डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

प्राणिकथा कायमच अशा मुलं आणि मोठ्या माणसांच्या दोन्ही परिसरांत रेंगाळत राहिल्या. सर्वच अर्थानं  हा बहुगुणी साहित्यप्रकार. समाजातील दंभाचा समाचार घेण्यासाठीचं साधन, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठीचं अवजार, आपल्या दडपलेल्या स्वप्न- आकांक्षांचा सूर प्रकट करण्यासाठी वापरलेलं माध्यम, वर्णभेद-विरोधातलं हत्यार अशी प्राणिकथांची अनेक उपयोजनं प्राणिकथांच्या विकसनाच्या कालखंडात दृष्टीला पडतात. या इतक्या मूलभूत, लवचीक आकृतिबंधाची भुरळ भल्याभल्यांना न पडली तरच नवल! या खऱ्या अर्थानं ‘फॅब्युलस’ फॅब्युलिस्ट्‌सनी ‘फेबल्स’ हा फॉर्म निरनिराळ्या कालखंडांत  आपापल्या परिप्रेक्ष्यातून जगात सर्वत्र हाताळला. फेबल्सच्या पुनर्रचनेची ओढ प्रत्येक संस्कृतीत, प्रत्येक कालखंडात, प्रत्येक संवेदनशील सर्जनशील मनाला होती. आणि म्हणून प्राणिकथा सातत्यानं निरनिराळ्या रंगांत- पोतांत बाजात सामोऱ्या आल्या.

वाघा-सिंहांच्या, कोल्ह्या-लांडग्यांच्या कथा आशिया-युरोपात व्यापाऱ्यांच्या तांड्यांबरोबर वाहिल्या. कृष्णवर्णीय गुलामांनी आपल्या मातीचं गाणं ह्रदयाशी जपत साता समुद्रापार अमेरिकेपर्यंत नेल्या. आफ्रिकेच्या जंगलात शेकोटीभोवती मुला-माणसांनी रात्र-रात्र त्या पालवल्या. तशा काही कहाण्या धर्मप्रसाराचा भाग म्हणून अति पूर्वेकडे गेल्या. बुद्ध धर्माच्या प्रसाराबरोबर चीनमधेे चौथ्या ते सहाव्या शतकात पोचलेल्या जातक कथा ‘बोरे जिंग’ या नावानं प्रसिद्धीला आल्या. चीनमधेे खरं तर राशिचक्र प्राण्यांशी संलग्न. त्यामुळं लोकजीवनात प्राणिकथा खोलवर रुजलेल्या होत्या. त्याची फारशी माहिती दीर्घ काळ जगाला नव्हतीच. याचं मुख्य कारण म्हणजे भाषेचा अडसर. चिनी कथा ज्या ग्रंथांत समाविष्ट केल्या गेल्या होत्या ते अगदी विशिष्ट प्रकारचा उच्च व्यासंग असलेल्या व्यक्तींनाच वाचता येणं शक्य होतं आणि जे काही लिखित ग्रंथ मिशनरी मंडळींसाठी उपलब्ध होतं, त्यातील पुस्तकी भाषा आणि प्रचलित असलेली कहाण्यांची बोलीभाषा यांत कितीतरी अंतर होतं. आजपर्यंत बाह्य जगापासून दूर राहिलेला हा खजिना विसाव्या शतकात प्रथम इंग्रजीत भाषांतरित झाला आणि पाश्चिमात्य जगाला याचा परिचय झाला.

या अतिशय सहज-सुंदर कथांत आपल्याला कोल्होबा भेटतोच. पण इथला खेकडा कोल्होबावर मात करतो. गरुड आणि भातपिकावर उपजीविका करणाऱ्या ‘राइस बर्ड’ पक्ष्याच्या अनाठायी स्पर्धेत त्यांची बाळं बदलतात. पण प्रत्येक जणाचं आपापलं रंगरूप ठरलेलं असतं. ते बदलता येत नाही हा धडा दोघांना मिळतो. यात नेहमीच्या प्राणिकथांत भेटणाऱ्या सिंह, हत्ती, मुंगी या वन्य प्राण्यांबरोबरच मांजरी, कोंबड्या, खेचर असे पाळीव प्राणीही दिसतात. या प्राणिकथांत बऱ्याचदा चढाओढ, स्पर्धा, वादंग यांच्या कथा आढळतात. या भांडकुदळ प्राण्यांची ‘कॉम्बिनेशन्स’ ही वेगळीच! मधमाश्या आणि गोगलगाय, कोंबड्या आणि कासव, सिंह आणि डास एकमेकांशी वाद घालताना दिसतात. स्वतःच्या हक्काच्या ‘जागे’साठीचा प्राण्यांचा झगडा बऱ्याच कथांतून प्रत्ययाला येतो. या सर्व कथांना तात्पर्य असतं. आणि इथंही इसापच्या कथांप्रमाणं दुर्बलांना आवाज उठवण्यासाठी हक्काची जागा प्राणिकथांतून राखलेली दिसते.

चिनी लोककथा-प्राणिकथांच्या अभ्यासाची सुरुवात व्हायला विसाव्या शतकाची पहिली दशपदी उजाडली. नव्या सांस्कृतिक चळवळीच्या उंबरठ्यावर चिनी बोलीभाषांना प्रतिष्ठा येऊ लागली तशी या  लोकपरंपरेतून आलेल्या कथांच्या अभ्यासाला गती मिळाली.

दरम्यान जपानमधेे सोळाव्या शतकात जेझुइट धर्मोपदेशकांबरोबर इसापकथा पोचल्या. परंतु जपानी लोकजीवनात त्यापूर्वी कित्येक शतकं आपली स्वतःची म्हणून प्राणिकथांची परंपरा रुजलेली होती. या कथा जातक कथांच्या प्रभावातून विकसित झालेल्या दिसतात.  माकड आणि कोल्हा ही पारंपरिक जपानी प्राणिकथांतून दिसणारी महत्त्वाची पात्रं. इथलं माकड म्हणजे दुष्ट, धूर्त, लबाड व्यक्तिरेखा. पण त्याच वेळी तो देवाचा, बुद्धाचा दूतही. ते पात्र चतुर, विनोदी आणि  सर्वांचं लाडकंही! या विरोधाभासाचं कारण म्हणजे आदिम शिकारी अवस्थेत माकड हे सहज उपलब्ध होणारं खाद्य होतं. पण पुढं कृषिसंस्कृतीच्या विकासकाळात शेतीची नासधूस करणारा उपद्रवी प्राणी म्हणून त्यानं माणसाचा रोष ओढावून घेतला. माकड हे जपानी प्राणिकथांत देवाचा दूत बनून येतं, तेव्हा माणसाला त्याच्या वर्तणुकीप्रमाणं वर किंवा शिक्षा देण्याचा हक्क बजावतं!

माकड जसा बुद्धाचा दूत तसा कोल्हा हा इनारी देवतेचा दूत! इनारी ही भाताची देवता. कोल्ह्याची हुशारी, चपळपणा आणि रात्रीचा दबकत वावर- त्यामुळं कोल्ह्याला एक गूढतेचं वलय जपानी प्राणिकथांत आलं आहे. त्याला जादूई शक्ती असतात. तो माणसाला ठकवण्यात बहाद्दर असतो! एकंदरीत कोल्हा हा प्राणिकथांचा सार्वत्रिक सार्वकालिक रहिवासी! जगात बहुतांश भूभागावर असलेला त्याचा अधिवास हे याचं रहस्य असावं!

धर्मप्रसाराच्या माध्यमातून जशा  प्राणिकथा  प्रसृत होत राहिल्या; तशा धनिकांच्या हौसेपोटी, राज्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राजाश्रयाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठबळानं प्राणिकथांच्या विकासप्रसाराला हातभार लागल्याचं दिसतं. प्राणिकथांचं प्रांगण खास करून मुलांसाठी खुलं होण्यात याचा मोलाचा वाटा ठरावा. चौदाव्या लुईच्या सहा वर्षांच्या मुलासाठी मूल्य शिक्षण देण्यासाठी ला फाँन्तेननं इसापकथा पुरस्कृत केल्या. लुईनं इसापच्या अडतीस  निवडक कथांवर आधारित जलस्तंभ शिल्पं व्हर्सायच्या राजवाड्यात उभारली असं सांगितलं जातं. इटालिअन राज्यकर्ता लोरेन्झो मेडिची यानं आपला मुलगा पिएरो याच्यासाठी 1480मधे एक खास भेट दिली. मुद्रणकला जवळजवळ दुर्मिळ असताना मेडिची यानं मुलांसाठी इसापकथांची खास एकमेव मुद्रित प्रत तयार करवून घेतली. बालवाचकांसाठी मुद्रित केलेलं फेबल्सचं, प्राणिकथांचं हे पहिलं ज्ञात उदाहरण.

दरम्यान, प्राणिकथांची आणि त्यातून रेनॉर्ड कोल्हा आणि लांडग्याच्या गोष्टीची समाजमनातली लोकप्रियता लक्षात घेऊन विल्यम्स कॅक्स्टन या पहिल्या इंग्रज मुद्रकानं या कथा रूपांतरित करून लाकडी ठोकळे कोरून मुद्रित केल्या. दि.26 मार्च 1484 ला कॅक्सटननं इसापकथा छापली आणि यातून प्राणिकथांची, तात्पर्यानं मुलांसाठीच्या मूल्यशिक्षणाची ‘सोपी पायवाट’ घालून दिली!

इंग्रजीच काय, मराठी मुद्रणकलेच्या इतिहासाचं आणि प्राणिकथांचं नातंही अतिशय मोलाचं! मराठीमधे पुस्तक मुद्रित व्हायला सुरुवात झाली, ती इंग्रजीच्या प्रभावातून. आणि पहिलंवहिलं पुस्तक इंग्रजीतून मराठीत अनुवादित झालं ते इसापनीती! 1809मधे तंजावरचे राजे सरफोजी भोसले यांनी सख्खन पंडित यांच्याकडून ते भाषांतरित करवून घेतलं. खरं तर या पुस्तकाचं नाव होतं ‘बाळबोध मुक्तावली’. हे पुस्तक आज प्रचलित नाही- पण याची एक प्रत ब्रिटिश म्युझियममधे जतन करून ठेवलेली आहे. यानंतर 1815मधे वैजनाथशास्त्रींनी ‘पंचतंत्र आणि हितोपदेश’ यांचे अनुवाद बंगालीतून मराठीत आणले. म्हणजे बाल साहित्याच्याच नव्हे; तर एकंदरीतच मुद्रित साहित्याचा मराठीतील प्रारंभ प्राणिकथांनी झाला! 1722 मधे ‘मुंबई हैंद शिक्षण मंडळी’ या नावानं  स्थापन झालेल्या शिक्षण खात्यानं किंवा तत्कालीन विद्याखात्यानं 1925 मधे जी शालेय पुस्तकं लिहवून घेतली, प्रसिद्ध केली आणि अभ्यासक्रमात लावली त्यात वैजनाथशास्त्रींच्या पंचतंत्रावरून मराठीत उतरलेल्या ‘पंचोपाख्याना’चा समावेश होता.

त्याच सुमाराला 1823मधे शिक्षण समितीवर बापू छत्रे यांची नेमणूक झाली. इंग्रजीतून अनुवाद होऊन मराठी गद्य सुबोध पुस्तकाची प्रथा त्यांनी सुरू केली आणि इंग्रजीतून अनुवादित होऊन ‘बाळमित्र’ व ‘इसापनीती’ या दोन पुस्तकांच्या रूपानं मुद्रित बालवाङ्‌मय मराठी साहित्याच्या दालनात प्रकटलं. याचं स्वरूप क्लिष्ट नव्हतं. ‘इसापनीती’ बालसुलभ, रंजक बनवण्यासाठी चित्रांचा वापर करण्यात आला. बाल साहित्य सचित्र असण्याची गरज या निमित्तानं सर्वप्रथम व्यक्त झाली. या इसापनीतीतील कथा पहिल्या पुस्तकापेक्षा व पंचोपख्यानापेक्षा सोप्या, सुटसुटीत होत्या. तात्पर्य- ही बुद्धीत भरावयास अवघड नव्हती. त्यामुळं ही इसापनीती लोकप्रिय ठरली. मराठी बाल साहित्याचा श्रीगणेशा असा प्राणिकथांनी केला!

विसाव्या शतकात मुलांसाठी म्हणून प्राणिकथा रुजता रुजता त्यात अनेक प्रयोग होत गेले. दूरदेशींशी विविध कारणांनं झालेल्या सांस्कृतिक अभिसरणातून नवनवे स्रोत प्रकटत चालले. भाषांतरयुगानं या देशोदेशीच्या प्राणिकथांशी मुलांची गट्टी करून दिली. अगदी रेनॉर्ड कोल्हाही मराठमोळ्या मातीत ‘राणा कोल्हा’ म्हणून अवतरला! प्राणिकथा हा जॉनर लेखकांचा आजही आवडता! आजही जगभरात प्राणिकथा विपुल लिहिल्या जातातच! या सर्व काळात प्राणिकथा तीन अंगांनी  विकसित झालेल्या दिसतात. एकीत प्राणी सर्वार्थानं  माणसांचीच बोली बोलतात. पंचतंत्र, इसापकथा यांचा उल्लेख यात करता येईल. दुसरीत प्राणी प्राण्यांसारखं बोलतात-वागतात. त्यांच्या विश्वातले ताळमेळ नीतिनियम चितारण्याऱ्या या कथा. ‘जंगल बुक’सारख्या प्राणी आणि माणसांच्या सीमारेषेवरच्या कथांचं अभिनव प्रयोगशील अनुकरण यात केलं गेलं. आणि तिसऱ्या कथा प्राण्यांविषयीच्या प्राणिजीवनाविषयी, त्यांचा वेध आपण बाहेरून घेऊन लिहिलेल्या. अलीकडच्या काळातल्या ‘वॉर हॉर्स’सारख्या कथांचा यात समावेश करता येईल किंवा पर्यावरणाशी नातं राखणाऱ्या कथांची यात वर्गवारी करता येईल.

निरनिराळ्या कालखंडांतील प्राणी आणि माणूस यांच्यातील भावबंध अतिशय बहुपेडी. बहुमिती. प्राणी हे माणसासाठी अस्तित्व टिकवण्यासाठीचं आव्हान होतं. भक्ष्य ते कृषिसंस्कृतीचं अवजार असं प्राण्यांचं स्थित्यंतर झालं. त्यानंतरच्या काळात माणसानं प्राण्यांना आपल्या जगण्यात जागा दिली. आपल्या भावनांचं आरोपण करून पंचतंत्र, इसापकथा आणि नंतरच्या अन्य मध्ययुगीन साहित्यानं प्राण्यांना 'questioning beasts and dreamland dragons' ची भूमिका देऊ केली. आपल्या सामाजिक-राजकीय व्यवस्थेचा, सभ्यतेचा कल्पित भाग बनवून त्यांना साहित्याच्या माध्यमातून मानवी जीवनाच्या वेशीच्या आत घेतलं. दरम्यान रेनेसान्स या काळात प्राणिकथांचं  महत्त्व काही काळ लोपल्यासारखं वाटता वाटता प्राण्यांबद्दलच्या एकोणिसाव्या शतकातल्या ‘ब्लॅक ब्यूटी’सारख्या कथांनी प्राणिकथांना पुन्हा एकवार उजाळा दिला.

प्राणिकथा कायमच अशा मुलं आणि मोठ्या माणसांच्या दोन्ही परिसरांत रेंगाळत राहिल्या. सर्वच अर्थानं  हा बहुगुणी साहित्यप्रकार. समाजातील दंभाचा समाचार घेण्यासाठीचं साधन, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठीचं अवजार, आपल्या दडपलेल्या स्वप्न- आकांक्षांचा सूर प्रकट करण्यासाठी वापरलेलं माध्यम, वर्णभेद-विरोधातलं हत्यार अशी प्राणिकथांची अनेक उपयोजनं प्राणिकथांच्या विकसनाच्या कालखंडात दृष्टीला पडतात. या इतक्या मूलभूत, लवचीक आकृतिबंधाची भुरळ भल्याभल्यांना न पडली तरच नवल! या खऱ्या अर्थानं ‘फॅब्युलस’ फॅब्युलिस्ट्‌सनी ‘फेबल्स’ हा फॉर्म निरनिराळ्या कालखंडांत  आपापल्या परिप्रेक्ष्यातून जगात सर्वत्र हाताळला.

फेबल्सच्या पुनर्रचनेची ओढ प्रत्येक संस्कृतीत, प्रत्येक कालखंडात, प्रत्येक संवेदनशील सर्जनशील मनाला होती. आणि म्हणून प्राणिकथा सातत्यानं निरनिराळ्या रंगांत- पोतांत बाजात सामोऱ्या आल्या.

ला फॉन्तेनने या कथा फ्रान्समध्ये लोकप्रिय केल्या. क्रायलोव्हने  रशियात त्यांना आपल्या मातीचा पोत दिला. भारतीय प्राणिजीवनाचे रंग ल्यालेल्या रुडयार्ड किपलिंगच्या ‘जस्ट सो स्टोरीज’पासून  हॅन्स अँडरसनपर्यंत आणि बिॲट्रिक्स पॉटरपासून टॉल्किनपर्यंत अनेकांनी या प्राणिकथांत आपापले रंग भरले. आकाशाला गवसणी घालणारा रिचर्ड बाखचा जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल आपली निराळीच धून लेऊन लहानमोठ्या मनाच्या अवकाशात पंख पसरून उडत राहिला. जेम्स थर्बरनं ससा आणि कासवाच्या गोष्टीला दिलेलं 'A new broom may sweep clean but never trust an old saw' हे व्यंगोसवषपूर्ण परिमाण वाचकाला रुचत गेलं आणि स्टॅलिनच्या एकाधिकारशाहीला पुरेपूर व्यंगोक्तिपूर्ण लेखणीने प्रतिकार करणारी  ऑरवेलची ‘ॲनिमल फार्म’ आज पंचाहत्तर वर्षांनंतरही जगात सर्वाधिक अभ्यासली जाणारी ‘पोलिटिकल फेबल’ म्हणून गौरवली जात राहिली. खलील जिब्रानसारख्या मातब्बरानं सुंदर अल्पाक्षरी रूपककथांच्या वाटेनं ‘चार बेडूक’सारख्या, सत्याचा केवळ शाब्दिक उदो उदो करणाऱ्या पण वास्तवात अर्धसत्याचे घुटके घुटके घेत जगण्याची चव घेणाऱ्या दांभिक जगाचं दर्शन घडवलं. तसं ‘दोन गरुड, एक कोकरू’सारख्या कथेच्या चिमुकल्या अवकाशातून  शांततेसाठीच्या प्रतीक्षेचं स्वप्न दाखवलं.

सभ्यतेच्या विकासात चतुष्पाद आणि द्विपादांचं नातं सतत संक्रमणशील राहिलं. या नात्यातील एक महत्त्वाचा तिठा म्हणजे डार्विनचा उत्क्रांतिवाद. प्राणिजीवनाच्या उतरंडीवर माणूस सर्वांत वरच्या स्थानावर आहे, याची खूणगाठ एकदा सिद्धतेच्या निकषावर माणसानं बांधली आणि आजवरच्या anthropomorphism पेक्षा, प्राण्यांच्या मानवीकरणापेक्षा एक वेगळी हालचाल फेबल्समधेे दिसू लागली. काफ्काचं ‘मेटॅमॉरफॉसिस’ हे त्याचं उदाहरण. प्राण्यांचं मानवीकरण करणाऱ्या माणसाचं आता प्राण्यात रूपांतर होणं ही एक निराळीच प्रक्रिया या निमित्तानं साहित्य जगताला डार्विनोत्तर फेबल्समधेे पाहायला मिळाली. माणूस आणि प्राण्याच्या या डार्विनोत्तर संबंधांच्या अनुषंगानं अनेक विद्यापीठांत साहित्याभ्यास सुरू झाला. त्याच वेळी जमिनीकडं नजर असणारा चतुष्पाद प्राणी आणि आकाशाचा वेध घेऊ शकणारा द्विपाद माणूस यांच्या नात्याचाही विचार निराळ्या परिप्रेक्ष्यातून सुरू झाला. याचा भाग म्हणून अमुक-अमुक राजाला मान खाली घालून निमूट ओझं वाहणाऱ्या गाढवाच्या तोंडाचा शाप मिळणं किंवा नेबुचेदनेझ्झारला ‘शिक्षा’ म्हणून गवतात चरणारा चतुष्पाद बनवलं जाणं या गोष्टींचाही मानवाच्या दोन पायांवर उभं राहण्याच्या उत्क्रांतीच्या परिप्रेक्ष्यातून विचार करणं अगत्याचं ठरावं. तसा ‘गाढवासारखा चरतोय’, ‘अजगरासारखा सुस्तावलाय’, ‘डुकरासारखा लोळतोय’ अशा भाषिक अंगानंही ‘अधोमुख’ प्राणी आणि ‘ऊर्ध्वगामी, ऊर्ध्वरेषी’ माणसाच्या नात्याचा प्राणिविश्वाच्या उतरंडीवरून विचार करता येतो का हे पाहणं रोचक ठरावं!

माणसानं आपल्या बुद्धिश्रेष्ठतेच्या बळावर अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या मूलभूत गरजांपासून उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर हर्षोल्हासासाठी, मनोरंजनासाठी, सुकर जगण्यासाठी प्राणिसृष्टीला हवं तसं वाकवून घेतलं तरी माणसाचं नातं या पायाखालच्या मातीशी निगडित राखलं ते प्राणिकथेनंच! एका विशिष्ट अवकाशात प्राण्यांशी एकरूपत्व पावल्याशिवाय, माणसाला या प्राणिकथेचा आस्वाद घेणं अवघड! द्विपाद प्राण्यानं ही वस्तुस्थिती कुठंतरी खोलवर स्वीकारली आहे आणि म्हणून प्राणिकथा अडीच हजार वर्षं कालनदीच्या पात्रावर तरली आहे. मानवी सभ्यता-संस्कृतीच्या मूलभूत मूल्यांना, स्वप्नांना, आकांक्षांना या ओंजळीतून नव्या कोवळ्या पिढीच्या ओंजळीत निगुतीनं सोपवण्याच्या माणसाच्या आंतरिक ऊर्मीतच प्राणिकथांच्या चिरंजीवित्वाची शक्यता सामावली आहे!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

स्वाती राजे,  पुणे
swatijraje@gmail.com

साहित्यिक, संशोधक, लेखिका 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके