डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

‘द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया’, या सी.एस.लुईसच्या गाजलेल्या पुस्तकात नोम्सना ‘भूमिपुत्र’ म्हटलं गेलंय. ते माणसासारखे दिसतात. पण वेगवेगळ्या रंगांचे असतात. नार्नियातली दुष्ट राणी - ‘द लेडी ऑफ द ग्रीन कर्टल’ नोम्सना आपले गुलाम म्हणून वागवत असते. तिच्या पाडावानंतर नोम्स आपल्या खऱ्या घरी जमिनीत खोल खोल परत गेलेले दिसतात. हॅरी पॉटरमध्ये हॅरीचा मित्र वीझली नोम्सशी फार कनवाळूपणे वागताना आपल्याला दिसतो. अशी अतिमानवी योनी असलेले कल्पनाबंध जगात अनेक संस्कृतींतील लोकसाहित्यात आढळतात. जर्मनीत ‘रुबेझॉल’ हा डोंगरातला नोम्स सापडतो. डच कथांतला ‘कबाउतार’ हा ठेंगू बाबा तिथल्या लोकांना लाकडी बूट बनवायला शिकवतो. तर स्वीडिश खुजा ‘टॉमटे’ हा नोम्सचा जवळचा भाईबंद शोभतो! 

युरोपीय लोकसाहित्यातून परीकथेत प्रकटलेल्या अतिमानवी मंडळींमध्ये ‘एल्फ’ हे प्रकरण एकंदर बहुरंगीच! विविध आकारांच्या, प्रकारांच्या या कलंदर बुटक्यांतील एका खास ‘प्रकरणा’ची नोंद केल्याशिवाय या जमातीची ओळख पुरी होत नाही. कधी एल्व्ह्‌ज जमातीची टोपी चढवणाऱ्या, तर कधी सोयीनं स्वतःचं स्वतंत्र संस्थान थाटणाऱ्या या महाखटाटोपी प्रकाराचं नाव, कोबॉल्ड. प्रामुख्याने जर्मन लोकसाहित्यात याचा वावर.

‘कोबॉल्ड’ हे मायावी प्रकरण. कोणतंही रूप तो अंगीकारू शकतो. स्वतःच्या मूळ रूपात तो सामोरा येईल किंवा एखाद्या प्राण्याच्या किंवा अगदी एखाद्या वस्तूच्या... म्हणजे अगदी मेणबत्तीच्यासुद्धा! हा माणसाच्या घरात राहणं पसंत करणारा. ‘नॉर्मल’ वागायची लहर आली तर शेतकऱ्याचा वेश घेणारा.

कोबाल्डचं मूळ अस्तित्व प्राचीन ग्रीक मिथकांमध्ये आढळतं. पुढे युरोपच्या रोमन कॅथॉलिकीकरणानंतर तिथला मूळच्या पेगन - बहुदैवतवादी श्रद्धांच्या खुणा कोबाल्डच्या रूपाने शिल्लक राहिलेल्या दिसतात असं समाजशास्त्रज्ञांचं मत. कोबॉल्डच्या कथा युरोपीय समाजात घराघरांत रोजच्या जगण्यात विणलेल्या होत्या. कोबॉल्डच्या मूर्ती घडवणं हा तत्कालीन समाजजीवनातला एक भाग होता. विशिष्ट लाकडापासून ह्या मूर्ती कोरल्या जात. त्यांना रंगीत कपडे दिले जात. शिवाय त्यांचा चेहरा नेहमी हसरा राखला जाई. म्हणजे अगदी तोंड उघडून हसण्याची हौस असलेले कोबॉल्ड घरोघरी दिसत. सतराव्या शतकात प्रचलित झालेला 'to laugh like Kobold' हा वाक्प्रचार यातूनच आलेला!

तर ‘कोबॉल्ड’ हा ज्या लॅटिन आणि नंतर ग्रीक शब्दाचा अपभ्रंश होत युरोपीय साहित्यात स्थिरावला. त्याचा मूळ अर्थ होता ‘ठगोबा’ किंवा ‘गुंडोबा’! तोच विशेष घेऊन कोबॉल्ड सर्वदूर वावरला. कधी चार वर्षांच्या मुलाच्या इतकी उंची असलेला, कधी डोक्यावर टोपी घातलेला, कधी सोनेरी कुरळे केस खांद्यापर्यंत रुळत असलेला, कधी लाल रेशमी कोट घालणारा- तर कधी मेंढपाळाच्या वेशातला कोबॉल्ड साहित्यातून प्रकटला. आकार बदलण्यात माहीर कोबॉल्ड कधी मांजर, कधी कोंबडा, कधी साप, तर कधी वटवाघळाच्या रूपातही दिसला. ‘फायर कोबॉल्ड’ तर घराच्या चिमणीतूनच ये-जा करायचा म्हणे!

‘ट्रूपिंग फेअरीज’चं म्हणजे, राजघराण्यातल्या पऱ्यांचं राज्य जसं समुद्राच्या तळाशी किंवा जमिनीच्या पोटात पसरलेलं, तशी ‘कोबाल्ड’ची वस्ती घरात किंवा कडेकपारीत. त्याचं राहण्याचं एक खास आवडतं ठिकाण म्हणजे खाणी! खाणीत राहणारे कोबॉल्ड पाठीवर कुबड असलेले, विद्रूप. मध्ययुगीन खाणकामगार कोबॉल्डचं अस्तित्व अगदी पुरेपूर मानणारा. खाणींमध्ये अपघात होणं, गुहा ढासळणं, दरड कोसळणं या साऱ्यांना कोबॉल्ड जबाबदार आहे असं मानलं जाई. जमिनीखाली मिणमिणत्या दिव्यांच्या उजेडात खाणकाम करणारे खाणकामगार काम नीट पूर्णत्वाला जाण्यासाठी कोबॉल्डची प्रार्थना करत. जमिनीखाली आपल्या जिवाच्या सुरक्षिततेसाठी त्याचं स्मरण करत. त्याचा कोप होऊ नये म्हणून करुणा भाकत.

आपण जीव धोक्यात घालून जे मौलिक धातू म्हणून खणतोय ते अखेर हिणकस खनिज निघणं ही केवळ ‘कोबॉल्ड’ची अवकृपा आहे, यावर मध्ययुगीन खाणकामगारांचा गाढा विश्वास असे! मग त्याला प्रसन्न करण्यासाठी सोनं-चांदी अर्पण केलं जाई!

कोबॉल्ड खाणीत जसा उपस्थित तसा समुद्रावर खलाश्यांच्या अध्येमध्येही हजर असे. काही वेळा काही  स्टाइलिश कोबॉल्ड खलाश्यांच्या वेशात बोटीवर पाइपचे झुरके घेतानाही आढळणारे! त्यातला ‘क्लाबुतरमान’ हा भडक माथ्याचा कोबॉल्ड जहाजबांधणीच्या लाकडातून आत शिरे आणि जहाज बुडायला आलं तर जहाज सोडणारा तो शेवटचा प्राणी असे!  जोपर्यंत खलाशी आणि कप्तान त्याचं आदरातिथ्य चांगलं करत, तोवर तो खूश! नाहीतर भर समुद्रावर जहाजाची आणि खलाश्यांची काही धडगत नसे!

जमिनीच्या पोटातल्या खजिन्याशी, खाणकामगारांच्या आयुष्याशी संबंधित कोबॉल्डप्रमाणे या भूमिगत खजिन्याचे राखणदार म्हणजे  नोम्स!  आपल्याला युरोपीय लोकसाहित्यात भेटणारे हे ‘नोम्स’ही परीकथेत एल्फबरोबर नांदणारी- पण त्यांच्यापेक्षा वेगळी असणारी जमात. काही वेळा नोम्सना एल्व्ह्‌ज (Elves) ची उपजात मानली जाते. पण ‘नोम्स‘ हे आपल्या काही खास गुणवैशिष्ट्यांनी युरोपीय लोकसाहित्यात आपलं खास स्थान टिकवून राहिले. Gnomes ही एल्व्ह्‌जसारखीच आकाराने खुजी मंडळी. अगदी अलीकडची त्यांची ओळख द्यायची झाली तर जे.के. रोलिंगच्या ‘हॅरी पॉटर’ मधून हे नोम्स आपल्याला भेटतात. बहुतांश वेळा त्रिकोणी लाल टोपीचे हे नोम्स बुटक्या म्हाताऱ्या दाढीवाल्यांच्या रूपात दिसतात. उपद्रव देण्यापेक्षा ते चांगुलपणासाठी अधिक प्रसिद्ध. एल्व्ह्‌ज जसे खोडसाळ, नाठाळ तसे नोम्स मदतीला तत्पर! एल्व्ह्‌जचा वावर सर्वत्र. तर नोम्स बहुतांश वेळा जमिनीच्या पोटात. प्रकाशापासून दूर! वाटलीच जर प्रकाशाची गरज तर हळूच बाहेर काढणार पावलं आणि घेणार थोडासा प्रकाश पावलांनी पिऊन!

अशा गिरिकुहराशी नातं असलेल्या ‘नोम्स’चा उल्लेख आढळतो तो रेनेसान्स काळाच्या अलीकडे-पलीकडे चौदा-पंधराव्या शतकात प्रचलित असलेल्या नव्या लॅटिन भाषेत- 'gnomus' असा. ग्रीक 'gnosis’  मधूनही तो शब्द आल्याचं म्हटलं जातं. याचा अर्थ 'knowledge'. तर हे ‘ज्ञानी’ नोम्स 'genomos' - म्हणजे मातीशी - भूमीशी संबंधित असल्याचंही म्हटलं जातं. जर्मन रेनेसान्सच्या काळचा तत्त्वज्ञ आणि तेथील वैद्यकीय क्रांतीचा प्रणेता समजल्या जाणाऱ्या पॅरासेल्सस  या विद्वानाच्या सोळाव्या शतकात प्रसिद्ध झालेल्या 'A Book on Nymphs, Sulphs,
Pygmies and Salamanders and on the other spirits'  या ग्रंथात नोम्सची पहिली लिखित नोंद आढळते. दोन वीत उंचीचे, माणसाच्या वस्तीपासून दूर राहणारे हे दिवाभीत नोम्स. एल्व्ह्‌ज जसे माणसाच्या वस्तीशी सहज लगटून राहतात, अगदी घरातही लुडबुड करायला मागेपुढे पाहत नाहीत, तसे नोम्स मात्र बुजरे. मानवजातीपासून  दूर फटकून राहणारे. त्यांना माणसाच्या दृष्टीआड राहणं आवडतं. त्यांच्या डोक्यावरच्या त्रिकोणी टोपीच्या लाल रंगामागचं कारणही बहुधा हेच असावं, असं सांगितलं जातं. ही टोपी त्यांनी खलाशांच्या वेशापासून प्रेरित होऊन घेतली म्हणे! समुद्रावर काळोखात उठून दिसण्यासाठी खलाशी पांढरी टोपी वापरत आणि दिसू नये म्हणून लाल. तर या आपल्या ‘नोम्स’नी आपण कुणाच्या दृष्टीला पडूं नये म्हणून लाल टोपीचा स्वीकार केला.

नोम्सचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे माणूस जसा सहजी हवेतून चालतो किंवा मासे जसे पाण्यातून सुळ्‌कन पोहतात, तितक्या सहजपणे नोम्स जमिनीतून आरपार चालू शकतात. जमिनीच्या पोटातलं अगदी केंद्रभागापर्यंत त्यांचं राज्य!

स्वित्झर्लंडच्या लोकसाहित्यात नोम्सबद्दलची एक खास कहाणी प्रसृत आहे. सन 1618 मध्ये इटली आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवर पियर्स गावावर दरड कोसळली आणि हे गाव पूर्ण नष्ट झालं. असं म्हटलं जातं की, पूर्वी या गावच्या रक्षणकर्त्या नोम्सनी या गावकऱ्यांच्या कल्याणासाठी जमिनीच्या भेगांभेगांतून  आपल्या खजिन्यातील सोन्याचा रस ओतला. गावकऱ्यांनी सोन्याच्या खाणी खोदल्या. लोक धनवंत झाले. पण धनाबरोबर आढ्यता, अहंकार आणि भ्रष्टाचारही आला. आपल्या या देणगीचा दुरुपयोग होताना पाहून नोम्स संतापले. गावकऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी त्यांनी दरड कोसळवून हे गाव नष्ट करण्याचा निर्णय घेतला... आणि तसं केलंही!

भलेपणाच्या मूल्याशी जवळचा संबंध असलेले नोम्स हे भूमिगत खजिन्याचे, रत्नांचे राखणदार. मानवजातीशी  मित्रत्वाचं नातं राखणारी, किंबहुना माणसाला त्रास न देणारी ही उद्योगी जमात. सज्जन माणसांच्या मुलांना ते भरभरून धन देतात आणि कधीही आपल्या उपकारांच्या परतफेडीची अपेक्षा करत नाहीत अशी त्यांची ख्याती.

नोम्स आधुनिक साहित्यात अनेक ठिकाणी दृष्टोत्पत्तीस पडतात. प्रामुख्याने फँटसी साहित्यात त्यांनी मोठी जागा व्यापली आहे. काळाच्या ओघात त्यांची वैशिष्ट्यं आणि कामं प्रत्येक लेखकाने आपापल्या कल्पनेने बदलली. बाउम्सच्या ‘विझर्ड ऑफ ओझ’मध्ये या नोम्सचा राजा ‘ओझ’ लोकांचा सल्लागार बनलेला दिसतो. काही गोष्टींत जमिनीखाली राहाणारे रत्नांच्या साठ्याचे रक्षणकर्ते नोम्स लांब दाढीचे, गोलमटोल, भडक माथ्याचे ‘अमर’ दाखवले आहेत. टॉल्किनच्या समग्र साहित्यात- ‘लिजेंडेरियन’ मध्ये नोम्सना महत्त्वाचं स्थान आहेच. त्याने चितारलेले नोम्स पारंपरिक नोम्सपेक्षा वेगळे, उंच, सुंदर, काळ्या केसांचे, सुज्ञ, ज्ञानी दिसतात. या नोम्सचा दुरभिमानही काही वेळा दृष्टीस पडतो!

‘द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया’, या सी.एस.लुईसच्या गाजलेल्या पुस्तकात नोम्सना ‘भूमिपुत्र’ म्हटलं गेलंय. ते माणसासारखे दिसतात. पण वेगवेगळ्या रंगांचे असतात. नार्नियातली दुष्ट राणी - ‘द लेडी ऑफ द ग्रीन कर्टल’ नोम्सना आपले गुलाम म्हणून वागवत असते. तिच्या पाडावानंतर नोम्स आपल्या खऱ्या घरी जमिनीत खोल खोल परत गेलेले दिसतात. हॅरी पॉटरमध्ये हॅरीचा मित्र वीझली नोम्सशी फार कनवाळूपणे वागताना आपल्याला दिसतो.

अशी अतिमानवी योनी असलेले कल्पनाबंध जगात अनेक संस्कृतींतील लोकसाहित्यात आढळतात. जर्मनीत ‘रुबेझॉल’ हा डोंगरातला नोम्स सापडतो. डच कथांतला ‘कबाउतार’ हा ठेंगू बाबा तिथल्या लोकांना लाकडी बूट बनवायला शिकवतो. तर स्वीडिश खुजा ‘टॉमटे’ हा नोम्सचा जवळचा भाईबंद शोभतो!

आपल्याकडे, भारतीय उपखंडात या ‘नोम्स’च्या किंवा एल्व्ह्‌जच्या जवळ जाणारी एक व्यक्तिरेखा प्राचीन साहित्यात आढळते ती म्हणजे यक्ष!

बऱ्याचदा पौर्वात्य साहित्यात यक्ष हे बुटके, जाडे, ढेरपोटे रंगवले जातात. यक्षिणी सुंदर, सौष्ठवपूर्ण. सामान्यतः यक्ष हे पाण्याशी संबंधित शक्ती असल्याचं दिसतं. त्यांचं वाहन बऱ्याचदा मगर किंवा माशाच्या शेपटीचा प्राणी असल्याचं प्रतीकात्मकरीत्या दाखवलं जातं. यक्षांची व्यक्तिरेखा ‘आयरिश परीकथा किंवा मिथककथांतील  'Lords of Life' समजल्या जाणाऱ्या ‘तुआथा दी दनान’ या व्यक्तिरेखेच्या जवळ जाणारी ठरू शकेल.

तुआथा दी दनान हीसुद्धा पाण्याशी संबंधित शक्ती. पण ते राहतात जमिनीवर. तर यक्ष तळ्यात! यक्ष ही ‘जल’ किंवा ‘रसा’चं नियंत्रण करणारी शक्ती. त्यांचं हे काम केवळ तलाव, विहिरी, पाणवठ्यांपुरतं मर्यादित नाही तर झाडापानांतील आंतरसालातील रसांचा स्रावही ते नियंत्रित करतात अशी प्राचीन लोकसंस्कृतीची धारणा. जलाशय हे यक्षाला स्वतःचं हक्काचं राज्य वाटतं, याचे उल्लेख प्राचीन साहित्यात आपल्याला दिसतात!

 बौद्ध जातकांत यक्ष हा वैश्रवणाचा मदतनीस असल्याचं सांगितलं जातं. वैश्रवणाने नेमून दिलेल्या तळ्यात एक यक्ष राहत असे. त्याला तळ्यातल्या प्राण्यांना खाण्याची मुभा होती. परंतु हा यक्ष पाणी प्यायला येणाऱ्या माणसांना प्रश्न विचारत असे आणि त्यांना उत्तर देता आलं नाही तर कोंडून ठेवून मारत असे. बोधिसत्त्वाने त्याच्या कूट प्रश्नांची यथायोग्य उत्तरं देऊन आपल्या सग्यासोयऱ्यांची सुटका केली अशी कथा जातकांत आढळते. पाणी प्यायला येणाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा आपला हक्क यक्ष महाभारतातही बजावताना दिसतोच.

कुबेरासारखे यक्ष जसे कल्याणकारी, तसे दुष्ट यक्षही दिसतात. धनाचे, दिशांचे रक्षण करणारे यक्ष जसे आढळतात तसे वाटमारी करणारे, लुबाडणारे अगदी दोघा यक्षांच्या सीमेवर पडणारे प्रेत कुणाच्या वाटणीचे यावरून भांडणारे यक्षही जातकांत दिसतात.

यक्षांना जादूई शक्ती असतात. मनुष्याला बंद दरवाजातून कुठेही नेण्याची विद्या त्यांना अवगत असते.

संध्याकाळपासून रात्रीपर्यंत त्यांच्या संचाराचा हक्काचा काळ. स्मशान हे यक्षांचे, विशेषतः यक्षिणींचे आवडते ठिकाण. एका संन्याशाने यक्षिणीला प्रसन्न करण्यासाठी स्मशानात होम केला. तेव्हा विद्युन्माला नावाची यक्षीण अवतरली असा उल्लेख कथासरित्सागरात आढळतो. यातही यक्षिणींची ‘श्रेणी’ दिसते! विद्युन्माला, चंद्रलेखा आणि सुलोचना या यक्षिणी या ‘यक्षपंथात’ श्रेष्ठ- असाही उल्लेख या कथेत आढळतो.

 यक्ष हा अतिमानवी शक्तींमधला गुंतागुंतीचा, सुष्ट-दुष्ट अशा दोन्ही बाजू असलेला, विविध प्रकारची भली-बुरी कामं करणारा, विलासप्रिय, चंचल वृत्तीचा आणि पिशाच किंवा राक्षसाच्या जवळ जाणारा प्रकार समजला जातो. त्याच्या या गडद-रोचक स्वरूपामुळे तो अन्य अभ्यासकांना जवळचा वाटला असावा. ज्येष्ठ संशोधक डॉ.आनंदा कुमारस्वामी यांनी या यक्षाचा तपशीलवार अभ्यास करून ग्रंथ सिद्ध केला आहे. आणखीही काही संशोधकांचं लक्ष यक्षानं वेधल्याचं दिसतं. मात्र प्राचीन साहित्यातला अद्‌भुताचं परिमाण लाभलेला यक्ष भारतीय परीकथेत तितकासा रमलेला - रुळलेला दिसत नाही.

एल्व्ह्‌ज, नोम्स आणि यक्षासारखाच जादूई, पण जरा गडद छटेने रंगलेला एक कल्पनाबंध पाश्चिमात्य परीकथेत अतिशय जोरकसपणे आपलं अस्तित्व दाखवताना आढळतो. तो म्हणजे ‘‘चेटकीण’’!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

स्वाती राजे,  पुणे
swatijraje@gmail.com

साहित्यिक, संशोधक, लेखिका 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके