डिजिटल अर्काईव्ह

"साने गुरुजींचे साहित्य रडके आहे'' असा सरसकट शेरा मारण्याची प्रवृत्ती दिसते. या व अशा तऱ्हेच्या विधानांचा समाचार घेणारे भाषण 'स्वप्न आणि सत्य' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी पु. ल. देशपांडे यांनी केले. साने गुरुजींच्या साहित्याचा जीवनाचा एका सहृदय लेखकाने घेतलेला हा अविस्मरणीय आढावा.

काही दिवसांपूर्वी श्री.हरिभाऊ लिमये माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की, ''साने गुरुजींच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. त्या समारंभाला तुम्ही भाषण करायला यावं माझी इच्छा आहे.'' गुरुजींच्याविषयी मला आस्था आहे याचे स्मरण असलेली मंडळी अजून आहेत हे पाहून मला बरे वाटले. मी काय किंवा स्वतः हरिभाऊ काय, आम्ही अशा एका काळात वाढलो की ज्यावेळी साने गुरुजींचा आपल्या आयुष्यात न घेणे हे ठरवले असते तरी शक्य झाले नसते. साने गुरुजी हे पहिल्यापासून अखेरपर्यंत तरुणांचे नेते होते. आणि पंचवीस-तीस वर्षांपूर्वी, स्वातंत्र्यपूर्वकाळात तरी निश्चितच आम्ही तरुण होतो. त्यामुळे जे जे म्हणून तरुण होते त्या तरुणांना साने गुरुजींनी आकर्षित केले नाही असे झालेच नाही. साने गुरुजींच्याविषयी बोलायला मला आज इथे संधी मिळाली हा माझा मोठा गौरव झाला असे मी मानतो. मात्र अध्यक्षस्थानी श्री.मधू लिमये आहेत हे कळल्यावर मी थोडासा दवलो. कारण गुरुजींच्याविषयी मधूच्या इतक्या अधिकाराने बोलणारे फार थोडे लोक आहेत. साने गुरुजींनी महाराष्ट्रातली जी काही मुले आनंदाने दत्तक घेतली होती त्या मुलांपैकी मधू लिमये एक आहेत. गुरुजींविषयी अत्यंत मोठ्या अधिकाराने तेच बोलू शकतील. पण तरीही मी हे आमंत्रण मुद्दाम स्वीकारले. आताच हरिभाऊ म्हणाले की, ''मी आमंत्रण लगेच स्वीकारले, आणि आनंदाने स्वीकारले.'' गुरुजींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण मला मिळाला, त्याचा मला खरोखरीच फार मोठा आनंद होतो आहे. 

ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.

माझ्यासारख्या विनोदी वगैरे लेखकालासुद्धा साने गुरुजी गुरुस्थानी वाटतात. माणसाला जीवनात एक गुरू पुरेसा नसतो. दत्ताने म्हणे चोवीस गुरू केले. माझे गुरू मोजायला गणित शास्त्रातला पंडित बोलवावा लागेल. ह्या संबंधात मला साने गुरुजींचीच एक गोष्ट आठवते. काँग्रेसमधून जेव्हा समाजवादी पक्ष फुटला तेव्हा काही सनातनी काँग्रेसवादी होते त्यांतल्या कोणीसे म्हटले की, "ह्या लोकांची गांधींवरही श्रद्धा आहे आणि मार्क्सवरही आहे. म्हणजे हे दोन बापांचे आहेत." रागाने म्हटले असेल कुणीतरी. गुरुजींनी त्याला फार सुंदर उत्तर दिले. त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामधून नेहरुंचेच एक वाक्य काढून दाखवले: "माणसाचे जीवन इतके गुंतागुंतीचे आहे की त्याला एकच काय अनेक बाप असू शकतात." गुरुजींनी म्हटले आहे: "चांगले कार्य करताना मला कोणी शंभर बापांचा मुलगा असे म्हटले तरी मला त्याचे दुःख होणार नाही."

साकल्याच्या प्रदेशातला थोर प्रवासी 

आपल्याकडे ब्राह्मण हा द्विज असतो. तो आईबापांकडे जन्म घेतो, आणि पुन्हा एकदा त्याचा जन्म होतो- जेव्हा त्याचे विद्यागुरू त्याला मुंजीच्या वेळी दीक्षा देतात तेव्हा. देतात म्हणण्याऐवजी देत असत असे म्हणा हवे तर. कारण अलीकडे मॅट्रिक वगैरे झाल्यानंतर मुंज झालेली मी पाहिली आहे. तरीही हरकत नाही. मॅट्रिकनंतरही गुरूचा शोध चालू असावा. मला तर वाटते, द्विजच काय माणसाने सहस्रज असावे. दोन्ही डोळे उघडे ठेवून जीवनातली अनेक रहस्ये पाहू इछिणाऱ्या माणसाला सहस्रजच असावे लागते. एरवी डोळ्यांना झापडे बांधून जगणारी माणसे नाईलाज म्हणून जन्माला आलेली असतात, आणि मरणे हातात नाही म्हणून जगणे चालू ठेवतात. त्यांच्याविषयी आपल्याला बोलायचे नाही किंवा द्विज नावाच्या जातीत जन्माला आलेल्याविषयीही बोलायचे नाही. नवा जन्म मिळावा असे वाटण्यासारखे कितीतरी अनुभव जीवनात येत असतात. एखादे उत्तम चित्र पाहिले की वाटते आपल्याला थोडासा चित्रकाराचाही जन्म लाभावा; चांगले गाणे ऐकताना वाटते गाणाऱ्याचाही जन्म मिळावा; किंवा मधु लिमयांसारख्याने एखादा पराक्रम केलेला पाहिला की वाटते राजकारणातही गुरू मिळून तिथेही जन्म लाभावा. अर्थात राजकारणाचा विचार मी लगेच डोक्यातून काढून टाकतो. त्या जातीत जन्म घालवणे मोठे कठीण काम आहे. दिवसेंदिवस तर फारच कठीण होत चालले आहे. तरीही  जीवनातल्या त्याही अंगाचे आकर्षण संपलेले नाही. एक तर जीवन हा एक सतत चाललेला शोध आहे. पण मुख्य शोध चाललेला असतो तो मानवी व्यापाराचा अर्थ लावण्याचा; मानवी जीवनातली आनंदनिधाने शोधण्याचा. कारण माणसाला सर्वांत मोठी ओढ असते ती माणसाची. ही ओढ, ही भूक संपली की सारे संपलेच. मागे एकदा मी साहित्य अॅकेडमीमध्ये बोलताना सांगितले होते की, अलीकडे 'अँग्री यंग मॅन' होण्याकडे प्रवृत्ती आहे. मी ॲग्री नाही-मी हंग्री आहे; माझी भूकच संपत नाही. जीवनामध्ये इतके काही भरलेले आहे की ते खायला वेळ नाही. किती विविधता! केवढे विराट जीवन! माझ्या कॉलेज शिक्षणाच्या काळात ज्या अनेक संस्कारांनी विचारांचा पिंड घडत गेला त्यात केशवसुतांच्या कवितेचा फार मोठा हिस्सा होता. केशवसुतांच्या 'नवा शिपाई' ह्या कवितेत त्यांनी म्हटले आहे, 

'खादाड असे माझी भूक |
चतकोराने मला न सूख |
मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे । 
कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे ।' 

केशवसुतांच्या काही काही ओळी मनात जाऊन रुजल्या: 

'हिंदुहि नाही यवनहि नाही न मी एक पंथाचा 
तेच पतित की जे आखडिती प्रदेश साकल्याचा।' '

सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत'...या साकल्याच्या कल्पनेने जगणारा केशवसुतांचा 'नवा शिपाई' मला साने गुरुजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळघा अंगांत ते रमले होते. आज ह्या ठिकाणी जमलेली माणसे गुरुजींच्या प्रेमाने जमलेली आहेत. त्यांच्या वाङ्मयाविषयी मी आपल्याला सांगायला हवे असे नाही. पण इथे जी मला तरुण मंडळी दिसताहेत त्यांना थोडेसे सांगायला हवे असे मला वाटते. कारण त्यांच्यावर जी माणसे वाङ्मयीन संस्कार शाळा-कॉलेजांतून घडवतात त्यांनी एका विशिष्ट शेऱ्यात साने गुरुजींचे वाङ्मय डिसमिस करून टाकले आहे. साने गुरुजींचे वाङ्मय ना? रडके! आमच्या साहित्यसमीक्षकांनीही गुरुजींच्या वाङ्मयाला रडके वाङ्मय म्हणून वारंवार हेटाळलेले आहे. हास्य आणि अश्रू यांची ज्यांना किमतच कळलेली नाही त्यांना जीवनातले काय कळते तेच मला कळत नाही. कारुण्य आणि रडकेपणा ह्यांतला फरक ज्यांना कळत नाही, विनोद आणि आचरटपणा ह्यांतला फरक ज्यांना समजला नाही त्यांनी हवे असेल तर साने गुरुजींचे वाङ्मय रडके म्हणावे. 

गुरुजींच्या चिडण्यामागची प्रचंड भव्यता

पण साने गुरुजींच्या डोळ्यांतले अश्रू कशामुळे उभे राहिले होते? ह्याचा शोध घेत कोणी गेले आहे का? हल्ली आमचे धडे वगैरे लावलेले असतात कॉलेजात. आपल्याबद्दल विद्यार्थीवर्गात काय मत करून देण्यात आले आहे ते पाहावे म्हणून अधूनमधून मी विद्यार्थ्यांच्या वह्या पाहतो. भरमसाट शेरेबाजी केलेली असते. लेबले मारून बाजूला ठेवून देण्याची विलक्षण घाई. (साने गुरुजी यांचे वाङ्मय रडके आहे!) काय रडके आहे? आणि ते रडके आहे हे कोणी म्हणायचे? की ज्यांच्या आयुष्यात व्यक्तिगत रडीखेरीज दुसरे काहीही नसते असल्या पोटार्थी शिक्षकांनी? मला अजून लेक्चररचे प्रोफेसर करत नाहीत, प्रोफेसरचे प्रिन्सिपाल करत नाहीत. प्रिन्सिपालचे व्हाइस चॅन्सेलर होऊ देत नाहीत-या रडकथा खाजगी किंवा सार्वजनिक मिळेल त्या ठिकाणी सांगणाऱ्यांनी? साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. त्यांच्या वाङ्मयाचा आस्वाद घेताना सहृदय वाचकाचे डोळे पाणावतात. गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो, येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी ते क्षण खऱ्या अर्थाने आपण जगली असे म्हणा. साने गुरुजी नुसते रडले नाहीत. गुरुजी प्रचंड चिडले. ते रडणे आणि ते चिडणे सुंदर होते. त्या चिडण्यामागे भव्यता होती. ह्या रडणाऱ्या माणसाच्या चिडण्याची एक कथा मी आपल्याला सांगतो. परळच्या कामगार मैदानावर साने गुरुजींचे भाषण होते. स्वातंत्र्य  मिळाल्यानंतरच्या काळात आपले सरकार आले होते. काँग्रेसचे सरकार सत्तेवरच्या काँग्रेसला सत्यावर श्रद्धा असणारे साने गुरुजी नको होते. गुरुजींच्यावर भाषणबंदीचा हुकूम बजावला. कामगार मैदान तुडुंब भरले होते. गुरुजींच्यावर भाषणबंदीचा हुकूम द्यायला जो कोणी सब-इन्स्पेक्टर गेला त्याने "काय करणार-पोट असतं साहेब म्हणून हे करावं लागतं." अशा चेहऱ्याने तो हुकूम गुरुजींच्या हातात दिला. त्या माणसालासुद्धा वाटले असेल की जीवनात कसले हे काम आपल्या वाट्याला आले आहे! गुरुजींनी हुकम घेतला आणि तडक व्यासपीठावर चढले. तो कागद हातात घेऊनच त्यांनी भाषण सुरू केले. त्या दिवती गुरुजींनी 'स्वातंत्र्य' म्हणजे काय? ह्या विषयावरच भाषण केले. स्वातंत्र्य म्हणजे फुलण्याचे स्वातंत्र्य. समाजाचे भले व्हावे याच्यासाठी ज्या ज्या वेळी सत्य असेल तेच बोलणार-असे सांगायची वेळ येते त्या त्या वेळी सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य. शेकडो बलिदाने झाली, तुरुंगवास घडले, सर्वस्वाचा नाश ओढवून घेतला गेला तो असल्या स्वातंत्र्यासाठी. आणि मग गुरुजींनी एका पाठोपाठ एक अशा अनेक क्रांतिकारकांच्या त्यागमय जीवनाचे वर्णन सुरू केले. तेजस्वी गद्यातले पोवाडेच ते. गुरुजींचे हे संतप्त स्वरूप अलौकिक असायचे. पारा चढत चढत जात होता, आणि शेवटी-'हे आमचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या असल्या भाषणबंदीच्या हुकमाची मी एवढीच किंमत करतो-' म्हणून हजारो लोकांदेखत तो कागद त्यांनी टरकावून फेकून दिला! समोरची हजारो अंतःकरणे चरकली. हे असले धैर्य ज्याला होते तो रडका? त्यांचे वाङ्मय रडके? त्यांचे विचार रडके? त्या माणसाचे मन कशासाठी रडत होते? आपल्या मुलीचे लग्न जमत नाही म्हणून? त्या माणसाच्या डोळ्यांमध्ये अश्रू कशासाठी दाटत होते? राह्यला जागा मिळत नाही स्वतःला म्हणून?-की वशिल्याने वरची जागा मिळावी म्हणून? उपमंत्रिपदसुद्धा दिले नाही 'हो' म्हणून? त्या अश्रूंचा शोध घेत आम्हाला नको जायला? त्यांच्या अपार कारुण्याचा विचार नको करायला? पण खरे सांगू का? साने गुरुजींचे विचार पद्धतशीर रीतीने मागे पडावेत अशी गेल्या वीस-पंचवीस वर्षांतली आमची स्वातंत्र्यानंतरची कारकीर्द आहे.

गुरुजींना जीवनातल्या विसंगती आणि त्यामागे दडलेले कारुण्य दिसत होते. विनोदी लेखकालाही नुसतेच विसंगतीवर बोट ठेवून भागत नाही. त्यामागल्या कारुण्याचे दर्शन घडावे लागते. असल्या विसंगतीचे एक सुंदर उदाहरण गुरुजींनीच सांगितलेल्या एका प्रसंगात आहे. लहानपणी शास्त्रीबुवांकडून वेदपठण शिकत असताना वेदातल्या प्रार्थनांमध्ये 'चर्मकारेभ्यो नमः' 'कुलालेभ्यो नम' हे ऐकून त्यांना अतिशय आनंद झाला. केवढे श्रेष्ठ आमचे वेद. चांभारांना नमस्कार असो! कुंभारांना नमस्कार असो म्हणणारे! गुरुजी फुलून आले; त्या उत्साहात आपल्या गुरूंना विचारले, '– वेदांत चांभार, कुमार ह्यांना नमस्कार आहेत. मग आपल्या पांडू कुंभाराला घेऊन येतो. त्याला नमस्कार करू या.' 
वेदपठण शिकवणारे भटजीबुवा भडकले न म्हणाले, 'गाढवा, जास्त शहाणपणा करायचा नाही. हे नुसतं म्हणायचं.'

साहित्य व जीवन यांत फारकत नव्हती

हिंदूंचा वेद चांभाराला नमस्कार करतो आणि हाडामासाचा चांभार देवळात शिरू शकत नाही. वेदांतला चांभार ठीक आहे; देवळातला पांडुरंग परवडतो; पण देवकळेनेच वागले पाहिजे असा आग्रह धरणारा पांडुरंग साने परवडत नाही. साने गुरुजींचा आदर्श पाळून वागायचे म्हणजे तापदायक. स्वातंत्र्यपूर्वकाळात अनेक तरुणांनी त्यांचा प्रेमाचा धाक मानून त्याप्रमाणे सार्वजनिक जीवनात उड्या घेतल्या. आपल्या वागण्यात समाजविरोधी काही घडले तर ते गुरुजींना रुचणार नाही असा तो स्वतःच खुषीने मानलेला धाक होता. कोणीतरी सर्वसंगपरित्याग करून आपल्या सुखासाठी धडपडतो आहे, दुःखाने रडतो आहे, अन्याय पाहून चिडतो आहे-त्या आदर्श पुरुषाला दुःख होईल असे आपण वागू नये, असा कुठेतरी ज्यांचा धाक होता अशी माणसे स्वातंत्र्यपूर्वकाळात होती. मग ती कुठल्याही विचारसरणीची असोत. सत्तेच्या राजकारणात घुसलेल्या स्वातंत्र्यकाळातल्या नेत्यांनी असल्या माणसांना काट्यासारखे वेचून बाजूला काढले. क्षणभर विचार करा, आपले वाईट वागणे अमक्या एका नेत्याला आवडेल का? असा विचार करून जगण्यासारखा धाक असलेला आज एक नेता दाखवून दिला तर दुसऱ्या क्षणाला मी हरी लिमयांना सांगेन की, आता साने गुरुजींची पुस्तके छापायची गरज नाही. लोक सुधारले. तो धाक असायला मागे तपश्चर्या हवी, चारित्र्यशीलता हवी, चांगल्या मूल्यांवर श्रद्धा हवी. साने गुरुजी त्या श्रद्धा केवळ वाङ्मयातून व्यक्त करत नव्हते तर आचरणात आणत होते. साहित्य आणि जीवन ह्यांत फारकत नव्हती. हे व्रत महाकठीण. मी मघाशी सांगितल्याप्रमाणे 'सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत' असे साने गुरुजींना वाटत होते. ही सहृदयता घेऊन ते जगत होते, आणि वाङ्मयात जोपासत होते.

घाऊक द्वेष करणे जमले नाही

साने गुरुजींच्याविषयी बोलताना मी जर आपल्याला वुडहाउसचे एक वाक्य सांगितले तर जरा नवल वाटेल. केवळ विनोदी लेखकाचे उदाहरण देऊन माझे नाते जमवावे ह्यासाठी मी हे उदाहरण देतो असे कृपा करून समजू नका. वुडहाउस गेल्या महायुद्धात जर्मन लोकांच्या तावडीत सापडले. त्यांना कॉन्सेंट्रेशन कॅम्पमध्ये राहावे लागले. तिथे त्यांचे हाल झाले. सुटून आल्यावर एका मित्राने विचारले, ''प्लम्- (वुडहाउसना त्यांचे मित्र प्लम् म्हणतात.) प्लम्, डोंच्यू हेट् जर्मन्स?''

वुडहाउस म्हणाले, ''नो; आय नेव्हर हेट इन्व्ल्यूरल्स!''-''नाही! मी कधी घाऊक तिटकारा करत नाही. ''

गुरुजींचा जर कदाचित कुठला दोष असेल तर त्यांना घाऊक तिटकारा करता येत नसे. हा जर दोष मानायचा असेल तर माझे काही म्हणणे नाही. 'राजकारण' ह्या नावाखाली जे जे काही आपल्या बुद्धीशी, संस्कृती किंवा आपल्या विचारांशी व्यभिचार करतात, त्यांनाच जर आपण गुण मानत असू तर गुरुजींना नाही मानले तरी चालेल. ढोंगीपणाने गुरुजींना मानू नये. जर मानायचे असेल तर गुरुजींच्या ज्या काही श्रद्धा होत्या त्या मानाव्या लागतील. प्रेमात आणि राजकारणात सगळे काही चालते अशा प्रकारची पळवाट काढून जगणार असाल तर तिथे गुरुजींचे नाव घेण्याचा अधिकार आपण गमावला आहे असे स्वच्छ कबूल करा. पण तत्त्वाला मुरड घालत, सारखी सारखी तडजोड करत स्वार्थासाठी द्वेषाचे वातावरण तापत ठेवत जगणारांनी उगीचच साने गुरुजींचे नावही घेऊ नये, किंवा त्या तत्त्वा प्माणे आपल्याला जगता येत नाही म्हणून त्यांना रडकेबिडके म्हणून नावेही ठेवू नयेत. साने गुरुजींना वुडहाउसच्या शब्दांत सांगायचे म्हणजे घाऊक तिटकारा किंवा द्वेष करता येत नव्हता. सगळ्या मुसलमानांचा द्वेष, तमाम ब्राह्मणांचा द्वेष, कोणी ख्रिस्ती म्हणून ख्रिश्चनांचा द्वेष, असे ते घाऊक द्वेष करू शकत नव्हते. दुर्दैवाने राजकारणात द्वेषाचे झेंडे वर केले तरच खाली माणसे जमतात. 'इस्लाम खतरेमे हैं' म्हटल्याखेरीज इस्लामी झेंड्याखाली कोणी जमत नाही, आणि हिंदू धर्मावर मुसलमानांनी भयंकर आघात चालवले आहेत-' 'हिंदू धर्म बुडाला' अशा आरोळ्या ठोकल्याखेरीज हिंदू एकत्र येत नाहीत. हिंदू धर्माला पुन्हा एकदा थोडे साफसूफ करू या' वगैरे म्हणून पाहा. कोणी येणार नाही पण अमक्याच्या विरुद्ध निषेधाला जमायचे झाले तर खूप जमाव करता येतो. ज्याप्रमाणे एका ब्राह्मणाने गांधींचा खून केला म्हणून सगळ्या ब्राह्मणांची घरे जाळत सुटणे हा महामूर्खपणा किंवा अमानुषपणा, त्याचप्रमाणे कुठल्या तरी एका मुसलमानाने एका हिंदू तरुणीवर बलात्कार केला म्हणून मुसलमानांचे मोहोल्ले जाळत सुटणे हाही तितकाच मूर्खपणा आणि अमानुषपणा. साने गुरुजींना मानायचे असले तर हे असले घाऊक सूड स्वीकारता येणार नाहीत. म्हणून म्हणतो की, साने गुरुजी स्वीकारताना अगर धिक्कारताना थोडा विचार करून ठरवावे; आणि त्यासाठी तरी त्यांनी काय म्हटले आहे ते वाचून पाहावे. केवळ शेरे मारून मोकळे होऊ नये. निदान विद्वत्तेचा व्यवसाय करणारांनी तरी नव्या पिढीची दिशाभूल करू नये. अनेक लेखकांच्या बाबतीत ही शेरेबाजी दिसून येते. डॉक्टर केतकरांच्या कादंबऱ्या म्हटल्या की, 'त्यांची शैली खडबडीत होती' एवढ्या एका वाक्यात त्यांना उरकून टाकायचे! वाङ्मयाकडे पाहण्याच्या असल्या ह्या दृष्टिकोनातूनच साने गुरुजींना 'रडके' हे लेबल बसले. पण साने गुरुजींसारख्या उदारचरिताने काय लिहिले आहे ते वाचून तरी पाहा. हरी लिमयांनी त्यांच्या लिखाणातले सुंदर विचारधन आपल्यापुढे आणले आहे. त्यांनी हे मोठे चांगले काम केले आहे.

तत्त्वासाठी प्राणासवे ताटी करणारे गुरुजी

नव्या पिढीला साने गुरुजींचे विचार समजतील असे मला वाटते. माझा नव्या पिढीवर विश्वास एवढ्याचसाठी आहे की त्या पिढीने चिडायला सुरुवात केली आहे. मला नेहमी नव्या पिढीपुढे जाताना जुन्या पिढीतला माणूस म्हणून अपराध्यासारखे वाटत असते. मला असे वाटते की, आम्ही त्यांच्यासाठी फार चांगले काही ठेवले नाही. साने गुरुजींनी आमच्यासाठी केवढे ठेवले होते. पुढे त्या विचार आणि आचारधनाचे आम्ही काय केले? आम्ही अपराधी आहोत. पण आजोबाचे गुण नातवात येतात तसे साने गुरुजींच्या पिढीचे गुण कदाचित आजच्या या तिसऱ्या पिढीत आले असतील. नव्या पिढीत मला मनाचे औदार्य दिसते. साने गुरुजींचे विचार वाचताना त्यांच्या लक्षात येईल, आज ज्या गोष्टीबद्दल आपण बंड करतो त्याविरुद्धच साने गुरुजींचेही बंड होते. गुरुजी राजकारणात होते, पण राजकारणी नव्हते राजकारणी असणे निराळे, आणि राजकारणात असणे निराळे. गुरुजी ज्या वेळी राजकारणात होते त्या वेळी त्या राजकारणात असल्यामुळे पुढे काही बक्षीस मिळण्यासारखे नव्हते. आज राजकारणात शिरणारा माणूस आपल्याला माहीतच आहे की 'मग? आमची सोय कुठे करता?' हा प्रश्न विचारून मग राजकारणात जातो. ह्या साऱ्या स्वार्थाच्या, सत्तेच्या, लोभाच्या आधारावर उभ्या असलेल्या प्रत्येक क्षेत्रातल्या राजकारणाच्या कथा वर्तमानपत्रातून येत असतात. त्या वाचल्यावर ह्या मुलांना आपले नेते, गुरुजन ह्यांच्याबद्दल का म्हणून आदर वाटावा? त्यांचे गुरुजन युनिव्हर्सिटीत आपल्याला अमकी जागा मिळावी, तमकी जागा मिळावी म्हणून गलिच्छ पातळीवर भांडणे करवात, मान्यता लाभलेले नेते सत्तेचे अमुक एक पद मिळत नाही म्हणून रुसून निघून जातात हे सारे वर्तमानपत्रातून वाचायला मिळत असताना मुलांनी कुठे म्हणून विश्वास ठेवायचा? मला खरेच कळत नाही. माझी वर्तमानपत्रवाल्यांना विनंती आहे की, कृपा करून तेवढी जागा कोरी ठेवा! ह्या नव्या पिढीला बिचारीला तेच रोज वाचायला मिळते. अशा ह्या पिढीला आज साने गुरुजींचे जीवनविषयक विचार ह्या पुस्तकात संकलित स्वरूपात वाचायची सोय हरिभाऊ लिमयांनी करून दिली आहे. त्या विचारांना जिवंतपणा आहे. कारण गुरुजींच्या वाङ्मयात जे गुण दिसतात त्या गुणांना त्यांनी जीवनाचे मोल दिले आहे. गुरुजी केवळ साहित्यासाठी साहित्य किंवा कलेसाठी कला असे मानणाऱ्यांतले नव्हते. जे जे काही आहे ते जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आहे अशी त्यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेसाठी लागणारी किंमत गुरुजी देत होते. तुकारामाच्या शब्दांत बोलायचे म्हणजे, 'तुका म्हणे व्हावी प्राणासवे ताटी । नाही तरी गोष्टी बोलू नये' अशी गुरुजींची जीवननिष्ठा.

प्रश्न आहे आज तत्त्वासाठी अशी प्राणासवे ताटी करायला कोण तयार आहे हा! धुळ्याची किंवा त्याच भागातल्या शहरातली गोष्ट आहे. संप चालला होता. गिरणीमालक इरेला पेटले होते; सरकारही ऐकत नव्हते. गुरुजी म्हणाले, ''ठीक आहे. मी तापीत जाऊन जलसमाधी घेतो'' अशी प्राणासवे ताटी करायला सिद्ध असणारी ही माणसे. सेनापती बापट वारले त्या वेळी मला विचारआला की राजकारणी मंडळींना त्यांच्या निधनाचे निराळ्या कारणाने दुःख होणार; केव्हाही जीव द्यायला तयार असणारा हातातला माणूस गेला! असो. प्राणासवे ताटी करणारी गुरुजींसारखी माणसे आपल्या प्रत्येक कृतीतून जीवनातली क्षुद्रता निघून जावी म्हणून जगत असतात. रडत असतात. चिडत असतात. स्वत: इंग्रजीतून काही चांगले वाचले की इंग्रजी न कळणाऱ्या जास्तीत जास्त लोकांन ते कळावे ह्याची ओढ त्यांना लागत असे. त्या ओढीतून त्यांनी लिहिले. त्यांनी पुष्कळ वेळा म्हटले आहे की, ''मला कृपया साहित्यिक म्हणू नका. मी तसा साहित्यिक नाही. माझे लेखणीपेक्षा झाडू आणि टोपलीवर अधिक प्रेम आहे.'' नुसते प्रेम नव्हे, हाती झाडू आणि टोपली घेऊन ते राबत असत. त्यांनी स्वत:ला साहित्यिक म्हणवून घेण्याचा आग्रह धरला नाही हे खरे. पण ते खरोखरीच चांगले साहित्यिक होते. गुरुजींना साहित्यिक म्हणूनसुद्धा मोठे मानाचे स्थान दिले पाहिजे. गुरुजींच्या वाङ्मयात निसर्गाचे किती सुंदर दर्शन घडते. आधुनिक जीवनामध्ये निसर्गाशी ताटातूट झालेली आहे. नवीन साहित्यात कचऱ्याच्या पेट्याच जास्त दिसतात. हे खरेच आहे. त्यामुळे माणसांनी कचऱ्याच्या पेट्यांबद्दल लिहावे; पण साऱ्या जीवनाची कचऱ्याची पेटी होऊ नये ह्या तळमळीने लिहावे. घाण जावी एवढ्याचसाठी. की मग आपल्याला चांदण्याचा स्वच्छ छान आनंद मिळेल. चांदण्याची आठवण असायला हवी. चांदण्याबद्दल लिहिणारा जुना आणि कचरापट्टीबद्दल लिहिणारा नवा इतके काही नव्या-जुन्याचे गणित सोपे नाही. झाडू टोपली घेऊन कचरा नाहीसा करणारे गुरुजी निसर्गात खूप रमत असत. मी आपल्याला मुद्दाम आज एक लहानसा उतारा वाचून दाखवणार आहे. इथे नवीन मुले आली आहेत, त्यांनी ऐकायला पाहिजे. तुम्ही बालकवींच्या निसर्गप्रेमाबद्दल वर्गातल्या प्राध्यापकांकडून ऐकले असेल. बालकवींच्या निसर्गप्रेमाबद्दल सांगणे प्राप्तच आहे त्यांना. पण बालकवींशिवाय इतरही लेखकांमध्ये हे प्रेम वादळते हे फारसे सांगितले जात नाही. निसर्गप्रेमात साने गुरुजी बालकवींपेक्षा कुठेही उणे पडणार नाहीत. हे कोकणातल्या एका खेड्याचे वर्णन एका पावसाच्या सुमाराचे वर्णन आहे. अप्रतिम वर्णन. साधे, सोपे, तीन तीन- चार चार शब्दांची वाक्ये लिहिणे अतिशय अवघड असते. त्यांनी सोपे लिहिले. सर्वांना कळावे ही इच्छा होती. शैलीदार साहित्यिक म्हणावे म्हणून त्यांनी लिहिले नाही. आपणांपैकी कोकणातले जे असतील त्यांच्या डोळ्यांपुढे हे चित्र उभे राहील: 

'रोहिणीचे खळखळ झरे वाहू लागले. पण ते पऱ्हे, नाले पुढे सुकले. वाळले. थोडे थोडे कुठे पाणी आहे एवढेच. एक पूर येऊन गेला. साकवावर पाणी आले होते. सोंडेवरच्या पऱ्ह्यातून एक मुलगा वाहून जाताना वाचला. त्याच्या पाण्याला ओढ फार आहे. अहो गावात पऱ्हे किती? सोनार आळीतला. खोंडातला. खेरांच्या आळीतला. तो शिरवळचा. हा सोंडेकडचा. प्रत्येक ओघळाचे निराळे नाव. प्रत्येक ओढ्याचा निराळा नाद. एवढेच नव्हे तर तोच ओढा सर्वत्र तीच भाषा बोलत नाही. आपला खोंडातला पऱ्ह्या आहे ना, तो तिथल्या मळीतल्या शेताजवळ आला की निराळीच गुणगुण करतो. निराळा नाद. एवढेच नव्हे तर तोच ओढा सर्वत्र ती भाषा सगळीकडे जाताना बोलत नाही. दगडावरून उड्या घेत येत येत खो खो खो खो हसतो. मग पुढे गंभीर होतो. जणू काही त्याची समाधी लागते. नदीजवळचा तो अवखळ खो खो हसणारा, उड्या मारणारा, गडबड करणारा, तोच का प्रवाह? तर हा मोठा लबाड आहे हो. कुळकर्ण्यांच्या साकवाजवळ संथपणा धारण करणारा हा प्रवाह पुढे ओकांच्या शेताजवळ गेला की गाणं म्हणायला लागतो. निरनिराळ्या प्रवाहांचे हे विविध संगीत ऐकणे मोठे मजेचे असते."

मला सांगा, ज्यांनी वृक्ष-झऱ्यांचे गूढ मधुर गुज इतक्या बारकाईने ऐकले त्या माणसाच्या कलेच्या आसक्तीबद्दल, निसर्गाच्या प्रेमाबद्दल त्यांच्या साहित्यातून आढळणारे प्रसंग न वाचता एकदम काहीतरी शेरा मारून मोकळे व्हायचे? साऱ्या कलांविषयी साने गुरुजींना ओढ होती. सेवा दलाच्या कलापथकाचे सारे श्रेय साने गुरुजींना. आमच्यासारखी मुले नाही तर गाण्याबजावण्याऐवजी त्यांच्या क्रांतिकार्यात कशी आली असती? बॉम्ब वगैरे भानगडी आम्ही कसले करणार? ते आम्हांला जमणारे काम नव्हते. आम्हांला वाटायचे, आम्हांला काहीच काम नाही का? आम्हांला झाडूदेखील नीट मारता येत नाही. माझ्यासारख्या मुलांना त्या काळात त्यांनी सांगितले- ''तुला काम नाही कसं? तुला खूप काम आहे. तुला गाणे म्हणता येते ना? दहा मुले गोळा कर. आणि गावोगाव म्हणत हिंडा गाणी. मी लिहून देतो. म्हणा. येथून तेथून सारा पेटू दे देश...गाण्यांनी देश पेटवता येतो. खेड्यात जा. नाटके करा. निसर्गात खेळा. आबाल-वृद्धांसाठी त्यांच्यापाशी कार्यक्रम होता. 'गुरुजी' ही उपाधी लावावी अशा प्रकारचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये होते. कारण सांगायच्या आधी ती शिकवण ते स्वतःच्या जीवनात उतरवीत होते.

गुरुजींचा धर्म: मातृधर्म 

हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कुठला? मानवधर्म वगैरे आपण म्हणतो. पण मला वाटते, साने गुरुजींचा धर्म म्हणजे 'मातृधर्म'. आपण नेहमी म्हणतो की, गुरुजींनी मातेचे महन्मंगल स्तोत्र गायले. त्यांनी ती स्तोत्रे नुसती गायली नाहीत; साक्षात मातेची जी कर्तव्ये असतात त्याचे पालन ते करत होते. मातेचा धर्म घेऊन ते जगत होते. ते मातृधर्मी होते. माता ह्याचा अर्थ केवळ मुलाला जन्म देणारी स्त्री असाच नव्हे. मुलाला जन्म देणे ही निसर्गाची करामत झाली, पण 'माता' ही पदवी हवी असेल तर अनेक जबाबदाऱ्या आल्या. 'माता' म्हणवून घ्यायचे असेल तर अनेक प्रकारची व्रते आली. असंख्य प्रकारचे नकार आले. आपल्या मुलांना कुठल्या तरी वाह्यात नोकराच्या अंगावर सोडून समाज सुधारायला जाणारी बाई ही माता नव्हे, मला कोणी जुना म्हणा हवा तर;पण मातृत्वाच्या दर्जाला जाण्याची तयारी स्वतःच्या घरात झाली पाहिजे. त्यासाठी फार मोठी किंमत द्यावी लागते. चांगली माता होऊ इच्छिणाऱ्या आईला त्या मुलाचे भंगी व्हावे लागते, स्वयंपाकीण व्हावे लागते, डॉक्टरीण व्हावे लागते, दाई व्हावे लागते, शिक्षिका व्हावे लागते, त्या मुलासांठी गायिकाही व्हावे लागते. गावात खूप छान गाण्याचा कार्यक्रम असतो, पण मी नाही जाणार तिथे. ह्या मुलाला कुठे टाकून जाऊ? तिथे त्याला जागरण झाले तर? गाणे किंवा नाटक चालू असताना ते टप टप करून रडले तर काय त्याचे तोंड दाबू? हे बरे आहे का?- असले विचार करणाऱ्या मातेला अनेक गोष्टींना मुकावे लागत. मातृत्वाने किंवा गृहिणी म्हणून जगणे सोपे नाही. सगळ्याच विवाहित बायका सौभाग्यवती असतात असे मला वाटत नाही. जी बाई नवयाने खूप पैसे खर्च करून आणलेला दागिना अंगावर घालण्यापूर्वी हा एवढा पैसा कुठून आला हो तुमच्याकडे? हा प्रश्न विचारत नाही ती सौभाग्यवती कसली? आपण ब्लॅक मार्केट बद्दल बोलतो. तसल्या पैशातून घरात ऐश्वर्य उभे केलेले असते. हा थाटमाट उभा करत असताना काय करतात त्या ब्लॅक मार्केटवाल्यांच्या बायका? त्यांना का विचारीत नाहीत? 'अहो, तुम्ही तर नुसते सबरजिस्ट्रार आहात. मग तुम्हांला हे पन्नास हजार रुपयांचे फर्निचर घेणे जमले कसे?' हा प्रश्न जी बाई नवऱ्याला विचारत नाही. ती सौभाग्यवती कसली? लबाडीने जमवलेले भाग्य हे काय सौभाग्य? मग ही असली सौभाग्यवती आणि एखाद्या शेठजींनी चंद्रहार आणून दिल्यावर हा चंद्रहार तुम्ही कुठून आणलात? पैसा कुठला ह्याची चौकशी न करता तो हार गळ्यात घालणारी ठेवलेली बाई ह्यांच्यात फरक काय उरला? मी कठोर बोलतो असे समजू नका. पण हे सत्य आहे. जी नवऱ्याच्या ह्या असल्या व्यवहारामध्ये अशी अप्रत्यक्ष सहभागी होते ती तितकीच सामान्य प्रतीची बाई, शयनेषु रंभा! ह्यापलीकडे काही नाही. पण 'मातृत्व' स्वीकारायचे असेल तर मात्र त्याला फार मोठे मोल द्यायला हवे. साने गुरुजी 'माता' होते म्हणजे काय होते! हे विशाल घर सुंदर व्हावे, शीलवन्त व्हावे म्हणून ज्या ज्या शारीरिक आणि मानसिक हालअपेष्टा भोगाव्या लागतात त्याला ते तयार होते. क्रांतिकारक म्हणजे काय चोवीस तास बॉम्ब करत बसलेला नसतो. गुरुजींनी ज्या सहजतेने बेचाळीसच्या लढ्यात बॉम्ब हाती घेतला तितक्याच सहजतेने आपल्या सहकाऱ्यांसाठी पोळ्या लाटल्या. मधु लिमयांना विचारा हवे तर. चळवळीत भाग घेतलेल्या मुलांसाठी गुरुजी स्वयंपाक करत. आणि मुलेही अशी आचरट आचरट नसतील प्रेमाने म्हणत असतील, पण गुरुजींना म्हणायची, 'गुरुजी, पोळ्या भाजल्या नाहीत नीट!' ज्या हक्काने आणि प्रेमाने आईला सांगावे त्या हक्काने सांगत. अशा प्रकारचा प्रेमाचा अधिकार मिळवण्याचे भाग्य किती लेखकांना आणि राजकारणी लोकांना लाभले असेल? साने गुरुजींबद्दल बोलताना ते मातृधर्मी होते. असंख्याची आई होऊन जगत होते. हे वाक्य मी काही केवळ टाळ्या मिळवण्यासाठी बोललो नाही. आईचा कठीण धर्म ते पाळत होते. हे आम्ही पाहिले आहे-म्हणून बोललो.

गुरुजींना लाभलेले आनंदाने रडणारे डोळे

आई म्हणजे काय सदैव मुळूमुळू करणारी किंवा बाळाचे लाड करणारी बाई नव्हे. मुलांच्यात मूल होणारे साने गुरुजी अन्यायाविरुद्ध चिडून भाषणाला उभे राहिले की त्यांना सांगावेसे वाटे-गुरुजी, तुमचे हे विराट स्वरूप आम्हाला पाहवत नाही. आमच्या डोळ्यांत एवढे त्राण नाही. हे कृष्णा, तुझे ते सौम्य स्वरूप-तू गोष्टी सांगत होतास, बासरी वाजवत होतास तेच तुझे चांगले स्वरूप धारण कर. मातृधर्मात सात्विक संतापाने निखाऱ्यासारखे फुलणेही येते. मुलावर प्रेम करणारी आई मुलाच्या चुकीबद्दल शासनही करते. घरात अनाचार करणाऱ्या नवऱ्याला वठणीवर आणते. तिचा मार्ग आत्मक्लेशाचा असतो. कठोर व्रतांचा असतो. मुलाच्या चुकीबद्दल त्याला जेवायला वाढणार नाही म्हणणारी आई मुलाने चूक दुरुस्त करेपर्यंत स्वतःही जेवत नाही. भाग्याने ज्यांना अशा आया लाभल्या असतील त्यांनी आपल्या आईने हा मातृधर्म कसा पाळला होता त्याचे स्मरण करून पाहावे. तिचा त्याग आठवावा. मुलांना खाऊ घातल्यानंतर, घरातल्या इतरांची जेवणे झाल्यावर जिला लोणच्याबरोबर भात खावा लागला ह्याचे दुःख न होता 'सगळी कशी पोटभर जेवली' हा आनंदाची तृप्ती लाभते, त्या तृप्तीची अनुभूती ज्यांनी आपली भाकरी दुसऱ्याला देऊन त्याच्या समाधानात आपले समाधान मानले आहे-त्यालाच कळेल. आईच्या डोळ्यांत अश्रू असतात. त्यात दुःखाचे असतात, संतापाचे असतात, आणि आनंदाचेही असतात. गडकऱ्यांनी म्हटलेच आहे, 'ते हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही-जे आनंदेही रडते दुःखात कसे ते होई.' 

मातृहृदयी गुरुजींना आनंदाने रडणारे डोळे लाभले होते. कलापथकाचा कार्यक्रम चांगला झाला, एखाद्या मुलाने चांगले लिहिले चांगळे गाणे म्हटले की त्यांच्या डोळ्यांत पाणी येई. आपला मुलगा बक्षीस घ्यायला शाळेच्या स्टेजवर जाताना आईच्या डोळ्यांत दाटणारी आसवे, आणि कुठल्याही पोराच्या यशाने गदगदून येणारे साने गुरुजी. त्या आईचे तरी ते पोटचे पोर. साने गुरुजींना सगळीच पोरे प्रिय. असले प्रेम घेऊन जगणाऱ्यांच्या डोळ्यांतल्या अश्रूंना फार मोल असते. आपण कबूल करूया की- आम्ही करंटे आहोत. आम्हाला अशा प्रकारचे अश्रू ठाऊक नाहीत. मधु लिमयांनी काही वर्षांपूर्वी एक लेख लिहिला होता-'देश नासला-नासला,' असे समर्थांचे उद्गार घातलेला मथळा होता. देश नासला-नासला! कशामुळे नासला? प्रेमाची भाषा बोलणाऱ्यांची संख्या कमी झाली वाणि फक्त हक्कांची भाषा बोलणाऱ्यांची संख्या वाढली की देश नासतो. हे साधे गणित नाहे. त्याला फार मोठे राजकारणी व्हावे लागत नाही. आमच्यासारख्या सामान्य लोकांनासुद्धा हे कळते. प्रत्येक जण हक्काची भाषा बोलतो आहे. कर्तव्याची भाषा कोणी बोलत नाही. आई घरात हक्काची भाषा बोलत नाही. घरातल्या माणसांना ती असे म्हणत नाही की तुमच्या वाट्याला चार चार जिलब्या आल्या मग माझ्या वाटणीच्या जिलबीचे काय? असले प्रश्न विचारणारी आहे-आई कसली ती? देता देता मला उरले नाही ह्यात आनंद मानणारी आई. घेताना शेवटी आणि देताना प्रथम. कुटुंबावर संकट आले की पहिल्यांदा ती आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या उतरवून देते. पहिला त्याग माझा असला पाहिजे असे तिला वाटते. मातृधर्माला त्यागाचे मोल द्यावे लागते. 

गुरुजींनी शेवटी एक मोठे मोल दिले. आपणच विचार करा. गुरुजी ज्या मूल्यांना धरून जगत होते त्यांतले तुम्ही आणि आम्ही आमच्या या देशाच्या संसारात काय शिल्लक ठेवले? आपणच क्षणभर अंतर्मुख होऊन विचार करूया. कशासाठी गुरुजींनी एवढी घडपड केली होती? पंचवीस वर्षे होत आली. स्वतंत्र भारताची भाषादेखील ठरवता आली नाही आम्हाला. गुरुजी आंतर भारतीचे स्वप्न पाहत होते. आज आम्हाला कानडी माणूस चिन्यांपेक्षा जास्त मोठा शत्रू वाटायला लागला आहे. बेळगाव मिळाला नाही, हे मिळाले नाही, ते मिळाले नाही, ही आमची भाषा. कानडी पुढाऱ्यांनी अशी भाषणे करायची की जणू सारा महाराष्ट्र सैन्य घेऊन चाल करायला निघालाय-आम्ही त्या मुद्द्यांना तसल्याच भाषेत उत्तरे द्यायची. सुंदर संसार केलेल्या मातेने, एखाद्द्या व्रतासारखे जीवन जगणाऱ्या मातेने जर आपली मुले दारुडी निघाली, व्यभिचारी निघाली, काळाबाजार करू लागली हे पाहिले तर त्यानंतरसुद्धा तिने तसंच जगत राहावे असे आपल्याला म्हणता येईल का? गुरुजींना बाम्ही दुसरा काय मार्ग ठेवला होता? मला असे वाटते की, गुरूजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नासला की गुरूजी सारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले. असे पाहा, आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथे राहील तरी का? जुन्या काळची असेल तर बिचारी काशीयात्रेला जाईल. गुरूजी असा एका महायात्रेला निघून गेले की तिथून परत येणे नाही. त्यांच्या त्या अंताचा आपण हा असा अर्थ करून घ्यायला हवा.

हा असा मातृधर्मी माणूस हा आमच्यात होऊन गेला. आमचे भाग्ये पण आम्ही काहीच करू शकणार नाही का? मी तरी निराश नाही. अजिबात निराश नाही. जीवनामध्ये अशी निराशा येऊन चालायचे नाही. चुकले आहे; पण चुकले आहे हे लक्षात आल्यावर आपण काय बरोबर करू याचा विचार करायला हवा. गुरूजींनी किती साधे साधे कार्यक्रम दिले आहेत. आंतर भारतीसारखा कार्यक्रम आहे. त्या पलीकडल्या माणसाची भाषा जाऊन शिकूया. मजा वाटेल. एखादा परत्रांतातला माणूस मराठी बोलल्यावर किती बरे वाटते. मी हे सांगोवांगी सांगत नाही. मी थोडासा अधिकारी आहे ह्या विषयावर बोलायला. एका प्रांतातली भाषा दुसऱ्याने शिकणे अजिबात कठीण नाही. करत नाही आम्ही आम्हाला व्रते करायला नकोत आणि पुण्य पाहिजे. हे कसे जमणार? लहान मुलांना सुंदर गोष्टी जाऊन सांगाव्या. गुरूजी किती सुरेख गोष्टी सांगत. मात्र गोष्टी सांगायला जाताना प्रेमाने भरलेले मातृहृदय घेऊन जावे. मुलांना आपल्यावर प्रेम करणारी माणसे बरोबर ओळखता येतात. आईचे अंतःकरण कसे ओळखावे हे मुलांना शिबिरात जाऊन शिकावे लागत नाही. आपण काहीच करू शकत नाही का? किमानपक्षी गुरुजींनी एवढे सुंदर लिहून ठेवले जाहे ते आपण वाचूही शकत नाही का? 

गुरुजी गेले. गुरूजींना जावेसे वाटले; ते गेले. त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निःश्वासही टाकला असेल. कारण गुरुजींसारखी माणसे आपल्याला पेलत नाहीत. तो प्रेमाचा धाक तापदायक असतो. तो धर्म आचरायचा म्हणजे त्रास असतो. अत्रे एकदा सांगत होते, 'गुरुजींच्या बरोबर आगगाडीतून प्रवासाला निघाले. गुरुजींचे थर्ड क्लासचे तिकिट, अत्र्यांचे फर्स्ट क्लासचे. गुरुजी थर्डमध्ये बसल्यावर अत्र्यांना थर्डमध्ये बसणे आले. थर्डच्या गर्दीत एकदा आपल्याला जागा मिळाली की नव्या स्टेशनात डब्यात घुसणाऱ्या उतारूंना जागा नाही जागा नाही म्हणायचे आपले धोरण. गुरुजी आपले नवे लोक घुसायला लागले की म्हणायचे, 'या-या बसू कसे तरी-' अत्रे सांगत होते, 'ह्या आग्रहाने झाले असे की सरकत सरकत आम्ही अशा ठिकाणी जाऊन पोहोचलो की पुढे प्रवास करणे अशक्य. मग अत्र्यांनी गुरुजींचा निरोप घेतला आणि फर्स्ट क्लासमध्ये जाऊन बसले. आपल्याला फर्स्ट क्लासमधून जायला हवे आहे.' गुरुजींचा हा धर्म पेलायचा कसा? 

गुरुजींच्या वाङ्मयात केवळ काव्यातलाच निसर्ग आहे असे नाही. त्यांनी विज्ञानाच्या उपासनेला फार महत्त्व दिले आहे. गुरुजींनी म्हटले आहे, 'विज्ञानग्रंथांची भाषांतरे करा. तुम्हाला प्रतिशब्द मिळाले नाहीत तर ऑक्सिजनला ऑक्सिजन म्हणा; कार्बनला कार्बन म्हणा. पण विमाने उडतात कशी? आकाशापर्यंत लोक कसे जातात-हे मुलांना कळू द्या. 

आईला स्तन्याची वेदना सहन न व्हावी आणि मुलाला किती पाजू न किती नको असे वाटावे अशा प्रकारची जोड असलेले गुरुजी. त्यांचे हे पुस्तक हरिभाऊंनी काढले. फार मोठे काम केले. अत्यंत वेळेवर हे पुस्तक काढले आहे. हे पुस्तक सुंदर आहे. माझी एक विनंती आहे आपल्याला. हे पुस्तक आपण सर्वांनी वाचावे. सर्वांनी-विकत घेऊन वाचावे. सहा रुपयेच किमत आहे ह्या पुस्तकाची. मला वाटते, साने गुरुजींसाठी सहा रुपये खर्च करायला हरकत नसावी. ह्या पुस्तकामुळे हरिभाऊंचा फायदा होईल असे नाही; पण गुरुजींचे किती तरी वाङ्मय अप्रकाशित आहे. ते प्रसिद्ध करायला त्यांचे जे कोणी प्रकाशक आहेत त्यांना उत्साह वाटेल.

आजच्या प्रसंगी मी पुष्कळ बोललो आहे. मला राहवले नाही म्हणून जास्त बोललो. अधिक बोलल्याची मला क्षमा करा. एवढे सांगून मी आपली रजा घेतो.

Tags: मुस्लीम हिंदू तत्त्वे झेंडे केशवसुत आत्महत्या भूक आई ब्राह्मण पक्ष कॉंग्रेस हरिभाऊ लिमये साने गुरुजी पु.ल. देशपांडे Mulsim Hunger. Hindu Brahmin Keshavsut Haribhau Limaye Flags Principles Mother Congress Party Suicide Sane Guruji P.L. Deshpande weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

पु. ल. देशपांडे ( 15 लेख )

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु.ल. देशपांडे (8 नोव्हेंबर 1919 - 12 जून 2000) हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे त्यांना म्हटले जाते. त्यांच्या नावाच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु.ल. म्हणून ओळखले जातात.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी