डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सार्क युनिव्हर्सिटीमधला कुठलाही कार्यक्रम (पाकिस्तानी विद्यार्थी) नौमानच्या गाण्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्याने गायलेले ‘गुलाबी आँखे’ हे गाणे मी कधीच विसरू शकणार नाही. (राजेश खन्ना व नंदा यांच्यावर चित्रीत झालेले ‘द ट्रेन’ या सिनेमातील ते गाणे आहे) मला जश्न-ए-आझादी या नावाने होणारा भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचा संयुक्त कार्यक्रम (१४ ऑगस्टच्या रात्री) अनोखा वाटला.

सार्क युनिव्हर्सिटीमधल्या बहुतेकांना माझे खरे नाव ‘फातिमाथ शरीफ’ आहे, हे माहीतच नाहीये! सगळे जण मला ‘थाटू’ म्हणतात. मला माझे नाव आवडत नाही असे काही नाही. माझे कुटुंबीय आणि मालदीवमधली मित्र- मंडळी मला ‘थाटू’ म्हणतात. त्यामुळे जेव्हा मला इथले लोक ‘थाटू’ अशी हाक मारतात, तेव्हा मला माझ्या घरी मालदीवमध्ये असल्याचाच भास होतो. मला वाटते, आयुष्य हे छोट्या-छोट्या आठवणींनी तयार झालेले असते. तुम्ही त्या आठवणी मिळाव्यात यासाठी काहीही नियोजन करीत बसत नाही, पण त्यांना नक्कीच जपता. माझा सार्क युनिव्हर्सिटीमधला काळ अशा आठवणींनी भरलेला आहे.

सार्क युनिव्हर्सिटीमधली पहिलीच रात्र माझे डोळे उघडवणारी होती. एका अर्थाने मी त्यामुळेच इथला काळ घालवण्यासाठी सज्ज झाले. आम्ही संध्याकाळी सात वाजता (सार्क युनिव्हर्सिटी असलेल्या) चाणक्यपुरीतील अकबर भवनमध्ये आलो. माझे आणि अफझलचे रजिस्ट्रेशन झाले नसल्याने, आम्हाला राहण्यासाठी (पाचव्या मजल्यावरील मुलींच्या होस्टेलमधील) तात्पुरती रूम दिली गेली. ब्रेंडा नावाची एक गोड श्रीलंकन मुलगी पण आमच्या रूममध्ये होती. आम्ही ज्या विमानातून दिल्लीत आलो त्याच विमानात ती होती, पण आमची भेट मात्र सार्क युनिव्हर्सिटीमध्ये झाली! आमची एक सिनिअर इंदू हिने आम्हाला जेवणासाठी (पहिल्या मजल्यावरील एका बाजूस असलेल्या) मेसमध्ये नेले. आम्ही तिथे जेवण करू शकलो नाही, म्हणून मग शेजारच्या ‘यशवंत प्लेस’ या मार्केटमध्ये ती आम्हाला घेऊन गेली. धूळभरल्या आणि आणि जुनाट जागेत येतो तसा वास असणाऱ्या रूममध्ये रात्री आम्ही झोपलो असतानाच लाईट गेले, तेव्हा सार्क युनिव्हर्सिटीमध्ये पुढे शिकावे की नाही, असा प्रश्न माझ्या मनात आला होता.

सुदैवाने पाचव्या मजल्यावरील महिला-सुरक्षारक्षक अरुणादी(दी) मदत करण्यास उपलब्ध होत्या. कदाचित, तेव्हापासूनच मला याची जाणीव झाली की, कितीही अडचणीची परिस्थिती समोर उभी ठाकली तरी सार्क युनिव्हर्सिटीमधले कोणी ना कोणी मदत करायला उभे राहते. (हॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री) मर्लिन डीट्रीक एकदा म्हणाली होती की, ‘ज्या मित्रांना तुम्ही पहाटे चार वाजता फोन करू शकता, तेच खरे (मित्र)’. तिचे हे म्हणणे अगदी खरे आहे. सार्क युनिव्हर्सिटीमुळे मला वेगळ्या आणि वैविध्यपूर्ण मित्र-मैत्रिणी मिळाल्या. त्यांची साथसांगत आयुष्यभर टिकून राहील. जर ते नसते, तर माझे सार्क युनिव्हर्सिटीमधले आयुष्य अगदीच नीरस झाले असते.

सक्कूला मी माझी मैत्रीण मानत नसे. बोलताना आम्ही एकमेकींची ओळख रूममेट्‌स अशीच करून द्यायचो. सुरुवातीला आम्ही फार बोलत नसू. आम्ही एकमेकींना आवडत नव्हतो असे नाही; पण गेल्या दीड वर्षांत जेव्हा- जेव्हा मला अडी-अडचणींमधून मार्ग काढायची वेळ आली, तेव्हा ती माझ्या मदतीसाठी ठामपणे उभी राहिली. आम्ही अनेक रात्री आयुष्याविषयी, प्रेमभंगाविषयी, भविष्याविषयी आणि आमच्या आशा-आकांक्षांविषयी बोलण्यात घालवल्या आहेत. सार्क युनिव्हर्सिटीमुळे मला तिच्यासारखी केवळ रूममेटच नव्हे तर एक जिवाभावाची बहीण मिळाली.

मी मूळची मालदीवची. (पर्यटनाधारित व्यवस्थेमुळे) तिथे सर्व वस्तू महाग आहेत आणि बार्गेनिंग कल्चर तिथे नाही. त्यामुळे माझ्यासाठी ‘सरोजिनी मार्केट’मध्ये जाणे हा एक सुखद धक्का होता. माझ्या मित्र-मैत्रिणींनी मला असा सल्ला दिला आहे की, तिथे कोणतीही वस्तू लगेच विकत घेऊ नये. जरी मला विक्रेत्याने सांगितलेली किंमत कितीही स्वस्त वाटली तरी ते मला तीच गोष्ट आणखी स्वस्तात मिळवून देऊ शकतील. शॉपिंग करणे हे therapeutic आहे असे जे म्हटले जाते, ते खरे आहे. सरोजिनी मार्केट, कमला मार्केट, जनपथ, लाजपतनगर ते कॅनॉट प्लेस इ. वेगवेगळ्या ठिकाणी मी मैत्रिणींबरोबर जाऊन शॉपिंगचा आनंद लुटला आहे.  

मी दिल्लीतील पाणीपुरीला कशी विसरू शकेन? केवळ सार्क युनिव्हर्सिटीमध्ये आल्यामुळेच मला पाणीपुरीची चव कळू शकली आणि मी तिच्या प्रेमात पडले. मालदीवमध्ये पाणीपुरी मिळत नाही. पण टीव्हीवर पाहिल्यामुळे मला त्याविषयी कुतूहल होते. पाणीपुरी खाल्ल्याशिवाय आमची सरोजिनी मार्केटची फेरी पूर्ण होऊच शकत नाही. सार्क युनिव्हर्सिटीतील माझ्या मित्र-मैत्रिणींपैकी केवळ पूजा हिलाच माझ्याइतकी पाणीपुरी आवडते. सार्क युनिव्हर्सिटीमुळेच मला हॅरिस आणि अबू यांसारखे मित्र मिळाले. पहाटे चार वाजता जेव्हा ते तुम्हाला चुकीच्या विमानतळावर नेतात आणि तिथून प्रयत्नपूर्वक योग्य जागी आणल्यावर तुमच्या चुकीमुळे पुन्हा गोंधळ होतो तेव्हाही ते तुमच्यावर ओरडत नाहीत की चिडत नाहीत. तुमच्यामुळे त्यांचे फोन तुटले तरी ते तुमचा जीव घेत नाहीत!

अभ्यासाविषयी बोलायचे झाले तर आमच्या लॉ डिपार्टमेंटमध्ये भारतभरातून आलेले उत्तम शिक्षक आहेत. मात्र सार्क युनिव्हर्सिटी ही सार्क देशांची असल्यामुळे त्यांचे प्रतिबिंब शिक्षकांमध्ये पडलेले असेल, असे मला वाटत होते. आमच्या डिपार्टमेंटमध्ये एक पाकिस्तानी शिक्षक होते (ते आता सोडून गेले आहेत), परंतु आम्हाला त्यांची लेक्चर्स ऐकण्याची संधी मिळाली नाही. आमच्या सध्याच्या युनिव्हर्सिटीच्या प्रेसिडेंटनी असे सांगितले आहे की, इतर सार्क देशांतून शिक्षक आणण्यासाठी खास प्रयत्न केले जातील. अभ्यासक्रमाच्या आखणीबाबतही तेच. मुख्यतः भारत आणि काही वेळा बांगलादेश व नेपाळ यांसारख्या देशांवर लक्ष केंद्रित केले जात असल्याने, मालदीवसारख्या छोट्या देशांकडे दुर्लक्ष होते असे मला वाटते.

International Relations आणि Sociology सारख्या डिपार्टमेंटबाबतसुद्धा ही गोष्ट खरी आहे. जरी ङङच च्या पहिल्या सेमिस्टरमध्ये ‘राज्यघटनांचा तुलनात्मक अभ्यास’ हा विषय शिकवला जातो, तरीसुद्धा सार्क युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत मालदीवच्या राज्यघटनेची अद्याप एकही प्रत नाही. अर्थात, ही अजूनही तुलनेने नवी युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे भविष्यकाळात हे चित्र बदलू शकेल. सार्क युनिव्हर्सिटीमुळे माझ्यात इतर सार्क देशांची संस्कृती आणि परंपरा यांविषयी जास्त अवेअरनेस आला. सार्क युनिव्हर्सिटीमधील कार्यक्रमांमुळे मला नेपाळी नृत्यप्रकार, अफगाणी जेवण, वैविध्यपूर्ण पारंपरिक पोशाख, भारतीय संगीत आणि बांगलादेशी मुलांमुळे ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषादिन’ (२१ फेब्रुवारी) याची ओळख झाली.

सार्क युनिव्हर्सिटीमधला कुठलाही कार्यक्रम (पाकिस्तानी विद्यार्थी) नौमानच्या गाण्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्याने गायलेले ‘गुलाबी आँखे’ हे गाणे मी कधीच विसरू शकणार नाही. (राजेश खन्ना व नंदा यांच्यावर चित्रीत झालेले ‘द ट्रेन’ या सिनेमातील ते गाणे आहे.) मला जश्न-ए-आझादी या नावाने होणारा भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचा संयुक्त कार्यक्रम (१४ ऑगस्टच्या रात्री) अनोखा वाटला. जर त्या दोन देशांचे विद्यार्थी एकमेकांचे स्वातंत्र्यदिन एकत्रपणे साजरे करू शकतात, तर त्या दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित होण्याची आशा आपण करू शकतो. सार्क युनिव्हर्सिटीमधले माझे अनुभव परिपूर्ण नाहीत, पण मी त्यांची तुलना इतर कशाशीच करू शकत नाही. माझे LLM पूर्ण झाल्यावर मी मालदीवमध्ये परत जाईन तेव्हा मी पूर्वी साधे-साधेच वाटणारे छोटे प्रसंग मिस करेन. जसे की, प्रेझेन्टेशन, परीक्षा किंवा रिसर्च पेपरसाठी जागवलेल्या रात्री, In and out जवळच्या स्टॉलवर मित्र- मैत्रिणींसोबतचा चहा, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात केलेली रात्रीची जेवणे, बंगाली भाषा शिकण्याचा प्रयत्न, सरोजिनी मार्केटमधील शॉपिंग वगैरे... या आठवणी आयुष्यभरासाठी मी जपून ठेवणार आहे.

थाटू शरीफ सध्या सार्क युनिव्हर्सिटीमधून LLM (जुलै २०१३ पासून) करीत आहे. तिची तिसरी सेमिस्टर पूर्ण झाली असून, शेवटची चौथी सेमिस्टर चालू आहे.

Tags: सार्क विद्यापीठ एलएलएम थाटू शरीफ शिक्षण education LLM saarc university gulabi aankhe jo teri dekhi maldiv thaathu sharif weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके