डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

नीरुभाईंचे व्यक्तित्व एकांगी नव्हते. राजकारणाव्यतिरिक्त जीवनाची जी विविध अंगे आहेत त्यांचीही त्यांना गोडी होती. गुजरातमध्ये खेळ आणि व्यायामाच्या क्षेत्रातील मंडळींशी त्यांचा निकट संबंध होता. गिर्यारोहणाला त्यांचे प्रोत्साहन असे. पुरातत्वशास्त्राची त्यांना गोडी होती. अहमदाबादमधील त्यांचे घर ओळखू येई ते घराजवळव्या ऐतिहासिक अवशेषांमुळे. अहमदाबादमध्ये त्यांच्या घरी गेले की ते मनापासून स्वागत करीत आणि त्यानंतर अनेक विषयांबद्दल चर्चा करीत.

ज्येष्ठ पत्रकार नीरुभाई देसाई यांचे निधन 

निष्ठावान स्वातंत्र्य सैनिक, गुजरातचे ज्येष्ठ पत्रकार, आर्थिक विषयांचे समालोचक, समाजवादी कार्यकर्ते श्री. नीरुभाई देसाई यांचे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी गेल्या महिन्यात, 1 डिसेंबर 1993 रोजी निधन झाले. बेचाळीसच्या क्रांतीचे ते अग्रणी होते. ‘बेतालीस बिरादरी’ नावाची संघटना ते चालवीत. आंतरभारती बद्दल त्यांना विशेष आस्था होती. गुजरात आणि महाराष्ट्राची भाषिक राज्ये वेगळी झाली. त्यामुळे न कळत अलगपणा निर्माण झाला. त्यावर मात करण्यासाठी गुजरात- महाराष्ट्र स्नेहमीलनाचे कार्यक्रम पुणे आणि अहमदाबाद या ठिकाणी आयोजित केले होते. गुजरातमधून आलेल्या समूहाचे नेतृत्व नीरुभाईंनी केले होते. साधनेचा गुजरात-महाराष्ट्र स्नेहमीलन विशेषांक त्यानिमित्ताने प्रकाशित झाला होता.

नीरुभाईंचा जन्म अहमदाबादला झाला होता. ते खरेखुरे अहमदाबादी होते. 1929 ते 1932 हा काळ भारतात मोठ्या खळबळीचा होता. लाहोरला रावी नदीच्या तीरावर भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास झाला आणि देशभर युवकांत चैतन्याची एक लाट पसरली. नीरुभाई स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतात म्हणून त्यांना महाविद्यालयाने काढून टाकले तरी नीरुभाई डगमगले नाहीत!

1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली. नीरुभाई या गटात सामील झाले. श्री. जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन, अशोक मेहता यांच्या संपर्कात ते आले आणि काँग्रेस समाजवादी पक्षाचे काम गुजरातेत करू लागले. त्यांच्याभोवती युवकांचे एक मंडल निर्माण झाले. नीरुभाईंचे व्यक्तित्व एकांगी नव्हते. राजकारणाव्यतिरिक्त जीवनाची जी विविध अंगे आहेत त्यांचीही त्यांना गोडी होती. गुजरातमध्ये खेळ आणि व्यायामाच्या क्षेत्रातील मंडळींशी त्यांचा निकट संबंध होता. गिर्यारोहणाला त्यांचे प्रोत्साहन असे. पुरातत्वशास्त्राची त्यांना गोडी होती. अहमदाबादमधील त्यांचे घर ओळखू येई ते घराजवळच्या ऐतिहासिक अवशेषांमुळे. अहमदाबादमध्ये त्यांच्या घरी गेले की ते मनापासून स्वागत करीत आणि त्यानंतर अनेक विषयांबद्दल चर्चा करीत.

नव्याचे स्वागत ते उत्साहाने करीत आणि तरुण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत. वृत्तक्षेत्रांत नव्याने पदार्पण करणारांबद्दल ते आशा दाखवत. पत्रकारांच्या लेखांचे संग्रह क्वचित प्रसिद्ध होतात, कारण वृत्तपत्रीय लेखन म्हणजे अळवावरचे पाणी समजले जाते! नीरुभाईंच्या लेखनाला तात्त्विक बैठक असे. आणि त्यांचे लेखन संग्राह्य समजले जाई.

अर्थकारण, राजकारण, समाजकारण, साहित्य अशा अनेक विषयांवर त्यांनी अनेक गुजराती नियतकालिकांत लेखन केले होते. गुजरातीत त्यांची पंधरावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या निधनामुळे देशातील एक समाजवादी चिंतक, पट्टीचा लेखक आणि कार्यकर्ता आपल्यातून गेला आहे! त्यांच्या स्मृतीला प्रणाम.

साथी राजाभाऊ चांदोरकर कालवश 

राजाभाऊ चांदोरकर हे स्वातंत्र्य चळवळीतील आणि समाजवादी आंदोलनातील एक प्रखर लढाऊ कार्यकर्ते. राजाभाऊंचे कार्यक्षेत्र मुख्यतः रायगड जिल्ह्यात रोहा येथे होते. राजाभाऊ स्पष्टवक्ते आणि निर्भय होते. सामाजिक न्याय आणि समता यांसाठी झगडताना त्यांनी कधी तडजोड केली नाही. राजाभाऊ चांदोरकर यांचे गेल्या आठवड्यात वृद्धापकालाने निधन झाले. आमच्या जुन्या मित्रास आणि अथक परिश्रम करणाच्या सहकाऱ्यास साधना परिवाराचे अभिवादन.

श्री. अप्पा शिर्के यांचे निधन 

श्री. रामचंद्र लक्ष्मण ऊर्फ अप्पा शिर्के यांचे गुरुवार दिनांक 30 डिसेंबरला हृदयविकाराने पुण्यात निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. अप्पा शिर्के हे साधना प्रेसमध्ये सुरुवातीपासून कंपोझिंग सेक्शनमध्ये काम करीत. पुढे ते विभाग प्रमुख झाले. पुस्तकांचे काम अप्पांच्याकडे असे. सहकार्यांशी ते मिळून मिसळून वागत. काम चोख आणि वेळेवर झाले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे. साधना प्रेसचे ते आधारस्तंभच होते. अशा निष्ठावान सेवकांमुळेच ‘साधने’ला मुद्रणाची बक्षिसे मिळाली आणि साधना प्रेसच्या दर्जेदार छपाईस मान्यता मिळाली. अप्पांच्या निधनामुळे आमचा एक ज्येष्ठ सहकारी हरपला. अप्पा शिर्के यांच्या कुटुंबीय मंडळींच्या दुःखात साधना परिवार सहभागी आहे.

साथी राजारामभाऊ पाटील यांचे निधन 

चाळीसगावचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते राजाराम भिला पाटील यांचे या महिन्यात वृद्धापकाळाने निधन झाले. राजारामभाऊ यांना गोवा मुक्ती संग्रामात अमानुष मारहाण झाली होती. समाजवादी पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात ते आघाडीवर असत. संयुक्त महाराष्ट्राच्या त्यांनी जळगाव जिल्ह्यात धडाडीने काम केले. ते त्यावेळी आमदार म्हणून चाळीसगाव मधून निवडून आले होते. राजारामभाऊ हे दिलदार आणि प्रेमळ होते. कार्यकर्त्यांना त्याचा मोठा आधार असे. 'राष्ट्र सेवा दल', 'साधना' यांना ते सतत साहाय्य करीत. साथी राजारामभाऊंच्या कुटुंबियांच्या दुःखात साधना परिवार सहभागी आहे. 

Tags: कॉंग्रेस समाजवादी पक्ष साधना साप्ताहिक राष्ट्र सेवा दल राजारामभाऊ पाटील श्री. अप्पा शिर्के राजाभाऊ चांदोरकर नीरुभाई देसाई Congress Samajwadi Party Sadhana Weekly Rashtr Sewa Dal Rajarambhau Patil Shri. Appa Shirke Rajabhau Chandorkar Neerubhai Desai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके