डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

नाना आणि मी दोघेही नास्तिक असल्यामुळे नेहमी विचारांच्या एकाच फलाटावर उभे होतो. नानांच्या प्रत्येक वाक्यात मला माझ्या मनोविचारांची झलक दिसत असे. त्यांच्या आणि माझ्या विचारांची वाट 'तिमिराकडून तेजाकडे' निघाली आहे असे मला सतत जाणवे.

नानांचा वाढदिवस होता. पवार, माडगूळकर, अरुण खोरे वगैरे मंडळी नानांशी गप्पांत रंगून गेली होती. तेवढ्यात राधाबाईच्या बहिणीने स्वतः तयार केलेला केक आणला. नानांनी कापून सर्वांना लहान लहान तुकडा दिला. आम्ही सर्वांनी लगेच तो खाऊन घेतला. पण नानांच्या हातात केकचा तुकडा तसाच राहिला होता. मला वाटले साई, जुई व शुभाची आठवण झाली असावी. मी उठलो. नानांच्या हातातला तुकडा घेतला. क्षणभर सर्वांना वाटे तो आता मीच खाणार; पण मी तो तुकडा नानांना भरवला. टाळ्यांचा कडकडाट झाला. नानांची माझी दृष्टादृष्ट झाली. त्यात स्नेह, प्रेम व माझ्याबद्दलची नितांत आपुलकीची चमक मला दिसली.

मी, नाना, माझी पत्नी झेनव व मुलगी शबनम घरच्या गाडीने मुंबईला जात होतो. मुंबईला आम्ही एक धरणे धरण्यासाठी निघालो होतो. मी गाडी चालवत असताना नाना माझ्या शेजारी बसले होते. गाडी वळवण डेंमवर आली होती. शबनम सारखी गाडी चालवण्यास मागत होती व मी नाही म्हणत होती. त्यावर नानांना शबनम म्हणाली, 'पहा ना नाना! डॅडींचा माझ्यावर विश्वास नाही. ते मला गाडी चालवायला देण्यास घाबरत आहेत.' त्यावर त्यांनी शबनमला उत्तर दिले की, 'तुझे डॅडी व जुन्या काळातल्या बायांमध्ये काही फरक नाही.' मी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. व शबनमला चालवण्यास दिली.

नाना माझ्याकडे जेवायला आले होते. दुसऱ्या इतरही साथींना सहभोजनास बोलावले होते. नानांना मटन व ड्रिंक आवडत नसे. मासे मात्र आवडत असत. मला स्वतःला ड्रिंक घ्यावला आवडते. तसेच माझ्या इतरही साथींना आवडते. पण नानांच्यासमोर कसे घ्यायचे म्हणून मनात संकोच वाटत होता. कुणीही त्यांच्यासमोर शिष्टाचार म्हणून ड्रिंक घेतले नसते. म्हणून मी नानांना म्हणालो, 'नाना खोटा शिष्टाचार म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर ड्रिंक घेतले नाही, असे तुम्हाला समजले तर ते तुम्हाला रुचणार का?'

त्यावर ते लगेच म्हणाले, 'असा खोटा शिष्टाचार पाळण्याची गरज काय?'

जेवण मजेत पार पडले. त्यानंतर मी नानांना बदामाचा लिक्युअर घ्या म्हणून आग्रह केला. ते म्हणाले, मला चव आवडणार नाही. एखादा थेंब जिभेला लावून पहा, आवडला नाही तर मी तुमचा लिक्युअर पिऊन टाकीन, असे मी म्हणालो. नानांनी प्याल्यावर ओठ लावले. त्यांना त्याची चव आवडली. जेव्हा जेव्हा नाना जेवायला येत असत तेव्हा आवर्जून मी त्यांना लिक्युअर देत असे व तेही मोठ्या खुशीत स्वाद घेत असत.

मी व नाना एकदा सातारला गेलो होतो. आमचा मुक्काम नरेंद्र दाभोळकर यांच्याकडे होता. रात्री आम्हा दोघांना एकच खोली दिली होती. मी नानांना म्हणालो, मी झोपेत घोरतो. त्यांनी नरेंद्रला सांगून माझी झोपण्याची व्यवस्था दुसऱ्या खोलीत केली.

मी लंडनला इंटरनॅशनल बोहरी कॉन्फरन्सला हजर राहण्यासाठी गेलो होतो. तेथे प्रोफेसर हमजा अलवी यांची ओळख झाली. हे गृहस्थ इंटरनेशनल पोलिटिकल डिपार्टमेंटचे हेड होते. अलवी यांनी 'पाकिस्तान: इथनीसीटी, इस्लाम अँड आयडिऑलॉजी' वर एक पेपर लिहिला होता.

मला पेपरची मांडणी आवडली म्हणून मी तो पेपर नानांना वाचायला दिल. नानांनी ग. प्र. प्रधानांना दिला व मराठीत अनुवाद करून 'साधना'मध्ये नानांनी तो छापण्यास दिला.

नाना पिट्सबर्गला दरसाल जात. माझा व नानांचा फावल्या वेळात पत्रव्यवहार चाले. मी नानांना लिहिले की, मला शबनम सारखी प्रेमळ मुलगी आहे याचा मला नेहमी आनंद होतो. पण सायली, जुई सारख्या आणखी दोन असत्या तर जास्तच आनंद झाला असता. मला त्या दोन्हीही माझ्या मुलीसारख्याच वाटतात.

नरेंद्र दाभोलकरांचा साताऱ्याहून फोन आला. त्यांनी फोनवर सांगितले 'ताहेरभाई, नाना तुमच्या शब्दांनी फार सुखावले.'

या शब्दांचा अर्थ मला पिट्सबर्ग डायरीत माझा उल्लेख वाचला तेव्हा जाणवला व मीही मनोमन सुखावलो.

नाना आणि मी दोघेही नास्तिक असल्यामुळे नेहमी विचारांच्या एकाच फलाटावर उभे होतो. नानांच्या प्रत्येक वाक्यात मला माझ्या मनोविचारांची झलक दिसत असे. त्यांच्या आणि माझ्या विचारांची वाट 'तिमिराकडून तेजाकडे' निघाली आहे असे मला सतत जाणवे.

ज्या दिवशी नानांना मृत्यू आला तेव्हा मी गुजरात मध्ये होतो. मित्रांकडून मला ही बातमी समजली. मन सुन्न झाले. मृत्यू म्हणजे काय?

काही असले तरी मृत्यू हेच सत्य आहे, हे त्या दिवशी प्रखरपणे जाणवले.

Tags: अरुण खोरे. माडगूळकर ताहीर पुनावाला Arun Khore Madgulkar #Tahir Punawala weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ताहेरभाई पूनावाला

(1922 - 2017)

विवेकवादी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते आणि सामाजिक कृतज्ञता निधीचे आधारस्तंभ
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके