डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

श्री. वजिर पटेल यांच्यासाठी

वजिर पटेल यांना त्यासाठी आपली स्कूटर आणि जमीन विकावी लागणार, असे कळताच डॉ.शिवाजीराव पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या तपोवन कुष्ठ-अपंग वसाहतीतील मंडळी अस्वस्थ झाली आणि वजिर पटेल यांच्यासाठी त्यांनी हजार रुपये गोळा केले.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अमरावतीचे लढाऊ कार्यकर्ते श्री. वजिर पटेल यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्याने कळवळला नसेल असा सहृदय माणूस मिळणे दुर्मिळ. धर्माच्या नावाखाली चाललेल्या अधर्माला वजिर पटेल आव्हान देत होते. इस्लामची तत्त्वे धाब्यावर बसवून सवती आणणारे आणि तलाक देणारे यांच्याविरुद्ध त्यांनी जिहाद पुकारले होते. हातभट्ट्या व अन्य गुन्हेगारी चालवणाऱ्यांनाही त्यांचा कडकडीत विरोध होता. ‘बागवान' या आपल्या उर्दू नियतकालिकातून ते या अधर्मावर प्रखर हल्ला चढवीत होते.

त्यांचा वैचारिक मुकाबला करणे जमत नाहीसे पाहून त्यांच्यावर अधमपणे मारेकरी घालण्यात आले. मरता मरता ते वाचले. हातपाय जायबंदी झालेल्या अवस्थेत अमरावतीच्या सरकारी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. डॉ. अब्दे यांनी अत्यंत काळजीपूर्वक यांच्यावर उपचार केले. परंतु त्यांच्या जखमांचे व अस्थिभंजनाचे स्वरूप ध्यानी घेऊन त्यांची केस बॉम्बे हॉस्पिटलकडे पुढील उपचारासाठी पाठवण्याची शिफारस डॉ. अब्दे यांनी केली. ही केस मेडिको लीगल केस असल्याने उपचाराचा सर्व खर्च नियमाप्रमाणे सरकारने उचलायला हवा. पण त्याशिवायही बराच खर्च करावा लागणार आहे. 

वजिर पटेल यांना त्यासाठी आपली स्कूटर आणि जमीन विकावी लागणार, असे कळताच डॉ.शिवाजीराव पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या तपोवन कुष्ठ-अपंग वसाहतीतील मंडळी अस्वस्थ झाली आणि वजिर पटेल यांच्यासाठी त्यांनी हजार रुपये गोळा केले. त्यांचे हे पैसे नाकारणे म्हणजे त्यांच्या सहृदयतेला नकार देण्यासारखे झाले असते, पण ते स्वीकारण्याचाही वजिर पटेल यांच्या मित्रांना संकोच वाटला.

प्रा. मदन भट्ट यांनी पवनारला विनोबाजींकडे जाऊन वजिर पटेल यांची शौर्यगाथा ऐकवली तेव्हा त्यांच्या स्वास्थ्यासाठी विनोबांनी प्रतीकात्मक एक रुपया दिला आणि वजिर यांचे हार्दिक शुभचिंतन केले. 

सामाजिक क्रांतिकारक कृतज्ञता निधीच्या मंडळानेही त्यांना एक हजार रुपये देण्याचे ठरवले आहे. सामाजिक क्रांतिकारक कृतज्ञता निधी अशा प्रसंगांसाठीच निर्माण केला असून आजवर अनेक कार्यकर्त्यांना व पीडितांना ऐनप्रसंगी त्यातून तातडीची मदत दिली जाते. सामाजिक क्रांतिकारक कृतज्ञता निधीत अशा मदतीमुळे जो काही खळगा पडतो तो महाराष्ट्रातील सहृदय मंडळी ताबडतोब भरून काढतात आणि त्यामुळे पुन्हा ऐन प्रसंगी निधी उपलब्ध होऊ शकतो. वजिर पटेल यांना मेडिको लीगल केसमधील संबंधित म्हणून उपचार करावे लागल्याने त्यांच्या इलाजाचा सर्व खर्च शासनाने करावा यासाठी राज्यपालांकडे मागणी करणारी पत्रे गेली असून दोन शिष्ट मंडळेही त्यांना भेटली आहेत. शासनाकडेही तशी मागणी करण्यात आली आहे.

बाँबे हॉस्पिटलमधील उपचारांमुळे वजिर पटेल यांची प्रकृती प्रायः पूर्ववत होणार आहे. बाँबे हॉस्पिटलमधून त्यांची आता सुटका करण्यात आली असून लवकरच ते अमरावतीला परत जातील. 

श्री. वजिर पटेल यांच्या सहाध्यायींनीही त्यांच्यासाठी काही पैसे गोळा केले आहेत. वजिर पटेल यांच्यासारखा धडाडीचा समाज- क्रांतिकारक ही समाजाची दौलत असून तिचे जतन करण्याची जबाबदारी लोकांचीच आहे.

Tags: बागवान पटेल वजिर मंडळ सत्यशोधक #मुस्लिम attack Muslim Bagaban Patel Vazir weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके