डिजिटल अर्काईव्ह

दहशतीचं माध्यम आणि निःशस्त्रांचं सैन्य

वागळे स्वतः मालवणमधली दहशत निपटून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी कोकणात जायची गरज नाही. दहशतीची विविध रूपं शहरातही पाहायला मिळतील. लोकलमधून शांतपणे प्रवास करायचं सोडून कर्कश बेसूर आवाजात भजनं म्हणून इतर प्रवाशांना हैराण करणं, हा दहशतीचाच एक प्रकार आहे. प्रवाशांच्या सहनशीलतेचा फायदा घेऊन हे अघोरी प्रकार चालू आहेत. या विकृत धर्माचारणाला एका दहशतवादी संघटनेचा पाठिंबा असल्यानं येथील पोलिसखातेही मालवणमधल्या पोलिसांसारखे वागताहेत. शांतीचा प्रसार करणाऱ्या धर्माच्या नावावर या देशात आणि खास करून या शहरात इतका आचरट हैदोस आणि गोंगाट चालतो, की प्रश्न पडतो या शहरात माणसं राहतात की वानरं? शहरातल्या वानरांचा बंदोबस्त आपला आपणच करायला हवा, सगळी जबाबदारी निखिल वागळेंवर सोपवून आपण केवळ पाठिंबादर्शक पत्र वर्तमानपत्रात पाठवायची हे धोरण बरोबर नाही.

दहशत हेदेखील एक माध्यम आहे. आणि लोक आता शब्दांऐवजी या माध्यमातून संवाद साधू लागलेत. परवा नारायण राणे आणि त्यांच्या निष्ठावंत अनुयायांनी 'महानगर'चे संपादक निखिल वागळे, पत्रकार युवराज मोहिते, प्रमोद निगुडकर यांना या माध्यमातून त्यांना जे काही सांगायचं होतं ते सांगितलं. स्थानिक पोलीस प्रशासनाच्या पाठबळाशिवाय अशा गोष्टी घडत नाहीत. वागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलीसठाण्यावर ज्या पद्धतीनं वागवलं गेलं, त्यावरून हे सिद्धच झालं. स्थानिक गुंड स्थानिक पोलीस प्रशासनाशी दहशतीच्या माध्यमातून संवाद साधत असतात. गुन्हेगारांना कडक शासन केलं जाईल, असं गृहमंत्री म्हणाले; तरी तो उपचार असतो. पोलीस ठाणी मालवणमधली, असोत की मालाडमधली ती गृहमंत्र्यांच्या नव्हे तर स्थानिक गुंडांच्या नियंत्रणाखाली असतात हे आता सर्वांना ठाऊक झालं आहे. अशा स्थितीत पोलिसांबद्दल सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तक्रार करून सरकारनं कोणतीच कारवाई केली नाही याचं वागळेंना आश्चर्य वाटावं, याचंच आश्चर्य वाटतं. 

इथं मालवणला राणे असतील तर तिथं जळगावला काँग्रेसचे काणे असतात आणि नांदेडला कुणी चव्हाण. पक्ष असतील वेगळे पण माध्यम हेच. माणसांना 'आपलंस' करून घ्यायचं तंत्र हेच. स्वभावानुसार मालवणमध्ये वागळेंवर झालेल्या हल्ल्याचा जराही निषेध न करता नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली आणि काही उर्मट सवाल केले. 'निखिल वागळे मालवणला का गेले? तिथं त्यांचं काय काम होतं?' माना खाली घालून पत्रकार त्यांचं उद्धट निवेदन टिपून घेत होते. एकाही पत्रकाराला उभं राहून राणेंना सुनवावंसं वाटलं नाही, की मालवण हा भारताचाच प्रांत आहे. देशात कुठेही कारणाशिवाय फिरण्याचा अधिकार घटनेनं भारतीय नागरिकाला दिलेला आहे. असे सवाल तुम्ही विचारूच कसे शकता? महाराष्ट्राचा एकेकाळचा मुख्यमंत्री अशा प्रकारे घटनेचा उपमर्द करणारे प्रश्न विचारतो ही गोष्ट पत्रकारांना खटकली नसेल, असं नाही. पण काय करणार? दहशतीच्या माध्यमाचा सर्वप्रथम प्रयोग पत्रकारांवर होतो. निखिल वागळे हल्ला प्रकरणाची बड्या वृत्तपत्रांनी ज्या प्रकारे बोळवण केली त्यावरून हे अधिक स्पष्ट झालं आहे. 

'महानगर' या सायंदैनिकाविषयी वाटणाऱ्या असूयेचाही यात भाग आहे. राजकारण या पद्धतीनं पुढं जात राहिलं तर उद्या आपल्यावरही ही पाळी येईल याची जाणीव या वृत्तपत्रांत आढळली नाही. शत्रू उंबरठ्यापाशी येईपर्यंत ही जाणीव आपल्यात सहसा निर्माण होत नाही. जसजसा काळ सरकतोय तसं दहशत नावाचं माध्यम वेगानं सर्व क्षेत्रांत पसरत चाललं आहे. शासकीय पक्षातील माणसं जिल्हा पातळीवर लोकांना 'समजावण्यासाठी' या माध्यमाचा पूर्वीपासून वापर करत आले आहेत. त्यामुळे या प्रश्नावरून सेना किंवा बजरंग दलावर सतत दोषारोप करत राहणं बरोबर नाही. पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी गट दहशतीच्या जोरावर खंडणी गोळा करतात; अधिकृत जागांवर अतिक्रमण करतात, अशा वार्ता आहेत. अगदी सेनेच्या स्टाईलनं हे चालू आहे म्हणे. निखिल वागळेंचं एक बरं आहे. लढाऊ पत्रकार म्हणून त्यांची देशभर ख्याती आहे. शहरातील बुद्धिमंतांचा एक मोठा गट त्यांच्या पाठीशी आहे. मानवतावादी विचारसरणीचे कलावंत या लढ्यात त्यांच्या समवेत आहेत. हल्लाप्रकरणी वागळे मुख्यमंत्र्यांना भेटले तेव्हा त्यांच्या समवेत रिबेरो होते. 

मात्र या सगळ्या वरकरणी दिलासा देणाऱ्या गोष्टी आहेत. खरोखरच यातून काही साधते का? शाब्दिक पाठिंबा, पत्रकं या पलीकडे हा प्रश्न नेऊन धसास लावायला नको का? उदाहरणार्थ, रिबेरोंनी मुख्यमंत्र्याच्या गाठीभेटी घेण्यापेक्षा थेट मालवणात जाऊन तेथील पोलीस ठाण्यांना का भेटी देऊ नयेत? कलावंत, साहित्यिक, पत्रकारांच्या एका पथकानं या प्रकरणी जाब विचारायला थेट मातोश्रीवरच का जाऊ नये? निखिल किंवा युवराजनं या संदर्भात सरळ उद्धव ठाकरेंचीच मुलाखत का घेऊ नये? वागळेविषयी महाराष्ट्रात क्षोभ निर्माण व्हावा म्हणून सेनेच्या मुखपत्रानं वागळेंच्या तोंडी सावरकरांच्या बदनामीची विधानं टाकायचा खोडसाळपणा केला, म्हणून संपादक संजय राऊतला प्रेस कौन्सिलसमोर का उभं केलं जाऊ नये? विचारवंतांनी स्वतःची दहशत राज्यकर्त्यांवर आणि समाजातील कुप्रवृत्त गटांवर निर्माण करणं गरजेचं आहे. या दहशतीसाठी शस्त्रांची गरज नाही. गरज या कामासाठी आपला वेळ देऊ शकणाऱ्या निःशस्त्र माणसांची आहे. 

वागळे स्वतः मालवणमधली दहशत निपटून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी कोकणात जायची गरज नाही. दहशतीची विविध रूपं शहरातही पाहायला मिळतील. लोकलमधून शांतपणे प्रवास करायचं सोडून कर्कश बेसूर आवाजात भजनं म्हणून इतर प्रवाशांना हैराण करणं, हा दहशतीचाच एक प्रकार आहे. प्रवाशांच्या सहनशीलतेचा फायदा घेऊन हे अघोरी प्रकार चालू आहेत. या विकृत धर्माचारणाला एका दहशतवादी संघटनेचा पाठिंबा असल्यानं येथील पोलिसखातेही मालवणमधल्या पोलिसांसारखे वागताहेत. शांतीचा प्रसार करणाऱ्या धर्माच्या नावावर या देशात आणि खास करून या शहरात इतका आचरट हैदोस आणि गोंगाट चालतो, की प्रश्न पडतो या शहरात माणसं राहतात की वानरं? शहरातल्या वानरांचा बंदोबस्त आपला आपणच करायला हवा, सगळी जबाबदारी निखिल वागळेंवर सोपवून आपण केवळ पाठिंबादर्शक पत्र वर्तमानपत्रात पाठवायची हे धोरण बरोबर नाही. शहरात निःशस्त्र नागरिकांच्या सेना उभारल्या गेल्या पाहिजेत. आणि त्या दहशतवादाशी सामना करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या पाहिजेत. धरणं आणि उपोषणाचे दिवस आता संपले.

Tags: Narayan Rane Pramod Nigudkar Yuvraj Mohite Nikhil Wagle Mahanagar Avadhut Paralkar नारायण राणे प्रमोद निगुडकर युवराज मोहिते निखिल वागळे 'महानगर’ अवधूत परळकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अवधूत परळकर,  मुंबई ( 215 लेख )
awdhooot@gmail.com

पत्रकार, लेखक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी