते ‘मला ते ओळखतात’. पोलीस बंदोबस्तातल्या चौकशीला धीटपणे तोंडही देते.नवरा येई पर्यंत माझ्या घरात गुपचूप रहा म्हणते. अशा या मैत्रीतही तडा गेलेला आहे. घर कुणी जाळलं ते मुनीराला ज्योतीकडून जाणून घ्यायचं आहे. ती ते माहीत नाही असं सांगत राहते पण अपराधी भाव लपवू शकत नाही. संजय (परेश रावल) त्याचा भाऊ, बायको आरती (दीप्ती नवल), पलंगाला खिळलेले पण सतर्क वडील, शाळकरी मुलगा असं एक कुटुंब. या भावांनी दुकानं लुटण्यात सहभाग घेतला आहे. भाऊ दंगली दरम्यान सामूहिक बलात्कारात सहभागी झालेला आहे. ते दोघं घरी येतात. मुलगा शाळेत जातो. आरतीला घरात फक्त नोकराचं स्थान आहे. ती सोडून इतर लोक जुन्या सोयी सुविधांची अपेक्षा करू लागले आहेत. संजयच्या आरेरावीनं दबलेली आरती आणखी एका दडपणाखाली आहे. दंगली दरम्यान टाहो फोडून आश्रम मागणाऱ्या बाईसाठी आपल्या घराचा दरवाजा तिला उघडता आलेला नाही. म्हणूनती स्वयंपाक करताना स्वतच्या हातावर डागून घेते आहे. नवऱ्याला याच्याशी काहीही देणंघेणं नाही. खाण्यापिण्यासाठी तो आरतीवर खेकसतो. स्कूटरवरून भावाबरोबर भटकायला जातो. अनु देसाई तिचा नवरा समीर शेख बरोबर गाडीतून तिच्या भावाकडे चालली आहे. त्यांचंघर शहराच्या सुरक्षित भागात पुलापलीकडे आहे. त्यांचं दुकान मात्रलुटलं गेलं आहे. मिश्र विवाहाचा ताण एरवी फार न जाणवणाऱ्या या जोडप्याला आता समीरच्या मुसलमान असण्याचं काम करामचं याचा ताण आहे विशेषत समीरला. आपली मुळं जोपासणारं शहर सोडून काजामचं असा प्रश्न निघतो. अनुच्या संगीत शिकण्याचाही उल्लेख होतो. समीरच्या आग्रहामुळे अनु दिल्लीला स्थलांतरित व्हायला तयार झाली आहे. स्थलांतरानं प्रश्न सुटेल असं तिला वाटत नाहिये. तो त्यांचा शहरातला शेवटचा दिवस. सामान बांधून तयार आहे. हे त्यांच्या बोलण्यातून आपण जाणतो आणि त्यांच्या गाडीला संजयची स्कूटर धडकते. अनुची चूक नसूनही संजय दमबाजीची भाषा करतो. समीरला संघर्ष टाळायचा आहे अनुला जपायचं आहे. म्हणून तो पैसे देऊन संजय आणि त्याच्या भावाचं तोंड बंद करतो.

अनुच्या भावाच्या घरी एकूणच दंगलीविषयी, भीतीच्या वातावरणाविषयी चर्चा होते. अनुचा भाऊ आणि समीर यांचं पार्टनरशिपमध्ये दुकान असतं. समीर मुसलमान असल्यानं ते लुटलं गेलं असं तो म्हणतो. पण समीरमुळेच हे दुकान मुळात काढणं शक्य झालं अशी आठवण अनुचा भाऊ करून देतो. स्थलांतर करणं योग्य नाही असा गप्पांचा सूर निघतो. समीर अस्वस्थ होतो. आम्हा मुसलमानंचं काय होतं मते तुम्हाला काम कळणार असं काहीसं टोकदार बोलतो. त्यावर इतरांच्या दुखावलेल्या प्रतिक्रिया येतात. मग तो म्हणतो ‘’आम डिडंट रिअलाईझव्हेन ‘आम’ बिकेम ‘वुई’.’’ त्यावेळी ते दुकानाच्या लोज सर्किट टीव्हीवरचं रेकॉर्डिंग ते पहात असतात. त्या लुटणाऱ्या माणसांत समीरला संजय दिसतो. या माणसाला घाबरून मघाशी आपली चूक नसताना आपण पैसे दिले म्हणून स्वत:वर आणि परिस्थतीवर चिडतो. तेवढ्यात बेल वाजते. दारात देवीच्या उत्सवासाठी वर्गणी मागणारे, भगवी उपरणी घेतलेले लोक असतात. समीर पुढे होऊन पैसे देतो. ते पावती फाडताना त्याला नाव विचारतात. तो समीर देसाई असं बायकोचं आडनाव सांगतो. सगळे अचंबित होतात. घरी परत येतानाते सुन्या रस्त्या वर उभ्या असलेल्या ओळखीच्या ऑमलेट पाववाल्याकडे खायला थांबतात. तेथे तणावग्रस्त गप्पा होतात. पोलीस येऊन ठेलेवाल्याला सगळं आवरायला सांगतात. आपल्या शहरातल्या शेवटच्या संध्याकाळी आपण स्वस्थतेनं खाऊही शकत नाही त्यामुळे समीर चिडतो. त्याला जाणीव होते कुठेही गेलंतरी आपण समीर शेखच राहणार. पोलिसांशी शाब्दिक चकमक होते. अनु त्याला आवरते. पण गाडीकडे जाताना तो आपलं नाव समीर शेख असल्याचं जाहीर करतो पोलीस आणि ठेलेवाला दचकतात. आणि अनुदेसाई बरोबर समीर शेख घरी जातो.

बाहेरचं जग बंद केल्यासारखे राहणारे गामक खानसाहेब आणि त्यांचा नोकर, हिंदू बहुल वस्तीतल्या जुन्या घरात रहात आहेत. दरवाज्याला पडलेलं भोक कापडी बोळ्या नं बंद केलेलं आहे. बाहेर धोकादायक कुणी नाही ना हे बघण्यासाठी आता त्या भोकाचा उपयोग आहे. गाणं ऐकायला येणाऱ्यांसाठी रोजची तयारी करण्यात नोकराला आता रस नाही कारण तरुण डॉटर सोडले तर कुणी फारसं येत नाही. आसपासचे मुसलमान निघून गेले आहेत याचा खानसाहेबांना पत्ता नाही. नोकर टीव्ही ॲडिट आहे खानसाहेब तो अजिबात बघत नाहीत. त्यांनी वर्तमानकाळ जणू स्विच ऑफ केलाय. नोकराचाही यात हातभार आहे.पण तरीही तो त्यांना विचारतो ‘आपको हैरानी नही होती हिंदू मुलमानोंको मार रहे है?’ त्यावर ते म्हणतात ‘इन्सान इन्सान को मारता है इस बातका दुख है मिया.’ आपल्या गाण्यासाठी माणसं येत राहतील असं त्यांना वाटत असतं पण परिस्थिती स्पष्ट झाल्यावर ते म्हणतात ‘सिर्फ सात सुरोंमे इतनी काबलियत कहा कि इतनी नफरतका सामना कर सके.’

शेवटाच्या एका सीनमध्ये मात्र अनु, डॉटर आणि त्याची छोटी मुलगी त्यांचं गाणं ऐकताहेत असं आपल्याला दिसतं. घाबरतच भाजी घ्यायला घराबाहेर पडलेल्या आरतीचा धक्का लागून मोहसीनच्या हातात लंकेळं पडतं. तो रेफ्युजी कॅम्पमधून बाहेर पडून आपल्या अब्बूला शोधायला हिंडतो आहे. त्याचं भुकेलं, दबलेलं रूप पाहून आरती त्याला घरी आणते. सासऱ्याला वाटतं नोकरच परत आला कामाला. आरतीही नोकरानं मामोहनला पाठवलं आहे असं सांगते. हळूच त्याच्या गळ्यातला ताईत फिरवून मागे टाकते. त्याचं नाव मोहन असल्याचं बजावते. तो हो म्हणतो. खाऊ खातो. त्याच्या कपाळावरच्या जखमेवर ती तेलहळद लावून देते. त्याला स्वयं पाकघरात लपवता येईल असं तिला वाटतं. तरीही आश्रम मागणाऱ्या बाईला नाकारल्याची बोच मधूनच अंगावर येतेच आहे. काही वेळानं संजय घरी येतो. क्षुल्लक कारणावरून आरतीवर चिडतो. तिला बेडरूममध्ये बोलावून मारतो. दाराच्या फटीतून मोहसीन/मोहन ते पाहतो आणि घाबरून बाहेर पडतो. रस्त्यावरच्या सुरक्षिततेसाठी आता त्याला मोहन हे नाव सापडलंय. ते तो वापरतोही. पण शेवटी आश्रमाला एका ओळखीच्या चाचाकडे जातो.

रिक्षावाल्या हनीला सुरक्षिततेसाठी आणि बदला घेण्यासाठी बंदुकीची गरज वाटते. तो मित्राकडे जातो. ( कबर खणणाऱ्याचा मदतनीस) त्याची बायको दंगलीतल्या भमानं गुमसुम होऊन गेलेली. पोलीसही मधून मधून येऊन त्रास देताहेत. भरलेलं पाणी ओतून टाकताहेत. बामकोची आणि मतिमंद भावाचीही काळजी त्याला घ्यायची आहे. पण तो बंदूक मिळविण्याच्या कामी मदत करायला नाइलाजानं तयार होतो. रात्र झाली आहे. हे निघालेले असताना चाचा मोहसीनला त्यांच्या ताब्यात देतो आणि जाता जाता कपमध्ये सोडायला सांगतो. बंदुक मिळते पण मतिमंद तरुण, त्यातली एकच गोळी अनवधानानं उडवतो. पोलीस मागे लागतात. मोहसीनला घेऊन हनीफपळतो. एका सुरक्षित ठिकाणी त्याला ठेवतो. पाठलागात स्वतचा जीव वाचवायला बघत असताना वरच्या मजल्यावरून कुणीतरी त्याच्यावर जड वस्तू फेकतं. त्याच्या वर्मी बसून तो मरतो. मोहसीन तेही पाहतो.

अनु आणि समीर, आपल्या घरात पॅक केलेल्या सामानाच्या खोक्यांनी वेढलेले. समीर म्हणतो ‘या खोमांमध्ये माझी भीती पॅक केलेली आहे. मी कुठेही गेलो तरी ती माझ्या बरोबर येणार, मग इथून कुठे कशाला जायचं!’ स्थलांतर रद्द होतं. भीतीसह जगण्याचा स्वीकार होतो. मोहसीन निघून गेल्यावर आरती स्वतला दिलेल्या डागण्यांवर हळद लावते आहे. आता तिनं भीतीचाच त्याग केला आहे, घरातूनबाहेर पडली आहे. मोहसीनला कुणीतरी कँपमध्ये पोहोचवलेलं आहे. चेहऱ्यावर कायमचं गांगरलेपण. शेवटच्या फ्रेममध्ये तो आणि कबर खणणारा माणूस खांबाला टेकून बसले आहेत, डोळ्यांत आशा-निराशा घेऊन आपल्याकडे बघत. असा विषय हाताळतानाही क्रौर्य, हिंसा या गोष्टी प्रत्यक्ष न दाखवण्याची निवड नंदितानं केली आहे. गोष्टींच्या गोफातली कुठलीच पात्रं ठळकपणे रंगवलेली नाहीत. तरीही त्यांना जे सांगायचं ते ती पुरतंच सांगतात. एरवी टाळीबाज वाटतील अशी वाक्यही ही माणसं सहजपणे बोलून जातात. परिस्थितीचा उद्‌गार असल्यासारखी. त्यातून फिराक हेच सांगतो... दंगल थांबली तरी क्रौर्य थांबत नाही काही खदखदणारं उरतंच पुन्हा कधीतरी उफाळण्यासाठी. बळींचे धर्म, वंश बदलतात पण बळी पडणारी माणसंच असतात...सुरक्षिततेच्या शोधात भटकणारी, भटकलेली.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात