डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कोणतीही गोष्ट पुढे वाहून नेण्यासाठी ‘नायक’ किंवा प्रोटॅगॉनिस्ट महत्त्वाचा असतोच. पण मग  ‘‘चोरावर मोर’’ अशा प्राणिकथांत नायक कोण? ठकवणाऱ्या, थोड्या नकारात्मक छटा असणाऱ्या मंडळींना ‘नायक‘ कसं म्हणावं? प्राणिकथांच्या विश्वात वाघ, सिंह, हत्ती अशा बलाढ्यांसमवेत आढळतात काही शारीरिक दृष्ट्या दुर्बळ प्राणी. प्राणिजीवनाच्या उतरंडीवर फार काही उच्च स्थानी नआढळणारे. मात्र त्यातल्या काहींनी प्राणिकथांच्या इतिहासात या बलाढ्य नायकांच्या बरोबरीनेच एक खास स्थान मिळवलेलं दिसतं. ते अक्कल हुषारीवर! प्राणी कथांतील हा एक लोकप्रिय ‘मोटिफ’- कल्पनाबंध म्हणजे प्राणिजगतातील ‘ठकसेन : ट्रिक्सटर!’ 

इसाप कथा, पंचतंत्र आणि त्या पूर्वीच्या जातक कथांनी घालून दिलेल्या पायवाटेवरून फेबल्स किंवा कल्पित कथा पुढे शतकानुशतके विविध परिवेषांत प्रवास करत राहिल्या. हा जगातला सर्वांत जुना कथाविषय. माणूस आणि प्राण्यांच्या या गूढरम्य नात्याला माणसाने आपल्या विचारांत, जगण्यात आणि अभिव्यक्तीत प्राचीन काळापासून स्थान दिलेलं दिसतं.  अगदी ख्रिस्तपूर्व 1120 मधल्या इजिप्शिअन भित्तिचित्रात एक मांजर बदकांना हाकत असल्याचं दृश्य पाहायला मिळतं. आणि एटनाच्या ॲकेडियन दंतकथेत साप आणि गरुडाची कहाणी आपल्याला सापडते. आपल्याकडच्या मिथक कथा-पुराणकथांत नर-सिंह आढळतो. त्याचा उलटा प्रकार स्पिंक्स. माणसानं प्राणिजीवनाला फार निरनिराळ्या प्रकारांनी न्याहाळण्याचा, त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. आदिम काळात भक्ष्य म्हणून त्यांचा विचार करताना पुढं स्थिर कृषी जीवनातील एक महत्त्वाचा अवजार मानलं. जगण्याची गती आणि व्याप्ती वाढवण्यासाठी दळणवळणाचं साधन बनवलं. त्याची उपयुक्तता आणि उपकार जाणून कृतज्ञता व्यक्त करताना त्याला दैवत्व बहाल केलं. माणूस आणि प्राण्यांच्या सहजीवनाचं प्रतिबिंब घडवणाऱ्या या प्राणिकथा जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळतात. धर्मप्रसारानिमित्तानं, साम्राज्यविस्तारासाठी आणि व्यापारासाठी,  अभ्यास-व्यासंग किंवा अन्य कारणानं सर्वदूर प्रवास करणाऱ्या पर्यटकांकडून या कथा संक्रमित होत राहिल्या. आपापल्या भौगोलिक सीमा ओलांडत गेल्या. इथून तिथं जाताना या गोष्टींनी त्या त्या हवेचे गंध वाहून नेले आणि जिथं त्या रुजल्या तिथल्या मातीचे रंग ल्यायल्या. लोकजीवनातून आलेल्या लोककथांचा संकर होत त्या त्या कहाण्या तिथं आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण रूपरंग-पोतांत सजत राहिल्या. पंचतंत्रातील करटक आणि दमनकांची कोल्हेकुई मध्य पूर्व आणि पश्चिमेकडच्या जगात सर्वदूरच्या कहाण्यांतून आपापल्या आवाजात उमटत राहिली. आपापल्या आवाजात आणि आपापल्या सोयीनुसार निरनिराळ्या रूपांत.

युरोपातली स्वतःची म्हणून लिहिलेली पहिली प्राणिकथा आढळते ती अकराव्या शतकात, ‘एकबॅसिस कॅप्टिव्ही’ : अनामिक कर्त्यानं लॅटिनमधे लिहिलेली. मध्ययुगीन युरोपातील ही पहिलीवहिली मानवीकरण केली गेलेली anthropomorphic नीतिकथा. तिचं उगमस्थान फ्रान्सच्या व्हास्जेस प्रदेशानजीक मानलं जाणारं. हेक्झामीटरमधेे लिहिल्या गेलेल्या कवितेच्या रूपातील या कथेत सापडतात ते करटक आणि दमनकाचे नातेवाईक कोल्होबा! गोष्ट अशी की वनराज सिंह पडतात आजारी. त्यांना पाहायला येणारे सर्व प्राणी काही ना काही इलाज सुचवतात. फक्त कोल्होबा समाचाराला काही येत नाहीत. साहजिकच उपाय सुचवत नाहीत. तेव्हा संधिसाधू लांडगा कोल्होबाला फासावर लटकवायला सुचवतो! कोल्होबा येतात. आपण तीर्थयात्रेला गेल्याचा खुलासा करतात. आणि मग उपाय सुचवतात : लांडग्याचं ताजं सोललेलं कातडं गुंडाळलं की सिंह महाराज बरे होतील! लांडग्याच्या जिवावर जेव्हा बेततं त्या वेळी कोल्हा त्याचा मृत्युसंदेश लिहितो. इथून सुरू झालेलं, एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या कोल्हा व लांडग्याचं वैर पुढे कित्येक शतकं प्राणिकथांना कथाविषय म्हणून पुरलेलं दिसतं!

काळाच्या ओघात ‘फेबल्स’चं, नीतिकथेचं रूप बदलत गेलं. केवळ नीतिमत्तेवर भर न देता, बोध करणं हेच उद्दिष्ट न ठेवता मनोरंजनासाठी रचलेल्या beast tales या छोटेखानी गोष्टी आणि beast epics या चांगल्या लांब-रुंद कथा-काव्याच्या फॉर्म्सचा उदय झाला. या दोन्हींमधे आढळतात एकमेकांवर चातुर्यानं मात करणाऱ्या प्राण्यांच्या अतिशय रोचक कथा!

या कथांत सार्वत्रिकरीत्या सापडतो तो चतुर कोल्हा

सन 1148-49 मधे रचल्या गेलेल्या येसेनग्रिमस या लॅटिन प्राणिकथा मालिकेत सुरुवातीला आयसेनग्रिन लांडग्याची सरशी होते तिथपर्यंतच. बाकी सगळीकडं रेनार्ट कोल्हा सतत लांडग्याला फसवत आणि चिडवत, सतावत राहतो. त्यातली एक गमतीची गोष्ट. रेनार्ट लांडग्याला बर्फात मासे पकडायला- ‘आइस फिशिंग’ला घेऊन जातो. लांडग्याला आपली शेपटी माशांना भुलवायला गळ म्हणून वापरायची गळ घालतो. पुरेसा वेळ झाला की कोल्हा म्हणतो, ‘‘हं, ऊठ आता!’’ लांडगोबा उठायला पाहतो. पण उठू थोडाच शकतोय! लांडगोबाची शेपटी पूर्ण थिजून बर्फात अडकून गेलेली! लांडगोबा संतापानं, उद्वेगानं ओरडतो, ‘‘खोटारड्या, तू काय बोलतोस हे तुलातरी कळतंय का? माझ्या बुडाशी अख्खा स्कॉटलंड लटकलाय!’’... या अशा फसवाफसवीच्या गमतीदार कथांतून कधी लांडगा आणि कोल्हा ही रूपकं म्हणूनही वापरली गेली. लांडगा हा इतरांची पापापासून मुक्तता करण्याचा आव आणणारा ढोंगी धर्मगुरू आणि दुसरीकडं अक्कलहुशारीच्या बळावर सरशी मिळवणारा कोल्हा हा फारशी सत्ता हाती नसलेल्या दीनदुबळ्या सर्वसामान्य माणसाचं प्रतीक या रूपांत सामोरे येतात!

युरोपातल्या प्राणिकथांत हा कोल्हा जर्मनीपासून अनेक ठिकाणी गोष्टींतून फिरताना आढळतो. नावातल्या थोड्याफार फरकानं.

व्यापाऱ्याच्या मुख्य तिठ्यावर नसलेल्या आणि वसाहतवादाच्या स्पर्धेच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या रशियापर्यंत या प्राणिकथा पोचल्या त्या अनेक प्रवाहांच्या संगमातून. बायझेंटाइन, ग्रीको-स्लावोनिक सत्ता, बौद्ध धर्माचा प्रभाव असलेल्या काही भागातील मंगोल राजवटीनंतर आणि पुढच्या काळात झारनं पाश्चिमात्य संस्कृतीसाठी उघडलेल्या दारांतून. जरी या कथा परकीय परिवेष घेऊन रशियात प्रकटल्या तरी त्या कालांतरानं रशियन मातीचं रंगरूप घेत रुजल्या. आपले रेनार्ट कोल्होबा रशियाला चिकटलेल्या फिनलंड- स्कँडिनेव्हियन  सीमेवरून तुरुतुरु पळत रशियन ‘बीस्ट एपिक’मधेे पोचले, पण रशियात पोचेपर्यंत त्यांनी अवतार बदलून ‘कोल्हीणबाईचं’ रूप घेतलं!

मनोरंजन हे मुख्य मूल्य जपलेल्या या कोल्हीणबाईच्या गोष्टी रशियन प्राणिकथांत आणि एपिकमधे मोठ्या प्रमाणावर आढळतात. पण स्थळ आणि काळ बदलला, तरी कोल्हा आणि लांडग्याचं नातं मात्र बदललेलं दिसत नाही. कोल्हा इथंही लांडग्याला ठकवतोच. कधी इतर प्राण्यांशी संगनमत साधून त्याला त्रास देतो. त्याला फसवून लांडग्याच्या पाठीवरून सैर करतो. चोरून मध खाल्ल्यावर ‘बुडघागरी’सारखी फसगत होऊ नये म्हणून चांगलीच युक्ती लढवतो आणि लांडग्यालाच तोंडघशी पाडतो. आपल्याकडं कोंबडीच्या पिलाच्या पाठीवर पान पडल्यानंतर ‘आभाळ पडलं’ म्हणून घाबरून धावणाऱ्या प्राण्यांना घरात आश्रय देऊन गट्टम करणाऱ्या कोल्ह्याच्या धूर्तपणाच्या अनेक छटा कमी-अधिक प्रमाणात या कोल्हेकथांतून दिसतात. तो गरजेप्रमाणे कमी-जास्त दुष्ट, चलाख, चाणाक्ष जरूर असतो!

कोणतीही गोष्ट पुढं वाहून नेण्यासाठी ‘नायक’ किंवा प्रोटॅगॉनिस्ट महत्त्वाचा असतोच. पण मग या अशा ‘चोरावर मोर’ प्राणिकथांत नायक कोण? ठकवणाऱ्या, थोड्या नकारात्मक छटा असणाऱ्या कोल्होबांना ‘नायक’ तरी कसं म्हणावं? प्राणिकथांच्या विश्वात वाघ, सिंह, हत्ती अशा बलाढ्यांसमवेत आढळतात काही शारीरिकदृष्ट्या दुर्बळ प्राणी. प्राणिविश्वाच्या उतरंडीवर फार उच्च स्थानी नसणारे. पण प्राणिकथांच्या इतिहासात त्यांनी या बलाढ्य नायकांच्या बरोबरीनंच, त्यांनी एक खास स्थान मिळवलेलं दिसतं.

प्राणिकथांतला हा लोकप्रिय ‘मोटिफ’- कल्पनाबंध म्हणजे प्राणिजगतातील ‘ठकसेन : ट्रिक्सटर!’

‘ट्रिक्सटर!’ ही प्राणिकथांतील खास  जमात! आपल्या भाईबंदांना ठकवणं आणि त्यापासून आनंद घेणं हाच त्यांचा उद्योग! हा ठकसेन चतुर असतो आणि शारीरिक दुबळेपणाची कसर ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ या न्यायानं तो बुद्धीच्या, अक्कलहुशारीच्या बळावर भरून काढतो. मौखिक कथा-परंपरेतून विकसित झालेली ट्रिक्सटर ही फार गमतीची, गुंतागुंतीची व्यक्तिरेखा. हा बहुतांश वेळा मानवीकरण झालेला anthropomorphic प्राणी. तो राहतो प्राणिविश्वात. पण समोर आलेल्या परिस्थितीत तो प्राण्यांपेक्षाही माणसासारखा वागतो. त्याला बऱ्याचदा अतिमानवी, मर्यादित जादूई शक्तीही असतात. एखाद्यावर कुरघोडी करण्यासाठी साम-दाम-दंड-भेद अशा कशाचाही वापर करायला हा ठकसेन कचरत नाही. हा सर्वज्ञानी(!) महाउपद्‌व्यापी प्रकार कित्येकदा निर्व्याजपणातून मूर्खपणा करतानाही दिसतो. नको तिथं नाक खुपसण्याच्या सवयीतून, फाजील आत्मविश्वासातून अडचणीतही येतो. अगदी गंमत म्हणून प्राण्यांना त्रास देतो. जुनं वैर लक्षात ठेवून कधीकधी दुष्ट विध्वंसक रूपही धारण करतो. स्वतःचं महत्त्व येनकेन प्रकारेन वाढवणं त्याला आवडतं.

प्राणिकथांच्या लोकप्रियतेत आणि दूरवरच्या प्रसारात या ‘ठकसेनां’चा वाटा फार मोठा. कारण त्यांना असलेलं खरंखुरं मानवी परिमाण.

रशियाच्या रेनॉर्ट कोल्ह्याशी अर्थार्थी तसा संबंध नसलेला पण त्याच्याच पंथाचा एक ‘नमुना’ म्हणजे ‘अनान्सी’. हा मूळ पश्चिम आफ्रिकेचा राहणारा.  घाना- लायबेरिया-नायजेरिया असं त्याचं वास्तव्य.

आपल्या प्राणिमित्रांना, आजूबाजूच्या माणसांना आणि पऱ्या-बिऱ्या अशा जादूई शक्तींना फसवणं हा त्याचा आवडता उद्योग. हा एक लबाड, चलाख, स्वार्थी आणि लोभी कोळी! सहा पायांचा, अंगात फारशी ताकद नसलेला लेचापेचाच म्हणावा असा प्राणी. पण आपल्या चलाखीनं असं काही जाळं या भवतालच्या मंडळींभवती विणण्यात वाकबकार, की ही मंडळी त्यात कधी, कशी अडकतात ते त्यांचं त्यांनाही कळू नये! हा यजमानाच्या डोळ्यांत धूळ फेकून, आमंत्रण नसलेल्या मेजवानीवर यथेच्छ ताव मारून येतो... ‘‘तुझी लांबी मोजतो बरं का!’’ असं सांगून भल्या मोठ्या अजगराची शेपटी झाडाला बांधून ठेवून त्याची खोड मोडतो. अजगरासारखाच तो चावऱ्या मधमाश्या आणि चपळ बिबट्यालासुद्धा अक्कलहुशारीने ठकवतो. हा प्राणी खरा कसा दिसतो ते कुणालाच माहीत नाही!  त्याचं रूप दर गोष्टीनुसार बदलतं. कधी सहा पायांच्या कोळ्याच्या ‘ओरिजिनल’ रूपात तो दिसतो. तर कधी एक टक्कल पडलेलं बिलंदर व्यक्तिमत्त्व म्हणून तो सामोरा येतो. त्याचा शारीरिक दुबळेपणा सार्वत्रिक. पण त्याच्या दिसण्याच्या पंचायती करतो कोण! दिसण्यापेक्षा त्याचे उपद्‌व्याप निस्तरता निस्तरता शतकानुशतकं लोकांच्या नाकी नऊ आलेलं!

तर अनान्सी शेती करतो. फसवून मेजवान्या आणि सण-समारंभांना हजेरी लावतो. नाच करतो. शेती अवजारांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करतो. किनाऱ्यावरच्या मच्छीमारांकडून मासे मिळवतो.  वसाहतवादपूर्व काळातलं पश्चिम आफ्रिकेचं जनजीवन अनान्सीच्या कहाण्यांतून प्रतिबिंबित होतं. पश्चिम आफ्रिकेच्या गुलामांच्या व्यापाराबरोबर तो कॅरिबियन बेटं आणि अमेरिकेत पोचला. हा हिकमती प्रकार तिथंही रुळला. हैतीमधेे ‘टी मलाइस’ नावानं ओळखला जाऊ लागला आणि रेनॉर्ट कोल्हा जसा रशियात पोचताना कोल्हीणबाई बनला, तसा अनान्सी अमेरिकेच्या दक्षिण भागात ‘आन्ट नॅन्सी’ नावानं प्रसिद्धीला आला.

अनान्सी दुसऱ्या खंडातून समुद्र पार करून अमेरिकेत पोचलेला. पण त्याचा दुसरा भाईबंद थेट अमेरिकन मातीतच रुजलेला. त्याचं नाव कोयोटी. मूळ अमेरिकन इंडियन जमातीतल्या लोककथांमध्ये हा सुखेनैव वावरणारा. कोल्हा-लांडगा-कुत्रा अशा प्राण्यांचं मिश्रण असलेला हा अमेरिकेचा खास स्वतःचा ठकसेन! वायव्य पॅसिफिक ते मेक्सिको अशा पट्ट्यातल्या प्राचीन कहाण्यांत त्याचं वसतिस्थान. अनान्सी जसा सगळीकडं ‘हिरो’ म्हणून वावरतो तसा स्वतःला नको इतका शहाणा समजणारा कोयोटी मात्र कितीही बिलंदर असला, तरी बऱ्याचदा ‘मूर्ख’ म्हणून सामोरा येतो. कोयोटी हुशार आहे. चतुर आहे. उत्सुक आहे. उत्साही आहे. पण मूर्खही आहे. त्याला प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी नाक खुपसण्याची सवय आहे. या खोडीपायी तो काही वेळा स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतो. त्याचा धूर्तपणा सफल होतो तेव्हा तो मस्त मौला असतो. पण आपल्या ‘योजने’त अयशस्वी होतो तेव्हा मुळीच खंत न करता तो पुन्हा नव्या दमानं आपल्या फसवण्याच्या नव्या योजना आखायच्या मार्गी लागतो. अशा या अर्ध्या ‘हिरो’ आणि अर्ध्या ‘झिरो’ ठकसेनाच्या चपळाईची एक गोष्ट सर्वत्र परिचित आहे. आणि त्यासाठी समस्त प्राणिजात त्याच्या ऋणात आहे! ...तर त्या वेळी जगात माणूस आणि प्राण्यांकडे अग्नी नव्हता म्हणतात. कोयोटीची चपळाई लक्षात घेऊन तीन दुष्ट शक्तींकडून त्यांना चकवून अग्नी आणण्यासाठी त्याला पाठवलं गेलं. कोयोटीनं या शक्तींकडचं जळतं लाकूड पळवून आणण्याचं काम शिताफीनं तर पार पाडलं, पण त्याची शेपटी मात्र पाठलाग करणाऱ्या तिघा दुष्ट शक्तींच्या हातात येताच अटीतटीच्या वेळी त्यानं विलक्षण चपळाईनं प्रसंगावधान राखून ते जळतं लाकूड सिंहाकडं फेकलं. सिंहाकडून ते ‘रिले’ होत होत झाडावर पडलं. झाड धडाडून पेटलं. दुष्ट शक्तींना झाडापासून आग काढून घेणं अशक्य बनलं! पुढे कोयोटीनं लाकडावर लाकूड घासून आग पेटवण्याचं चोरून आणलेलं तंत्रही प्राणिजगताला शिकवलं!

कोयोटीच्या प्रसंगावधानानं प्राणिमात्रांकडं अग्नी पोचला, ही गोष्ट शतकानुशतकं अमेरिकन स्थानिक जमातींत जिव्हाळ्यानं सांगितली जाते. विस्तवाच्या शोधापासून, सभ्यतेच्या उगमाच्या काळापासून, ॲझटेक मिथक कथांपासून थेट औद्योगिक क्रांतिपूर्व संस्कृतीपर्यंतच्या कथांत कोयोटीचा वावर आढळतो आणि बऱ्याचदा विविध कालखंडांत हा ‘अतिशहाणा बैल रिकामा’ कोयोटी नवनव्या क्लृप्त्यांच्या शोधात भटकताना दिसतो.

अन्न शिजवण्यासाठी, उबेपासून रक्षण करण्यासाठी, उजेडासाठी आग आणून देण्याचं उत्क्रांतीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच्या कामाचं श्रेय ठकसेन कोयोटीला एकट्याला सहजासहजी मिळत नाही. तर काही प्राणिकथांत एक निराळाच ठकसेन ते श्रेेय लाटताना दिसतो! आणि तोही अगदी परका! आफ्रिकेच्या सहारा परिसरामधला ‘झोमो’, ‘सुंगरू’, ‘सुलवे’ अशा नावांनी ओळखला जाणारा एक चतुर ससोबा!

अतिशय चलाख, चतुर, शहाणा, चपळ ससोबा! चांगलाच धिटुकला. आणि म्हणून  व्रात्य, खोडकर. विनोद त्याच्या अंगात पुरेपूर भरलेला!

‘मी आहे, मी आहे ससुल्या गडी

डुल डुल डुल डुल डुलक्या काढी

वाघोबाचे डोळेच फोडी!’

अशा बढाईतून वाघाला ठकवणाऱ्या आपल्याकडच्या ससोबात आणि याच्यात आश्चर्यकारक साधर्म्य!

एकदा हा आफ्रिकेतला ससा आणि बिबट्या चुकून एकाच ठिकाणी घर बांधतात, आणि ‘आलिया भोगासी’ न्यायानं एकत्र राहण्याचा प्रयत्न करतात. पण ते काही जमत नाही. मग मोठ्या ताकदवान बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी ससा कारस्थान रचतो आणि बंद दाराआड बायकोशी ‘बिबट्याचं मांस कसं आपल्या भाईबंदांना प्रिय आहे,’ याचं मोठ्यांदा वर्णन करत, भेदरलेल्या बिबट्याला पळवून लावण्यात चलाखीनं यशस्वी होतो!

हा ससोबाही गुलामांच्या जहाजावरून प्रवास करत अमेरिकेत पोचला. तिथल्या ‘चेरूकी’ जमातीतल्या आणखी ठकसेन कथांशी संकर होऊन पुढं ‘ब्रेर रॅबिट’ नावानं जगात सर्वत्र लोकप्रिय ठरला. ‘ब्रेर रॅबिट’ हा अमेरिकेतल्या ‘अंकल रेमुस’चा मानस पुत्र आणि अंकल रेमुस हा जोएल शँडलर हॅरिस या पत्रकार लेखकाचा मानस पुत्र. अंकल रेमुस हा मळ्यातला कृष्णवर्णीय गुलाम. आता तो मुक्त झालेला.

गोऱ्या मळेवाल्याच्या नातवाला तो गोष्टी सांगतो, त्या  ब्रेर रॅबिटच्या. ‘ब्रेर रॅबिट’ हा ‘ब्रदर रॅबिट’चा बोलीभाषेतला अपभ्रंश. खरं तर, या स्थलांतरितांच्या जिभेवर रुळलेलाच उच्चार. आपल्यापेक्षा ताकदवान प्राण्यांना ब्रेर रॅबिट आपल्या बुद्धिचातुर्यानं फसवतो. चलाखीनं अडचणींतून सुटका करून घेतो. तो दुष्ट नाही. खोडकर आहे. बंडखोर नाही. उलट आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीला सामोरं जाताना, अपरिहार्यतेवर चातुर्यानं मात करणारा आहे. ‘ब्रेर रॅबिट’ आणि ‘ब्रेर फॉक्स’ यांची ‘टार बेबी’ची गोष्ट याचं उदाहरण म्हणून सांगितली जाते. ब्रेर रॅबिटला अडकवण्यासाठी कोल्हा एक डांबरी चिकट बाहुली तयार करतो. पण तिला ससा चिकटूनही बसतो. पण युक्तीनं कोल्ह्याच्या तोंडातून निसटतो, अशी ही कथा. हा ‘चिकटण्याचा’ कल्पनाबंध भारतीय जातकांतही आढळून येतो. आणि महाराष्ट्रात रोज गूळ खाणाऱ्या कोल्ह्याला शेतकरी, फणसाच्या चिकाचं बाहुलं करून अडकवतो अशा गोष्टीचा उल्लेख लोकसाहित्याच्या अभ्यासक दुर्गा भागवत करताना आढळतात.

‘ब्रेर रॅबिट’ हा केवळ प्राणी नाही. तो मानवी सामाजिक सांस्कृतिक इतिहासाचा एक महत्त्वाचा घटक आहे. तो केवळ ट्रिक्सटर किंवा ठकसेन या कल्पनाबंधाच्या पलीकडे जाऊन पोचतो. दूरदेशी, हलाखीचं जिणं जगणाऱ्या कृष्णवर्णीय गुलामांच्या मन:स्थितीचा तो थेट उद्‌गार आहे. कोल्हा आणि सशाच्या या कथेसारख्या गोष्टी तत्कालीन कृष्णवर्णीय गुलामांच्या समाजजीवनाचं प्रतिबिंब सहज शोधता यावं इतक्या जिवंत. अन्यायाच्या, असाहाय्यतेच्या जिण्याला सकारात्मकतेनं सामोरं जाऊन विनोदाच्या अंगानं सुसह्य बनवणाऱ्या या अंकल रेमुसच्या ‘ब्रेर रॅबिट’ कथांना म्हणूनच फार मोठं सामाजिक मूल्य आहे. स्वातंत्र्य-युद्धोत्तर काळात कृष्णवर्णीय जीवनाचं चित्रण करणाऱ्या आणि स्थलांतरितांच्या बोलीभाषेची प्रतिष्ठा जपणाऱ्या कथा म्हणून शँडलरच्या या कथांचा उल्लेख गौरवानं केला जातो.

रेनॉर्ट कोल्हा, अनान्सी कोळी, कोयोटी कोल्हा- लांडगा आणि ब्रेर रॅबिट ससेभाऊ यांच्यासारखे असे अनेकानेक ठकसेन आपल्याला प्राणिकथांच्या प्रांगणात आढळतात. ॲमेझॉन खोऱ्यातलं जाबुटी कासव, चीनचं सुन वुकाँग माकड, इंडोनेशिया-मलेशियातलं कांचील हरण ही सारी निरनिराळ्या कथनसंस्कृतींत रुजलेल्या ठकसेनांची उदाहरणं. ठकसेन हा प्रत्येक समाजाचा अविभाज्य घटक. ठकसेनांचं प्रत्येक समाज-संस्कृतीत आपलं-आपलं एक खास स्थान. आपलं-आपलं एक खास कार्य. मुळातच असलेली हुशारी आणि नावीन्यांची धडपड, यांच्या बळावर कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची तयारी ही यांची वैशिष्ट्यं. हा व्यामिश्र कल्पनाबंध नायकांच्या गुणाबरोबर माणसातल्या खलनायकी वैशिष्ट्यांचंही दर्शन घडवणारा. हा कल्पनाबंध प्राणिकथांना मानवी जगण्याच्या फार जवळ आणणारा. मानवी मनाची स्वार्थी, कोती, गडद बाजू या व्यक्तिरेखांतून सामोरी येणारी. चोरावर मोर होण्याच्या मानवी वृत्तीचं चित्रण यातून घडतं. जगण्याच्या संघर्षाचं तरण्याच्या- किंबहुना न बुडण्याच्या आटोकाट प्रयत्नांचं दर्शन यातून प्रत्ययाला येतं. यात दरवेळी हा ठकसेन जिंकत नाही. ‘म्हातारे म्हातारे बोरं पिकली’ म्हणून तिला त्रास देणारा कोल्होबा म्हातारीच्या अनुभवजन्य शहाणपणातून स्वतःचं बूड भाजून घेतोच!  प्रत्येकच ठकसेनाला महाठक भेटतोच. प्रसंगावधानाचा, चतुराईचा, अनाठायी उत्साहाला आवर घालण्याचा, कसं वागू नये, याचा आणि समाजातल्या धूर्त प्रवृत्तींचा सामना कसा करावा याचा संदेश अतिशय सोपेपणानं देणाऱ्या या कथा... देशोदेशी पांगलेल्या. पण मूळ गाभ्यात एकमेकींशी बांधलेल्या. गुंतागुंतीच्या जगण्यात टिकून तरून राहण्याचा वस्तुपाठ देणाऱ्या या सहजसुंदर ठकसेन कथा मौखिक साहित्य, लोकसाहित्य आणि नंतर बालसाहित्याच्या प्रांगणात न रुळत्या तर नवलच!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

स्वाती राजे,  पुणे
swatijraje@gmail.com

साहित्यिक, संशोधक, लेखिका 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके