डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

कार्यक्रम उपक्रम (15 जानेवारी 1994)

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जे काही परिवर्तन देशात घडायला पाहिजे होते ते घडू शकले नाही. आजही बदलत्या स्वरूपात विषमतेवर आधारित समाजव्यवस्था कायम आहे. म्हणून ही व्यवस्था नष्ट करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी शैक्षणिक अभिसरण व सांस्कृतिक नेतृत्व निर्माण करण्याचे कार्य हाती घ्यावे असे आवाहन प्रा. नागोराव कुंभार यांनी येथील रचनात्मक संघर्ष समितीचे अपघातात निधन पावलेले कार्यकर्ते कै. डॉ. मोहन कुलकर्णी व लिंबाजी दुधाने यांच्या प्रथम स्मृतिदिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.

“विषमतेवर आधारित समाजव्यवस्था नष्ट करण्यासाठी शैक्षणिक अभिसरण व सांस्कृतिक नेतृत्व उभारण्याची चळवळ स्वयंसेवी संस्थांनी हाती घ्यावी”- प्रा. नागोराव कुंभार

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जे काही परिवर्तन देशात घडायला पाहिजे होते ते घडू शकले नाही. आजही बदलत्या स्वरूपात विषमतेवर आधारित समाजव्यवस्था कायम आहे. म्हणून ही व्यवस्था नष्ट करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी शैक्षणिक अभिसरण व सांस्कृतिक नेतृत्व निर्माण करण्याचे कार्य हाती घ्यावे असे आवाहन प्रा. नागोराव कुंभार यांनी येथील रचनात्मक संघर्ष समितीचे अपघातात निधन पावलेले कार्यकर्ते कै. डॉ. मोहन कुलकर्णी व लिंबाजी दुधाने यांच्या प्रथम स्मृतिदिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. स्व. डॉ. मोहन कुलकर्णी, लिंबाजी दुधाने स्मारक समितीच्या वतीने अहमदपूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. एस.एम. कुलकर्णी होते.

प्रा. कुंभार पुढे म्हणाले की, या देशातील राज्यकर्त्यांना परिवर्तनाची गरज नाही पण अन्यायास वाचा फोडून प्रतिकार करणारे कार्यकर्ते हेच खरे परिवर्तनाचे आधार आहेत. या संघटनेच्या स्व. मोहन व लिंबाजी या कार्यकर्त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे त्यांच्या सहकाऱ्यांनी चालवलेल्या कार्यावरून वाटते. कार्यकर्त्यांना परिवर्तनाच्या ध्येयापढे स्वतःच्या भविष्याची चिंता नसते. त्यांच्या भवितव्याची चिंता समाजाने करणे गरजेचे आहे. त्यांना आर्थिक संरक्षण मिळाले पाहिजे. समाजात काम करणारे कार्यकर्ते आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने काम करतात. आज समाजात, माझ्या हिताचे काय याचाच विचार चालतो. म्हणून येथील कार्यकर्ते करत असलेले काम फार मोलाचे आहे. इतरांसाठी काही करण्याची इच्छा दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा परिस्थितीत विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निःस्वार्थपणे परिवर्तनाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नष्ट करण्यासाठी धर्माचा, शुद्र जातीयवादाचा वापर करीत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आणि सामाजिक समतेचा विचार डोळ्यांसमोर ठेवून काम करण्याची गरज आहे. त्याचबरोबर समाजपरिवर्तनाचा विचार करताना सामाजिक कार्याची दिशा ठरवून घेणे आवश्यक आहे व थोर पुरुषांनी ज्या ध्येयांसाठी चळवळ केली तिला मूर्त स्वरूपात आणण्यासाठी शैक्षणिक अभिसरण होणे आवश्यक आहे. कारण सध्या शिक्षणाचा प्रसार या नावाखाली बाजार मांडला जात आहे. त्यास पायबंद बसावा म्हणून शैक्षणिक अभिसरण होणे आवश्यक आहे. तसेच समाजात सांस्कृतिक नेतृत्वाचाही अभाव जाणवतो. तो निर्माण होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. समाजाचा विकास म्हणजे कारखाने किंवा बिल्डिंग्ज उभारणे नव्हे तर देशातील प्रत्येक माणसाच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे हे आहे. ज्या समाजात या गरजांची पूर्तता होते तोच समाज चांगला समाज म्हणून गणला जातो. आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी व सामाजिक न्यायासाठी शैक्षणिक अभिसरण, मूलभूत गरजांची पूर्तता, सांस्कृतिक नेतृत्व निर्माण करण्याची गरज आहे.

याप्रसंगी स्मारक समितीच्या वतीने दिवंगत कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचा धनादेश प्राचार्य नागोराव कुंभार यांच्या हस्ते देण्यात आला व यापुढील काळात या कुटुंबीयांस फेब्रुवारी 94 पासून दरभहा 500 रु. देण्याची घोषणा समितीच्या वतीने करण्यात आली.

"परित्यक्ता हक्क परिषदेत सहभागी होऊन सुखी व समृद्ध समाजनिर्माण कार्याला पाठबळ द्या" - उषाताई आपटे 

30 जानेवारी 94 रोजी औरंगाबादेत परित्यक्ता हक्क परिषद होणार असून या परिषदेत अहमदनगर जिल्ह्यातील हजारो लोकांनी सहभागी होऊन सुखी व समृद्ध समाजनिर्मितीच्या प्रयत्नांना पाठबळ द्यावे असे आवाहन श्रीरामपूरच्या उषाताई आपटे यांनी केले आहे. परित्यक्ता मुक्ती आंदोलन पुरुषविरोधी आंदोलन नसून राक्षसी प्रवृत्तीच्या विरोध व समता, न्याय, एकता, स्वातंत्र्य इ. मूल्यांचे संरक्षण व संवर्धन करणारे आंदोलन आहे. अहमदनगर जिल्हा परित्यक्ता हक्क परिषद संचालन समितीच्या निमंत्रक म्हणून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उषाताईंची एकमताने निवड केल्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उषाताई आपटे यांनी वरील विचार मांडले.

परिषदेच्या संयोजक अ‍ॅड. निशाताई शिवूरकर म्हणाल्या की, महाराष्ट्रात 6 लाख परित्यक्ता असून 12 लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजेच 1 कोटी लोकांना या प्रश्नाने हैराण केले आहे. एक परित्यक्त स्त्री किमान 15-20 लोकांच्या अवघड जागेवरची ‘जखम’ बनते! मंत्री ते चपराशी अन् डॉक्टर ते कंपाऊंडरपर्यंत सर्व जाति-धर्मांत व वर्गात हा प्रश्न आहे. सर्व स्त्री पुरुषांनी एकमेकांना समजावून घेऊन जगण्याशिवाय पर्याय नाही. मुले असणारांनी तर विभक्त होण्यापूर्वी हजारदा विचार करायला हवा. 23 जिल्ह्यांत परिषद संयोजन समित्या स्थापन झाल्यामुळे औरंगाबादेत लाखभर लोक जमतील.

अ‍ॅड. अलकनंदा फुंदे यांनी दुसरे बेकायदेशीर लग्न करणारावर स्थानिक लोकांनी बहिष्कार टाकावा असे सुचविले.

समाजाने संघटित होऊन समाजात परित्यक्ता निर्माण करणारी प्रवृत्ती नष्ट करावी आणि संगोपन करताना मुलाचा ‘अहंगंड’ व मुलीचा ‘न्यूनगंड’ नष्ट करायला हवा असे प्रा. शिवाजी गायकवाड यांनी सांगितले.

सरताज खान म्हणाल्या की, 'शराब और शराबीने सब खराबी बनवाई है। यह सब बंद करो।‘

गोपाळ अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अहमदनगर जिल्हा परित्यक्ता हक्क परिषद संचालन समिती स्थापन करण्यात आली. उषाताई आपटे यांची समितीच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. अहमदनगर जिल्हा परित्यक्ता हक्क परिषद संचालन समितीच्या वतीने सर्व तालुक्याच्या गावी व काही मोठ्या गावी असे एकूण 25 स्त्री-पुरुष मेळावे आयोजित केले जाणार आहेत. 30 जाने. 94 रोजी औरंगाबादेत होणार्‍या परित्यक्ता हक्क परिषदेत अहमदनगर जिल्ह्यातून हजारो लोक जावेत असा प्रयत्न संचालन समिती करणार आहे.

Tags: परित्यक्ता हक्क परिषद उषाताई आपटे औरंगाबाद अहमदनगर अहमदपूर लिंबाजी दुधाने डॉ. मोहन कुलकर्णी प्रा. एस.एम. कुलकर्णी शैक्षणिक अभिसरण Parityakta Hakk Parishad Ushatai Apte Aurangabad Ahamadnagar Ahamadpur Limbaji Dudhane Dr.Mohan Kulkarni Prof.S.M.Kulkarni Academic Convergence weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके